Thursday, February 13, 2020

शाहीनबागची रेशीमबागवर मात ? -- १


शाहीनबाग आंदोलनाला लक्ष्य करून विजय मिळविण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला आणि नागपूरच्या रेशीमबागेवर दिल्लीच्या शाहीनबागेने मात केल्याचे चित्र निर्माण झाले. अशी मात करण्याच्या हेतूने दिल्लीच्या मतदारांनी मतदान केले असा निष्कर्ष अतिशयोक्तीपूर्ण ठरेल पण असा आभास निर्माण झाला तो भाजपच्या प्रचारात शाहीनबाग मध्यवर्तीस्थानी असल्यामुळे. 
--------------------------------------------------------------------

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पार्टीचा दणदणीत विजय, भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षांना बसलेला दणका आणि कॉंग्रेस पक्षाची उडालेली दाणादाण याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. या तिन्ही पक्षासाठी याचे वेगळे अर्थ निघतात आणि परिणामही वेगळे संभवतात. कॉंग्रेस पक्ष ही निवडणूक ज्या पद्धतीने लढला ते लक्षात घेता त्याची दाणादाण होणारच होती. कॉंग्रेस पक्षाजवळ लढण्याची जिद्द नाही, जिंकण्याची उर्मी नाही. देशावर ६० वर्षे राज्य केलेल्या पक्षाजवळ निवडणूक लढण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री नसणे हेच त्याच्या दारिद्र्याचे लक्षण नाही तर पक्षाजवळ निवडणूक लढण्यासाठीची रणनीती नसणे  ही दिवाळखोरी आहे. या पक्षाच्या नेत्या आणि कार्यकर्त्यात असलेला संभ्रम लक्षात घेवून पक्षाच्या मतदारांनीच आपली रणनीती निश्चित करून मतदान केले. भाजपला बसलेल्या दणक्यात आणि कॉंग्रेस पक्ष्याच्या दारूणस्थितीला दिल्लीतील काँग्रेसी मतदारांची रणनीती बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. पक्ष म्हणून कॉंग्रेसचा निवडणुकीवर पडलेला प्रभाव शून्य आहे पण काँग्रेसी मतदारांची भूमिका मात्र प्रभावी राहिली एवढेच कॉंग्रेस बद्दल बोलण्यासारखे आहे.                                                              

कॉंग्रेस वगळली तर निवडणुकीत उतरलेल्या आप आणि भाजप या दोन्ही पक्षाकडे लढण्याची आणि जिंकण्याची जिद्द होती आणि आखीवरेखीव रणनीती देखील होती. भाजपकडे तर साधनसामुग्री , नेते आणि कार्यकर्ते यांची कमी नव्हतीच. कॉंग्रेस पक्षाला ६० वर्षात पक्षाची तिजोरी भरता आली नाही पण अमित शाह यांनी अवघ्या ६ वर्षात कितीही खर्च करा रिकामी होणार नाही अशी भाजपची तिजोरी भरून ठेवली आहे. या तिजोरीच्या बळावर देशभरातून कार्यकर्ते व नेते यांना दिल्लीत बोलावून भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यात गुंतविले होते. मुख्यमंत्री असलेले किंवा राहिलेले पक्षाचे नेते दिल्लीत कॉर्नर सभा घेत होते. अमित शाह सह पक्षाचे दिग्गज नेते दारोदार फिरून मत मागत होते. प्रचार कसा करावा आणि प्रचाराची यंत्रणा कशी उभी करावी हे भाजपकडून सर्व पक्षांनी शिकण्या सारखे आहे. पण दिल्लीने हे देखील दाखवून दिले की या सगळ्या गोष्टी आजच्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असतीलही पण तेवढ्यावर निवडणूक जिंकता येत नाही. भारतीय जनता पक्षाने देखील या निवडणुकीतून हा धडा घेतला पाहिजे. याही पेक्षा दिल्लीच्या निकालाने भाजपवर दुसऱ्याच बाबीचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आणली आहे. मुस्लीम विरोध, हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी योजिलेले हातखंडे, प्रचाराला पाकिस्तानची फोडणी, सोबतीला मतदारांना पाजण्यासाठी राष्ट्रवादाची भांग या निवडणुकीत हमखास यश मिळवून देणाऱ्या बाबींचा दिल्ली निवडणुकीत करता येईल तितका वापर करूनही त्याचा परिणाम झाला नाही हा भाजपला मोठा झटका आहे आणि यावर गंभीर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भाजप जवळ असलेल्या यशाच्या गुरुकिल्लीवर पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा देखील पूर्ण विश्वास बसला होता. पण दिल्ली निकालाने या विश्वासाला तडा बसल्याने कार्यकर्ते सैरभैर होवून प्रतिक्रिया देवू लागलेत याचा विपरीत परिणाम पक्षाला पुढच्या निवडणुकांमध्ये भोगावा लागू शकतो. तुम्ही जवळपासच्या संघ-भाजपच्या कार्यकर्त्याला दिल्लीतील पराभवाबद्दल विचाराल तर दिल्लीतील मतदार फुकटे आहेत आणि भाजपला निवडले नाही म्हणून देशद्रोही आहेत हीच प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळेल. सोशल मेडियावर अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. केजरीवाल यांनी फुकट सवलतींचा मारा केला आणि मतदार त्याला भाळले असे उथळ आरोप करणाऱ्या या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सवलतीची खैरात केली होतीच. आजवर मोदी-शाह यांना जाहीरपणे विरोध करणारे पक्ष आणि प्रभावी व्यक्तींना ही मंडळी देशद्रोही ठरवत आली होती. आणि आता तर त्यांना मतदान न करणारा सर्वसाधारण मतदार त्यांच्यालेखी देशद्रोही ठरला आहे. दिल्लीच्या मतदारांना फुकटे म्हणून भाजप कार्यकर्ते सर्रास हिणवून मतदारांचा अवमान करीत सुटले आहेत. विरोधकांना देशद्रोही ठरविण्याची खेळी दिल्लीत अंगलट आली याचे देखील पक्ष कार्यकर्त्यांना भान नाही. मुसलमानांना देशद्रोही ठरविण्याची खेळी हिंदू मानसिकतेला काही प्रमाणात सुखावणारी असल्याने त्याबद्दलचा संताप फारसा व्यक्त झाला नाही. पण या निवडणुकीत भाजपने चक्क केजरीवाल यांनाच आतंकवादी आणि शाहीनबाग आंदोलनाला रसद पुरविणारा देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न केला. जावडेकर सारख्या केंद्रीय मंत्र्याने आणि योगी सारख्या मुख्यमंत्र्याने केलेला असा प्रचार लोकसंतापाला आणि लोकांचे डोळे उघडायला कारणीभूत ठरला. तसेही केजरीवाल शाहीनबाग आंदोलनाकडे फिरकलेही नव्हते.                                                         

शाहीनबाग आंदोलन दिल्लीतील जनतेच्या डोळ्यासमोर अनेक दिवसांपासून सुरु आहे. आंदोलन स्थळी देशभक्तीपूर्ण वातावरण आहे, शांततेने आणि समंजसपणे आंदोलन चालविले जात आहे , यात मुस्लीम महिलांचा पुढाकार असला तरी आंदोलनाचे स्वरूप सर्वधर्मीय आहे, पंजाब आणि दिल्लीतील शीख समुदायाचे या आंदोलनाला एकमुखी समर्थन आहे या सगळ्या गोष्टींची माहिती दिल्लीकरांना आहे. जगभरात ज्या आंदोलनाची वाहवा होत आहे तेच आंदोलन भाजपच्या प्रचाराचे लक्ष्य ठरल्याने दिल्लीकरांच्या पचनी पडले नाही. शाहीनबाग आंदोलनाला लक्ष्य करून विजय मिळविण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला आणि नागपूरच्या रेशीमबागेवर दिल्लीच्या शाहीनबागेने मात केल्याचे चित्र निर्माण झाले. अशी मात करण्याच्या हेतूने दिल्लीच्या मतदारांनी मतदान केले असा निष्कर्ष अतिशयोक्तीपूर्ण ठरेल पण असा आभास निर्माण झाला तो भाजपच्या प्रचारात शाहीनबाग मध्यवर्तीस्थानी असल्यामुळे.  
------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल – ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment