Thursday, May 28, 2015

मनमोहन धोरणावर शिक्कामोर्तब करणारे वर्ष

मनमोहन सरकारचा पाडाव करण्यासाठी ज्या युक्त्या मोदींच्या पक्षांनी योजल्या त्याचे परिणाम आता सत्तेवर आल्यानंतर त्यांना भोगावे लागत आहेत. मनमोहन सरकारच्या शेवटच्या तीन वर्षात जे निर्णय होवू देण्यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने अडथळे उभे केले ते निर्णय मार्गी लावण्यातच मोदी सरकारचे वर्ष निघून गेले .
--------------------------------------------------


मागच्या लेखाच्या सुरुवातीला  मोदी शासनातील रिझर्व बँकेचे प्रमुख रघुराम राजन यांचे मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरी वरचे मत उद्घृत केले होते. मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे , पण लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा अवास्तव आणि अव्यावहारिक आहेत . राजन यांच्या विधानावरून एक बाब तर स्पष्ट होते कि लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे, भलेही त्याचे कारण अवास्तव आणि अव्यावहारिक अपेक्षा असतील. मोदी शासनात धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या पदावर असलेल्या आणखी एका तज्ज्ञाने मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीबद्दल आपले स्पष्ट मत मांडले आहे. मोदी सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी एक वर्षात जे केले त्यापेक्षा अधिक करता आले असते असे अनेकांचे मत असले तरी या वर्षात आर्थिक सुधारणांचा भरीव कार्यक्रम मोदी सरकारच्या अजेंडावर होता.असे मत व्यक्त केले. मोदी सरकार आर्थिक सुधारणांसाठी राबत आहे हे सांगत असताना जे तथ्य त्यांनी मांडले ते विचारात घेण्यासारखे आहे. या वर्षभरात काही अडलेले प्रकल्प मार्गी लागले असले तरी नवे प्रकल्प सुरु करण्याचा आणि नवी गुंतवणूक करण्याचा उद्योगपतींचा उत्साह या वर्षात आढळून आला नाही याची कबुली त्यांनी दिली. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या वर्षभरात मोठी गुंतवणूक असलेल्या एकाही नव्या प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही ! घटत चाललेल्या उत्पन्नामुळे ग्रामीण भारतात जी विपन्नावस्था आली आहे ती दूर करण्यासाठी मोदी सरकारने मार्ग शोधले पाहिजे असे सांगत असताना त्यांनी मनमोहनसिंग यांचे काळात २००५-०६ ते २०११-१२ सर्वाधिक वेगाने गरिबी निर्मुलन झाले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्रामीण भारताच्या उत्पन्नात वाढ होईल असे काही पहिल्या वर्षात मोदी सरकारने केले नाही हे त्या सरकारचे तज्ज्ञ आर्थिक सल्लागार सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवला पाहिजे असे नाही . ग्रामीण भागातील वर्षभरात जी परिस्थती आपण आपल्या डोळ्याने पाहतो आणि अनुभवतो आहोत त्याच्याशी भारत सरकारच्या प्रमुख आर्थिक सल्लागाराचे मत मिळते जुळते असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवणे भाग पडते. मोदी सरकारने काहीच केले नाही असे नाही पण ज्यांच्या जीवनात 'अच्छे दिन' आणण्याची सर्वाधिक गरज होती त्यांच्यासाठी ठोस असे काही घडले नाही , त्यांची परिस्थिती होती त्यापेक्षा खालावली हे पहिल्या वर्षातील मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे. अर्थात अर्थकारणाच्या बाबतीत 'पी हळद हो गोरी' असे होत नसते. निर्णय झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा वेळ दिल्या नंतरच त्याचे परिणाम दिसू लागतात. या वर्षभरात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम पुढच्या काळात दिसू शकतात. त्यामुळेच वर्षभरात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाची समिक्षा महत्वाची ठरते. 

या वर्षभरात पंतप्रधान मोदींचा सर्वाधिक जोर परकीय गुंतवणूक भारतात आणण्यावर राहिला आहे. राजन आणि सुब्रमण्यम जे सांगताहेत ते खरे आहे. मोदी आणि त्यांचे सरकार खूप मेहनत घेत आहे. २००५ ते २०११ च्या दरम्यान भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न चांगले राहिल्याने या काळात स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक वेगाने गरिबी कमी झाली याचा दुसरा अर्थ तोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करीत होती. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे . पुढे ज्या कथित घोटाळ्यांची चर्चा होवून मनमोहन सरकारचे पतन झाले त्या कथित घोटाळ्यांचा हा काळ होता !मोदी सरकारच्या काळात हा घोटाळा दुरुस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या दुरुस्तीमुळे सरकारच्या खजिन्यात काही लाख कोटींची भर पडल्याचा गवगवा केला जात आहे. एवढे लाखो कोटी रुपयावर पाणी सोडून (जनसामान्यांच्या भाषेत खावून !)  मनमोहन सरकारने गरिबी कमी करण्यात विक्रमी यश मिळविले . मोदी सरकारच्या काळात सरकारी खजिन्यात विक्रमी भर पडून गरिबांची दुरावस्था वाढली हे वास्तव चित्र आहे. मनमोहन सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला (धोरणात्मक निर्णय चूक किंवा बरोबर असू शकतो) घोटाळ्याचे रूप देवून देश-विदेशात त्याची जशी चर्चा झाली त्याच्या परिणामी पटरीवर असलेली भारतीय अर्थव्यवस्था पटरीवरून घसरली. २०११ नंतर घोटाळ्यांची चर्चा करून मनमोहन सरकारचे  नामोहरण करण्यात आले आणि हे सरकार निष्प्रभ करण्यात आले. असे करण्यात सिविल सोसायटी , कोर्ट , सरकारच्याच कॅग सारख्या वैधानिक संस्था आणि विरोधीपक्ष आघाडीवर होते आणि या सर्वात आघाडीवर भारतीय जनता पक्ष होता. मोदी सरकारला आज जी मेहनत करावी लागत आहे ती  भारत सरकारची आपणच घालवलेली पत परत मिळविण्यासाठी. मनमोहन सरकारचा पाडाव करण्यासाठी ज्या युक्त्या मोदींच्या पक्षांनी योजल्या त्याचे परिणाम आता सत्तेवर आल्यानंतर त्यांना भोगावे लागत आहे. 

मनमोहन सरकारच्या शेवटच्या तीन वर्षात जे निर्णय होवू देण्यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने अडथळे उभे केले ते निर्णय मार्गी लावण्यातच मोदी सरकारचे वर्ष निघून गेले ! देशात एवढी टीका सहन करून मोदींना जे परदेश दौरे करावे लागत आहेत ते खोळंबलेले निर्णय मार्गी लावण्यासाठी आणि थांबलेली परकीय गुंतवणूक पुन्हा सुरु करण्यासाठी. मनमोहन सरकारने किराणा क्षेत्रात ५१ टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली होती. या निर्णयाचा तीव्र विरोधच करून भाजप थांबला नाही तर आपण सत्तेत आल्यावर मनमोहन सरकारचा हा निर्णय बदलू अशी घोषणा देखील केली होती. मनमोहन सरकारचा पडता काळ लक्षात घेवून परकीय गुंतवणूकदारांनी भाजपच्या या घोषणेमुळे गुंतवणुकी बाबत हात आखडता घेतला. सत्तेवर आल्या नंतर मनमोहन सरकारच्या ज्या निर्णयाला तीव्र विरोध केला होता त्या किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा महत्वाचा निर्णय मोदी सरकारने घेवून मनमोहन बरोबर होते याची पावती दिली. मनमोहन सरकारने केलेला अणुकरार अपघाताच्या दायित्वावरून भाजपने पूर्णत्वाला जावू दिला नव्हता. मोदी सरकारने सत्तेत आल्यावर मात्र दायित्वाचा मुद्दा बाजूला सारत अणुकरारातील स्वत: निर्माण केलेले अडथळे स्वत:च्या हाताने दूर केले. मनमोहन काळात भारताने पाकिस्तान सोबत चर्चा करता कामा नये असा भाजपचा आग्रह असायचा. सत्तेत आल्यावर सर्वात आधी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी पायघड्या घालण्यात आल्याचे आपण पहिले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध काही भूभागाच्या अदलाबदली वरून बिघडत चालले होते. अशी अदलाबदल करण्यासाठी मनमोहन सरकार अनुकूल आणि तयार होते. मात्र याला भाजपचा तीव्र विरोध असल्याने हा करार होवू शकला नव्हता. मोदींनी सत्तेत आल्यानंतर असा करार केला ! देशांतर्गत धोरणा बाबत सुद्धा अशीच परिस्थिती आहे. आधार योजनेला भाजपचा विरोध सर्वश्रुत होता. भाजप सत्तेत आला कि योजना बंद होईल असे वाटत होते. झाले उलटेच . आधारसाठी अधिक आर्थिक तरतूद करून अनेक योजनांना आधारशी जोडण्याचा मनमोहन सरकारचा निर्णय मोदींनी जोमात पुढे नेला. वस्तू आणि सेवा कर या संबंधीचा देश पातळीवर एकच कायदा (जी एस टी) कायदा करण्याचा मनमोहन सरकारच्या प्रयत्नांना भाजपने नव्हे तर गुजरात राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने मोदींनी विरोध केला होता. हाच कायदा लागू करण्यासाठी मोदींची वर्षभर धडपड सुरु होती ! अशी निर्णयांची मालिकाच सांगता येईल . सत्तेत आल्यानंतर ज्या योजना सुरु करताना खूप गाजावाजा करण्यात आला त्या योजना देखील मनमोहन काळात चालूच होत्या . त्यात थोडाफार फेरफार करून लेबल बदलून मोदी सरकारने लागू केल्या आहेत. 


स्वच्छता अभियान अशीच गाजावाजा करून सुरु करण्यात आलेली योजना. महत्वाची ऐतिहासिक योजना म्हणून मोदींनी आपली पाठ थोपटून घेतली. मान्यवरांनी चमकोगिरी करण्यासाठी हाती झाडू घेवून फोटो काढलेत हाच काय तो मोदी आणि मनमोहन यांच्या स्वच्छता अभियानातील फरक सांगता येईल. स्वच्छते बाबतीत मनमोहन काळातील जाहिराती आजही सुरु आहेत हाच पुरावा सांगतो कि स्वच्छता अभियानात नवीन असे काही नाही. बँक खात्यांबद्दलही अशीच स्थिती आहे. सबसिडीचा पैसा सरळ बँक खात्यात जमा करण्यासाठी अशी खाती उघडण्याची मोहीम मनमोहन काळात सुरुच होती . सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशी खाती मनमोहन काळात अनिवार्य करण्यात आली होती. जनधन योजनेच्या नावावर खाती उघडून मोदी सरकार तेच काम पुढे नेत आहेत. मोठ्या आकड्यांचा लोकांवर प्रभाव पडतो हे हेरून मोदींनी वर्षभरात विक्रमी संख्येत बँक खाती उघडण्याची योजना यशस्वीपणे राबविली हे त्यांचे वेगळेपण नक्कीच आहे. मनमोहन सरकारचे काम चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या गतीने मोदी पुढे नेत आहेत असे नक्कीच म्हणता येईल. गरिबांसाठीच्या ज्या योजना मनमोहन काळात सुरु होत्या त्या सरकारच्या तिजोरीवर एक पैशाचाही भार येवू न देता सर्वांसाठी खुल्या केल्या ही कौतुकास्पद हुशारी मोदींनी दाखविली यावर दुमत होणार नाही. असे केल्यामुळे अशा योजनात होणारा भ्रष्टाचार आणि भाई-भातीजावाद यांना आपसूकच आळा बसणार आहे . कॉंग्रेस काळात निराधारांना पेन्शन योजना होतीच पण त्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसा जायचा. आता निराधारानाच नाही तर कोणालाही पेन्शन पाहिजे तर तुम्ही ठराविक पैसा भरा आणि ठराविक पेन्शन घ्या ही अटल पेन्शन योजना मोदींनी सुरु केली आहे. स्वत: पैसे भरून अपघात विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अशा प्रकारच्या कमी पैशात चांगले संरक्षण देणाऱ्या योजना अनेक विमा कंपन्याकडे आहेत . तुम्ही स्टेट बँकेच्या विमा योजनांची चौकशी केली तर मोदींनी जे देवू केले आहे ते तर बाजारातही मिळते याची तुम्हाला खात्री पटेल ! मोदींची सुकन्या योजना कॉंग्रेस काळात वेगळ्या नावाने सुरु होती हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. मोदी सरकारच्या या योजना म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू आहे असे अनेकांना वाटते. मला त्यात एक फरक दिसतो. सगळ्या योजना कॉंग्रेस काळातील असल्या तरी कॉंग्रेस योजनांना भिकेचा वास होता , तो मोदी योजनांना नाही. तुमच्याच पैशातून तुम्ही स्वाभिमानाने जगू शकता ही आर्थिक साक्षरता मोदींनी निर्माण केली हेच त्यांचे वर्षभरातील वेगळेपण आहे. गेल्या  ६५ वर्षात काहीच झाले नाही असे म्हणत ६६ वे वर्ष मोदींनी मनमोहनसिंग सरकारचीच धोरणे पुढे रेटण्यात घालविले आहे ! 

----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------

Thursday, May 21, 2015

आशेच्या शिखरावरून निराशेच्या घसरणीकडे नेणारे वर्ष

 मनमोहनसिंग यांच्या मौनाने जे गैरसमज झालेत तसे गैरसमज बोलक्या मोदींच्या बाबतीत होण्याचे कारण नसतांना मोदी सरकार बाबत वर्षाच्या शेवटी नाराजीचा सूर उमटत आहे. मोदींसाठी सगळी अनुकुलता असताना त्यांना अपेक्षित परिणाम का साधता आला नाही हा खरा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे.
-----------------------------------------------------------------------


एक वर्षापूर्वी २७ मे २०१४ रोजी सत्तेवर येतांना मोदी सरकारने जनतेच्या मनात ज्या अपेक्षा निर्माण केल्या होता आणि जनतेत उत्साहाचा जो संचार निर्माण झाला होता त्याची जागा हळू हळू अपेक्षा भंग आणि निराशा घेवू लागली आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर राजन यांनी म्हंटल्या प्रमाणे मोदी सरकारकडून ज्या अपेक्षा करण्यात येत आहेत त्या अव्यावहारिक आहेत. मोदी सरकारची धडपड , प्रयत्न सुरु आहेत आणि अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी मोदी सरकार गंभीर प्रयत्न करीत आहे असे देखील राजन यांनी म्हंटले आहे. राजन यांची रिझर्व बँकेच्या प्रमुखपदी झालेली नियुक्ती ही मनमोहनसिंग यांच्या काळातील आहे हे लक्षात घेतले तर राजन उगीचच सरकारची री ओढत आहेत असे म्हणता येणार नाही. मोदी सरकारकडून लोकांच्या निर्माण झालेल्या अपेक्षा अव्यावहारिक होत्या हे खरे असले तरी या अपेक्षा स्वत: मोदींनी आणि उत्तम , खंबीर आणि विकासकेंद्री प्रशासक अशी मोदींची प्रतिमा तयार करणाऱ्या संघ-भाजप आणि प्रसार माध्यमांनी निर्माण केल्या आणि जनता त्याला भुलली असे म्हणणे वास्तवाच्या अधिक जवळ आहे. मोदी सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ लोकांना आपली भूल लक्षात आणून देणारा ठरला आहे. खोट सरकारच्या प्रयत्नात नाही खोट सरकारात येण्यासाठी लोकांची जी दिशाभूल करण्यात आली त्यात आहे.

गेल्या ६५ वर्षात देशाने काहीच प्रगती केली नाही आणि ६५ वर्षात जे झाले नाही त्यापेक्षा जास्त मी ५ वर्षात करून दाखवितो या मोदींच्या  दर्पोक्तीला खरे भासविण्यासाठी गढण्यात आलेल्या सुरस कथांमुळे मोदी भोवती चमत्काराचे वलय निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे आता चमत्कार घडणारच अशी लोकभावना निर्माण झाली होती. .  लोकांचा अपेक्षाभंग झाला तो असा काही चमत्कार घडतांना दिसत नाही म्हणून. ज्या चमत्काराची अपेक्षा लोक मोदींकडून करत होते तो एक चुनावी जुमला होता हे भाजपच्या अध्यक्षानीच कबूल केले . मोदी सरकारची प्रतिमा खराब होत चालली ती त्या सरकारच्या निष्क्रीयतेमुळे नाही तर अशा चुनावी जुमल्यामुळे . आर्थिक - सामाजिक बदल असे एका रात्रीतून घडत नसतात . केवळ सरकारी यंत्रणेच्या बळावर तर अजिबात बदल घडविता येत नाही. त्यासाठी मोठे संघटन , अथक परिश्रम  विशालमन  आणि  दूरदृष्टी असावी लागते. ही कसोटी लावून पाहायचे झाले तर पंतप्रधान मोदी अथक परिश्रम करताना दिसतात हे खरे आहे. मोदींच्या मागे सदस्य संख्येने जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सारखी देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था मोदींच्या मागे आहे. सामान्याला महात्मा बनविण्याची ताकद आणि कला अवगत असलेली आणि घराघरात पोचलेली शक्तिशाली प्रसारमाध्यमे मोदींच्या पाठीशी आहेत. विकासाची वेगळी नसली तरी मनमोहन दृष्टी मोदींकडे आहे. गेल्या पाच वर्षात जनतेने पाहिलेला सरकारच्या प्रत्येक कामात अडंगा आणणारा विरोधीपक्ष आज नाही. या वर्षभरात तर विरोधी पक्ष अस्तित्वात आहे असे जाणवले देखील नाही. निवडणुकीत आडवा झालेला पक्ष वर्षाच्या शेवटी उभा राहण्याची धडपड करताना दिसू लागला आहे. त्यामुळे मोदींना जे करायचे त्यासाठी सर्वार्थाने अनुकूल परिस्थिती या वर्षभरात होती. असे असताना मनमोहनसिंग सरकारच्या शेवटच्या २-३ वर्षात विकासाच्या पटरी वरून घसरलेला देश पुन्हा विकासाच्या पटरीवर आला आणि विकासाची घोडदौड सुरु झाली असे चित्र निर्माण करण्यात मोदींना पाहिजे तसे यश आले नाही . असे यश आले असते तर चुनावी जुमल्यामुळे लोकात आलेली नाराजी दूर झाली असती.
मनमोहनसिंग यांची सर्वात मोठी कमजोरी त्यांना लोकांशी संवाद साधण्याची कला अवगत नव्हती ही होती. लोकांशी संपर्क आणि संवाद नसल्याने जशी त्यांना आपली कामगिरी लोकांच्या मनावर बिम्बविता आली नाही तसेच तथ्यहीन आरोपांना स्पष्ट आणि रोखठोक उत्तरे न दिल्याने ते आरोप खरे मानले जावून त्यांच्या कपाळी चिकटले. दुसऱ्याच्या प्रश्नाची बेआबरू होवू नये म्हणून पाळलेल्या मौनाने त्यांचीच अब्रू गेली. मोदींचे तसे नाही. आपले म्हणणे पटविण्याची आणि ते लोकांच्या गळी उतरविण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. या हातोटीनेच तर ते पंतप्रधान बनले. मनमोहनसिंग यांच्या मौनाने जे गैरसमज झालेत तसे गैरसमज मोदींच्या बाबतीत होण्याचे कारण नसतांना मोदी सरकार बाबत वर्षाच्या शेवटी नाराजीचा सूर उमटत आहे. मोदींसाठी सगळी अनुकुलता असताना त्यांना अपेक्षित परिणाम का साधता आला नाही हा खरा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. मोदींना पाहिजे त्या वाटेवर न चालू देण्या इतपत विरोधी पक्षाची ताकद नाही. मोदींना खरा अडथळा आहे तो स्वत:चा , स्वत:च्या पक्षाचा आणि हा पक्ष ज्याच्या तालावर चालतो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. मोदींनी या वर्षभरात पक्षाला आपल्या मुठीत ठेवण्यात चांगले यश मिळविले असले तरी हे यशच पक्षाला आपल्या मागे उभे करण्यात अडथळा ठरले आहे. पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्याचे महत्व संपविल्याने हे नेते मोदींच्या यशासाठी प्रयत्न करण्या ऐवजी मोदी अपयशी ठरण्याची वाट पाहात बसले आहे. जे पक्ष नेत्याबद्दल तेच सरकारातील मंत्र्याबाबतही म्हणता येईल. मंत्रीमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्र्याला देखील आपल्या पसंतीचा स्वीय सहाय्यक नेमता येत नाही. त्यांच्या मंत्रालयाचे निर्णय पंतप्रधान कार्यालयात होत आहेत. मंत्री म्हणून मिळणाऱ्या सुखसोयी उपभोगणे एवढेच त्यांना काम उरले आहे. सामुहिक निर्णय नाहीत त्यामुळे सामुहिक जबाबदारीही नाही. मोदी उत्साहात कामाला लागले असले तरी मंत्रिमंडळासाठी काम नसल्याने मंत्र्यात मरगळ आहे. पंतप्रधान विदेश दौरे करताहेत आणि विदेशमंत्री घरी बसून आहेत असे चित्र पहिल्यांदाच दिसते आहे .मोदींच्या या कार्यशैलीने त्यांना सामुहिक बळ मिळत नाही . सरकार म्हणजे मोदी आणि भालदार-चोपदारां सारखे एका बाजूला अमित शाह तर दुसऱ्या बाजूला अरुण जेटली असे चित्र निर्माण झाले आहे. मनमोहन कामे सोपवून मोकळे होत आणि मोदी कामे न देवून मंत्र्यांना मोकाट सोडतात . दोन्हीचा परिणाम सारखाच . सगळ्या दोषाचे वाटेकरी पंतप्रधान ! पंतप्रधान म्हणून मनमोहन एकाकी पडले होते तर मोदींनी स्वत:हून 'एकला चलो'ची भूमिका स्विकारली आहे. या दोन्ही पंतप्रधानांची कार्यशैली टोकाची भिन्न असली तरी कार्यशैलीचे परिणाम एकच. दोन्ही प्रकारात सामुहिक पुरुषार्थाला जागा नाहीच. मोदी दोषी आहेत ते इथे.

मोदी सरकारची सारी कामगिरी झाकोळण्याचे किंवा सरकारला अपेक्षित कामगिरी करू न देण्याचे खरे अपश्रेय कुणाचे असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि संघाच्या भाराभर संघटनांचे आहे. निवडणुकात फक्त विकासाची - सर्वांच्या विकासाची- भाषा बोलली गेली आणि हीच भाषा मोदींना भरभरून मते देवून सत्तारूढ करून गेली. ही भाषा मोदीच बोलत नव्हते तर सरसंघचालक भागवत देखील बोलत होते. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर संघ आपल्या मूळ वळणावर गेला. हिंदुत्व, हिंदुराष्ट्र , अल्पसंख्याकांचा द्वेष हा आपला कार्यक्रम राबविण्याची हीच सुवर्णसंधी मानून संघ कामाला लागला. सबका साथ सबका विकास इथेच मागे पडला. विकासा ऐवजी घरवापसी आणि लव्हजिहाद हेच परवलीचे शब्द बनलेत. अन्न-धान्य आणि औद्योगिक उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देण्या ऐवजी हिंदू मुलांचे उत्पादन वाढविण्याचा आदेश आणि उपदेश दिला जावू लागला. मोदी सरकारची प्रतिमा डागाळली ती संघाच्या या कारवायाने. मोदी सरकार करीत असलेल्या कामाची चर्चा प्रसिद्धीमाध्यमात जरूर होती, लोकमनावर  मात्र संघ कारवायाचीच छाप राहिली. अशी चर्चा न होता विकासाची चर्चा होत राहिली असती , मोदी सरकार त्यासाठी करीत असलेले प्रयत्न चर्चिले गेले असते तर नक्कीच मोदी सरकारची वेगळी आणि सकारात्मक प्रतिमा लोकांसमोर उभी राहिली होती. संघ संघटनांच्या कारवायामुळे विकास हा देखील चुनावी जुमला तर नव्हता ना अशी शंका लोकमनात निर्माण होवून वर्षभरातच मोदी सरकार बाबत साशंकता निर्माण झाली आहे. या प्रकाराने मोदींच्या खंबीर नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरकार घटनेप्रमाणेच चालेल हे मोदी वारंवार सांगत असले तरी घटना विरोधी कारवाई करणाऱ्यावर कारवाई करण्यास मोदी सरकार धजावत नाही हेच वर्षभरात दिसून आले आहे. अशा कारवायात लिप्त काही लोकांना पंतप्रधानांनी व्यक्तिगतरित्या झापले हे खरे. या मागे असलेल्या संघटन शक्ती विरुद्ध मात्र पंतप्रधान एका शब्दानेही बोलत नाहीत. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर होणारी टीका नक्कीच अन्यायकारक आहे. परकीय गुंतवणूक आणण्यासाठी या दौऱ्यांचा नक्कीच उपयोग होणार आहे. मात्र संघ आपले ऐकत नाही आणि संघाला बोलण्याची सोय नाही यामुळे तर पंतप्रधान सतत विदेश दौऱ्यावर जात नाहीत ना असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.  सरदार वल्लभभाई पटेलांचे नाव घेतांना पंतप्रधान थकत नाहीत . मात्र समाजाला , राष्ट्राला विभाजित करणारी विषवल्ली ठेचण्यासाठी पटेलांनी जी धमक दाखविली होती त्याचा विचारही पंतप्रधानांच्या मनात येत नाही. पंतप्रधानाचा सगळा खंबीरपणा संघशक्तीपुढे लुळा पडतो हेच या वर्षभरात दिसून आले. याचा अर्थ वर्षभरात मोदी सरकारने फारसे काही केले नाही असा नाही. या वर्षभरात अनेक प्रश्न मार्गी लागलेत . आजवर होवू न शकलेले महत्वाचे निर्णयही झालेत ज्याचे भविष्यात चांगले परिणाम दिसणार आहेत. यात धक्कादायक एवढेच आहे की मार्गी लागलेली कामे , झालेले निर्णय हे मनमोहन सरकारच्या धोरणांचीच अंमलबजावणी आहे ! याचा आढावा आपण पुढच्या लेखात घेवू. इथे आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एवढीच आहे कि वाचाळपणा सोडला तर या सरकारच्या  धोरणाच्या बाबतीत मनमोहन सरकारपेक्षा वेगळेपण दिसत नाही  किमान या वर्षात तरी हे वेगळेपण अधोरेखित झालेले नाही.

------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------------------

Thursday, May 14, 2015

जनतेच्या न्यायालयात न्यायव्यवस्था दोषी !

 जामीन  न्यायालयाची मर्जी नसून आरोपीचा अधिकार आहे आणि नाकारण्यासाठी सबळ कारण नसेल तर तो तात्काळ प्रभावाने मिळाला पाहिजे हे न्यायव्यवस्थेतील अंगभूत तत्व आमचे न्यायालयच विसरले असेल तर लोकांच्या तरी कसे लक्षात राहील. मागील ३-४ वर्षात जामीनाच्या बाबतीत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने रूढ केलेला सिंघम न्याय बाजूला सारून मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याप्रमाणे सलमानला न्याय देवून टीका ओढवून घेतली आहे.
----------------------------------------------------------------


सुस्त हत्तीच्या अंगात चित्याची चपळता आली की त्याची चर्चा होणारच. रेंगाळलेल्या अभिनेता सलमानखान प्रकरणात निकाल लागल्या नंतर त्याला मिळालेला अंतरिम जामीन आणि नंतर लगेच या अंतरिम जमानतीवर झालेले शिक्कामोर्तब हा देशपातळीवर चर्चेचा विषय ठरला. न्यायव्यवस्था श्रीमंत आणि प्रभावी लोक आपल्या मर्जीप्रमाणे झुकवू शकतात . गरिबाला कधी न्याय मिळू शकत नाही. अशा चर्चा सलमान प्रकरणात झडल्या आहेत. या निमित्ताने प्रभावी लोक वर्षानुवर्षे आपले खटले रेंगाळत ठेवू शकतात असाही निष्कर्ष लोकचर्चेत निघाला. या निमित्ताने न्यायव्यवस्था उघडी पडली आणि या डोळ्याला पट्टी बांधलेल्या आंधळ्या न्यायव्यवस्थेवरच्या लोकांच्या आंधळ्या विश्वासाला तडा गेला हे चांगलेच झाले. न्यायव्यवस्थेचे जे दोष लोकांना सलमान प्रकरणात टोचू लागलेत ते काही नवीन नाहीत. सलमान धनसंपन्न सेलेब्रिटी व्यक्ती आहे म्हणून न्यायालयाने त्याला वेगळा न्याय दिला अशी निर्माण झालेली भावना एक तर कायद्याच्या अज्ञानातून आहे आणि चर्चा करणारे सुद्धा सलमानखानकडे सामान्य आरोपी म्हणून न बघता सेलेब्रिटी आरोपी म्हणून बघत असल्याने झाली आहे. सलमान प्रकरणात जे घडले ते कायदाबर हुकुम घडले , कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करून सलमानला सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे खरे तर चर्चा सलमानला जो न्याय मिळाला तो सर्व आरोपींना का मिळत नाही आणि तसा मिळण्यासाठी काय करावे लागेल यावर केंद्रित व्हायला हवी होती. पण सलमानच्या सेलेब्रिटी रुतब्यामुळे लोकांना यात बेकायदेशीर आणि काळेबेरे घडल्याचा , पैशाच्या जोरावर न्यायव्यवस्थेला वाकविल्याचा संशय व्यक्त होवून चर्चा याच मुद्द्याभोवती फिरत राहिली. जामीन मिळण्याच्या आधी निकाल लागल्या बरोबर याच लोकांनी आपल्या न्यायव्यवस्थेचे गोडवे गायले होते. इथे देर आहे पण अंधेर नाही असे न्यायव्यवस्थे बद्दल कौतुकाने बोलले जात होते. अगदी दोन महिन्यापूर्वी मेरठ मधील हाशीमपुरा शिरकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेवर दिल्लीतील न्यायालयाने जो निकाल दिला तो आमच्या डोळ्यासमोर असता तर आमची न्यायव्यवस्थे बद्दल गोडवे गाण्यासाठी जीभ धजावलीच नसती. यात ४२ लोकांना अटक करून गोळ्या घालून ठार करणारे पोलीसकर्मीना संशयाचा फायदा देवून मोकळे सोडले गेले.  असे अनेक हाशीमपुरा आपल्या न्यायव्यवस्थेने पचविले आहे. सलमान प्रकरणापेक्षा हे गंभीर प्रकरण आहे. पण त्यावर नाही झाली एवढी चर्चा.  सलमानला झटपट जामीन मिळाल्यावर मात्र लोकांनी न्यायव्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अर्थात यात दोष लोकांचा नाही. कायद्याबद्दलचे अज्ञान काही नवीन नाही. सलमान जामीन प्रकरणात उठलेले वादळ निर्माण होण्यास लोकांच्या कायद्या बद्दलच्या अज्ञाना सोबतच मनातील सेलेब्रिटी रुतब्या बद्दलचा आकस जसा कारणीभूत आहे तसेच न्यायालयाचे वर्तनही कारणीभूत ठरले आहे. गेल्या ४-५ वर्षात वरच्या न्यायालयांनी जामीनाची प्रकरणे ज्या पद्धतीने हाताळलीत त्यामुळेच सलमानचे प्रकरण वेगळे म्हणून लोकांच्या नजरेत भरले.

आपल्या देशात एखाद्या व्यक्तीने लोकप्रियतेचे शिखर गाठणे नवीन नाही. पण एखाद्या संस्थेने लोकप्रियतेचे शिखर गाठणे यात नाविन्य आहे. असे शिखर गाठले ते वरच्या न्यायसंस्थेने ! कायदा हातात घेवून न्याय देणारे तर जास्त लोकप्रिय ठरतात . म्हणून तर आमच्याकडे सिंघम जास्त लोकप्रिय ठरतो. मागच्या काही वर्षात सेलेब्रिटी आणि प्रभावी राजकारणी मंडळीच्या बाबतीत न्यायालयाने अशी सिंघमची भूमिका निभावून प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जुने अनेक निर्णय स्पष्ट शब्दात असे सांगतात की जामीन हा काही न्यायालयाच्या मर्जीचा प्रश्न नाही तर तो  प्रत्येक आरोपीचा मुलभूत अधिकार आहे. अगदी खालच्या कोर्टाने शिक्षा केलेल्या आरोपींचा सुद्धा . आरोपीला तुरुंगात पाठविणे हा शेवटचा पर्याय असला पाहिजे असे अनेक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. याच्या विपरीत गेल्या ३-४ वर्षात आरोप असलेल्या अनेक राजकारणी आणि सहारा समूहाच्या सुब्रतो राय सारख्या सेलेब्रिटी व्यक्तीच्या बाबतीत आधी तुरुंगाची हवा खा , मग जामीनाचे पाहू अशी भूमिका न्यायालयाने घेतल्याचे आपण पाहतो. गंभीर प्रकरणाच्या बाबतीत आरोपपत्र दाखल होईस्तोवर जामीन देवू नये असा संकेत आहे आणि तीन महिन्यात आरोपपत्र दाखल करण्याचे बंधन आहे. या कालावधीत आरोपपत्र दाखल झाले , न झाले तरी आरोपीचा जामिनाचा मार्ग मोकळा होतो. मागच्या अनेक घटनात असे आरोपपत्र दाखल होवूनही उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने प्रभावी व्यक्तींचे जामीन नाकारले आहेत. खालच्या कोर्टात दोषी असणारा व्यक्ती वरच्या कोर्टात निर्दोष ठरू शकतो. असे सर्रास घडते देखील. त्यामुळे खालच्या कोर्टात दोषी ठरणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात राहावे लागले आणि वरच्या कोर्टाने निर्दोष सोडले तर त्याच्या तुरुंगात राहण्याची भरपाई कशी करणार ? म्हणूनच तत्काळ प्रभावाने सुलभ रीतीने जामीन मिळणे अपेक्षित असते. गेल्या ३-४ वर्षाचा प्रभावी व्यक्तीच्या जामिनाचा इतिहास मात्र असे सांगतो की जामीन हा न्यायालयाच्या मर्जीचा विषय आहे. त्याचमुळे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना जामीनाविना तुरुंगात ८० दिवस काढावे लागले. स्पेक्ट्रम प्रकरणातील राजकीय व इतर प्रभावी आरोपींना जामीना अभावी अनेक दिवस तुरुंगात खितपत पडावे लागले.  जयललिता यांना जामीन न मिळाल्याने २१ दिवस तुरुंगात काढावे लागले आणि आता त्या निर्दोष सुटल्या आहेत. तहलकाचे तरुण तेजपाल यांचेवर आरोपपत्र दाखल होवूनही त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. सहाराचे सुब्रतो राय तर न्यायालयाच्या खप्पा मर्जीने विना जामीन-विना सुनावणी तुरुंगात आहेत.

न्यायालयाने या लोकांना जामीन न देता अशी तुरुंगाची हवा खायला लावली या बद्दल आम्ही आनंदी होतो . त्यांच्या घटनात्मक अधिकाराची पायमल्ली झाली असे पुसटसेही कोणाला वाटले नाही. मनमोहन सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या शेवटी अविश्वास ठरावावर पैशाची उलाढाल केल्याचा ज्यांच्यावर आरोप होता त्यातील राजकीय आरोपींना तर आरोपपत्र दाखल होवून खटला सुरु झाल्यावर वरच्या न्यायालयाने आरोपींना तुरुंगात का पाठविले नाही अशी विचारणा करीत त्यांना तुरुंगात पाठविण्याचे फर्मान सोडले. ही कारवाई अनावश्यक होती. तरीही लोकांनी न्यायालयाच्या या आदेशाला डोक्यावर घेतले .पुढे हे आरोपी निर्दोष सुटलेत ! खालच्या कोर्टात दोषी ठरलेल्या आरोपींना जामीनासाठी वरच्या कोर्टात जाता यावे म्हणून खालच्या कोर्टांनी दुपारी निकाल देण्याचे संकेत आहेत.लगेच आरोपीला वरच्या कोर्टात निकालावर स्थगिती मिळवून जामीनावर सुटता यावे हा त्यामागचा उद्देश्य आहे. सलमानच्या वकिलांनी याचाच उपयोग करीत सलमानला जामीन मिळवून दिला. जामीन देणारे न्यायालय लोकांच्या नजरेतून उतरले याचे कारण गेल्या काही वर्षात प्रभावी व्यक्तीचा जामीनासाठी अर्ज आला की सुनावणीसाठी  ८-१५ दिवसानंतरची तारीख देण्याची पद्धत रूढ झाली होती. जामीन हा आरोपीचा अधिकार आहे आणि नाकारण्यासाठी सबळ कारण नसेल तर तो तात्काळ प्रभावाने मिळाला पाहिजे हे आमचे न्यायालयच विसरले असेल तर लोकांच्या तरी कसे लक्षात राहील. सेलेब्रिटीच्या बाबतीत रूढ झालेला सिंघम न्याय बाजूला सारून मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याप्रमाणे सलमानला न्याय देवून टीका ओढवून घेतली आहे.

सलमान जामीन प्रकरणी काहीही चुकीचे किंवा बेकायदेशीर घडले नसले तरी या निमित्ताने खटले वर्षानुवर्षे रेंगाळतात आणि पैसेवाले न्याय पदरात पाडून घेतात याची चर्चा होवू लागली हे सुचिन्हच आहे. मात्र या बाबतीत व्यक्तीला दोष देण्यापेक्षा व्यवस्थेची समिक्षा करून व्यवस्थेत सुधारणा कशी आणि काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. खालच्या कोर्टात निकाल लागल्या नंतर ३ तासात उच्च न्यायालयाकडून जामीन मिळवायचा असेल तर तो पैसे खर्च करणाराच मिळवू शकेल. भौगोलिकदृष्ट्या उच्चन्यायालयापासून दूर असलेली व्यक्ती तर पैसा असूनही एवढ्या वेळात जामीन मिळवू शकत नाही. मग जामीनपात्र प्रकरणात वरच्या न्यायालयात अपील करण्याची मुभा असताना खालच्या कोर्टाने अपील करण्यासाठी स्वत:च निकालाला स्थगिती देवून आरोपीला जामीन दिला पाहिजे अशी कायदेशीर तरतूद असायला काय हरकत आहे ? अशी तरतूद झाली तर गोरगरीब आरोपींवर सुद्धा वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडण्याची वेळ येणार नाही. जामीन हा आरोपीचा अधिकार आहे आणि   अपवादात्मक परिस्थितीच तो नाकारला जावा हे सर्वमान्य होणे गरजेचे आहे. प्रश्न उपस्थित करायचा झाला तर आरोपी जामीनावर का सुटला यावर न होता आरोपी का सुटला नाही यावर केला पाहिजे. आपल्या न्यायव्यवस्थेत प्रभावशाली व्यक्ती आपल्या मर्जीने खटले लांबवू शकतात हे खरे आहे. पण ज्या खटल्यात वादी आणि प्रतिवादी सामान्य आहेत त्यांचे खटलेही त्यांच्या मर्जीविरुद्ध वर्षानुवर्षे लांबतात हे देखील खरे आहे. आपली न्यायव्यवस्था एवढी सुस्त, ढिसाळ आणि संवेदनशून्य आहे कि खटला लांबविण्यासाठी प्रभावशाली असण्याची गरज नाही. काळा कोट चढवून कोर्टात उभा राहणारी कोणतीही व्यक्ती हे काम लीलया करू शकते ! असे घडायचे नसेल तर खटला किती वेळात संपवायचा याचे वैधानिक बंधन घालून दिले पाहिजे. अशा सुधारणा केल्या तरच सलमानला मिळाला तसा न्याय मिळविणे सर्वसामन्याच्या आवाक्यात येईल. न्यायव्यवस्था अशी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहू नये असे वाटत असेल तर न्यायिक सुधारणांसोबत सिंघम न्यायाचे न्यायाधीशांना आणि सामान्य नागरिकांना असलेले आकर्षण कमी झाले पाहिजे. असे झाले तरच घटना आणि कायद्या प्रमाणे न्याय मिळणे सुकर होईल.

------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------

Thursday, May 7, 2015

स्त्री-जन्माचे भोग संपणार कधी ?

 स्त्रियांचे भोग संपत नाहीत कारण  ज्यांच्यावर अत्याचार होतो आहे त्या स्त्रिया संघटीत होवून लढायला सोडा बोलायला देखील तयार नाहीत, आणि दुसरे म्हणजे मानव निर्मित कायद्या पेक्षा मनुस्मृती सारख्या ग्रंथात सांगितलेल्या  "ईश्वर निर्मित " कायद्याचा जनमनावर जास्त प्रभाव  आणि पकड आहे.
---------------------------------------------------------------


गेल्या पंधरवाड्यात स्त्री प्रश्नावर दु:खदायी घडामोडी घडूनही त्याची व्हावी तशी चर्चा झाली नाही.उपाय योजना तर दूरची गोष्ट. याचा बहुतांशी दोष स्त्रीयाकडेच जातो. कितीही संतापजनक घटना त्यांच्या बाबतीत घडली तरी त्या स्थितप्रद्न्य असतात.बालकासाठी आवश्यक घुट्टी एखादेवेळी पाजली जाणार नाही पण स्त्रियांनी कसे सोशिक राहिले पाहिजे याचे बाळकडू मात्र न चुकता न विसरता प्रत्येक कुटुंबात पाजले जाते. परिणामी कितीही अन्याय , अत्याचार तिच्यावर होवू द्या तिच्याकडून हुं की चू होणार नाही. पुरुषप्रधान समाजासाठी तिची ही सोशिकता फायद्याची असल्याने समाजाकडून तिच्या या सोशिकतेचा गौरव होतो आणि हा गौरव तिला अधिक सहन करण्याची ताकद देतो. याचा अर्थ तिच्यात अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद नाही असा नाही. आपल्या कुटुंबावर - समाजावर अन्याय-अत्याचार होत असेल तर ती वाघिणी सारखी चवताळून लढू शकते. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील समतेच्या लढ्यात स्त्रीच्या अमर्याद लढाऊपणाचे दर्शन घडले आहे. लढ्यात अव्वल असलेली स्त्री कुटुंबात मात्र दुय्यमच राहात आलेली आहे. कारण या दुय्यमत्वा विरुद्ध लढायची तिची मानसिकताच नसते. त्यामुळे तिच्या प्रश्नावर संसदेत चर्चा झाली , अगदी गदारोळ माजून संसद बंद पडली तरी लक्षात यावी आणि घ्यावी अशी स्त्रियांची प्रतिक्रिया असत नाही. 

बाबा रामदेव यांच्या "पुत्रजीवक बीज" या औषधावर संसदेत वादळी चर्चा झाली. त्याही आधीही हे औषध चर्चेचा विषय राहिले आहे. आपल्याकडे मुलगी नव्हे तर मुलगा जन्माला यावा म्हणून देव पाण्यात घालून बसतात . मुलीचा जन्म ओझे आणि नकोसा वाटतो. लोकसंख्येतील स्त्रियांचे घसरते प्रमाण याचा पुरावा आहे. मुली ऐवजी मुलगा व्हावा अशी शाश्वती एखादे औषध देत असेल तर त्या औषधाची तुफानी विक्री होणारच. बाबा रामदेवांच्या पुत्रजीवक औषधा बद्दल हेच घडले. संसदेत चर्चा झाल्या नंतर रामदेवबाबाने खुलासा केला कि हे औषध मुलगा होण्यासाठी नसून मुलगा किंवा मुलगी असे कोणतेही अपत्य जन्माला यावे यासाठी आहे. झालेल्या गदारोळा नंतर यापेक्षा वेगळा खुलासा येणे शक्यच नव्हते. बाबांनी खुलासा खरा मनाला  तरी हे औषध मुलगा व्हावा यासाठीच घेतले जाते हे वास्तव बदलत नाही. मुलगाच व्हावा यासाठी ते औषध नसेलही, पण मुलगाच हवा ही आमची मानसिकता लक्षात घेवून बाबाने त्या औषधाचे नांव तसे ठेवले आणि त्या पद्धतीने प्रचार करून लोकांना फसवून आपला धंदा वाढविला या आरोपातून बाबांची सुटका होत नाही.  संसदेत या औषधाची तपासणी करण्याचे केंद्रसरकारचे आश्वासन आणि बाबा रामदेवच्या खुलाशा नंतरही मध्यप्रदेश सरकारने या औषधाच्या विक्रीवर प्रतिबंध घातला आहे यावरून हे औषध कशासाठी घेतले जात होते हे स्पष्ट होते. बाबांनी आपल्या खुलाशात जो राजकीय कांगावा केला आहे त्यावरून पाणी कुठेतरी मुरतेय असा संशय येणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी या औषधाची चर्चा केली जात आहे असे बाबांनी म्हंटले आहे. संसदेत किंवा संसदे बाहेरील चर्चेत कोणीही दुरान्वयानेही या औषध निर्मितीशी पंतप्रधानांचा संबंध जोडला नव्हता. उलट बाबांच्या खुलाशाने तो जोडला गेला किंबहुना तसा जोडणे बाबांना आवश्यक वाटले. असे वाटण्याचे कारण उघड आहे. केंद्र सरकार या औषधाची तपासणी आणि औषध विक्रीची चौकशी करणार असल्याने ती चौकशी प्रभावित करण्यासाठीच बाबाने पंतप्रधान मोदींना या वादात ओढले असाच निष्कर्ष निघतो. केंद्रसरकारच्या तपासणीची वाट न पाहताच भारतीय जनता पक्षाचे शासन असलेल्या मध्यप्रदेशात या औषधावर बंदी  आली आहे हे लक्षात घेतले तर मोदींना बदनाम करण्यासाठी या औषधाची चर्चा होतेय हा बचाव गळून पडतो. मूळ मुद्दा असा आहे कि मुलगी नको , मुलगा व्हावा म्हणून घ्यावयाचे हे औषध स्त्रियांनी घ्यायचे आहे आणि तसे ते मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याचा अर्थ स्त्रियांना देखील मुली जन्माला यायला नको आहेत. कुटुंबाच्या दबावाखाली त्या वागत असतील हे शक्य आहे. आपल्या वाट्याला जे भोग आलेत ते आपण जन्माला घातलेल्या मुलीच्या वाट्याला येवू नयेत म्हणून मुलगी नकोच अशीही तिची भावना असू शकते. तरीही हे तर मान्यच करावे लागेल कि स्त्री जन्मासाठी प्रतिकूल परिस्थिती विरुद्ध तिचे मन बंड करून उठत नाही.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू स्त्रियांनी अधिक मुलांना जन्माला घालावे अशी चर्चा सतत कानावर आदळत आहे. स्त्रियांनी चूल आणि मुल सांभाळावे अशी भारतीय संस्कृती आहे असे अनेकवेळा सांगणारे रा. स्व. संघप्रमुख भागवत यांनी देखील अशी चर्चा करणाऱ्यांना फटकारले. स्त्री म्हणजे मुले जन्माला घालण्याचा कारखाना नाहीत या शब्दात ते बोलले. पण त्यांना न जुमानता त्यांचे अनुयायी स्त्रियांनी जास्त मुले जन्माला घालावीत असे बोलतच आहे. असे बोलताना त्यानाही मुली जन्माला याव्यात हे अपेक्षितच नाही . कारण असे मुले जन्माला घालायची आहेत ती दुसऱ्या धर्मावर मात करण्यासाठी , दुसऱ्या धर्माविरुद्ध लढण्यासाठी . स्त्री हे काम करू शकणार नाही असेच त्यांचे संस्कार आहेत. स्त्रियांनी मुले जन्माला घालून चुलच सांभाळली पाहिजे हे ते संस्कार आहेत. या संस्काराची वाहक "आई"च राहात आली आहे. असे संस्कार कमी पडून मुलगी जन्माला आली आणि घराबाहेर पडलीच तर तिला कायमचा धडा शिकवायला समाजातील टगे आहेतच. दिल्लीतील निर्भया प्रकरणा नंतर मोठे आंदोलन झाले , कठोर कायदे झालेत. तरी स्त्रियांचे भोग कमी झाले नाहीत. निर्भया प्रकरणी आंदोलनात आघाडीवर असलेले अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झालेत. परवा त्यांच्याच घरासमोर आणखी एका निर्भयाला सामुहिक बलात्कार करून फेकण्यात आले. स्त्रियांची परिस्थिती बदलू पाहणाऱ्या व्यवस्थेलाच हे एकप्रकारचे आव्हान आहे. समाजातील टगेच स्त्रियांचे जीवन नरकमय करतात असे नाही. न्याय आणि समानता निर्माण करण्याची आणि रक्षण करण्याची जबाबदारी असलेले लोकही वेगळ्या पद्धतीने हेच करतात. नवऱ्याकडून बायकोवर होणारी लैंगिक जबरदस्ती कायद्याने गुन्हा ठरविली पाहिजे ही मागणी संसदेतच सरकारने फेटाळून लावली आहे. स्त्रियांची इच्छा असो वा नसो त्या मात्र पुरुषांच्या इच्छापूर्तीचे साधन आहे ही खोलवर रुजलेली मान्यता ही मागणी फेटाळण्या मागे. एकीकडे कुटुंबाला पवित्र संस्था म्हणायचे आणि या पवित्र संस्थेत अत्याचाराला राजमान्यता आणि धर्ममान्यता द्यायची हे ढोंग आहे. कुटुंबातील अत्याचारांना असे संरक्षण तर समाजातील अत्याचारांसाठी स्त्रियांचे कपडे , त्यांचे रात्री-अपरात्री बाहेर पडणे या सारख्या गोष्टी जबाबदार मानल्या जातात ! कायदा आणि शासन या आव्हानापुढे दोन कारणांनी निष्प्रभ ठरत आहे. एक तर ज्यांच्यावर अत्याचार होतो आहे त्या स्त्रिया संघटीत होवून लढायला सोडा बोलायला देखील तयार नाहीत, आणि दुसरे म्हणजे मानव निर्मित कायद्या पेक्षा मनुस्मृती सारख्या ग्रंथात सांगितलेल्या  "ईश्वर निर्मित " कायद्याचा जनमनावर जास्त पकड आणि प्रभाव आहे. असे "ईश्वर निर्मित" कायदे फक्त हिंदू धर्मातच नाहीत तर दुसऱ्याही धर्मातही आहेत. धर्माविरुद्ध एल्गार पुकारण्याची मानसिक आणि संघटीत संख्येची ताकद स्त्रिया उभा करीत नाहीत तो पर्यंत स्त्री जन्माचे भोग संपणार नाहीत. 

------------------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८ 
-------------------------------------------------------------------------------------------