Friday, January 31, 2025

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ११४


जम्मू-काश्मीर हायकोर्टाने ऑक्टोबर  २०१५ साली दिलेल्या आपल्या ६० पानी निकाल पत्रात स्पष्ट केले होते की संविधानात हे कलम तात्पुरते असल्याचे म्हंटले असले तरी नंतरच्या घटनाक्रमाने कलम ३७० स्थायी झाले असून त्यात आता कोणताही बदल करता येणार नाही किंवा ते रद्दही करता येणार नाही.  हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते . एप्रिल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते 
----------------------------------------------------------------------


५ ऑगस्ट २०१९ रोजी राज्यसभेत कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्याच्या प्रस्तावासोबत जम्मू-काश्मीर राज्याच्या विभाजनाचा आणि राज्याचा दर्जा काढून घेवून केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव मांडताना जे भाषण केले त्यात सत्य, अर्धवट सत्य आणि असत्य याची बेमालूमपणे सरमिसळ केली आणि काही गोष्टी सांगायचे त्यांनी टाळले ! इतर राज्याच्या विलीनीकरणात सरदार पटेल यांची जशी प्रमुख भूमिका होती तशी जम्मू-काश्मीर मध्ये नव्हती. नेहरूंची प्रमुख भूमिका होती आणि कलम ३७० नेहरू मुळे आले .त्यात पटेलांची भूमिका नव्हती. जुनागड संस्थानाच्या विलीनीकरणात आणि हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणात सरदार पटेलांची प्रमुख भूमिका असल्याने त्या राज्यासाठी कलम ३७० ची गरज पडली नसल्याचे त्यांनी नमूद केले.  कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर मध्ये फुटीरतावाद आणि आतंकवाद वाढीस लागला. यातून झालेल्या रक्तपातात जवळपास ४५००० लोकांचे जीव गेले. कलम ३७० मुळे राज्याचा विकास खुंटला. राज्याचे औद्योगीकरण न झाल्यामुळे रोजगार उपलब्ध होवू शकला नाही. पर्यटनासाठी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी बाहेरची गुंतवणूक कलम ३७० व कलम ३५ अ मुळे येवू शकली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जाळे उभे राहू शकले नाही. शिक्षण व आरोग्य व्यवस्थेचा अभाव निर्माण झाला. देशातील जनतेला शिक्षणाचा अधिकार देणारा जो कायदा झाला तो भारतीय कायदे जम्मू-काश्मीर मध्ये लागू होत असल्याने हा अधिकार जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना मिळाला नाही. माहितीचा अधिकार लागू झाला नाही. जम्मू-काश्मीर राज्यातील सरकारच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याचा अधिकार कॅगला नसल्याने खूप मोठा भ्रष्टाचार झाला व लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली नाही.                                                     

अनुसूचित जमातींना आरक्षण मिळू शकले नाही. पाकिस्तानातून आलेले जे निर्वासित जम्मूत स्थायिक झालेत त्यांना जम्मू-काश्मीर राज्याच्या नागरिकत्वाचे फायदे मिळाले नाहीत. जम्मू-काश्मीरचा नागरिकत्वाचा कायदा महिलांशी भेदभाव करणारा आहे. ज्या वाल्मिकी समाजाला बाहेरच्या प्रदेशातून आणून काश्मीरमध्ये वसविले त्यांना नागरिकत्वाचे पूर्ण अधिकार देण्यात आले नाहीत. राज्यात बाहेरच्यांना जमिनी खरेदी करता येत नसल्याने राज्यातल जमिनीचे भाव पडलेले आहेत आणि हे सगळे कलम ३७० व कलम ३७० मुळे लागू होवू शकलेल्या कलम ३५ अ मुळे घडल्याचे प्रतिपादन अमित शाह यांनी आपल्या भाषणात केले.  कलम ३५अ संसदेत चर्चा न करता  संसदेला विश्वासात न घेता परस्पर राष्ट्रपतीच्या अध्यादेशाने लागू करण्यावर त्यांनी मोठा आक्षेप घेतला.  हे कलम तात्पुरते असताना इतके वर्ष कसे चालू राहिले असा सवाल त्यांनी विचारला. निवडणुकीच्या राजकारणासाठी कलम ३७० चालू ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. कलम ३७० रद्द झाल्याच्या ५ वर्षानंतर जम्मू - काश्मीर राज्य प्रगतीच्या शिखरावर दिसेल असे चित्र त्यांनी आपल्या भाषणात रंगविले. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा परिस्थिती सुधारली की लगेच बहाल केला जाईल. सर्वात महत्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी सांगितली की घटनात्मक तरतुदीच्या आधारेच कलम ३७० रद्द करण्यात येत आहे आणि या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले तरी कलम ३७० रद्द करण्याचा संसदेने घेतलेला निर्णय तिथे वैध ठरेल !

गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताना मांडलेल्या मुद्द्यांचा उहापोह त्यांच्या शेवटच्या मुद्द्यापासून करू. घटनात्मक तरतुदीच्या आधारेच कलम ३७० रद्द करीत असल्याचा त्यावेळी त्यांनी केलेला दावा आश्चर्यात टाकणारा होता. १९७५ साली इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्ला यांची तुरुंगातून सुटका करून त्यांच्याशी जो करार केला होता त्याचे संसदेत समर्थन करताना पहिल्यांदा नि:संदिग्ध शब्दात कलम ३७० तात्पुरते राहिले नसून ते कायम स्वरूपी झाले आहे. कारण हे कलम रद्द करण्याचा अधिकार फक्त जम्मू-काश्मीरच्या संविधान सभेचा होता आणि ते कलम रद्द न करता संविधान सभा विसर्जित झाली. हीच बाब जम्मू-काश्मीर हायकोर्टाने ऑक्टोबर  २०१५ साली दिलेल्या निकालात अधोरेखित केली होती. हायकोर्टाच्या बेंचने आपल्या ६० पानी निकाल पत्रात स्पष्ट केले होते की संविधानात हे कलम तात्पुरते असल्याचे म्हंटले असले तरी नंतरच्या घटनाक्रमाने कलम ३७० स्थायी झाले असून त्यात आता कोणताही बदल करता येणार नाही किंवा ते रद्दही करता येणार नाही. कारण या कलमात बदल करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार केवळ जम्मू-काश्मीर राज्याच्या घटना समितीकडे होता आणि आता घटना समिती अस्तित्वात नाही. हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते . एप्रिल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते ! कोर्टाचा असा सुस्पष्ट निर्णय असताना सरकारने घटनात्मक तरतुदीच्या आधारेच कलम ३७० रद्द करीत असल्याचा दावा करण्याला काय आधार आहे हे गृहमंत्र्याने आपल्या भाषणात स्पष्ट केले नव्हते.                                                                                                 
कलम ३७० मुळे भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मिरात लागू होवू शकली नाही असा दावा करताना आणि कलम ३५ अ केवळ राष्ट्रपतीच्या आदेशाने लागू करण्यात आले हे सांगताना त्यांनी हे सांगायचे टाळले की संसदेत कोणतीही चर्चा न करता घटना लागू झाल्याच्या ५० वर्षात भारतीय राज्यघटनेची विविध कलमे जम्मू-काश्मीर राज्यात लागू करण्यासाठी राष्ट्रपतींनी ४५ आदेश जारी करून केंद्र व राज्याशी संबंधित समवर्ती सूची लागू केली. एवढेच नाही तर पहिल्या ५० वर्षातच घटनेच्या ३९५ कलमापैकी २६० कलमे लागू झाली होती. ही सर्व कलमे संसदेत चर्चा न होता केवळ राज्याच्या संमतीने राष्ट्रपतीने काढलेल्या आदेशाने लागू झाली होती. कलम ३७० असल्यामुळे जम्मू-काश्मीर राज्य कॅगच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे संपूर्ण असत्य त्यांनी संसदेत उजागिरीने मांडले. १९५८ सालीच जम्मू-काश्मीर राज्य कॅगच्या अधिकार क्षेत्रात आले होते. माहिती अधिकार कायदा आणि शिक्षणाचा अधिकार कायदा जम्मू-काश्मिरात नाही असे खोटेच त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये जो माहिती अधिकार कायदा होता त्या अंतर्गत दोन महिन्यात कोणतीही माहिती मिळत असे. उलट आता माहिती मिळण्यात अडचण जात आहे. शिक्षणाचा अधिकार कायदा जम्मू-काश्मिरात लागू होता. कलम ३७० मुळे काश्मीर मागासलेला राहिला हे अमित शाह यांचे रडगाणे खोटे असल्याचे नियमित होणारा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेचे निष्कर्ष दाखवून देतात.                                    


--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


Thursday, January 16, 2025

ईव्हिएम बाबतच्या संशयकल्लोळास सरकार व संविधानिक संस्था जबाबदार -- ५

 निवडणुका घेणारे हात पारदर्शक नसतील तर कागदी मतपत्रिकेकडे वळण्याचा पर्याय तेवढा उरतो. कागदी मतपत्रिकेकडे वळायचे म्हणजे सगळ्या उमेदवारांच्या नाव-चिन्हाच्या मतपत्रिका छापून त्यावर मतदारांनी आपल्या पसंतीचा शिक्का मारण्याची गरज नाही. ई व्हि एमचे बटन दाबून मतदान करायचे पण मोजणी मात्र व्हि व्हि पी ए टी मधील कागदी मतांची करायची !
-------------------------------------------------------------------------------------------



मोदी सरकार समर्थकाकडून आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एक प्रश्न नेहमी विचारला जातो की एका उमेदवाराला दिलेले मत दुसऱ्या उमेदवाराला गेल्याचा काही पुरावा आहे का. तसे सिद्ध झालेले नाही हे खरे आहे. जगात जिथे जिथे ई व्हि एम वापरले गेले तिथे देखील असे झाल्याचा पुरावा नाही. आणि तरी देखील तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या जगातील महत्वाच्या देशांनी ई व्हि एम द्वारे निवडणुका घेणे बंद केले आहे. भारताची वाटचाल निवडणुका संपूर्णपणे ई व्हि एम द्वारे करण्याकडे सुरु असताना पाश्चिमात्य राष्ट्र एकेक करत ई व्हि एम वर बंदी घालत होते किंवा ई व्हि एम मुक्त निवडणूकीकडे वाटचाल करीत होते. असे करण्यामागचे दिली गेलेली कारणे सारखीच होती. यात पारदर्शकतेचा अभाव हे महत्वाचे कारण होते. आपले मत आपण ज्याला दिले त्यालाच गेल्याची खात्री मतदारांना वाटत नव्हती. ई व्हि एम द्वारे झालेल्या मतदानाची तपासणी मतदारांना करता येत नाही. जर्मनीच्या फेडरल कोर्टाने पारदर्शकता नसल्याने ई व्हि एम चा वापर अवैध ठरवला. जर्मनीत तेव्हापासून ई व्हि एम चा वापर बंद आहे. आयर्लंडने पण २००९ साली ई व्हि एम न वापरण्याचा निर्णय घेतला. इटली , जपान सारखे देश ई व्हि एम वापरत नाही. अमेरिकेत अनेक राज्यात ई व्हि एम वापरावर बंदी आहे. तिथे ज्या राज्यात ई व्हि एम वापरले जाते तिथे पेपर ट्रेलची सक्ती आहे. अन्य देशात ई व्हि एम चा वापर बंद करण्यामागची ही जी कारणे दिल्या गेली त्याची चर्चा ई व्हि एम चा वापर सुरु झाल्यापासून आपल्याकडेही होत आली आहेत . पण तेव्हा सरकार, निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्ट यांची भूमिका मतदानाच्या या नव्या पद्धतीवर लोकांचा विश्वास बसेल अशा सुधारणा करण्याकडे होता. आज ई व्हि एम मुळे घोळ होवू शकतो हे सिद्ध करण्याचे आव्हान देणाऱ्या निवडणूक आयोगाने आणि सरकारी एजंटानी एका प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. ई व्हि एम एवढे फुलप्रूफ होते तर तत्कालीन निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने ई व्हि एम सोबत व्हि व्हि पी ए टी मशीन जोडण्याला मंजुरी कशासाठी दिली?

 आपण ज्याला मत दिले त्यालाच ते मिळाले याची खात्री मतदारांना वाटत नव्हती आणि तशी ती वाटणे गरजेची असल्याने सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला व्हि व्हि पी ए टी जोडण्याचे आदेश दिले आणि आमच्या  ई व्हि एम मध्ये हेराफेरी होवू शकत नाही अशी हेकेखोर भूमिका न घेता तेव्हाच्या निवडणूक आयोगाने लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याचे वचन दिले व अंमलातही आणले. व्हि व्हि पी ए टी संबंधीचा निर्णय ज्या याचिकेवर आला त्या याचिकेत ई व्हि एम मध्ये मताची हेराफेरी होवू शकते असा दावा करण्यात आला होता. २०१४ नंतर अशी याचिका आली असती तर आजच्या निवडणूक आयोगाचे व सुप्रीम कोर्टाचे वर्तन बघता याचिका फेटाळल्या गेली असती असे मानण्यास वाव आहे. त्यामुळे आज खरा प्रश्न किंवा कळीचा प्रश्न ई व्हि एम विश्वासार्ह आहे की नाही हा नाहीच. ई व्हि एम ज्यांच्या ताब्यात आहे आणि ई व्हि एम संदर्भात निर्णय घेण्याचा ज्यांना अधिकार आहे तेच पारदर्शक नाहीत. मशीनचा वापर पारदर्शक आणि अपारदर्शक असा दोन्ही पद्धतीने होवू शकतो. याचा वापर करणारे पारदर्शक असतील तर वापर पारदर्शक होईल आणि ज्यांना पारदर्शकतेचे वावडे असेल असे हात मशीन मागे असतील तर त्यात अपारदर्शकता असणारच. आजचा ई व्हि एम चा संशय कल्लोळ पारदर्शकतेच्या अभावातून निर्माण झालेला आहे. ज्या देशात ई व्हि एम वर बंदी आली तिथे मतदारांना फक्त मशीन अपारदर्शक वाटत होते. आपल्याकडे केवळ मशीनच नाही तर मशीन मागचे हातही अपारदर्शक आहे. मशीन मागचे हात म्हणजे मतदान केंद्रात मशीन हाताळणारे कर्मचारी नव्हे तर या मशीन संबंधी उच्च स्तरावर निर्णय घेणारे निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि सरकार यांचे हात इथे अभिप्रेत आहेत. यातली प्रत्येक संस्था स्वतंत्र आहे आणि त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेणे अपेक्षित आहे. तसे न होता या संस्था एकमेकांना पाठीशी घालतात असे यांचे सकृतदर्शनी वर्तन आहे. व्हि व्हि.पी ए टी च्या मोजणीच्या निर्णयातून ते स्पष्ट होते. 


ई व्हि एम द्वारे होणाऱ्या निवडणुका पारदर्शी व्हाव्यात आणि मतदारांचा विश्वास कायम राहावा यासाठी ई व्हि एम ला व्हि व्हि पी ए टी जोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मतदारांना आपण ज्याला मत दिले त्यालाच ते मिळाल्याचे दिसणे शक्य झाले. पारदर्शकता आणि विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी व्हि व्हि पी ए टी जोडले गेले असेल तर मतमोजणीच्या प्रक्रियेत त्याचा अधिक वापर करायला हरकत आणि अडचण कसली आहे. २०१९ साली निवडणूक आयोगाकडे २५ राजकीय पक्षांनी व्हि व्हि पी ए टी मध्ये पडणारी कागदावरील ५० टक्के मते मोजावीत आणि ती ई व्हि एम मताशी जुळल्या नंतरच निवडणूक निकाल घोषित  करण्याची मागणी केली होती. या मागणी मध्ये गैर काहीही नव्हते. तरी निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ टक्के व्हि व्हि पी ए टी मते मोजण्याचा आदेश दिला. खर्च १०० टक्के करायचा आणि वापर ५ टक्के करायचा आणि हे कशासाठी तर निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की व्हि व्हि पी ए टी ची ५० टक्के मते मोजत बसलो तर निवडणूक निकाल जाहीर करायला वेळ लागेल वेळ महत्वाचा की विश्वासार्हता महत्वाची याचा विचार ना निवडणूक आयोगाने केला ना सुप्रीम कोर्टाने.

ज्या देशात निवडणुका २-२ महिने होतात आणि पहिल्या फेरीत मतदान केलेल्या मतदारांना निकालाची दोन महिने वात पहावी लागते तिथे मतमोजणीत आणखी काही तास लागल्याने कोणते आभाळ कोसळणार आहे. पण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट विवेकाने विवेकी मागणीवर विचार करायला तयार नाही. संशय वाढतो तो अशा अट्टाहासी व अविवेकी निर्णयाने. जेव्हा संपूर्ण मतदान कागदी मतपत्रिकेवर घेतले जात होते तेव्हा त्याची मोजणी होवून मध्यरात्री पर्यंत निकाल हाती येत होते. आता मशीन द्वारे होणाऱ्या मतदानाची मोजणी एका क्लिक द्वारे होत असतानाही सगळे निकाल यायला संध्याकाळ होतेच. त्यामुळे वेळेचे वेद पांघरून निवडणूक आयोगाला काही लपवायचे तर नसते ना अशी शंका घ्यायला वाव मिळतो. जेव्हा कोणत्याच संस्था इमानेइतबारे वागत नाहीत असा समज पसरतो तेव्हा या संस्थाना हस्तक्षेप करण्यास वावच मिळणार नाही अशी निवडणुकीची पारदर्शक पद्धत अंमलात आणणे लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते. ई व्हि एम द्वारे निवडणुका सोयीच्या व कमी खर्चिक असल्याचा दावा करून त्या पद्धतीने निवडणुका घेण्याचा अट्टाहास करायचा असेल तर पारदर्शकतेचा तेवढाच आग्रह राखला तर संशयाला जागा उरत नाही. निवडणुका घेणारे हात पारदर्शक नसतील तर कागदी मतपत्रिकेकडे वळण्याचा पर्याय तेवढा उरतो. कागदी मतपत्रिकेत घोटाळे होत नाहीत का ? होतात पण ते लपून राहात नाहीत ! लगेच त्याचा गवगवा होतो आणि घोटाळा सुधारता येतो. चंडीगड मेयर निवडणूक याचे उत्तम उदाहरण आहे. मतपत्रिकांची पूर्वीची पद्धत परत आणण्याचीही गरज नाही.  कागदी मतपत्रिकेकडे वळायचे म्हणजे सगळ्या उमेदवारांच्या नाव-चिन्हाच्या मतपत्रिका छापून त्यावर मतदारांनी आपल्या पसंतीचा शिक्का मारण्याची गरज नाही. ई व्हि एमचे बटन दाबून मतदान करायचे पण मत मोजणी मात्र व्हि व्हि पी ए टी मधील मतांची करायची ! फक्त सध्याच्या पद्धतीत डोळ्याला दिसणाऱ्या मताची स्लीप हाती पडेल व मतदाराला ती वेगळ्या मतपेटीत टाकण्याची सोय तेवढी करावी लागेल. या मतांची ई व्हि एम मध्ये नोंदल्या गेलेल्या मतांशी गरज असल्यास पडताळणी करता येईल. या पद्धतीने निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करता येईल आणि निवडणुकीची विश्वासार्हता टिकविता येईल. 

---------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८  


Thursday, January 9, 2025

ईव्हिएम बाबतच्या संशयकल्लोळास सरकार व संविधानिक संस्था जबाबदार - ४

 
निवडणूक नियमात घाईघाईने करण्यात आलेल्या दुरुस्तीने दोन गोष्टीला हवा मिळाली आहे. एक, निवडणूक आयोग व सरकार यांची मिलीभगत आहे आणि दोन, निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतूद असलेली माहिती न पुरविण्यासाठी केलेला आटापिटा निवडणुकीत झालेला घोळ लपविण्यासाठी तर नव्हता ना अशा संशयाला बळ देणारा आहे. 
------------------------------------------------------------------------------------


ईव्हिएम विरोधात कायदेशीर लढाई लढणारे वकील महमूद प्राचा यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या अनपेक्षित विजया नंतर बूथ वर करण्यात आलेले व्हिडीओ चित्रण , सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व बूथ वरील फॉर्म १७ - सी चा भाग १ व भाग २ देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. १९६१ च्या निवडणूक कायद्याप्रमाणे सदर माहिती पुरवणे निवडणूक आयोगावर बंधनकारक असताना निवडणूक आयोगाने महमूद प्राचा यांची मागणी फेटाळली. आयोगाच्या निर्णया विरोधात महमूद प्राचा यांनी पंजाब व हरियाणा हायकोर्टात अपील दाखल केले. सुनावणी दरम्यान आयोगाच्या वकिलांनी महमूद प्राचा हे हरियाणाचे रहिवाशी नाहीत किंवा त्यांनी हरियाणा विधानसभेची निवडणूक लढली नाही या आधारावर माहिती पुरविण्यास विरोध केला. मागितलेली माहिती निर्धारित फी घेवून उमेदवाराशिवाय इतरांना देण्याची निवडणूक नियमातील तरतूद महमूद प्राचा यांच्या वकिलांनी हायकोर्टाच्या लक्षात आणून दिली. निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्याची आणि तसे झाल्याची खात्री करून घेण्यासाठीच निवडणूक नियमात माहिती पुरविण्याची तरतूद असल्याचे सांगत हायकोर्टाने अर्जदाराने मागितलेली माहिती ६ आठवड्याच्या आत पुरविण्याचा आदेश ९ डिसेम्बर २०२४ रोजी निवडणूक आयोगाला दिला. पण हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्या ऐवजी किंवा हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्या ऐवजी घाईघाईने केंद्र सरकारकडून निवडणूक नियमात बदल करून घेतले जेणेकरून मागितलेली माहिती देण्याचे बंधन निवडणूक आयोगावर असणार नाही.                                                                 

हायकोर्टाच्या निर्णयास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही तर ६ आठवड्याच्या आत मागितलेली माहिती पुरविण्याचे बंधन आयोगावर राहिले असते. हे टाळण्यासाठी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात गेले नाही आणि सरकारकडून पाहिजे ती दुरुस्ती करून घेतली. सरकारने कोणतीही खळखळ न करता हायकोर्टाच्या निर्णयानंतर अवघ्या १० दिवसात निवडणूक नियमात दुरुस्ती केली आणि निवडणुकीत काही घोळ झाला असेल तर तो तपासण्याचा मार्ग बंद करून टाकला ! ९ डिसेंबरला हायकोर्टाचा आदेश आला आणि तो निरस्त करण्यासाठी २० डिसेंबर २०२४ रोजी केंद्र सरकारने १९६१ च्या निवडणूक कायद्यातील कलम ९३ [२] [अ] मध्ये दुरुस्ती केली. पूर्वी जी कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध होती टी आता उपलब्ध असणार नाहीत आणि अशी कागदपत्रे अर्जदाराला देण्याचे आदेश आता कोर्टाला देता येणार नाहीत. निवडणूक नियमात घाईघाईने करण्यात आलेल्या दुरुस्तीने दोन गोष्टीला हवा मिळाली आहे. एक, निवडणूक आयोग व सरकार यांची मिलीभगत आहे आणि दोन, निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतूद असलेली माहिती न पुरविण्यासाठी केलेला आटापिटा निवडणुकीत झालेला घोळ लपविण्यासाठी तर नव्हता ना अशा संशयाला बळ देणारा आहे. आता तर निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी बनविण्यात आलेला कायदाच बदलून निवडणुका व जनता या दरम्यान अपारदर्शक पडदा लावण्यात आला आहे. शेवटी मागितलेली आणि ती सुद्धा कायद्यात बसणारी माहिती न पुरवून आयोगाला काय लपवायचे आहे हा प्रश्न कोणालाही पडेल. लपवाछपवी करण्याचा संशय असलेला आयोग आपल्या ईव्हिएम मध्ये काही घोळ होवूच शकत नाही असा दावा करीत असेल तर त्यावर कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न वावगा म्हणता येणार नाही. 

आयोगावर विश्वास ठेवणे अवघड असल्याची आणखीही काही कारणे आहेत. नुकतेच दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात तंत्रज्ञ असलेले 'आप' पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी एका पक्षाला दिलेले मत दुसऱ्या पक्षाकडे कसे वळते करता येवू शकते याचे प्रात्यक्षिकच विधानसभेत दाखविले. ९० सेकंदात ईव्हिएमचे सेटिंग बदलणे शक्य असल्याचे दाखविले. यावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की ते निवडणूक आयोग वापरत असलेले ईव्हिएम नव्हते. निवडणूक आयोगाच्या ईव्हिएम मध्ये असे होणे शक्यच नसल्याचा आयोगाने पुन्हा दावा केला आहे.  ते निवडणूक आयोग वापरत असलेले ईव्हिएम नव्हते तर ईव्हिएम सदृश्य मशीन होते हे खरे आहे. यावर आप आमदार भारद्वाज यांनी आयोगाने आपल्या हाती त्यांचे ईव्हिएम दिले तर त्यावर असा चमत्कार घडवून दाखवू शकतो असे प्रत्युत्तर दिले आहे. या आव्हान प्रति आव्हानामुळे सामान्य मतदारांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे आणि त्यातून ईव्हिएम बद्दल संशयाची पाल चुकचुकणेही स्वाभाविक आहे. या संशयाचे निराकरण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. ईव्हिएम ला आव्हान देणाऱ्यांना संधी देवून , त्यांच्याशी सहकार्य करून काय खरे , काय खोटे हे लोकांसमोर येवू द्यायला हवे. आमच्या ईव्हिएम मध्ये बदल होवूच शकत नाही असा दावा करायचा आणि तो दावा खोटा असल्याचे आव्हान देणाऱ्यांना आपले ईव्हिएम वर प्रयोग करूच द्यायचे नाहीत हा प्रकार ईव्हिएम बद्दलच्या संशयाला बळकटी देणारा आहे.                               

गायब झालेल्या ईव्हिएम मुळे संशयकल्लोळात भरच पडली आहे. ई सीआय एल, हैदराबाद आणि बी ई एल , बेंगलेरू या दोन सरकारी कंपन्या निवडणूक आयोगासाठी ईव्हिएमची निर्मिती करतात. या कंपन्यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या ईव्हिएमची संख्या आणि निवडणूक आयोगाकडच्या ईव्हिएमच्या संख्येत प्रचंड तफावत आहे. मुंबईच्या मनोरंजन रॉय या माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मिळविलेल्या माहितीतून गायब किंवा गहाळ झालेल्या ईव्हिएम बद्दलची माहिती उघड झाली आहे. रॉय यांनी माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना निवडणूक आयोगाने २१ जून २०१७ रोजी दिलेल्या उत्तरात दोन्ही सरकारी कंपन्यांकडून २० लाख २० हजार १०६ ई व्हिएम मिळाल्याची माहिती दिली. माहिती अधिकारा अंतर्गत या कंपन्यांनी निवडणूक आयोगाला किती ईव्हिएम पुरवले असा प्रश्न विचारण्यात आला. या दोन्ही कंपन्याकडून जे उत्तर मिळाले त्यानुसार या कंपन्यांनी निवडणूक आयोगाला ३९ लाख १४ हजार ५२५ ईव्हिएम पाठवल्याचे उघड झाले. अधिकृत रेकॉर्ड प्रमाणे कंपन्यांनी पाठवलेले आणि आयोगाला मिळालेल्या ईव्हिएमच्या संख्येत तब्बल २० लाख ईव्हिएमचा फरक आहे. हे २० लाख ईव्हिएम गेले कुठे , कोणाच्या ताब्यात आहे याचे कोणाकडे उत्तर नाही. ते शोधण्याचे काय प्रयत्न झालेत याचेही स्पष्टीकरण द्यायला कोणी समोर येत नाही. विधानसभा सोडा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निकालात हे कथित गहाळ ईव्हिएम फेरबदल घडवून आणू शकतात अशी शंका कशी उडवून लावणार ? एवढ्या संख्येने ईव्हिएम चोरण्याची, ते लपवून ठेवण्याची क्षमता असणारे लोक निवडणूक प्रक्रियेत हे ईव्हिएम सामील करण्याची क्षमता बाळगून नसतील हे कशावरून समजायचे. गहाळ ईव्हिएमचा निवडणुकीशिवाय दुसरा काहीच उपयोग नाही. 

------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Friday, January 3, 2025

ईव्हिएम बाबतच्या संशयकल्लोळास सरकार व संविधानिक संस्था जबाबदार - ३

 कुठल्याही नितीमत्तेची चाड नसलेला पक्ष व त्याचे सरकार अशी प्रतिमा स्वपराक्रमाने भाजप नेत्यांनी निर्माण केली आहे. सत्ता मिळविण्यासाठी हा पक्ष व त्यांचे नेते कोणत्याही थराला जावू शकतात हे वारंवार अधोरेखित झाल्याने यांच्यासाठी ईव्हिएम घोटाळा करणे अशक्य नाही ही भावना ईव्हिएम बाबतच्या संशयकल्लोळास कारणीभूत आहे.
-------------------------------------------------------------------------------------


ईव्हिएमच्या संशयकल्लोळ नाट्यातील सर्वात मोठे खलनायकी पात्र केंद्र सरकार आहे आणि विदुषकी पात्र भाजप आहे. सत्तेत नसताना ईव्हिएमचा विरोध करणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की २०१४, २०१९ आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील दारूण पराभवानंतरही कॉंग्रेसने अधिकृतपणे ईव्हिएम वर आक्षेप घेतला नव्हता किंवा त्या यंत्रा द्वारे निवडणूक घेण्यास विरोध केला नव्हता. कॉंग्रेसने ईव्हिमएम वर आक्षेप घ्यायला सुरुवात केली ती २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या हरियाना व महाराष्ट्रातील निवडणुकानंतर. दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसला अनुकूल वातावरण होते आणि या दोन्ही राज्यात भाजप पराभूत होणार हे तटस्थ राजकीय निरीक्षक देखील खात्रीने सांगत होते. अगदी सरकार धार्जिणे माध्यमे देखील दोन्ही राज्यात भाजप विजयाची शक्यता पुसट असल्याचे मान्य करीत होते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या झालेल्या दणदणीत विजयाने ईव्हिएम बद्दल संशय निर्माण झाला आणि कॉंग्रेसने ईव्हिएम वर पहिल्यांदा आक्षेप घेतला आहे. भाजपचे सरकार असताना २००४ साली पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक ई व्हि एम द्वारे घेतली गेली आणि त्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपने ईव्हिएम विरोध सुरु केला तो थेट २०१४ चे सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत ! त्यानंतर मात्र भाजप ईव्हिएमचा कट्टर समर्थक बनला. ईव्हिएम बाबतच्या आक्षेपाला निवडणूक आयोगा ऐवजी भाजपचे प्रवक्ते आणि मोदी सरकारातील मंत्रीच उत्तर देवू लागले.                                                                                       

२०१४ नंतर भारतीय जनता पक्षाचे जे चरित्र देशासमोर आले ते असे आहे की निवडणुकीत काही राज्यात पराभव झाला तरी सम दाम दंड भेद वापरून विरोधी सरकार पाडायचे आणि आपले सरकार स्थापन करायचे. या बाबतीत कुठल्याही राजकीय नीतीमत्तेचे पालन भाजपने व केंद्रातील भाजप सरकारने केले नाही. विरोधी पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात 'ऑपरेशन कमळ' सुरु असल्याच्या बातम्या राजरोसपणे प्रसिद्ध होताना आपण पाहिले आहे. ऑपरेशन कमळ म्हणजे कोट्यावधी रुपये आणि ईडी व सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षाचे आमदार फोडून भाजपचे सरकार स्थापन करायचे. याबाबत कोणतीही लाजलज्जा या पक्षाने वा या पक्षाच्या नेत्यांनी कधी बाळगली नाही. उलट असे करणे हे त्या पक्षाच्या नेत्यासाठी गौरवाची व अभिमानाची बाब असते. मी नुसताच सत्तेत परत आलो नाही तर दोन दोन पक्ष फोडून परत आलो असा स्व-गौरव करताना सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना आपण पाहिले आहे. कुठल्याही नितीमत्तेची चाड नसलेला पक्ष व त्याचे सरकार अशी प्रतिमा स्वपराक्रमाने या पक्षाच्या नेत्यांनी निर्माण केली आहे. सत्ता मिळविण्यासाठी हा पक्ष व त्यांचे नेते कोणत्याही थराला जावू शकतात हे वारंवार अधोरेखित झाल्याने यांच्यासाठी ईव्हिएम घोटाळा करणे अशक्य नाही असे वाटण्या इतके यांचे कर्तृत्व आहे आणि या पार्श्वभूमीवर यांचा ईव्हिएमचा पुरस्कार संशयास्पद ठरणारा आहे.                                           

निवडणूक आयोग या पक्षाच्या दिमतीला असेल तर ईव्हिएम घोटाळा करणे अशक्य नाही असा समज दृढ होण्यामागे निवडणूक आयोगाचे पक्षपाती व भाजपानुकुल वर्तन कारणीभूत ठरले आहे. २०१४ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान , भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री व अन्य भाजप नेत्यांनी निवडणूक नियम उल्लंघून धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणारी अनेक आक्षेपार्ह विधाने अनेकदा केलीत पण निवडणूक आयोगाने त्यांना रोखले नाही की त्यांच्यावर कारवाई केली नाही. निवडणूक आयोग भाजप व सरकारला शरण गेल्याचा हा मोठा पुरावा आहे. निवडणूक आयोगाला भाजप धार्जिणा बनविण्यासाठी केंद्र सरकारने केलेले आणि चालविलेले प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. पंतप्रधानाच्या एका आक्षेपार्ह भाषणावर त्यांना नोटीस देण्याचा प्रस्ताव जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगा समोर आला होता तेव्हा तीन पैकी एका निवडणूक आयुक्ताने अशी नोटीस देण्याचा आग्रह धरला होता. अशी भूमिका घेतल्याबरोबर निवडणूक आयुक्ताच्या कुटुंबीयामागे केंद्रीय संस्थांचा ससेमिरा लागला व शेवटी त्या केंद्रीय निवडणूक आयुक्ताला राजीनामा द्यावा लागला होता. सध्याचा निवडणूक आयोग केंद्र सरकार व सरकारी पक्षाचा धार्जिणा असल्याचा समज मोठ्या प्रमाणात झालेला असतानाच अलीकडे केंद्र सरकारने घेतलेला मोठा पण विवादास्पद निर्णय केंद्राला निवडणूक आयोग आपल्या मुठीतलाच पाहिजे आहे याची पुष्टी करणारा आहे.                                               

पंतप्रधानांना आक्षेपार्ह विधानाबद्दल नोटीस पाठविण्याची हिम्मत करणारा पुन्हा एखादा निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगात  नियुक्त होणार नाही याची सोय मोदी सरकारने निवडणूक आयोग नियुक्तीची पद्धत बदलून केली आहे. निवडणूक आयोगाच्या पक्षपाती वर्तना बाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेवून आणि निष्पक्ष निवडणूक आयोगाची गरज व महत्व ओळखून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मार्च २०२३ मध्ये निवडणूक आयुक्त नियुक्त करणाऱ्या समितीत मोठा आणि महत्वाचा बदल केला. निवड समितीत सरकार पक्षाचे वर्चस्व समाप्त करणारा हा निर्णय होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवड समितीत पंतप्रधान , विरोधीपक्ष नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश यांचा समावेश असणाऱ्या समितीने निवडणूक आयुक्तांची नेमणूक होणार होती. या निर्णयात काहीही आक्षेपार्ह नव्हते किंबहुना तटस्थ निवडणूक आयुक्त नेमणुकीसाठी हा निर्णय स्वागत करण्या योग्य होता. या निर्णयाने निवडणूक आयोगावरील आपली पकड नाहीशी होईल हा धोका ओळखून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निरस्त करण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पाउल उचलले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे गठीत समितीकडून निवडणूक आयुक्त निवडण्याची वेळ येण्या आधीच संसदेत बहुमताच्या बळावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून सरकार पक्षाचे वर्चस्व असणारी दुरुस्ती मान्य करून घेण्यात आली.                                                                               

या दुरुस्तीप्रमाणे निवडणूक आयुक्ताच्या निवडीसाठी पंतप्रधान , पंतप्रधाना द्वारा नियुक्त त्यांच्या मंत्रीमंडळातील एक सदस्य व विरोधीपक्ष नेता अशी तिघांची समिती असणार आहे. सरकार पक्षाला अनुकूल निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा मार्ग मोदी सरकारने मोकळा करून घेतला. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला म्हणून प्रचंड आकांडतांडव करणाऱ्या पक्षाने अत्यंत बेमुर्वतखोरपणे तटस्थ व पारदर्शक वातावरणात निवडणुका होण्याचा मार्ग अवरुद्ध केला. सरकार पक्षाने नियुक्त केलेले निवडणूक आयुक्त सरकार पक्षाच्या विजयासाठीच काम करतील आणि सरकार व निवडणूक आयोग मिळून निकालात हेराफेरी करू शकतात हा समज मोदी सरकारच्या निर्णयाने बळावला आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने आपली सत्ता अबाधित ठेवण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न असल्याचा समज होणे स्वाभाविक आहे. ईव्हिएम बद्दलच्या संशय कल्लोळास ही पार्श्वभूमी आहे. हरियाना विधानसभा निवडणुका संबंधीच्या एका याचिकेवर हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होवू नये यासाठी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांनी तातडीने निवडणूक नियमात करून घेतलेली दुरुस्ती ईव्हिएम घोटाळा झाकण्यासाठी तर नाही ना अशी शंका उपस्थित करण्यास वाव देणारी आहे. 

--------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८