Thursday, October 26, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७८

 वाजपेयी काळात मनमोहनसिंग काश्मीरवर लक्ष ठेवून होते आणि याची प्रचिती ते पंतप्रधान झाल्याबरोबर आली. वाजपेयी काळात सुरु झालेली प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सरकारचा दूत म्हणून वाजपेयी यांनी काम करावे अशी विनंती पंतप्रधानाच्या वतीने वाजपेयी यांना करण्यात आली होती.
------------------------------------------------------------------------------------------
    

पंतप्रधान वाजपेयी यांच्या काळापर्यंत भारताच्या काश्मीर धोरणाचे एक वैशिष्ट्य राहिले आहे. ते म्हणजे एका पंतप्रधानाने आखलेले काश्मीर धोरण नंतर येणाऱ्या पंतप्रधानाने पुढे नेले नाही. याला अल्पकाळाचा अपवाद राहिला आहे तो नरसिंहराव यांचे नंतर पंतप्रधान झालेले देवेगौडा यांचा. दशकभर राज्यपाल व राष्ट्रपती राजवटीचा अंमल राहिलेल्या जम्मू-काश्मीर मध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणूक घेवून निर्वाचित सरकारच्या हाती तेथील कारभार सोपविण्याचा नरसिंहराव यांचा प्रयत्न व आग्रह होता. यासाठी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत देता येईल तितकी स्वायत्तता देण्याची त्यांची तयारी होती. नरसिंहराव यांचे हेच धोरण आपल्या ११ महिन्याच्या अल्प कार्यकाळात देवेगौडा यांनी पुढे नेले व विधानसभेच्या निवडणुका घेतल्या. स्वायत्ततेच्या बाबतीत नरसिंहराव यांचेच धोरण पुढे नेण्याची घोषणाही त्यांनी केली होती. काश्मीर विधानसभेने पारित केलेला भारतीय राज्यघटने अंतर्गत स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव वाजपेयी सरकारने फेटाळून आधीच्या सरकारच्या धोरणाशी फारकत घेतली. काश्मीरच्या बाबतीत अशी फारकत पहिल्यांदाच घेतली गेली नव्हती. आपल्या शेवटच्या दिवसात पंडीत नेहरुंना शेख अब्दुल्लांना अटक ही चूक होती याची जाणीव झाली होती. शेख अब्दुल्लांना बाजूला सारून काश्मीर बाबत तोडगा काढता येणार नाही हेही त्यांच्या लक्षात आले होते. शेख अब्दुल्लांची मुक्तता करून काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले. या कामी मदत करण्यासाठी त्यांनी आग्रहपूर्वक लालबहादूर शास्त्रींना दिल्लीला बोलावून मंत्रीमंडळात सामील करून घेतले व काश्मीरप्रश्नी वाटाघाटीची जबाबदारी सोपविली होती. पण पुढे काही प्रगती होण्या आधीच नेहरूंचे निधन झाले. त्यांच्या नंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि शेवटच्या काळात नेहरूंनी काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याचे सुरु केलेले प्रयत्न थांबविले. शास्त्रींच्याच काळात शेख अब्दुल्लांना पुन्हा अटक करण्यात आली होती.                                                                                                           

शास्त्री यांचे नंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधीनी शास्त्रींच्या काळातील काश्मीर धोरण पुन्हा बदलले. त्यांनी शेख अब्दुल्लांची तुरुंगातून सुटका करून त्यांच्याशी वाटाघाटी सुरु केल्या. त्यांच्या सोबत करार करून त्यांचेकडे काश्मीरची सत्ताही सोपविली आणि आपल्याच कार्यकाळात शेख अब्दुल्ला नंतर सत्तेत आलेल्या फारूक अब्दुल्ला यांच्या सत्तेला आव्हान दिले. त्यांचे सरकार बडतर्फ करून व त्यांच्या पक्षात फुट पाडून नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग प्रशस्त केला. इंदिरा गांधी यांचे नंतर सत्तेत आलेल्या राजीव गांधीनी पुन्हा इंदिरा गांधींच्या काश्मीर धोरणात बदल करून फारूक अब्दुल्लाशी जुळवून घेतले. काश्मीरच्या बाबतीत अशी धरसोड सातत्याने झाली आहे. आधीच्या कार्यकाळातील काही धोरणे स्विकारायची काही नाकारायची असेही घडले. नरसिंहराव यांचे स्वायत्ततेचे धोरण वाजपेयींनी फेटाळले पण काश्मिरातील पृथकतावादी आणि दहशतवादी गटांशी चर्चा करून त्यांना मुख्य धारेत आणण्याचे नरसिंहराव यांनी सुरु केलेले प्रयत्न मात्र वाजपेयींनी पुढे चालू ठेवले होते. वाजपेयी काळात आखलेले काश्मीर बाबतचे संपूर्ण धोरण आपल्या पहिल्या कार्यकाळात पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे एकमेव पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग होते. पंतप्रधान बदलला की काश्मीर बाबतीत धोरणही बदलते यात खंड पडला. मात्र काश्मीर धोरणा संदर्भात सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणात खंड पडला नाही. काश्मीर संदर्भात वाजपेयींचे धोरण पुढे नेणाऱ्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांना वाजपेयी यांचेकडूनच विरोध झाला. मनमोहनसिंग काश्मीर बाबतीत मऊ धोरण अवलंबित असल्याचा वाजपेयींनी आरोप केला होता. काश्मीरसह सर्व प्रश्नांवर सर्व पातळ्यावर चर्चा आणि सहकार्य हे वाजपेयींनी आखलेले धोरणच वाजपेयींच्या पराभवानंतर डॉ.मनमोहन सिंग यांनी पुढे नेले. याच्या परिणामी सिंग यांच्या २००४ ते २००९ या पहिल्या  कार्यकाळात २००८ चा अपवाद वगळता काश्मीर शांत राहिले. 

पंतप्रधान बनण्याच्या आधीपासून मनमोहनसिंग काश्मीर संबंधीच्या निर्णय प्रक्रियेत सामील होते. नरसिंहराव मंत्रीमंडळात मनमोहनसिंग अर्थमंत्री असले तरी नरसिंहराव यांनी काश्मीरच्या सल्लामसलतीत सिंग यांना सामील करून घेतले होते. राजेश पायलट यांचेकडे काश्मीरचा प्रभार असला तरी काश्मीर संबंधीचा कोणताही प्रस्ताव मनमोहनसिंग यांच्या चिकित्सेनंतरच नरसिंहराव यांच्या विचारार्थ जात असे. काश्मीर प्रश्नाशी सिंग यांचा आलेला संबंध वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्याही उपयोगी आला. पाकिस्तान प्रेरित मोठमोठ्या आतंकवादी हल्ल्यानंतरही वाजपेयींनी पाकिस्तानशी चर्चेचा प्रयत्न चालू ठेवला होता यावर कॉंग्रेसचा आक्षेप होता व कॉंग्रेस सातत्याने वाजपेयी यांच्यावर टीका करत होती. अशी टीका देशहिताची नाही हे मनमोहनसिंग यांनीच कॉंग्रेसच्या धुरीणांना पटविले आणि काश्मीर बाबतीत वाजपेयींवर होणारी टीका सौम्य करायला कॉंग्रेसला भाग पाडले होते. याचा अर्थ वाजपेयी काळातही मनमोहनसिंग काश्मीरवर लक्ष ठेवून होते आणि याची प्रचिती ते पंतप्रधान झाल्याबरोबर आली. वाजपेयी काळात सुरु झालेली प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सरकारचा दूत म्हणून वाजपेयी यांनी काम करावे अशी विनंती पंतप्रधानाच्या वतीने वाजपेयी यांना करण्यात आली होती.                                   

वाजपेयी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला असता तर नवा इतिहास घडला असता. काश्मिरी जनतेच्या मनात वाजपेयी बद्दल आदर होता आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचाही वाजपेयींवर विश्वास होता. आग्रा शिखर परिषद वाजपेयी यांचेमुळे असफल झाली नसल्याची मुशर्रफ यांना खात्री होती. त्यामुळे मनमोहन सरकारचा दूत म्हणून वाजपेयींना त्यांच्या कार्यकाळात जे साध्य करता आले नाही ते साध्य करण्याची संधी चालून आली होती.पण भारतीय जनता पक्ष २००४ साली झालेल्या अनपेक्षित पराभवाच्या धक्क्यातून सावरला नव्हता. आपल्याला जे साधता आले नाही ते मनमोहन सरकारलाही साधता येवू नये अशी पक्षाची कोती भूमिका होती जी अडवाणी यांच्या वक्तव्यातून प्रकट झाली. पराभवानंतर भारत पाकिस्तान यांच्यात होवू घातलेल्या वाटाघाटीवर भाष्य करताना अडवाणी यांनी फक्त भारतीय जनता पक्षच पाकिस्तानला सवलत देवून संबंध सुरळीत करू शकतो कारण भारतीय जनता पक्ष पाकिस्तान धार्जिणा नाही यावर भारतीय जनतेचा विश्वास आहे असा दावा केला होता.  कॉंग्रेसची धोरणे पाकिस्तान व मुस्लीम धार्जिणी आहेत हा टीकेचा सूर आळवता यावा म्हणून भारतीय जनता पक्षाने वाजपेयींना मनमोहन सरकारचे दूत म्हणून काम करण्याची परवानगी दिली नाही. वाजपेयींच्या नकारा नंतरही मनमोहनसिंग यांनी काश्मीर आणि भारत-पाक संबंधांवर वाजपेयींशी सल्लामसलत सुरु ठेवली. मनमोहन पंतप्रधान झाल्यानंतर काही महिन्यातच युनोची आमसभा होणार होती व याप्रसंगी मनमोहन-मुशर्रफ यांची बैठक होणार होती. युनोच्या आमसभेला जाण्यापूर्वी मनमोहनसिंग यांनी वाजपेयींना भेटीसाठी बोलावले होते. त्यांच्यात आणि मुशर्रफ यांच्यात झालेली चर्चा, झालेले निर्णय त्यांनी वाजपेयी यांचेकडून समजून घेतले. या बैठकीच्या वेळी मनमोहन मंत्रिमंडळातील परराष्ट्रमंत्री नटवरसिंग आणि वाजपेयी मंत्रीमंडळात पारराष्ट्र मंत्री राहिलेले यशवंत सिन्हाही उपस्थित होते. काश्मीर आणि पाकिस्तान संबंधीच्या धोरणात सातत्य राखण्याचा हा पहिला प्रयत्न होता.

                                                          (क्रमशः)
-----------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, October 11, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७७

एप्रिल २००३ मध्ये श्रीनगरच्या सभेत पंतप्रधान वाजपेयींनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठीची त्रिसूत्री मांडली. 'इन्सानियत , जम्हुरियत आणि काश्मिरियत' अशी ती त्रिसूत्री होती. केवळ जाहीर सभेत बोलून अटलबिहारी वाजपेयी थांबले नाहीत. त्यांनी लोकसभेत बोलताना देखील या त्रिसूत्रीवर भर दिला होता.  काश्मीरला जे काही द्यायचे ते संविधानाच्या मर्यादेतच या आजवरच्या धारणेला वाजपेयींच्या या त्रिसुत्रीने छेद देवून काश्मिरी जनतेच्या मनात नवी आशा निर्माण केली होती.
----------------------------------------------------------------------------------------------------

 
१९९८ ते २००४ हा पंतप्रधान वाजपेयी यांचा कार्यकाळ काश्मीर संदर्भातील भरगच्च घडामोडी आणि चांगल्या वाईट घटनांनी भरलेला होता. त्यांची राजवट जावून २० वर्षे झालीत पण त्यांचा कार्यकाळ आजही तिथली जनता विसरली नाही. ज्या पंतप्रधानाची काश्मिरात सर्वाधिक आठवण केली जाते ते पंतप्रधान वाजपेयीच आहेत. आज पन्नाशीच्या पुढचे जे लोक काश्मीरमध्ये आहेत त्यांचे एका बाबतीत एकमत आढळेल आणि ती बाब म्हणजे २००४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत एन डी ए चा पराभव झाला नसता आणि वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले असते तर काश्मीरचा गुंता सुटायला मोठी चालना मिळाली असती. काश्मीरच्या बाबतीत सर्वात मोठी घोषणा तर पंतप्रधान नरसिंहराव यांनी केली होती. संविधानाच्या चौकटीत काश्मीरची जनता जे मागेल ते देण्याची तयारी त्यांनी दाखविली होती. 'स्काय इज द लिमीट' हा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. त्यानंतरच फारूक अब्दुल्ला यांनी काश्मीर विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आणि एक दशकानंतर तिथे निवडणुका होवू शकल्या. नरसिंहराव आणि देवेगौडा या पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनानुसार संविधानाच्या चौकटीत काश्मीर विधानसभेने स्वायत्ततेची मागणी केली व तसा ठरावही केला. हा ठराव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला तेव्हा पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते. तो ठराव संविधानाच्या चौकटीत आहे हे वाजपेयी आणि अडवाणी दोघानाही मान्य होते. आणि तरीही इंदिरा गांधी यांनी जो तर्क दिला होता तोच तर्क - १९५२ ची स्थिती निर्माण करणे म्हणजे घड्याळाचे काटे मागे फिरविल्या सारखे होईल - देत वाजपेयी सरकारने जम्मू-काश्मीर विधानसभेचा स्वायत्तता विषयक ठराव नामंजूर केला होता. आणि तरीही काश्मीरची जनता वाजपेयींचीच आठवण करतात हे विशेष आहे. पाकिस्तानकडून भारताशी संबंध बिघडतील अशा कारवाया वेळोवेळी होवूनही पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न वाजपेयींनी शेवटपर्यंत सोडला नाही हे एक महत्वाचे कारण त्यामागे होते.                                                           

पाकिस्तानच्या चिथावणीने १९९० च्या दशकात काश्मिरी जनतेला जे भोगावे लागले त्यामुळे जनतेचा दहशतवादाबाबत भ्रमनिरास झाला होता. काश्मिरात शांतता नांदायची असेल व दहशतवादी कारवाया थांबवायच्या असतील तर भारत-पाक संबंध सुरळीत होणे गरजेचे आहे या निष्कर्षाप्रत लोक आले होते आणि वाजपेयींनी त्यावरच जोर दिला होता. पाकिस्तानशी चर्चा करणे भारतीय जनतेला फारसे आवडत नाही. अशा चर्चेचा आधी जनसंघ व नंतरच्या भारतीय जनता पक्षाने कायम विरोध केला आहे. त्यामुळे भारत पाक चर्चा कायम पडद्याआड व लोकांच्या नजरेआड होत आली आहे. अगदी सध्याचे नरेंद्र मोदी सरकार सुद्धा दुसऱ्या देशाच्या भूमीवर पाकिस्तानशी चर्चा करत असते. पण कारगिल सारख्या घटनेनंतरही पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा आणि हिम्मत वाजपेयींनी दाखविली. २००४ साली तर लालकृष्ण अडवाणी यांनी जाहीरपणे म्हंटले होते की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाकिस्तानला सवलती दिल्या तरी लोक त्याचा विरोध करणार नाही ! त्यांचे हे विधान अजिबात अतिशयोक्त नाही. कारगिल घडविणाऱ्या परवेज मुशर्रफ यांचे दिल्ली व आग्रा येथे झालेले जंगी स्वागत व आग्रा शिखर परिषद अडवाणी यांच्या विधानाची पुष्टी करते. कॉंग्रेसच्या राजवटीत कारगिल घडले असते आणि ते घडविणाऱ्याला कॉंग्रेस सरकारने आमंत्रित करून जंगी स्वागत केले असते तर देशभर काय आणि कशा प्रतिक्रिया उमटल्या असत्या याचा सहज अंदाज करता येईल. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारून काश्मीर प्रश्न सोडवायला चालना देणे कॉंग्रेसला शक्य नाही. ते काम भारतीय जनता पक्षाचे अटलबिहारी सारखे नेतेच करू शकतात या निष्कर्षाप्रत काश्मिरी जनता आली होती आणि म्हणून काश्मिरी जनतेला वाजपेयी यांच्या बद्दल विशेष आस्था आणि प्रेम वाटत आले. भारतीय जनमताचा विचार न करता वाजपेयींनी त्यांच्या कार्यकाळात आणखी एक गोष्ट केली. हुरियतच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या पाकिस्तान धार्जिण्या विभाजनवादी नेत्यांशी काश्मीर प्रश्न कसा सोडविता येईल याची थेट चर्चा सुरु केली. यापूर्वीही नरसिंहराव सरकारने विभाजनवादी व दहशतवादी गटांशी चर्चा केली होती. पण ती चर्चा गाजावाजा न करता , लोकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने केली होती. वाजपेयींनी चर्चेतून प्रश्न सोडविण्याचे जाहीर आवाहन करून उघडपणे चर्चा केली. काश्मीरच्या राजकारणात हुरियतच्या नेत्यांना पहिल्यांदाच महत्व मिळाले होते आणि ते नेते वाजपेयीवर जाम खुश होते. पण हाच प्रयोग मनमोहनसिंग सरकारने पुढे चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षाने आणि दस्तुरखुद्द वाजपेयींनी विरोध केला.  

अटलबिहारी वाजपेयींच्या काश्मीर जनतेमधील लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण ठरले ते काश्मिरी जनतेला भावलेले त्यांचे भावनिक आवाहन ! १८ एप्रिल २००३ रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची श्रीनगरच्या क्रिकेट स्टेडियम मध्ये जाहीर सभा झाली. १९८७ नंतर काश्मिरात झालेली पंतप्रधानांची ही पहिली सभा होती. १९८७ साली राजीव गांधींची सभा झाली होती. या सभेपूर्वी वाजपेयींनी काश्मीरला तीनदा भेट दिली होती. सभा मात्र चवथ्यांदा आले तेव्हा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला चर्चेचे आवाहन केले. दहशतवाद्यांनी नवी दिल्लीत संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन पराक्रम'च्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सभेत पुढे बोलताना १९९० च्या दशकात जे भोगावे लागले त्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि काश्मीरचा प्रश्न संविधानाच्या मर्यादेत नव्हे तर मानवतेच्या दृष्टीकोनातून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे वचन जनतेला दिले. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठीची त्रिसूत्रीच त्यांनी या सभेत मांडली. 'इन्सानियत , जम्हुरियत आणि काश्मिरियत' अशी ती त्रिसूत्री होती. केवळ जाहीर सभेत बोलून अटलबिहारी वाजपेयी थांबले नाहीत. त्यांनी लोकसभेत बोलताना देखील काश्मीर प्रश्न सोडविण्याची ही त्रिसूत्री मांडली होती. काश्मीरला जे काही द्यायचे ते संविधानाच्या मर्यादेतच या आजवरच्या धारणेला वाजपेयींच्या या त्रीसुत्रीने छेद देवून काश्मिरी जनतेच्या मनात नवी आशा निर्माण केली. काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा काश्मिरी जनतेकडून आजही वाजपेयींची आणि त्यांच्या या त्रिसूत्रीची आठवण करून देण्यात येते. १९५३ नंतर काश्मिरी जनतेचे मन जिंकणारे पंतप्रधान म्हणून वाजपेयींचा उल्लेख होत राहील. काश्मिरी जनतेचे मन जिंकणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांच्यामुळेच काश्मीर भारताचा भाग बनला हे सत्य असले तरी काश्मिरी जनतेतील त्यांची लोकप्रियता १९५३ च्या शेख अब्दुल्लांच्या बडतर्फी व अटके नंतर उरली नाही. काश्मीरमध्ये आज नेहरूंचे नाही तर वाजपेयींचे नाव आदराने घेतले जाते.  

                                                      (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, October 5, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७६

 २००२ च्या काश्मीर विधानसभा निवडणुकी वेळी वाजपेयी सरकारची इच्छा दहशतवादी गटांनी व त्यांच्या नेत्यांनी दहशतवाद सोडून निवडणुक प्रक्रियेत सहभागी व्हावे अशी होती. तशी या गटांच्या प्रमुखाशी सरकारने बोलणीही केली. पण निवडणुकांचा पूर्वानुभव लक्षात घेता निवडणुका खुल्या वातावरणात होतील यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. प्रत्यक्षात निवडणुका झाल्या नंतर इंग्लंड-अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी निवडणुका मुक्त वातावरणात झाल्याची पावती दिली.
---------------------------------------------------------------------------------------------------


नवी दिल्लीत संसदेवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पाकिस्तान स्थित आतंकवादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी आखलेल्या 'ऑपरेशन पराक्रम' मोहिमेनंतर सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव होवूनही युद्ध झाले नाही. काश्मिरातील नियंत्रण रेषेवर सैन्याच्या मोठ्या प्रमाणावर उपस्थितीचा एक फायदा झाला. त्यावेळी काश्मीरमध्ये निवडणुका होवू घातल्या होत्या. निवडणुका होवू नयेत असाच पाकिस्तान प्रेरित आणि प्रशिक्षित दहशतवाद्यांचा प्रयत्न असायचा. सीमेवरील सैन्याच्या मोठ्या उपस्थितीमुळे पाकिस्तानातून किंवा पाकव्याप्त काश्मीर मधून नियंत्रण रेषा पार करून निवडणुका उधळून लावण्यासाठी दहशतवादी कारवाया करणे नेहमीप्रमाणे सहजशक्य नव्हते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या प्रभावापासून व कारवायापासून वाजपेयी काळात झालेल्या काश्मीर विधानसभेच्या निवडणुका बऱ्याच प्रमाणात मुक्त राहिल्या. तहरीक ए हुरियत या पाकिस्तानकडे झुकलेल्या संघटनेने निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन काश्मिरी जनतेला केले होते. बहिष्कारासाठी पाकिस्तानचा दबाव असतांनाही हुरियत कॉन्फरन्सने बहिष्काराचे आवाहन केले नाही. ४३ टक्क्यापेक्षा अधिक मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले.  कॉंग्रेसमधून व्ही.पी. सिंग काळात जनता दलात गेलेल्या आणि नरसिंहराव काळात परत कॉंग्रेसमध्ये आलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कॉंग्रेसचा त्याग करून जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ची स्थापना केली. शेख अब्दुल्लांच्या मृत्यूनंतर काश्मीरचा मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांना मुख्यमंत्री होता आले नाही. कॉंग्रेसमध्ये राहून आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होणार नाही या निष्कर्षाप्रत आलेल्या मुफ्तीने आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. २००२ च्या निवडणुकीतील पीडीपीची कामगिरी फार चांगली राहिली असे म्हणता येणार नाही तरी मुख्यमंत्रीपदी आरूढ होण्यात ते यशस्वी झाले.
 

निवडणूक मुक्त वातावरणात आणि कोणत्याही हेराफेरीविना झाल्याचे जगाला दाखवण्याची वाजपेयी सरकारची इच्छा होती. त्यासाठी केंद्र सरकारने त्यावेळचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या पुढे राज्यपाल राजवट लागू करून निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. फारूक अब्दुल्लांनी राज्याच्या राजकारणात न राहता उपराष्ट्रपती व्हावे असाही प्रस्ताव देण्यात आला होता. दोन्ही प्रस्तावास फारूक अब्दुल्लाने मान्यताही दिली होती. पुढे उपराष्ट्रपती पदाचा प्रस्ताव बारगळल्या नंतर फारूक अब्दुल्लांनी निवडणुकीपूर्वी राज्यपाल राजवट लावण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव अमान्य केला. तरीही २००२ साली झालेल्या निवडणुका तुलनेने शांत परिस्थितीत झाल्या आणि मुख्य म्हणजे या निवडणुका हेराफेरी मुक्त झाल्याचे मानण्यात येते. इंग्लंड-अमेरिकेसह अनेक देशांनी निवडणुका मुक्त वातावरणात झाल्याचे मान्य करून केंद्र व राज्य सरकारचे कौतुक केले. वाजपेयी सरकारची इच्छा दहशतवादी गटांनी व त्यांच्या नेत्यांनी दहशतवाद सोडून निवडणुक प्रक्रियेत सहभागी व्हावे अशी होती. तशी या गटांच्या प्रमुखाशी सरकारने बोलणीही केली. पण निवडणुकांचा पूर्वानुभव लक्षात घेता निवडणुका खुल्या वातावरणात होतील यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. या गटांच्या मते केंद्र सरकारला फारूक अब्दुल्ला किंवा उमर अब्दुल्ला यांनाच मुख्यमंत्री करायचे असल्याने निवडणुकांचे निकाल तसेच लागतील. आपल्या सहभागाने हे निकाल बदलणार नाहीत असा पक्का विश्वास असल्याने दहशतवादी गटांच्या म्होरक्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार दिला होता. या गटांनी व्यक्त केलेला अंदाज सपशेल खोटा ठरला यावरूनही निवडणुकीत हेराफेरी करून एखाद्या पक्षाला निवडून आणण्याचा प्रयत्न झाला नाही हे स्पष्ट झाले. ही निवडणूक मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला व त्यांच्या पक्षासाठी कठीण गेली. १९९६ ला स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करून फारूक अब्दुल्लाने यश मिळविले होते. निवडून आल्यावर त्यांनी स्वायात्तते संबंधीचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून घेतलाही होता. पण त्यांचा पक्ष सहभागी असलेल्या एन डी ए सरकारने तो प्रस्ताव नामंजूर केला. प्रस्ताव नामंजूर झाल्यावर एन डी ए न सोडणे फारूक अब्दुल्ला व त्यांच्या पक्षाला महागात पडले. फारूक अब्दुल्ला व नॅशनल कॉन्फरन्स स्वायात्तते बद्दल गंभीर नाही असा समज पसरला व त्याचा फटका २००२ च्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला बसला.


स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करून १९९६ साली ८७ पैकी ५७ जागा मिळविणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सला २००२ च्या निवडणुकीत फक्त २८ जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतापासून दूर राहूनही पहिल्या क्रमांकाच्या जागा मिळविणारा पक्ष हे स्थान नॅशनल कॉन्फरन्सला टिकविता आले. कॉंग्रेसने आश्चर्यकारकरित्या २० जागा मिळवून दुसरे स्थान पटकावले. नवा पक्ष स्थापन करून पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपी पक्षाला १६ जागा मिळविता आल्या. केंद्रातील वाजपेयी सरकार पाठीशी असूनही दुसऱ्या पक्षात फुट पाडून सरकार बनविण्याचा प्रयत्न नॅशनल कॉन्फरन्स कडून झाला नाही. त्यामुळे सरकार बनण्यातही पारदर्शकता राहिली. काश्मीर सारख्या अशांत प्रदेशात स्थिर सरकारची गरज लक्षात घेवून पंतप्रधान वाजपेयींची नॅशनल कॉन्फरन्स व कॉंग्रेसने एकत्र येवून सरकार बनवावे अशी इच्छा होती. पण ते शक्य झाले नाही. कॉंग्रेस व मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपी पक्षात सरकार बनविण्यावर सहमती झाली. पहिली तीन वर्षे पीडीपीचा मुख्यमंत्री तर नंतरची तीन वर्षे कॉंग्रेसचा मुख्यमंत्री राहील असे ठरले व त्याप्रमाणे पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. केंद्रात सत्तेत असूनही भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत फटका बसला. ही बाब २००२ च्या निवडणुकीत केंद्र सरकारच्या यंत्रणेने हस्तक्षेप करून निवडणूक निकाल फिरविले नाहीत हे सिद्ध करणारी आहे. १९९६ च्या निवडणुकीत भीमसिंग यांच्या पँथर पार्टी सोबत युती करून ८ जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी भीमसिंग यांच्या पक्षाला एक जागा मिळाली होती. २००२ च्या निवडणुकीत मात्र भाजपला एकाच जागेवर विजय मिळविता आला तर भीमसिंग यांची पँथर पार्टी ४ जागी विजयी झाली. केंद्रात सत्तेत असताना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सने कॉंग्रेस सोबत युती केली पाहिजे असा आग्रह धरला होता. तसा आग्रह पंतप्रधान वाजपेयी यांनी केला नाही. त्यामुळे निवडणुका मुक्त वातावरणात होवू शकल्या. दिल्ली ते लाहोर बस सुरु करणे आणि पाकिस्तान सोबतचे संबंध सुधारण्याच्या वाजपेयींच्या प्रयत्नाने काश्मिरात वाजपेयींची लोकप्रियता वाढूनही निवडणुकीत त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला नाही. याचा अर्थ काश्मीरमध्ये पंतप्रधान वाजपेयी व्यक्ती म्हणून लोकप्रिय होते पण भारतीय जनता पक्षा बद्दलचे काश्मिरी जनतेचे मत अनुकूल नव्हते. २००२ च्या निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या पक्षाचे नेते वाजपेयी यांच्या काश्मिरी जनतेतील लोकप्रियतेचे रहस्य काय असा प्रश्न पडतो.

                                                             (क्रमशः)

---------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८