Thursday, July 12, 2012

गरज आंबेडकर आणि गांधींचीही



 'सत्यमेव जयते' च्या देशातील जातीयवादावर बेतलेल्या भागात  फुले - आंबेडकरांचा नामोल्लेख न होणे ही बाब जशी सगळ्यांनाच खटकणारी होती तशीच कार्यक्रमात महात्मा गांधी यांचा झालेला उल्लेख अनेकांना खटकणारा वाटावा ही बाब देखील खटकणारीच आहे.  या क्षेत्रातील फुले - आंबेडकरांचे कार्य अतुलनीय आहे हे कोणीच अमान्य करीत नाही आणि करूही शकत नाही. पण गांधींच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल बरेच किंतु-परंतु आहेत. या पार्श्वभूमीवर गांधींचे योगदान अधोरेखित करणे  'सत्यमेव जयते'कारांना गरजेचे वाटले असेल तर ते समजून घेतले पाहिजे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी व्यक्ती पूजक नाही. अवतार आणि पुनर्जन्म यावर तर अजिबातच विश्वास नाही. गांधी आणि आंबेडकर या दोघांचेही अनुयायी त्यांना अवतार पुरुष मानण्यात आणि मानायला लावण्यात धन्यता मानीत असतात. मी गांधी विचाराच्या चळवळीत वाढलो असलो तरी गांधी माझ्यासाठी हाडा मासाचा माणूसच आहे. आंबेडकरांना सुद्धा या पेक्षा वेगळे मानण्याचे कारण नाही. गांधी विचाराच्या चळवळीत अनेक वर्ष रमल्या नंतरही जर आज मला गांधींचे कोणते विचार पटतात असा कोणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मला देता येईल असे वाटत नाही. असहमती बद्दल कदाचित भरभरून बोलता येईल. असे असले तरी स्वातंत्र्य चळवळीतून जो भारत घडला त्यातील त्यांचे योगदान सरस होते हे मान्य करायला मला अजिबात संकोच होत नाही. असेच योगदान स्वातंत्र्य चळवळीत नसले तरी आधुनिक भारताच्या जडण घडणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राहिले आहे. उपमा द्यायची झाली तर यांना आगगाडीच्या रुळांची द्यावी लागेल. दोघेही समकालीन असले तरी त्यांचे कार्य आगगाडीच्या रूळा सारखे समांतर राहिले आहे. आधुनिक भारतरूपी  आगगाडी  पुढे गेली ती या रुळावरुनच . ही गाडी बरीच पुढे जावू शकली त्याला हे समांतर रूळ जेवढे कारणीभूत आहेत तेवढेच या रूळा खालील जमीन मजबूत करण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई सारख्या अनेक समाज सुधारकांचे परिश्रम कारणीभूत होते. परवा दूरदर्शन वर चित्रपट अभिनेता आमिरखानने देशवासियांना जातीयवादाचा म्हणण्यापेक्षा अस्पृश्यतेचा जो आरसा देशवासीयांसमोर धरला तो पाहताना या सर्व समाज सुधारकांची आठवण होणे अपरिहार्य होते. आमिरखानने औपचारिकरीत्या फुले,शाहू आणि आंबेडकरांचे नाव घेतले नाही आणि सत्यमेव जयतेच्या या भागातील सर्वात जास्त टोचणारी ही बाब असली तरी हा कार्यक्रम पाहताना ज्याच्या डोळ्यासमोरून फुले-आंबेडकरांचे कार्य तरळून गेले नसेल असा दर्शक विरळाच असेल. फुले - आंबेडकरांचा नामोल्लेख न होणे ही बाब जशी सगळ्यांनाच खटकणारी होती तशीच कार्यक्रमात महात्मा गांधी यांचा झालेला उल्लेख अनेकांना खटकणारा वाटावा ही बाब देखील खटकणारीच आहे.  या क्षेत्रातील फुले - आंबेडकरांचे कार्य अतुलनीय आहे हे कोणीच अमान्य करीत नाही आणि करूही शकत नाही. पण गांधींच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल बरेच किंतु-परंतु आहेत. या पार्श्वभूमीवर गांधींचे योगदान अधोरेखित करने 'सत्यमेव जयते'कारांना गरजेचे वाटले असेल तर ते समजून घेतले पाहिजे. गांधीजी आणि बाबासाहेबांची अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची वाटचाल देखील समांतर असली तरी ती विरोधी नव्हती. दोघांचे कार्य एकमेकांच्या ध्येया पर्यंत पोचण्यासाठी पूरक आणि बळ देणारेच होते याची समज आणि जाणीव नसणाऱ्यांना कार्यक्रमातील गांधींचा उल्लेख खटकण स्वाभाविक आहे. स्वतंत्र भारतात इतक्या वर्षा नंतर आणि इतक्या प्रयत्ना नंतरही अस्पृश्यता व जातीयता याचे उच्चाटन करता आले नाही याची झापडे उघडे ठेवून कारण मीमांसा केली तर लक्षात येईल की गांधी आणि आंबेडकर यांनी सुरु केलेले समांतर कार्य थंडावले आहे. थंडावलेले हे कार्य जोमात सुरु झाल्याशिवाय सामाजिक समता हे स्वप्नच ठरणार आहे. आंबेडकर आणि गांधींची गरज आहे म्हणताना हे दोन व्यक्ती इथे अभिप्रेत नसून या दोन व्यक्तींनी सुरु केलेल्या सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची निकड या निमित्ताने समजून घेतली पाहिजे. 

                                                                मतभेदांचा विपर्यास 

गांधी आणि आंबेडकर यांनी आपल्या अंगीकृत कार्यासाठी जो प्राधान्यक्रम ठरविला होता त्यात या दोघांच्या मतभेदांची बिजे आहेत. इंग्रजाच्या गुलामीतून आधी देशाची मुक्ती याला गांधींचा अग्रक्रम होता तर हिंदूंच्या गुलामीतून अस्पृश्य समजल्या गेलेल्या दलित समाजाची मुक्ती याला बाबासाहेबांनी अग्रक्रम दिला होता. हिंदू समाजातून अस्पृश्यतेचे  उच्चाटन झाले पाहिजे या बाबत दोघात दुमत नव्हतेच. आमचे प्रश्न आम्ही सोडवू पण आधी इंग्रजांनी चालते व्हावे ही गांधींची भूमिका होती. पण उच्च वर्णीय व उच्च वर्गीय हिंदुनी शतकानुशतके दलितांवर जो अन्याय व अत्याचार चालविला होता त्याचा विदारक अनुभव स्वत: बाबासाहेबांनी घेतला असल्याने अशा हिंदू समाजाबद्दल बाबासाहेबांच्या मनात अविश्वासाची भावना होती आणि इंग्रज येथून निघून गेले तर दलित समुदाय पुन्हा एकदा अशा जातीयवादी हिंदूच्या तावडीत सापडेल अशी भिती आंबेडकरांना वाटत होती. कॉंग्रेसचे त्यावेळचे स्वरूप लक्षात घेतले तर आंबेडकरांची भिती अनाठायी नव्हती. म्हणून दलित मुक्ती शिवाय स्वातंत्र्य हे त्यांना मान्य नव्हते. शिवाय दलितांचा प्रश्न समजून घेण्यातही त्यांच्यात अंतर होते. या प्रश्नावर सुरुवातीला गांधी प्रचंड गोंधळात होते आणि आंबेडकर तितकेच स्पष्ट होते. हिंदू मधील वर्ण व जाती व्यवस्था समाप्त झाल्याशिवाय दलितांचा प्रश्न सुटू शकत नाही ही आंबेडकरांची शास्त्रीय भूमिका होती तर अस्पृश्यता तेवढी वाईट , वर्ण आणि जाती व्यवस्था वाईट नाही अशी गांधींची भूमिका होती. गांधींची ही भूमिका १९३२-३३ साला पर्यंत कायम होती .त्यामुळे दोघांचे एकत्रित काम करने अशक्य बनले होते. वर्ण आणि जाती व्यवस्थेतच अस्पृश्यतेचा उगम आहे हे त्याकाळी गांधीना ठणकावून सांगणारे आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते. प्रारंभी गांधीना त्यांच्यावरील हिंदू धर्माच्या पगड्यामुळे आंबेडकरांचे म्हणणे पटले नव्हते . आंबेडकरांची भूमिका त्यांना अतिरेकी वाटली होती. असे असले तरी त्यानंतर गांधीनी कधी वर्ण आणि जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला नाही. आज गांधीच्या चातुवर्ण्याची आवर्जून आठवण करून देणारी मंडळी गांधीचा प्रवास चातुवर्ण्या पासून ते ज्या विवाहात एक जोडीदार दलित समाजातील नाही त्या विवाहात आपण उपस्थित राहणार नाही इथ पर्यंत झाल्याचे सोयीस्करपणे विसरतात. गांधीत असा बदल होई पर्यंत दोघांचे राजकीय, सामाजिक परिवर्तनाचे मार्ग वेगळे होवून गेले होते. मार्ग वेगळे झाले तरी दोघांनी एकमेकांचे मार्ग अडविण्याचा किंवा एकमेकांच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला नाही. दलितांना जागृत व संघटीत करून हिंदू धर्मातील जाती व्यवस्थे विरुद्ध आंबेडकरांनी एकीकडे लढा उभारला तर दुसरीकडे गांधी अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे आणि तो दुर करण्यासाठी जागृतीचे काम स्वातंत्र्य चळवळी सोबत गांधीनी हाती घेतले होते. हिंदू धर्मातून अस्पृश्यता जाणार नसेल तर हिंदू धर्म नष्ट झाला तरी चालेल अशी  टोकाची  धर्मवादी गांधीनी भूमिका घेतली होती . याचा मोठा परिणाम सवर्ण हिंदूंवर झाला होता हे मान्य करावे लागेल. याचा पुरावा म्हणून नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात सवर्ण हिंदूंच्या  आणि कॉंग्रेसच्या सहभागाकडे पाहता येईल. सत्याग्रहाच्या पाहणी साठी आलेल्या तत्कालीन आयुक्तांनी सत्याग्रहीचे जे वर्णन आपल्या अहवालात लिहून ठेवले आहे त्यात अनेक सत्याग्रहींनी खादी  वस्त्र व खादी टोपी परिधान केल्याचे आणि आंबेडकरांच्या सोबतच गांधींचा जयजयकार करीत होते असे वर्णन लिहून ठेवले आहे. मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करण्याची ही वेळ योग्य नाही असे गांधींचे मत असतांनाही गांधीनी कॉंग्रेस कार्यकर्ते व नेते यांना आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात सामील होण्यापासून रोखले नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. पुढे गांधीनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी यात्रा सुरु केल्याने या सत्याग्रहातील कॉंग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचा सहभाग कमी झाला होता तरी जाती निर्मुलनाचे आंबेडकरांचे प्रयत्न आणि अस्पृश्यता निर्मुलनाचे गांधींचे प्रयत्न हे दलित मुक्ती साठी पूरक ठरले हे ऐतिहासिक सत्य नाकारण्यात हशील नाही. पुढे तर गांधीनी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात दलितांच्या मंदिर प्रवेशाला स्थान दिले होते. याला आंबेडकरांनी विरोध केला असला तरी कॉंग्रेसने किंवा गांधीनी दलितांसाठी कार्यक्रम घेवू नये अशी त्यामागची भूमिका नव्हती तर दलितांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे असे आंबेडकरांनी गांधीना सुचविले होते. सांगायचा मुद्दा असा आहे कि आज गांधी आणि आंबेडकरांना एकमेकांचे शत्रू असल्यागत आणि गांधी दलित विरोधी असल्याचे जे विपर्यस्त चित्र आज उभे केले जात आहे त्याला ऐतिहासिक आधार नाही. उलट आंबेडकरांनी या प्रश्नावर दलितांना संघर्षासाठी तयार करणे आणि गांधीनी सवर्ण समुदायाची मानसिकता बदलण्याचा केलेला प्रयत्न यातून दलित मुक्तीच्या लढाईला बळ मिळाले . यातून जे वातावरण तयार झाले त्या वातावरणाच्या परिणामीच समतेवर आधारित भारतीय संविधान तयार झाले आणि मान्यही झाले हे विसरता येणार नाही. गांधींच्या अनुयायांचा भरणा असलेल्या संविधान सभेत आंबेडकरांना आपल्या मनासारखे संविधान मान्य करून घेता आले  त्यात  आंबेडकरांनी उभी  केलेली  दलित चळवळ आणि यातून उभी राहिलेली दलित शक्ती जेवढी कारणीभूत होती तितकीच गांधीनी सातत्याने केलेली जागृती आणि यातून तयार झालेले जनमत कारणीभूत होते . जाती व्यवस्थेच्या निर्मुलनासाठी असे दोन्ही आघाड्यावर काम चालल्याने जाती निर्मुलनाच्या कार्याला यश मिळत गेले होते. पण गांधी - आंबेडकरा नंतर त्यांच्या अनुयायांनी या प्रश्नावर संघर्ष आणि जागरण सोडून दिल्याने जाती व्यवस्था टिकूनच राहिली नाही तर नव्याने मजबूत होवू लागली आहे. आज या प्रश्नावर ना सवर्ण आघाडीवर काम होत आहे ना दलित आघाडीवर . आमिरखानने दाखविलेल्या आरशात जातीवादाचे आणि अस्पृश्यतेचे जे भेसूर चित्र दिसले ते याच मुळे. 

                                           नव्या लढाईची गरज 

गांधींच्या मृत्यू नंतर गांधी सोबत त्यांची अस्पृश्यता निवारणाची चळवळही संपली. स्वातंत्र्याच्या लढाईतील कॉंग्रेस देखील त्यांच्या सोबतच संपली. त्यांचा वारसा चालविण्याचा दावा करणाऱ्या सत्तेतील आणि सत्ता निरपेक्ष अनुयायांनी ही लढाई कधीच गांभीर्याने पुढे नेली नाही. स्वातंत्र्यानंतर उरला तो आंबेडकरांचा एकाकी लढा. पण दलित मुक्तीच्या लढाईच्या रथाचे  सवर्णात बदल घडवून आणण्याचे एक चाकच निखळून पडल्याने जो अपघात झाला त्याचे पर्यावसन धर्मांतरात झाले. यातून सवर्णांची मानसिकता बदलण्याचे कार्य आणखी मागे पडले. पण धर्मांतर करूनही दालीताची मुक्ती संभव झाली नाही याचे कारण सवर्णाच्या मानसिकतेत बदल घडविण्याचे काम थांबल्यात सापडते. आंबेडकरांच्या निर्वाणा नंतर तर दलित मुक्तीच्या रथाचे दुसरे चाक ही निखळून पडले. आंबेडकरांच्या प्रयत्नाने आणि राज्य घटनेचे संरक्षण लाभल्याने शिक्षित झालेली दलितांची पिढी समाज प्रवाहात आपले स्थान बळकट करण्यात गुंतली. पण दालितातील मोठया समूहाला असे शिक्षित होवून समाजात सामावून जाण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांना पुन्हा सवर्णाच्या अत्याचाराला बळी पडावे लागत आहे. कारण  आंबेडकरांनी ज्या पद्धतीने दलितांना संघटीत करून संघर्षाला प्रेरित केले , दालीतात नवा आत्मविश्वास निर्माण केला ते कार्य करण्याची कोणाचीच तयारी नाही. प्रस्थापित दलित बांधवाना आणि आंबेडकर 
चळवळीचे फलित म्हणून जे उच्च शिक्षा विभूषित होवू शकले अशा नव तरुणांना मागे राहिलेल्या दलित बांधवाची आठवण येण्यासाठी अत्याचाराची घटना घडावी लागते. अशी घटना घडली कि हे तरुण जरूर चवताळून बाहेर येतात. दगडफेक करून थकल्यावर आपल्या घरट्यात परततात. पण दलितांवर अन्याय आणि अत्याचार होणारच नाहीत अशा पद्धतीने आंबेडकरा सारखे सातत्यपूर्ण कार्य आणि चळवळ करायची कोणाची तयारी नाही. एकीकडे गांधी चळवळ मृतप्राय झाली तर दुसरीकडे आंबेडकर चळवळीला उत्सवी आणि धार्मिक स्वरूप आले आहे. मुलभूत परिवर्तनाकडे लक्ष देण्या ऐवजी दलित तरुण गांधीना लक्ष्य आणि भक्ष्य बनविण्यात पुरुषार्थ मानू लागली आहेत. असे करताना दलितांना लक्ष्य व भक्ष्य बनविणाऱ्या सनातनी हिंदूंचा वारसा पुढे चालविणाऱ्या तरुणांच्या मनातील गांधी विषयीची मळमळ ते ओकतात याचेही भान दलित तरुणांना राहात नाही. एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करण्याची गांधीनी दाखविलेली तयारी त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाशी जोडून गांधींची हिंदुत्ववाद्यांनी जी सातत्याने खिल्ली उडविली आहे त्याचा संदर्भ दलित तरुणांनी लक्षात घेतला पाहिजे. सवर्ण हिंदुनी दलितांवर एवढे अत्याचार केले आहेत कि त्यामुळे चिडून कोण्या दलिताने मला हिंदू समजून माझ्या श्रीमुखात लगावली तर मी त्याचा प्रतिकार करणार नाही दुसरा गाल पुढे करीन असे गांधी म्हणाले होते.  पुणे कराराच्या नावाने किती काळ आम्ही गळे काढीत बसणार आहोत ? गांधीनी उपोषणाचा अस्त्र म्हणून वापर करून पुणे करार मान्य करायला भाग पाडण्याची घोडचूक केली हे खरे असले तरी पुणे करारात अंतर्भूत प्रश्नाकडे राजकीय मतभेद म्हणूनच पाहिले गेले पाहिजे. स्वतंत्र मतदार संघाला विरोध म्हणजे दलित विरोध असे  समीकरण मांडणे चुकीचे आहे. स्वतंत्र मतदार संघाचा निवाडा येण्याच्या आधी स्वत: बाबासाहेब अशा मतदार संघाला अनुकूल नव्हते. मुस्लीम समाजाला स्वतंत्र मतदार संघ बहाल केले नसते तर आपण कधीच दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ मागितले नसते असे त्यांनी स्पष्ट प्रतिपादन केले होते.गांधींच्या उपोषणा आधी अनेक दलित नेत्यांनी देखील स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला होता आणि हा विरोध एवढा तीव्र होता कि नागपुरात आंबेडकरांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. पुणे  कराराकडे गांधीनी आंबेडकरांना झुकविले असे पाहणेच चुकीचे आहे. या करारामुळे आंबेडकरांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी सोडावी लागली तरी इंग्रजांनी देवू केले  होते  त्या पेक्षा जवळपास दुप्पट  मतदार संघ दलितांसाठी मिळविण्यात आंबेडकर यशस्वी झाले होते हे विसरून चालणार नाही. इतिहासातील घटनेकडे सत्याचा विपर्यास करून पाहण्याने दलित चळवळीचे भले होणार नाही. गांधीचे तत्वज्ञान म्हणून जे पुढे मांडल्या जाते त्यात टाकाऊ आणि कालबाह्य गोष्टींचा भरणा अधिक असला तरी पूर्वग्रहातून मुक्त होवून दलित तरुणांनी आणि विचारवंतानी गांधीच्या दलित मुक्तीतील योगदानाचे पुनर्मुल्यांकन केले पाहिजे. कारण दलित मुक्तीसाठी आंबेडकर मार्ग जितका अपरिहार्य आहे तितकीच सवर्णांच्या परिवर्तनाच्या गांधी मार्गाची देखील गरज आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी ही गरज प्रकर्षाने सर्वांच्या लक्षात आली होती . त्या काळात जयप्रकाश आंदोलनातून निर्माण झालेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून आम्ही चंद्रकांत वानखडे, मोहन हिराबाई हिरालाल,डॉ.सुगन बरंठ  यांच्यासह तरुणांची नामांतर यात्रा विदर्भात काढली होती. या यात्रेचे दालीताकडून स्वागत झाले तरी सवर्ण उदासीन होते हे लक्षात घेवून आम्ही यात्रा सवर्ण वस्तीतच थांबेल आणि सवर्णांनी खाऊ घातले तरच जेवू असा संकल्प काही ठिकाणी उपाशी राहून पूर्णत्वाला नेला होता. पण हा प्रयत्न प्रतीकात्मक होता. दलित मुक्तीसाठी अशा प्रयत्नांना चळवळीचे स्वरूप येणे गरजेचे आहे. अशा प्रयत्नांना आंबेडकरी चळवळीचा भाग मानण्याची गरज आहे. दलित मुक्तीच्या रथाचे गांधी आणि आंबेडकर ही निखळून पडलेली दोन्ही चाके पुन्हा त्या रथाला जोडल्याशिवाय दलित मुक्तीचा रथ पुढे जावू शकत नाही हे समजून घेण्याची हीच वेळ आहे. 

                                    (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि.यवतमाळ 

11 comments:

  1. सतत आपले लेख या ब्लॉगवर वाचत असतो, व पुढच्या लेखाची वाट पहात असतो. कारण एकच. सद्ध्याच्या पोकळ अभिनिवेषाच्या, द्वेषाच्या अन वैचारिक गोंधळाचा फायदा उठवून राजकीय हेतू साध्य करण्याच्या काळात नरहर कुरुंदकरांची आठवण करून देणारे आपले लेख हा एक सुखद अपवाद आहेत.
    हा लेखही असाच संयत, माहीतीवर आधारित, सौजन्यशील तरीही परखड सत्यावर प्रकाश पाडतो.
    धन्यवाद - डॉ अरूण गद्रे

    ReplyDelete
  2. अतिशय सांगोपांग विवेचन करणारा लेख. गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचे मर्म इतक्या साध्या भाषेत समजावलेले मी प्रथमच पाहिले. यावर अधिक सखोल लेखन होण्याची गरज आहे. आजच्या तत्त्वहीन राजकारणाला छेद देण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाची चर्चा आजच्या तरुण पिढीसमोर होणे गरजेचे आहे. अन्यथा राजकारण म्हणजे केवळ भ्रष्टाचार, आणि राजकारणी लोक म्हणजे केवळ निर्बुद्ध असे सध्या रुजू घातलेले समीकरण दृढ होण्याची शक्याना फार! यावर पुस्तक लिहा असा आग्रह धरावासा वाटतो.

    ReplyDelete
  3. Very good and thought provoking article. I agree with you to find common ground and don't take Gandhi or Ambedkar as Mahatmas but to evaluate and take this revolution of reconciliation further. There is need of reconciliation between two potent forces. Mahatma Gandhi is established icon and pro Brahminism who wants to reform Hinduism which is not at all religion but system of slavery needs to be distroyed. Revolution of love and promotion of human equality through mutual understanding and dialogue is answer. Dharmadhikari's solution of broom in Brahmin's hand and Gita in Lowered caste's hand is not an answer which is problematic and offensive to both. Brother/ sisterhood between two through love and dignity is answer. Basava, Tukarama, Phule, kabir ,Nanak and Ambedkar have prepared the way ,let's walk on this road with heads held high and hand in hand with pen,zadoo( like Gadge baba) and great love in hearts with the Dream of Baliraj

    ReplyDelete
  4. श्री. जाधव,
    आपली व माझी ओळख नाही. एका परिचिताने आपल्या ब्लॉगची ही लिंक मला मेल केली. आपला लेख वाचून ठसठसत्या जखमेवर कुणीतरी मलम लावल्यासारखे वाटले. ज्या विषयाला आपण हात घातला आहे, तो फार महत्वाचा आहे. विशेषतः आंबेडकरी चळवळीतील तरुणांना दिशाहीन करण्यात काहीजण गेली काही वर्षे धन्यता मानत आहेत. तुम्ही म्हणता तसे सवर्णांनी जातीभेद निर्मूलनाचे काम जवळपास थांबवलेच आहे. जातीगत अहंकाराने त्यांचा पिच्छा अद्याप सोडलेला नाही. अशा स्थितीत दलितबहुजन समाजातील तरुणांची माथी भडकली तर त्यांना दोष देता येणार नाही. मात्र त्यांच्या डोक्यात जहरी विचारांच्या पुड्या सोडणाऱ्या लबाड लोकांचे ढोंग उघड करण्याची वेळ आली आहे. गांधी हे नाव ऐकले तरी हिंदुत्ववादी आणि आंबेडकरी तरुण एकाच भाषेत बोलू लागतात, गांधींच्या वैयक्तिक बदनामीपर्यंत त्यांची मजल पोहोचते यामागचे गौडबंगाल उलगडून दाखवायला हवे. या देशातल्या लोकशाही समाजवादी चळवळीने जातीअंताच्या लढाईतून काढलेला पळ हाही याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. माणसांचे देव किंवा राक्षस बनविणे ही हिंदू प्रवृत्ती आंबेडकरी चळवळीनेही आपलीशी करावी याचे दुःख वाटते.
    आपण या विषयावर खरे तर सविस्तर लिहायला हवे. जमले तर एखादे पुस्तकच.
    प्रतिमा जोशी,
    महाराष्ठ्र टाइम्स

    ReplyDelete
  5. Nicely written analysis.

    Nanawaty

    ReplyDelete
  6. Read such a mature article on gandhi- ambedkar relation for first time. thanks. Sumati Unkule

    ReplyDelete
  7. आत्म सम्मान जागृत करने वाली फुळे-अम्बेदकर की धारा और आत्म-शुद्धि का आवाहन करने वाली गांधी की धारा दोनों को पूरक होना पडेगा ।
    आपकी अनुमति से यह कड़ी दे रहा हूं : गांधी अम्बेडकर और मिट्टी की पट्टियां [सात भागों में }

    ReplyDelete
    Replies
    1. Compliments for very clear, nuanced, balanced approach. Yash Sumant has also drawn attention to the need to grasp that on the issue of overcoming casteism, the role of Gandhi and Ambedkar has been complimentary also. Anant Phadke

      Delete
  8. savarna ani tyancha dharm yachashi amhala kahi dene ghene naahi.

    ReplyDelete
  9. तुमी मनता हे बरो बर आहे पन ़ गाधी व अबेंडकर कुटे राहीले या काळत . सर्वे जन आप आपले कीसे भरत आहे .समाजाकडे लश देन्यासाटी कोनाकड वेड आहे हो . असेल तरी वेड पन आपली दार शीजवन्या येन्याचा देखावा करतात . असे आहे या काडातील मानुस की . काही चुकले तर माप करा .
    वाचक
    र्कीष्णा कुमरे

    ReplyDelete