Thursday, March 31, 2016

विद्यार्थी आणि राजकारण


१८ वर्ष वयाच्या तरुण-तरुणींना मतदानाचा जो अधिकार मिळाला त्यातून सत्ता परिवर्तन घडून आले हे लक्षात घेतले तर विद्यार्थ्यात राजकीय जाण आणि राजकीय जागृती असणे गरजेचे ठरते. महाविद्यालय आणि विद्यापीठात राजकीय स्वरूपाच्या चर्चा , वादविवाद , आंदोलन सदृश्य कार्यक्रम याला स्थान मिळणे आवश्यक आहे. अभ्यासा सोबत देशाच्या भवितव्याचा विचार विद्यार्थ्यांनी केला नाही तर त्यांचेच भवितव्य अंध:कारमय होईल .
--------------------------------------------------------
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करावे राजकारण करू नये असा सल्ला प्रस्थापित आणि सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळातून दिल्या गेला आहे. सरकार विद्यापीठांना अनुदान देते ते विद्यार्थ्यांनी शिकावे म्हणून , राजकारण करण्यासाठी नव्हे असे बोल मोदी सरकारच्या अनेक मंत्र्यांनी ऐकवले. हे सगळे ते मंत्री आहेत ज्यांना विद्यार्थ्यांनी आपले शाळा – महाविद्यालय आणि विद्यापीठ सोडून अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रामलीला मैदानात ठिय्या दिला तेव्हा त्यांची पाठ थोपटण्यात धन्यता मानीत होते. आजचा सत्ताधारी भाजप आणि त्याला सत्तेत आणण्यासाठी मदत करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या दहा दिवसात देशभरात शाळा – महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांना वर्ग सोडायला लावून त्यांच्या मिरवणुका काढीत होते. संघाने त्या दिवसात आपली काळी टोपी सोडून ‘मै अण्णा हू’ ची टोपी परिधान केली होती. संघ शाखेत जाणारे बहुतांश विद्यार्थी असतात आणि त्यांच्या डोक्यावर त्या काळी ती टोपी होती. निर्भया प्रकरणात तर सर्वप्रथम रस्त्यावर उतरणारे विद्यार्थी जे एन यु चे होते. आज सत्तेत असलेल्या मंडळीनी जे एन यु च्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला डोक्यावर घेवून निर्भया प्रकरणात तत्कालीन सत्ताधाऱ्यांची कोंडी आणि बदनामी करण्यासाठी त्याचा वापर केला होता. विरोधी पक्षातून सत्तेपर्यंत जाण्यात आजच्या सत्ताधाऱ्यांना सर्वात मोठी मदत कोणाची झाली असेल तर ती या दोन आंदोलनाची होती आणि या आंदोलनाचा आधार युवा विद्यार्थी होते. त्यामुळे आजचे सत्ताधारी जेव्हा म्हणतात कि विद्यार्थ्यांनी राजकारण न करता विद्यार्जन करावे तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांच्या राजकीय शक्तींची चांगलीच जाणीव आहे आणि पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना विद्यार्थी आंदोलनाने जो धक्का दिला तसा धक्का आपल्याला मिळू नये याची खबरदारी म्हणून आजचे सत्ताधारी विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेवू नये असे साळसूदपणे सांगत आहेत. किंबहुना कोणत्याही विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी संघटीत होवून कोणत्याही कारणासाठी आंदोलन करू नये यासाठी साम ,दाम , दंड , भेद असे सगळे उपाय या सरकारकडून योजिले जात आहेत. विद्यार्थी परिषदे मागे सारी राजकीय ताकद आणि पोलिसी बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना संघटीत होण्यापासून आणि आंदोलन करण्यापासून रोखण्यात येत आहे. सरकारच्या अशा कुटनीतीतून हैदराबादेत रोहित वेमुलाचा बळी गेला आणि हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन नाही , आंदोलन दृष्टीपथातही नाही अशा ठिकाणी ‘देशद्रोहा’च्या हत्याराचा वापर करून विद्यार्थ्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेने केलेला प्रयत्न याच स्वरूपाचा होता. देशद्रोहाचा आरोप किती सवंगपणे लावल्या जात आहे हे फर्ग्युसन प्रकरणात स्पष्ट झाले आहे.

बहुमतात असलेल्या सरकारला विरोधी पक्षाची भीती नाही. सरकारला भीती आहे ती कमजोर विरोधी पक्षाच्या मागे विद्यार्थी शक्ती उभी राहण्याची. कारण आजचा मजबूत सत्ताधारी पक्ष कालचा असाच कमजोर विरोधी पक्ष होता. आणि त्या कमजोर विरोधी पक्षाला युवाशक्तीची साथ मिळाल्यानेच आज तो मजबूत सत्ताधारी बनला आहे. ज्या भाबड्या मंडळीना मोदी सरकार कारण नसताना विद्यार्थ्यांच्या मागे का लागले हे कळत नाही त्यांनी गेल्या निवडणुकीत युवाशक्तींनी घडविलेला चमत्कार लक्षात घेतलेला नाही. मोदींमुळे सत्ता परिवर्तन झाले असे सरसकट बोलले जाते. त्यातील सत्य हे आहे की , युवाशक्ती मोदींच्या पाठीशी उभी राहिल्याने सत्ता परिवर्तन शक्य झाले. निवडणूक निकाला नंतर याच स्तंभात मतदानाच्या आकडेवारीच्या आधारे मी हे सत्य मांडल्याचे या स्तंभाचे जे नियमित वाचक आहे त्यांना आठवेल. कॉंग्रेसचा गेल्या निवडणुकीत दारूण पराभव झाला खरा. मात्र त्या आधीच्या निवडणुकीत विजयी कॉंग्रेसला जेवढी मते मिळाली होती तेवढी किंबहुना त्यापेक्षा किंचित अधिक मते मिळूनही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. निवडणुकी पूर्वीच्या ५ वर्षाच्या काळात तरुण मतदारांची जी नोंदणी झाली त्यातील बहुतांश तरुण मतदार मोदींच्या बाजूने उभे राहिल्याने मोदींचा विजय आणि कॉंग्रेसचा पराजय झाला. १८ वर्षे वयाच्या विद्यार्थी-तरुणांना मतदानाचा जो अधिकार मिळाला त्यातून सत्ता परिवर्तन घडून आले हे लक्षात घेतले तर तरुणांमधील राजकीय जाण आणि राजकीय जागृती महत्वाची ठरते. विद्यार्थी आणि तरुण राजकीय दृष्टीने जागृत नसतील तर चुकीच्या व्यक्ती आणि पक्षाच्या हाती सत्ता जाण्याचा मोठा धोका संभवतो . त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजकारण करावे कि नाही हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. विद्यार्थी हा मतदार असेल तर त्याने राजकारणाचा विचार करणे अपरिहार्य ठरते. त्याचा कोणी बाऊ करावा असे त्यात आहेच काय. त्याचा बाऊ केला जातो कारण राजकारण म्हणजे काही तरी वाईट गोष्ट आहे अशी समजूत झाली आहे. राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि सत्तेतून मिळणाऱ्या अधिकाराचा उपभोग , भ्रष्टाचार असे त्याला स्वरूप आले आहे. राजकारण नीट न कळता राजकारणात झालेल्या खोगीर भरतीचा हा परिणाम आहे. त्यामुळे समजायला लागल्यापासूनच राजकारणाचा विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशा आणि विद्यापीठ हेच राजकारण समजून घेण्याची योग्य अवस्था आणि ठिकाण आहे. विद्यापीठात शिकत असताना राजकारणाचा विचार केला तर ते लोकांच्या भल्यासाठी , लोकांच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी करायचे असते हा विचार रुजतो. हा विचार न रुजता राजकारणात पडले कि मग एक व्यवसाय म्हणून राजकारणाकडे पाहिले जाते . राजकारणाचा धंदा व्हायचा नसेल तर आदर्शाने भारलेल्या तरुणांचा राजकारण प्रवेश स्वागतार्ह मानला पाहिजे. समाजाची अवस्था आणि व्यवस्था समजून घेणे हा विद्यार्थी जीवनाचा अभिन्न हिस्सा असले पाहिजे. जे एन यु मध्ये हा प्रयत्न सुरु असतो. इतर ठिकाणी असे प्रयत्न आणि प्रयोग याचा विस्तार होण्याची गरज आहे. या प्रयत्नात काही चुका होणारच. नवा आणि नव्याने विचार करण्यातच चुका होत असतात . जुन्या पिढीने जे केले तेच करायचे असेल तर मग नाही होणार चुका आणि मग प्रगती पण नाही होणार .

स्वातंत्र्य लढ्याला बळ आणि गती मिळाली ती विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे . ते विद्यार्थी शिक्षण एके शिक्षण करीत बसले असते तर आणखी किती काळ पारतंत्र्यात राहावे लागले असते हे सांगता येणे कठीण आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि राजकारण या काही वेगळ्या गोष्टी नव्हत्या. नवे काही घडवून आणायचे असेल तर विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग आवश्यक आहे या बाबतीत त्या काळच्या नेतृत्वाच्या मनात कोणतीही शंका नव्हती. त्याचमुळे सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी तर १८४८ साली जागृती व्हावी यासाठी विद्यार्थी संघटना तयार करून त्यांना चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. लॉर्ड कर्झन याने १९०५ साली बंगालची फाळणी केली त्याच्या विरोधात सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि त्यानंतर हा सहभाग वाढतच गेला हा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व गांधीकडे आले तेव्हा त्यांनी १९१९ साली रौलेट कायद्या विरुद्ध आणि जालियनबाग घटने विरुद्ध आंदोलन पुकारले तेव्हा त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग फार मोठा होता. भगतसिंग सारखे विद्यार्थी रत्न स्वातंत्र्याच्या लढाईने घडविले. सावरकरांनी देखील परदेशात विद्यार्थी संघटना स्थापन करून सशस्त्र लढ्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. गांधीच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढाईत तर विद्यार्थी आणि युवक-युवतीचाच मोठा सहभाग होता. १९२० साली स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून नागपूर येथे पहिली अखिल भारतीय विद्यार्थी अधिवेशन पार पडले. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अधिवेशनाने विद्यार्थी स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित झाले. गांधीजीनी असहकाराची चळवळ पुकारली तेव्हा तर त्यांनी शाळा-महाविद्यालयावर बहिष्कार टाकून लढाईत सामील होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले आणि त्याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. १९४२ चे चलेजाव आंदोलन तर विद्यार्थी आणि तरुणांनी चालविलेले आंदोलन होते. त्यामुळे आपली स्वातंत्र्य चळवळ हे स्वातंत्र्यासाठीचे विद्यार्थी आंदोलन होते असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही.


विद्यार्थी युवकांच्या सहभागाने राजकीय स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्य मिळाल्या नंतरच्या इतक्या वर्षानंतर आपल्याला अजूनही अनेक गोष्टी पासून स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे. जाती व्यवस्थे पासून मुक्ती मिळणे बाकी आहे. स्त्री-पुरुष समता अजूनही एक स्वप्नच आहे. गरिबीमुळे येणाऱ्या गुलामीत मोठी लोकसंख्या जगत आहे. अज्ञान , रूढी , परंपरा यातून मुक्ती मिळायची आहे. यातून मुक्ती मिळाल्या शिवाय वैज्ञानिक वृत्ती आणि दृष्टी निर्माण होणे शक्य नाही. भ्रष्टाचार , कुशासन यापासून मुक्ती हे मोठे आव्हान आहे. राजकीय स्वातंत्र्य हे या सर्व गोष्टी पासून स्वातंत्र्य मिळविण्याची पहिली अनिवार्य अशी पायरी होती. राजकीय स्वातंत्र्या इतकेच या सगळ्या बाबी पासून स्वातंत्र्य महत्वाचे आहे. राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत विद्यार्थी युवक-युवती शिक्षण सोडून सहभागी झालीत याचा आम्हाला अभिमान वाटत असेल तर आता आम्हाला ज्या ज्या गोष्टीपासून स्वातंत्र्य मिळवायचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे स्वागत करायला हवे. राजकारण यापेक्षा काही वेगळे नसते. अशा राजकारणात विद्यार्थ्यांचा सहभाग स्वागतार्हच नाही तर अपरिहार्य मानला पाहिजे.
----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment