Thursday, May 2, 2024

मोदींसाठी निवडणूका म्हणजे शत्रू विरुद्ध युद्ध !

मोदीजी निवडणूक युद्ध समजून, विरोधकाना शत्रू समजून लढतात आणि मग शत्रूचा नि:पात करण्यासाठी असत्य आणि अनैतिक मार्ग याचा अवलंब करतात. २०१४ सालच्या निवडणूक प्रचारात या मार्गाचा तसा मर्यादित वापर केला होता. पण निवडून आल्यानंतर सत्ता टिकविण्यासाठी त्यांनी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. सध्याच्या निवडणुकीत तर या मार्गाचा खुलेआम अमर्याद वापर नरेंद्र मोदी करीत असल्याचे दिसून येते.
------------------------------------------------------------------------------------------

वाढत्या उन्हा सोबत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने देशातील वातावरण तापले आहे. वातावरण असह्य डिग्रीपर्यन्त तापविण्यास प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार कारणीभूत ठरत आहे. २०१४ साली फक्त ५ वर्षासाठी सत्ता द्या म्हणणारे नरेंद्र मोदी १० वर्षानंतरही सत्ता हातून जाणार नाही यासाठी निकराचा प्रयत्न करीत आहेत. केवळ प्रयत्न नाही तर सत्ता हाती राखण्यासाठी साम , दाम, दंड, भेद अशी सर्व प्रकारची हत्यारे वापरत आहेत. आणि अतिशय निर्ममपणे वापरत आहेत. त्यांच्यासाठी निवडणुका युद्ध बनले आहे आणि निवडणुका युद्ध समजून लढत असल्याने निवडणुकातील प्रतिस्पर्धी त्यांच्यासाठी शत्रूस्थानी आहे. युद्ध करून सत्ता मिळविणे ही पद्धत जुनीच आहे पण जग जसे प्रगत बनले, जगाच्या काही भागात लोकशाही अवतरल्या नंतर युद्ध करून सत्ता मिळवायला रानटी समजले जावू लागले. तसे असले तरी 'प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते' या वाक्प्रचाराचा प्रभाव ओसरला असे म्हणता येत नाही. त्यामुळे लोकशाही सारख्या आधुनिक व्यवस्थेत लोकशाही मार्गाने सत्ता मिळविण्याचे सुसंस्कृत, शिष्टसंमत. घटना व कायदासंमत मार्ग उपलब्ध असताना कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायला प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते या वाक्प्रचाराने अनैतिकतेला क्षम्य बनविले. तसा हा वाक्प्रचार फार जूना नाही. कवी व लेखक असलेल्या इंग्लंड मधील जॉन लिली याने १५७८ मध्ये लिहिलेल्या एका कादंबरीत पहिल्यांदा हा वाक्प्रचार वापरला. नंतर यावर आधारित शेक्सपियरचे एक नाटक पण आले.प्रेमात आणि युद्धात इतरांशी प्रामाणिकपणे व न्यायाने वागणे आवश्यक नसल्याची धारणा यातून रूढ झाली. पण इंग्रजीत फेअर अँड स्क्वेअर म्हणजेच  फेअर प्ले  असाही वाक्प्रचार रूढ आहे आणि लोकशाही प्रणाली संदर्भात त्याचे मूलभूत महत्वही आहे. यात प्रत्येक खेळाडूने लिखित नियमानुसार वागावे आणि अलिखित नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. प्रतिस्पर्ध्यासह सर्वांचा आदर यात आवश्यक मानला आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीला युद्ध मानल्यामुळे व युद्धात शत्रूचा नि :पात गरजेचाच असतो हे गृहित धरून प्रचार सुरू केल्याने त्यांना पदाचा मान राखण्याची किंवा मर्यादा सांभाळण्याची गरज वाटत नाही. युद्ध म्हंटले की कमांड आणि कमांडर अपरिहार्यच . युद्धात कमांडरचे स्थान आणि महत्व वेगळे असते. निवडणूक लढताना मात्र सर्व समान असतात. निवडणूक आणि युद्ध या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. नरेंद्र मोदी लोकशाहीवादी नाहीत या आरोपाला बळ मिळन्याचे कारण हे आहे. ते निवडणूक युद्ध समजून, विरोधकाना शत्रू समजून लढतात आणि मग शत्रूचा नि:पात करण्यासाठी असत्य आणि अनैतिक मार्ग याचा अवलंब करतात. २०१४ सालच्या निवडणूक प्रचारात या मार्गाचा तसा मर्यादित वापर केला होता. पण निवडून आल्यानंतर सत्ता टिकविण्यासाठी त्यांनी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. सध्याच्या निवडणुकीत तर या मार्गाचा खुलेआम अमर्याद वापर नरेंद्र मोदी करीत असल्याचे दिसून येते. 

एखाद्या पक्षाने एखाद्या विषयावर घेतलेल्या भूमिकेचा विरोध करणे, त्या भूमिकेवर टीका करणे, त्या भुमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडणे यात गैर किंवा चुकीचे काही नाही आणि असे करणे लोकशाही विरोधी नक्कीच नाही.  निवडणुक प्रचारात असे होणे अपेक्षित असतेच. पण नरेंद्र मोदी ज्या प्रकारे प्रचार करीत आहेत तो या चौकटीत बसणारा नाही. उदाहरण द्यायचे झाले तर कोंग्रेसच्या निवडणूक जाहिरनाम्याबद्दल नरेंद्र मोदी जे बोलले त्याचे देता येईल. राजस्थान मध्ये एका प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसचा जाहीरनामा चिंताजनक असल्याचा उल्लेख केला. आणि चिंताजनक का तर ते तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा शोध घेतील, स्त्रियांकडे असलेल्या सोन्यानाण्यांचा शोध घेतील आणि ते काढून घेवून दुसऱ्याला वाटून टाकतील. आणि दुसऱ्याला कोणाला तर 'ज्याना जास्त मुले आहेत त्यांना आणि घुसखोराना वाटून टाकतील. त्यांचा स्पष्ट इशारा मुसलमानाना वाटतील असा होता. याला हिंदू-मुस्लिम असे वळण देवून ते थांबले नाही तर कॉँग्रेसवाले स्त्रियांच्या मंगळसूत्रालाच हात घालतील असा आरोप करत मोदींनी भारतीय स्त्रियांच्या मंगळसूत्रा बद्दलच्या भावनानाच हात घातला. कोंग्रेसचा जाहीरनामा चिंताजनक असल्याचे सांगत मोदी जे बोलले त्यापैकी आवाक्षरही कोंग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही ! खरे तर पक्षांचा जाहीरनामा हा एक उपचार असतो असे मानून सामान्य नागरिक जाहीरनामा वाचत नाहीत. जाहिरनाम्या विषयी वर्तमानपत्रात जे छापून येते तेवढे नजरेखालून घालणे त्यांच्यासाठी पुरेसे असते. पण मोदींच्या विधानानी कोंग्रेसच्या जाहिरनाम्याची जास्तच चर्चा झाली व अनेकांनी तो वाचून काढला. कोंग्रेसच्या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना करण्याचा उल्लेख आहे आणि अशी गणना करताना त्यांच्या सांपत्तिक स्थितीची माहिती घ्यावी या अर्थाचा उल्लेख आहे. पण संपत्तीच्या फेरवाटपाचा काहीही उल्लेख नाही ! मुळात संपत्तीवर कर लावून त्या आधारे गरिबांसाठी योजना राबविण्याचा प्रयोग कोंग्रेस सरकारने फार आधी करून पहिला आणि त्यातून काही निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यावर सोडूनही दिला. कॉँग्रेसकाळात - विशेषत: नेहरू ते इंदिरा गांधी पर्यंतच्या राजवटीत शेतजमिनीच्या फेरवाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला होता. त्या कार्यक्रमावर मोदींनी टीका केली असती तर ती सत्याला धरून झाली असती. पण सिलिंगच्या जमीन वाटपावर तोंड उघडण्याची मोदींची हिम्मत नाही. म्हणून असा असत्य प्रचार मोदी करीत आहे. कोंग्रेसच्या जाहिरनाम्याचा उल्लेख करून एवढे धडधडीत खोटे बोलणे अंगलट येणारेच आहे. कारण प्रेम आणि युद्ध यात काहीही केले तरी ते क्षम्य असते असे मानणाऱ्या पैकी मोदी एक आहेत ! धादांत असत्य प्रचार करण्याची ही काही मोदींची पहिली वेळ नाही. निवडणुक प्रचारात  आपल्या सरकारने काय केले आणि पुन्हा निवडून आलो तर काय करणार हे सांगण्या ऐवजी मोदींचा जोर व प्रयत्न निवडणूक ही पाकिस्तान व मुसलमान या भोवती फिरत राहावी यावरच असतो. निवडणूक कठीण वाटली तर हे दोन विषय मोदीकडून हमखास काढले जातात. 


२०१४ मध्ये मोठा विजय मिळवून पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या मोदीना २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत कोंग्रेसकडून दमदार आव्हान मिळाले होते. पहिल्या फेरीच्या मतदानानंतर हे आव्हान लक्षात आल्यावर दुसऱ्या फेरीच्या मतदानाआधी मोदींनी एक सनसनाटी आरोप केला. मणीशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी कॉँग्रेसने पाकिस्तानच्या प्रतिनिधिमंडळा सोबत गुप्त बैठक घेवून त्यात गुजरात निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यावर खल झाला. या बैठकीस पूर्व प्रधानमंत्री मनमोहनसिंग व उपराष्ट्रपती हमीद अंसारी उपस्थित होते असे मोदींनी जाहीरसभेत सांगितले. भारत दौऱ्यावर (अर्थात भारत सरकारच्या परवानगीने) आलेल्या पाकिस्तानी मुत्सद्दयासाठी अय्यर यांनी मेजवानीचे आयोजन केले होते आणि त्यांनी यासाठी भारत-पाक संबंधात रस असणाऱ्या व पाकिस्तानात राजदूत म्हणून काम केलेल्या मुत्सद्दयाना, पत्रकाराना निमंत्रित केले होते. मनमोहनसिंग, हमीद अंसारी यांचे सोबत पूर्व सेनाप्रमुख दीपक कपूरही तिथे उपस्थित होते. मोदीच्या आरोपानंतर पूर्व सेनाप्रमुख कपूर यांनी पहिला खुलासा केला. या बैठकीत फक्त भारत-पाक संबंधावर चर्चा झाली व बैठकीत गुजरात निवडणुकीचा विषयही निघाला नसल्याचे स्पष्ट केले. मोदींच्या हिणकस आरोपाने दु:खी झालेल्या मनमोहनसिंग यांनी बैठक कॉँग्रेस नेत्यांची नव्हती हे स्पष्ट करत उपस्थितांची यादीच आपल्या निवेदनाला जोडून मोदींनी केलेल्या आरोपा बद्दल माफी मागावी अशी मागणी केली. गुजरात विधानसभेच्या त्या निवडणुकीत भाजपा पराभवापासून थोडक्यात वाचली. त्यानंतर झालेली  बिहार विधानसभा निवडणुक जड जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी हिंदू-मुस्लिम हत्यार उपसले होते. स्मशानभूमीचा मुद्दा त्यावेळी उकरून काढला होता. २०१९ च्या निवडणुकीत पुलवामा घडवून पाकिस्ताननेच मोदीसाठी निवडणूक सोपी केल्याने हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाची गरज पडली नव्हती. पण यावेळेस तशी गरज असावी म्हणून मोदींनी संपत्तीच्या फेरवाटपाचा मुद्दा मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. निवडणुकीतील फेअर प्ले मोदीना मान्य नसल्याने त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना तुरुंगात टाकले. कॉँग्रेसचा निवडणूक निधी गोठवला. अनेक पक्ष फोडून विरोधक कमजोर होतील असा प्रयत्न केला. निवडणुकीला युद्ध समजून कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविण्यात गैर नाही या मोदींच्या समजुतीला मतदारानी आव्हान दिले तरच भारतीय निवडणुका निकोप होतील. निकोप निवडणुका लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहेत. 

-------------------------------------------------------------------------------------  

  सुधाकर जाधव 
पंढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाइल - ९४२२१६८१५८ 


No comments:

Post a Comment