Monday, October 21, 2013

अमर हबीब : आव्हानांना आव्हान देणारा कार्यकर्ता

अमरने  त्याने स्विकारलेल्या आणि त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिका सारख्याच ताकदीने निभावल्या.  अमरकडे पत्रकार म्हणून पाहिले तर तो हाडामासाचा पत्रकार वाटतो. लेखक - प्रकाशक म्हणून पाहिले तरी तसेच वाटते.  कार्यकर्ता म्हणून पाहिले तर त्याला तोडच नाही असे वाटते. कुटुंबियांसाठी तो संपूर्ण कुटुंबवत्सल असतो तर माझ्या सारख्यांसाठी असतो तो फक्त मित्र. .पण कोणत्या भूमिकेतला अमर श्रेष्ठ हे डोळसपणे पाहूनही  ठरवता येत नाही. . जात,धर्म ,पक्ष ,पंथ याच्या पलीकडे विचार करणारा  माणूसपण जपणारा माणूस हीच त्याची खरी ओळख आहे. 'आम्ही सारे' नी अमर नावाच्या कार्यकर्त्याचा नाही तर माणूसपण जपणाऱ्या माणसाचा गौरव केला आहे.
----------------------------------------------------------------------------

अमर हबीब  आणि माझी पहिली भेट झाली ती आणीबाणीत नासिकच्या तुरुंगात. मी सर्वोदय चळवळीशी तर तो सेवादल परिवाराशी संबंधित. तुरुंगात असलेले समाजवादी नेते बापू काळदाते आणि 'मराठवाडा'कार अनंत भालेराव यांचे सर्वोदय चळवळीशी जवळचे आणि ममत्वाचे संबंध असल्याने   औरंगाबादला कार्यकर्ता म्हणून वावरताना त्यांच्याशी माझे जितके जवळचे संबंध होते तितकेच अमरचेही तो सेवादलात सक्रीय असल्याने त्यांचेशी आपुलकीचे नाते होते. त्यामुळे आमच्यात परिचय आणि संवाद व्हायला वेळ लागला नाही. शेखर सोनाळकरही असाच जवळ आलेला.  तुरुंगात आमचे त्रिकुट तयार झाले. अमर - शेखर हे सेवादलात जाणारे असल्याने समाजवादी विचारसरणीने प्रभावित तर मी सर्वोदयी. गांधी हा आमच्यातील समान दुवा असला तरी विचार भिन्नतेने वाद व्हायचेच. यातून दूर जाण्या ऐवजी एकमेकांच्या अधिक जवळ आलो , एकमेकांना जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता आले. शेखर आम्हा दोघापेक्षा जास्त अभ्यासू होता आणि समाजवादी विचाराच्या वाचनाने भारावलेला सुद्धा होता. त्यामुळे त्याच्याशी हलकी फुलकी आणि पुस्तके व विचार या पलीकडची चर्चा व्हायला फारसा वाव नसायचा. अमरचे आणि माझे वेगळे विचार , वेगळ्या पोथ्या होत्याच , पण त्यापलीकडे जावून हलक्या-फुलक्या आणि सुख-दु;खाच्या गोष्टी आमच्यात चालायच्या आणि त्यातून माझ्यात आणि अमर मध्ये जास्त सख्य आणि मैत्र निर्माण झाले. भिन्न विचार , भिन्न पार्श्वभूमी याने संबंधात बाधा न येता दोघानाही समृद्ध केले.  आमचे हे सख्य त्रिकुटाच्या मैत्रीला बाधा आणणारे ठरले नाही. तुरुंगातील त्या दिवसांनी पुढे एकत्र काम करण्याचा पाया रचला . आणीबाणी  नंतर लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी बिहार राज्याच्या बाहेरच्या तरुणांना संघटीत करून परिवर्तनाच्या चळवळीत आणण्या साठी छात्र युवा संघर्ष वाहिनीचा देशभर विस्तार करण्याचा निर्णय घेवून त्यासाठी राष्ट्रीय समितीचे गठन केले. सहा जणांच्या त्या समितीत मला स्थान मिळाले आणि महाराष्ट्रातील कामासाठी टीम उभी करण्याची जबाबदारी येवून पडली. साहजिकच या टीम साठी पहिले नाव अमरचेच समोर आले. अमर , शेखर हे समाजवादी विचारसरणीचे तर किशोर देशपांडे , चंद्रकांत वानखेडे आणि मी सर्वोदायाच्या जवळचे अशी आमची टीम तयार झाली. या टीम मध्ये संघटन कौशल्य , संवाद कौशल्य , कार्यक्रमाचे नियोजन आणि कार्यकर्त्यात उत्साह निर्माण करणारे व्यक्तित्व असा आम्हा सर्वाना अमरचा जवळून परिचय झाला. आम्हा सर्वात अमरचे हे वेगळेपण उठून दिसले त्याचे कारण त्याचा जीवनानुभव आमच्यापेक्षा मोठा आणि अस्सल होता. आम्हा सर्वांचीच आर्थिक परिस्थिती अमर पेक्षा फार चांगली आणि वेगळी होती अशातला भाग नाही. पण आमची वाढ कुटुंबाच्या संरक्षण आणि छत्रछायेत झाली. आम्ही सगळेच कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध परिवर्तनाच्या चळवळीत सामील झालो तरी कुटुंबाचे संरक्षण सोडले नव्हते. अमर मात्र याला अपवाद होता. काम मिळावे , कमाई करता यावी आणि जग जवळून पाहता यावे यासाठी अमरने थोडे कळू लागताच घर सोडून दिल्ली पर्यंत मजल मारली होती. त्या वयात प्रतिकुलतेचा यशस्वी सामना केला होता. याचा त्याला पुढे ज्या ज्या क्षेत्रात तो गेला तेथे तेथे त्याचा उपयोग झाला.

मानधनावर व देणग्यावर अवलंबून राहून अमरने कधीच समाजकार्य केले नाही. ज्यांनी असे केले त्यांचे काम एकसुरी आणि चाकोरीबद्ध राहिले. अमरच्या उद्यमीवृत्तीने त्याला समाजापासून वेगळा पडलेला सामाजिक कार्यकर्ता बनविले नाही. छोटेखानी वर्तमानपत्र सुरु करणे , छापखाना टाकणे , प्रकाशन संस्था सुरु करणे अशी सामाजिक चळवळी साठी पूरक ठरतील असे उद्योग केल्याने त्याला स्वत:ला अनुभव समृद्ध होता आले आणि ही अनुभव समृद्धता सामाजिक चळवळीसाठी पूरक आणि उपयुक्त ठरली. दुसरीकडे सामाजिक चळवळीतील सहभाग त्याच्या या दुसऱ्या कामना आशय संपन्न बनवीत गेला. या कामामागची प्रेरणा नफ्याची किंवा पैसा कमावण्याची राहिली नाही. पण त्याच बरोबर अशा कामांसाठी कोणाला आर्थिक फटका बसू नये हे पाहणे ओघाने आलेच. . त्याने फार मोठ्या आणि नावाजलेल्या वृत्त समूहात काम करून पत्रकार म्हणून नाव कमावले नाही. तर कोणाचाच पाठींबा नसलेले छोटेखानी नियतकालिक चालविताना जे प्रयोग केले , अनुभवावर आधारित डोळस लिखाण केले त्यामुळे तो नावाजलेला पत्रकार झाला. मोठ्या वृत्त समूहात काम करणाऱ्या मोठमोठ्या पत्रकारांचा गुरु झाला. अंबाजोगाई सारख्या छोट्या आणि आडवळणी गावात प्रकाशन संस्था सुरु करणे , कोणत्याही जाहिरातीविना चालविणे आणि वैचारिक व दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून त्याचा नवा वाचकवर्ग तयार करणे हे अवघड काम लीलया पार पाडण्यात तो यशस्वी झाला याचे कारण त्याचा निरनिराळ्या क्षेत्रातील लक्षणीय वावर आणि धडपड हे आहे. आजमितीला साने गुरुजीची धडपडणारी मुले म्हणून ज्या थोड्या लोकांकडे बोट दाखविता येईल त्यात अमरचे नाव ठळक असेल. यातून लोक समजायला आणि विचाराची उपयुक्तता आणि मर्यादा समजायला अमरला नक्कीच मदत झाली आहे. यातून अमरचे व्यक्तिमत्व संतुलित बनले.  कामात एकारलेपण नसल्याने विचारात एकांगीपणा आणि विचाराचा दुराग्रह त्याला सहज टाळता आला जयप्रकाश नारायण यांच्यातील विचाराचा खुलेपणा अंगीकारायला अमरला अडचण गेली नाही. एका टप्प्यावर एक विचार उपयुक्त वाटला म्हणून कायम आंधळेपणाने त्याचा पाठपुरावा करणारा अमर इतक्या वर्षात मला कधी दिसलाच नाही. विचाराच्या खुलेपणा मुळेच अमर समाजवादापासून आर्थिक उदारीकरणा पर्यंत वाटचाल करू शकला. विचाराचा हा खुलेपणाच शेतकरी नसताना शेतकरी संघटनेचा विचार आत्मसात करायला कारणीभूत ठरला. विचार आणि कृतीत साचलेपण येवू न देण्याचा सातत्याने व डोळसपणे प्रयत्न करीत राहिल्याने त्याचे कार्य प्रवाही आणि प्रभावी राहिले आहे.  अशाप्रकारच्या कामांनी त्याला सामाजिक चळवळीत काम करण्याचे बळच दिले नाही तर चळवळी बलवान करायलाही मदत झाली. शेतकरी नसतांना आणि शेतीचा अनुभव पाठीशी नसताना ज्या सहजतेने अमर शेतकरी संघटना आणि विचार याशी एकरूप झाला त्याचे कारणच जीविकेच्या संघर्षातून झालेले समाजाचे आकलन.  जाती , धर्म , व्यवसाय अशा स्वरुपात त्याने समस्यांचा वेध  कधीच घेतला नाही. प्रत्येक समस्येकडे तो मानवाची समस्या म्हणून बघत गेला आणि सोडविण्याचा प्रयत्न करीत गेला. म्हणूनच तो शेतकरी नसताना शेतकरी संघर्षात आघाडीवर राहिला आणि दलित नसताना नामांतरासाठी लाठ्या खाण्यात आघाडीवर राहिला. संघर्ष वाहिनीचा राष्ट्रीय संयोजक असताना बोधगयातील भूमिहिनांच्या संघर्षाला दिशा आणि बळ दिले.
 
अमर ज्या समाजात वाढला त्या समाजात छोटी-छोटी वाटणारी आणि हलकी भासणारी कामे करण्याचा संकोच कधी नव्हताच. अशा छोट्या छोट्या कामातून तो मोठा झाला. ज्या समाजाने  त्याच्या मोठे होण्याचा पाया रचला त्या समाजाच्या दु:खाची जवळून जाणीव असूनही त्यांच्यासाठी वेगळे त्याने काही केले  नाही असे मुस्लिमांना तर वाटतेच पण मुस्लिमेतर समाजातील त्याला ओळखणाऱ्या अनेकांना देखील हा प्रश्न पडतो. हमीद दलवाई सारखी भूमिका त्याने घ्यायला हवी अशी तीव्र पण अव्यक्त भावना मुस्लिमेतर समाजात आहे आणि तो अशी भूमिका का घेत नाही हा त्यांना कायम पडलेला प्रश्न आहे.   पुरोगामी बनून मुस्लीम समाजात काम केले कि तो कार्यकर्ता हिंदूंच्या गळ्यातील ताईत बनतो आणि मुस्लिमांना मात्र तो आपला वाटत नाही. हमीद दलवाईच्या बाबतीत असेच घडले. त्यांच्यातील बनून काम करावे तर हिंदू बहुल समाज शंकेच्या नजरेने पाहतो. या दोन्ही भूमिका त्याला एकांगी वाटत असाव्यात. अशी एकांगी भूमिका त्याने कधीच स्वीकारली नाही. मुस्लीम धर्म आणि समाज जगभर पसरला असल्याने त्यांच्यातील सामाजिक सुधारणांचा प्रश्न स्थानिक पातळीवर हाताळण्याला मर्यादा आहेत याचे चांगले भान अमरला असल्यने त्यात त्याने शक्ती वाया घालविली नसावी.  मुस्लिमात सामाजिक सुधारणांचा प्रयत्न केला असता तर अमरला मुसलमानेतर समाजात मोठी मान्यता आणि लोकप्रियता  अगदी सहज मिळाली असती. एकही सुधारणा घडवून आणू न शकणारा सुधारक म्हणून स्वत;ला मिरवून न घेण्यात अमरचा सच्चेपणा दिसून येतो. व्यापक भूमिकेतून मुस्लीम समाजाशी निगडीत आर्थिक प्रश्न हाताळून मुस्लीम आणि मुस्लिमेतर समाजाला एकमेकांविरुद्ध संघर्ष करीत बसण्यापेक्षा एकत्र संघर्ष करायला प्रवृत्त केले . अमरने शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यात आणि जागतिकीकरणाचा स्विकार करण्यामागे मुस्लीम समाजाच्या आर्थिक प्रगतीचा प्रामुख्याने विचार केल्याचे जाणवते. मुस्लिमेतर समाजात शेतकरी विरोधी समाजवादी भूमिकेत जास्त लोकप्रिय होता येते. पण ग्रामीण भागातील मुस्लीम समाज शेतीवर तर शहरी भागातील मुस्लीम समाज छोट्या-छोट्या स्वयंरोजगारावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन आणि जागतिकीकरण या दोन्ही गोष्टी मुस्लीम समाजासाठी त्यांचा आर्थिक स्तर सुधारायला आवश्यक अशा होत्या. अमरचे शेतकरी संघटनेत असणे आणि समाजवाद सोडून आर्थिक उदारीकरणाचा पुरस्कार करणे हे अनेकांसाठी असलेले कोडे यातून उलगडते. धर्म न पाळणारा इमानदार व्यक्ती ही त्याची ओळख हाच मुस्लिमांच्या मनात आपल्या धार्मिक आस्थेबद्दल प्रश्न निर्माण करणारी ठरली. असा प्रश्न निर्माण होणे हाच धर्माच्या बेड्या तोडण्याचा प्रारंभ ठरतो. धर्म न पाळणारा व्यक्ती इमानदार राहू शकतो हे इस्लाम मान्य करीत नाही . पण अमरचे धर्म न पाळता इमानदार असणे हे त्याला ओळखणाऱ्या मुस्लिमांना पडलेले कोडे धर्म आणि सामाजिक सुधारणांकडे नेणारे ठरणार असल्याने आपला समाज सुधारण्यांसाठी अमरने काहीच केले नाही असा ठपका आपल्याला ठेवता येणार नाही.   
 
अमरने सारख्याच ताकदीने त्याने स्विकारलेल्या आणि त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिका निभावल्या. त्या आंधळ्याची आणि हत्तीची गोष्ट अमरच्या विशाल व्यक्तिमत्वाला तंतोतंत लागू पडते. हत्तीचा अंदाज घेतांना आंधळ्याला हत्तीच्या पायाला स्पर्श झाला तर पायालाच हत्ती समजतो, कानाला स्पर्श झाला तर त्यालाच संपूर्ण हत्ती समजतो. अमरच्या बाबतीत अनेकांचे असेच होत आले आहे. अमरकडे पत्रकार म्हणून पाहिले तर तो हाडामासाचा पत्रकार वाटतो. लेखक - प्रकाशक म्हणून पाहिले तरी तसेच वाटते.  कार्यकर्ता म्हणून पाहिले तर त्याला तोडच नाही असे वाटते. कुटुंबियांसाठी तो संपूर्ण कुटुंबवत्सल असतो तर माझ्या सारख्यांसाठी असतो तो फक्त मित्र. माझे आणि अमरचे मैत्री आणि कौटुंबिक संबंधाच्या मर्यादा पलीकडचे नाते. इतक्या जवळून कित्येक वर्षापासून अमरला मी पाहात आलो.पण कोणत्या भूमिकेतला अमर श्रेष्ठ हे डोळसपणे पाहूनही मला ठरवता आले नाही. खरे तर बाहेरच्यांसाठी त्याच्या या भूमिका वेगवेगळ्या असतील. त्याचे व्यक्तिमत्व मात्र या सर्व भूमिकांच्या समन्वयातून साकार झाले आहे. जात,धर्म ,पक्ष ,पंथ याच्या पलीकडे विचार करणारा माणूसपण जपणारा माणूस हीच त्याची खरी ओळख आहे. 'आम्ही सारे' नी अमर नावाच्या कार्यकर्त्याचा नाही तर माणूसपण जपणाऱ्या माणसाचा गौरव केला आहे.
                             (संपूर्ण)
सुधाकर जाधव
पांढरकवडा,जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८

3 comments:

  1. गौरव लेख कसा असावा याचा वस्तुपाठ आहे हा लेख

    ReplyDelete
  2. जाणीव ठेऊन केलेले उत्कृष्ट लेखन .

    ReplyDelete
  3. प्रिय मित्र,
    अमर हबीब पर इससे सुंदर लेखन की कल्पना भी नहीं की जा सकती. उनका व्यक्तित्व तो सुंदर है ही, किंतु चाँद की तारीफ कालिदास जब करता है तो वह तारीफ चाँद से भी बड़ा दस्तावेज बन जाती है. यही इस लेखन के साथ होगा. जब कभी अमर को समझने की कोशिशें की जायेगी, यह लेख एक दस्तावेज की तरह सभी के काम आएगा.
    दिनेश शर्मा

    ReplyDelete