Thursday, September 7, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७२

 काश्मीर प्रश्नावर ताणल्या गेलेले भारत पाक संबंध सुरळीत करण्याच्या अटलबिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ यांच्या प्रयत्नांना जनरल मुशर्रफ यांच्या कारगिल दुस्साहसामुळे खीळ बसली. पुढे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जनरल मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख पदावरून बरखास्त केले तेव्हा लष्कराने नवाज शरीफ यांनाच पदच्युत करून तुरुंगात पाठविले आणि जनरल मुशर्रफ राष्ट्रप्रमुख बनले. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादाला प्रोत्साहन मिळून भारत पाकिस्तान संबंध तणावपूर्ण बनले.
------------------------------------------------------------------------------------


पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ लाहोर मध्ये भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची गळा भेट घेवून यापुढे दोन देशात युद्ध नको असे म्हणत होते तेव्हा पाकिस्तानी लष्कराने कारगिल मध्ये घुसखोरी सुरु केलेली होती. याची माहिती ना पाकिस्तानच्या नागरी सरकारला होती ना भारत सरकारला. भारत पाक संबंध सुरळीत करण्यात पाकिस्तानी लष्कर नेहमीच अडथळा ठरत आले आहे. याचे कारण भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी लष्कर सतत पराभूत होत आले हे आहे.  पराभवाचा बदला घेण्याच्या मानसिकतेत पाकिस्तानी लष्कर वावरत असते. कारगिल मधील घुसखोरी आणि त्यातून झालेले दोन देशातील मर्यादित युद्ध पाकिस्तानी लष्कराच्या याच मानसिकतेचा परिपाक होता. वाजपेयींच्या पाकिस्तान भेटीवेळी जनरल परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते. लष्कर प्रमुख होण्याच्या बऱ्याच आधी ब्रिगेडियर असताना जगातील उंच असे सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्यावरून झालेल्या लढाईत त्यांनी पाकिस्तानी तुकडीचे नेतृत्व केले होते. पाकिस्तानी लष्कराने कारगिल मध्ये घुसखोरी करून जसा कारगिलचा ताबा घेतला होता तोच प्रकार सियाचीन ग्लेशियरच्या बाबतीत चालविला होता. पण भारताच्या लक्षात वेळीच हा प्रकार आल्याने भारताने सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्याची योजना आखून जय्यत तयारी केली. पाकिस्तानही त्याच तयारीत होते. पाकिस्तानला सियाचीन ग्लेसियर पर्यंत जमीन मार्गे सैन्य व रसद पाठविणे शक्य होते तर विपरीत भौगोलिक स्थितीमुळे भारताला सैन्य आणि रसद हवाई मार्गेच पोचविणे शक्य होते. एवढ्या उंचीवर हेलिकॉप्टर आणि विमान उतरविणारे भारत पहिले राष्ट्र ठरले. विपरीत भौगोलिक स्थिती व विपरीत हवामानावर मात करून भारतीय सैन्याने पाकिस्तानला मागे ढकलत योजिलेले ऑपरेशन मेघदूत यशस्वी केले. सियाचीन ग्लेशियर १३ मार्च १९८४ रोजी ताब्यात घेतले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ च्या युद्धानंतर पाकिस्तानला दुसऱ्यांदा धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा १९८७ व १९८९ मध्ये सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यात पुन्हा काही महत्वाची ठिकाणे पाकिस्तानला गमवावी लागली. जनरल परवेज मुशर्रफ यांच्या आत्मवृत्तात पाकिस्तानने सियाचीनचा २५०० चौरस किलोमीटरचा प्रदेश गमावल्याचे लिहिले आहे.                                                         


 हे ग्लेशियर पाकिस्तानचे नव्हते. दोन्ही देश त्यावर ताबा सांगत असल्याने तो भूभाग वादग्रस्त होता असे म्हणता येईल. भारताने सियाचीन ग्लेशियरवर ताबा मिळवून हा वाद संपविला. पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख जनरल झिया उल हक यांच्या कार्यकाळात झालेल्या या मर्यादित युद्धातील पराभव जसा जनरल झिया उल हक यांना बोचत होता तसाच तो या लढाईत भाग घेतलेले परवेज मुशर्रफ यानाही बोचत होता. झिया उल हक यांनी त्याचाच बदला म्हणून भारताला 'हजार जखमा' देण्यासाठी काश्मिरातील दहशतवादी कारवायात वाढ करण्याची योजना आखली होती. त्यांचे विमान अपघातात निधन झाल्या नंतर सत्तेत आलेल्या बेनझीर भूत्तोने ती योजना पुढे नेली. १९९० च्या दशकातील दहशतवाद त्या योजनेचाच भाग होता. एवढे करून पाकिस्तान लष्कराला समाधान झाले नाही. सियाचीन ग्लेशियर वर चढाई करण्याची परवानगी त्यांनी बेनझीर भुत्तो कडे मागितली जी नाकारण्यात आली होती. पुढे नवाज शरीफ पंतप्रधान झाले तर परवेज मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यदलाचे प्रमुख बनले. नवाज शरीफ यांनी भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न चालविले होते तर नागरी सरकारची परवानगी न घेता जनरल मुशर्रफ यांनी पाकिस्तानी लष्कराला कारगिल मध्ये घुसखोरी करायला लावून सियाचीनचा बदला घेण्याचा प्रयत्न केला. ही घुसखोरी लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय'ची आखणी केली व मोठा पराक्रम गाजवून कारगिल परत मिळविले.  कारगिल पराक्रमाची चर्चा नेहमीच होते व कारगिलचा विजय दिवस दरवर्षी साजराही केला जातो. पण पाकिस्तानच्या कारगिल घुसखोरीसाठी निमित्त ठरलेला सियाचीन ग्लेशियरचा विजय अभूतपूर्व असतानाही विस्मृतीत गेला आहे. जगातील सर्वात उंचावरच्या एकमेव 'ऑपरेशन मेघदूत'ची चर्चा होत नाही. काश्मीर प्रश्नावर ताणल्या गेलेले भारत पाक संबंध सुरळीत करण्याच्या अटलबिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ यांच्या प्रयत्नांना जनरल मुशर्रफ यांच्या कारगिल दुस्साहसामुळे खीळ बसली. पुढे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जनरल मुशर्रफ यांना लष्कर प्रमुख पदावरून बरखास्त केले तेव्हा लष्कराने नवाज शरीफ यांनाच पदच्युत करून तुरुंगात पाठविले आणि जनरल मुशर्रफ राष्ट्रप्रमुख बनले. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादाला प्रोत्साहन मिळून भारत पाकिस्तान संबंध तणावपूर्ण बनले.


जनरल मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्या नंतर दोनच महिन्यात २४ डिसेंबर १९९९ रोजी इंडियन एअरलाईन्सचे काठमांडू वरून १७६ प्रवासी घेवून दिल्लीला निघालेल्या विमानाचे पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी अपहरण केले. अत्यंत भोंगळ पद्धतीने भारत सरकारने व प्रशासनाने हे विमान अपहरण प्रकरण हाताळल्याने वाजपेयी सरकारची नाचक्की झालीच शिवाय दहशतवाद्यांपुढे झुकून ज्यांनी काश्मीर आणि काश्मीर बाहेरही मोठ्या दहशतवादी कारवाया केल्या अशा दहशतवाद्यांची सुटका करावी लागली. काठमांडू वरून दिल्लीसाठी निघालेल्या विमानाचे अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी ते विमान लाहोरकडे वळविण्याचा आदेश विमान चालकाला दिला. पण पाकिस्तानने ते विमान लाहोरला उतरू दिले नाही. इंधन संपत आल्याने इंधन भरण्यासाठी विमान अमृतसर विमानतळावर उतरले होते. तिथेच भारताला कमांडो करवी कारवाई करण्याची संधी होती. ढिसाळ नियोजन व कारवाई बाबत दिल्लीत असलेला संभ्रम यामुळे अपहरणकर्त्यांना वैमानिकाला धाक दाखवून विमानाला अमृतसरवरून लाहोरला नेता आले. २४ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटाला प्रवासी विमानाचे अपहरण झाल्याचे दिल्लीला कळले होते. पंतप्रधान वाजपेयी त्यावेळी पाटणा येथे होते. त्यांना तिथे ही बातमी कळलीच नाही. ते दिल्लीला ५ वाजून २० मिनिटांनी परतल्या नंतर त्यांना अपहरणाचे वृत्त समजले. त्याआधी कॅबिनेट सेक्रेटरी प्रभात कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संकट व्यवस्थापन समितीची बैठक झाली होती. त्यात रॉ प्रमुख , आय बी प्रमुख , एन एस जी प्रमुख बैठकीत सामील होते. पण काय करावे याबाबत संभ्रम कायम होता. इंधन भरण्यासाठी जेवढा जास्त वेळ घेता येईल तेवढा घ्या एवढाच दिल्लीवरून अमृतसर विमानतळ अधिकाऱ्यांना व इतर अधिकाऱ्यांना आदेश होता. 

                                      (क्रमशः)

---------------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment