Thursday, January 19, 2017

मोदी चरखा !

प्रधानमंत्री मोदी ज्या चरख्या मागे बसले आहेत तो शेतकऱ्यांच्या शोषणाला विरोध करणारा गांधी चरखा नाही. शेतकऱ्यांसोबत चरखा चालविणारांचेही शोषण करणारा तो मोदी चरखा आहे. कारण आज हा चरखा चालवून पुरेसा मोबदला मिळत नाही. मोदींच्या चरखा छायाचित्राला विरोध या मुद्द्यावर व्हायला हवा.
---------------------------------------------------------------------------------------------------


चरख्या सोबतचे गांधीजींचे एक छायाचित्र जगप्रसिद्ध आहे. अगदी त्याच धर्तीवर प्रधानमंत्री मोदी यांचे छायाचित्र खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आपल्या दिनदर्शिकेवर प्रकाशित करून एका विवादाला जन्म दिला आहे. याला गांधींची जागा घेण्याचा मोदींचा प्रयत्न  समजून गांधीप्रेमी आणि गांधीवादी कार्यकर्त्यांनी नापसंती व्यक्त करून आपला विरोध नोंदविला. खादी ग्रामोद्योग आयोगा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि कारागिरांनीही एक दिवसाचा उपवास करून सदर छायाचित्राला विरोध केला. दुसऱ्या बाजूने खादी ग्रामोद्योग आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मोदी समर्थकांनी या कृतीचे जोरदार समर्थन केले आहे. विरोध आणि समर्थनाचे दोन्ही बाजूचे म्हणणे आपापल्या जागी रास्त असू शकेल. विरोध आणि समर्थन करीत असताना एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे चरख्याचे महत्व ! विरोधक आणि समर्थक यांनी जे मुद्दे मांडलेत त्यावरून त्यांना चरखा आज प्रासंगिक वाटतो हे स्पष्ट होते. पण या सगळ्या वादात चरख्याच्या आजच्या प्रासंगिकतेवर फारसे बोलले गेले नाही. आजच्या संदर्भात चरख्याची प्रासंगिकता तपासण्यासाठी या वादातील दोन्ही बाजूचे म्हणणे समजून घेणे उपयुक्त ठरेल.

मोदींच्या अशा छायाचित्राला विरोध करण्यामागे एक मोठे आणि महत्वाचे जे कारण सांगितले जाते ते छायाचित्राच्या घटनेशीच निगडित आहे असे नाही. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्याने प्रधानमंत्री मोदी यांनी सत्ता मिळविली आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधुनिक भारताची जडणघडण करणाऱ्या बहुतांश महापुरुषांना, त्यांच्या कार्याला आणि विचारधारेला विरोध राहिला आहे. अशा महापुरुषात फुले , गांधी, आंबेडकर , नेहरू , सुभाषचंद्र बोस , सरदार पटेल यांचा समावेश आहे. हे सगळेच महापुरुष भारतीय जनतेला वंदनीय आहेत. ज्यांना आजवर विरोध केला त्यांना आपल्या द्वेषावर आधारित विचारसरणीच्या प्रसारासाठी आणि या विचारसरणीला लोकमान्यता मिळविण्यासाठी आपल्या दावणीला बांधण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचा संघ विरोधकांचा आरोप आहे. मोदींचा गांधी-आंबेडकरांना जवळ करण्याचा प्रयत्न संघाच्या या व्यापक हेतूपूर्तीचा प्रयत्न म्हणून पाहिला जातो. या दृष्टिकोनातून त्या छायाचित्राकडे पाहिल्या गेल्याने त्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. विरोधाचे दुसरे कारण गांधींची हुबेहूब नक्कल करणारे छायाचित्र लोकांपुढे आणून मोदी स्वतःला या महापुरुषांच्या रांगेत प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा समज होऊन या छायाचित्राला विरोध झाला. या कारणात तथ्य आहे असे मानले तरी मोदी विरोधाची ही दोन्ही कारणे छायाचित्र प्रसिद्ध होण्या आधीपासूनच अस्तित्वात होती. चरख्यावरील छायाचित्राने त्याला उजाळा तेवढा मिळाला. १० लाखाचा कोट घालणारा आणि एक दीड लाखाचा पेन वापरणारा व्यक्ती सादगीचे प्रतीक असलेला चरखा चालवितो हे दांभिकपणाचे आहे असे वाटून या छायाचित्राला विरोध झाला आहे. चरख्या मागची गांधींची आर्थिक विचारसरणी आणि मोदींची आर्थिक विचारसरणी परस्पर विरोधी असल्याने अशा छायाचित्राला विरोध याला फारतर विरोधामागचे प्रासंगिक कारण म्हणता येईल. चरख्याचा प्रसार आणि खादीचा वापर ही आजची गरज असेल तर देशाचा प्रधानमंत्री त्याचा पुरस्कार करतो ही तर स्वागतयोग्य घटना वाटायला हवी होती. पण तसे झाले नाही. चरखा आणि खादी पेक्षा मोदी विरोध प्रबळ ठरला.
                                                                                                                                                                                                                                  छायाचित्रात गांधींची जागा घेण्याची मोदींची कृती आक्षेपार्ह आहे हे पटण्याजोगे कारण कोणी दिले असेल तर ते मोदी समर्थकांनी दिले आहे. हरियाणा राज्याचे मंत्री श्री.वीज यांनी खादी आणि चरख्याच्या प्रसारासाठी गांधींपेक्षा मोदी हे अधिक योग्य असल्याचे प्रतिपादन करून अशाप्रकारच्या छायाचित्रमागची खरी भूमिका मांडली ! मोदींना गांधींच्या रांगेतच नाही तर गांधी पेक्षा वरचे स्थान देण्याचा मोदी समर्थकांचा प्रयत्न हा निश्चितच हिणकस आणि आक्षेपार्ह आहे. मोदी समर्थक राजकारण्यांनी त्यांची हुजरेगिरी करावी हे समजण्या सारखे आहे. पण ज्या चरख्याचा आणि खादीचा गांधीजींशी अन्योन्य संबंध आहे त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापित खादी ग्रामोद्योग आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांची अशी हुजरेगिरी करावी हे त्यापेक्षा जास्त आक्षेपार्ह आणि धोकादायक आहे. ज्या संस्था आणि व्यक्तींनी आपला कणा आणि मान ताठ ठेवण्याचा आदर्श समाजासमोर ठेवायला हवा त्यांनी लाचारीचे उदाहरण समाजासमोर ठेवावे हा खरे तर या प्रकरणी सर्व गांधीजनांनाच नाही तर लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाला आक्षेपार्ह वाटायला हवे होते. सत्तेच्या लांगूलचालनाची समाजात पसरत चाललेल्या किडीने गांधीवादी संस्था देखील पोखरल्या आहेत हे मोदींनी चरखा पळविण्यापेक्षा जास्त गंभीर आहे.

खरेतर हा वाद विचाराच्या अंगाने पुढे आणण्याची गरज होती. जेव्हा देशाचा प्रधानमंत्री चरख्यामागे बसतो तेव्हा तो चरख्याचे महत्व लोकमनावर बिंबवीत असतो. पण प्रधानमंत्री जे महत्व बिंबवीत आहेत ते कोणते - वर्तमानातील की ऐतिहासिक ? वर्तमानात चरखा उपयुक्त असल्याचे चरख्या सोबत मोदींच्या छायाचित्राला विरोध करणारे आणि त्या छायाचित्राकडे भक्तिभावाने पाहणारे हे दोघेही सांगतात पण त्यात खरेच तथ्य आहे का ? एखाद्या महापुरुषाने काळानुरूप केलेली गोष्ट चिरस्थायी मानण्याची आमच्या समाजाला बिमारीच जडली आहे. त्यातलाच हा प्रकार .  त्यावेळी परकीय सत्ता असताना त्या सत्तेच्या मदतीशिवाय लोकांच्या हाती देता येईल असे सुलभ तंत्रज्ञान म्हणजे चरखा. त्याकाळी चरखा वाढला , विस्तारला , विकसित झाला तो स्वयंपूर्णतेकडे वाटचाल म्हणून. तरीही त्याकाळी लोकांच्या वस्त्राची गरज चरखा पूर्ण करू शकला नव्हता. लोकांची वस्त्राची गरज पूर्ण झाली ती विकसित झालेल्या नवीन तंत्रज्ञानाने. त्याकाळातही चरखा लोकांच्या हाताला काम देणारे , लोकांना रोजगार देणारे साधन म्हणून  नव्हताच. आमच्या इथला कापूस स्वस्तात नेवून महागडे कापड आमच्या माथी मारत स्वत:ची आर्थिक भरभराट करणाऱ्या इंग्रजांच्या धोरणाला विरोध म्हणून त्याकाळी चरख्याचे महत्व होते. त्या काळाप्रमाणे आजही चरखा लोकांची वस्त्राची आणि रोजगाराची गरज पूर्ण करण्यासाठी उपयुक्त नाहीच पण ज्या आर्थिक साम्राज्यवादाच्या विरोधाचे चरखा हे प्रतीक होते , आजही चरख्यामागील ते तत्वज्ञान तितकेच उपयुक्त आणि लागू आहे. कारण शेतकऱ्याचा कापूस आजही स्वस्तात लुबाडण्याची व्यवस्था कायम आहे. या लुबाडणुकीला विरोध ही चरख्या मागची भूमिका होती. आज उत्पादनासाठी चरखा प्रासंगिक नाही , शेतकऱ्यांच्या लुबाडणुकीला विरोधाचे प्रतीक म्हणूनच चरख्याकडे पाहावे लागेल. मग या लुबाडणुकीला विरोध म्हणून मोदी चरखा समोर करीत आहेत का हा खरा प्रश्न आहे. मोदी सरकारची आर्थिक धोरणे ही शेतकऱ्यांना मातीत घालणारी ठरली आहेत. ज्या चरख्याला हात लावून मोदीजी बसले आहेत त्या चरख्या मागील तत्वज्ञानाला मोदी  सरकारची  शेतीविषयक धोरणे पायदळी तुडवीत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळणार नाहीत अशी धोरणे राबवीत असल्याने प्रधानमंत्री मोदींना चरख्यामागे बसण्याचा किंवा चरख्याचा पुरस्कार करण्याचा कोणताही नैतिक हक्क नाही. मोदी ज्या चरख्या मागे बसले आहेत तो शेतकऱ्यांच्या शोषणाला विरोध करणारा गांधी चरखाच नाही. शेतकऱ्यांसोबत चरखा चालविणारांचेही शोषण करणारा तो मोदी चरखा आहे. कारण आज हा चरखा चालवून पुरेसा मोबदला मिळत नाही. मोदींच्या चरखा छायाचित्राला विरोध या मुद्द्यावर व्हायला हवा. 
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि . यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment