Thursday, April 12, 2012

बिनचेहऱ्याचे राजकीय पक्ष

------------------------------------------------------------------------------------------------
देशाला पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा झपाटा आणि आवाका लक्षात घेवून त्या गतीने देशाला पुढे नेण्याची जिद्द असणाऱ्या पर्यायाची गरज आहे. तंत्रज्ञानाला मानवीय चेहरा देण्याचे कौशल्य असणे ही या पर्यायाची पूर्व अट असली पाहिजे. आज देशाला एखादा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याचा पुरुषार्थ गाजविणाऱ्या नेतृत्वाची गरज नाही . गरज आहे ती अरबी समुद्रातही प्रकल्प उभे करण्याची जिद्द बाळगणाऱ्या नेतृत्वाची . गरज आहे ती आजच्या सर्व पक्षांना अरबी समुद्रात बुडविण्याची .ताकद असणाऱ्या पर्यायी पक्षाची.
------------------------------------------------------------------------------------------------

आजच्या जाहिरातीच्या युगात जाहिरातीचीही जाहिरात केली जाते. जाहिरातीची कशी आवश्यकता आहे हे दाखविणारी एक जाहिरात आपण नेहमीच पाहतो.या जाहिरातीत वस्तूंचे खोके कोरे दाखविले जाते. त्यामुळे सर्व वस्तू सारख्याच दिसतात. वस्तूंचे वैशिष्ठ्य कळत नाही. बाजारात अशा पद्धतीने वस्तू विकायला ठेवल्या तर ग्राहक त्यातून निवड कशी करणार असा प्रश्न त्या जाहिरातीत उपस्थित करण्यात आला आहे. भारतातील विद्यमान राजकीय पक्षांना ही जाहिरात तंतोतंत लागू पडते. भारतीय राजकारणाच्या बाजारात सर्व राजकीय पक्ष हे कोऱ्या खोक्या सारखे आहेत. त्यामुळे आपल्या पसंतीचा राजकीय पक्ष निवडताना पक्षा -पक्षात काय आणि कसा फरक करावा असा प्रश्न भारतीय मतदारांना हमखास पडतो आणि नेहमीच पडतो. कारण लोकांना सगळे राजकीय पक्ष सारखेच वाटतात. त्यांच्या घोषणा , त्यांचे तत्वज्ञान (असे काही असेल तर !) आणि त्यांचे वर्तन यांच्यात मतदारांना कमालीचे साम्य वाटत आले आहे. मतदारांना जे कधीच वाचायला मिळत नाहीत किंवा मतदार जे कधीच वाचत नाही अशा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करून प्रसिद्ध होणारे राजकीय पक्षांचे जाहीरनामे सुद्धा एकाच छापाचे असतात. त्यांच्यात फरक असेल तर एवढाच की कोणता पक्ष मतदारांना तांदूळ किंवा गहू दोन रुपये किलोने देणार की एक रुपये किलोने देणार ! म्हणजे प्रचलित भाषेत ज्याला १९-२० चा फरक म्हणतात तसा हा प्रकार . वेगळी ओळख असलेले राजकीय पक्ष अगदीच नाहीत असे नाही. पण ते पक्ष एक तर मर्यादित भूभागा पुरतेच अस्तित्वात असतात किंवा मग त्यांच्या ओळखीला राष्ट्राच्या सीमेच्या मर्यादा नसतात. शिवसेना आणि त्यातूनच वेगळा निघालेली महाराष्ट्र नाव निर्माण सेना हे वेगळी ओळख असलेले मर्यादित भूभागातील राजकीय पक्षाचे उत्तम उदाहरण आहे. पण यांच्यातही निवड करायची झाली तर मतदारांचा गोंधळ काही कमी होत नाही. शिवसेना आणि मनसे म्हणजे १९-२० चा प्रकार. मराठी भाषेचा व भाषिकांचा अभिमान हे समान सूत्र आणि फरक काय तर हा अभिमान दर्शविण्यासाठी राडा घालण्याची ताकद किती आणि पद्धत कोणाची अधिक आकर्षक आहे इतकाच ! तामिळनाडूतील तामिळी पक्ष असेच. फक्त ते आपसात राडा करतात इतकेच ! ज्यांची ओळख वेगळी आहे आणि राष्ट्राच्या सीमाही ही ओळख मर्यादित करीत नाही असे पक्ष म्हणजे ज्याला आपण डावे किंवा कम्युनिस्ट पक्ष म्हणतो ते . यांचेकडे तत्वज्ञान आहे. पण ते तत्वज्ञान साऱ्या जगाला लागू पडते असा यांचा दावा . भारतीय परिस्थिती भिन्न असली तरी युरोपीय आर्थिक आणि औद्योगिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले तत्वज्ञान भारतावर थोपविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने वेगळी ओळख असली तरी त्यात भारतीयतेचा अभाव असल्याने कम्युनिस्ट पक्षांना राष्ट्रीय पक्षाचे स्वरूप आले नाही. तत्वज्ञान व्यापक आणि अस्तित्व मर्यादित भूभागा पुरते अशी यांची अवस्था. तत्वज्ञान जर एक आहे तर कम्युनिस्ट पक्ष एक का नाही हे मतदारांना कधीच कळले नाही. म्हणजे मतदाराची संभ्रमातून सुटका इथेही नाही! फक्त डावे पक्ष हल्ली एकमेकाविरुद्ध निवडणूक लढणे टाळत असल्याने त्यांच्या पैकी कोणाची निवड करावी हा संभ्रम डाव्या मतदारांना पडत नाही . पण यांच्याही बाबतीत सगळे डावे पक्ष एकाच छापाचे आहेत या परिस्थितीत फरक पडत नाही . त्यांनी जर एकमेका विरुद्ध निवडणूक लढविली तर कोणाची कोणत्या आधारावर निवड करावी असा प्रश्न मतदारा समोर पडल्या शिवाय राहणार नाही. विशिष्ठ भूभागा वर प्रभाव असणारे किंवा स्थानिक अथवा प्रादेशिक पक्ष यांचा अस्पष्ट का होईना एक चेहरा समोर येतो. पण ज्यांना खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखल्या जाते त्या पक्षांची वेगळी ओळख काय आहे हे सर्व सामान्यांना सोडा पण राजकीय विश्लेषणात तरबेज असणारी विद्वान मंडळीही सांगू शकणार नाहीत. कॉंग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षावरील संकट दुहेरी आहे. हे दोन्ही पक्ष आपली स्वत:ची ओळख हरवून बसले आहेत हे पहिले संकट आणि यांच्यातील फरकाची सीमारेषा अतिशय धुसर होत चालल्याने कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील फरकच मतदारांना कळेनासा झाला आहे. या दोन पक्षांना मतदान करण्या पेक्षा कसा का होईना पण चेहरा आहे अशा स्थानिक व प्रादेशिक पक्षाकडे वळू लागल्याने अनेक नव्या समस्या निर्माण होणार आहेत . यातून उदयाला येणाऱ्या राजकीय नेतृत्वाची समज प्रादेशिक राहणार असल्याने त्यांना राष्ट्रीय समस्यांचे भान असणार नाही आणि तसे भान आले तरी त्या समस्या सोडविण्याची दृष्टी आणि कुवत असणार नाही. जगप्रसिद्ध टाईम मासिकाचे .संपादक फरीद झकेरिया यांचे भारतीय नेतृत्व कुपमंडूक असल्याने त्याला जागतिक परिस्थितीचे भान नाही आणि जागतिक संधीचा उपयोग करून घेण्याची क्षमता नाही हे त्यांचे मत खरे असले तरी गैरलागू आहे. कारण जागतिक परिस्थिती ही दूरची गोष्ट झाली, इथल्या नेतृत्वाला तर राष्ट्रीय परिस्थितीचे सुद्धा भान नाही आहे. म्हणूनच बिनचेहऱ्याचे राजकीय पक्ष ही मोठी समस्या बनली आहे आणि ही समस्या सुटत नाही तो पर्यंत प्रगती आणि विकास हे स्वप्नरंजन ठरणार आहे.

कॉंग्रेस - भाजप ची दुर्दशा

देशातील सर्वात जुना आणि मोठा असलेला कॉंग्रेस पक्ष आपला चेहरा मोहरा गमावून बसला आहे. स्वातंत्र्य मिळेपर्यंत महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली असलेली कॉंग्रेस स्वातंत्र्या नंतर पंडीत नेहृच्या नेतृत्वाखाली आली. या दोघांच्या विचारामध्ये टोकाचे अंतर असल्याने आणि दोघांचाही कॉंग्रेस वर चांगला प्रभाव असल्याने कॉंग्रेस ला कधीच सुस्पष्ट दिशा घेवून पुढे जाता आले नाही की स्वत:चे स्वतंत्र असे आर्थिक , सामाजिक व राजकीय दर्शन निश्चित करता आले नाही. पण स्वातंत्र्य लढ्याचा वारसा असल्याने सर्वाना सोबत घेवून जाण्याची दृष्टी मात्र या पक्षाकडे होती आणि यातून एक मध्यम मार्गी पक्ष अशी प्रतिमा या पक्षाची तयार झाली. जोडीला स्वातंत्र्य लढ्याचा तोंडावळा या पक्षाकडे होता. पण नेहरू युगाच्या अस्ता सोबत कॉंग्रेस ची ओळख लयाला गेली आणि इंदिराजीच्या कृतीने कॉंग्रेसला घराणेशाहीचा चेहरा लाभला. घराणेशाही टिकवायची असेल तर तोडा आणि फोडा अशीच राजनीति करने इंदिराजींना भाग होते. पण ही राजनीति फक्त पक्षांतर्गत असून उपयोगाची नव्हती. समाजाचे बळ त्यासाठी हवे होते. सिलिंग कायद्याची अंमलबजावणी, वीस कलमी कार्यक्रम अशा माध्यमातून समाजाची विभागणी करून इंदिराजींनी कॉंग्रेस ला आपल्या दावणीला बांधले. कॉंग्रेसची ओळख इंदिरा कॉंग्रेस अशी झाली ती याच मुळे. पण जसा स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव आणि नेहरूंचा प्रभाव ओसरल्या बरोबर कॉंग्रेस पुढे आपल्या ओळखीचे संकट निर्माण झाले , तसेच आज घराणेशाहीचा आधारावर उभ्या असलेल्या कॉंग्रेस समोर घराणे शाहीचा प्रभाव झपाट्याने ओसरत चालल्याने आपल्या ओळखीचे व अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. त्यावेळी या पक्षाला इंदिराजींनी आपला चेहरा देवून कॉंग्रेसला नवी ओळख दिली. पण आता ही ओळख एवढी धुसर झाली आहे की हा पक्ष बिन चेहऱ्याचा पक्ष दिसू लागला आहे. ज्या पक्षाला स्वत:चा चेहरा नाही तो पक्ष देशाला चेहरा देवू शकणार नाही हे उघड आहे. पण याच मुळे देशात भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इतरांच्या कुबड्याच्या मदतीने ही पोकळी भरून काढण्याची संभावना असलेल्या भारतीय जनता पक्षाची अवस्थाही कॉंग्रेस पेक्षा वेगळी नाही.

भारतीय जनता पक्षाला चेहरा नाही अशातला भाग नाही. त्याचा चेहरा पुराणमतवादी कर्मठ हिंदुत्वाचा आहे. अशा हिंदुत्वा बद्दल गर्व असल्याची डरकाळी या पक्षाचे काही धुरीण फोडीत असतात. पण पक्ष म्हणून आपला हिंदू चेहरा लपविण्याची खटपट हा पक्ष नेहमीच करीत आला आहे. हा चेहरा बदलला तर मागे कोणी उभे राहात नाही आणि या चेहऱ्याने सत्तेच्या जवळ पोचता येत नाही अशा संकटात हा पक्ष सापडला आहे. मधला मार्ग म्हणून चेहऱ्यावर अटल बिहारींचा मुखवटा पक्षाला स्वीकारावा लागला होता. नरेंद्र मोदीचा चेहरा समोर केला तर मते मिळत नाही , आणि पक्षात असे नरेंद्र मोदी नसतील तर पक्षापुढेच अस्तित्वाचे संकट उभे राहते अशा चक्रव्यूहात हा पक्ष सापडला आहे. म्हणून तर या पक्षाला मते मिळविण्या साठी अटल बिहारींचा मुखवटा लागतो आणि जेव्हा असा मुखवटा लावावा लागतो तेव्हा तेव्हा मूळचा चेहरा उपयोगी नाही हे उघड आहे. या देशातील हिंदू मुलत: उदार असल्याने त्यांना कट्टर हिंदुत्व वादी बनविण्याचे सगळे प्रयत्न असफल ठरले आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून बाबरी मस्जिद जमीनदोस्त करण्यात आली. मोदींनी गुजरातेत मोठा नरसंहार घडवून आणला . देशातील हिंदू समाज काही काळा साठी त्यांच्या सोबत मनाने वाहवत गेला असेल पण त्याला भानावर यायला वेळ लागला नाही. देशातील हिंदुना कट्टरपंथी बनविण्याचा उपद्व्याप करण्याऐवजी हिंदु उदार वादाच्या लाटेवर आरूढ होवून पक्षाला सत्तेचा सोपान गाठणे सहज शक्य आहे या अटल अनुभवापासून पक्ष काही शिकलेला नाही. सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण उदारवाद मान्य नाही अशी टोकाची भूमिका असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात जो पर्यंत पक्षाच्या नाड्या आहेत तो पर्यंत पक्षाला हे सत्य दिसणे आणि पचणे संभव नाही. प्रगत राष्ट्रात ख्रिस्ती धर्माचा अभिमान बाळगणारे पक्ष आहेत आणि ते सत्तेवरही येतात. पण त्या पक्षात धार्मिक कट्टरतेला वावच नसतो. तिकडे ही धार्मिक कट्टरता जोपासणारे पक्ष आहेत पण त्यांना सहजा सहजी सत्ता मिळत नाही. भारतीय जनता पक्षाची तशीच अवस्था आहे. लोकांना इच्छे विरुद्ध कॉंग्रेसचे मढे आपल्या खांद्यावर याच मुळे वाहावे लागतं आहे.

पर्यायाला पर्याय नाही

आपल्याकडील पक्षांना आर्थिक , राजकीय असे तत्वज्ञान नसल्याने त्यांची तशी ओळख कधी निर्माण झालीच नाही. कम्युनिस्ट पक्षांकडे असे तत्वज्ञान आहे पण त्याला भारतीय संदर्भ ही नाही आणि भारतीय चेहराही नाही. कारण प्रादेशिक पक्षांची ओळख प्रामुख्याने जातीच्या आणि भाषिक अस्मितेने पटते. अशा प्रकारे आपली लोकशाही एक तर सपाट चेहऱ्याच्या किंवा मग कालबाह्य चेहऱ्याच्या पक्षावर अवलंबून आहे. परिणामी सर्वच राजकीय पक्षाची आर्थिक ,सामाजिक , राजकीय समज कालबाह्य तरी आहे किंवा तोकडी तरी आहे. जगात तंत्रज्ञानाचा ज्या गतीने विकास होतो आहे ते लक्षात घेतले तर प्रचलित राजकीय पक्ष्याच्या सहाय्याने देशाला त्या गतीशी जुळवून घेताच येणार नाही हे उघड आहे. जग पुढे जाताना दिसते आणि आपण मागे येताना दिसतो ते याच मुळे. पण या पक्षांच्या विरोधात जी राजकीय संस्कृती विकसित होत आहे ती देखील या पक्षा इतकीच धोकादायक आहे. राजकीय पक्ष नको म्हणून अण्णा संस्कृती किंवा विकास विरोधी ममता-मेधा पाटकर संस्कृतीचा अवलंब तितकाच घातक आहे. देशाला पुढे नेण्यासाठी म्हणूनच तंत्रज्ञानाचा झपाटा आणि आवाका लक्षात घेवून त्या गतीने देशाला पुढे नेण्याची जिद्द असणाऱ्या पर्यायाची गरज आहे. तंत्रज्ञानाला मानवीय चेहरा देण्याचे कौशल्य असणे ही या पर्यायाची पूर्व अट असली पाहिजे. आज देशाला एखादा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याचा पुरुषार्थ गाजविणाऱ्या नेतृत्वाची गरज नाही . गरज आहे ती अरबी समुद्रातही प्रकल्प उभे करण्याची जिद्द बाळगणाऱ्या नेतृत्वाची . गरज आहे ती आजच्या सर्व पक्षांना अरबी समुद्रात बुडविण्याची .ताकद असणाऱ्या पर्यायी पक्षाची . अशा पर्याया खेरीज देशाला तरणोपाय नाही.

(समाप्त)


सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ.

1 comment:

  1. कुठलाही नवा राजकीय पक्ष स्थापन करताना काही नियम करण्याची गरज आहे. यांमध्ये त्यांना स्वतःची राजकीय तत्त्व प्रणाली काय आहे, ती सध्या उपलब्ध असणाऱ्या पक्षान्पेक्षा वेगळी कशी आहे हे स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे असावे. पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पक्षाच्या विदित ध्येय धोरणांशी सुसंगत असणे गरजेचे असावे. हे नसल्यास पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी व अशा पक्षाद्वारे निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून घोषित करण्यात यावेत. आज स्थापण्यात येणारे बहुसंख्य पक्ष व्यक्तिगत स्वार्थ आणि महत्त्वाकांक्षा यामुळे निर्माण होत आहेत. यावर नियंत्रण बसणे गरजेचे आहे.

    ReplyDelete