Thursday, October 29, 2020

मोदी हरणार नाहीत, कारण ...... !

 मोदींची खासियत ही आहे कि सगळे अपयश पाठीशी बांधून ते भावनिक बुडबुडे सोडतात. या बुडबुड्याना टाचणी लावण्या ऐवजी विरोधी नेते बुडबुड्यात वाहून जातात !
--------------------------------------------------------------

कोरोनाला  न जुमानता बिहार निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांना लोकांची गर्दी होत आहे. पार पडलेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निवडून दिल्या नंतर सर्वच सरकारांनी लोकांना निराश केले असले तरी निवडणुकांबद्दलचा लोकांचा उत्साह कमी न होणे यामुळे देशातील लोकशाही टिकण्यास हातभार लागला आहे. जम्मू-काश्मीर सारख्या अशांत व आतंकवादाने त्रस्त प्रांतातही निवडणूक लागली की लोकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढत असतो हा आजवरचा अनुभव आहे. देशभरात लोक कोरोना मुळे आतंकीत आहेत. कोरोनाचा आतंकही  निवडणूक प्रचारा दरम्यान किंवा मतदाना दरम्यान लोकांना घरात बसायला बाध्य करू शकला नाही. देशातील लोक देव भाबडे किंवा धर्म भाबडे म्हणून ओळखले जात असले तरी या काळात लोक मंदिर,मस्जिद वा चर्च पासून दूरच राहिले. राजकीय नेत्यांनी लोकांचा देव किंवा धर्म भाबडेपणाला आवाहन करत मंदिर खुले करण्याची मोहीम हाती घेतली असली तरी त्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी लोक घराबाहेर पडलेले नाहीत. निवडणूक मोहिमेत मात्र लोक स्वत:हून घराबाहेर पडले आहेत.
                                    

निवडणूक हंगामात फारसी भीती न बाळगता कोणाचे समर्थन वा विरोध करणे शक्य होते हे लोकांच्या उत्साहाचे एक कारण आहेच. दुसरे कारण निवडणुक प्रचार सभातून होणाऱ्या मनोरंजनाची सर दुसऱ्या कोणत्याही मनोरंजनाला नाही. निवडणूक काळातील गर्दीचे हे एक कारण आहेच पण त्याही पेक्षा आपला नेता विरोधी नेत्याची कशी खिल्ली उडवतो, विरोधी नेत्यावर कसे शाब्दिक वार करतो हे ऐकण्याची देशातील मतदारांना अनिवार ओढ असते. एखाद्याचे नेता बनणे वा नेता न बनणे पुष्कळदा त्याच्या निवडणूक सभेतील कामगिरीवर अवलंबून असते. नरेंद्र मोदी नेता बनलेत त्याचे एक कारण त्यांची निवडणूक सभेतील कामगिरी डोळ्यात भरण्यासारखी असते ! आपण सांगत असलेला इतिहास, भूगोल बरोबर आहे कि नाही याची पर्वा न करता ते आत्मविश्वासाने सांगत असतात. खरे काय ,खोटे काय याची पर्वा न करता ते बोलत असतात. मोदींच्या खोट्याचा आपण मुकाबला करू शकत नाही एवढेच काय ते प्रचारसभेला साजेसे टाळ्याखाऊ वाक्य राहुल गांधी आतापर्यंत बोलू शकलेत. प्रचार सभेत मोदींना मुक्त उधळण करता येते याचे सर्वात महत्वाचे कारण राहुल गांधी सह त्यांच्या विरोधातील कोणताही नेता त्यांना उत्तर द्यायला भाग पाडण्यास असमर्थ ठरला आहे.                                                       

 

मोदींची खासियत ही आहे कि सगळे अपयश पाठीशी बांधून ते भावनिक बुडबुडे सोडतात. या बुडबुड्याना टाचणी लावण्या ऐवजी विरोधी नेते बुडबुड्यात वाहून जातात ! बिहारच्या सध्याच्या निवडणूक प्रचारात उपलब्धी म्हणून सांगण्यासारखी मोदींकडे एकही गोष्ट नाही आणि तरीही ते आक्रमक आणि ज्यांनी आक्रमक राहायला ते संरक्षणाच्या पवित्र्यात ! याचे कारण मोदींच्या भावनिक बुडबुड्याना टांचणी लावण्याचे धाडस आणि कसब विरोधी नेत्यांकडे नाही. २०१४ आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीचे हेच चित्र आहे . मोदींच्या डोक्यावर अपयशाचे जेवढे ओझे वाढत आहे तेवढेच निवडणुकीचे यशही  वाढत आहे. कारण ज्याला अपयश म्हणतो ते निवडणुकीचे मुद्देच बनत नाहीत. निवडणुकीचे मुद्दे बनतात राम मंदीर , कलम ३७० किंवा सर्जिकल स्ट्राईक सारखे ! अशा मुद्द्यांवर मोदींच्या तोंडून लाह्या फुटतात आणि विरोधक मूग गिळून बसतात ! त्यामुळे निवडणूक एकतर्फी वाटते. निकाल तितके एकतर्फी येत नाहीत याला कारण बऱ्याचदा विरोधी नेत्यांपेक्षा लोक भूमिका घेतात हे आहे. बिहारचा प्रचार बघितला तर मोदींच्या प्रचाराचे घोडे चौखूर उधळले आहेत आणि त्याला लगाम घालण्यात  विरोधी नेते यशस्वी ठरले नाहीत..याचा अर्थ बिहारचा निकाल मोदींच्या  बाजूने लागेल असा नाही. शक्यता उलटीच दिसते. ही शक्यता लक्षात घेता मोदींना सळो की पळो  करून सोडायला  पाहिजे पण मोदीच विरोधकांना बचावात्मक पवित्रा घ्यायला लावत आहेत. बिहारात भाजप-जद युतीचा पराभव होईलही पण  विरोधक जो पर्यंत बचावात्मक आहेत तो पर्यंत मोदींचा पराभव कठीण आहे. 

 

बिहारात विरोधकांना यश खुणावत असतांना बचावाचा पवित्रा घेत यशाला दूर ढकलण्याचा करंटेपणा विरोधकाकडून  होतांना दिसत आहे. आपण जे बोलू त्याचा मोदी आणि भाजप कसा उपयोग करून घेतील याचाच विरोधक जास्त विचार करतात. अमुक गोष्ट बोलायची नाही , तमुक गोष्ट अशाच प्रकारे मांडायची असे ठरवून बोलल्याने मुद्द्यातील सहजता आणि आक्रमकता जावून कृत्रिमता येते जी लोकांच्या मनाला भिडत नाही. इथे विरोधक म्हणतो ते म्हणजे राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस आणि प्रादेशिक पातळीवरचे भाजप विरोधी पक्ष. प्रादेशिक पक्ष मोदी राष्ट्रीय पातळीवर काय कार्यक्रम राबवितात याचा फारसा विचार करत नाही.त्यांना या बाजूने राहिले काय आणि त्या बाजूने राहिले काय केंद्रात दुय्यम भूमिकेतच राहावे लागणार असल्याने त्यांची नजर नेहमी राज्यावर स्थिर झालेली असते. केंद्राच्या लोक विरोधी नीतीने राज्यात सत्ता मिळाली तर ते खुश असतात. त्यामुळे मोदी आणि भाजप यांचा विरोध करण्याची जबाबदारी कॉंग्रेसवर येते आणि प्रत्येक मुद्द्यावर बचावात्मक राहण्याने कॉंग्रेसला विरोधाच्या भूमिकेला न्याय देता येत नाही आणि त्यामुळे यशही कॉंग्रेसपासून दूर पळत आले आहे.                                     

 

बिहारमध्ये लालू यादवांचा राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस यांची युती किती बचावात्मक आहे हे काही उदाहरणावरून स्पष्ट होइल. राजद लालू आणि राबडीदेवीचा प्रचारामध्ये फारसा उल्लेख होणार नाही याची काळजी घेत आहे. यांचा उल्लेख करून भाजपच्या हातात कोलीत नको असा विचार लालू-राबडीदेवीचा मुलगाच करणार असेल तर लालू समर्थकांनी करायचे काय ? हे खरे आहे कि मोदी आणि भाजपने उभारलेली प्रचार यंत्रणा आणि मुठीत ठेवलेली प्रसार माध्यमे तिळाचा ताड बनविण्यात पटाईत आहेत. पण त्यांना भिवून गप्प बसणे हा त्यावरचा उपाय नाही तर या यंत्रणेचा प्रतिवाद कसा करायचा याचे मार्ग शोधायला हवेत. मोदी काळात सत्ताधारी पक्षाच्या नेत्या विरुद्ध सीबीआयने कोणती कारवाई कधी केली हे विचारायला हवे. लालू सोबतचा सीबीआयचा व्यवहार आणि आज सीबीआय सत्ताधाऱ्याच्या ताटाखालचे मांजर कसे बनले हे दाखवायला हवे होते. आज लालू यादव केंद्रातील भाजपच्या सत्ते सोबत असते तर त्यांच्या विरोधात तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचे काय झाले असते हा प्रश्न प्रचारसभेत जाहीरपणे विचारला असता तर मतदारांनी खरे उत्तर दिले असते. लालु मुख्यमंत्री असताना आरोप झाले म्हणून त्यांना खुर्ची सोडायला लावणारे तेव्हाचे मनमोहन सरकार आणि आज हायकोर्टाने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याच्या सीबीआय चौकशीचा आदेश देवूनही ढिम्म न हलणारे आजचे मोदी सरकार हा फरक दाखवून दिला तर तो लक्षात येणार नाही किंवा लक्षात घेणार नाहीत इतके मतदार दुधखुळे नाहीत. भाजपला व मोदीला विरोध करणारा एकमेव राष्ट्रीय  पक्ष  असलेल्या कॉंग्रेसची भूमिका तर तेजस्वी यादवच्या राष्ट्रीय जनता दला पेक्षा अधिक लचर आणि लाचार आहे. त्याविषयी पुढच्या लेखात.
------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com

No comments:

Post a Comment