Wednesday, April 10, 2019

डॉ. आंबेडकर : शेतीसमस्येचा शास्त्रीय विचार करणारे पहिले विचारवंत !


बाबासाहेबांची दलितांचे नेते म्हणून जेवढी ओळख निर्माण झाली तशीच ओळख शेतकरी नेते म्हणून निर्माण व्हायला हवी होती इतके त्यांचे या क्षेत्राविषयी चिंतन आणि कार्य आहे. 
 ------------------------------------------------------------------------


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य आणि दलित समाजाचा मुक्तिदाता म्हणून जग ओळखते. भारतातील जातिव्यवस्थे संदर्भातील त्यांचे मूलभूत चिंतन जगाला परिचित आहे. बाबासाहेबांचे असेच मूलभूत चिंतन देशाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांविषयी होते याची माहिती मात्र फार कमी लोकांना आहे. आजच्या सारखेच त्याकाळी सुद्धा भारतासारख्या कृषिप्रधान देशासमोर जाती समस्ये इतकेच कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांचे फार मोठे आव्हान होते. हे आव्हान कसे पेलता येईल याचा मूलभूत आणि शास्त्रीय अंगाने विचार करणारा पहिला विचारवंत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव घ्यावे लागेल. केवळ विचारापुरते बाबासाहेबांचे काम मर्यादित नव्हते. समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कार्य आणि संघर्ष देखील त्यांनी केला. दलितांना संघटित करून जातिव्यवस्थे विरुद्ध जशा त्यांनी चळवळी चालविल्या तेवढ्याच आत्मीयतेने त्यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा विचार केला. त्यांची चळवळ किंवा विचार महार वतन जमिनी पुरता मर्यादित नव्हता. दलितांचा विटाळ मानणाऱ्यादलितांना विहिरीवर येऊ न देणाऱ्या शेतकरी समूहाच्या कल्याणाचा आणि मुक्तीचा बाबासाहेबानी तेवढाच प्रयत्न केला जेवढा दलित मुक्तीचा केला. दलितांचे नेते म्हणून जेवढी त्यांची ओळख निर्माण झाली तशीच ओळख शेतकरी नेते म्हणून निर्माण व्हायला हवी होती इतके त्यांचे या क्षेत्राविषयी चिंतन आणि कार्य आहे. 



शेतजमिनीचे तुकडेकरण हा आजचा शेती क्षेत्रा समोरचा मूलभूत महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. शेती न परवडण्याची अनेक कारणे आहेत. त्या कारणात अग्रक्रमाने सांगता येईल असे कारण म्हणजे दिवसेंदिवस घटत चाललेली जमीन धारणा आहे. बाबासाहेब राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय असतांना मूठभर लोकांच्या हातात प्रचंड जमीन तर मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांच्या हातात अत्यल्प जमीन अशी परिस्थिती होती. एकाच्या हातात प्रचंड जमीन असणे आणि एकाच्या हातात अत्यल्प जमीन असणे या दोहोंच्याही विरोधात बाबासाहेब होते. समाजवादाचा प्रभाव म्हणून ते असा विचार करत नव्हते तर अशा दोन्ही प्रकारच्या जमीन धारणा आणि जमिनीची मालकी उत्पादकतेला प्रतिकूल असल्याचे त्यांचे मत होते. यातून बचत होत नसल्याने शेतीसाठी भांडवल शेतकऱ्याच्या हाती राहत नाही आणि त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचा विकास अवरुद्ध होतो अशी त्यांची धारणा होती. शेतीतील ही मोठी समस्या आहे हे त्यांनी १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात ओळखले होते. 'अल्प भूधारणा आणि त्यावरील उपाययोजनाहा १९१७ मध्ये त्यांनी लिहिलेला प्रबंध याची साक्ष देतो. आता त्यावेळची जमीनदारी राहिली नाही. पण ती समाप्त करतांना बाबासाहेबांच्या विचारांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी शेतजमिनीच्या तुकडेकरणाची समस्या वाढली आहे. आज ७० टक्के शेतकरी अल्प भूधारक बनले आहेत. शेती क्षेत्राला उभारी द्यायची असेल तर जमिनीचे एकत्रीकरण ही काळाची गरज आहे हे बाबासाहेबानी १९१७ मध्ये सांगितले असले तरी त्यांचा हा विचार तेव्हा पेक्षा आज जास्त महत्वाचा आहे. 



शेतीसाठी पाणी महत्वाचे आहे. त्याचा देखील शास्त्रीय विचार सर्वप्रथम बाबासाहेबांनीच मांडला. हा विचार अंमलात आणण्याची संधी इंग्रज राजवटीत त्यांना मिळाली. तत्कालीन व्हाईसरायने त्यांची नियुक्ती लेबर आणि पब्लिक वर्क्स विभागाचे मंत्री म्हणून केली. पब्लिक वर्क्स विभाग आजही अस्तित्वात आहे पण पब्लिकसाठी खरे काम झाले असेल तर ते हा विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करीत होता तेव्हा झाले. पाण्याचे नियोजन आणि सर्वाना त्याचा उपयोग कसा होईल याचा आदर्श बाबासाहेबानी घालून दिला. दुष्काळ आणि पूर या परस्पर विरोधी समस्यांवर मात करून केवळ शेतीला पाणी पुरवठाच नाही तर मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करून औद्योगिकरणाला चालना देणे शक्य आहे हे बाबासाहेबानी आपल्या प्रयत्नातून दाखवून दिले. आता पाण्यासाठी राज्य-राज्यातील भांडणे विकोपाला जाताना आपण पाहतो. पण तेव्हा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नातून राज्यांच्या सक्रिय सहकारातून मोठे प्रकल्प साकारले गेलेत. याला बाबासाहेबांचे परिश्रम आणि विचाराची स्पष्टता आणि ते पटवून देण्याची त्यांची क्षमता कारणीभूत होती. त्यातूनच दामोदर व्हॅली परियोजनाहिराकूड प्रकल्प , सोन रिव्हर परियोजना असे मोठे प्रकल्प साकार होऊन देशाचा चेहरा मोहरा बदलायचा प्रारंभ झाला.


आज शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न तीव्र आणि उग्र बनला आहे याचे कारण आजच्या राज्यकर्त्यांमध्ये विचाराची व त्यानुसार धोरणे तयार करण्याची स्पष्टता आणि क्षमता नाही.  शेतकरी असंतोषाचे मूळ न परवडणाऱ्या शेतीत आहे आणि त्यासाठी शेतीसंरचना बदलण्याची गरज असताना राज्यकर्ते अशा बदलांऐवजी थातुरमातुर उपाय योजून शेतकऱ्यांचा असंतोष दूर करू पाहतात. शेतकरी संख्येने मोठा असला तरी त्याची संघटित अशी राजकीय ताकद नसल्याने राज्यकर्त्यांचे थातुरमातुर उपाय करून काम भागते. भाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्या ऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये भरल्याने मते मिळणार असतील तर मोठ्या बदलासाठी परिश्रम घेण्याची आणि भांडवल खर्च करण्याची गरजच उरत नाही. शेतकऱ्यांचे हित कशात आहे हे त्यांना पटवून देण्याची क्षमता असणारा आणि समस्ये विषयी जाण असणारा व त्यावर मूलभूत विचार करणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा नेता आज नसल्याने शेती आणि पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहे. अशा समस्या सोडवायच्या तर बाबासाहेबांसारखे विचारी आणि जनहितासाठी परिश्रम घेणारे राज्यकर्ते हवेत.
----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment