Thursday, October 15, 2015

माननीय प्रधानमंत्र्यांना खुले पत्र

 भाषण करताना तुमचे हात जसे मुक्तपणे हातवारे करतात ते हात कृतीच्या वेळी बांधून ठेवू नका. कोण आपला कोण परका याचा विचार न करता देशाचे स्वास्थ्य आणि सौहार्द बिघडविणाऱ्या चिथावणीखोरावर फक्त हात उगारा. तुमचा उगारलेला हात पाहूनच देशाच्या भाईचारा आणि एकतेला कुरतडणारे हे उंदीर बिळात पळतील.
---------------------------------------------------------------



माननीय प्रधानमंत्री ,

प्रारंभीच एक गोष्ट कबुल करतो . मी तुम्हाला सत्तेत येण्यासाठी मतदान केले नव्हते. तसे न करण्याचे प्रमुख कारण तुमचा पक्ष सत्तेत आल्या नंतर देशाच्या धर्मनिरपेक्ष चरित्रात बदल तर होणार नाही ना ही भीती होती. जगात जेवढे धर्म आणि संप्रदाय आहेत ते सगळे या देशात गुण्यागोविंदाने नांदून देशाच्या संपन्नतेत भर घालीत असल्याने ही सांस्कृतिक संपन्नता संपणार तर नाही ना ही भीती होती. कारण तुमच्या आणि तुमच्या पक्षामागे गेल्या १२५ वर्षा पासून देशाला हिंदूराष्ट्र बनविण्याचा ध्यास घेवून कार्यरत असलेली संघटना होती. इथल्या लोकशाही व्यवस्थेबद्दल या संघटनेला फारसे प्रेम आहे याची आणीबाणीचा अल्पकाळ सोडला तर स्वातंत्र्योत्तर काळात कधी प्रचीती न आल्याने देशातील धार्मिक सलोखा आणि लोकशाही संकटात तर येणार नाही ना अशी भीती स्वाभाविक होती. मतदान करणे आणि न करणे हा प्रश्न निवडणुकीपुरता असतो. एकदा निवडणूक आटोपली कि तिचा निकाल सर्वांनी मान्य करून पुढे जायचे असते. हीच तर लोकशाहीची खासियत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर तुम्ही सगळ्यांचे प्रधानमंत्री झालात आणि देशातील सगळी जनता तुमच्यासाठी एकसमान झाली. तुम्ही सुद्धा  मतदान न करणाऱ्या ६९ टक्के मतदारांनाही तुम्ही आपले मानले. 'सबका साथ , सबका विकास' ही तुमची घोषणाच होती. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठीच तर तुम्ही तुम्हाला मतदान न करणाऱ्या मतदारांना तुमच्या टीममध्ये स्थान दिले. तुमची टीम १२५ कोटीची असल्याचे लालकिल्ल्यावरून अभिमानाने सांगितले. या टीमचा एक सदस्य असल्याने मला तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार मिळाला आहे आणि तसे सांगणे एक नागरिक म्हणून कर्तव्य देखील आहे. त्याच साठी हे खुलेपत्र आहे.

तुमच्या कानावर काही गोष्टी टाकण्या आधी मला आणखी एक कबुली द्यायची आहे. तुम्ही प्रधानमंत्री झाल्यानंतर काही प्रसंग असे आलेत की माझ्या सारख्या तुमच्या विरोधकाला तुम्हाला मतदान न करण्यात , तुम्हाला समजून घेण्यात काही चूक तर झाली नाही ना असे वाटले. निवडून आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला तेव्हा संसदेच्या पायरीवर तुम्ही टेकविलेला माथा कोण विसरेल. तुमच्या पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याही डोळ्यात पाणी आणले होते. तेव्हा तुम्ही संसदेला लोकशाहीचे मंदीर संबोधले होते हे आजही मी विसरलो नाही.संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातील तुमच्याच पक्षाच्या नेत्यांसमोर झालेल्या पहिल्यावहिल्या भाषणात तुमच्या पक्षाला स्वातंत्र्याची कोणतीच विरासत नसताना तुम्ही खुल्या मनाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सेनानींचा गौरव केला होता.देशाच्या संविधान निर्मात्यांचे स्मरण करून त्यांच्यापुढे नतमस्तक होवून संविधानाचा गौरव केला होता. तुमच्या कारकिर्दीत गुजरात मध्ये जे काही घडले ते अगदी सहजपणे विसरून जाण्याचा तो क्षण होता. गुजरात आणि त्या ठिकाणी घडलेल्या घटनांना पाठीमागे टाकून तुम्ही नवी सुरुवात करीत आहात असे वाटण्याचा तो क्षण होता. तुमच्या त्या ऐतिहासिक भाषणावर तुमच्या पक्षांच्या संसद सदस्यांनी , मुख्यमंत्र्यांनी आणि इतर नेत्यांनी जी दाद दिली ती लक्षात घेता भीती वाटावे असे काही नाही असे वाटले होते. पण त्या प्रसंगी तुमच्या समोर बसलेल्या ज्या लोकांनी तुम्हाला जो अपूर्व प्रतिसाद दिला त्यांच्या पैकीच अनेकांनी संसदेच्या बाहेर आल्या नंतर तुम्ही संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात निर्माण केलेल्या भावनांना मूठमाती देण्यास प्रारंभ केला. तुम्ही व्यक्त केलेला विकासाचा ध्यास , त्यासाठी सुरु केलेले प्रयत्न पाहता तुमच्याच सहकाऱ्यांनी विकासा आड येणाऱ्या धर्मवादाचे भूत उभे करण्याचे उपद्व्याप विरून जातील असे वाटत होते. विकासासाठीच्या १२५ कोटीच्या तुमच्या टीम मध्ये सामील होण्यास तुमच्याच सरदारांना अजिबात स्वारस्य नसल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकीकडे देशाच्या विकासासाठी तुम्ही इतर राष्ट्रांचे उंबरठे झिजवून खोऱ्याने डॉलर देशात आणण्याचा प्रयत्न करीत आहात आणि तुमचे सरदार मात्र धर्मवादाचे जुनी मुडदे वर काढण्याच्या कार्यात दंग आहेत. विकासाच्या गोष्टी आता आम्हाला परदेशात होणाऱ्या तुमच्या भाषणातून तेवढ्या ऐकायला मिळतात. देशात मात्र विकासा ऐवजी धर्मवादाचे पुनरुज्जीवन करण्याच्या खटपटी आणि लटपटी सुरु आहेत. तुमच्याच पक्षाचे आणि तुमच्याच संघटनेचे सदस्य यात अभिमानाने आणि उन्मादाने पुढाकार घेत आहेत. देशाच्या धर्मनिरपेक्ष रचनेला आणि संविधानाला आव्हान देवून धार्मिक उन्माद वाढवीत आहेत. या धार्मिक उन्मादाने अल्पसंख्याकांनाच भयभीत करण्यात येत नसून विवेकवादाची , अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरु आहे. अशा वातावरणात आर्थिक विकासाला वाव आणि स्थान नसते . तुमच्या सगळ्या प्रयत्नावर ही मंडळी पाणी फिरवीत आहेत आणि त्याचे तुम्ही मूकदर्शक बनला आहात.

१२५ कोटीच्या टीमचा सेनापती अशा परिस्थितीत हतबल आणि लाचार असल्यासारखे वर्तन करीत असेल तर या १२५ कोटीच्या टीमची पांगापांग व्हायला वेळ लागणार नाही. ज्यानी ज्यांनी विकासाच्या शब्दाला प्रमाण मानून तुम्हाला मत दिले , मोदीच विकास करू शकतील असे लोकांना सांगत तुम्हाला भरभक्कम पाठींबा दिला त्या सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर खिळल्या आहेत . माझ्या सारखे तुमचे आधीपासूनचे जे विरोधक आहेत त्यांना 'बघा , आम्ही म्हणत होतो तसेच घडत आहे ना' असे बोलण्याची तुम्ही संधी देत आहात. माननीय प्रधानमंत्री , असे बोलण्याची आमच्या सारख्यांना संधी मिळते याचा आम्हाला अजिबात आनंद नाही. कारण असे बोलण्याची परिस्थिती असणे हे देशासाठी घातक आहे. आमच्या सारख्यांना चूक ठरविणे हेच देशहिताचे आहे. तशी गळ घालण्यासाठीच तुम्हाला हे पत्र लिहित आहे. उत्तरप्रदेशातील दादरीत अकलाखच्या बाबतीत जे घडले तो तुमच्यासाठी आणि देशासाठी एक 'वेक अप कॉल' आहे - जागे व्हा हे सांगणारा तो एक निर्वाणीचा इशारा आहे. हा इशारा तुमच्या पर्यंत नक्कीच पोचला आहे .तुमची थोडी हालचाल झाल्याचेही दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्या पासून रोखण्यासाठी तेवढी हालचाल पुरेसी नाही, खडबडून जागे होण्याची गरज आहे. तसे तुम्ही होताना दिसत नाही यामुळे तुमचे आजवरचे खंदे समर्थक नाराज होत आहेत. आमचे सोडा. आम्ही तर तुमचे विरोधकच. त्यामुळे आमचे बोलणे तुम्ही मनावर न घेणे समजू शकते. पण ज्यांनी तुम्हाला प्रधानमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत जाण्यास मदत केली त्यांची तरी तुम्ही निराशा करू नये . देशातील सर्वसामान्य जनतेच्या खूप आशा आहेत हो तुमच्याकडून . अच्छे दिन येण्याची चातकासारखी वाट पाहात आहे हो ही जनता. अच्छे दिन दाखविण्या ऐवजी तुमचे लोक त्यांना मध्ययुगीन रानटी जगाचा अनुभव देत आहेत. त्यांना आवरा . तेच तुमच्या आणि देशाच्याही हिताचे आहे. आमच्या सारख्या विरोधकाचे तुम्ही अजिबात ऐकू नका . पण तुमचे समर्थक , तुमचे काही सहकारी काय म्हणतात ते तरी ऐका. ज्यांच्याकडे देशाच्या विकासासाठी डॉलर मागायला जाता ते काय म्हणताहेत हे तरी ऐका. माझी अशी भावना झाली आहे की तुमच्या आजूबाजूचे लोक हे काहीच तुमच्या कानावर येवू नये याची दक्षता घेत आहेत. देशात सगळे कसे आबादीआबाद आहे अशी तुमची समजूत करून देत आहेत आणि त्यामुळे काहीच विपरीत घडत नाहीये या भ्रमात तुम्ही वावरत आहात. तुमचा हा भ्रम दूर करण्यासाठीच हे लिहित आहे. आजच्या परिस्थिती बद्दल तुमचे समर्थक काय बोलत आहेत हे तुमच्या कानी घातले तर तुम्हाला पटेल या आशेने हे लिहित आहे.

आज सर्वत्र देशातच नाही तर जगभर भारताच्या संदर्भात चर्चिल्या जात असलेल्या दादरीच्या घटनेबद्दल अनेक दिवस तुम्ही मौनमोहन झालात आणि उशिराने मौन तोडून जे काही बोललात त्यात काहीच दम नसल्या बद्दलची नाराजी या समर्थकांनी व्यक्त केली आहे.  देशाच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी रचनेला आव्हान देणाऱ्या घटनेबद्दल तुम्ही चक्क १० दिवस मौन पाळून होता. या दरम्यान अगदीच चिल्लर घटनावर तुम्ही तुमच्या आवडत्या ट्वीटर वर प्रतिक्रिया देत राहिलात. बोलले तेव्हा म्हणाले कि हिंदू-मुस्लिमांनी ठरवावे त्यांना विकास हवा की भांडत बसायचे. माननीय पंतप्रधान , इथे दोन जमाती एकमेकांशी भांडत नाही आहे. तुमचेच सहकारी भांडण उकरून काढून हल्ले करीत आहेत. सगळा दोष त्यांचा असताना तो लपविण्यासाठी तुम्ही दोन्ही जमातींना दोषी ठरविले.  याचा चुकीचा संदेश गेला. तुम्हाला प्रधानमंत्री पदाच्या खुर्ची पर्यंत पोचविण्यासाठी माध्यमातील ज्या पंडितांनी वातावरण निर्मिती केली त्यांच्या पैकी काही जणांची मते मी तुम्हाला ऐकवीत आहे. प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभ लेखिका तवलीन सिंग म्हणतात कि . दादरीत अकलाखच्या हत्येला अपवादाने घडलेली गुन्हेगारी घटना म्हणून पाहण्याची आणि तिची तीव्रता कमी करण्याची चूक कोणी करू नये.त्यांच्या मते या घटनेवर तुम्ही खूप उशिरा तोंड उघडले. उशिरा का होईना जे काही बोललात त्यामुळे चुकीच्या लोकांना चुकीचा संदेश मिळाला. अशा घटनांना खतपाणी घालणाऱ्यांवर जरब बसावी आणि लोकात विश्वास निर्माण व्हावा असे त्यात काही नव्हते. त्याही पुढे जावून त्यांनी तुमच्या विकासाच्या प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सुशासन आणण्यासाठी ज्या डिजिटल इंडियाचा तुम्ही पुरस्कार करीत आहात ती डिजिटल साधने वापरून तुमच्या पक्षाचे लोक झुंडशाही निर्माण करीत आहे. तुमच्या सहकाऱ्यांची मानसिकता आधी बदला नाही तर विकास निरर्थक ठरेल असा इशारा तवलीन सिंग यांनी दिला आहे. माध्यमातील तुमच्या दुसऱ्या कट्टर समर्थक मधु किश्वर यांनी तर घडणाऱ्या घटनावरची तुमची प्रतिक्रिया पाहून तुमच्यावर कोणी काळी जादू तर केली नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. याच मधु किश्वर यांनी निवडणूक काळात "मोदीनामा" नावाचे पुस्तक लिहून तुमची हवा बनावी यासाठी हातभार लावला होता. तुमच्यासाठी निवडणूक काळात जी जाहिरात यंत्रणा राबली होती त्याची एक सदस्य असलेल्या अर्पिता चटर्जी यांनी सध्याच्या घटना बघून तुमच्या निवडणूक प्रचारात जी मदत केली त्याबद्दल आपल्याला भयंकर पश्चाताप होत असल्याचे नमूद केले आहे. तुमचे खंदे समर्थक असलेले दुसरे स्तंभ लेखक सुरजितसिंग भल्ला यांनी तर तुम्हाला लैटीन म्हणीची आठवण करून दिली आहे. एखाद्या मुद्द्यावर जो गप्प राहतो त्याचा अर्थ त्याची त्या मुद्द्याला सहमती आहे या म्हणीचे स्मरण त्यांनी करून दिले आहे. या गोष्टी फक्त आमच्या सारखे विरोधक किंवा विरोधी पक्षातील लोक बोलत नाहीत. साहित्यिकही बोलायला आणि पुरस्कार परत करायला लागले आहेत.  तुमचे समर्थक म्हणतात तसे हे साहित्यिकही तुमचे विरोधक असल्याने बोलत आहेत असे आपण मानू.  त्यांचा नका तुम्ही विचार करू. पण तुमचे समर्थकच तुमच्या भूमिकेचा काय अर्थ घेतात ते तरी तुम्ही लक्षात घ्या.
उत्तर प्रदेश सारखी घटना पूर्वी घडली नाही अशातला भाग नाही. मात्र अशा घटनांचे कधी कोणी समर्थन केले नाही . अशा घटनांबद्दल दु:खही व्यक्त झाले आणि प्रतिबंधक उपाययोजनाही झाल्यात. तुम्ही १५ दिवसांनी खेद व्यक्त केला असला तरी तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांनी घटनेच्या पहिल्या दिवसापासून जमावाच्या हिंसेचे निर्लज्ज समर्थन केले. तो जमाव अफवा पसरवून तुमच्याच लोकांनी जमवला आणि हत्याही घडवून आणली हे आता उघड झाले आहे. निव्वळ अफवे वरून एका माणसाला ठार मारले आणि त्यावर तुमच्या पक्षाचे नेते म्हणाले गायीचे संरक्षण करण्याप्रती अखिलेश सरकार गंभीर नाही. दुसऱ्या नेत्याने गायीची हत्या केली तर असेच घडेल असे चिथावणीखोर वक्तव्य केले. माणूस मारल्याचे दु:ख नाही आणि न मारलेल्या गायी वरून चिथावणी देवून उन्माद निर्मिती तुमच्याच पक्षाचे नेते करीत आहेत. या लोकांना आवरण्याचे पक्षाचा एक सर्वोच्च स्थानी असलेला जबाबदार नेता म्हणून तुमचे कर्तव्य होते. प्रधानमंत्री म्हणून तुमच्या मंत्रीमंडळातील अशा चिथावणीखोर सहकाऱ्यांना मंत्रीमंडळाच्या बाहेर करणे तुमचे कर्तव्य होते. या लोकांनी घेतलेल्या शपथेचा भंग करून राज्यघटनेला आव्हानच दिले नाही तर अपमानही केला आहे. तुम्ही म्हणालात या घटनेसाठी केंद्राला का आणि कसे जबाबदार धरता ते अगदी बरोबर आहे. केंद्राचा या घटनेशी संबंध नाही. पण घटने नंतर तुमच्या मंत्रीमंडळातील सहकारी जे बेताल वागले आणि वागत आहेत त्याची जबाबदारी कोणाची आहे ? त्यांना आवरणार कोण ? त्यांचेवर कायदेशीर कारवाई कोण करणार ? तुम्हीच जबाबदारी पासून हात झटकण्याचा किंवा पळण्याचा प्रयत्न केला तर लोकांनी - तुमच्याच १२५ कोटीच्या टीम मेम्बर्सनी- कोणाकडे पाहायचे हे तुम्हीच सांगा. माननीय प्रधानमंत्री , भाषण करताना तुमचे हात जसे मुक्तपने हातवारे करतात ते हात कृतीच्या वेळी बांधून ठेवू नका. कोण आपला कोण परका याचा विचार न करता देशाचे स्वास्थ्य आणि सौहार्द बिघडविणाऱ्या चिथावणीखोरावर फक्त हात उगारा. तुमचा उगारलेला हात पाहूनच देशाच्या भाईचारा आणि एकतेला कुरतडणारे हे उंदीर बिळात पळतील. तुमच्यावर हात चालविण्याची देखील पाळी येणार नाही. देशाचा प्रधानमंत्री मौनी आणि दुबळा नसल्याचे  दाखवून देण्याची ही वेळही आहे आणि गरज देखील. आशा आहे स्पष्ट आणि मोकळे बोलल्याचा तुम्हाला राग येणार नाही.
                                                                                                                                                              आपला नम्र
                                                                                                                                  तुमच्या १२५ कोटीच्या टीमचा एक सदस्य
-------------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८

-------------------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. Weldon Sir, Modiji he aikatil & tumachya aamachya sarkyanna khote tharavatil ashi aasha karu ya!I

    ReplyDelete
  2. KHUPACH SUSANGAT LIHILYA BADDAL ABHINANANDAN

    ReplyDelete