Thursday, August 31, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ७१

 १९९९ मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर काश्मीर प्रश्नावर भारत पाकिस्तानात असलेला तणाव दूर करण्याच्या उद्देश्याने दिल्ली लाहोर बस सुरु करून पहिल्या बसने लाहोर गाठण्याचा वाजपेयींचा निर्णय ऐतिहासिक होता. जगाने या घटनेची तुलना पूर्व व पश्चिम जर्मनीला विभक्त करणारी बर्लिनची भिंत जमीनदोस्त होण्याच्या घटनेशी केली होती.
--------------------------------------------------------------------------------


अटल बिहारी वाजपेयी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले ते १३ दिवसासाठी. दुसऱ्यांदा १९९८ मध्ये त्यांना १३ महिने मिळाले होते. १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर मात्र ते पूर्ण ५ वर्षे पंतप्रधान पदावर राहिले. १९९८ ते २००४ या ६ वर्षाचा विचार केला तर काश्मीर संदर्भात अनेक घटना आणि घडामोडींनी भरलेली ही वर्षे होती. १९९८ साली पदावर आल्यानंतर १३ महिन्याच्या काळात घडलेली ऐतिहासिक घटना म्हणजे पोखरण येथे घेतलेली अणु चाचणी. या चाचणी नंतर भारत अणुबॉम्बधारी राष्ट्रात सामील झाल्याचे वाजपेयींनी घोषित केले होते. जगातील राष्ट्रांसाठी हा धक्का होता. वास्तविक या चाचणीची पूर्ण तयारी नरसिंहराव पंतप्रधान असताना झाली होती. पण हेरगिरी करणाऱ्या अमेरिकन उपग्रहाने ही तयारी टिपली. त्यावेळी अमेरिकेने मोठा दबाव आणून ही चाचणी स्थगित करायला भाग पाडले होते. वाजपेयींच्या काळात कोणाला कळणार नाही याची दक्षता घेत यशस्वीरित्या चाचणी पार पडली. भारताने केलेल्या अणुबॉम्ब  चाचणीच्या धक्क्यातून जग सावरण्या आधीच पाकिस्तानने देखील अशी चाचणी पार पाडून आपणही अण्वस्त्रधारी राष्ट्रात सामील झाल्याचे जाहीर केल्याने अमेरिका युरोपसह अन्य राष्ट्राची चिंता वाढली. या चिंतेचे मूळ कारण होते भारत-पाकिस्तानात काश्मीर प्रश्नावर झालेली युद्धे आणि सततची युद्धसदृश्य परिस्थिती. अण्वस्त्र सज्ज झाल्यानंतर युद्धाचा भडका उडाला तर अण्वस्त्राचा वापर होवू शकतो अशी चिंता अमेरिका व इतर राष्ट्रांना वाटत होती. या घटनेपूर्वी  झालेल्या १९९८ च्या  सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात वाजपेयींनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचा भाग निवडून आलो तर परत मिळवू अशी घोषणा केली होती.  निवडणुकीनंतर वाजपेयीच पंतप्रधान झाल्याने या मुद्द्यावर पुन्हा युद्ध तर होणार नाही ना अशी चिंता जगातील अनेक राष्ट्रांना वाटत होती.  काश्मीरच्या मुद्द्यावर तणाव वाढू नये यासाठी भारत व पाकिस्तानने बोलणी करावी यासाठी अमेरिकेने व इतर राष्ट्रांनी दबाव आणला.       


दोन्ही देशाच्या अण्वस्त्र चाचणी नंतर काही महिन्यातच झालेल्या  संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमुळे दोन्ही देशाच्या पंतप्रधानांना बोलणी करण्याची संधी मिळाली. न्यूयॉर्क येथे  भारताचे पंतप्रधान वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात  २३ सप्टेंबर १९९८ रोजी बोलणी होवून तणाव कमी करण्यासाठी पाउले उचलण्याचे निश्चित झाले. याच बैठकीत पहिल्यांदा दिल्ली-लाहोर बस सुरु करण्याची कल्पना पुढे आली. नंतर दोन्ही देशाच्या अधिकारी व मंत्री पातळीवर दिल्ली-लाहोर बसची चर्चा झाली. दरम्यान वाजपेयी सरकारवर आणलेला अविश्वास ठराव पारित झाल्याने सरकारला राजीनामा द्यावा लागला व बस सुरु करण्याचा विषय मागे पडला. पुन्हा निवडणुका होवून वाजपेयीच पंतप्रधान झाले तेव्हा नवाज शरीफ यांनी वाजपेयींना दिल्ली लाहोर बस सुरु करण्याची आठवण दिली. ४ फेब्रुवारी १९९९ रोजी प्रकाशित इंडियन एक्सप्रेस मधील मुलाखतीत नवाज शरीफ यांनी दिल्ली -लाहोर पहिल्या बसने लाहोरला येण्याचे निमंत्रण वाजपेयींना दिले. त्याच दिवशी दुपारी वाजपेयींनी शरीफ यांचे निमंत्रण स्वीकारले.. १९ फेब्रुवारी १९९९ रोजी दिल्लीहून पहिली बस निघाली. या बस मध्ये अमृतसर येथे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी चढले. वाघा बॉर्डरवर  त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उभे होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या लाहोर आगमनाने दोन्ही राष्ट्रातील तणावाचा काही काळ विसर पडून उत्साही व उत्सवी वातावरण तयार झाले होते. या बस मध्ये वाजपेयी एकटेच नव्हते. भारतातील अनेक दिग्गज त्या बस मध्ये होते. दिल्लीहून लाहोरला जाणाऱ्या पहिल्या बसच्या प्रवाशांमध्ये कपिलदेव, देवआनंद, शत्रुघ्न सिन्हा, जावेद अखर , मल्लिका साराभाई इत्यादींचा समावेश होता.  पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल हे देखील या बसमध्ये होते. सदा ए सरहद बस असे दिल्ली-लाहोर बसचे नामकरण करण्यात आले होते. 

लाहोर मध्ये पोचलेल्या वाजपेयीसाठी लाहोर किल्ल्याच्या दिवाण ए खास मध्ये शानदार स्वागत सोहळा ठेवण्यात आला होता. वाजपेयींच्या लाहोर भेटीचा भारतापेक्षा पाकिस्तानात जास्त जल्लोष दिसत होता. जमात ए इस्लामीने वाजपेयी दौऱ्याला विरोध करून गालबोट लावले. वाजपेयी लाहोर किल्ल्याकडे येत असताना जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक सुद्धा केली होती. तरी लाहोर किल्ल्यावरील सोहळा उत्साहात पार पडला होता. दिल्ली लाहोर बसमधून लाहोरला आलेल्या पंतप्रधान वाजपेयी यांची वाढलेली लोकप्रियता पाहून नवाब शरीफ म्हणाले होते की अटलबिहारी पाकिस्तात सहज निवडून येतील. जिथे २३ मार्च १९४० रोजी पाकिस्तान निर्मितीचा ठराव झाला होता ते स्थळ मिनार ए पाकिस्तान म्हणून जतन करण्यात आले आहे. त्या स्थळाला भेट देवून वाजपेयींनी पाकिस्तानी जनतेला आणि भारतातील चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. स्थिर आणि प्रगतीशील पाकिस्तान भारताच्या हिताचा आहे असे तिथल्या भेटपुस्तिकेत लिहून एकप्रकारे फाळणीचा व पाकिस्तान निर्मितीचे सत्य वाजपेयींनी स्वीकारले. पाकिस्तान निर्मिती विषयी भारतीय जनमत लक्षात घेता अटलबिहारी त्या स्थळाला भेट देणार नाहीत असे पाकिस्तान सरकारलाही वाटत होते. पण ते धाडस वाजपेयींनी दाखवले. त्यांचे त्या भेटीतील दुसरे धाडस म्हणजे पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांच्या कबरीला दिलेली भेट. पुढे काही वर्षांनी लालकृष्ण अडवाणी यांनी जीनाच्या कबरीला भेट देवून जीनांचे सेक्युलर नेता म्हणून केलेल्या कौतुकाने भारतीय जनता पक्षातील त्यांच्या स्थानाला लागलेले ग्रहण लक्षात घेतले तर वाजपेयींच्या त्या स्थळांना भेटी कशा धाडसी होत्या हे लक्षात येईल. या भेटीत भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी 'लाहोर घोषणापत्रा'वर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रात जम्मू काश्मीरसह सर्व प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडविण्याचे मान्य करण्यात आले. तसेच आण्विक स्पर्धा टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशाच्या संसदेने लाहोर घोषणापत्रावर शिक्कामोर्तब केले होते. वाजपेयींची लाहोर भेट अवघ्या २६ तासात आटोपली. या भेटीने काही महिने तरी दोन देशातील तणाव कमी होवून देशच नव्हे तर जनताही एकमेकांच्या जवळ आली होती. दिल्ली लाहोर बस मधून वाजपेयींच्या पाकिस्तान भेटीची तुलना जगातील मुत्सद्द्यांनी पूर्व व पश्चिम जर्मनीला विभक्त करणारी बर्लिनची भिंत जमीनदोस्त होण्याच्या घटनेशी केली होती. वाजपेयींच्या लाहोर बस यात्रेने दोन देशात निर्माण झालेले सौहार्दाचे वातावरण फार काळ टिकू शकले नाही.  पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतीने कारगिलचे युद्ध झाले आणि वाजपेयींच्या बस डीप्लोमसीवर पाणी फेरले गेले.

                                                   (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 




No comments:

Post a Comment