Thursday, July 1, 2021

चुकीला चूक म्हणणे टाळल्याने आजचे संकट - ८

निवडणुकीत कोरोना प्रोटोकॉल तोडण्यात प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री शाह आघाडीवर होते. लाखा-लाखाच्या सभा घेणे, मोठमोठ्या मिरवणुका काढणे आणि वरून बघा आमच्या सभांना किती गर्दी होते अशी शेखी मिरविणे हे कोरोनाचे भान नसल्याचे लक्षण होते.
-----------------------------------------------------------------------------------

 
कोरोना साथ वेगाने पसरत असतांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता मोदी सरकारने राजकीय हित साधणाऱ्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केल्याने पहिल्या लाटेने उग्र रूप धारण केले होते. तज्ञांचा आणि राजकीय विरोधकांचा दु:स्वास हे मोदी राजवटीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. यामुळे येवू घातलेल्या पहिल्या लाटे बद्दल सावध राहण्याचा आणि ती थोपविण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याचा तज्ञांनी आणि राहुल गांधी सारख्या विरोधी पक्ष नेत्याने दिलेल्या सल्ल्याची मोदी मंत्रीमंडळातील मंत्र्यानी त्यात दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्याचा समावेश होता खिल्ली उडविली होती. जगभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू होत असतांना आपले प्रधानमंत्री बिनधास्तपणे दिल्ली हाटला जावून लीट्टीचोखा खातांना साऱ्या देशाने पाहिले. लीट्टीचोखा एवढ्या जाहीरपणे का खात होते तर बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि ते बिहारमधील आवडते खाद्य असल्याने त्यातून मोदीजी आपले बिहार प्रेम दर्शवीत होते ! त्यानंतर ट्रंपसाठी जमवलेली गर्दीही पाहिली. नंतर सर्वांनी मास्क वापरावा यासाठी आग्रही असणाऱ्या मोदी सरकारने सुरुवातीला याकडे साफ दुर्लक्ष केले होते हे एका उदाहरणावरून स्पष्ट होईल. पहिला लॉकडाऊन सुरु होण्याआधी राज्यसभेचे अधिवेशन सुरु होते. या अधिवेशनात काही सदस्य मास्क घालून गेले होते. त्यावेळी त्यांची ही कृती आक्षेपार्ह मानून राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांना मास्क घालून सभागृहात येता येणार नाही किंवा बसता येणार नाही असे म्हणत मास्क काढण्याचा आदेश दिला होता. सरकारने तज्ञांचे म्हणणे आणि सल्ला ऐकला असता तर असा प्रसंग घडला नसता. 

अचानक लॉकडाऊन असा प्रकार होता ज्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले ज्यामुळे घरापासून दूर असणाऱ्या प्रत्येकाला घर जवळ करण्याची घाई झाली. यातून प्रारंभी शहरांपुरता मर्यादित असलेला कोरोना सर्वत्र पसरला. लोकांचे एवढे हाल होत असतांनाही लोक आपल्या पाठीशी कसे उभे आहेत हे दाखविण्यासाठी टाळ्या-थाळ्या वाजविण्याचा , दिवे लावण्याचा उपक्रम हाती घेतला गेला. अनेकांनी रस्त्यावर उतरून टाळ्या-थाळ्या वाजविण्यासाठी गर्दी केली नि कोरोना प्रसारास हातभार लावला. दिवे लावल्याने निर्माण होणाऱ्या उष्णतेने कोरोना कसा नाहीसा होईल याचा प्रचार केला गेला. याने फारशी हानी झाली नसेल पण कोरोना प्रतिबंधा बाबतीत मोदी आणि त्यांच्या सरकारचा अवैज्ञानिक दृष्टीकोन स्पष्ट झाला. हाच अवैज्ञानिक दृष्टीकोन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढविण्यासाठी कारणीभूत झाला. 

पहिल्या लाटेच्या अनुभवाने शहाणे होवून लाट ओसरली तरी जगातील अनेक देश स्वस्थ बसले नाही. दुसरी लाट येवू शकते याचा अंदाज घेवून ती रोखण्यासाठी , पहिल्या लाटेत झालेले नुकसान पुन्हा होवू नये यासाठी तज्ञांशी विचारविनिमय करून उपाययोजना करण्यात अन्य देश गुंतले होते तेव्हा आमचे सरकार काय करीत होते? तर मोदींनी कोरोनावर मात करून देशाला वाचविल्याच्या वल्गना करीत होते. भारतीय जनता पक्षाने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील आपल्या मुख्यालयात कोरोनाच्या प्रकोपापासून देशाला वाचविल्याबद्दल मोदींचा विशेष गौरव केला होता. अशा प्रचारकी गौरवाने पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकात फायदा होईल हे गणित त्यामागे होते. म्हणजे दुसरे देश कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना करीत होते तेव्हा प्रधानमंत्री मोदी, त्यांचे सरकार व त्यांचा पक्ष बंगाल,केरळ,आसाम आदि पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय कसा मिळवायचा याचे नियोजन करत होते.                                     

विरोधक नावालाही उरू नयेत आणि सर्व सत्ता आपल्या हाती केंद्रित व्हावी यासाठी विशेष सजग असलेल्या मोदी आणि शाह यांनी येवू घातलेल्या कोरोना संकटा ऐवजी निवडणूक जिंकण्याला महत्व दिले यात नवल काहीच नव्हते. पण मोदी-शाह यांच्या सत्तेच्या भुकेने देशातील लक्षावधी लोक कोरोनाचे भक्ष्य ठरले. पहिल्या लाटेच्या वेळी कोरोना पेक्षा मध्यप्रदेशचे कॉंग्रेस सरकार पाडून आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करणे आणि अमेरिकेच्या होवू घातलेल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांनी  तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश देण्यासाठी ट्रंपला भारतात बोलावून मोठ्या मेळाव्यात त्यांना निवडणुकीत समर्थन जाहीर करणे प्रधानमंत्री मोदी यांच्यासाठी जास्त महत्वाचे होते. त्यांच्या या चुकीकडे दुर्लक्ष करणे देशवासीयांना फार महाग पडले. कारण दुसरी लाट सुरु झाली असताना आपल्या राजकीय महत्वाकांक्षेला वेसन घालण्याची गरज मोदीजीना वाटली नाही. तुमचे राजकारण महत्वाचे नसून लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे हे पहिल्या लाटेच्या वेळीच मोदी आणि त्यांच्या सरकारला ठणकावून सांगितले गेले असते तर दुसऱ्या लाटेवेळी मोदी आणि त्यांचे सहकारी कोरोनाकडे दुर्लक्ष करून बेभान होवून ५ राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारात गुंतले नसते. निवडणूक प्रचारात बेधुंद होवून वेळ वाया घालविण्या ऐवजी संपूर्ण देशात ओक्सिजानचा सुरळीत पुरवठा होईल आणि बेड व व्हेंटिलेटर कमी पडणार नाहीत याकडे लक्ष दिले गेले असते तर पुढचा अनर्थ टळला असता.

निवडणुकीत कोरोना प्रोटोकॉल तोडण्यात मोदी आणि शाह आघाडीवर होते. लाखालाखाच्या सभा घेणे, मोठमोठ्या मिरवणुका काढणे आणि वरून बघा आमच्या सभांना किती गर्दी होते अशी शेखी मिरविणे हे कोरोनाचे भान नसल्याचे लक्षण होते. बेभान होण्याच्या बाबतीत गृहमंत्री अमित शाह प्रधानमंत्र्याच्याही एक पाऊल पुढे होते. सभा मिरवणुकात तर ते मास्कही वापरत नव्हते. त्यांचे गृहखाते राज्यांना मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करायला सांगत होते आणि गृहमंत्री स्वत: मास्क न घालता गर्दी जमवत फिरत होते. यावेळी देशाचे आरोग्यमंत्री काय करत होते तर आज अमुक ठिकाणी प्रधानमंत्र्याच्या सभेला इतक्या लाखाची गर्दी झाली असे रोज ट्वीट करून प्रधानमंत्र्याची खुशामतगिरी करत होते. म्हणजे दिल्लीत राहूनही त्यांचे लक्ष कोरोना ऐवजी प्रधानमंत्र्याच्या सभेकडे होते ! जेव्हा एखाद्या व्यक्तीला ठरवून मोठे केले जाते तेव्हा यापेक्षा वेगळे घडत नसते.               

प्रधानमंत्री व गृहमंत्री यांनी ज्याप्रकारे गर्दी जमविली त्याचे परिणाम फक्त स्थानिक नव्हते तर देशव्यापी झालेत. त्यावेळच्या चर्चा आठवा. लोक म्हणत होते निवडणुकीत विनामास्क लाखोची गर्दी होते त्यांना कोरोना होत नाही मग आमच्यावरच बंधने का असा विचार करत लोकांचा बंधने तोड्ण्याकडे कल वाढला ज्यामुळे दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या वाढली आणि त्यांच्या उपचारास वैद्यकीय सोयी मोठ्या प्रमाणावर अपुऱ्या पडून लोकांचे जीव गेलेत. मोदी-शाह प्रमाणे दुसरे राजकीय नेते गर्दी जमवत नव्हते का हा प्रश्न व्यर्थ आहे. प्रधानमंत्री व गृहमंत्री यांच्यावर कोरोना सारख्या साथींवर उपाययोजना करण्याची घटनादत्त जबाबदारी आहे. ज्यांचेवर घटनादत्त जबाबदारी आहे त्यांनीच ती जबाबदारी पाळली नाही तर इतरांकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्याच्या बेजबाबदार वर्तनामुळेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमातून भारताच्या कोरोना परिस्थितीला मोदीजीना जबाबदार धरण्यात आले. त्यांना जबाबदार धरण्याची आणखी काही कारणे आहेत त्याचा उहापोह पुढच्या लेखात करू.
------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment