Thursday, February 14, 2019

संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचार : भाजपची दुटप्पी भूमिका -- ५


भाजप संरक्षण सौद्यावर आक्षेप घेतो तेव्हा देशभक्त असतो आणि विरोधकांनी आक्षेप घेतला तर ते भाजपच्या दृष्टीने देशद्रोही असतात ! भाजपचा दुटप्पीपणा आहे तो असा.
---------------------------------------------------------------------------------------
              
मागच्या काही लेखातून बोफोर्स घोटाळ्या संबंधी दिलेली माहिती अनेक वाचकांसाठी नवी असेल. ज्यांनी त्यावेळी वाचले असेल त्यांना अनेक घटना आठवत नसतील. अशाच आणखी २-३ घटनाची नोंद घेवून पुढे जावू.  मागच्या लेखात अटल काळात दिल्ली हायकोर्टाने राजीव गांधीना आरोपातून मुक्त केले होते आणि त्या निर्णया विरुद्ध सरकारने सुप्रीम कोर्टात अपील देखील केले नाही हे बघितले. हायकोर्टाच्या निर्णयानंतर ज्यांनी बोफोर्सचा मुद्दा पुढे करून निवडणुकीत राजीव गांधीच्या कॉंग्रेसला हरविले त्या माजी प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले कि बोफोर्स भ्रष्टाचाराशी राजीव गांधी यांचा काहीही संबंध नव्हता व या प्रकरणात राजीव गांधी दोषी आहेत असे आपण कधीही म्हंटले नव्हते !                                                
बोफोर्स प्रकरणाचा भारतीय वृत्तपत्रातून भंडाफोड करणाऱ्या भारतीय पत्रकार चित्रा सुब्रम्हण्यम यांना माहिती कोणी दिली हे सुमारे २५ वर्षे गुलदस्त्यात होते. २५ वर्षानंतर त्यावेळचे स्वीडीश पोलीस प्रमुख लिंडस्टार्म यांनी आपणच ही माहिती दिल्याचे प्रथमच पत्रकारांसमोर उघड केले. स्वीडन मध्ये यांनीच या प्रकरणाचा तपास केला होता. बोफोर्स मध्ये कमिशन दिले गेले असले तरी ते राजीव गांधी पर्यंत पोचले याचा कुठलाही पुरावा आढळून आला नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. इटलीचा शस्त्र दलाल क्वात्रोची गांधी परिवाराच्या जवळची व्यक्ती आहे या तर्काच्या आधारे राजीव गांधीचे नाव यात गोवण्यात आले आणि गांधी परिवार व बच्चन परिवार यांच्यातील घरोब्याच्या संबंधामुळे या प्रकरणात अमिताभ बच्चन व त्याच्या भावाचे नाव भारताच्या सीबीआयने १९९० साली गोवले असाही खुलासा माजी स्वीडिश पोलीस प्रमुखांनी केला. अमिताभ बच्चन मार्फत बोफोर्सचा पैसा राजीव गांधी पर्यंत पोचला असा त्यावेळी आरोप करणारे भाजपचे नेते आज अमिताभला आपल्या सरकारचा ब्रँड अँबेसेडर बनवितात. भाजपला अमिताभ बच्चनची क्लीनचीट मान्य आहे, राजीव गांधीची नाही ! भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा हा पुरावा आहे.                                       

त्यावेळी राजीव गांधीचे निकटवर्ती असलेले सध्याचे भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या मते भारताची रशिया कडूनच शस्त्र खरेदी करण्याची नीती होती. रशियाचा हा एकाधिकार मोडून राजीव गांधीनी बोफोर्सच्या निमित्ताने पश्चिमी देशांकडून शस्त्र खरेदीला सुरुवात केल्याने बोफोर्सचा वाद पेटविण्यात आला. या पेटलेल्या वादावर भाजप सतत आपली राजकीय पोळी भाजत आला आहे. मुळात राजीव गांधीनी संरक्षण साहित्यात मध्यस्थ नको ही भूमिका न घेता दलाली पद्धत चालू ठेवली असती तर दिल्या गेलेल्या दलालीवर आक्षेप घेण्याचे कारणच मिळाले नसते.                                  
बोफोर्स प्रकरणात राजीव गांधीना लक्ष्य केल्याचे राजकीय लाभ गेल्या ३०-३२ वर्षात मिळत आल्यानेच त्याच धर्तीवर ऑगस्टा वेस्टलैंड हेलिकॉप्टर घोटाळा नव्याने पेटविण्याचा आणि त्यात सोनिया गांधीचे नांव यावे यासाठी मोदी सरकार का जंग जंग पछाडत आहे हे लक्षात येईल. राजकारण म्हणून तसे करण्यात वावगे नसेलही. पण भाजपने प्रत्येक संरक्षण सौद्यावर प्रश्नचिन्ह उभे केल्याने लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम होत नाही, संरक्षण सिद्धतेवर परिणाम होत नाही आणि त्यामुळे पाकिस्तानला लाभही मिळत नसेल तर भाजप विरोधकांनी संरक्षण सौद्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवले तर संरक्षण दलाच्या मनोधैर्यावर आणि संरक्षण सिद्धतेवर कसा परिणाम होतो आणि त्यामुळे पाकिस्तानला कशी मदत होते हे प्रधानमंत्र्याने आणि भाजपने जनतेला सांगितले पाहिजे.                

बोफोर्स मध्ये जे घडले जवळपास तसेच ऑगस्टा वेस्टलैंड हेलिकॉप्टर सौद्यात घडले आहे. राष्ट्रपती सारख्या अतिमहत्वपूर्ण व्यक्तींसाठी खास हेलिकॉप्टरची गरज वायूदलाने संरक्षण मंत्रालयाला सूचित केली त्यावेळी अटलबिहारी यांचे सरकार होते. सरकारकडून निविदा काढण्यात आल्या. निविदात ज्या प्रकारचे हेलिकॉप्टर पाहिजे होते ते फक्त फ्रांसच्या कंपनीचे होते. ते न घेता अटल सरकारचे संरक्षण सल्लागार असलेल्या ब्रिजेश मिश्रांनी संरक्षण मंत्रालयाला पुन्हा निविदा काढायला सांगितले. पण पुढे काही होण्यापूर्वीच अटल सरकार गेले आणि मनमोहन सरकार आले. मनमोहन काळात हा व्यवहार पूर्ण झाला. त्यावेळी संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी होते. दुसऱ्या निविदा मध्ये इटलीच्या ऑगस्टा वेस्टलैंडला पसंती देण्यात आली.बोफोर्स सौद्यात दलाल नको ही राजीव गांधीनी घेतलेली भूमिका कायम ठेवत मनमोहन सरकारने संरक्षण साहित्य खरेदी करण्याची रीतसर नियमावली व प्रक्रिया निश्चित केली.             

ज्या कंपन्यांच्या निविदा स्विकारण्यात आल्या त्यांना लाच दिली जाणार नाही अशी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले. अशी हमी देण्यास रशियन कंपनीने नकार दिला आणि निविदा प्रक्रियेतून माघार घेतली ! उरलेल्या २ कंपन्याच्या हेलिकॉप्टर चाचणी नंतर वायुदलाने ऑगस्टा वेस्टलैंड कंपनीचे हेलिकॉप्टर निवडले आणि २०१० मध्ये करार झाला. २०१२ मध्ये ३ हेलिकॉप्टर आले देखील. पण २०१३ साली या व्यवहारात कंपनीने दलालांना पैसे दिल्याचे उघड झाले. वायुदल प्रमुख राहिलेल्या त्यागींच्या जवळच्या नातेवाइकानी एक कंपनी बनविली होती व या कंपनीला दलालीचा पैसा मिळाल्याचा व मिशेल मार्फत सत्ताधाऱ्यांना पैसा दिल्याचा आरोप झाला आणि पुन्हा बोफोर्स सारखी चौकशीची, कारवाईची प्रक्रिया सुरु झाली. मोदी सरकार येण्यापूर्वी काय कारवाई झाली आणि मोदी सरकार आल्या नंतर काय कारवाई झाली हे पुढच्या लेखात पाहू.
----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८  

Wednesday, February 6, 2019

संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचार : भाजपची दुटप्पी भूमिका -- ४


राफेल प्रकरणी कोणतीही चौकशी होवू न देता मोदीजीना निर्दोष घोषित करायचे आणि सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जात राजीव गांधी निर्दोष ठरले ते मात्र मान्य करायचे नाही. हा भाजपचा दुटप्पीपणा नाही का?
--------------------------------------------------------------------------
   
बोफोर्स सौद्यात मध्यस्थाना स्वीडिश कंपनीकडून मोठी रक्कम दिल्या गेल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याने राजीव गांधी यांनीच सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. बोफोर्स प्रकरणात उठलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी सरकारचा बळी गेला आणि डाव्या-उजव्यांच्या पाठींब्यावर विश्वनाथप्रताप सिंग प्रधानमंत्री झाले. बोफोर्स सौदा झाला तेव्हा सिंग राजीव गांधी मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते. विश्वनाथप्रताप सिंग यांनी धीरूभाई अंबानी , अमिताभ बच्चन या सारख्या दिग्गजाच्या घरांवर धाडी टाकायला लावल्याने त्यांना अर्थमंत्री पदावरून दूर करण्यासाठी राजीव गांधी यांचेवर दबाव आला. राजीव गांधीनी त्यांची रवानगी संरक्षण मंत्रालयात केली. पुढे मंत्रिमंडळ बैठकीत मतभेद झाल्याने संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देवून सिंग मंत्रिमंडळ व कॉंग्रेस बाहेर पडले. बोफोर्स वादळ सुरु असताना या घडामोडी घडल्याने याचा संबंध बोफोर्स व्यवहाराशी जोडल्या गेला. सार्वत्रिक निवडणुकीत सिंग यांनी बोफोर्स मुद्दा उचलल्याने हा समज आणखी दृढ झाला. प्रधानमंत्री पद गेल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या राजीनाम्याचा बोफोर्सशी संबंध नव्हता तर दुसऱ्याच एका व्यवहारा संदर्भात मतभेद झाल्याने आपण राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले होते. ते काहीही असले तरी राजीव गांधी काळात सुरु झालेल्या सीबीआय चौकशीची परिणती विश्वनाथप्रताप सिंग यांचे काळात बोफोर्स प्रकरणात एफ आय आर दाखल करण्यात झाला.


राजीव गांधी विरोधात बोफोर्स मुद्द्याचा वापर करून प्रधानमंत्री बनलेल्या व्हि.पी.सिंग यांच्या राजवटीत २२ नोव्हेंबर १९९० मध्ये दाखल एफआयआर मध्ये राजीव गांधी किंवा अन्य कोणी करारासाठी पैसे घेतल्याचा उल्लेखही नव्हता. करारात मध्यस्थ असणार नाहीत हे ठरले असताना बोफोर्स कंपनीने मध्यस्थाना पैसे दिले आणि भारताची फसवणूक केली हा मुख्य मुद्दा होता. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनी अटलबिहारी प्रधानमंत्री असताना १९९९ मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर एक वर्षाने २००० साली पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या दोन्ही आरोपपत्रात राजीव गांधीवर कोणतेही दोषारोपण नव्हते. किंबहुना कोणी लाच घेतली हा मुद्दाच नव्हता. मुद्दा वर सांगितला तोच होता. बोफोर्स कंपनीने भारत सरकारची फसवणूक केली. आरोपी बनविण्यात आले होते ते बोफोर्सचे अधिकारी आणि कंपनीने ज्या दलालांना पैसे दिले त्यांना. बोफोर्स प्रकरणी एफआयआर दाखल करणे, आरोपपत्र दाखल करणे हे काम कॉंग्रेस विरोधी राजवटीत होवूनही त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राजीव गांधीचा संबंध जोडण्यात आला नाही. ज्यांच्या कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले त्या न्यायधीशानी वृत्तपत्रात जे छापून येत होते त्या आधारे नोव्हेंबर २००२ मध्ये राजीव गांधीना सुद्धा आरोपी बनविण्याचा आदेश दिला. प्रधानमंत्री राजीव गांधी आणि ज्यांच्या नेतृत्वात वाटाघाटी झाल्यात ते संरक्षण खात्याचे सचिव भटनागर यांचेवर पदाचा दुरुपयोग करून फ्रांस कंपनीची तोफ कमी किंमतीत पडत असताना बोफोर्सची तोफ खरेदी करून सरकारचा तोटा केल्याचा आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणात राजीव गांधींचा आरोपी म्हणून असा समावेश झाला ! खटला चालविणाऱ्या न्यायाधीशानेच राजीव गांधींचा आरोपी म्हणून समावेश केल्यावर अटलबिहारी सरकारच्या ताब्यातील सीबीआयने व सरकारी वकिलांनी राजीव गांधी दोषी असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. पण दिल्ली हायकोर्टाने खालच्या कोर्टावर आणि सीबीआय वर ताशेरे ओढत राजीव गांधी आणि त्यावेळचे संरक्षण सचिव भटनागर यांचे विरूद्धचे आरोप रद्द केले.

हा निकाल देताना राजीव गांधी यांच्या संदर्भात हायकोर्टाने म्हंटले होते,” माध्यमांनी खटला चालवून न्याय-निवाडा करून एखाद्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबियाची कधीही भरून न निघणारी हानी करण्याच्या दुष्टपणाचे बोफोर्स हे ज्वलंत उदाहरण आहे. रीतसर खटला चालविल्या शिवाय एखाद्याची नाचक्की करून त्याच्यावर दोषी असल्याचा शिक्कामोर्तब करण्याचा प्रकार न्यायव्यवस्थेलाच आव्हान आहे.” निकालात सीबीआय वर तर बरेच ताशेरे आहेत. विशेष म्हणजे हा निकाल अटलबिहारी प्रधानमंत्री असताना लागला आणि हायकोर्टाच्या या निकालाला त्यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले नाही ! खरे तर राजीव गांधी संदर्भातील बोफोर्सची चर्चा इथेच थांबायला हवी होती. भाजपने तसे होवू दिले नाही. बोफोर्स प्रकरण जीवंत ठेवण्यासाठी मोदी सरकारने २०१८ मध्ये बोफोर्स प्रकरणातील हायकोर्टाच्या एका निवाड्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. ज्या निवाड्याला मोदी सरकारने आव्हान दिले तो निवाडा राजीव गांधी यांना आरोपमुक्त करणारा निवाडा नाही. राजीव गांधीना आरोप मुक्त करणारा २००४ सालचा आहे. मोदी सरकारने आव्हान दिले तो निवाडा होता २००५ सालचा. या निवाड्यात बोफोर्स कंपनीसाठी काम करणाऱ्या विन चढ्ढा सारख्या मध्यस्थांवरील खटला उच्च न्यायालयाने पुराव्या अभावी रद्द केला होता. या २००५ सालच्या निवाड्या विरुद्धचे भाजप कार्यकर्ता असलेल्या वकिलाने आधीच सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले आहे. उद्या समजा सुप्रीम कोर्टाने २००५ सालच्या निवाड्यावर विचार करायचा ठरविले तरी त्यामुळे आधीचा राजीव गांधीना आरोपमुक्त करणारा निकाल बदलणार नाही. असे असताना राजीव गांधीना दोषी म्हणत राहायचे आणि राफेल प्रकरणात कोणतीही चौकशी होवू न देता मोदीजी निर्दोष आहेत असे रेटून सांगायचे हा भाजपचा दुटप्पीपणा नाही का ?

--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८      



Wednesday, January 16, 2019

संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचार : भाजपची दुटप्पी भूमिका -- ३

बोफोर्सने लष्करी अधिकारी, मुलकी अधिकारी व सत्ताधारी नेते यांना लाच देवून हे कंत्राट मिळविल्याचा आणि खुद्द राजीव गांधी यांचेकडे अंगुलीनिर्देश होत असतानाही राजीव गांधीनी संयुक्त संसदीय समिती मार्फत बोफोर्स व्यवहाराची चौकशी करायला विरोध केला नाही.
---------------------------------------------------------------------------
बोफोर्स तोफांच्या सौद्यात दलाली दिल्या गेल्याचा आरोप स्वीडिश रेडीओ वरून होताच याची सर्वात आधी चौकशी स्वीडिश ऑडीट ब्युरो कडून झाली. कंपनीचे कागदपत्रे पाहून आणि कंपनी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण ऐकून स्वीडिश ऑडीट ब्युरोने या सौद्यात कंपनीने तीन कंपन्यांना मोठी रक्कम दिल्याचे नमूद केले. यात कंपनीचा पूर्वीचा भारतीय एजंट असल्याचे पण म्हंटले. ही रक्कम जवळपास ६४ कोटीची होती. ही रक्कम एकूण सौद्याच्या २ ते ३ टक्के असल्याचे ब्युरोने आपल्या अहवालात स्पष्ट केले. हा अहवाल आल्या नंतर स्वीडन आणि भारतात वादळ उठले. स्वीडन प्रधानमंत्री यांनी सौद्यात दलाल असणार नाही याची काळजी घेण्याचे वचन दिले होते यामुळे तिकडे ते अडचणीत आले तर दलालीचा संबंध सत्ताधाऱ्यांशी जोडण्यात आल्याने इकडे प्रधानमंत्री राजीव गांधी अडचणीत आले.            
ऑडीट ब्युरो अहवाल आल्यानंतर स्वीडन सरकारने स्वीडिश अभियोगकर्त्याला (प्रॉसिक्युटर) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत बोफोर्स तोफा बनविणाऱ्या नोबल कंपनीने स्वीस बँकेत जमा करण्यात आलेली रक्कम ही दलालीची किंवा लाच देण्यासाठी नव्हती तर भारत सरकारने सौद्यात दलाल नको ही अट घातल्याने आधीच्या दलाल कंपन्याशी झालेला करार गुंडाळण्यासाठी नुकसानभरपाई म्हणून दिलेली रक्कम आहे. कंपनीची ही भूमिका चुकीची नसल्याचे स्वीडनच्या अभियोगकर्त्याने मत नोंदविले. अशा प्रकारची रक्कम देवून कंपनीने स्वीडनच्या कोणत्याही कायद्याचा भंग किंवा भ्रष्टाचार केल्याचा किंवा सौदा होण्यासाठी अवैध मार्गाचा वापर करून प्रभाव पाडला नसल्याचा निर्वाळा दिला.           

बोफोर्स कंपनीने सदर कंपन्याशी जे करार केले होते ते गोपनीयतेचे कारण पुढे करत उघड केले नाही. तसेच स्वीस बँकेत रक्कम जमा करण्यात आल्याने बँकेच्या गोपनीयतेच्या नियमांमुळे याचे नेमके लाभार्थी कोण हे पुढे येणे शक्य नव्हते. स्वीडन मध्ये चौकशी करणाऱ्या अभियोगकर्त्याच्या निर्वाळ्या नंतरही ६४ कोटी रकमेचा वाद शमला नाही तो या गोपनीयतेच्या नियमामुळे. या चौकशी नंतर स्वीडन सरकार पुरता हा प्रश्न निकाली निघाला असला तरी भारतात बोफोर्स प्रश्नाने उग्र चर्चेचे रूप धारण केले. स्विस बँकेत रक्कम जमा करण्यात आली त्यात ‘लोटस’ नावाने एक खाते होते. लोटस म्हणजे कमळ आणि राजीव या शब्दाचा अर्थ कमळ असा बादरायण संबंध जोडत राजीव गांधी यांचे नाव यात जोडल्या गेल्याने भारतातील राजकारणाचा पारा चढला नसता तरच आश्चर्य. भारतात काय घडले याचा आता आढावा घेवू.

बोफोर्स कंपनीने लष्करी अधिकारी, मुलकी अधिकारी व सत्ताधारी राजकीय नेते यांना लाच देवून हे कंत्राट मिळविल्याचा आरोप झाल्याने आणि बोफोर्स कंपनीने स्विस बँकेत ३ कंपन्याच्या नावे ६४ कोटी रुपये जमा केल्याची पुष्टी स्वीडिश ऑडीट ब्युरोच्या अहवालाने केल्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरण शांत करण्यासाठी आणि सत्य शोधण्यासाठी राजीव गांधी सरकारने संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली. या समितीला सीबीआयसह सर्व तपास संस्थांची मदत घेण्याचे अधिकार देण्यात आले. संयुक्त संसदीय समितीने सप्टेंबर १९८७ मध्ये आपले काम सुरु केले आणि एप्रिल १९८८ मध्ये आपला अहवाल सादर केला. समितीने कराराची छाननी केली. स्वीडिश रेडीओच्या आरोपानंतर दोन देशाच्या सरकारात झालेला पत्रव्यवहार तपासला. कराराशी संबंधित अधिकाऱ्यांच्या साक्षी काढल्या , बोफोर्स अधिकाऱ्यांच्या उलट तपासण्या घेतल्या. स्वीडन चौकशीचे अहवाल तपासले. सीबीआय व इतर तपास संस्थाना तपासात काय आढळले याचा विचार केला आणि बोफोर्सला ६४ कोटी रुपया संबंधी सर्व माहिती उघड करण्यास बाध्य करता येईल का ही कायद्याची बाजू तपासली. म्हणजे संयुक्त संसदीय समितीने आपल्या परीने सत्य शोधून काढण्याचे सर्व प्रयत्न करून निष्कर्ष काढला असे म्हणता येते.

संरक्षण साहित्याची खरेदी करण्यासाठी जी निर्धारित प्रक्रिया आहे त्याचे कुठेही उल्लंघन झाले नाही, तांत्रिक आणि आपल्या गरजेच्या आधारावरच सेना दलाने बोफोर्स तोफांना पसंती दिली, या पसंतीमागे कोणतेही आर्थिक हितसंबंध नव्हते. कमीतकमी किंमतीत हा सौदा पदरात पाडून घेण्यात वाटाघाटी करणारी समिती यशस्वी झाली व या सौद्यात कोणीही मध्यस्थ नव्हता असे निष्कर्ष काढले. कंपनीने पूर्वी दलाल कंपन्याशी जे करार केले होते ते मोडीत काढण्यासाठी मोबदला म्हणून दिलेल्या ६४ कोटी रुपयाबाद्द्ल कंपनी गोपनीयतेचे कारण देत माहिती देत नसली तरी स्वीडन मधील सार्वजनिक हिशेब तपासनीस संस्थेने भारताशी झालेल्या करारा संदर्भात कंपनीचे ऑडीट करून जे प्रमाणपत्र दिले त्यानुसार यात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही याची पुष्टी होते संसदीय समितीने स्पष्ट केले. समितीने आपला हा अहवाल सादर केल्या नंतरही बोफोर्सचा वाद थांबला नाही ही गोष्ट वेगळी. समितीत कॉंग्रेस खासदारांचे बहुमत होते हे खरे. आज संसदेत मोदी सरकारचे बहुमत आहे आणि राफेल वर संयुक्त संसदीय समिती बनविली तर त्यात प्रमाणशीर प्रतिनिधी तत्वानुसार भाजप खासदारांचे बहुमत असणार आहे. तरीही भाजप संयुक्त संसदीय समिती करवी राफेल व्यवहाराची चौकशी का करू देत नाही हा प्रश्न इथे उपस्थित होतो. संयुक्त संसदीय समितीच्या अहवाला नंतर हा प्रश्न न्यायालयात कसा गेला आणि काय निकाल लागले हे पुढच्या लेखात.
 
----------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८  

Wednesday, January 9, 2019

संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचार : भाजपची दुटप्पी भूमिका -- २


शस्त्रास्त्राच्या खरेदीत दलालांमुळे भ्रष्टाचार तर होतोच शिवाय शस्त्रांच्या किंमती देखील वाढतात. हे लक्षात घेवून राजीव गांधी सरकारने शस्त्र खरेदी व्यवहारात दलाल असणार नाहीत हा निर्णय घेतला आणि त्यांच्यावरच दलाली घेतल्याचा आरोप चिकटला.
------------------------------------------------------



बोफोर्स तोफांच्या खरेदी पासून संरक्षण दलासाठीच्या शस्त्रास्त्र खरेदीतील भ्रष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला. शस्त्रास्त्र कंपनीचे दलाल वारेमाप पैसा खर्च करून सगळी सरकारी यंत्रणाच भ्रष्ट करतात आणि त्यामुळे खरेदी करायच्या अस्त्रांची किंमत सुद्धा अव्वाच्यासव्वा मोजावी लागते हे लक्षात घेवून तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी संरक्षण खरेदीत कोणत्याही दलालाची भूमिका असणार नाही असा अभूतपूर्व निर्णय घेतला. हा निर्णय घेतला तेव्हा स्वीडन कंपनीच्या बोफोर्स तोफांच्या खरेदी विषयी वाटाघाटी सुरु होत्या. राजीव गांधी सत्तेत येण्या आधी पासूनच वाटाघाटी सुरु होत्या पण इंदिराजीची हत्या आणि त्यानंतर नव्या सरकारच्या सत्तेत येण्याने यात काही काळ खंड पडला होता. पुन्हा जेव्हा वाटाघाटी सुरु झाल्या तेव्हा त्या वाटाघाटीतून कंपन्यांच्या दलालांना बाद करण्यात आले होते. पण त्यापूर्वीच्या वाटाघाटीत दलाल आणि त्यांच्या कंपन्या कार्यरत होत्या. राजीव गांधीनी दलाल पद्धती बंद केल्यानंतर पुन्हा वाटाघाटी सुरु करण्यापूर्वी सौद्यात कोणी दलाल असणार नाही याची संबंधित कंपन्यांकडून लेखी हमी घेतली. हमीचा भंग झाला तर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी देखील ताकीद देण्यात आली होती. अशा प्रकारच्या दलालीमुळे वाढलेली किंमत कमी करण्यात यावी अशी देखील भारताकडून मागणी करण्यात आली. किंमतीच्या वाटाघाटीच्या वेळी तसा आग्रहही धरण्यात आला.

सुरुवातीला सेना दलाने स्वीडनची बोफोर्स तोफइंग्लंडची आय एम एस तोफफ्रांसची सोफमा आणि ऑस्ट्रीयाची अल्पाईन अशा ४ देशांच्या तोफांची चांचणी घेतली. शेवटी सेनादलाच्या पसंतीला स्वीडनची बोफोर्स तोफ आणि फ्रांसची सोफमा तोफ उतरली. संरक्षण मंत्रालयाने ज्याच्याकडून स्वस्त मिळेल त्याच्याकडून खरेदी करण्याचा निर्णय घेवून एकाच वेळी या दोन्ही कंपन्याशी वाटाघाटी सुरु ठेवल्या. संरक्षण मंत्रालयातील अधिकारी आणि लष्करी अधिकारी यांचा समावेश असलेली चमू वाटाघाटी करीत होती. करार पदरी पाडून घेण्यासाठी दोन्ही कंपन्यात चुरस असल्याने दोन्हीही कंपन्यांना आपल्या किंमती बऱ्याच खाली आणाव्या लागल्या. यात बोफोर्सने बाजी मारली. स्वीडनच्या कंपनीशी १४३८ कोटी रुपयात ४०० तोफा खरेदी करण्याचा करार झाला. बोफोर्सशी सौदा झाल्या नंतर भारतातील प्रतिनिधीच्या हवाल्याने स्वीडन रेडीओ वरून एक वृत्त प्रसारित झाले त्यात बोफोर्स तोफा बनविणाऱ्या कंपनीने दलाला मार्फत लष्करी अधिकाऱ्यांना, नोकरशहांना आणि कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना लाच देवून हा सौदा केल्याचा आरोप केला आणि इथून 'बोफोर्स घोटाळ्याचीचर्चा सुरु झाली ती अजून सुरूच आहे.  



स्वीडन रेडीओच्या आरोपानंतरचा घटनाक्रम पाहणे आवश्यक आहे. त्यावरून राजीव गांधी सरकारची बोफोर्स आरोपाप्रकरणी प्रतिक्रिया व कृती आणि मोदी सरकारची राफेल आरोपानंतरची प्रतिक्रिया आणि कृती याची तुलना करता येईल. २४ मार्च १९८६ ला बोफोर्स तोफा खरेदीचा करार झाला. त्याआधी १० मार्च १९८६ ला बोफोर्स कंपनीने या करारात दलाल असणार नाहीत याची लेखी हमी दिली. करार झाल्यावर एक महिन्याच्या आतच १६ एप्रिल १९८६ रोजी स्वीडन रेडीओने हा करार पदरात पाडून घेण्यासाठी दिल्लीस्थित दलाला मार्फत सुमारे ६० कोटीची लाच वाटल्याचा आरोप प्रसारित केला. आरोप झाला तेव्हा संसद चालू होती. राफेलच्या बाबतीत जसे फ्रांस सरकारकडून आणि कंपनी कडून स्पष्टीकरणे येत असतात किंवा सांगितले जातात तसेच त्यावेळी स्वीडन सरकार व बोफोर्स कंपनीची स्पष्टीकरणे येत होती व संसदेतील चर्चे दरम्यान संसदे समोर मांडली जात होती. राफेल आणि बोफोर्स कडून आलेल्या स्पष्टीकरणात फरक एवढाच आहे कि, राफेलची स्पष्टीकरणे न मागता येताहेत आणि बोफोर्सच्या बाबतीत भारताचा पवित्रा स्वीडन सरकार व स्वीडिश कंपनीकडे जाब विचारण्याचा होता. कारण स्वीडिश रेडीओने दिलेल्या बातमीनुसार त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या आश्वासनाचा भंग झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत होते.
           


स्वीडनचे त्यावेळचे पंतप्रधान पामे यांनी कंपनीशी करार करण्या आधी करारात कोणी मध्यस्थ असणार नाही याची काळजी घेण्याची राजीव गांधी यांनी विनंती केली होती आणि आपण बोफोर्स कंपनीला तशी काळजी घेण्यास सांगितले होते असा खुलासा केला. स्वत: राजीव गांधीनी दलालाच्या बाबतीत आपली काय भूमिका होती आणि ती स्वीडन सरकार व बोफोर्स कंपनीला कळवून त्यांच्याकडून तसे आश्वासन मिळविल्याचे संसदेला सांगितले. याउपरही असे घडले असेल तर त्याची चौकशी केली जाईल व दोषींवर कारवाई केली जाईल हे संसदेत सांगितले. दरम्यान स्वीडन मध्ये यासंबंधी झालेल्या चौकशीत ३ कंपन्यांना पैसा दिल्याचे निष्पन्न झाले. हा पैसा दलाली होती का आणि कोणा भारतीयाचा ती दलाली मिळण्याशी संबंध आहे का याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. एवढेच नाही तर या प्रकरणी काही चुकीचे घडले का याच्या सर्वंकष तपासासाठी संसदेची संयुक्त चौकशी समिती नेमण्यात आली होती. स्वीडनची तपास संस्थां, सीबीआय व संयुक्त संसदीय समिती अशा तीन संस्थाकडून या व्यवहारात दलाली दिल्या गेली का याची चौकशी झाली. चौकशीत काय निष्पन्न झाले ते पुढच्या लेखात बघू. इथे एवढेच लक्षात घेतले पाहिजे कि आरोप झाल्या नंतर असे काही घडलेच नाही, चौकशीची गरज नाही अशी भूमिका राजीव गांधी सरकारने घेतली नव्हती.
-------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८

Friday, January 4, 2019

संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचार : भाजपची दुटप्पी भूमिका -- १


बोफोर्स प्रकरणात भारतीय न्यायालयाने आणि ऑगस्टा हेलिकॉप्टर प्रकरणात इटलीच्या न्यायालयाने क्लीनचीटदिलेली असतांना अजूनही त्या प्रकरणांना हवा देत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेत्यांना राफेल प्रकरणी अर्धवट क्लीनचीटमिळालेल्या निकालावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे असे वाटते. 
----------------------------------------------------------------------

राफेल विमान सौद्यावर याच स्तंभात लिहिलेल्या ‘राफेल घोटाळ्याचे परिस्थितीजन्य पुरावे’ या लेख मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या भागात (देशोन्नती,११ नोव्हेंबर २०१८) मी लिहिले होते, “...सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक व्यवहारासह सौदा निर्धारित नियमानुसार आणि निर्धारित चौकटीत झाला की नाही याची माहिती मागविल्याने प्रधानमंत्र्याच्या अडचणीत भर पडली आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित प्रक्रियेचे पालन झाल्याचा निष्कर्ष काढला तरी आर्थिक व्यवहाराची चर्चा मोदींची पाठ सोडणार नाही. बोफोर्सची चर्चा काहीही सिद्ध न होवून देखील कॉंग्रेसची पाठ सोडायला तयार नाही तसेच राफेलच्या बाबतीत घडणार असे आजची परिस्थिती दर्शविते. प्रधानमंत्री मोदी आणि भाजपसाठी राफेल हे दुसरे बोफोर्स ठरणार आहे.” गेल्या आठवड्यात संसदेत राफेलवर जो गोंधळ,वादंग आणि चर्चा झाली त्यावरून मी वर्तविलेल्या भाकिताची पुष्टीच झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतरही राफेल वाद मोदी आणि त्यांच्या सरकारचा पिच्छा सोडायला तयार नाही. मुळात सर्वोच्च न्यायालयाचा निकालच वादग्रस्त ठरला. ‘कॅग’ने राफेल विमानाच्या किंमती संबंधीचे ऑडीट केले असून त्याचा अहवाल लोकलेखा समिती व संसदेला सादर केला असल्याचे सांगत किंमतीच्या वादात शिरण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाचे हे प्रतिपादन सरकारने बंद लिफाफ्यात जी माहिती सादर केली त्या आधारे होते. असा कोणताही अहवाल सादर झालेलाच नसल्याने या निकालाने सर्वोच्च न्यायालय तोंडघशी पडले आणि सरकारची शोभा होवून संशयाचे निराकरण होण्या ऐवजी संशय वाढला. बंद लिफाफ्यात आपण तसे काही सांगितले नव्हते, न्यायालयाने चुकीचा अर्थ काढला असा ठपका सुरवातीला सरकारने न्यायालयावरच ठेवला. नंतर टाईप करण्यात ती झालेली चूक होती अशी सारवासारव करून सरकारने निकालात दुरुस्तीसाठी अर्ज दिला आहे.                                                        

न्यायालय आता आपल्या निकालात काय बदल करते हा आता औत्सुक्याचा विषय आहे. यातून एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली. राफेल विमानाची किंमत ५०० कोटीवरून १६०० कोटी कशी झाली हा या प्रकरणातील प्रमुख वादग्रस्त मुद्द्यावर न्यायालयाने भाष्य करायचे टाळले. न्यायालयाने सौदा करताना निर्धारित प्रक्रियेचे पालन झाले की नाही हे बघितले आणि “थोडे फार इकडे तिकडे झाले” असले तरी सर्वसाधारणपणे प्रक्रियेचे पालन केले गेले असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. यापूर्वी वादग्रस्त ठरलेले बोफोर्स व ऑगस्टांवेस्टलैंड सौदे नियमांच्या चौकटीतच झाले होते. बोफोर्स प्रकरणात भारतीय न्यायालयाने आणि ऑगस्टा प्रकरणात इटलीच्या न्यायालयाने ‘क्लीनचीट’ दिलेली असतांना अजूनही त्या प्रकरणांना हवा देत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेत्यांना राफेल प्रकरणी अर्धवट ‘क्लीनचीट’ मिळालेल्या निकालावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे असे वाटत आहे. इथेच भाजपची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते. राफेल संबंधी आरोपामुळे संरक्षण सिद्धतेवर परिणाम होत असून असे आरोप म्हणजे लष्कराला लांछन देणारे आहे असा आज साक्षात्कार झालेल्या भाजपने १९८६ पासून नेमके हेच केले आहे. भारताच्या संरक्षण सिद्धतेचे संतुलन बिघडण्यात भारतीय जनता पक्षाची गेल्या ३०-३२ वर्षातील आक्रस्ताळी भूमिका बऱ्याच अंशी कारणीभूत ठरली आहे. भाजपची भूमिका समजावून घेण्यासाठी बोफोर्स , ऑगस्टा हेलिकॉप्टर आणि राफेल या तिन्ही घोटाळ्यावर संक्षेपाने नजर टाकावी लागेल.

बोफोर्स आणि ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीच्या वेळी भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता तर राफेल खरेदी कराराच्या वेळी कॉंग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. सत्ताधारी आणि विरोधक म्हणून दोन पक्षांच्या भूमिकेत किती सुसंगती वा विसंगती आहे हे तिन्ही कराराच्या एकत्रित आढाव्यातून समोर येईल. बोफोर्स करारा वेळी नेमके काय घडले हे आता फारसे कोणाला माहित नाही आणि आठवतही नाही. एक मात्र नक्की आठवते. ते म्हणजे कमिशन तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांचे खात्यात जमा झाल्याची चर्चा होती. आणि अर्थात अशी चर्चा चालविण्यात आणि ‘गली गली मे शोर है , राजीव गांधी चोर है’ म्हणण्यात भाजप आघाडीवर होता. आज राफेल मध्ये कॉंग्रेस कडून मोदींच्या बाबतीत असेच बोलले जात आहे. तेव्हा करारातील वादाचे मुद्दे कोणते व संबंधितांची काय भूमिका राहिली हे समोर आले तर दोष कोणाच्या पारड्यात जातो हे कळायला मदत होईल. आधी बोफोर्स वर नजर टाकू. बोफोर्स घोटाळा कसा उद्भवला हे लक्षात घेतले तर अनेकांना आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही ! बोफोर्स तोफा खरेदी करण्याची चर्चा राजीव गांधी सत्तेत येण्या आधी पासून चालू होती. या चर्चेला वेगळे वळण मिळाले ते तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे ! जगभरात शस्त्रास्त्रांच्या व्यापारात मोठी आर्थिक उलाढाल होते आणि शस्त्र-अस्त्र निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धाही प्रचंड आहे. कंपन्यांनी आपले एजंट नेमले आहेत आणि त्यांच्या मार्फत पैसे पेरून कंत्राट मिळविण्याचा फंडा सर्वच कंपन्या वापरतात. अशा प्रकारे मध्यस्था मार्फत सौदे करण्याला आपल्याकडेही रीतसर मान्यता होती. राजीव गांधीनी मात्र ही पद्धत मोडीत काढून शस्त्रास्त्रांच्या खरेदीत दलालांची भूमिका राहणार नाही असा निर्णय घेतला. हाच निर्णय राजीव गांधीसाठी कसा गळफास ठरला हे पुढच्या लेखात बघू.
---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८


Sunday, December 23, 2018

सत्ताधारी आणि विरोधकांनी शिकण्यासारखे बरेच काही


२०१४ ची निवडणूक मोदीजीनी एकहाती जिंकून दिली असली तरी २०१९ ची निवडणूक त्यापद्धतीने जिंकून देण्याच्या स्थितीत ते नाहीत हे या निकालांनी स्पष्ट केले आहे. धृविकरणाचा त्याग आणि सामुहिक नेतृत्वाच्या पुनर्स्थापनेची गरज निवडणूक निकालाने स्पष्ट केली आहे.
---------------------------------------------------------------------------

प्रत्येक निवडणूक ही पराभूतांसाठी धडा असते. नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांनी पराभूतांसोबत विजेत्यानाही धडे दिले आहेत. अर्थात हे धडे जो अधिक विनम्र त्याला अधिक समजतील असे आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपला निवडणूक निकालापासूनचे धडे शिकायला जड जाणार आहे. कारण गेल्या चार वर्षात सत्ताधारी भाजपचे वागणे चढत्या क्रमाने उन्मादी राहिले आहे. ५० वर्षापेक्षा अधिक काळ सत्तेत राहूनही कॉंग्रेसने आणीबाणीचा अपवाद वगळता सत्तेची मस्ती कधी दाखवली नाही ती या चार वर्षात जनतेने बघितली. आणीबाणीचा मस्तवालपणा कॉंग्रेसला इतकी महाग पडली की पक्षाचे मूळ स्वरूप आणि वैभव पुन्हा कधीच प्राप्त झाले नाही. भाजपच्या बाबतीतही आता हाच धोका असल्याचे या निवडणूक निकालांनी दाखवून दिले आहे. भाजप उन्मादाच्या एवढ्या शिखरावर पोचला आहे की विनम्रतेच्या धरातलावर येवून आपण काय होतो आणि काय झालो हे समजून घेईल की नाही याबाबत शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. सिनेअभिनेता नसिरुद्दीन शाह याच्या ताज्या वक्तव्यावर पक्ष कार्यकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया या शंकेची पुष्टी करणाऱ्या आहेत. या राजवटीत असुरक्षित वाटते असे कोणाला वाटत असेल तर सत्ताधारी या नात्याने ते समजून घेवून त्याच्या मनातील भीती दूर करणे हे कर्तव्य ठरते. हे कर्तव्य पार पाडण्या ऐवजी सत्ताधारी पक्षाकडून अधिक भीती घालण्याची ४ वर्षापासून सुरु झालेली परंपरा ५ राज्याच्या निवडणुकात दणका बसूनही खंडित झालेली नाही हेच यातून सिद्ध होते. या प्रकरणात नेहमीप्रमाणे कार्यकर्ते अद्वातद्वा बोलत असले तरी नेहमी प्रमाणे भाजपच्या नेत्यांनी यावेळी आगीत तेल ओतण्याचे काम केले नाही ही जमेची बाजू आहे. भाजप नेते निवडणूक निकालातून शिकू लागलेत असा याचा अर्थ होतो.
  

केवळ प्रधानमंत्री मोदीचा करिष्मा आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे नियोजन या बळावर निवडणुका जिंकण्याचे दिवस संपले आहेत हा या निवडणुकांनी भाजपला दिलेला संदेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाणे या निवडणुकीत भाजपने चालवून पाहिले. ‘तुमचा अली, आमचा बजरंग बली’ या प्रकारची दुहीची बीजे पेरण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांना वापरले पण फायदा झाला नाही. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने केरळ मधील साबरीमला मंदिराचा वाद पेटता ठेवला होता. त्या वादाचा भाजपला केरळ मधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात जसा फायदा झाला नाही तसा विधानसभा निवडणुकात सुद्धा फायदा झाला नाही. निवडणूक प्रचार जोरात असताना संघाने मैदानात उतरून राम मंदिराचा दिलेला हुंकारही भाजपच्या कामी आला नाही. याचा अर्थ आपले नेते आणि आपला धृविकरणाचा कार्यक्रम पुढे करून भाजपला लोकसभा निवडणुका जिंकता येणार नाहीत याची आगाऊ ताकीद मतदारांनी भारतीय जनता पक्षाला दिली आहे. प्रधानमंत्री मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाला फक्त निवडणूक जिंकण्याच्या यंत्राचे रूप दिले आहे. निर्णय प्रक्रियेत पक्ष कार्यकर्ते व पक्षाचे इतर नेते यांना स्थानच उरले नाही. पक्ष यंत्र बनला तर मेहनत खूप करेल पण मतदारांना भावनिक साद त्याला घालता येणार नाही.


भाजपमध्ये भावनिक साद घालणारा एकच नेता उरला आहे आणि तो म्हणजे प्रधानमंत्री मोदी. आणि आता याच नेत्याचा भावनिक साद लोकांच्या हृदया पर्यंत पोचत नसेल तर भाजपला लोकसभा निवडणूकीत विजय मिळविणे कठीण जाणार आहे. वेळीच पक्षाने सामुहिक नेतृत्वाकडे वळले पाहिजे आणि सामुहिक नेतृत्वाने पक्षात चैतन्य निर्माण केले तर आजच्या प्रतिकूलतेवर मात करता येईल. यापूर्वी अटलजी आणि अडवाणीजी भाजपचे सर्वोच्च आणि शक्तिशाली नेते होते. त्यांनी नेहमीच पक्षात विचार विनिमयाला आणि सामुहिक नेतृत्वाला वाव आणि स्थान दिले. याची आठवण पक्षाला आणि नेतृत्वाला या निकालांनी दिली आहे. आज शिखरस्थानी मोदी आणि शाह आहेत आणि भाजप मधून त्यांना मोठे समर्थनही आहे. पण हे समर्थन ते निवडणूक जिंकून देतात यासाठी आहे. पण आता परीस्थिती बदलल्याचे स्पष्ट संकेत विधानसभा निवडणुकीतून मिळाले आहेत. २०१४ ची निवडणूक मोदीजीनी एकहाती जिंकून दिली असली तरी २०१९ ची निवडणूक त्यापद्धतीने जिंकून देण्याच्या स्थितीत ते नाहीत हे या निकालांनी स्पष्ट केले आहे. धृविकरणाचा त्याग आणि सामुहिक नेतृत्वाच्या पुनर्स्थापनेची गरज निवडणूक निकालाने स्पष्ट केली आहे. भाजपा पुढे कशी वाटचाल करतो यावर पक्षाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.


कॉंग्रेससाठी सुद्धा मतदारांचा हाच संदेश आहे. लोकांचा भाजप आणि त्याच्या नेतृत्वाबद्द्लचा राग मतपेटीतून आजच्या पेक्षा मोठ्या स्वरुपात प्रकट होवू शकला असता. पण कॉंग्रेस खिळखिळी आणि विस्कळीत असल्याने कमी पडली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नेतृत्व विजय मिळवून देईल या आशेवर राहणे सोडून मेहनत घेतली तरच त्याला बरे दिवस येतील हे मतदानातून स्पष्ट झाले आहे. मोदीजी विरुद्ध राहुल गांधीना बळ मिळायचे असेल तर ‘असेल हरी तर देईल खाटेवरी’ या मानसिकतेतून कॉंग्रेसला बाहेर पडावे लागेल. बसपा-सपा सारख्या पक्षाच्या नेत्यानाही कॉंग्रेसला अडचणीत आणून त्यांचा फायदा होणार नाही हा धडा मिळाला आहे. यापासून धडा घेतील तेच लोकसभा निवडणुकीत यशस्वी होतील.
------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८



Friday, December 21, 2018

लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण


५ वर्षापूर्वी झालेल्या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकी या लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनल म्हणून लढल्या गेल्या तशाच आताच्या निवडणुकाही. लोकसभा निवडणुकीतील तुल्यबळ लढतीचा पाया या निवडणुकांनी रचला आहे.
-----------------------------------------------------------------------
  
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण जिंकले कोण हरले यापेक्षाही महत्वाचे काय घडले असेल तर भारतातील लोकशाही व्यवस्था अधिक बळकट झाली आहे. बळकट लोकशाहीसाठी बळकट सरकारापेक्षा बळकट विरोधी पक्ष असणे जास्त जरुरीचे असते. गेल्या चार वर्षात याच्या नेमकी उलटी परिस्थिती होती. कमजोर विरोधी पक्ष असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला या चार वर्षात मनमानी कारभाराला परवाना मिळाल्यासारखी स्थिती होती. सत्ताधारी पक्ष तर आपल्या विरोधात कोणी उभे राहणार नाही याची सतत तजवीज करीत आला होता. सरकारच्या धोरणावर , कार्यक्रमावर कोणी प्रश्न उपस्थित करायला गेला कि प्रश्नकर्त्याच्या अंगावर सरकार आणि मोदी समर्थकाच्या झुंडीचे आक्रमण ही नित्याची बाब झाली होती. सरकारच्या धोरण आणि कार्यक्रमाला विरोध करणाऱ्याला देशद्रोही ठरविण्याची सत्ताधारी पक्षातील नेत्यात आणि कार्यकर्त्यात स्पर्धा लागलेली असायची. विरोधी पक्षाची अवस्था बघता सत्ताधारी पक्षाला ५० वर्षे सत्ता उपभोगण्याची स्वप्ने पडू लागली होती. विरोधी पक्षात कोण आहे जो आम्हाला सत्तेतून खाली खेचू शकतो असा अहंकार आणि विरोधकाप्रती तुच्छ भाव सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून व्यक्त होताना पदोपदी दिसत होता.

सत्ताधारी पक्षाचा असा रोख विरोधकावरच होता असे नाही. घटनाकारांनी लोकशाही व्यवस्थेत सत्ता समतोल राखण्यासाठी आणि पारदर्शक निर्णय प्रक्रियेसाठी निर्मिलेल्या संस्था, त्यांना देण्यात आलेले अधिकार व स्वायत्तता ही देखील सत्ताधारी पक्षाच्या डोळ्यात विरोधका इतकीच खुपत होती. या संस्थाना जर्जर करणे, तिथे वकूब नसलेल्या होयबांची भरती करणे आणि त्या संस्थाना सरकारचे म्हणणे मानण्यासाठी दबाव टाकणे हे प्रकार वाढीस लागले होते. भारतीय रिझर्व्ह बँक हे याचे ठळक उदाहरण. देशाचे सर्वोच्च न्यायालय देखील सरकारच्या तडाख्यातून सुटले नाही. सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांच्या निवडीसाठीच्या शिफारसीना प्रतिसाद न देणे, शिफारसी बदलण्यासाठी दबाव आणणे हे सगळे प्रकार सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याचे दर्शवीत होती. विरोधकांना आणि सरकारवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थाना लाचार बनविले की आपल्यापुढे कोणाचेच आव्हान राहणार नाही ही सत्ताधारी पक्ष आणि सरकार मधील नेत्याची रणनीती राहिली आहे. या रणनीतीत एकच चूक राहिली आणि तीच सत्ताधारी भाजपला भोवली. जनतेला गृहीत धरण्याची चूक भाजप आणि मोदी सरकारने केली. विरोधक आहेतच कुठे त्यामुळे जनतेला तरी आपल्या मागे येण्याशिवाय कोणताच पर्याय नाही असे सत्ताधारी नेत्यांना वाटू लागले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते एक गोष्ट विसरले. ती म्हणजे या देशात विरोधी पक्ष कमजोरच राहात आला आहे. सत्ताधारी पक्ष जेव्हा जेव्हा उन्मत्त झाला तेव्हा तेव्हा विरोधी पक्षांनी नाही तर भारतीय मतदारांनी त्याला वेसण घातली , जमिनीवर आपटले. या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नेमके हेच काम केले आहे.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा सूर आणि नूर ५ वर्षापूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्याच्या निवडणुकांनी निश्चित केला होता. त्यावेळी मिझोरम सहित दिल्ली व राजस्थान या कॉंग्रेसशासित आणि मध्यप्रदेश व छत्तीसगड या भाजपशासित राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. दिल्ली आणि राजस्थान मध्ये कॉंग्रेसला सपाटून मार बसला होता. केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना १० वर्षापासून  भाजपच्या ताब्यात असलेली म.प्र. व छत्तीसगड ही राज्ये भाजपने मोठ्या फरकाने ही राज्ये पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींकडे प्रचाराची सूत्रे होती. तेव्हा मोदी आणि भाजपने दणदणीत विजय मिळवत आपल्या लोकसभा विजयाचा पाया रचला होता. उत्तरप्रदेश आणि बिहारसहित या तीन हिंदी भाषिक राज्यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना डोळे दिपवणारे यश मिळवून दिले होते. २०१८ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हे चित्र २०१४ पेक्षा उलटे झाले आहे.

त्यावेळी कॉंग्रेसकडून या स्थानिक प्रश्नावर लढल्या गेलेल्या राज्याच्या निवडणुका आहेत आणि लोकसभा निवडणुकाचे निकाल यापेक्षा वेगळे असतील अशी सारवासारव केली गेली होती. नेमकी अशीच सारवासारव आज भाजपकडून केली जात आहे ! मोदींचे नेतृत्व किंवा केंद्र सरकारची कामगिरी या निवडणुकीत पणाला नव्हती तर राज्याचे नेतृत्व आणि राज्याची कामगिरी यावर हा कौल असल्याचे आता भाजपकडून सांगितले जात आहे. त्यावेळी कॉंग्रेस जशी सत्याला सामोरे जायला तयार नव्हती तशीच भाजप आज तयार नाही एवढाच त्याचा अर्थ होतो. तेव्हा भाजपचे प्रचार प्रमुख असलेले नरेंद्र मोदी यांनी ती निवडणूक स्थानिक प्रश्न व स्थानिक नेतृत्वापासून दूर नेत मनमोहन सरकारच्या कारभाराशी जोडून लोकसभेची सेमीफायनल बनविली होती. या सेमी फायनलच्या विजयाने त्यांचा प्रधानमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आताही निवडणूक प्रचाराची धुरा आपल्याकडेच ठेवून आणि सगळा फोकस आपल्यावर राहील याची काळजी घेत कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर तोफा डागत केलेल्या प्रचाराने ही निवडणूक स्थानिक न राहता राष्ट्रीय बनली आणि आता या निवडणुकीकडे लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिले गेले तर ते वस्तुस्थितीला धरूनच होणार आहे. लोकसभेच्या या सेमी फायनल मध्ये राहुल गांधी आणि कॉंग्रेसने मोदी आणि भाजप यांचेवर मात केली आहे. त्यामुळेच लोकसभेसाठी तुल्यबळ लढतीचा पाया रचला गेला आहे. हेच लोकशाहीचे बळकटीकरण आहे.
--------------------------------------------------------------------- 
सुधाकर जाधव , पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८

Thursday, December 13, 2018

राजकीय समीकरण बदलवणारे निवडणूक निकाल

गुजरात आणि कर्नाटकच्या निवडणुकीने मोदी-शाह यांच्या निवडणूक जिंकून देण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राजस्थान, म.प्र. व छत्तीसगड निवडणुकीने हे प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.
-------------------------------------------------------------------------------

निवडणुकीला सामोरे गेलेल्या ५ राज्यांपैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन प्रदेशातील विधानसभा निवडणूकांचे भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या दोन प्रमुख पक्षासाठी अनन्य साधारण महत्व होते. इथे प्रामुख्याने या दोन पक्षात सरळ लढत असल्याने लोकसभा निवडणुकीत हे पक्ष किती ताकदीने एकमेकांसमोर उभे राहू शकतात याचा अंदाज येणार होता. या तीन राज्यात लोकसभेच्या ६५ जागा आहेत आणि सध्या ६२ जागा भाजपच्या ताब्यात असल्याने लोकसभेचा अंदाज येण्याच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या होत्या. भाजपच्या दृष्टीने या निवडणुकीचा उपयोग कॉंग्रेसचे आणखी खच्चीकरण करून राहुल गांधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करूच शकत नाही हे दर्शविण्या पुरता मर्यादित होता. काही महिन्यापूर्वी राजस्थानात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मार खाल्ला असल्याने राजस्थानचीच थोडीशी काळजी होती. पक्षाचा मोदींच्या प्रभावी प्रचारावर आणि पक्षाध्यक्ष अमित शाहच्या सूक्ष्म नियोजनावर भरवसा असल्याने राजस्थान मध्ये सुद्धा ही जोडी विजय मिळवील याची पक्षाला खात्री होती. राजस्थान व छत्तीसगड मधील विजयाबद्दल भाजपला १०० टक्के खात्री होती. राजकीय विश्लेषक व प्रसार माध्यमे ही खात्री चुकीची नसल्याचे सांगत होते. सर्वेक्षण आणि सट्टा भाजपचे पारडे जड असल्याची ग्वाही देत होते.                         

निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष जिंकण्याचा दावा करतात तसा दावा करण्या पलीकडे कॉंग्रेस जवळ ठोस सांगण्या सारखे काही नव्हते. भाजप आणि बरेच राजकीय विश्लेषक या विधानसभा निवडणुकांचे निकालच कॉंग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील आव्हान संपुष्टात आणेल याची खात्री देत होते. या पार्श्वभूमीवर समोर आलेले निकाल भाजपसाठी मोठा धक्का देणारे आणि अनेक राजकीय पंडीतासाठी आश्चर्यकारक ठरले. मुळात हा धक्का आणि आश्चर्य भाजपच्या प्रचाराचाच परिणाम आहे. आमचा विशेषत: नरेंद्र मोदींचा मुकाबला कोणी करू शकत नाही आणि पुढची अनेकवर्षे आमचेच राज्य राहणार आहे हे गुलाबी चित्र उभे करण्यासाठी माध्यमांना हाताशी घेवून जो प्रचार केला गेला त्याने भाजप कार्यकर्ते स्वत:च प्रभावित झालेत. मोदी आणि शाह त्यांना खरोखरच अवतार पुरुष वाटू लागले. आपले नेतृत्व अजेय असल्याच्या भावनेने ते एवढे प्रभावित होते कि पुढे काय वाढून ठेवले आहे हेच त्यांना दिसेनासे झाले. म्हणूनच हे निकाल भाजपसाठी , त्याच्या कार्यकर्त्यासाठी पचायला जड जात आहे. खरे तर प्रधानमंत्री मोदी आणि भाजपसाठी पुढे काय वाढून ठेवले आहे याचे संकेत बरेच आधीपासून मिळत होते. जे या स्तंभाचे नियमित वाचक आहेत त्यांना या संदर्भात काही लेखामधून केलेली चर्चा आठवत असेल त्यांना या विधानसभा निवडणूक निकालाचे आश्चर्य वाटणार नाही.

याची सुरुवातच गुजरात विधानसभा निवडणुकी पासून झाली होती. याच स्तंभात ‘अजेयतेची कवचकुंडले गुजरातने हिरावली’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात मी म्हंटले होते, ”आज पर्यंतच्या विजय मालिकांनी मोदींचा पराभव करणारा समर्थ नेताच अस्तित्वात नाही अशी जी धारणा बनली होती त्या धारणेला तडा देणारा भाजपचा गुजरात विजय ठरला ! एकप्रकारे हवेत चाललेला मोदीजींचा विजय रथ गुजरातच्या मतदारांनी जमिनीवर टेकवला. गुजरातच्या जनतेने आपल्या माणसाचापराभव केला नाही पण पराभव शक्य आहे हे दाखवून दिले. आकड्यांच्या पलीकडे गुजरात निवडणुक निकालाने जो चमत्कार केला तो हाच आहे. हा चमत्कारच भविष्यातील राजकारणावर प्रभाव टाकणारा आणि राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार आहे. ज्याला इंग्रजीत गेम चेंजरम्हणतात तो अर्थ सार्थ करणारा गुजरातचा निवडणूक निकाल आहे. .” भाजपला सावध करणारा हा निकाल होता. सावध व्हायचे म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी मोदीजीवर विसंबून चालणार नाही असे मानावे लागले असते. असे मानणे ना कार्यकर्त्यांच्या सोयीचे होते ना नेत्यांच्या. त्यामुळे गुजरातचा संदेश दुर्लक्षिला गेला. त्यानंतरच्या त्रिपुरा विजयाने तर कार्यकर्ते हुरळूनच गेले. जिथून लोकसभेचे फक्त २ खासदार येतात त्या विजयाचे एवढे ढोल बडविण्यामागे गुजरात विसरले जावे हे कारण देखील असू शकते. पण नंतरच्या कर्नाटक निवडणुकीने गुजरात सारखाच संदेश अधिक ठळकपणे दिला.

१९७८ नंतर कर्नाटकात राजस्थान प्रमाणेच दर पाच वर्षांनी सरकार बदलत आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सत्ता काबीज करणे निवडणूक जिंकण्याच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध असलेल्या मोदी-शाह या जोडीला अवघड नव्हते. तिथे बहुमत मिळविता आले नाही. तरीही सरकार बनविण्याच्या अट्टाहासाने भाजप नेतृत्वाने स्वत:चे हसे करून घेतले. एवढे होवूनही नेतृत्वाचे अपयश पक्षाला खटकले नाही. नेतृत्वावरचा आंधळा विश्वासच आत्ता निवडणूक झालेल्या भाजपशासित राज्यात बसलेल्या दणक्याला कारणीभूत आहे. मोदी-शाह यांचे भोवती विजयाचे वलय निर्माण करतांना एक गोष्ट सोयीस्कर विसरल्या गेली. विरोधी पक्षांची सरकारे सहज ताब्यात आली पण स्वत:च्या ताब्यातील सरकार कायम राखण्यात या जोडीची दमछाक झाली. गोव्यात सरकार बनले तरी निवडणुकीत पराभवच झाला होता. पंजाब राखता आले नाही आणि गुजरात कसेबसे राखता आले. पहिल्यांदा स्वत:च्या ताब्यातील मोठी राज्ये राखण्याची वेळ आली तर मोदी-शाह जोडी सपशेल अपयशी ठरली. ताज्या विधानसभा निकालाने मोदी-शाह केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यास समर्थ आहेत का याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. या निकालाचे काय परिणाम होवू शकतात याचा आढावा पुढच्या लेखात.
---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८


Thursday, December 6, 2018

सीबीआय : भरकटलेली सुनवाई सरकारच्या पथ्यावर


सर्वोच्च न्यायालयानेच वर्मा यांचेवरील आरोपाची चौकशी करणारा अहवाल नंतरच्या सुनावणीत गुंडाळून ठेवला आणि सुनावणी भरकटल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. 
-------------------------------------------------------------------------


सीबीआय वरील मागच्या लेखात म्हंटले होते कि, हा संघर्ष दोन अधिकाऱ्यात आहे असे चित्र उभे करण्यात येत असले तरी सीबीआय मधील आजची परिस्थिती मोदी सरकारच्या विशेषत: प्रधानमंत्री कार्यालयाच्या बेदरकार कार्यपद्धतीचा परिणाम आहे. सरकार मात्र सीबीआयचे अधिकारी कसे बेदरकार वागले असे चित्र उभे करून स्वत:च्या बेदरकार कार्यपद्धतीवर पांघरून घालत आहे. अधिकारी बेदरकारपणे वागले हे क्षणभर मान्य केले तरी सरकारने त्याच पद्धतीने वागणे अपेक्षित नाही. सरकारने नियम,कायदे आणि संविधान यांची बूज राखूनच काम केले पाहिजे. मुळात सर्वोच्च न्यायालया समोर निर्णयासाठी हाच प्रश्न आहे. सरकारने मध्यरात्रीच्या अंधारात सीबीआय सोबत कुकर्म केले कि तसे वागण्याचा सरकारला कायदेशीर अधिकार होता या प्रश्नावर निर्णय अपेक्षित असताना सर्वोच्च न्यायालयातील सुनवाई पहिल्या दिवसापासूनच भरकटली. सुनवाई भरकटण्यास सरकार नाही तर खुद्द सर्वोच्च न्यायालय आणि विशेषत: सरन्यायाधीश कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळेच सुनवाई मूळ मुद्द्यापासून भरकटली.


सीबीआय संचालकाचा कार्यकाळ २ वर्षाचा निश्चित करण्यात आला आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचाच जुना निर्णय आहे. सरकारला सीबीआय संचालकावर दबाव आणून तपास प्रकरणी हस्तक्षेप करता येवू नये म्हणून हे संरक्षण सीबीआय संचालकाला ९० च्या दशकात दाखल विनीत नारायण यांच्या जनहित याचिकेवर निर्णय देताना प्रदान केले होते. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या नियमाचा याप्रकरणी भंग झाला असून सरकारला सीबीआय संचालकाला पदावरून दूर करण्याचा अधिकार नसल्याची याचिका सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या सीबीआय संचालक वर्मा यांनी दाखल केली होती. याचिकेत दम नसेल तर ती फेटाळण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहेच. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली याचाच अर्थ याचिकेत उपस्थित करण्यात आलेला कायद्याचा मुद्दा महत्वाचा होता. सीबीआय संचालकाचा कार्यकाळ फक्त ३ महिने बाकी आहे हे लक्षात घेता या मुद्द्यावरील त्यांचे म्हणणे ऐकून घेवून त्या मुद्द्यावर आधी निर्णय अपेक्षित होता. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मात्र उपस्थित करण्यात आलेल्या कायद्याच्या मुद्द्यावर तातडीची सुनावणी घेण्या ऐवजी आधी वर्मा यांचेवरील आरोपाची चौकशी करण्याचा घोळ घातला. त्यांच्यावरील आरोपाची चौकशी आधी करा आणि मग त्यांना रजेवर पाठविणे योग्य आहे की नाही ते ठरवा अशी मागणी सरकारने देखील केली नव्हती. जी कोणाची मागणीच नव्हती तो मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने अग्रक्रमाने हाती घेतला.


सीबीआय संचालक वर्मा यांच्यावरील आरोपाचा चौकशी अहवाल आल्यानंतर वर्मा यांना चौकशी अहवालातील निष्कर्षावर त्यांची बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक होते आणि तशी ती दिली गेली. नंतर जे उत्तर बंद लिफाफ्यात द्यायला सांगितले ते आधीच माध्यमात छापून आल्या बद्दल संताप व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच १० दिवस पुढे ढकलली. आपण सीबीआय या संस्थेची प्रतिष्ठा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत पण त्याची लक्तरे जाहीरपणे वेशीवर टांगली जात असल्या बद्दल न्यायमूर्तीनी त्रागा केला. संस्थेची प्रतिष्ठा त्या संस्थेत काम करणाऱ्यांनी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्यानी जपायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाने ती जबाबदारी आपल्या शिरावर घेण्याचे काहीच कारण नव्हते. बरे एवढे सगळे झाल्यावर स्वत: न्यायालयानेच वर्मा यांचेवरील आरोपाची चौकशी करणारा अहवाल नंतरच्या सुनावणीत गुंडाळून ठेवला आणि सुनावणी भरकटल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.


नंतरच्या सुनावणीत न्यायालयाने आरोपाच्या चौकशी अहवालाची सुनावणी घेतली तर सर्वाना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी लागेल आणि आपल्याला आरोप-प्रत्यारोपाची शहानिशा करायची नसल्याचे सांगत चौकशी अहवाल बाजूला ठेवला. सध्या आपल्याला फक्त वर्मा यांना रजेवर पाठवण्या आधी सरन्यायधीश, प्रधानमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्याच्या सीबीआय संचालकाची निवड करणाऱ्या  निवड समिती पुढे  हे प्रकरण ठेवणे आवश्यक होते का हे तपासून पाहायचे अशी भूमिका मांडली. ही भूमिका बरोबर आहे. त्यांच्यापुढे आलेली याचिका यासाठीच होती. पहिल्याच सुनावणीत ही भूमिका न घेता त्याला फाटे का फोडण्यात आले हे समजायला कठीण आहे. चौकशी अहवालावर आधी विचारच करायचा नव्हता तर त्यात ४ सुनावण्या आणि एक महिना का वाया घातला याचे उत्तर मिळत नाही. आधी समोर असलेला कायदेशीर व वैधानिक मुद्द्याची तड लावून नंतर आरोपाचा विचार करणे आवश्यक वाटले तर करायला हरकत नव्हती. सरकारने जे केले ते सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे हे दिसत असताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीची जी दिशा ठरवली त्यामुळे सरकारचे वर्तन तपासल्याच गेले नाही. सरकारने जे केले ते कायदेशीरदृष्ट्या बरोबर नव्हते या निष्कर्षाप्रत न्यायालय आले असते तर ‘सीबीआय’ मध्ये जैसे थे स्थिती बहाल करावी लागली असती. पण न्यायालयात जी दिशाहीन सुनावणी झाली त्यामुळे सरकारची चूक ही चूक नव्हतीच हा चुकीचा संदेश गेला आहे.


मूळ मुद्द्याला बगल देवून झालेल्या ४ सुनावण्या नंतर ६ डिसेंबरच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट मुद्द्यावर आले. पहिल्यांदाच या प्रकरणात सरकारच्या मध्यरात्री बदल करण्याच्या घाईवर सुप्रीम कोर्टाने सरकारला प्रश्न विचारले. जी सुनावणी पहिल्याच दिवशी व्हायला हवी होती ती दीड महिन्या नंतर झाली. आता सुनावणी पूर्ण होवून कोर्टाने निकाल राखून ठेवला असला तरी न्यायालयात खटले का रेंगाळतात याच्यावर प्रकाश टाकणारा हा खटला आहे.
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८

Wednesday, November 28, 2018

सीबीआयच्या आरशात सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे प्रतिबिंब


लोकसभा निवडणुकीत मोदीजीनी ज्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची ग्वाही भारतीय जनतेला दिली होती त्या ग्वाहीला स्वत: मोदीजीनी कशी तिलांजली दिली याची कहाणी म्हणजे सीबीआयचा जनते समोर आलेला संघर्ष आहे.

-----------------------------------------------------------------


सीबीआय मध्ये उफाळून आलेला संघर्ष हा सीबीआयचे संचालक आणि विशेष संचालक या दोन अधिकाऱ्यातील बेबनावाचा परिणाम असल्याची चर्चा माध्यमात आणि कोर्टात होत आहे. सीबीआय मधील संकट हे दोन अधिकाऱ्यातील भांडणातून निर्माण झालेले नसून याचे मुख्य कारण मोदी सरकारची कार्यपद्धती राहिली आहे. केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी भाजप आणि मुख्यमंत्री म्हणून मोदी यांचा मनमोहन सरकारवर मुख्य आक्षेप सीबीआयच्या दुरुपयोगावर होता. सरकार सीबीआयचा बाहुले म्हणून वापर करते हा आक्षेप साधारणपणे इंदिरा गांधीच्या कार्यकाळा पासून प्रत्येक प्रधानमंत्र्याच्या कार्यकाळात कमी अधिक प्रमाणात ऐकायला मिळत आला आहे. मोदी काळात सीबीआयच्या राजकीय दुरुपयोगाचा आक्षेप कमी होण्या ऐवजी गडद होत गेला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीजीनी ज्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची ग्वाही भारतीय जनतेला दिली होती त्या ग्वाहीला स्वत: मोदीजीनी कशी तिलांजली दिली याची कहाणी म्हणजे सीबीआयचा जनते समोर आलेला संघर्ष आहे.


 सीबीआयचा दुरुपयोग प्रत्येक  सरकारने केल्याचा आरोप होत आला असला तरी आजवर यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेत भ्रष्ट अधिकारी नियुक्त करण्याचा किंवा त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला असे आरोप झाले नाहीत. मोदी सरकारच्या काळात मात्र असा गंभीर आरोप होत असून सीबीआय मधील घडामोडी या आरोपाची पुष्टी करणाऱ्या आहेत. मोदी सरकारने प्रधानमंत्री मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या मर्जीतील आणि जवळचे समजले जाणारे गुजरात केडरचे अधिकारी अस्थाना याना सर्व नीती-नियम बाजूला सारत त्यांची सीबीआय मध्ये नियुक्ती केली, बढती दिली आणि संरक्षणही दिले. अस्थानावरील आरोप लक्षात घेतले तर ही नियुक्ती किती आक्षेपार्ह आहे हे लक्षात येईल.  मोईन कुरेशी प्रकरणात साना या व्यावसायिकाकडून जवळपास ३ कोटीची खंडणी वसूल केल्या प्रकरणी अस्थानावर आरोपपत्र दाखल झाले आहेच, त्याशिवाय इतरही अनेक गंभीर आरोप अस्थानावर आहे. मल्ल्याचे प्रकरण अस्थानाकडे होते आणि सीबीआयने मल्ल्याला देश सोडून जाण्यास प्रतिबंध करणारी आधीची सूचना बदलल्याने मल्ल्याला पळून जाता आले. स्टर्लिंग-बायोटेकने ज्यांना पैसे दिलेत त्यात अस्थानाचे नाव आहे. या कंपनीच्या संदेसराने बँकेला ५००० कोटीचा गंडा घातला आहे. या संदेसराने अस्थानाच्या मुलीच्या शाही सोहळ्यासाठी सर्व सुविधा पुरविल्याचे सीबीआय तपासातून उघड झाले आहे. अशा गंभीर आरोपाचे धनी असलेल्या अस्थानाला प्रधानमंत्री कार्यालयाने सीबीआय वर कसे थोपले हे लक्षात घेतले तर या कार्यालयाची बेदरकार आणि भ्रष्ट कार्यपद्धतीवर झगझगीत प्रकाश पडतो.

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय प्रमुखाचा कार्यकाळ २ वर्षाचा निश्चित केला आहे. कार्यकाळ वाढविणे किंवा नव्या प्रमुखाच्या नियुक्तीचे अधिकार सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आणि विरोधीपक्ष नेता या तिघांच्या समितीचा आहे. सध्याचे डायरेक्टर वर्मा यांच्या नियुक्तीपूर्वी डायरेक्टर असलेले अनिल सिन्हा यांचा कार्यकाळ कधी संपतो याची सरकारला जाणीव होती. त्यामुळे आधीच या समितीची बैठक बोलावून नव्या सीबीआय संचालकाची निवड अपेक्षित होती. प्रधानमंत्री कार्यालयाने वेगळीच खेळी केली. सीबीआय संचालकाच्या नियुक्तीसाठी बैठक बोलवण्या ऐवजी या पदावर प्रबळ दावा असलेल्या त्यावेळचे विशेष सीबीआय संचालक दत्ता यांची तेव्हाचे संचालक निवृत्त होण्याच्या २ दिवस आधीच गृहमंत्रालयात बदली केली. सोबत गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी अस्थाना यांना सीबीआयचे सहसंचालक म्हणून बढती दिली. तेव्हाचे सीबीआय संचालक सिन्हा निवृत्त झाले की सहसंचालक म्हणून नेमलेले अस्थाना यांना सीबीआयचे कार्यकारी संचालक नेमता यावे यासाठी ही खेळी होती. नंतर यथावकाश सीबीआय संचालक नियुक्तीचे अधिकार असलेल्या समितीची बैठक झाली आणि समितीचे सदस्य असलेल्या विरोधीपक्ष नेत्याच्या विरोधानंतरही सध्याचे संचालक वर्मा यांची नियुक्ती झाली. वर्मा यांची नियुक्ती झाल्यानंतर मोदी सरकारने पुन्हा अस्थाना यांची सीबीआयचे विशेष संचालक म्हणून बढती दिली. संचालक म्हणून नियुक्त झालेल्या वर्मा यांनी अस्थाना यांचेवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची सूचीच सतर्कता आयोग व प्रधानमंत्री कार्यालयाला सोपवून त्यांच्या बढतीला विरोध केला. वर्मा यांचे म्हणणे न ऐकता अस्थानाला विशेष संचालक म्हणून बढती दिली गेली. 



गुजरात दंगलीतील दोषारोपातून मोदींना मुक्त करणाऱ्या एसआयटी मध्ये अस्थानाची महत्वाची भूमिका राहिली असल्याने मोदींना अस्थाना विषयी विशेष आस्था असणे स्वाभाविक असले तरी अस्थाना  विरुद्धचे सीबीआय संचालकांनी केलेल्या लेखी आरोपातून मुक्त होईपर्यंत बढती देणे योग्य नसल्याचे भान सरकारला राहिले नाही. एवढेच नाही तर अस्थाना विरुद्ध सीबीआयनेच आरोपपत्र दाखल केल्या नंतर स्वत: प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेवून वर्मा आणि अस्थाना यांच्यात तडजोड घडवून अस्थानाला वाचविण्याचा प्रयत्न केला. तडजोड होवू शकली नाही म्हणून मध्यरात्री संचालक वर्मा व अस्थानाला रजेवर पाठविण्यात आले. सकृतदर्शनी दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचे चित्र उभे करण्यात आले असले तरी वर्माच्या जागी तात्पुरती नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याने मध्यरात्रीच अस्थानाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या  बदल्या केल्याने सगळे काही अस्थानाला वाचविण्यासाठी होते हे स्पष्ट झाले. मंत्रिमंडळ सचिव या सर्वोच्च अधिकाऱ्यापासून ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल सारख्यांनी अस्थाना विरुद्ध चौकशीत कसे अडथळे आणलेत हे सर्वोच्च न्यायालयासमोर आल्याने प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या सरकारचा स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा दावा धुळीला मिळाला आहे. 
----------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ 
मोबाईल ९४२२१६८१५८ 

Friday, November 23, 2018

मोदी सरकारचे वस्त्रहरण करणारे सीबीआय कांड


सीबीआयचे धिंडवडे निघत आहेत असे सकृतदर्शनी वाटत असले तरी प्रत्यक्षात धिंडवडे प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या सरकारच्या कार्यपद्धतीचे निघत आहेत.
----------------------------------------------------------------------------

देशाची भ्रष्टाचार प्रकरणांचा छडा लावण्यासाठी प्रसिद्ध असलेली आणि अनेक कांड उघडकीला आणणारी सर्वोच्च तपास संस्था सीबीआय ही स्वत:च एक कांड बनून चर्चेचा व चिंतेचा विषय बनली आहे. गेल्या काही दिवसात सीबीआय मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लाथाळ्यातून जे काही बाहेर आले ते थक्क करणारे आणि थरकाप उडविणारे आहे. सीबीआय मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भांडणातून सीबीआय जशी नागडी झाली तसेच मोदी सरकार उघडे झाले. सरकारच्या हातचे बाहुले बनून सरकार विरोधकांना त्रास देणारी तपास संस्था म्हणून सीबीआय कुख्यात असली तरी पोलिसांपेक्षा जास्त विश्वास जनतेला सीबीआय बद्दल वाटत आला आहे. पोलीस हे स्थानिक प्रभावी व्यक्तींच्या प्रभावात सहज येतात आणि त्यामुळे एखाद्या प्रकरणाचा छडा कोणताही पक्षपात न करता लावतील यावर फारसा विश्वास नसल्याने प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी होत असते. सरकार विरोधी पक्षाला त्रास देण्यासाठी सीबीआयचा वापर करते असा सतत आरोप करणारे विरोधी पक्षातील लोक सुद्धा एखाद्या प्रकरणाच्या तपासाची मागणी करतात तेव्हा ती सीबीआय मार्फतच झाली पाहिजे असा आग्रह धरीत असतात. सीबीआय राज्यसरकारला जबाबदार नसल्याने राज्यसरकारच्या प्रभावात येत नाही आणि त्यांच्यावर स्थानिक प्रभावी व्यक्तींचा प्रभाव काम करीत नाही ही धारणा त्यामागे आहे. पोलिसांना चिरीमिरी देवून तपास थांबविता येतो किंवा अनुकूल करून घेता येतो तसे सीबीआयच्या बाबतीत शक्य नसल्याची आजवरची धारणा अशा मागणीमागे होती. ताज्या घटनाक्रमाने सीबीआयचे जे रूप समोर आले आहे त्याने आजवरच्या लोकधारणा चुकीच्या असल्याचे सिद्ध केले आहे. असे घडायला सीबीआय इतकेच केंद्र सरकार देखील जबाबदार आहे.

सत्ताधारी पक्षाला सीबीआय आपल्या मुठीत राहावी आणि तिने आपल्या इशाऱ्यावर काम करावे असे कायम वाटत आले आहे. विरोधी पक्षांना सीबीआय स्वायत्त आणि सरकारी हस्तक्षेपा पासून मुक्त पाहिजे असते ते जोपर्यंत विरोधी पक्षात आहेत तोपर्यंतच. कोळसा खाण वाटपातील भ्रष्टाचाराच्या तपासात सीबीआयला प्रभावित करण्याचा मनमोहनसिंग सरकारवर आरोप झाला तेव्हा त्यावेळचा विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारच्या अधिकार क्षेत्रातून सीबीआयला बाहेर काढण्याची आणि या तपास संस्थेला स्वायत्त व घटनात्मक दर्जा देण्याची जोरदार मागणी संसदेत व संसदेबाहेर केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला पिंजऱ्यातील पोपट म्हणत सीबीआय व केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले होते. अण्णा हजारे यांचे आंदोलन व भाजपची मागणी यातून सीबीआय स्वायत्ततेच्या चर्चेला बळ मिळाले होते. लोकपाल कायदा संसदेत पारित करताना सीबीआय कोणाच्या ताब्यात असावे हा मोठा चर्चेचा मुद्दा बनला होता. सीबीआय सरकारच्या नाही तर लोकपालच्या नियंत्रणाखाली असले पाहिजे यावर अण्णा आंदोलनाचे नेते आणि भाजप नेते यांचे एकमत होते. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यावर सीबीआयचा सरकारवरील अंकुश कमी होवून त्याला तपास स्वातंत्र्य मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. पण घडले उलटेच. आज सीबीआयचे जे रूप समोर आले आहे ते तसे येण्यास मोदी सरकारच कारणीभूत आहे. प्रत्येक संस्था आपल्या पंखाखाली घेण्याचा मोदी सरकारचा आणि नेमके सांगायचे तर प्रधानमंत्री मोदी यांचा अट्टाहास यामागे आहे.

प्रधानमंत्री मोदी यांना अहमदाबाद मध्ये जेवढे सुरक्षित वाटत होते तेवढेच असुरक्षित त्यांना दिल्लीत वाटते हे त्यांच्या निर्णयातून स्पष्ट होते. या असुरक्षिततेतून त्यांनी मुख्यमंत्री असताना तिथे त्यांच्या हाताखाली ज्या अधिकाऱ्यांनी काम केले आणि जे त्यांच्या खास मर्जीतील आहेत अशा अधिकाऱ्यांना दिल्लीत महत्वाच्या पदावर आणून बसविण्याचा सपाटाच लावला. आज ज्या ज्या संस्थेत त्यांच्या अधिकारात नियुक्ती होते तेथे आपल्याला गुजराथी अधिकारी पाहायला मिळतो. न्यायालय आणि सीबीआय प्रमुखाच्या नियुक्त्या पूर्णपणे प्रधानमंत्र्याच्या हातात नाही आणि त्याची एक विशिष्ट प्रक्रिया निर्धारित असल्याने प्रधानमंत्र्याला सरळ न्यायाधीशांची आणि सीबीआय प्रमुखाची नियुक्ती करता येत नाही. तसे असते तर त्या ठिकाणी सुद्धा प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या विश्वासातील व्यक्ती गुजरात मधून आणून बसविले असते. सीबीआय पूर्णपणे आपल्या मुठीत राहावे यासाठी प्रधानमंत्री मोदींनी जी पाउले उचलली त्यातून सीबीआय मध्ये भडका उडाला आणि सीबीआयची लक्तरे वेशीला टांगल्या गेली. पण हे सगळे प्रधानमंत्र्याच्या अट्टाहासातून घडल्याने प्रधानमंत्र्याची आणि त्यांच्या सरकारची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. प्रधानमंत्री मोदी यांची भ्रष्टाचार विरोधी भूमिका सीबीआय मधील घडामोडीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आपल्या विश्वासातील गुजरात केडरच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात सीबीआय देण्याच्या प्रधानमंत्र्याच्या प्रयत्नातून सगळा वाद उफाळून आला. सीबीआय प्रमुखाची नियुक्ती पूर्णपणे प्रधानमंत्र्याच्या हातात नसली तरी त्यात त्यांची भूमिका महत्वाची असते. सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आणि लोकसभेतील सर्वाधिक खासदार असलेल्या विरोधी पक्ष नेत्याची समिती समोर ठेवण्यात आलेल्या नावातून सीबीआय प्रमुखाची नियुक्ती करते. ज्येष्ठता व योग्यता तपासून निर्धारित प्रक्रियेनुसार सीबीआय प्रमुख पदासाठी नावे निवडल्या जातात. त्यातून ही समिती एका नावावर शिक्कामोर्तब करते. आलोक वर्मा यांच्या नावाला समितीतील विरोधी पक्ष नेत्याने आपला विरोध नोंदवला होता. प्रधानमंत्र्याने हे नाव उचलून धरले व सरन्यायाधीशांनी संमती दिली म्हणून आलोक वर्मा सीबीआय प्रमुख झाले. पण प्रधानमंत्री मोदींना आपला खास माणूस तिथे हवा होता आणि अस्थानाच्या अस्थानी नियुक्तीतून सगळे रामायण घडले आहे.
--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------------------



Friday, November 16, 2018

कंपनी सरकार !



मोदी सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना खाजगी विमा कंपन्यांसाठी सोन्याची खाण ठरू पाहात आहे. कंपन्यांचा फायदा करून देणारा हा राफेल पेक्षा मोठा घोटाळा असल्याचा आरोप प्रसिद्ध कृषी पत्रकार पी. साईनाथ यांनी केला आहे. योजनेचे आकडे आरोपाची पुष्टीच करतात.
----------------------------------------------------------------------

गाजावाजा करीत एखादी योजना सुरु करायची, योजनेला मोठी प्रसिद्धी देवून मोठी आशा निर्माण करायची ही मोदी सरकारची कार्यपद्धती राहिली आहे. यासाठी प्रधानमंत्री मोदी यांच्या डोक्यातून नवी योजना बाहेर पडण्याची गरज नसते. जुनी योजना नव्या नावाने चालू ठेवत पूर्वी असे काही नव्हते असा भास निर्माण करण्यात या सरकारचा कोणी हात धरू शकत नाही. मोदी सरकारने सुरु केलेली अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. पूर्वी सुरु असलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेचे हे नामांतर. पण फक्त नामांतर नाही. योजनेत काही बदलही आहेत. पीक विमा मिळविण्यासाठी शेतकऱ्याला भरावा लागणारा कमीतकमी हप्ता हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. विमा हप्त्याचा मोठा भार केंद्र व राज्य सरकारने सारखाच उचलला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना अत्यल्प पैशात विमा संरक्षण देण्याची गरज पडणे हे शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे आहे. योजनेतील एवढ्या एका बदलाने योजनेला शेतकरी हिताची , शेतकऱ्यांच्या जीवनात व शेतीक्षेत्रात आमुलाग्र बदल करणारी योजना म्हणून संबोधले गेले. कमी हप्ता भरावा लागणे हाच एक लाभ वगळता कोणताही वेगळा बदल या योजनेमुळे झाला नसल्याची योजनेची दोन वर्षाची वाटचाल दर्शविते. नवी पीक विमा योजना फायद्याची ठरली आहे ती विमा कंपन्यांना. पूर्वीच्या योजनेच्या तुलनेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कंपन्यांना – विशेषत: खाजगी विमा कंपन्यांना – झालेला फायदा अभूतपूर्व या श्रेणीत मोडणारा असल्याने त्या अर्थाने ही योजना अभूतपूर्व ठरली आहे. मोदी सरकारचे प्रत्येक पाऊल आणि धोरण खाजगी कंपन्यांसाठी वरदान ठरत आल्याचा जो आरोप होतो त्याची पुराव्यानिशी पुष्टी करणारी कोणती योजना असेल तर ती प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे.

इंग्रजाचे राज्य होते तेव्हा त्या सरकारला कंपनी सरकारही म्हंटले जायचे. हे नामाभिदान इस्टइंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजांनी सत्ता प्राप्त केली म्हणून नाही तर शेतकऱ्यांना लुटून त्या कंपनीचे भले करणारी धोरणे राबविली म्हणून झाले आहे. त्याअर्थाने मोदी सरकारला कंपनी सरकार म्हणावे लागण्यासारखी परिस्थिती आहे. ज्या योजनेने शेतकऱ्यांचे भले व्हायला पाहिजे ते तसे न होता कंपन्यांच्या समृद्धीत भर पडत असेल तर सरकारसाठी ‘कंपनी सरकार’ हेच नांव योग्य ठरते. जानेवारी २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु झाली. त्यापूर्वी दोन वर्षे मोदी सरकारने मनमोहन काळापासून चालत आलेली राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविली होती. २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात कंपन्यांना कृषी विमा हप्त्यापोटी १०,५६० कोटी रुपये मिळाले होते. पीक नुकसानीच्या भरपाईपायी कृषी विमा कंपन्यांना २८५६४ कोटी रुपये द्यावे लागून मोठा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर ही योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रुपांतरीत झाली आणि कंपन्यांची चांदीच झाली. पूर्वीच्या विमा योजनेने शेतकऱ्याचे भले झालेच नाही तीच गत शेतकऱ्यांची नव्या योजनेतही झाली. कमी हप्ता भरावा लागण्याचा दिलासा सोडला तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे नुकसान भरून काढणारी विमा भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. नव्या योजनेने पीक विमा काढणाऱ्या कंपन्या मात्र मालामाल झाल्या आहेत हे बघता प्रधानमंत्री पीक विमा योजना कोणाच्या भल्यासाठी आणल्या गेली हा प्रश्न पडतो.

एवढा गाजावाजा करून सुरु केलेल्या नव्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग फक्त ०.४२ टक्क्यांनी वाढला म्हणजे अर्ध्या टक्क्यानीही वाढला नाही. पीक क्षेत्राची वाढही अल्पच म्हणावी अशी आहे. पूर्वीच्या योजनेत ४६.३९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र विम्याच्या छत्राखाली होते. नव्या योजनेत ४९.०४ दशलक्ष हेक्टर क्षेत्र विम्याखाली येते. मात्र पीक विम्यापोटी कंपन्यांना मिळणाऱ्या रकमेत मात्र प्रचंड म्हणजे जवळपास ३५० टक्क्यांनी (३६८४८ कोटीने) वाढ झाली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीच्या २०१६-१७ या पहिल्या वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या दुसऱ्या वर्षात योजनेखालील शेतीक्षेत्र व शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली असली तरी कंपन्यांना विम्यापोटी मिळणाऱ्या रकमेत वाढच झाली आहे. त्यामुळे कंपन्यांची विशेष काळजी या नव्या पीकविमा योजनेत घेतली आहे असे म्हणता येते. आकड्यात सांगायचे झाले तर २०१६-१७ मध्ये विम्यापोटी कंपन्यांनी २२३६२ कोटी रुपये गोळा केले आणि शेतकऱ्यांची संख्या व शेतीक्षेत्र घटूनही २०१७-१८ या वर्षात कंपन्यांनी २५०४६ कोटी गोळा केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची २ वर्षे आणि त्या आधीच्या राष्ट्रीय पीक विमा योजनेची २ वर्षे याची तुलना केली तर नवी प्रधानमंत्री योजना कंपन्यांसाठी कशी सोन्याची खाण ठरली आहे हे लक्षात येते. आधीच्या दोन वर्षात कंपन्यांना मिळालेल्या रकमेपेक्षा अधिक रकमेची नुकसानभरपाई मोजावी लागून मोठा तोटा सहन करावा लागला होता. नव्या योजनेतील नंतरच्या २ वर्षात मात्र कंपन्यांनी विम्यापोटी ४७४०८ कोटी जमविले आणि नुकसानभरपाईपोटी ३१६१३ कोटी खर्च केलेत. रिलायन्स,एस्सार, टाटा या सारख्या १० च्या वर कंपन्यांना जवळपास १६००० कोटी रुपये मिळाले आहे. याचमुळे प्रसिद्ध कृषी पत्रकार पी.साईनाथ यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला राफेल पेक्षाही मोठा घोटाळा म्हंटले आहे. वरचे आकडे या आरोपाची पुष्टी करणारेच आहेत.
-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा , जि. यवतमाळ
 मोबाईल – ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------------