Thursday, April 13, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर : ५१

 पाकिस्तानच्या लष्कराने  व आय एस आय या गुप्तहेर संघटनेने दहशतवाद्यांना हाताशी धरून  काश्मिरातील हिंदुना व शिखांना बाहेर काढण्याची योजनाच बनविली होती. योजनेचा पहिला भाग पंडीत समुदायामध्ये भीती निर्माण करण्याचा होता. त्यासाठी प्रशासनातील पंडीताना लक्ष्य करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. यातून एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते. प्रशासन कोलमडणार होते आणि पंडितांमध्ये भीती निर्माण होणार होती. आणि झालेही तसेच.
---------------------------------------------------------------------------------------


काश्मीर घाटीतून बाहेर पडू पाहणाऱ्या पंडीत समुदायाला संरक्षण देवून तिथेच थांबविणे जगमोहन प्रशासनास जमले नाही किंवा तसा प्रयत्नच करण्यात आला नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे आहे की ज्यांच्या सोबत इतकी वर्षे पंडीत समुदाय धर्माच्या भिंती आड येवू न देता गुण्यागोविंदाने राहिला त्या मुस्लीम समुदायाने देखील एक समुदाय म्हणून पंडीत समुदायाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. व्यक्तिगत स्नेहसंबंधाच्या आधारावर अनेक ठिकाणी अनेकांनी पंडीत कुटुंबानी जावू नये, घर व गांव सोडू नये यासाठी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे सापडतील. त्यामुळे त्या भयंकर वातावरणात अनेक पंडीत कुटुंब बाहेर पडण्या ऐवजी तिथेच थांबले. पण एक समुदाय म्हणून मुस्लीम समुदायाने पंडीत समुदायाला घाटी सोडण्यापासून रोखले नाही ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे दहशतवादी घाटी सोडून जाण्यासाठी पंडितांना धमकावत होते आणि दुसरीकडे संरक्षणासाठी पोलीस किंवा सुरक्षा दलाचे अस्तित्व जाणवत नव्हते आणि तिसरीकडे मुस्लीम समुदायात पंडीत समुदायाबद्दल कोरडे आणि असहिष्णुतेचे भाव जाणवू लागल्याने मोठ्या संख्येने पंडीत समुदाय घरदार सोडून काश्मीर घाटीतून बाहेर पडला. वर्षानुवर्षे शेजारधर्म पाळणाऱ्या काश्मिरातील मुस्लीम समुदाय त्यावेळी शेजारधर्माला का जागला नाही त्याचे उत्तर झपाट्याने बदललेल्या काश्मीर घाटीतील परिस्थितीत दडले आहे.                                               

रुबिया सईद अपहरण प्रकरणात केंद्र सरकार झुकल्या नंतर श्रीनगर शहर जवळपास जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्यासारखी परिस्थिती होती. हिवाळा असल्याने राजधानी जम्मूत होती. राज्यसरकारचे सारे प्रशासन जम्मूत होते. परिस्थिती बिघडू लागली तसे केंद्र सरकारचे बहुतांश कर्मचारीही घाटी सोडून निघून गेले होते. स्थानिक पोलिसांना निष्क्रिय करण्यात लिबरेशन फ्रंटला यश आले होते. फक्त आता काही दिवसाचा प्रश्न उरला आहे. काश्मीर भारतापासून 'आझाद' होणार असे वातावरण तयार करण्यात जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटला यश आले होते. श्रीनगरच्या रस्त्यावर पोलीस किंवा केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या दिसत नव्हत्या. दिसत होते टोळीने फिरणारे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे शस्त्रधारी  दहशतवादी. सर्वसामान्यांनाही आझादी डोळ्यासमोर दिसू लागली होती. तमाम भारतीयांसाठी काश्मिरी मुसलमानांची आझादीची भावना देशद्रोह वाटत असली तरी त्यांना तो आपला अधिकार वाटत होता. हा अधिकार भारत सरकारने हिरावल्याची भावना तिथल्या मुस्लीम समुदायात घर करून होतीच. इतके दिवस दबून असलेली भावना या वातावरणात उफाळून आली. पंडीत किंवा इतर हिंदू समुदाय  आणि शीख समुदायाला मुस्लीमामध्ये उफाळून आलेल्या आझादीच्या भावनेला प्रतिसाद किंवा साथ देणे शक्य नव्हते. कारण वातावरण नुसते आझादीने भारले नव्हते. आझादी सोबत इस्लामी राज्य निर्माण करण्याची मनीषा दहशतवादी संघटनांनी जाहीर केलेली होती. जे आपल्या आझादीला साथ देत नाहीत असे लोक बाहेर जाणार असतील तर जावू द्या ही सर्वसाधारण मुस्लीम समुदायाची त्यावेळची भावना होती. पाकिस्तानच्या लष्कराने  व आय एस आय या गुप्तहेर संघटनेने दहशतवाद्यांना हाताशी धरून  काश्मिरातील हिंदुना व शिखांना बाहेर काढण्याची योजनाच बनविली होती. योजनेचा पहिला भाग पंडीत समुदायामध्ये भीती निर्माण करण्याचा होता. त्यासाठी प्रशासनातील पंडीताना लक्ष्य करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. यातून एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते. प्रशासन कोलमडणार होते आणि पंडितांमध्ये भीती निर्माण होणार होती. आणि झालेही तसेच. 


परिस्थिती किती झपाट्याने बदलली हे त्यावेळी श्रीनगर मध्ये असलेल्या काश्मीरचे आय बी  प्रमुख ए.एस.दुलत यांनी लिहून ठेवले आहे. रुबिया सईद अपहरण प्रकरणानंतर दहशतवाद्यांचे हौसले बुलंद झाले होते तरी आपण एकट्याने ख्रिस्तमस पर्यंत श्रीनगर शहरात फिरत असू. नंतर मात्र दहशतवाद्यांनी आय बी च्या लोकांना लक्ष्य करणे सुरु केले.  काश्मिरातील ब्युरो मध्ये प्रामुख्याने पंडितांचा भरणा होता. पण  ३ जानेवारी १९९० ला दहशतवाद्यांकडून मारला गेलेला पहिला आय बी अधिकारी बिहारचा होता. अनंतनाग येथे आर एन पी सिंग या अधिकाऱ्याला दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्या. नंतर १५ जानेवारीला एम.एल. भान या पंडीत अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली.नंतर टी.के.राजदान यांची हत्या झाली. त्यामुळे आय बी च्या अधिकाऱ्यात घबराट निर्माण झाली. अधिकारी दुलात यांचेकडे काश्मीरघाटी बाहेर जाण्याची परवानगी मागू लागले ती त्यांनी नाकारली. तो पर्यंत काश्मिरी मुसलमानांना आझादी टप्प्यात आल्याचे जाणवू लागले होते. काश्मिरात मोठा उठाव झाला तर पाकिस्तानचे सैन्य मदतीला येवून काश्मीर मुक्त करेल असे आय एस आय कडून दहशतवाद्यांना सांगण्यात आले होते. आय एस आयने अफगाणिस्तानात अमेरिकेच्या मदतीने रशिया विरोधात दहशतवादी नेटवर्क उभे करून रशियाला बाहेर पडायला भाग पाडण्यात मोठी भूमिका निभावली होती. अफगाणिस्तानच्या अनुभवाने आत्मविश्वास दुणावलेल्या आय एस आय ने काश्मीर मुक्ती मिशन हाती घेतले होते. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांनीच या मिशनची आखणी केली होती. भारताने बांगलादेशची निर्मिती केली याचा बदला त्यांना घ्यायचा होता. झिया उल हक यांच्या अपघाती निधनानंतर पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी आय एस आयच्या मदतीने झिया उल हक यांची योजना पुढे नेली.                                                                                                                                 

पाकिस्तानच्या कारस्थाना बाबत भारताचे लष्कर प्रमुख राहिलेले काश्मिरी पंडीत असलेले जनरल विज यांच्या लिखाणातूनही याला दुजोराच मिळतो. ऑपरेशन टोपॅक या नावाने पाकिस्तानने राबविलेली ही त्रिस्तरीय योजना होती असे जनरल विज यांनी म्हंटले आहे. एक, काश्मिरात अधूनमधून दहशतवादी कारवाया घडवून दहशतवाद जिवंत ठेवायचा. दहशतवाद वाढवत नेवून पोलीसासह सर्व प्रशासनिक,शैक्षणिक व आर्थिक संस्था ठप्प करून अराजकाची स्थिती निर्माण करायची हे दुसरे सूत्र होते...या अराजकाचा  फायदा घेत युवकांना पुढे करून भारतापासून वेगळे होण्याची मागणी रेटायची हे तिसरे सूत्र होते. या आधीही कमी अधिक प्रमाणात पाकिस्तानने असेच प्रयत्न केले होते पण अपयशी ठरले होते. यावेळी अपयशाचे कारण लक्षात घेवून पाकिस्तानने नियोजन केले होते. काश्मिरातील सुफी इस्लामला कट्टर किंवा मूलगामी इस्लाममध्ये परिवर्तीत केल्याशिवाय यश मिळणे कठीण आहे हे ओळखून पाकिस्तानने त्यावर जोर दिला. धर्मनिरपेक्ष भारताने केलेला वचनभंग, निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याच मर्जीचे सरकार लादण्यातील सातत्य आणि लोकांच्या इच्छेतून तयार झालेल्या सरकारची बरखास्तगी, कुशासन आणि भ्रष्टाचार याला कंटाळलेल्या जनतेसमोर दहशतवाद्यांनी मांडलेली इस्लामिक राज्याची कल्पना लोकांना आक्षेपार्ह वाटली नाही आणि इथेच पाकिस्तानला अर्धे यश मिळाले ! लहानसे कट्टर इस्लामिक राज्य निर्माण करून तेथून हिंदुना पळवून लावणे हे ऑपरेशन टोपॅकचे उद्दिष्ट होते. पाकिस्तानला काश्मीरचे इस्लामिक स्टेट निर्माण करण्यात यश मिळाले नसले तरी हिंदुना काश्मीर घाटीबाहेर काढण्यात ते यशस्वी झाले हे भारताचे अपयश होते याची कबुली जनरल विज यांनी दिली.
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८ .


No comments:

Post a Comment