Thursday, September 21, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७४

आग्रा करार का होवू शकला नाही याची दोन्ही देशातर्फे वेगवेगळी कारणे देण्यात आली होती. परवेज मुशर्रफ यांनी आपल्या आत्मकथेत म्हंटले आहे की स्वाक्षरी न करण्याचे जे अधिकृत कारण सांगितले गेले ते होते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या कराराला सहमती दिली नाही ! पुढे मुशर्रफ यांनी असेही लिहिले की या कराराला मोडता लालकृष्ण अडवाणी यांनी घातला ! 
--------------------------------------------------------------------------------------------


आग्रा शिखर परिषदेसाठी आलेल्या परवेज मुशर्रफ यांचे दिल्लीत जोरदार स्वागत झाले तरी दौऱ्याची सुरुवात फार चांगली झाली असे म्हणता येत नाही. याचे कारण ठरले नवी दिल्लीतील पाकिस्तान दुतावासाने ठेवलेला चहापान कार्यक्रम. परवेज मुशर्रफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काश्मिरातील पाकिस्तान धार्जिण्या हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या कार्यक्रमा बद्दल आणि मुशर्रफ यांनी हुरियतच्या नेत्यांची भेट घेण्यावर आक्षेप घेणारे पत्रक जारी केले. याची दखल न घेता पाकिस्तान दूतावासातील चहापान कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला. दुसऱ्या दिवशी आग्रा येथे शिखर बैठक सुरु होण्यापूर्वी भारताच्या तत्कालीन मंत्री सुषमा स्वराज यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी पत्रकार परिषदेत शिखर बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार याची माहिती दिली. त्यात त्यांनी काश्मीरवर चर्चा होणार याचा उल्लेखच केला नाही. त्यामुळे पाकिस्तानचे प्रतिनिधी मंडळ नाराज झाले. परवेज मुशर्रफ यांनी भारतात येण्यापुर्वीच जाहीर केले होते की ते इतर मुद्दे आणि काश्मीरची चर्चा करण्यासाठी भारतात जात नसून काश्मीर व इतर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जात आहे. त्यांच्यासाठी काश्मीर प्रमुख मुद्दा होता व इतर मुद्दे त्यानंतरचे होते. परिषदेच्या विषय पत्रिकेत काश्मीर असताना त्याचा उल्लेख का केला नाही या बद्दल खुलासा करताना सुषमा स्वराज यांनी म्हंटले की काश्मीरवर चर्चा होणार हे उघड होते. त्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही. या गोष्टींचा परिणाम होवू न देता वाजपेयी व मुशर्रफ यांच्यात ठरल्याप्रमाणे काश्मीर व भारत पाक संबंधाना प्रभावित करणाऱ्या इतर विषयांवर ९० मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा दोन्ही देशाच्या प्रतिनिधी मंडळात नाही तर दोन्ही देशाच्या राष्ट्राप्रमुखातच झाली.चर्चा सकारात्मक झाल्याचे दोन्ही देशांकडून जाहीर करण्यात आल्याने परिषदेतून चांगले निष्पन्न होईल ही भावना बळावली होती. या चर्चेनंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यात शिखर परिषदेत स्वाक्षरी करण्यासाठीच्या करारावर सहमती झाल्याची चर्चा होती. शिखर बैठकीच्या पहिल्या दिवसाने निर्माण केलेल्या आशेवर पाणी फिरवणारा दुसरा आणि शेवटचा दिवस ठरला. 


दुसऱ्या दिवशी सकाळी मुशर्रफ यांनी प्रमुख भारतीय संपादकांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी संपादकांशी ते प्रामुख्याने काश्मीर प्रश्नावर बोलले. तो प्रश्न सुटल्याशिवाय दोन्ही देशातील संबंध सुरळीत होणार नाही असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. या सगळ्या चर्चेचे त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जे जगभरात प्रसारित झाले. आपण काश्मीर प्रश्नावर भारताशी रोखठोक बोलत आहोत हा संदेश व्हिडीओ रेकॉर्डिंगद्वारे  पाकिस्तानी जनतेपर्यंत त्यांना पोचवायचा होता. भारताची स्थिती या उलट होती. भारत सरकारला काश्मीर हा चर्चेचा मध्यवर्ती मुद्दा आहे हे लोकांपर्यंत पोचू द्यायचे नव्हते. त्यामुळे भारतीय नेत्यांना संपादकांसोबतची बोलणी रेकॉर्डिंग करून जगाला ऐकवण्याचा प्रकार आवडला नाही. काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली त्या चर्चेत भारताने काश्मिरातील आतंकवादी कारवायांना पाकिस्तानची होत असलेली मदत आक्षेपार्ह असल्याचे चर्चेत भारताकडून जोरकसपणे मांडल्या गेल्याचे सांगण्यात आले. परिणामी पहिल्या दिवसाच्या चर्चेनंतर परिषदेतून ठोस निष्पन्न होईल व काश्मीर प्रश्नावर तोडगा दृष्टीपथात आहे असा जो आशावाद निर्माण झाला होता त्यावर दुसऱ्या दिवशी पाणी फेरले गेले. त्या परिषदे नंतर जी माहिती समोर आली त्यानुसार काश्मीर प्रश्नावरच्या तोडग्यावर वाजपेयी आणि मुशर्रफ तत्वश: सहमत झाले होते. त्या संबंधीचे निवेदन तयार करण्याची जबाबदारी दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांवर सोपविण्यात आली आणि त्यांनी सहमतीने निवेदन देखील तयार केले होते याचेही पुरावे नंतर प्रकाशित झाले होते. मुळात जो तोडगा निघाल्याचे बोलले जात होते तो मुशर्रफ यांनीच सुचविला होता. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी माघार घेण्याचे कारण नव्हते. सहमतीच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार भारतातर्फे दिला गेला. वाजपेयींनी ऐनवेळी माघार का घेतली किंवा करार का होवू शकला नाही याची दोन्ही देशातर्फे वेगवेगळी कारणे देण्यात आली होती. परवेज मुशर्रफ यांनी आपल्या आत्मकथेत म्हंटले आहे की स्वाक्षरी न करण्याचे जे अधिकृत कारण सांगितले गेले ते होते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या कराराला सहमती दिली नाही ! पुढे मुशर्रफ यांनी असेही लिहिले की या कराराला मोडता लालकृष्ण अडवाणी यांनी घातला ! अडवाणी यांनी याचा इन्कार करताना आपल्याच सूचनेवरून वाजपेयींनी मुशर्रफ यांना चर्चेसाठी आमंत्रित केल्याचा दावा केला होता. 

कोणत्या करारावर स्वाक्षऱ्या होणार होत्या हे आजतागायत अधिकृतपणे सांगितले गेलेले नाही. ज्याअर्थी मंत्रीमंडळाने कराराचा मसुदा नाकारला त्याअर्थी असा मसुदा तयार झाला होता हे उघड आहे. मात्र काश्मीर प्रश्नावर मुशर्रफ यांनी समोर ठेवलेला तोडगा मात्र जगजाहीर आहे. अंतिम मसुद्यात हा तोडगा जशाच्यातसा स्वीकारण्यात आला की त्यात काही फेरबदल करण्यात आले होते हे कळायला मार्ग नाही. काश्मीरच्या बाबतीत १९४७ पासून जे काही घडले त्यात गोपनीय म्हणाव्या अशा दोनच बाबी आहेत ज्याचा खुलासा आजवर झाला नाही. पहिली बाब म्हणजे मृत्युच्या काही दिवस आधी पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्नावर काही तोडगे सुचविले होते ज्याची चर्चा करण्यासाठी शेख अब्दुल्लांना पाकिस्तानात पाठविले होते. शेख अब्दुल्ला त्या कामगिरीवर पाकिस्तानात असतांना इकडे नेहरूंचा मृत्यू झाला होता. गुलदस्त्यात असलेली दुसरी बाब म्हणजे आग्रा शिखर परिषदेत वाजपेयी-मुशर्रफ यांच्या स्वाक्षरीसाठी तयार करण्यात आलेला मसुदा. मुशर्रफ यांच्या ज्या तोडग्याची चर्चा होत आली आहे त्यावरून मसुद्यात काय असेल त्याचा अंदाज तेवढा बांधता येतो. जाहीर झालेला मुशर्रफ यांचा चारसूत्री तोडगा असा होता : एक, भारत आणि पाकिस्तान यांनी मान्य केलेली आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषा आहे तशी कायम ठेवावी. दोन, या नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांनी आपले सैन्य टप्प्याटप्प्याने मागे घ्यावे. तीन, नियंत्रण रेषा काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर मधील काश्मीरींसाठी खुली ठेवावी आणि चार, काश्मीरच्या दोन्ही भागांना स्वातंत्र्य मिळणार नाही मात्र स्वशासनाचा अधिकार मिळेल. देखरेखीसाठी भारत, पाकिस्तान आणि काश्मिरी जनतेचे प्रतिनिधी अशी संयुक्त समिती असेल. या तोडग्याच्या आसपास आग्रा मसुदा तयार करण्यात आल्याचे मानल्या जाते. मात्र भारत आणि पाकिस्तानातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या आग्रा परिषदेने आशा निर्माण केल्या होत्या ती परिषद कोणतीही घोषणा न करता, कशावरही स्वाक्षरी न करता व दोन्ही राष्ट्रप्रमुखाची संयुक्त पत्रकार परिषद न होताच संपली. 

                                                  (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


No comments:

Post a Comment