Thursday, August 6, 2020

चीनच्या आक्रमकतेला पायबंद घालण्याबाबत नेतृत्व गोंधळात !

२० सैनिक शहीद झाल्यावर आक्रमक पवित्रा घेत १९६७ साली केली तशी छोटीशी चकमक करून चीनला मागे ढकलण्याची संधी होती पण नेतृत्वच संभ्रमात असल्याने ती संधी आपण गमावली आहे. ठरवून युद्ध पुकारणे कठीण आहे. मग वाटाघाटी हाच एक मार्ग उरतो.
----------------------------------------------------------

चीनने लडाख सीमेवर घुसखोरी करून तीन महिने आणि २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या रक्तरंजित घटनेला दीड महिना उलटून गेला तरी चीनला कसे उत्तर द्यायचे याबाबत प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या सरकारचा संभ्रम कायम असल्याचे चित्र फारसे सुखावह नाही. एकीकडे युद्धसामुग्रीची जुळवाजुळव तर दुसरीकडे वाटाघाटीत चीन मुजोरी दाखवीत असतांना सरकारचा वाटाघाटीवरचा जोर सरकारचा संभ्रम दर्शविणारा आहे. समस्या सोडविण्याचा युद्ध हा उपाय असू शकत नाही आणि म्हणून सरकारचा वाटाघाटीवर जोर असेल तर ते समजण्यासारखे आहे. मग त्यासाठी एका स्तरावरच्या वाटाघाटी यशस्वी होत नसतील तर त्या वरच्या स्तरावर् नेवून गुंता सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे पण तसे घडत नाही. दुसरीकडे लष्करासाठीची जी शस्त्रखरेदी सुरु आहे त्याने चीनवर काही दबाव येताना दिसत नाही. सध्या सुरु असलेल्या लष्करी साहित्याच्या खरेदीत राफेल या लढाऊ विमानाची गणना करता येणार नाही. याची खरेदी बऱ्याच आधी झाली होती आणि ती आता येवून पोचली इतकेच.                                                                                                                                                               

राफेल मुळे भारतीय वायुदलाची ताकद निश्चितपणे वाढली आहे पण केवळ ५ अत्याधुनिक लढाऊ विमाने हाती आली म्हणून चीनला नमविण्याची ताकद आली असे समजणे चूक आहे. आलेली विमाने आपल्या ताफ्यात आधीपासून असलेल्या सुखोई या लढाऊ विमानाच्या संरक्षणात आली याचा अर्थच अजून ती विमाने शस्त्रसज्ज झालेली नाहीत आणि लढाईसाठी तयार व्हायला अजून चार-सहा महिन्याचा अवधी लागू शकतो असे लष्करी तज्ञांचे मत आहे. फ्रांस कडून आणखी राफेल विमाने मिळायला वर्षभराचा अवधी लागू शकतो. सरकार अनुकूल माध्यमे आणि सरकार समर्थक कार्यकर्ते राफेल आल्याने चीनला धडकी भरली असे भासवीत आहेत पण त्याने जमिनीवरील परिस्थितीत आणि चीन सोबतच्या वाटाघाटीत फारसा फरक पडलेला नाही ही वस्तुस्थिती दृष्टीआड करून चालणार नाही.

चीन सोबतच्या वाटाघाटीत जिथे राफेल सारख्या लढाऊ विमानाचा परिणाम होत नाही तिथे दुसऱ्या प्रकारच्या शस्त्रसाहित्याची जी खरेदी सुरु आहे त्याने फरक पडेल असे मानणे चूक आहे. त्यामुळे नव्या शस्त्रखरेदीतून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे हे स्पष्ट होत नाही. सरकारने अमेरिकेकडे रायफल आणि काड्तुसाची मागणी नोंदविली आहे. इस्त्रायलकडून रणगाडे विरोधी आणि जमिनीवरून मारा करता येईल अशा मिसाइलची खरेदी सुरु केली आहे. द्रोण सुद्धा इस्त्रायल कडून मागविले आहेत. रशिया कडून तर नव्या मिग आणि सुखोई विमानाची खरेदी केली आहे. युनायटेड अरब अमिरात देखील आम्हाला शस्त्र पुरवठा करणार आहे ! अशी विविध देशाकडून तातडीने करण्यात येत असलेली खरेदी आपली संरक्षण सज्जता नव्हती हे दर्शविणारे असल्याचे मी मागच्या लेखात लिहिले होते. परंतु प्रधानमंत्री मोदींचे एक वैशिष्ठ्य मानले पाहिजे. आपले अपयश आणि चूक हे आपले अभूतपूर्व यश असल्याचे भासविण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. तीच हातोटी आत्ताही कामाला येत आहे.                                                  

कुठल्याही शस्त्रसाहित्य खरेदीची जी वार्ता प्रकाशित होते आहे त्यात ‘मोदी सरकारच्या या शस्त्र खरेदीने चीनला धडकी’ असे त्या बातमीत अधोरेखित केलेले असते. अमेरिकन रायफलने चीनला धडकी बसणार असेल किंवा इस्त्रायली द्रोण चीनच्या इत्यंभूत हालचालीची माहिती देणार असेल किंवा रशियाची मिग विमाने चीनचा मुकाबला करण्यासाठी समर्थ असतील तर ही तजवीज आधीच का नाही करून ठेवली असा प्रश्नही कोणाच्या मनात उपस्थित होवू नये असा स्वरुपात या बातम्या प्रकाशित होत असतात. बरे हे सगळे साहित्य लगेच मिळणार नाही. युद्धसाहित्य यायला आणि ते सीमेवर न्यायला देखील चार सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्या आधी थंडी आणि बर्फाने लडाख सीमेकडे जाणारे रस्ते बंद होणार आहेत. सप्टेंबर पासूनचे चार-पाच महिने रस्ते बंदच असणार आहेत. तेव्हा या तातडीच्या खरेदीचा तातडीने उपयोग होणार नसेल तर विचारपूर्वक व योजनापूर्वक लष्करी साहित्याच्या खरेदीची नियमित प्रक्रिया डावलून तातडीच्या खरेदीतून कोणता हेतू साध्य होणार असा प्रश्न पडतो. यातून फक्त सरकारचा गोंधळ स्पष्ट होतो.                                              


शस्त्र खरेदी संबंधीच्या प्रत्येक बातमीत चीन सोबत सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे ही खरेदी होत असल्याचे आवर्जून नमूद केले जाते. पण चीनला युद्धच करायचे असेल तर तो काय भारताच्या शस्त्रसज्ज होण्याची वाट बघत थांबला का असा प्रश्न कोणालाही पडत नाही. याचा अर्थ शस्त्रसज्ज असूनही चीनची युद्धाची तयारी नाही. कारण आजच्या परिस्थितीत युद्ध चीनला देखील परवडण्यासारखे नाही. आपण ज्या प्रकारची युद्ध सामुग्री जमा करत आहोत ती चीन सोबत युद्ध करायचे झाले तर पुरेशी नाही. अनेक तज्ञांनी भारताने तातडीने रशियाकडून मिग विमाने खरेदी करण्याच्या केलेल्या करारा बाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. चीनचा मुकाबला करण्यासाठी मिग पेक्षा अधिक अत्याधुनिक विमानांची गरज असल्याचे तज्ञांना वाटते. ताज्या खरेदीने लष्कराचे बळ वाढणार असले तरी त्यामुळे चीन बरोबरच्या युद्धात वरचढ होण्यासाठी उपयोग होईल अशी स्थिती नसेल तर आपणही चीनला मागे ढकलण्यासाठी युद्ध पुकारू शकणार नाही. तरीही आजच्या शस्त्रखरेदीवर लष्करी तद्न्य सोडले तर कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता प्रश्न उपस्थित करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की सरकार आणि सरकार समर्थक माध्यमे लगेच त्यांना देशद्रोही आणि लष्कर विरोधी ठरवतील याची त्यांना धास्ती वाटते !  


चीनची युद्ध करायची तयारी नाही आणि सगळी खरेदी केलेली शस्त्रास्त्रे मिळाली तरी चीनशी युद्ध पुकारण्याच्या स्थितीत आपण नसू तर मग उपाय काय हा प्रश्न उरतोच. २० सैनिक शहीद झाल्यावर आक्रमक पवित्रा घेत १९६७ साली केली तशी छोटीशी चकमक करून चीनला मागे ढकलण्याची संधी होती पण नेतृत्वच संभ्रमात असल्याने ती संधी आपण गमावली आहे. ठरवून युद्ध पुकारणे कठीण आहे. मग वाटाघाटी हाच एक मार्ग उरतो. वाटाघाटी लडाखचा गुंता सोडविण्या पुरत्या मर्यादित असून चालणार नाही. कारण लडाखचा गुंता सुटला तरी चीन दुसरीकडे कुठेतरी घुसखोरी करून नवा तंटा उभा करेल. म्हणून एकूणच भारत-चीन सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी आणि दोन देशातील सीमा निश्चितीसाठी वाटाघाटी तातडीने सुरु करण्याची गरज आहे. चीन सोबतच्या वाटाघाटी यशस्वी व्हायच्या असतील तर देवघेव करावी लागेल. आणि अशी देवघेव करायची असेल तर नेत्याला जनता आपल्या मागे उभा राहील हा विश्वास हवा. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं नक्कीच चीनशी यशस्वी वाटाघाटी करण्याच्या स्थितीत आहे. फक्त आपल्या ५६ इंची छातीच्या भासातून आणि भ्रमातून त्यांनी बाहेर येण्याची गरज आहे.
-------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com

No comments:

Post a Comment