Thursday, July 25, 2019

मनमोहनसिंग यांच्या कार्य-कर्तृत्वाचे फेरमूल्यमापन व्हावे - १


 मनमोहनसिंग कारकिर्दीतील अतिशय वाईट समजल्या गेलेल्या शेवटच्या काही वर्षाची मोदीजींसाठी चांगली मानल्या गेलेल्या पहिल्या कार्यकाळाशी तुलना केली तर मनमोहनसिंग यांच्या वाईट वर्षात अर्थव्यवस्थेची उपलब्धी मोदीजींच्या चांगल्या वर्षापेक्षा सरस ठरते.. ही बाबच  मनमोहनसिंग यांच्या राजवटीचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचे फेर मूल्यमापन करण्यासाठी पुरेशी आहे.
-------------------------------------------------------------------------------------

२४ जुलै १९९१  रोजी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवे वळण देणारा अर्थसंकल्प सादर करत डॉ मनमोहनसिंग यांनी आपल्या राजकारण प्रवेशाचा अमिट ठसा उमटविला. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली होती. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अर्थतज्द्न्य असलेले नोकरशाह मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री म्हणून मंत्रीमंडळात सामील केले. तेव्हापासून कालतागायत ते राज्यसभा सदस्य होते. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पराभूत झाल्यानंतर मनमोहनसिंग यांचेकडे राज्यसभेचे विरोधीपक्ष नेतेपद आले. पुढे प्रधानमंत्री झाल्यावर राज्यसभेचे नेतेपदी ते होते. प्रदीर्घकाळ राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर नुकतेच ते राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यांचे वय आणि काँग्रेसची आजची अवस्था बघता पुन्हा त्यांची राज्यसभेवर निवड होण्याची शक्यता नाही. अशावेळी त्यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेता त्यांचा नागरी आणि सर्वपक्षीय विशेष गौरव व्हायला हवा होता. तो झाला नाही याला सत्ताधारी भाजप आणि विरोधात असलेली काँग्रेस सारखीच जबाबदार आहे. कदाचित सत्ताधारी म्हणून भाजप अधिक जबाबदार ठरेल. मोदी राजवटीत विरोधकांवर फक्त टीका होते आणि मोदींशिवाय कोणाचे योगदान आहे हे मोदी, भाजप आणि त्यांचे समर्थक पार विसरून गेले आहेत. कदाचित असा गौरव समारंभ झाला तर डॉ मनमोहनसिंग यांच्या  योगदाना सोबत मोदी आणि त्यांच्या राजवटीची तुलना अपरिहार्यपणे झाली असती. सत्ताधारी भाजपने प्रयत्नपूर्वक मनमोहनसिंग यांची जी प्रतिमा जनतेच्या मनावर बिंबविली आहे त्याला तडा अशा कार्यक्रमातून गेला असता.

आमच्या मनामध्ये मनमोहनसिंग यांची प्रतिमा एक कमजोर प्रधानमंत्री म्हणून तयार झाली आहे. भाजप आणि संघसमर्थक तर त्यांना सोनिया गांधी यांचा घरगडी आणि सांगकाम्या समजून त्यांच्या विषयी बोलत असतात. कणा नसलेले प्रधानमंत्री अशी मनमोहनसिंग यांची प्रतिमा ठसविण्यात  भाजप नेते यशस्वी झालेत. त्यांना कमजोर आणि कणाहीन प्रधानमंत्री म्हणून रंगविणे मोदीजीना पुढे आणण्यासाठी गरजेचे होते. मनमोहनसिंग कमजोर आणि मोदीजी म्हणजे खंबीर अशी तुलना केली गेली. मोदीजी बोलणारे आणि मनमोहन मौनी अशीही तुलना केली गेली. मनमोहनसिंग यांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. मोदींनीही  प्रश्नांची उत्तरे दिलीत पण ती शाळकरी मुलांच्या प्रश्नांना. मनमोहनसिंग यांनी १० वर्षाच्या कारकिर्दीत ७ पत्रकार परिषदा घेऊन ऐनवेळी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. मोदीजी जगातले असे एकमेव प्रधानमंत्री ठरले ज्यांनी ५ वर्षाच्या पूर्ण कार्यकाळात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. प्रत्येक परदेश दौऱ्यात मनमोहनसिंग पत्रकारांना आपल्या विमानात घेऊन जात आणि त्यांच्याशी विमानात बातचीत करायचे. देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख असेच करतात. मोदीजींनी मात्र सर्वाधिक परदेश दौरे केलेत पण प्रधानमंत्र्याच्या विमानातून पत्रकारांना नेणेच बंद करून टाकले ! विमान प्रवासात पत्रकारांच्या प्रश्नाना टाळण्याचा हा नामी उपाय खर्चाच्या बचतीच्या नावावर मोदीजीनी योजिला ! तरीही मोदीजींची प्रतिमा बोलक्या प्रधानमंत्र्याची आणि मनमोहनसिंग मात्र मौनी प्रधानमंत्री ठरले. मनमोहनसिंगांची अशी चुकीची प्रतिमा रंगविल्या गेली आहे. डॉ. सिंग यांचे झालेले प्रतिमाभंजन त्यांची कामगिरी झाकोळण्यास कारणीभूत ठरली आहे.

प्रधानमंत्री म्हणून १० वर्षाच्या काळात मनमोहनसिंग यांचेकडून चुका झाल्या नाहीत असा दावा कोणालाच करता येणार नाही. जनतेने त्यांना शिक्षा मात्र त्यांच्या हातून न घडलेल्या चुकांसाठी दिली आहे. २ जी स्पेक्ट्रम आणि   कोळसाखाण वाटप या सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला घोटाळा समजणे चूक होते. धोरणात्मक निर्णय चुकीचा असू शकतो किंवा वाटू शकतो. धोरणात्मक निर्णय पसंत किंवा नापसंत म्हणून  सरकारला पायउतार करण्यात काहीच चूक नाही. न केलेल्या घोटाळ्यासाठी त्यांना दोषी ठरवणे चुकीचे होते. मी स्वत: याच स्तंभात त्यांच्या चुकांसाठी कठोर टीका केली आहे. वर्तमानात या स्तंभात मी मोदींवर टीका करतो म्हणून अनेकजण नाराजी व्यक्त करतात आणि मला काँग्रेस समर्थक ठरवतात. सरकार कोणतेही असो पत्रकारांनी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. सरकारवर टीकात्मक टिपण्णी करत राहिले पाहिजे. विकल्या गेलेली पत्रकारिताच सरकारचे ढोल बडवू शकते. मोदीजी पेक्षा जास्त टीका मी मनमोहनसिंग यांचेवर केली आहे. 'माननीय पंतप्रधान, तुमचे वय झाले आहे' , 'आत्मभान आणि आत्मविश्वास गमावलेले सरकार' 'लोकपाल नव्हे सक्षम प्रधानमंत्री हवाअराजकीय अराजकाची तीन वर्षे' ही त्याकाळात लिहिलेल्या काही लेखांच्या शीर्षकावरून  मी केलेल्या टीकेची कल्पना येईल.  घेतलेले निर्णय जनतेसमोर मांडणे आणि घेतलेल्या निर्णयाचे छातीठोकपणे समर्थन न करणे आणि शेवटच्या २ वर्षात तर निर्णयच न घेणे यासाठी ते नक्कीच टीकेस पात्र आहेत.  पण त्यांच्या कारकिर्दीतील अतिशय वाईट समजल्या गेलेल्या शेवटच्या काही वर्षाची मोदीजींसाठी चांगली मानल्या गेलेल्या पहिल्या कार्यकाळाशी तुलना केली तर मनमोहनसिंग यांच्या वाईट वर्षात अर्थव्यवस्थेची उपलब्धी मोदीजींच्या चांगल्या वर्षापेक्षा सरस ठरते.. ही बाबच  मनमोहनसिंग यांच्या राजवटीचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचे फेर मूल्यमापन करण्यासाठी पुरेशी आहे.  राज्यसभेतून निवृत्त होण्याचा प्रसंग त्यासाठी उपयुक्त होता. पण ती संधी गमावल्याने त्यांच्यावरील किटाळ दूर होण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे मनमोहंसिंग यांच्यावरील किटाळ, त्यांच्या चूका आणि त्यांच्या उपलब्धी विषयी अधिक चर्चा पुढच्या लेखात करू.  

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८ 


1 comment:

  1. सर, ज्याला अर्थशास्त्राची ABCD ही माहित नाही असेही लोक मा मनमोहनसिंग यांचेवर टीका करतात ही वस्तुस्थिती आहे.

    ReplyDelete