Thursday, July 20, 2017

शेतकरी नवरा नको ग बाई !

शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. रोज त्यात नवनवीन समस्यांची भर पडत आहे. जुन्या पेक्षा नवी समस्या अधिक भीषण वाटावी अशी परिस्थिती आहे. नुकत्याच एका सर्वेक्षणातून शेतकरी कुटुंबातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न बिकट आणि भीषण बनत चालल्याचे सत्य समोर आले आहे. गावागावातून शेकडो मुलांची लग्ने रखडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक प्रश्ना सोबत या कौटुंबिक प्रश्नाने चिंतीत केले आहे. कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी शेतीतून पैसा मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही आणि हा प्रश्न लवकर सुटला नाही तर ग्रामीण जीवनाची वीण विस्कटून जाण्याचा धोका आहे.
------------------------------------------------------------------------------------------------


शेतकऱ्यांचे ताजे आंदोलन सुरु झाले तेव्हा माध्यमातून - विशेषत: फेसबुक, ट्वीटर सारख्या माध्यमातून - शेतकऱ्यांवर टीकेची झोड उठली होती. शेतीक्षेत्राबद्दल अज्ञानी आणि एकूणच ग्रामीण जीवना बद्दल अनभिद्न्य सुखी माणसाचा सदरा घातलेल्या मंडळींनी कर बुडव्या  शेतकऱ्यांसाठी कशाला हवी कर्जमाफी असा सवाल उपस्थित केला होता. शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदान मिळत असताना पुन्हा त्यांचा ७/१२ कोरा करण्यासाठी करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी सरकारने करायला नको असा दबाव सरकारवर आणला होता. कर्जफेडीची क्षमता असूनही शेतकरी कर्ज फेडत नाही आणि कर्जमाफीसाठी कटोरा हाती घेण्याची त्यांना सवयच आहे असे शरसंधान या मंडळींनी केले होते. वर्तमानपत्राचे मथळे वाचून स्वत:ला ज्ञानी समजणारी विद्वान मंडळी यापेक्षा वेगळे काही बोलू शकत नाहीत. कारण शेतकऱ्यांसबंधी बातम्यांचे क्वचित मथळे आलेच तर ते असेच असतात. मागे महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्याने शेतकऱ्यांजवळ मोबाईल रिचार्ज करायला पैसे असतात पण विजेचे बील भरायला पैसे नसतात असे विधान केले होते. ही मोठी बातमी बनली होती. आणि आता आता तर असे बोलाणारांचे पेवच फुटले आहे. एवढी तूर खरेदी केली तर 'साले' रडतातच हे बातमीचा मोठा मथळा बनलेले त्यातलेचक मुक्ताफळ . अशी अनेक मुक्ताफळे उधळली गेली आहेत. मागे एका प्रतिष्ठीत वृत्तपत्राच्या संपादकाला तर सोन्यांनी लगडलेल्या शेतकऱ्यांच्या स्त्रियांचे दर्शन झाले होते. चारचाकी गाडी खरेदी करण्याच्या रांगेत शेतकऱ्यांनी केलेली गर्दी दिसत होती. अशा शेतकऱ्यांवर सरकार सवलतीचा मारा करून त्यांचे चोचले पुरवीत असल्या बद्दल या वृत्तपत्राने सात्विक संताप व्यक्त केला होता. मागे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी शेतकरी लग्न आणि इतर समारंभावर उधळपट्टी करीत असल्याने कर्जबाजारी होत असल्याचे ज्ञान पाजळले होते. शेतकरी आत्महत्येचे कोणाला न दिसलेले कारण याच महाशयांनी शोधून काढले होते. प्रेमभंगातून शेतकरी आत्महत्या करतात असा त्यांचा जावईशोध होता. अशा बातम्यांचे मथळे बनतात आणि या मथळ्यांचे वाचक मग शेतकऱ्यांवर गाढवा सारखा लत्ताप्रहार करीत राहतात. राज्यकर्त्यांना समृद्ध होण्याची घाई झाल्याने त्यांनी समृद्धी महामार्गासाठी ५-१० शेतकऱ्यांना कोट्यावधीचा मोबदला त्यांच्या शेतजमिनी घेण्यासाठी दिला अशी एक ताजी बातमी आहे. असा मोबदला मिळालेले शेतकरी नक्कीच चारचाकी गाडी घेतील. पण त्यावरून बघा शेतकऱ्यांकडे चारचाकी गाड्या आल्या आणि तरी रडतातच असे म्हणणे यालाच सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या मंडळींचा सध्या सुळसुळाट झाला आहे. पण एका छोट्याशा सर्वेक्षणाने यांच्या स्वर्गाचा धागा तोडून ते किती कच्चे असल्याचे दाखवून दिले आहे.



आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. हेरंब कुलकर्णी यांनी ते राहात असलेल्या जिल्ह्यातील काही गावच्या शेतकरी कुटुंबाचा सर्व्हे केला. श्री विठ्ठल शेवाळे यांच्या मदतीने त्यांनी हा सर्व्हे केला. नगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर या दोन तालुक्यातील ४५ गावात त्यांनी सर्व्हे केला. त्यांना या सर्व्हेत काय आढळले ? २५ ते ३० वयोगटातील म्हणजे लग्नाचे वय होवून गेलेली तब्बल २२९४ मुले आणि ३१ ते ४० वयोगटातील ७७४ मुले/व्यक्ती बिनलग्नाचे आहेत. या मुलांना ब्रम्हचारी राहण्याची हौस नाही. पण त्यांची लग्नेच जुळत नाहीत. ग्रह-तारे, शनी-मंगळ हे काही त्यांच्या लग्न न जुळण्याचे कारण नाही. ही मुले शेतकरी कुटुंबातील असून शेती शिवाय त्यांचा दुसरा व्यवसाय नाही हे त्याचे कारण आहे. शेतकरी कुटुंबात लग्न करायला दुसऱ्या सोडा शेतकऱ्यांच्या मुली देखील तयार नाहीत. मुलीच काय त्यांचे शेतकरी आई-बाप सुद्धा यासाठी तयार नसतात. आपला पोटचा गोळा आगीतून फुफाट्यात पडलेला कोणत्याही आई-बापाला कधीच आवडणार नाही. शेतकरी कुटुंबातील मुलगी शेतकऱ्यांच्याच घरात देणे म्हणजे आगीतून फुफाट्यात किंवा फुफाट्यातून आगीत पडण्यासारखे आहे. त्यामुळे नाना खटपटी करून , पोटाला चिमटा घेवून गरजा कमी करत थोडाफार पैसा साठवून आपली मुलगी नोकरी करणाऱ्या मुलांना देण्याचा प्रत्येक शेतकरी आई-बापाचा प्रयत्न असतो. परिणामी आपल्या मुलांसारखे अनेक मुले बिनलग्नाची राहतात हे भान मुलीचे भले करण्याच्या प्रयत्नात हरवलेले असते. मुले आणि मुली यांचे समाजात विषम प्रमाण असल्याने म्हणजे दर हजार पुरुषामागे मुलींची संख्या त्यापेक्षा कमी असल्याने मुलीला शेतकरी कुटुंबा बाहेरचे स्थळ मिळायला अडचण जात नाही. मुलीचे लग्न अडलेच तर खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने अडते. लग्नाचे वय झालेल्या मुलींच्या आत्महत्येच्या बातम्या अधूनमधून येतात त्या खर्चाच्या अडचणीमुळे. लग्नासाठी जोडीदार मिळत नाही हे त्याचे कारण नसते. अशा परिस्थितीत कोणी कर्ज काढून आपल्या मुलीचे लग्न लावून दिले तर त्याला ऋण काढून सण साजरे करण्यासारखे आहे असे कोणी समजत असेल तर तो असंवेदनशीलतेचा कळस आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सुखी समाजात अशी असंवेदनशीलता ठायी ठायी दिसून येते.

                                                             
शेतकरी कुटुंबातील मुलांच्या बाबतीत मात्र मुली मिळत नाहीत हीच प्रमुख समस्या आहे. याचे कारण शेतकरी कुटुंबात करावे लागणारे काबाडकष्ट आणि कष्ट करूनही राहणीमान सुधारत नाही हे शेतकऱ्यांच्या मुलीला आई-बापा कडच्या अनुभवावरून लक्षात आलेले असते. लग्नाच्या वया पर्यंत जे अपरिहार्यपणे सहन करावे लागले , लग्नाने तरी त्यातून सुटका व्हावी असे शेतकरी कुटुंबातील मुलीला वाटणे गैर नाही. मग जिथे शेतकरी कुटुंबातील मुली शेतकरी कुटुंबातील मुलाशी विवाह करायला तयार होत नाहीत तिथे दुसऱ्या नोकरी-व्यवसायाशी संबंधित कुटुंबातील मुली शेतकरी कुटुंबातील खेड्यात राहणाऱ्या मुलाशी विवाह करतील ही अशक्यप्राय गोष्ट आहे. कोणता आई-बाप आपल्या मुलीला अशा ठिकाणी द्यायला तयार होईल किंवा कोणती मुलगी अशा ठिकाणी जायला तयार होईल जिथे बहुतेक वेळा वीज रात्री १२ ते ६ या वेळेतच असते. जिथे आजारी पडले तर वैद्यकीय सेवा आणि सोयी मिळत नाही. सांडपाणी वाहून जाण्याची नीट व्यवस्था नसते. घरा शेजारीच गायी-म्हशी बांधलेल्या राहतात आणि त्यांच्या शेणा-मुताचा वास २४ तास दरवळत राहतो. गायीच्या शेणाचे आणि मुताचे अवडंबर माजविणारे तरी पाठवतील का आपल्या मुली अशा घरात. गायीच्या शेण-मुताचा गौरव राजकीय आणि आर्थिक लाभासाठी त्यांना करायचा असतो , पण त्याला रोज हात लावावा लागेल अशा घरात मुली देण्याचे नावही ही मंडळी काढणार नाही. ज्यांना आपल्या स्वप्नात शेतकऱ्यांच्या बाया सोन्याने मढलेल्या दिसतात आणि शेतकऱ्यांच्या दारात बैलबंडी ऐवजी मोटारगाडी उभी दिसते अशांनी तरी आपल्या मुली शेतकरी कुटुंबात उजवायला काय हरकत आहे. पण असे होताना दिसत नाही आणि होणारही नाही.
                                                                                                                                                                                            
यात मुलींचे काहीच चुकत नाही. चूक शेतकऱ्यांच्या घरच्या परिस्थितीची आहे. या परिस्थितीची शिक्षा शेतकऱ्यांच्या मुलांना मिळत आहे. त्यांची लग्न रखडत आहेत आणि लग्न न झालेल्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन तालुक्यातील फक्त ४५ गावातून हा जो आकडा समोर आला आहे त्यावरून समस्येची आणि त्याच्या परिणामाची भीषणता लक्षात येईल. ४५ गावांपैकी १२ गावे अशी आहेत की जेथे प्रत्येक गावात १०० पेक्षा जास्त मुलांची लग्ने रखडली आहेत. ८ गांवे अशी आहेत जिथे १०० पेक्षा कमी पण ५० पेक्षा जास्त मुलांची लग्ने प्रत्येक गावात रखडली आहेत. या आकड्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. माझाही बसला नसता. पण हेरंब कुलकर्णी यांना मी ओळखतो. वेतन आयोगाचा विरोध करणारेच नाही तर वेतन आयोगाची वेतनवाढ नाकारणारे महाराष्ट्रातील ते एकमेव शिक्षक आहेत. कदाचित देशभरातून ते एकटेच तसे असतील. मी वर त्यांचा आदर्श शिक्षक असा उल्लेख केला ते शासन पुरुस्कृत आदर्श शिक्षक म्हणून नाही तर या कारणासाठी ते आदर्श आहेत. कुठली सनसनाटी निर्माण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही किंवा तशी त्यांची ख्याती नाही. या सर्वेक्षणातून त्यांना जे दिसले त्यावर सुरुवातीला त्यांना आपल्याच  डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्यासाठी चाचपणी म्हणून त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातील काही मित्रांना असेच सर्वेक्षण करायला सांगितले . त्यानुसार शेवगाव तालुक्यातील २ गावात उमेश घेवरीकर यांनी, सोलापूर जिल्ह्यातील ४ गावात सतीश करंडे यांनी तर पुणे जिल्हातील ४ गावात विठ्ठल पांडे यांनी सर्वेक्षण केले . या १० गांवात मिळून ३३९ मुलांची लग्ने रखडल्याची माहिती समोर आली.  त्या सर्वेक्षणाशी आपले निष्कर्ष ताडून पाहिल्यावरच त्यांनी हे आकडे जाहीर केलेत. प्रत्येक ठिकाणचे आकडे कमी जास्त होतील , पण प्रत्येक गावाला  ही समस्या भेडसावत असणार असे अनुमान यावरून काढता येते. पण हाताच्या कंगनाला आरसा कशाला . आपल्यालाही आपल्या किंवा आजूबाजूच्या गावातील मुलांची लग्ने रखडत चाललीत की नाही याची शहानिशा करता येईल.

 
   शहरी विद्वानांना शेतकऱ्यांसमोर उभा झालेला हा नवा प्रश्न समजला , पटला तरी त्याचे समाधान करणारे खरे उत्तर त्यांच्याकडे असेल किंवा ते देतील याची शक्यता नाही असाच आजवरचा अनुभव आहे. ते लगेच सांगतील दर हजार पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण हजारापेक्षा कमी असल्याने मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत व लग्ने रखडतात असेच त्यांचे यावर उत्तर असणार. त्यात तथ्यांशही आहे. म्हणजे स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा कमी आहेच . २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांपैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. बाकी सर्व जिल्ह्यात कमी आहे. ज्या नगर जिल्ह्यातील सर्वेक्षणाची आपण चर्चा करतो आहोत त्या जिल्ह्यात १००० पुरुषांमागे ९३४ स्त्रिया आहेत. ४ - ४ गावाचे सर्वेक्षण ज्या सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात केले आहे तिथे अनुक्रमे हे प्रमाण दर हजार स्त्रियांमागे ९३२ आणि ९१० आहे. तुम्ही वाचण्यात चूक करीत नाही आहात. महाराष्ट्रातील प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जात असलेल्या पुणे जिल्ह्यात दर हजार पुरुषाच्या तुलनेत ९१० स्त्रिया आहेत आणि स्त्रियांचे प्रमाण कमी असणाऱ्या जिल्ह्यात पुण्याचा पहिला क्रमांक लागतो. पुरुष आणि स्त्री संख्येतील अंतर यामुळे मुलांची लग्ने रखडतात हे खरेच आहे. पण हे प्रमाण समसमान झाल्यावर किंवा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसे स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे तसे इतरत्र झाल्यावर शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न सुटेल एवढे सोपे उत्तर या प्रश्नाचे नाही. केवळ मुलींची संख्या कमी म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने रखडली नाहीत. मुली त्यांच्याशी लग्न करायला तयार होत नाहीत हे त्यांचे लग्न रखडण्याचे मोठे आणि महत्वाचे कारण आहे. नाकारण्याचे कारण वर सांगितल्या प्रमाणे शेतीशी निगडीत आहे. शेतीचा हा  प्रश्न रिझर्व्ह बँकेचे भूतपूर्व गव्हर्नर वाय व्ही.रेड्डी यांनी आपल्या ताज्या पुस्तकात नेमकेपणाने मांडला आहे. मनमोहनसिंग यांनी २००८ साली शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित केली होती त्यावेळी रेड्डी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांनी पुस्तकात लिहिले आहे कि आपण प्रधानमंत्री व अर्थमंत्री यांना भेटून कर्जमाफीचा विरोध केला. तेव्हा सरकारने त्यांच्या लक्षात आणून दिले कि , शेतीवर जगणारी लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा अधिक आहे आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५ टक्क्यावर त्यांना जगावे लागते. इतर घटकांचे उत्पन्न कैक पटीने वाढत असताना शेतीवर जगणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न फक्त २ टक्क्यांनी वाढत आहे .  रेड्डी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेल्या या दोन ओळीत शेतकरी समस्येचे सार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून कुटुंबाचे जीवनमान सुधारल्याशिवाय शेतकरी कुटुंबातील मुलाशी लग्न करायला कोणतीही मुलगी स्वखुशीने तयार होणार 
नाही.

----------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------

No comments:

Post a Comment