Thursday, October 29, 2015

गीता सार

सध्याच्या द्वेषाने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणाला छेद देणारी गीताची घरवापसी आनंदाची झुळूक आणि आशेचा किरण बनली आहे. या घरवापसीचा उपयोग देशांतर्गत आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील सौहार्द वाढविण्यासाठी केला पाहिजे.
------------------------------------------------------


भगवद्गीते बद्दल मी लिहिणार नाही. विनोबांच्या रसाळ भाषेतील गीताई पलीकडे माझे गीतेचे वाचन नाही. अनेकांनी गीतेवर भाष्य केलेत हे माहित आहे आणि गांधीजीनी गीतेवर भाष्य करणारे पुस्तक लिहिले नाही हे सुद्धा माहित आहे. तरीही आमचे प्रधानमंत्री मोदीजी पहिल्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी गांधी लिखित गीतेची दुर्मीळ प्रत अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांना भेट दिल्याचे वृत्त वाचून नवल वाटले. त्यामुळे गांधी लिखित गीता भाष्य मिळाले तर ते वाचण्याची मात्र उत्सुकता आहे आणि त्यावर लिहिण्याची देखील. सध्या तरी ती प्रत दुर्मिळच आहे ! त्यामुळे आता लिहित आहे ते पाकिस्तानातून भारतात परत आलेल्या गीता नावाच्या मुलीवर. मुकबधीर असलेल्या मुलीची भेट सर्वप्रथम प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती घेतात तेव्हा ही घटना विशेष महत्वाची असली पाहिजे आणि तशी ती आहेच. भारताच्या सध्याच्या सामाजिक - राजकीय वातावरणा त तर या घटनेचे महत्व अधिक आहे. फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमा देवून पाकिस्तानची निर्मिती झाली . भळभळणाऱ्या जखमेने खपली धरावी आणि ती सुकण्याआधीच काढल्या जावी असे वारंवार घडत आले आहे. अशी खपली ओरबाडून काढण्याची आगळीक सरकारी पातळीवर प्रामुख्याने पाकिस्तानकडून होत आली आहे. त्यात पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाने ही जखम चिघळतच ठेवली आहे. तिथल्या सर्वसामान्य जनतेकडून अशी आगळीक घडली असे म्हणता येणार नाही. भारताने फाळणीचे दु:ख मनात ठेवले पण त्याचा पाकिस्तान बरोबरच्या संबंधात परिणाम होणार नाही याची काळजी घेतली. मोठ्या भावाने छोट्या भावाच्या चुका पदरात घेत राहाव्यात हेच भारताने केले आणि अती झाले तेव्हा या छोट्या भावाला धडाही शिकविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी म्हंटल्या प्रमाणे भारतासाठी पाकिस्तान लहान भाऊच आहे. भारतीय जनतेने तर पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर यांचेवर आपल्या देशातील कलाकार आणि क्रिकेटपटू यांच्या इतकेच प्रेम केले आहे. जनतेच्या पातळीवर पाकिस्तानात देखील अशीच स्थिती आहे . तेथील सरकारी धोरणाने आणि आतंकवाद्यांच्या भारताविरुद्ध गरळ ओकण्याने पाकिस्तानच्या सर्वसामान्य  जनतेची भारताप्रतीची ही भावना कायम धूसर राहिली आणि म्हणावी तशी भारतीय जनते पर्यंत पोचली नाही. त्यामुळे इथेही ज्यांना फाळणीच्या जखमा ओल्या ठेवून राजकारण करायचे आहे त्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तान विरुद्ध वातावरण निर्मिती केली आहे. दोन्ही राष्ट्राचे संबंध शत्रुवत ठेवण्यासाठी दोन्हीकडील गट सतत कार्यशील असल्याने सतत संशय आणि गैरसमज पसरत राहिले आहेत. भारतातील अशा गटांनी पाकिस्तान बाबत जे समज पसरविले आहेत त्याला गीताची घरवापसी ही छेद देणारी घटना असल्याने तीचे महत्व आहे. गीता प्रकरणाची माहिती होण्यापूर्वीच तंतोतंत अशाच घटनेवर आधारित सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट भारतीयांनी डोक्यावर घेतला होता. प्रत्यक्षात तसे घडले असते तर गीताची जशी सन्मानाने घरवापसी झाली तशीच त्या चित्रपटातील मुन्नीच्या बाबतीत झाले असते. दोन्ही देशातील जनतेच्या भावना या निमित्ताने प्रकट झाल्या आणि त्या भावना समान आहेत ही आजच्या घडीला दिलासा देणारी मोठी बाब असल्याने याचे महत्व आहे.


गीताची घरवापसी होण्याआधी भारतात तीन  घटना घडल्या. पाकिस्तानी गझल गायक गुलामअली यांचा मुंबईतील कार्यक्रम शिवसेनेच्या धमकीमुळे रद्द करावा लागला. भाजपच्या वरच्या सत्ता वर्तुळात वावरलेले सुधींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्याच्या पुस्तकाच्या होणाऱ्या प्रकाशना आधी शिवसेनेने सुधींद्र यांच्या तोंडाला काळे फासून या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला विरोध केला. मुंबईत दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डच्या अध्यक्षांची सुरु असलेली बैठक शिवसेनेने गोंधळ घालून उधळून लावली. सीमेवर पाकिस्तानी आगळीकीतून होणाऱ्या गोळीबारात जवान शहीद होत असताना आपण आपल्या भूमीवर पाकिस्तानच्या कलाकारांचे गाणे ऐकायचे किंवा पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायचे या गोष्टीना शिवसेनेचा विरोध आहे आणि त्यांनी तो व्यक्त केला. भावनिकदृष्ट्या शिवसेनेची भूमिका पटणारी असल्याने शिवसेनेच्या भूमिकेला समर्थनही मिळाले. नीट विचार केला तर लक्षात येईल की दोन्ही देशा दरम्यान जे काही चालते ते तिथल्या जनतेच्या संमतीने किंवा इच्छेने होते असे नाही. पाकिस्तानच्या आगळीकी बद्दलचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांच्या हल्ल्यात आपले जवान मरतात हे म्हणणे ठीक आहे. त्या आगळीकीला आपले जवानही आत घुसून चोख प्रत्युत्तर देत असतात . खरे तर सीमेवर काय चालते हे सरकारकडूनच आपल्याला कळते. सरकार सगळी माहिती देते आणि खरी माहिती देते या भ्रमात कोणी राहू नये. शत्रू राष्ट्राची आंतराराष्ट्रीय जगतात प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याच्या हल्ल्यावर प्रकाशझोत टाकणे गरजेचे असते. तेव्हा सीमेवरील घटना सरकार आणि सैन्यावर विश्वासाने सोडायच्या असतात. जनतेच्या पातळीवर असे शत्रुत्व आणणे आणि वाढविणे चुकीचेच ठरते. पाकिस्तान सरकारच्या शत्रुत्वाच्या कारवाया विरुद्ध आवाज बुलंद करण्याची फार मोठी संधी शिवसेनेकडे होती. प्रधानमंत्र्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्रीमंडळाच्या शपथग्रहण समारंभाला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याला बोलावले होते तेव्हा त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेने शपथघेणे नाकारले असते तर पाकिस्तान साठी ते लज्जास्पद ठरले असते आणि मुत्सद्देगिरीने जगाला पाकिस्तान बद्दल जे सांगायचे ते सांगता आले असते. ती शिवसेनेची मुत्सद्देगिरी ठरली असती . आज मात्र ज्या पद्धतीने शिवसेनेने पाकिस्तानचा विरोध केला ती जगाच्या दृष्टीने गुंडगिरी ठरली आहे. खरी गरज पाकिस्तानच्या नेतृत्वाला पायघड्या न घालता विरोध करण्याची आहे . दुसऱ्या बाजूने तेथील जनतेला आपलेसे करण्याची आहे. त्यामुळे आपलाच नाही तर पाकिस्तानच्या जनतेचा दबाव देखील तिथल्या सरकारवर येईल. शिवसेनेने घडवून आणलेल्या घटनांनी आंतरारष्ट्रीय जगात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे तर गीताच्या घरवापसी प्रकरणात पाकिस्तानची प्रतिमा काहीशी उजळली आहे.

गीताच्या निमित्ताने एक महत्वाची बाब भारतीय जनते समोर आली आहे. पाकिस्तानात आपल्याकडे प्रचारित केले जाते तसा सगळाच काळोख नाही. पाकिस्तान इस्लामी राष्ट्र बनल्यामुळे धर्मराष्ट्राचे सगळे तोटे त्याच्या वाट्याला आले आहेत. पाकिस्तानी धर्मराष्ट्राचे काटे तेथील अल्पसंख्य हिंदुना , ख्रिस्ती आणि अन्य समुदायांना बोचातातच , पण त्याचे दुष्परिणाम मुस्लिमांनाही भोगावे लागत आहे. धर्मराष्ट्राने केवळ शिक्षण आणि आर्थिक प्रगतीच कुंठीत केली नाही तर लोकांचे शिरकाणही चालविले आहे. धार्मिक कट्टरतेतून निपजलेल्या आतंकवादाने तेथील हिंदू किंवा इतर अल्पसंख्याकांचे जेवढे बळी घेतले त्यापेक्षा शेकडो पटींनी मुस्लीमांचेच बळी गेले आहेत. धार्मिक कट्टरतेची किंमत पाकिस्तानला मोजावी लागत आहे. आपल्याकडील परंपरा आणि चालत आलेली उदारता लक्षात घेता आपल्याकडे माणुसकीचे झरे विपुल असणे यात नवल नाही, पण विपरीत वातावरणात पाकिस्तानातही माणुसकीचे झरे जीवंत आहेत गीता प्रकरणाने दाखवून दिले आहे. पाकिस्तानातील हिंदूवरील अत्याचाराच्या आणि धर्मांतराच्या कथा अतिरंजित पद्धतीने प्रचारित करून देशांतर्गत तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती गीता प्रकरणाने थोडीसी का होईना उघडी पडली आहे. याचा अर्थ तेथील हिंदू भरडले जात नाहीत असे नाही. धर्मराष्ट्रात भरडण्या पासून कोणीच वाचू शकत नाही हे त्यामागचे वास्तव आहे. गीता मुस्लिम नाही हिंदू आहे हे लक्षात आल्यावर तिच्या धर्म भावनेचा करण्यात आलेला आदर , सांभाळ हा तेथील जनतेच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकतो. जनतेच्या पातळीवर तरी दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची आणि दृढ करण्याची संधी गीतामुळे मिळाली आहे. जनतेच्या मनात विष कालविण्याच्या प्रयत्नाला यामुळे थोडा तरी लगाम बसेल. जनतेच्या पातळीवर संवाद , आदानप्रदान आणि येणेजाणे वाढले तर आपल्याला धर्मराष्ट्राचे तोटे लख्खपणे कळतील आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असण्याचे फायदे पाकिस्तानातील जनतेला कळतील. असे कळणे दोन्हीकडील जनतेसाठी जरुरीचे बनले आहे. असे झाले तर भारत ,पाकिस्तान आणि बांगलादेश आणि इतरही शेजारी राष्ट्राला सामावून घेत युरोपियन संघाच्या धर्तीवर भारतीय महासंघ बनण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल. अशा प्रकारचा महासंघ हाच अखंड भारत असणार आहे. ज्या लोकांना अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झालेले पाहायचे आहे त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अखंड भारताकडे जाण्याचा मार्ग अशाप्रकारे प्रेमाचा आहे. द्वेषातून राष्ट्राचे छकले पडतात. द्वेष बुद्धीला लगाम घालण्यातच सर्वांचे हित आहे.


----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment