पंडीत नेहरू यांच्या प्रयत्नाने काश्मीर भारतात सामील झाला हे जितके सत्य आहे तितकेच हेही सत्य आहे की स्वातंत्र्यापासून ज्या काश्मीर समस्येने भारताचा पिच्छा सोडला नाही त्या काश्मीर समस्येचा पाया पंडीत नेहरूंनीच घातला.
------------------------------------------------------------------------------------
कलम ३७० रद्द केल्याने काश्मीर प्रश्न संपला किंवा सुटला हा काश्मिरेतर भारतीयांचा भ्रम पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने बऱ्याच अंशी दूर झाला पण असा दहशतवादी हल्ला प्रश्न संपला की नाही याचा मापदंड असू शकत नाही. हा हल्ला कलम ३७० शी निगडीत नाही. कधीही आणि कोणत्याही दहशतवादी गटाने किंवा संघटनेने कलम ३७० च्या पुनर्स्थापनेची मागणी केलेली नाही. काश्मीरखोऱ्यातील जनतेची ती मागणी आहे आणि त्यांनी विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीतून प्रकट केली आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मिरातील घडामोडीचा जो आढावा इथे घेतला आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कलम ३७० मधील नमूद प्रक्रियेचा उपयोग करून पंडीत नेहरू पासून नरेंद्र मोदी पर्यंतच्या केंद्रातील सरकारने स्वत: मान्य केलेल्या काश्मीरच्या स्वायत्ततेचा गळा घोटण्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला. पंडीत नेहरू यांच्या प्रयत्नाने काश्मीर भारतात सामील झाला हे जितके सत्य आहे तितकेच हेही सत्य आहे की स्वातंत्र्यापासून ज्या काश्मीर समस्येने भारताचा पिच्छा सोडला नाही त्या काश्मीर समस्येचा पाया पंडीत नेहरूंनीच घातला. काश्मीर बाबत ज्या करणासाठी संघ,जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी नेहरुंना सातत्याने दोष देत आली त्या बाबतीत पंडीत नेहरू पूर्णपणे निर्दोष आहेत. नेहरूंनी काश्मीरचे भवितव्य निश्चित करण्यासाठी सार्वमताला मान्यता दिली, काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघात नेला , पाकव्याप्त काश्मीर न घेताच शस्त्रसंधी केली आणि कलम ३७० चे निर्माता नेहरू आहेत आणि यातून काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला आणि याला सर्वस्वी नेहरू जबाबदार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्या राजकीय शाखेचे म्हणजे जनसंघ-भारतीय जनता पार्टीचे मत. १९५२ पासून ते वर्तमान काळापर्यंत हिरीरीने आणि चिकाटीने ही मंडळी असे मत मांडत आली आहे. याला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत कॉंग्रेस मागे राहिल्याने सर्वसामान्य जनताही या मताची बनत गेली. नेहरू संघ परिवार म्हणतो त्या कोणत्याही बाबतीत दोषी नाहीत आणि तरीही त्यांनी काश्मीर समस्येचा पाया घातला तो कसा हे नीट समजून घेतले तर काश्मीरची नेमकी समस्या आपल्या लक्षात येईल.
काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय असला तरी त्यात प्रमुख भूमिका नेहरूंची होती हे खरे. काश्मीरवर व पर्यायाने भारतावर पाकिस्तानने आक्रमण केले आहे आणि त्या बाबतीत पाकिस्तानला दोषी ठरवून आपल्या हद्दीत परत जाण्याचा आदेश द्या अशी तक्रारवजा मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली. भारताने संयुक्त राष्ट्राकडे न जाता पाकिस्तानने ताब्यात घेतलेला भाग जिंकून घ्यायला हवा होता असा संघ परिवाराने निर्माण केलेला मतप्रवाह आहे. असे म्हणण्यामागे भारताने युद्ध थांबवून संयुक्त राष्ट्राकडे धाव घेतली असा समज या मागे आहे जो खरा नाही. भारत संयुक्त राष्ट्रात गेला तरी काश्मिरात युद्ध चालूच होते. राजा हरीसिंग यांनी काश्मीर भारतात सामील करण्याच्या सामीलनाम्यावर सही करेपर्यंत [२६ ऑक्टोबर १९४७] पाकिस्तानी घुसखोर श्रीनगरच्या सीमेजवळ पोचले होते. भारतीय सैन्य दुसऱ्या दिवशी श्रीनगरला उतरले आणि घूसखोरा विरुद्ध लढाई सुरु केली. ही लढाई सुरु असताना भारताने १ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तानी आक्रमणा विरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्या नंतरही युद्ध सुरूच ठेवले. भारताच्या तक्रारीवर संयुक्त राष्ट्र संघाने ४ महिन्या नंतर निर्णय घेत ठराव केला. या ठरावात तेच होते ज्याची मागणी भारताने केली होती. संयुक्त राष्ट्र संघाने पाकिस्तानला सर्व घुसखोरांना व आपल्या सैन्याला परत घ्यायला सांगितले तर भारताने गरजेपुरते सैन्य काश्मीरमध्ये ठेवून अतिरिक्त सैन्य परत घ्यायला सांगितले. याचा अर्थ स्पष्ट आहे संयुक्त राष्ट्रसंघाने भारताची तक्रार खरी मानून पाकिस्तानला आक्रमक ठरवले आणि परत जायला सांगितले. ठरावातला दुसरा मुद्दा होता काश्मीरच्या जनतेला भारतात राहायचे की पाकिस्तानात याचा निर्णय घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या देखरेखीखाली सार्वमत घेण्याचा. भारताने तर सामिलीकरणाच्या वेळीच सार्वमत घेण्याचे मान्य केले होते त्यामुळे या मुद्द्यावरही भारताच्या म्हणण्यानुसार निर्णय झाला. मग संयुक्त राष्ट्र संघात भारता विरोधात कोणताच निर्णय झाला नसताना संयुक्त राष्ट्रसंघात जाण्याची चूक झाली असे कसे म्हणता येईल.
भारत संयुक्त राष्ट्र संघात जाण्याआधी दोन महिने युद्ध सुरु होते, संयुक्त राष्ट्र संघाचा ठराव ४ महिन्यानंतर झाला तेव्हाही युद्ध चालूच होते आणि हा ठराव झाल्या नंतरही तब्बल ९ महिने युद्ध चालू होते! श्रीनगर पर्यंत आलेल्या पाकिस्तानी घुसखोर आणि सैनिकांना मागे ढकलत भारतीय सेनेने दोन तृतीयांश भागावर कब्जा मिळविला. मोठा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यातून परत मिळविल्या नंतर हवामान व भौगोलिक परिस्थितीमुळे पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला होता. दोन दिवस नेहरूंनी युद्धविराम टाळला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता हा निव्वळ अपप्रचार आहे. पाकिस्तान विरूद्धचे १९६५ चे युद्ध १७ दिवस आणि १९७१ चे युद्ध १३ दिवस चालले हे लक्षात घेतले तर अत्यल्प संसाधने असताना १५ महिने युद्ध चालल्याने त्यावेळच्या परिस्थितीत किती ताण आला असेल याची कल्पना येईल. संयुक्त राष्ट्र संघाने ऑगस्ट १९४८ मध्ये आपल्या मूळ ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली. दोन्ही देशांनी सार्वमत घेवून काश्मीर प्रश्न सोडवायला मान्यता दिल्याने युद्ध चालू ठेवणे शहाणपणाचे नव्हते म्हणून भारताने शस्त्रसंधी स्वीकारली. पुढे पाकिस्ताननेच सैन्य मागे घेण्यास नकार दिल्याने सार्वमत घेता आले नाही. या सगळ्या प्रकरणात भारताची कोणती चूक झाली असेल तर ती ही होती की संयुक्त राष्ट्र संघाचा तो ठराव अंमलात यावा यासाठी भारताकडून विशेष प्रयत्न झाले नाहीत. संयुक्त राष्ट्र संघात अमेरिका व इंग्लंडची त्यावेळची दादागिरी बघून पंडीत नेहरूंचा संयुक्त राष्ट्र संघा बद्दल मोह्भंग झाला व आपण उगीच संयुक्त राष्ट्राचे दार ठोठावले अशी त्यांची भावना झाली होती. असे असले तरी संयुक्त राष्ट्र संघात गेल्यामुळे कुठलाही आपल्या हिताच्या विपरीत निर्णय आपल्याला मान्य करावा लागलेला नाही. उलट आपल्याला पाहिजे तसा ठराव संयुक्त राष्ट्र संघाने केला .आधी त्या ठरावाला पाकिस्तानने मान्यता दिली पण नंतर अंमलबजावणी करण्याचे टाळले. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात जाण्याचा भारताला फारसा फायदा झाला नाही असे म्हणता येईल. पण गेल्याने तोटा झाला असे म्हणायला काहीच आधार नाही. संयुक्त राष्ट संघात जाणे हे पाकिस्तानला आक्रमक ठरवून त्याला मागे जाण्याचा आदेश देण्याच्या मर्यादे पर्यंत होते. ज्याला काश्मीर प्रश्न म्हणतो तो सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाला मध्यस्थी करण्यास तेव्हा किंवा नंतर कधीही भारताकडून सांगण्यात आले नाही किंवा मध्यस्थी स्वीकारण्यात आली नाही. संयुक्त राष्ट्र संघात जाण्याने आपला कोणताही तोटा झाला नसताना नेहरुंना दुषणे देणे चुकीचे आहे. पण नंतर जे नेहरूंनी केले त्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला.
------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment