Thursday, October 9, 2014

....तरच भारत स्वच्छ राहील !

सर्वत्र घाण दिसत असली तरी ज्याला ‘गायीचा प्रदेश-काऊ बेल्ट’ म्हणतात त्या राजस्थान,गुजरात पासून ते उत्तर प्रदेश बिहार पर्यंत पसरलेल्या प्रदेशात घाणीचे सर्वाधिक प्रमाण दिसून येईल. याच पट्टयात संघ-भाजपचा प्रभाव हा योगायोग नाही ! सनातनी संस्कृतीचा अभिमान आणि अस्वच्छता याच्या परस्पर संबंधाचे हे बोलके उदाहरण आहे!
-------------------------------------------------------

आम्हाला आमच्या संस्कृतीचा कितीही अभिमान असला आणि जगातील सर्वात श्रेष्ठ आणि पुरातन संस्कृती म्हणून आम्ही आमचा स्व-गौरव करून घेत असलो तरी जगात आमची खरी ओळख आहे ती सर्वदूर आणि सर्वत्र आम्ही पसरवीत असलेल्या घाणी मुळे. भारतात दर्शनीय स्थळांची भरमार असूनही इतर देशांच्या तुलनेत भारत दर्शनासाठी येणाऱ्या परकीय पाहुण्यांचे प्रमाण कमी आहे ते आमच्या या कुख्याती मुळे. आम्हीच पसरवीत असलेल्या घाणीमुळे आजाराचे , कुपोषणाचे आणि बालमृत्यूचे देखील प्रमाण प्रचंड आहे. देशात सर्वत्र पसरलेल्या घाणीमुळे सारा देशच आजारी आणि असंस्कृत वाटावा अशी परिस्थिती आहे. कदाचित आफ्रिकेतील अतिगरीब आणि शिक्षणाचा अल्पप्रसार झालेले काही देश यापेक्षा आम्ही थोडे पुढारलेलो आहो असा अभिमान बाळगता येईल ! त्याचमुळे देशापुढे अनेक उग्र समस्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेले स्वच्छ भारत अभियान लक्षवेधी ठरले . या अभियानाची मोठी गरज असल्याचे सार्वत्रिक मत व्यक्त झाले आणि विरोधकांनी देखील पंतप्रधानाच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. अर्थात पंतप्रधानांनी झाडू हाती घेतला म्हणून झाडू हाती घेण्या ऐवजी कमरेवर हात ठेवून पंतप्रधानांचे कौतुक करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे प्रचंड आहे. २ ऑक्टोबरला पंतप्रधानासोबत ज्यांनी झाडू हाती घेतला त्यापैकी मजबुरीने झाडू हातात घेणारांची संख्या कमी नाही. ज्यांनी उत्साहाने झाडू हाती घेतला तो उत्साह सफाई करण्यापेक्षा सफाईचा उत्सव साजरा करण्यासाठी अधिक होता. या आमच्या उत्सवी मनोवृत्तीमुळे २ ऑक्टोबरला सफाई अभियाना नंतर झालेल्या खाण्यापिण्याची घाण सर्वत्र पसरल्याची अनेक छायाचित्रे अनेक वृत्तपत्रातून झळकली , तसेच दूरचित्रवाणीवर बघायला मिळाली. त्यामुळे स्वच्छते बद्दलचा आमचा हा अस्वच्छ दृष्टीकोन नेमका कशामुळे आहे हे समजून घेत नाही आणि तो दृष्टीकोन बदलण्यासाठी , ज्या परिस्थितीतून आमचा हा दृष्टीकोन बनला ती परिस्थिती बदलण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही तर पंतप्रधानाच्या स्वच्छता अभियानाचे स्वरूप प्रतीकात्मक आणि उत्सवीच राहील . उलट स्वच्छता अभियान मोठ्या अस्वच्छतेत रुपांतरीत होण्याचा धोका आहे. प्रत्येक उत्सवानंतर आणि जत्रेनंतर , यात्रेनंतर जी घाण मागे राहते तशीच सफाई अभियाना नंतर देखील घाण मागे राहील. २ ऑक्टोबरला अभियानाच्या प्रारंभ दिवशीच याची झलक पाहायला मिळाली आहे.

इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात अधिक घाण पसरलेली दिसते त्याचे मूळ आणि खरे कारण आपल्या कथित महान संस्कृतीत दडले आहे . वर्षानुवर्षे चातुर्वर्ण्यावर तसेच जातीवर आधारित आणि विभाजित असा आमचा समाज राहिला आहे. यामुळे समाजातील वरच्या वर्गाना घाण करण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळाला तर त्यांची ही घाण साफ करण्यासाठीच समाजातील आज ज्यांना आपण दलित म्हणून संबोधतो त्या खालच्या समजल्या जाणाऱ्या वर्गाचा जन्म झाला यावर समाजाचा ठाम विश्वास होता. घाण करणारे वेगळे आणि साफ करणारे वेगळे अशी विभागणी आपल्याकडेच आहे आणि म्हणून भारत नावाचा हा महान देश जगातील सर्वात घाणेरडा देश बनला आहे. हिंदूंची देवळे , त्या देवळांचा परिसर यात इतर पूजास्थानांच्या तुलनेत प्रचंड घाण पसरलेली दिसते याचे महत्वाचे कारण चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्थेच्या नावावर झालेली कामाची विभागणी हे आहे. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींना घाण साफ करण्यासाठी सुद्धा मंदिरात प्रवेश नसतो. त्यांच्या सावलीने देखील यांचा देव बाटतो. उच्चवर्णीयांना तर हाती झाडू घेतला तरी विटाळ होतो. मग मंदिर आणि परिसर स्वच्छ कोण करणार . गुरुद्वारा , चर्च आणि मशिदी तुलनेत साफसुथरे का असतात याचे उत्तर यात सापडते. जी बौद्ध स्थळे हिंदूंच्या ताब्यात आहेत आणि जी बौद्ध स्थळे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात आहेत त्यातील स्वच्छते बद्दलचा फरक लक्षणीय आहे. हिंदू प्रबंधनाच्या ताब्यातील बौद्ध किंवा इतर स्थळे अस्वच्छ दिसतील. कारण उच्चवर्णीय हिंदूना घाण करण्याचे अधिकार आहेत , घाण साफ करण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेलेच नाहीत. हिंदूंची घरे स्वच्छ दिसतात याचे कारण त्या घरात क्षुद्र आणि शूद्रातिशूद्र समजली जाणारी स्त्री सफाई हे आपले जन्मसिद्ध काम असल्याचे समजून स्वच्छता राखते हे आहे. स्त्रीने घराबाहेर पडता कामा नये ही आमची संस्कृती असल्याने स्त्रीचा सार्वजनिक ठिकाणचा वावर कमी असतो घाण करणाऱ्यांचाच सार्वत्रिक आणि सार्वजनिक वावर अधिक असल्याने आपल्या देशात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. सर्वत्र घाण दिसत असली तरी ज्याला ‘गायीचा प्रदेश-काऊ बेल्ट’ म्हणतात त्या राजस्थान,गुजरात पासून ते उत्तर प्रदेश बिहार पर्यंत पसरलेल्या प्रदेशात घाणीचे सर्वाधिक प्रमाण दिसून येईल. याच पट्टयात संघ-भाजपचा प्रभाव हा योगायोग नाही ! सनातनी संस्कृतीचा अभिमान आणि अस्वच्छता याच्या परस्पर संबंधाचे हे बोलके उदाहरण आहे ! महात्मा गांधीचे स्वच्छता अभियान सफल झाले नाही कारण सनातनी हिंदूंचा त्यांना कायम विरोध होता. संडास सफाईसह सर्वप्रकारची कामे स्वत:च केली पाहिजेत हा गांधींचा आग्रह या वर्गाच्या पचनी पडण्यासारखा नव्हता. या वर्गाची ही मानसिकता बदलली नाही तर कोणतेही सफाई आणि स्वच्छतेचे अभियान यशस्वी होणार नाही. सुदैवाने ताजे स्वच्छता अभियान महात्मा गांधीच्या नावे असले तरी या वर्गाला जवळ वाटणाऱ्या पंतप्रधानाने ते सुरु केले असल्याने या वर्गाच्या मनोवृत्तीत बदल व्हायला प्रारंभ होईल अशी आशा करता येईल.

या देशात पसरणाऱ्या घाणीचे दुसरेही एक तितकेच महत्वाचे कारण आहे. ते कारण म्हणजे शेती आणि शेतीजन्य उद्योगात अडकून पडलेल्या प्रचंड लोकसंख्येची दुरावस्था. या समाजाला गाय,बैल शेळी,कोंबडी आणि स्वत;चे मुल एकाच अंगणात सांभाळावे लागत असेल आणि खतासाठी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग आणि शेणाच्या टोपल्या टाकाव्या लागत असतील तर ते इच्छा असली तरी आपले घर आणि परिसर स्वच्छ राखू शकत नाही. त्याची ही परिस्थिती असल्याने त्याला अनुदानात संडास बांधून द्यावा लागतो. संडास बांधला तरी त्यात ओतायला पाणी कोठून आणणार ? घरातील अडगळीच्या चार वस्तू त्यात टाकण्या पलीकडे सरकारी औदार्यातून बांधलेल्या संडासचा उपयोग नसतो हे वास्तव आम्ही कधी ध्यानात घेणार आहोत ? शेतकऱ्याचे,  कष्टकरी समुदायाचे आणि नोकरदार वर्गाच्या , श्रीमंत वर्गाच्या घराची तुलना करा आणि एकीकडे स्वच्छता का नाही आणि दुसरीकडे सारे कसे चकाचक आहे यामागचे कारण लक्षात येईल. जिथे गरिबी तिथे अस्वच्छता आणि जिथे समृद्धी तिथे स्वच्छता हे समीकरण कळायला फार अक्कल लागणार नाही. त्यामुळे रोज हातात झाडू घेवून सफाई केली तरी दुसऱ्या दिवशी तितकी आणि तशीच घाण पसरलेली दिसेल. शेती आपल्याकडेच होते असे नाही. इंग्लंड-अमेरिकेत देखील शेती करतात. जनावरांचे पालन करणारे आणि आपल्या पेक्षा जास्त दुधदुभते घेणारे देश जगाच्या पाठीवर आहेत. पण तेथे रस्त्यावर शेण दिसत नाही. कारण तिथे आपल्याकडे माणसांची सोय होत नाही अशी जनावरांची सोय होते. या सगळ्या देशात शेतीवर अवलंबून असणारी जनसंख्या अत्यल्प आहे. उद्योगात तेथील जनसंख्या सामावून गेल्यामुळे आलेल्या समृद्धीतून अल्पसंख्येतील शेतकरी लाभान्वित होत असतात. आपल्याकडे शेतकऱ्यांना सामावून घेणारी व्यवस्थाच नाही. तोट्यातील शेतीमुळे बाहेर फेकला जाणारा शेतकरी मजुरीच्या आशेने शहरात येतो. कफल्लक शेतकरी तिथे कसा राहतो याची कधी कोणी काळजी केली आहे का ? ज्याला राहायला घर सोडा शहरात मोकळी जागा मिळत नाही त्याला आम्ही कोणती आणि कशी स्वच्छता शिकविणार आहोत ! मध्यमवर्गीयांना स्वच्छता आणि समृद्धीचा संबंध लक्षात येत नसेल तर त्यांनी रेल्वेचा साधारण डबा आणि एसी वर्गाचे डबे पाहावेत ! तेव्हा समृद्धी शिवाय स्वच्छता हे निव्वळ स्वप्नरंजन ठरणार आहे.

स्वच्छतेच्या मार्गातील आणखी एक अडथळा म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा संपूर्ण अभाव. ज्या गंगेला आपल्याकडे सर्वाधिक पवित्र नदी समजली जाते त्या गंगेत सर्वाधिक घाण टाकण्याचे काम आमचा अवैज्ञानिक दृष्टीकोन करतो. कदाचित सर्वात जास्त पवित्र मानली गेल्यानेच गंगेचे रुपांतर गटारगंगेत झाले आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन नसल्याने तंत्रज्ञानाच्या वापराबाबत लोकच नाही तर आपल्याकडील नगरपालिका , ग्रामपंचायती सारख्या संस्था मागे आहेत. त्यामुळे सफाई म्हणजे झाडू हे समीकरण आपल्याकडे रूढ आहे. सफाई कामगार आपल्याकडे अपरिहार्य बनले आहेत. तंत्रज्ञाना अभावी पालिका – महापालिकांना कचऱ्याची विल्हेवाट नीट लावता येत नाही. त्यांची स्वच्छता म्हणजे एका ठिकाणची घाण दुसऱ्या ठिकाणी नेवून टाकणे एवढीच आहे. तेव्हा पंतप्रधानांनी झाडू हाती घेतला म्हणून लोक झाडू हाती घेवून स्वच्छता राखतील ही कल्पनाच वेडगळपणाची आहे. झाडू हाती घेतल्याने पंतप्रधानांवर प्रसिद्धीचा झोत पडेल , देश मात्र स्वच्छ होणार नाही. देश स्वच्छ ठेवायचा असेल तर त्यासाठी मोठे शैक्षणिक , सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणावे लागणार आहेत.
---------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा,जि.यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
----------------------------------------------------

1 comment:

  1. घाण करणारे वेगळे आणि साफ करणारे वेगळे अशी विभागणी आपल्याकडेच आहे आणि म्हणून भारत नावाचा हा महान देश जगातील सर्वात घाणेरडा देश बनला आहे.
    महापालिकांना कचऱ्याची विल्हेवाट नीट लावता येत नाही. त्यांची स्वच्छता म्हणजे एका ठिकाणची घाण दुसऱ्या ठिकाणी नेवून टाकणे एवढीच आहे. तेव्हा पंतप्रधानांनी झाडू हाती घेतला म्हणून लोक झाडू हाती घेवून स्वच्छता राखतील ही कल्पनाच वेडगळपणाची आहे.
    देश स्वच्छ ठेवायचा असेल तर त्यासाठी मोठे शैक्षणिक , सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणावे लागणार आहेत. (Y)

    ReplyDelete