Thursday, June 21, 2012

आठवण आणिबाणीची


पहिली संधी मिळताच जनतेने उत्स्फूर्त पणे आणीबाणीचे जोखड झुगारून दिले होते. पण आजची पिढी या पासून काही शिकायला तयार नाही. कारण आजची जास्त शिकली सवरलेली ही पिढी पूर्णत: राजकीय निरक्षर आहे. वाढलेला भ्रष्टाचार नव्हे तर वाढलेली राजकीय निरक्षरता हीच  लोकशाहीवरील टांगती तलवार आहे. राजकीय साक्षरता वाढविण्यासाठी अण्णा-बाबांच्या अराजकीय आंदोलनाची नाही तर १९७४ च्या  जयप्रकाश आंदोलना सारख्या राजकीय आंदोलनाची देशाला गरज आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

येत्या २६ जून ला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणी पर्वाला ३७ वर्षे पूर्ण होतील. भारतीय राज्य घटनेत आणिबाणीची तरतूद असली तरी  लोकशाही गृहित धरलेल्या आपल्या देशात आणिबाणी ही अगदीच अनपेक्षित व अकल्पित घटना ठरली. मुरलेले राजकारणी असोत , घटना पंडीत असोत, नावाजलेले राजकीय पंडीत असोत  किंवा सर्वद्न्य समजणारे वा समजली जाणारी संपादक मंडळी असोत या सर्वांनाच आणिबाणी काय असते हे कळायला किमान ४८ तास लागले होते. एवढ्या मोठया देशात बोलणाऱ्याच्या मुसक्या आणि लिहिणाऱ्याचे हात बांधायला इंदिराजींना जितका वेळ लागला तितकाच वेळ आणिबाणी काय असते हे कळायला लागला होता. देशात घटनात्मक तरतुदींवर आणि लोकशाहीवर अनंत वेळा अनंत चर्चा झडल्या असतील पण आणिबाणी लादली जाण्यापूर्वी या विषयीची चर्चा फक्त घटना समितीतच झाली होती आणि तेथील चर्चेलाही संदर्भ राष्ट्रीय सुरक्षेचा होता. त्यामुळे एखादे नागरी आंदोलन , जन आंदोलन किंवा सरकार विरोधी आंदोलन चिरडण्यासाठी आणिबाणी लादून लोकशाही स्वातंत्र्याचा संकोच केला जावू शकतो हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. ज्या आंदोलनामुळे आणिबाणी लादली गेली त्या आंदोलनाचे नेते असलेले लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या रोजनिशीत याची कबुली दिली आहे. एक शांततामय लोकशाही चळवळ मोडून काढायला जगातील सर्वात मोठया लोकशाही देशाचे पंतप्रधान सर्वसाधारण आणि असाधारण कायद्याचा मार्ग स्विकारतील , पण कुठल्याही परिस्थितीत लोकशाहीचाच विध्वंश करून हुकुमशाही आणणार नाहीत हे आपण गृहित धरण्यात चूक केल्याची कबुली त्यांनी या रोजनिशीत प्रारंभीच दिली आहे. जसे जयप्रकाशांनी हे गृहित धरले तसेच इंदिराजी आणि त्यांचे निवडक सल्लागार सोडले तर सर्वांचेच हे गृहीतक होते ज्याला इंदिराजींनी आणीबाणीच्या रुपाने जोरदार तडाखा दिला होता. आणिबाणी अनुभवलेली आणि भोगलेली पिढी देशाच्या राजकीय, सामाजिक पटला वरून काहीशी बाजूला पडली आहे. आणीबाणीचे अपत्य असलेले आणि नंतर सत्तेचे अमृत प्यालेले लालू, नितीश किंवा सुशील मोदी वा नरेंद्र मोदी सारखे नेते राजकारणात महत्वाची भूमिका निभावत असले तरी आणीबाणीची ऐतिहासिक घटना इतिहास बनून विस्मरणात गेली आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली १९७४-७५ साली झालेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देणारे पहिले सर्वात मोठे आंदोलन असून ही आजच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला त्या  आंदोलनाचा विसर पडला यात नवल वाटण्या सारखे काही नाही. अनेक प्रकारचे उपचार घेवूनही रोग बरा नाही झाला तर रोगी कोणतेही उपचार करून घ्यायला तयार होतो तसेच आजच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे झाले आहे. ओसरलेल्या आंदोलनाला उभारी देण्याच्या प्रयत्नांना यश येत नाही हे बघून त्यासाठी निरनिराळे नुस्खे आजमाविल्या जाण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या नेत्यांना जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या चळवळीची आत्ता-आत्ता आठवण झाली आहे. जयप्रकाश आंदोलनाची आठवण होण्या मागे आणखीही एक गंमतीशीर कारण आहे. बाबा रामदेव यांनी नव्याने सुरु केलेल्या आंदोलनात जयप्रकाशजींच्या प्रतिमेचा आवर्जून वापर केला. आपण बाबांच्या पुढे आहोत हे दाखविण्यासाठी मग टीम अण्णाने  यात्रेचा घाट घातला. या आंदोलनाच्या नेत्यांनी जयप्रकाशजींच्या जन्म गावा पासून एक जन जागरण यात्रा गेल्या ५ जून पासून सुरु केली आहे. यातून अण्णा आणि बाबांचे आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचे पुढचे पाऊल आहे असा समज आणि संभ्रम  निर्माण  झाला आहे जो सत्याला धरून नाही.
                            दोन आंदोलनातील फरक 

 आज आणीबाणीचे दिवस आठवण्याचे एक कारण त्याकाळी जे सोसावे लागले ते असले तरी त्यापेक्षा महत्वाचे कारण आजच्या आंदोलनाच्या नेत्यांच्या लोकशाही बद्दलची अनास्था हे आहे. आंदोलनाचे मुद्दे आणि आंदोलनाची तीव्रता आणि पद्धती सारखी भासत असली तरी जयप्रकाश आंदोलन आणि अण्णा-बाबा आंदोलन यांना वेगळे करणारी रेषा लोकशाहीची आहे हे आणिबाणी दिनाच्या निमित्ताने समजून घेतले पाहिजे. लोकशाहीला काही पर्याय असूच शकत नाही असे  गृहित धरण्याची चूक त्याकाळी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या नेत्यांनी केली आणि आजच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या नेते  लोकशाही हीच  भ्रष्टाचाराची जननी आहे असा समज पसरविण्याची चूक करीत आहेत. जयप्रकाश  आंदोलनाचा लोकशाही व्यवस्थेवरचा अतिविश्वास त्या आंदोलनाच्या नेत्यांना बेसावध बनवून गेल्याने आणिबाणी आली आणि आजचे नेते लोकशाही बद्दल दाखवीत असलेली अनास्था देशाला केवळ आणीबाणीच्या दिशेने  ढकलीत नसून त्याही पुढे जावून  निर्वाचित व्यवस्थेवर अविश्वास दाखवून हुकूमशाहीसाठी पायघड्या टाकण्याचे काम करीत आहे. दोन आंदोलनातील हा मुलभूत आणि महत्वाचा फरक आहे. लोकशाहीच्या मुद्द्यावर सरकार आणि आंदोलक यांच्या भूमिका देखील बदलल्या आहेत. जयप्रकाश आंदोलनाची लोकशाहीवर अढळ निष्ठा होती. पण त्यावेळी सरकारच्या नेतृत्व स्थानी असलेल्या इंदिरा गांधी यांनी जनतेचा बुद्धिभेद करण्यासाठी लोकशाही राष्ट्राचा पुरस्कार करण्या ऐवजी लोकशाही पेक्षा राष्ट्र मोठे असा प्रचार करून लोकशाहीला गौण मानले. आजचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची नेते मंडळी लोकशाही पेक्षा भ्रष्टाचार निर्मुलन महत्वाचे आहे आणि त्यासाठी लोकशाही निर्मुलन झाले तरी चालेल किंवा लोकशाही व्यवस्थाच भ्रष्टाचाराची जननी असल्याचा आभास निर्माण करीत आहेत . अण्णा-बाबा आंदोलनाने संसदेचे अवमूल्यन  करण्याची जी मोहीम चालविली आहे त्यामागची हीच धारणा आहे. तर दुसरीकडे विश्वासार्हता गमावलेले सरकार संसदेच्या श्रेष्ठत्वाची महती गात आहे. जयप्रकाशांच्या आंदोलन काळात इंदिरा सरकारने संसदेचे अवमूल्यन करून आणिबाणी लादली होती. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने आणिबाणी हटवून लोकशाहीच्या पुनर्स्थापनेत मोलाची भूमिका निभावली होती. पण आजचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनच संसदेचे अवमूल्यन करण्यात धन्यता मानीत आहे. आज सरकार लोकशाहीचे गोडवे गात असले तरी संसदीय व्यवस्थेचे अवमूल्यन करण्यात अण्णा-बाबा आंदोलनाच्या चार पावले पुढेच आहे. आज संसद किंवा सरकार व आंदोलक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले वाटत असले तरी दोघांच्याही कृतीतून एकच समान गोष्ठ घडत आहे आणि ती गोष्ठ म्हणजे लोकांचा  लोकशाही वरील विश्वास उडत चालला आहे. पूर्वी लोकांच्या इच्छेविरुद्ध आणिबाणीच्या रुपाने हुकुमशाही लादल्या गेली होती आणि आज हुकुमशाहीचे स्वागत करण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्यात येत आहे. सारखी भासणारी जयप्रकाश आंदोलन आणि अण्णा आंदोलन  परिणामाच्या दृष्टीने वेगळी असण्यामागे आंदोलनाच्या राजकीय आणि अराजकीय नेतृत्वाचा मोठा वाटा आहे.   प्रगल्भ राजकीय नेतृत्व अपरिहार्यपणे लोकशाहीचा पुरस्कार करते तर अराजकीय नेतृत्व नेहमीच लोकशाही व्यवस्थेकडे शंका आणि संकट म्हणून पाहात आले आहे. याला गांधी-विनोबा सारखे दिग्गजही अपवाद नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. अण्णा आंदोलनापासून जयप्रकाश आंदोलनातील कार्यकर्ते दुर का आहेत याचे उत्तर या दोन आंदोलनातील वेगळेपणात सापडते. 
                            लोकशाहीची महत्ता 

आणिबाणी नंतरच्या कालखंडात अराजकीय नेतृत्व पुढे येण्यामागे राजकीय नेतृत्वाने लोकांना कमालीचे निराश केले हे कारण आहेच. पण त्याही पेक्षा महत्वाचे कारण आज समाजाच्या सर्वच  क्षेत्रात वावरत असलेली पिढी ही आणिबाणी नंतरच्या कालखंडातील आहे. या पिढीला आणीबाणीच्या संघर्षाचा स्पर्शही झालेला नाही. स्वातंत्र्य आंदोलनाच्या परिणामापासून तर ही पिढी कोसो दुर आहे. बापजाद्याची दौलत वाटयाला यावी तशी  लोकशाही या पिढीच्या वाटयाला आली आहे. उदारीकरणाने आणि जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या संपत्तीची वाटेकरी झालेली ही पहिलीच पिढी आहे. संपत्ती निर्माण करण्यासाठीचे पूर्वी असलेले सरकार वरचे अवलंबित्व कमी झाल्यामुळे सरकार नावाच्या व्यवस्थेचे या पिढीला अप्रूप राहिलेले नाही. उलट सरकार काही न करता या संपत्तीतले वाटेकरी होत असल्याची चीड या पिढीत आहे. ही चीड राजकीय घृणेत रुपांतरीत होण्यात अण्णा-बाबा सारख्या अराजकीय नेतृत्वाखालील आंदोलनाने महत्वाची भूमिका बजावली. राजकीय संस्कारा पासून दुर असलेली ही पिढी अण्णा-बाबा यांच्या आंदोलनाची ताकद बनली आहे. पण समाजाच्या सर्व क्षेत्रात प्रभावशाली असलेल्या आजच्या तरुण पिढीच्या प्रगतीत लोकशाही व्यवस्थेची निर्णायक भूमिका राहिली आहे याचा विसर या पिढीला पडला आहे. जगाला विकासाचा मोठा टप्पा गाठून देण्यात लोकशाही राष्ट्रांचा सिंहाचा वाटा असणे हा योगायोग नाही तर ते स्वातंत्र्याचे गोमटे  फळ आहे. जगात लोकशाही व्यवस्थेचा जसजसा विकास झाला तसतशी समाजाची आर्थिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती झाली आहे. लोकशाही आणि विकास यांचे असे अतूट नाते आहे. लोकशाहीच्या झाडालाच विकासाची फळे येतात. निसर्ग नियमाने यातील अनेक फळे किडकी निघतात. पण यावर उपाय त्या झाडाचे नीट संगोपन करणे हाच आहे . किडकी फळे लागतात म्हणून झाडच छाटून टाकण्याचा विचार आज बलवत्तर होत चालला आहे. आणीबाणीच्या काळात सगळी कामे शिस्तीत आणि वेळेवर होत असल्याचा प्रचार झाला. संप, हरताळ यांना पूर्णविराम मिळाला. लोकांच्या भल्यासाठी कार्यक्रमांची मोठी जंत्री बनविल्या गेली. आणि असे असतानाही पहिली संधी मिळताच जनतेने उत्स्फूर्त पणे आणीबाणीचे जोखड झुगारून दिले होते. पण आजची पिढी या पासून काही शिकायला तयार नाही. कारण आजची जास्त शिकली सवरलेली ही पिढी पूर्णत: राजकीय निरक्षर आहे. वाढलेला भ्रष्टाचार नव्हे तर वाढलेली राजकीय निरक्षरता हीच  लोकशाहीवरील टांगती तलवार आहे. राजकीय साक्षरता वाढविण्यासाठी अण्णा-बाबांच्या अराजकीय आंदोलनाची नाही तर १९७४ च्या  जयप्रकाश आंदोलना सारख्या राजकीय आंदोलनाची देशाला गरज आहे. 

                          (संपुर्ण)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि.यवतमाळ  

1 comment:

  1. सद्ध्याच्या तरुणांची राजकीय निरक्षरता हा आपण उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे, पण मग प्रश्न असा उरतोच की राजकीय निरक्षरतेचा हा प्रश्न इतर राष्ट्रांनाही एवढा का भेडसावत नाही? स्वातंत्र्यासाठी करावा लागलेला त्याग, आणीबाणीतील अन्यायकारक अगतिकता या विषयी आजचा युवक अनभिज्ञ आहे असे जरी मानले, तरी जगातल्या इतरही कित्येक देशात सर्वसाधारण संपन्नतेत वाढलेली तरुण पिढी असेलच, या सर्वांचेच राजकीय ज्ञान (?अज्ञान) त्यांच्या प्रगतीला अडसर का ठरत नाही? स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आपल्या देशात इतक्या वेगाने वैचारिक आणि नैतिक अधःपतन का व्हावे? आपल्या देशाची मोठी लोकसंख्या हे त्याचे कारण आहे, की प्रथमपासूनच आपल्या देशातील जनतेत राष्ट्रवादाचा अभाव आहे? किंवा असेही असेल की स्वातंत्र्यापूर्वीचा आदर्शवादही तसा फसवाच होता, तथाकथित नेते मंडळींचा एकूण वकूबही आज वाटतो तेवढा महान नव्हता! गेल्या ६-७ दशकात भारतात झालेली वैचारिक आणि नैतिक घसरण हाच एक चिंतेचा विषय ठरावा.

    ReplyDelete