Thursday, October 5, 2017

सरकार आणि संघाचे साटेलोटे !

काशी हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरूंनी संघाची सत्ता असल्याने विद्यापीठात संघाचे नीती नियम लागू करण्यात काही गैर नसल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यांच्या दृष्टीने संघाचे नीती नियम म्हणजे मुलींसाठी वेगळे नियम , मुलांसाठी वेगळे नियम ! संघाने त्यांच्या वक्तव्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मुलींनी झालेल्या विनयभंगाच्या घटनेला विरोध म्हणून आंदोलन केले तर कुलगुरुनी पोलिसांना बोलावून त्यांना बदडून काढले . आपल्या मतदार संघातील घटनेवर प्रधानमंत्री देखील मौन बाळगून आहेत. कुलगुरूनी सांगितलेले संघाचे नीती नियम सरकारला नि संघाला मान्य आहेत असाच यातून अर्थ निघतो.
--------------------------------------------------------------------


काशी हिंदू विद्यापीठात ' ७ च्या आत घरात ' जाणाऱ्या मुलींचा उफाळून आलेला असंतोष आणि हा असंतोष दाबून टाकण्यासाठी पोलिसांनी मुलींच्या वसतिगृहात घुसून केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याने अनेक बाबींवरील पडदा दूर झाला आहे. राजकारणात फार रस न घेणाऱ्या आणि फारसे सक्रीय नसलेल्या तरुणांना राजकारणाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यात नरेंद्र मोदींना आलेले यशच त्यांना अनपेक्षितपणे प्रधानमंत्र्याची खुर्ची मिळण्यास कारणीभूत झाले होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान विकासाचे आणि फक्त विकासाचेच स्वप्न दाखवून त्यांनी देशातील तरुणाईला भुरळ घातली होती. आधीच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला जेवढी मते पडली होती त्यात या लोकसभा निवडणुकीत किंचित वाढ होवूनही कॉंग्रेसपक्षाचा दारुण पराभव झाला याचे कारणच देशातील तरुणाईने कॉंग्रेसकडे पाठ फिरवून नरेंद्र मोदींना समर्थन दिले हे होते . दोन लोकसभा निवडणुकी दरम्यान नव्याने नोंदला गेलेला सगळा मतदार तरुण असणार आणि हा सगळ्याच्या सगळा नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहिल्याने भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. नरेंद्र मोदींच्या यशाची शिल्पकार असलेली तरुणाई किती अस्वस्थ आहे हे ठिकठिकाणच्या विद्यापीठ निवडणुकीत भाजप आणि संघपरिवाराच्या लाडक्या अभाविपच्या वाट्याला आलेल्या पराभवातून दिसत होते. काशी हिंदू विद्यापीठातील घटनेने त्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर अनेक घोषणा दिल्या. 'बेटी बचाओ , बेटी पढाओ' ही घोषणा त्यातलीच एक. मुलींबरोबर कुटुंबात आणि बाहेर होणारा भेदभाव समाप्त झाला पाहिजे , मुलींना मुलांसारखेच वागवले पाहिजे असे म्हणत आणि मुली सोबत सेल्फी काढत प्रधानमंत्र्यांनी भरपूर टाळ्या मिळविल्या होत्या. ' बेटी बचाओ बेटी पढाओ ' ची घोषणा देणाऱ्या प्रधानमंत्र्याच्या मतदार संघातच विद्यापीठात पढणाऱ्या बेटींना पोलिसांनी मारून घायाळ केले. काशी हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींचा असंतोष उफाळून आला आणि त्या रस्त्यावर उतरल्या तेव्हा प्रधानमंत्री वाराणसीत आले होते. 'बेटी बचाओ बेटी पढाओ'ची घोषणा देणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी १०० वर्षाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या मतदार संघातील विद्यापीठात काय चालले याची दखल न घेण्याचा सरळ परिणाम म्हणजे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थीनीना सरळ करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने घडवून आणलेला लाठीमार ! प्रधानमंत्र्यांनी वाराणसी सोडताच विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पोलिसांना बोलावून त्यांच्या करवी विद्यार्थीनीना झोडपून काढले . मुलींचे आंदोलन हाताळण्यासाठी महिला पोलिसांची गरज ना विद्यापीठ प्रशासनाला वाटली ना पोलीस प्रशासनाला . पुरुष पोलिसांनीच सगळी कारवाई पार पाडली. या कारवाई बद्दल कुठलीही अपराधी भावना न बाळगता विद्यापीठ कुलगुरूनी जी मुक्ताफळे उधळली ती लक्षात घेतली तर विद्यार्थिनींच्या आंदोलनामागील कारणांचा उलगडा सहज होतो. कुलगुरू त्रिपाठी यांनी बेधडकपणे सांगून टाकले की विद्यापीठ संघाचे आहे , कारण राज्यात आणि केंद्रात सत्ता संघाची आहे ! त्यामुळे संघाचे नीतीनियम विद्यापीठात लागू करणे गैर नाही !


काशी हिंदू विद्यापीठातील विद्यार्थीनींच्या आंदोलनाचे तात्कालिक कारण छेडखानी आणि विनयभंग असले तरी विद्यापीठ प्रशासनाकडून मुलगी आहे म्हणून जी वागणूक विद्यार्थीनीना मिळत होती त्याचा साचलेला असंतोष या निमित्ताने बाहेर आला. विद्यापीठात मुलींबाबत जो भेदभाव केला जातो त्यावर टीकेची प्रचंड झोड उठली आणि त्या टीकेला उत्तर देतांना कुलगुरू जाहीरपणे बोलायला नको ते बोलून गेले. संघाचे विद्यापीठ आहे आणि सरकार संघाचे असल्याने त्यांचे नियम लागू करण्यात गैर काय म्हणताना कुलगुरूनी स्वत:लाच नाही तर संघ-भाजपला देखील अडचणीत आणले. त्यामुळेच संघप्रेमी असलेल्या कुलगुरुना दीर्घकालीन रजेवर जावे लागले. ज्याला कुलगुरू संघाची नीती म्हणतात आणि त्या नीतीचा अंमल केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतात ते नीती-नियम आहेत तरी कोणते ? तर मुलीनी संध्याकाळी ७ नंतर वसतीगृहाच्या बाहेर राहता कामा नये. रात्री मुलींनी अभ्यास करणेच गैर असल्याने रात्री अभ्यासासाठी त्यांना विद्यापीठाच्या लायब्ररीत प्रवेश मिळणार नाही. मुलीनी शाकाहारी असले पाहिजे . त्यामुळे मुलींच्या जेवणात अंडे आणि मांस याचा समावेश असणार नाही ! कोणी म्हणेल शाकाहार काय वाईट आहे का ? शाकाहार वाईट नाही पण भेदभाव वाईट आहे. त्याच विद्यापीठात शिकणाऱ्या आणि तिथल्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना मात्र आठवड्यातून दोनदा मांसाहार दिला जातो. मुले रात्री १० वाजेपर्यंत बाहेर उंडरु शकतात आणि रात्री मुलांसाठी लायब्ररी उघडी असते. अशा प्रकारे मुलगे आणि मुली यांच्यात भेदभाव करून मुलीना कमी लेखणारे नियम लागू असल्याने या नियमांच्या बाबतीत विद्यार्थीनींच्या मनात असंतोष धुमसत होताच. छेडखानी आणि विनयभंगाची घटना उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. संघाचे नीती नियम लागू करण्याचा दावा करणाऱ्या कुलगुरूनी छेडखानीच्या घटनांना मात्र कधीच गंभीरपणे घेतले नाही. विद्यापीठ परिसरात अशा घटना घडू नयेत यासाठी कोणत्याच उपाययोजना त्यांनी कधी केल्या नाहीत. त्यांच्या मते  मुलीनी रस्त्यावर फिरणे हाच गुन्हा असावा. असा गुन्हा करून वरून तक्रार करतात याचाच त्यांना खूप राग आला. मुलीनी जाहीरपणे विनयभंगाच्या तक्रारी करणे म्हणजे बाजारात आपल्या प्रतिष्ठेचा लिलाव करणे आहे असे या कुलगुरू महाशयांनी मुक्ताफळे उधळलीत. संबंधितानी मुलींची विनयभंगाची गंभीर तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तुम्ही रस्त्यावर काय करीत होता असे म्हणत त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. संध्याकाळी ७ च्या आधी ही घटना घडली, ७ वाजून काही मिनिटांनी घटना घडली असती तर विद्यार्थिनीवरच शिस्तभंगाची कारवाई झाली असती. हे सगळे असह्य झाल्यानेच विद्यार्थीनीना नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागले. इतर ठिकाणच्या विद्यापीठात किंवा विद्यापीठाच्या बाहेर सरकार विरोधी आवाज उठला कि लगेच देशद्रोही वगैरे ठरविण्याचा प्रकार होतो तसा इथेही झाला. सरकार पक्षाच्या लोकांना विद्यार्थीनींच्या आंदोलनात नक्षलवाद्यांचा हात दिसला. काहींना यात जे एन यु विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा हात दिसला. तर कुलगुरुनी आपली अकर्मण्यता झाकण्यासाठी याला राजकीय रंग दिला. मोदी वाराणसीत येणार हा मुहूर्त साधून मुद्दाम आंदोलन घडवून आणले असा आरोप केला. या आरोपाच्या समर्थनार्थ कुलगुरू असलेली व्यक्ती जे बोलली त्याने कोणाचीही मान शरमेने खाली जाईल. कुलगुरू वदले ," विनयभंग वगैरेचे हे प्रकरण नाहीच. मुलांनी साधे टोमणे तर मारले !" घटना घडली तेव्हा मुलीनी आरडाओरडा केला. पण थोड्या अंतरावर असलेला चौकीदार जागचा हलला नाही. नंतर त्याने बयान दिले - मी काही पाहिलेच नाही ! घटनास्थळा जवळच्या चौकीदाराने काही पाहिलेच नव्हते तर कुलगुरुना तो प्रकार विनयभंगाचा नव्हता तर शेरेबाजीचा होता हे कसे कळले असा प्रश्न विचारणे निरर्थक आहे.


काशी हिंदू विद्यापीठात जे काही घडले ते मुलींकडे पाहण्याच्या बुरसटलेल्या आणि मागासलेल्या दृष्टीकोणाचा परिणाम आहे. कुलगुरू म्हणतात राजवट संघाची. मी त्यांचे नियम तेवढे लागू केलेत. संघ , भाजप आणि राज्य किंवा केंद्रसरकार यांनी आजवर कुलगुरूंच्या म्हणण्याचा प्रतिवाद केला नसल्याने ते जे बोलतात ते खरेच असले पाहिजे असे मानावे लागते. त्या विद्यापीठात संघशाखांना परवानगी आहे , पण कोणत्याही विद्यार्थी संघटनाना मान्यता नाही. विद्यार्थी संघटनांचे अधिकृत अस्तित्व या विद्यापीठात नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन व सरकार काहीही म्हणत असले तरी विद्यार्थीनींचा उठाव हा स्वयंस्फूर्त होता. मुलगी आहे म्हणून प्रशासनाने चालविलेल्या हडेलहप्पी विरुद्ध हा उठाव होता. लाठीमारानंतर योगी सरकारने वाराणसीच्या विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. आयुक्ताने चौकशी करून जो अहवाल दिला त्यात सगळा दोष आणि ठपका विद्यापीठ प्रशासनाला दिला. विद्यापीठ प्रशासन तर संघाच्या मतानुसार चालणारे ! त्यामुळे योगी सरकारने पुन्हा वेगळा चौकशी आयोग नेमला आहे. या सगळ्या घटनाक्रमातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली ती म्हणजे संघपरिवाराच्या डोळ्यात नवी दिल्लीतील जागतिक प्रतिष्ठाप्राप्त जे एन यु - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ - एवढे का खुपते याचा उलगडा झाला. तिथे झालेल्या घोषणाबाजीचा आधार घेत तेथील विद्यार्थी आणि विद्यार्थी नेते यांचेवर देशद्रोह , दुराचार यासारखे भयंकर आरोप करून , खोटे व्हिडीओ प्रचारित करून , तिथल्या निरागस विद्यार्थिनींवर स्वैराचाराचा आरोप करून ते विद्यापीठ बंद करण्यासाठी संघपरिवाराने देशभर का धुराळा उडविला याचे उत्तर काशी हिंदू विद्यापीठातील घटनेत दडले आहे. संघाचे नीती नियम म्हणून काशी विद्यापीठाचे कुलगुरू जे बोलले त्या सगळ्या नीती नियमांविरुद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे मोदीपूर्व काळातील प्रशासन आणि तिथले विद्यार्थी वागत आले आहेत. आता तिथले प्रशासन संघानुकुल झाले असले तरी संघाचे नीती नियम लादणे शक्य झालेले नाही. याची सल असल्याने कोणत्या ना कोणत्या निमित्ताने संघ परिवार जे एन यु वर दुगाण्या झाडत असतो. संघ परिवाराला जे एन यु चा एवढा राग का हे आजवर स्पष्ट होत नव्हते ते काशी विद्यापीठामुळे झाले. भारतातील सर्व विद्यापीठांपेक्षा जे एन यु मध्ये सर्वात कमी स्त्री-पुरुषात भेदभाव केला जातो. विद्यार्थिनींच्या वसतीगृहात मुलांना पाय ठेवायचीही परवानगी नाही हा नियम वगळला तर तिथे मुलगा आणि मुलगी यांच्या बाबतीत कोणतेही वेगवेगळे नियम किंवा निकष नाहीत. इथे काय खायचे ते त्या त्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थीनीना ठरविता येते. विद्यार्थीनीना मांसाहार नको असा खुळचटपणा इथे चालत नाही. मुली ७ च्या आत वसतीगृहात स्वत:ला बंद करून घेत नाहीत. मुले आणि मुली रात्री उशिरापर्यंत विद्यापीठ परिसरात फिरू शकतात. दोघेही रात्री १२ वाजेपर्यंत लायब्ररीत बसून अभ्यास करू शकतात. मुलींचे रात्री अभ्यास करणे गैर आहे असे तिथे कोणी मानत नाही. इतक्या वर्षात एकतर्फी प्रेमातून २-३ दुर्दैवी घटना घडल्या असतील , पण विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनींची छेडखानी इथे कधी होत नाहीत. विरुद्ध विचाराच्या विद्यार्थीनीना विरुद्ध विचाराच्या विद्यार्थ्यांकडून कधी त्रास होत नाही. अशा मोकळ्या वातावरणाला संघ परिवार स्वैराचार समजत आला आहे.  इथे सगळ्या विद्यार्थी संघटनांना काम करण्याची खुली सूट असण्याची परंपरा आहे. इथे विद्यापीठ प्रशासनाला आणि सरकारलाही प्रश्न विचारण्याची परंपरा आहे. या प्रश्न विचारण्यातून इंदिरा गांधी देखील सुटल्या नाहीत. मोठ्यांचे म्हणणे ऐकून छोट्यांनी तसे वागावे , प्रश्न विचारू नयेत ही संघ परंपरा आणि विचारसरणी आहे. जे एन यु त्यालाच आव्हान देते.  त्यामुळे जे एन यु चा संसर्ग इतर विद्यापीठांना होवून मुली बंधमुक्त होतील ही भीती संघपरिवाराला असल्याने त्यांच्या डोळ्यात हे विद्यापीठ सलते. काशी विद्यापीठात विद्यार्थिनींचे आंदोलन झाले तेव्हा संघ परिवारातील अनेकांनी यासाठी जे एन यु ला दोषी धरले त्याचे हे कारण आहे. संघाचे विचार आणि नीतीनियम लादण्याच्या प्रयत्नाने देशभरचे विद्यापीठ परिसर अस्वस्थ बनत चालले आहेत. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याचा  बळी भाजप नेत्यांच्या राजकीय हस्तक्षेपातून गेल्याचे सर्वश्रुत आहे. रोहित वेमुला हा दलित नव्हताच हे सिद्ध करण्यावर विद्यापीठ प्रशासन आणि सरकारचा जो जोर राहिला आहे त्यातून चोराच्या मनातील चांदणे तेवढे दिसले.

मोदी राजवटीच्या ३ वर्षाच्या काळात राज्यकारभाराचा एक आकृतीबंध समोर आला आहे. मोदींनी फक्त विकासावर बोलायचे. ' बेटी बचाओ बेटी पढाओ ' अशी आकर्षक घोषणा देत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश द्यायलाही संघपरिवाराचा विरोध नाही. काय शिकवायचे आणि कसे शिकवायचे याचा अधिकार मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. त्यावर मोदींनी बोलायचे नाही. तुम्ही नोटबंदी करा , बुलेट ट्रेन आणा , समृद्धी महामार्ग तयार करा , स्वदेशी सोडून परदेशातून काहीही आयात करा संघ सरकारला विरोध करणार नाही. पण मग गायीचे हत्यार वापरून आमच्या झुंडी करीत असलेल्या कारवायांकडे सरकारने कानाडोळा करायचा. एखाद्या गोष्टीची देशात-परदेशात फारच चर्चा होवू लागली आणि सरकारची बदनामी होवू लागली तर मोदींनी बोलावे , अगदी कडक शब्दात बोलावे , पाहिजे असल्यास धमकी देखील द्यायला संघाची हरकत नसते. फक्त हे सगळे बोलण्यापुरते असावे , प्रत्यक्ष कृती करू नये एवढीच संघाची अपेक्षा असते. आजवर तरी मोदी आणि त्यांच्या सरकारने संघाचा अपेक्षाभंग केलेला नाही. त्यामुळे वाराणसीत असूनही बेटी पढाओ म्हणणाऱ्या मोदींनी बेटीकडे लक्ष दिले नाही. फारच चर्चा झाली आणि सरकारला बदनामीला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली तर 'मन की बात'मध्ये किंवा एखाद्या सभेत मुलींना किती अडचणीचा सामना करावा लागतो याचा पाढा वाचत चार अश्रू देखील ढाळतील. रोहित वेमुलाच्या बाबतीत ढाळले होते तसे. पण त्यापुढे काही होणार आणि करणार नाहीत. वाजपेयी प्रधानमंत्री असतांना संघाचे एक वरिष्ठ नेते गोविंदाचार्य यांनी त्यांना संघाचा मुखवटा म्हंटले होते. तेव्हा त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही आणि ते वाळीत टाकल्या गेले. प्रधानमंत्र्याला पुढे करून संघ आपल्याला जे साध्य करायचे ते करून घेतो असा गोविंदाचार्य यांच्या बोलण्याचा रोख होता. वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व त्यावेळी संघापेक्षा मोठे होते त्यामुळे संघाच्या मनाप्रमाणे त्यावेळी गोष्टी घडल्या नाहीत. अनेकदा संघाने वाजपेयी सरकार विषयी उघड नाराजी देखील व्यक्त केली होती. पण आता संघ मोदी आणि त्यांच्या सरकारवर खुश आहे. कारण मोदी सरकारने संघासाठी रान मोकळे सोडले आहे. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' म्हणणाऱ्या प्रधानमंत्र्याच्या मतदार संघातील मोठे नाव असलेल्या विद्यापीठात बेटीला दुय्यम मानणारे नीती नियम लागू करण्यासाठी बळाचा वापर करण्यास मोकळीक मिळणे हा त्याचाच पुरावा आहे. काशी विद्यापीठाचे संघ विचारसरणीने प्रभावित कुलगुरू आणि त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या काशी विद्यापीठाच्या रणरागिणी यामुळे अनेक गोष्टी स्वच्छ आणि स्पष्ट दिसायला मदत होणार असल्याने कुलगुरूंचे आभार आणि मुलींचे कौतुक करायलाच हवे.

-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment