शिक्षकाचे विद्यार्थ्याच्या आणि समाजाच्या जीवनातील स्थान शून्यवत होत चालले आहे. शिक्षकांची विश्वासार्हता उरली नाही. त्यांचा स्तर आणि स्थान कसे उंचावेल याची अग्रक्रमाने चिंता करण्याची गरज असताना पंतप्रधानांनी 'शिक्षक दिना' निमित्त शिक्षकांऐवजी विद्यार्थ्यांना संबोधित करून एका महत्वाच्या विषयावर शिक्षकाचे, समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्याची मोठी संधी गमावली.
--------------------------------------------
--------------------------------------------
सध्या आपल्या देशात दोन तट पडले आहेत. एक आहे कट्टर मोदी समर्थकांचा तर दुसरा कट्टर मोदी विरोधकांचा. समर्थकांना मोदींची प्रत्येक कृती कमालीची आवडते. त्याच कृतीवर विरोधकांचे नाक मुरडणे सुरु असते. मोदींच्या कृतीमधील चांगले विरोधकांना दिसत नाही आणि वांगले समर्थकांना आढळत नाही. त्यामुळे पंतप्रधानांची प्रत्येक कृतीवर वाद झडत असतात. पंतप्रधानानी 'शिक्षक दिना'चे निमित्त साधून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रमही असाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. केंद्राच्या मानव संसाधन मंत्रालयानेच या विषयावरील वादाला दारुगोळा पुरवीला. देशभरातील सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांच्या सक्तीच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे शाळा-शाळातून प्रसारण करण्याची व्यवस्था करण्याची सक्ती करण्यात आली होती. पंतप्रधानांचे १५ ऑगस्टचे लाल किल्ल्यावरील भाषण देशभर प्रसारित होत असते आणि ते देशभर ऐकलेही जाते. देशासाठीच्या ऐतिहासिक प्रसंगाचे भाषण ऐकण्याची सक्ती कधी केली गेली नाही . त्यामुळे ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिना निमित्तचे भाषण ऐकण्याची सक्ती आश्चर्यकारकच होती. मोदी विरोधकांनी या सक्तीचे भांडवल केले नसते तर नवल ! दुसरीकडे सक्तीच्या मुद्द्याकडे संपूर्ण कानाडोळा करून कोणत्याही पंतप्रधानाला जे सुचले नाही ते मोदींना सुचले म्हणून समर्थकांनी ढोल बडविले नसते तर ते देखील नवलच ठरले असते. एक मुलभूत प्रश्न दोघांनाही पडला नाही.शिक्षक दिनी शिक्षकांना संबोधित करण्या ऐवजी विद्यार्थ्यांना संबोधित करण्याचे काय प्रयोजन होते हा तो प्रश्न. आपल्या देशात शिक्षक हा प्राणी चिंतेचा विषय ठरला आहे. विद्यार्थ्यांना नवे काही देण्याची त्याची तयारी , क्षमता यावर भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. विद्यार्थी आणि शिक्षण याप्रती त्याची समर्पण भावना हा शोधाचा विषय बनला आहे. शिक्षकाचे विद्यार्थ्याच्या आणि समाजाच्या जीवनातील स्थान शून्यवत होत चालले आहे. शिक्षकांची विश्वासार्हता उरली नाही. त्यांचा स्तर आणि स्थान कसे उंचावेल याची अग्रक्रमाने चिंता करण्याची गरज असताना पंतप्रधानांनी शिक्षकांऐवजी विद्यार्थ्यांना संबोधित करून एका महत्वाच्या विषयावर शिक्षकाचे, समाजाचे आणि सरकारचे लक्ष केंद्रित करण्याची मोठी संधी गमावली.
स्वत: पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या प्रारंभीच शिक्षकाची आज काय पत उरली आहे हे स्पष्ट शब्दात सांगितले. शिक्षकाचे समाजातील महत्व कमी कमी होत चालले आहे आणि त्यामुळे नवी पिढी घडविण्याची क्षमता देखील कमी कमी होत चालल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. या मुद्द्यांवर शिक्षकांशी बोलणे किती जरुरीचे होते हेच मोदींच्या भाषणातून अधोरेखित झाले. तसे पाहिले तर मोदींच्या भाषणातील तीन चतुर्थांश भाग विद्यार्थ्यांशी कमी आणि शिक्षकांशी जास्त संबंधित होता. ही बाब सुद्धा हेच अधोरेखित करते कि शिक्षक दिनी शिक्षकांना संबोधित करणे किती गरजेचे होते. ज्या देशभरच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी संबोधित केले त्यांच्या डोक्यावरून जाणारा हा भाग होता. भाषण विद्यार्थ्यांना संबोधून असल्याने शिक्षकांनी ते आपल्या डोक्यात शिरवून घेण्याचा प्रश्नच नव्हता. याचा अर्थ पंतप्रधानानी अतिशय महत्वाचे आणि समर्पक मुद्दे मांडूनही त्यावर समाजाचे सोडाच शिक्षकांचे देखील लक्ष गेले नाही. पंतप्रधान विद्यार्थ्यांना संबोधित करणार असल्याने ते विद्यार्थ्यांविषयी काय बोलतात कसे बोलतात हाच औत्सुक्याचा विषय बनविण्यात आला आणि मग चर्चा देखील तेवढ्यापुरती मर्यादित राहिली. भाषणाचा समारोप तेवढा विद्यार्थी केंद्रित होता. तो चांगलाही होता , विद्यार्थ्यांना समजला आणि आवडला देखील. देशाच्या पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व सांगावे, अवांतर वाचनाचे , चरित्र वाचनाचे महत्व पटवून द्यावे , दिवसातून किमान चारदा शरीरातून घाम निथळला पाहिजे एवढे खेळायला सांगणे याचा विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगण्याची नितांत गरज होतीच. या गोष्टी करण्याचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य नसेल तर हा सगळा उपदेश निव्वळ उत्सवी आणि निरर्थक ठरणार आहे. या संदर्भातही शिक्षकांशीच बोलण्याची अधिक गरज होती.
पूर्वी प्रत्येक महान व्यक्तीकडून त्याच्या जडणघडणीत आई इतकाच शिक्षकाचा हात असल्याचे सांगितले जायचे. हल्ली शिक्षकांबद्दल असे काही ऐकू येत नसल्याची खंत पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून बोलून दाखविली. या शिवाय पंतप्रधानांनी आपल्या भाषणात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पूर्वी गावात सर्वाधिक मान शिक्षकाला दिला जायचा .त्याचा शब्द शेवटला समजला जायचा. पण आज ती स्थिती नाही. विद्यार्थ्याच्या आणि गावाच्या जीवनात पूर्वीसारखे शिक्षकांचे स्थान उरले नाही. कारण अपवादात्मक गाव असेल जिथे शिक्षक राहतो आणि अपवादात्मक शिक्षक असेल जो आपल्या नियुक्तीच्या गावी राहतो. शाळेच्या तासापलीकडे शिक्षकांचा गावाशी सोडा विद्यार्थ्यांशी देखील संबंध येत नाही. शिक्षकाचा शाळेच्या तासा पलीकडे विद्यार्थ्यांशी संबंध आलाच तर तो शिकवणीच्या तासा पुरता येतो. शिक्षकाच्या हातून विद्यार्थ्याची जडणघडण व्हायची असेल तर त्याला विद्यार्थ्याची कौटुंबिक,सामाजिक परिस्थिती समजून घ्यावी लागेल आणि त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल. आज कोण्या शिक्षकाकडे असा देण्यासाठी वेळ नाही आणि इच्छा तर अजिबातच नाही. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकाच्या नात्यातील दुराव्यास सर्वार्थाने शिक्षकच जबाबदार आहे. पंतप्रधानांना हे माहित नाही असे मानण्याचे कारण नाही. पण विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांच्या गुरुजनांचा कान धरणे शोभून दिसले नसते. पंतप्रधानांनी शिक्षकदिनी विद्यार्थ्यांना संबोधित करण्याचा घाट न घालता सरळ शिक्षकांना संबोधित केले असते तर त्यांना रोखठोक बोलता आले असते.
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षकांनी आधी अवांतर वाचन करायला हवे ना ! जिथे शिक्षकच पाठ्यपुस्तका पलीकडे काही वाचत नाही तिथे विद्यार्थी दुसरे काय वाचणार ? शाळामध्ये जसे मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत तशीच वाचनालय नाही कि वाचायला निवांत बसता येईल अशी जागा नसते. खेळांची मैदाने नसलेल्या शाळांची संख्याच आता वाढू लागली आहे. शाळेतच वाचनाची , खेळण्याची सोय नसेल तर त्या सवयी विद्यार्थ्यांना कोण , कुठे आणि कशा लावणार आहे ? पंतप्रधान सरळ शिक्षकाशी बोलले असते तर या प्रश्नाच्या मुळाशी त्यांना जाता आले असते. एकाच वेळी कोट्यावधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात भव्यता आली , भाषणाचे कौतुक सुद्धा भव्य प्रमाणात झाले. पण शिक्षक आणि शिक्षणाची दुरावस्था यात फरक पडेल असे त्या भाषणात काहीच नसल्याने उत्सवमूर्ती मोदींचे उत्सवी आणि विक्रमी भाषण एवढेच त्या भाषणाचे महत्व आहे. फार तर वर्षभरात मुलींसाठी शाळांमधून स्वच्छतागृह नावाचे अस्वच्छ आडोसे उभे राहतील. मुली आगीतून फुफाट्यात पडतील इतकेच! कारण स्वच्छतेचे महत्व सांगणे ही शिक्षकाची जबाबदारी राहिलीच नाही. पाठ्यपुस्तकातील धडे वाचून दाखविणे एवढीच त्याची जबाबदारी आहे ! विद्यार्थ्याच्या जीवनात बदल घडवायचा असेल तर आधी शिक्षकात सर्वांगाने आणि सर्वार्थाने बदल होणे गरजेचे आहे. त्याचसाठी मोदींनी विद्यार्थ्यांचा क्लास घेण्या ऐवजी शिक्षकदिनी शिक्षकांची शाळा घ्यायला हवी होती ! शिक्षकांच्या अशा शाळेत पंतप्रधानांनी एकच घोषणा करण्याची आवश्यकता होती. शिक्षकांना मोबदला वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार नाही तर त्यांच्या शिकविण्याच्या परिणामानुसार मिळेल ! अशी घोषणा हाच शिक्षण क्षेत्रातील बदलाचा श्रीगणेशा ठरला असता.
-------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा,जि.पांढरकवडा
सुधाकर जाधव, पांढरकवडा,जि.पांढरकवडा
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------
-------------------------------------------------