Thursday, July 3, 2014

'आप' च्या निर्मितीतच पराभवाची बीजे

आंदोलन आणि निवडणुकीचे राजकारण या दोन भिन्न गोष्टी आहेत हे ध्यानी न घेतल्याने पक्षाच्या पदरी मोठे अपयश आले आहे.. नेमके ज्या गोष्टीमुळे आंदोलन उभे राहते , वाढते त्याच गोष्टीचा राजकारणात वापर केला तर अपयश येते हेच आम आदमी पार्टीच्या पराभवाने दाखवून दिले आहे.
-----------------------------------------------------


लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या झालेल्या अभूतपूर्व वाताहतीमुळे पराभवाची सारी चर्चा कॉंग्रेस केंद्रित राहिली.  इतर पक्षांची पडझड कॉंग्रेस इतकीच दयनीय असूनही ती दुर्लक्षित राहिली आहे.  कॉंग्रेसचा पराभव अपेक्षित होता पण त्याची झालेली वाताहत अपेक्षित नव्हती. कॉंग्रेस इतकीच  इतर पक्षांची वाताहत देखील अनपेक्षित होती. इतर पक्षांच्या बाबतीत  मतदारांनी जो नीरक्षीर विवेक दाखविला त्यावरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसचे समर्थन करणाऱ्या पक्षांना कॉंग्रेस सारखीच शिक्षा  दिल्याचा निष्कर्ष काढता येतो. उ.प्र. मधील समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवची राजवट आणि प.बंगाल मधील तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बैनर्जीची राजवट याच्यात कोणताही गुणात्मक फरक नसतांना आणि दोघांचाही मोदी विरोध सारखा असतांना मतदारांनी यादवांना पायदळी तुडविले तर ममताला डोक्यावर घेतले यातून या निष्कर्षाची पुष्टीच होते. मतदारांनी फक्त मोदी आणि भाजपलाच डोक्यावर घेतले नाही तर कॉंग्रेस विरोधी सर्वच पक्षांना उचलून धरल्याचे दिसून येते. शिक्षा मिळाली ती कॉंग्रेस सोबत सरकारात असणाऱ्या पक्षांना आणि संसदेत वेळोवेळी बाहेरून समर्थन दिलेल्या समाजवादी आणि बसप सारख्या पक्षांना .  या सूत्राला अपवाद दोन पक्ष राहिले आहेत. कॉंग्रेस खालोखाल जुना असलेला कम्युनिस्ट पक्ष आणि नवोदित आम आदमी पार्टी . या दोन्ही पक्षांचा कॉंग्रेस विरोध जगजाहीर असताना मतदारांनी या दोन पक्षांना इतर कॉंग्रेस विरोधी पक्षाप्रमाणे डोक्यावर न घेता झिडकारले आहे. त्यामुळे कॉंग्रेस विरोधी असलेल्या आणि तरीही मतदारांनी नाकारलेल्या या पक्षांच्या पराभवाचा वेगळा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येल्चुरी यांनी  पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण करतांना तरुण वर्ग कम्युनिस्ट पक्षाकडे आकर्षित होण्याऐवजी आम आदमी पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचेकडे आकर्षित होत असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. २५-३०  वर्षापूर्वी समाज बदलाचा विचार करणाऱ्या तरुणाचे साम्यवादाचे आकर्षण स्वाभाविक आणि तारुण्यसुलभ  मानले जायचे. प्रागतिक बदलाचा विचार करणारा तरुण कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित नसला तरी त्याला 'मार्क्सवादी' असल्याचा अभिमान असायचा. कम्युनिस्ट रशियाचे पतन आणि लाल झेंड्याखाली भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारा चीन पाहिल्या नंतर तरुणांचे मार्क्सवादाचे आकर्षण लयाला गेले. रशियाचे पतन आणि भांडवलशाहीच्या ताकदीवर साम्यवादाचा झेंडा फडकवत ठेवणारा चीन मार्क्सवादाचा पुनर्विचार आणि पुनर्लेखन करण्याचा संदेश देत आहे हे आपल्या देशातील मार्क्सवादी धुरिणांनी लक्षात घेतले नाही. परिणामी तरुण वर्ग मार्क्सवादा पासून दूर झाला आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना ओहोटी लागली. याचेच प्रत्यंतर निवडणूक निकालातून आले आहे. आम आदमी पक्षाला मिळालेली मते लक्षात घेतली तर सर्वसाधारण तरुण या पक्षाकडे आकर्षित झालेला दिसत नाही. आदर्शाच्या कल्पनाविश्वात रममाण तरुणच आम आदमी पक्षाकडे आकर्षित झाला असावा. आदर्शाच्या किंवा विचारधारेच्या बंधनात न अडकलेला सर्व साधारण तरुण नरेंद्र मोदी यांचेकडे वळल्याचे त्यांच्या यशावरून स्पष्ट होते. २००९ ते २०१४ या दरम्यान १० कोटी पेक्षा अधिक नवे मतदार नोंदले गेलेत आणि याच नव्या मतदारांनी बदल घडवून आणला असे मानायला आधार आहे. सर्वसाधारणपणे पराभूत पक्षांचा जनाधार घसरला नाही ,पण विजेत्या पक्षाच्या जनाधारात प्रचंड वाढ झाली आणि ही वाढ नवी नोंदणी झालेल्या मतदार संख्येशी मिळती जुळती आहे. तरुणवर्ग कम्युनिस्ट पक्षाकडे जसा फिरकला नाही तसाच तो आम आदमी पार्टीकडे सुद्धा वळला नाही हेच मतदानाची आकडेवारी दर्शविते. कम्युनिस्ट पक्ष जुना आहे , त्याचे तत्वज्ञानही जुने आहे त्यामुळे त्यांच्या बद्दलचे तरुणांचे आकर्षण कमी होणे समजू शकते. पण 'आप' सारख्या नव्या पक्षाचे नव्या पिढीला आकर्षण असू नये ही बुचकाळ्यात टाकणारी गोष्ट आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता सोडून दाखविलेला पळपुटेपणा आणि संघटन नसतांना ४०० च्या वर जागा लढविण्याचा केलेला अट्टाहास ही 'आप'च्या पराभवासाठी दिली जात असलेली कारणे चुकीची नसली तरी वरवरची आहेत. 'आप'ची राजकारणाची , समाजकारणाची आणि अर्थकारणाची अपुरी समज या पराभवाच्या मुळाशी आहे. आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेले अनेक लोक 'आप'मध्ये असण्याने या क्षेत्रातील समज वाढत नसते हे 'आप'ने सिद्ध केले आहे. हा पक्ष स्वत:ला इतरांपेक्षा स्वच्छ, त्यागी आणि म्हणून श्रेष्ठ मानत आला आहे आणि या पक्षाचे हेच निवडणुकीसाठीचे भांडवल होते. हे गुण आंदोलन उभे करणे आणि चालविणे यासाठी उपयुक्त असले तरी एवढ्या आधारावर राजकारण करता येत नाही हे या पक्षाला उमगले नाही. एवढेच तुमचे भांडवल असेल तर निवडणुकीत चर्चा आर्थिक , सामाजिक आणि राजकीय मुद्द्याची न होता व्यक्तीची होते. मग पद सोडले तरी बंगला सोडला नाही हा मुद्दा निवडणुकीत मोठा बनतो. पद गेल्यानंतरही वर्षानुवर्षे  असे बंगले आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या सर्वपक्षीय महाभागांची संख्या आपल्याकडे कमी नाही आणि त्यांच्या बाबतीत हा कधी निवडणुकीचा मुद्दा बनत नाही. कारण आचरणातील शुचिता हे त्यांचे भांडवल कधीच नव्हते. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचारापेक्षा वैयक्तिक गुणांना जे महत्व देतात त्यांची चिकित्सा लोक त्या गुणांच्या आधारेच करणार .'आप'चा सामाजिक , आर्थिक राजकीय दृष्टीकोन या निवडणुकीत चर्चिला न जाता त्यांच्या उमेदवाराचे गुणदोष तेवढे चर्चिले गेले. हा लोकांचा दोष नाही . या पक्षाच्या नेतृत्वाने लोकांपुढे दुसरा पर्याय ठेवला नाही. उमेदवार स्वच्छ आणि त्यागी असणे लोकांना आवडत नाही असे नाही . याचे भांडवल केलेले मात्र लोकांना भावत नाही. त्याचे भांडवल करूनच 'आप' निवडणुकीत उतरला हे नाकारता येत नाही.  निवडणुकीत मत देताना आपल्या समस्या दूर करण्याची क्षमता मतदारांकडून जोखल्या जाते.मतदाराशी उमेदवाराचा संपर्क निवडणुकीत निर्णायक ठरतो. काम करण्याची क्षमता आणि संपर्क महत्वाचा याच्या जोडीला त्याग असेल तर सोन्याहून पिवळे आणि नसेल तर काही बिघडत नाही ही मतदारांची मानसिकता 'आप' ने लक्षात न घेता निवडणुकीत उडी घेतली आणि दारुण पराभवाला निमंत्रण दिले. त्यामुळे 'आप'चे उमेदवार इतर उमेदवारापेक्षा स्वच्छ आणि त्यागी , पण बहुतांश उमेदवाराची मतदाराशी आणि मतदारसंघाशी पहिल्यांदाच गाठभेट पडलेली . अशी गाठभेट न पडताही लोक आंदोलनात सामील होतात. कारण आंदोलन कोण्या एकट्याचे आणि एकट्यासाठी नसते. निवडणुकीतील उमेदवारी मात्र एकट्याची असते आणि म्हणून उमेदवाराने आपल्या संपर्कात असले पाहिजे हे मतदारांना वाटते.'आप'चे दिल्लीतील यश हे पक्षाने प्रयत्नपूर्वक आणि नियोजनपूर्वक केलेल्या मतदार संपर्कामुळे मिळालेले यश होते. मतदारांना भेडसावणाऱ्या वीजे सारखी समस्या सोडविण्याच्या प्रयत्नाचे यश आहे. आम्ही काही स्वत:साठी निवडणूक लढवीत नाही मतदारांनी आम्हाला मते दिली नाही तर तो त्यांचाच तोटा असे म्हणून निवडणूक लढविणाऱ्याच्या वाट्याला जे यायला हवे तेच 'आप'च्या वाट्याला आले आहे !

 आंदोलन आणि निवडणुकीचे राजकारण या दोन भिन्न गोष्टी आहेत हे ध्यानी न घेतल्याने पक्षाच्या पदरी मोठे अपयश आले आहे.. आंदोलन यशस्वी करण्यासाठी जे गुण  आवश्यक असतात , त्याच गुणावर राजकारणात यशस्वी होता येत नाही, काही प्रसंगी आंदोलनाचे गुण राजकारणातील अडथळा बनतात. आंदोलना मध्ये टोकाची , एककल्ली भूमिका आंदोलनाला उभारीच देतात . राजकारणात अशीच टोकाची आणि एककल्ली भूमिका घेतली तर ती अजिबात चालत नाही. आम्ही म्हणतो तेच आणि तसेच झाले पाहिजे असे म्हंटले कि आंदोलक चेकाळतात आणि आंदोलन स्फोटक बनते . राजकारणात अशी भूमिका घेतली कि मतदार दूर पळतो. आंदोलनात तुमचा अहंकार , तुमचा 'मी पणा' प्रकट झाला तर टाळ्यांचा कडकडाट होईल. तडजोड करणार नाही म्हंटले कि आंदोलनाला जोर येईल . तडजोड करणार नाही ही भूमिका राजकारणात चालत नाही. लोकशाहीत तुम्हाला पटले नाही तरी दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते , त्या म्हणण्याला स्थान आणि महत्व द्यावे लागते. असे केले नाही तर राजकारणात तुमची हेकड म्हणून संभावना होते . हेकडपणा आंदोलनात खपून जातो , राजकारणातमात्र डोळ्यात गेलेल्या कुसळा सारखा खुपतो. नेमके ज्या गोष्टीमुळे आंदोलन उभे राहते , वाढते त्याच गोष्टीचा राजकारणात वापर केला तर अपयश येते हा धडा 'आप' ने या निवडणुकीपासून घेतला नाही तर 'आप'ला भारतीय राजकारणात भवितव्य असणार नाही.
मुळात भारतापुढील समस्याचे चुकीचे निदान करून 'आप'ची निर्मिती केली हीच 'आप' नेतृत्वाची घोडचूक आहे. देशापुढची एकमात्र मोठी समस्या भ्रष्टाचार आहे आणि या समस्येच्या  निर्मूलनाची जादूची छडी म्हणून 'जनलोकपाल' आणले कि काम संपले असे म्हणणे आणि मानणे याचा अर्थ हा देश आणि देशाचे राजकारण समजले नाही असाच होतो. भ्रष्टाचार आणि काळापैसा याची जननीच निवडणूक आहे. हाच तर राजकारणातला चिखल आहे. हा चिखल अंगाला लावून घेतल्याशिवाय निवडणुकीत यश मिळत नाही हीच भारतीय राजकारणाच्या शुद्धीकरणातील सर्वात मोठी अडचण आहे. निवडणूक लढविण्यासाठी इतका पैसा खर्च करावे लागणेच चुकीचे  आहे. कमीतकमी खर्चात निवडणुका  संपन्न होतील अशी निवडणूक व्यवस्था तयार करता आली नाही तर 'आप' सारखा पक्ष निवडणुका जिंकू शकणार नाही आणि अशी व्यवस्था तयार झाली तर  भ्रष्टाचार निर्मूलनाचे उद्दिष्ट आपोआप पूर्ण होणार असल्याने  'आप' ची गरजच उरणार नाही. अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सत्ता हाती घेणे अशक्यप्राय असेल तर अशा व्यवस्थेच्या निर्मितीसाठी आंदोलन हाच मार्ग उरतो. म्हणूनच आंदोलन सोडून पक्ष बनविण्यात 'आप' नेतृत्वाने घाईच केली असे नाही तर चुकीचा मार्ग निवडला असेच म्हणावे लागेल.

----------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा ,जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------

No comments:

Post a Comment