Thursday, March 12, 2020

ज्योतिरादित्य सिंधीयांच्या दरबार बदलाचा अर्थ


कॉंग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय होतो असे सिंधिया यांना खरोखरच वाटत होते तर त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाविरुद्ध बंड करण्याची धमक दाखवायला हवी होती. नेतृत्वाविरुद्धचे त्यांचे बंड देखील कॉंग्रेसमध्ये नवा प्राण फुंकून चैतन्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरले असते. पण ती धमक आणि समज त्यांच्यात नव्हती हेच त्यांच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे.
---------------------------------------------------------------

कॉंग्रेसच्या भावी नेतृत्वाच्या फळीतील ज्योतिरादित्य सिंधिया हे अग्रगण्य नाव असण्याला कॉंग्रेस पेक्षा बाहेरच्यांचीच अधिक मान्यता होती. अशा लोकांना सिंधिया कॉंग्रेस सोडून भाजपात सामील झाले यास कॉंग्रेस नेतृत्व जबाबदार आहे असे वाटते. तर काहींनी कॉंग्रेसमध्ये जुन्या खोडांचे वर्चस्व असल्याने सिंधीयाना बाहेरचा रस्ता पकडावा लागल्याचे मत व्यक्त केले. या दोन्ही गोष्टींचा हात सिंधीयाच्या बाहेर पडण्यामागे निश्चितच आहे. पण तेवढेच या घटने मागचे कारण नाही. ज्योतिरादित्य स्वत: देखील दोषी आहेत हे सोयीस्करपणे विसरले जात आहे. कॉंग्रेस नेतृत्वाला जबाबदार धरण्याऐवजी कॉंग्रेसला नेतृत्व नसणे या घटनेस जबाबदार आहे हे मानले असते तर ते सत्याच्या अधिक जवळचे ठरले असते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी दिलेल्या राजीनाम्याने  कॉंग्रेसला गांधी घराण्याच्या कुबड्या बाजूला ठेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली होती. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी ही ऐतिहासिक संधी गमावली. कॉंग्रेसचा एकही नेता कॉंग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यासाठी पुढे आला नाही.


दरबारी राजकारणाने कॉंग्रेसमध्ये स्वयं:प्रकाशित  नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे राहूल गांधीनी नव्या नेतृत्वासाठी वाट करून दिली असली तरी त्या वाटेवरून चालायला कोणी समोर न येणे हे कॉंग्रेसचे सर्वात मोठे अपयश आहे. कॉंग्रेसचे जुने नेतृत्व लाचार आणि परप्रकाशित आहे याबद्दल दुमत असूच शकत नाही पण नवे नेतृत्व त्यापेक्षा वेगळे आहे असे कोणाला वाटत असेल तर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजपा प्रवेशाने तथाकथित नव्या नेतृत्वातील दमखम काय आहे हे दाखवून दिले आहे. दरबारी राजकारणात जुन्या नेत्यांचा मुरून मुरब्बा झाला असेल पण नव्या नेत्यानाही दरबारी राजकारणाबाहेर पडून स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्याचा आत्मविश्वास आणि इच्छा नाही हेच सिंधिया यांच्या भाजपा प्रवेशाने सिद्ध झाले आहे. सिंधिया आणि कमलनाथ किंवा दिग्विजयसिंह यांच्यातील संघर्ष तरुण तुर्क विरुद्ध म्हातारे अर्क असा नव्हताच. संघर्ष होता तो दरबारी राजकारणात आपले प्रस्थ वाढविण्यासाठी. सोनिया दरबारी हार झाली म्हणून सिंधिया मोदी दरबारात दाखल झालेत एवढाच खरा तर या घटनेचा अर्थ आहे.


सिंधीयाना कॉंग्रेसमध्ये आपले ऐकले जात नाही, आपली गळचेपी होते असे वाटू शकते. याचे कारण राजकारणात स्वकर्तृत्वाने मिळवायचे असते , आयते ताट वाढून मिळत नाही याचे भान त्यांना नव्हते. अशा बाबतीत राहुल गांधी सारखा एखादाच अपवाद असू शकतो हे त्यांनी लक्षात घेतले नाही. गलितगात्र कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. कॉंग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय होतो असे त्यांना खरोखरच वाटत होते तर त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाविरुद्ध बंड करण्याची धमक दाखवायला हवी होती. नेतृत्वाविरुद्धचे त्यांचे बंड देखील कॉंग्रेसमध्ये नवा प्राण फुंकून चैतन्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरले असते. पण ती धमक आणि समज त्यांच्यात नव्हती हेच त्यांच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे.
                                
                          
कॉंग्रेससोडून भाजपच्या वळचणीला जाताना जे मिळाल्याची चर्चा आहे त्यापेक्षा त्यांना अधिक मिळविता आले असते. कॉंग्रेसमध्ये राहून त्यांना मध्यप्रदेश सरकारचे नेतृत्व करायचे होते. मग भाजपात जातांना ते त्यासाठी का अडून बसले नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर अर्थातच त्यांच्यात ती धमक नाही हेच येते. भाजपात जावून त्यांनी जे मिळविले त्याच्या कितीतरी अधिकपटीने त्यांच्या या खेळीने कमलनाथ सरकार पडले तर भाजपचा फायदा होणार आहे.  म्हणजे आपले पत्ते चालविण्याची हुशारी आणि मुत्सद्दीपणा देखील त्यांचेकडे नाही. अशा नेत्याच्या कॉंग्रेस सोडण्याने कॉंग्रेसवर मोठा आघात होईल असे मानणे तर्कसंगत होणार नाही. मुळात आघात त्याच्यावर होवू शकतो जो जीवंत आहे. जीवंतपणाची कोणतीही लक्षणे कॉंग्रेसमध्ये दिसत नाहीत. सिंधीयाच्या खेळीने ते स्वत: जसे उघडे पडले तसे कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे नेतृत्व मुर्दाड आहे हे देखील पुन्हा एकदा उघड झाले आहे.
  

लोकसभा निवडणुकीनंतर सिंधिया कॉंग्रेसपासून हळूहळू दूर जात असल्याचे दिसत होते. काही मुद्द्यावर ते कॉंग्रेसच्या धोरणाविरुद्ध जाहीरपणे बोललेही होते. कमलनाथ सरकार बद्दलची नाराजी त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. कॉंग्रेस आज ज्या स्थितीत आहे त्यात एकेक कार्यकर्ता महत्वाचा असतांना सिंधीयाच्या नाराजीकडे कॉंग्रेस नेतृत्वाने लक्ष दिले नाही. सत्ता हाती असतांना अवलंबलेली थंड करून निर्णय घेण्याची सवय सत्ता आणि प्रभाव गेला तरी सुटली नाही. नेतृत्वाचा सामंती थाट कायम राहिला.  कॉंग्रेसला गांधी घराणे सोडता येणार नाही पण त्याच सोबत निर्णय घेणाऱ्या धडाडीच्या नेतृत्वाची गरज आहे हे या घटनेने दाखवून दिले. देशात कॉंग्रेसला मानणाऱ्या मतदारांची कमी नाही. पण या मतदारांना आकर्षित करणारे, संघटीत करणारे आणि रस्त्यावरील लढाईसाठी प्रेरित करणारे नेतृत्व कॉंग्रेसकडे नाही. कॉंग्रेसचे नेते आणि कथित कार्यकर्ते कुचकामी आहेत हेच सिंधीयाच्या बाहेर पडण्याने पुन्हा अधोरेखित झाले. म्हातारे विरुद्ध तरुण अशा संघर्षातून कॉंग्रेसमध्ये चेतना निर्माण होणार नाही. गरज आहे ती दरबारी राजकारणाविरुद्ध दंड थोपटून समोर येण्याची. कॉंग्रेसला सिंधीयाची नाही तर असे दंड थोपटून मैदानात उतरणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.
------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल – ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment