Thursday, May 11, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ५५

 मोर्चा ,त्यावर गोळीबार आणि या गोळीबाराच्या निषेधार्थ पुन्हा मोर्चा असे दुष्टचक्र १९९० पासून सुरु राहिल्याने काश्मीर मधील हिंसाचारात मुस्लीम नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. सगळे मुस्लीम सुरक्षादलाकडून मारले गेलेत असेही नाही. दहशतवादी संघटनांनी मारलेल्या मुस्लिमांची संख्या कमी नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------
        
हिंसाचार आणि त्यात बळी पडलेल्यांची आधी दिलेली आकडेवारी १९९० ते १९९३ या तीन वर्षाची होती.  १९९० मध्ये सुरु झालेला काश्मीर मधील हिंसाचार १९९३ पर्यंत मोठ्या प्रमाणात होता. नंतरही हिंसाचार सातत्याने सुरु राहिला. या हिंसाचाराची २०००  पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर त्याच्या भयावह स्वरुपाची कल्पना येईल. १९  जानेवारी १९९० ते २०००  या कालावधीत जम्मू-काश्मीर मध्ये हिसाचाराच्या ५६००० घटना घडल्याची नोंद आहे. यात दहशतवाद्यांनी केलेला हिंसाचार आणि सुरक्षादलांनी विविध प्रसंगी केलेल्या गोळीबाराचा समावेश आहे. या हिंसाचारात सरकारी आकड्यानुसार १६००० दहशतवादी आणि ४६०० सुरक्षा दलाचे जवान मारल्या गेले. यात धक्कादायक आकडा आहे तो दहशतवादी कारवायाशी संबंध नसलेले  १३५०० नागरिक मारल्या जाण्याचा. या नागरिकांमध्ये मारल्या गेलेल्या पंडितांचा आकडा ३१९ सांगितला जातो तो कमीच आहे. किती पंडीत मारल्या गेलेत या बाबत पंडीत समुदायात मतभेद आहेत. काश्मीर बाहेर पडलेल्या पंडितांची संघटना हा आकडा ३ ते ४००० असल्याचा दावा करते तर काश्मीर न सोडणाऱ्या पंडिताच्या संघटनेकडून ६५० पंडीत मारल्या गेल्याचा दावा केला गेला आहे.  काश्मीर घाटीतील पंडीत समुदाया व्यतिरिक्त अमरनाथ देशभरातून अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या हिंदू यात्रेकरूवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात आणि जम्मू भागात आतंकवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेले हिंदू लक्षात घेता हा आकडा १००० च्या घरात जातो हा निष्कर्ष मागच्या प्रकरणात काढला होता त्याची या आकड्यातून पुष्टीच होते. आतंकवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पंडितांच्या जास्त संख्येचा दावा ग्राह्य धरला तरी काश्मीर मध्ये झालेल्या हिंसाचारात कितीतरी अधिक काश्मिरी मुसलमान मारले गेलेत हे नाकारता येणार नाही. जास्त काश्मिरी मुस्लीम कसे मारले गेले हे एका उदाहरणावरून लक्षात येईल. हे उदाहरण यासाठी महत्वाचे आहे की साऱ्या जगातून काश्मीर प्रश्न हाताळणीवर टीका झाली तशीच टीका भारतीय प्रसिद्धी माध्यमातूनही झाली. हा पहिलाच प्रसंग आहे ज्यावर भारतीय प्रसार माध्यमांनी चुकीची कृती असल्याचे म्हंटले आणि याच प्रसंगामुळे जगमोहन यांना काश्मीरच्या राज्यपाल पदावरून दूर करण्यात आले.                                                                                       

हा प्रसंग होता मीरवायज मौलवी मोहम्मद फारूक यांच्या अंत्ययात्रेवर झालेल्या अंदाधुंद गोळीबाराचा. मीरवायज म्हणजे मुख्य धर्मोपदेशक. काश्मिरी मुसलमानांना आदरणीय असलेली ही वेगळ्या प्रकारची धार्मिक संस्था आहे जी इतर ठिकाणच्या मुसलमानात आढळत नाही. मीरवायज हे पद वंशपरंपरेने चालत आले आहे. या पदावर त्यावेळी मौलाना मोहम्मद फारुक होते. यांनी रुबिया सईदचे अपहरण झाले तेव्हा दहशतवाद्यांची ही कृती गैर इस्लामिक असल्याची भूमिका घेत तिच्या सुटकेची मागणी केली होती. हा प्रसंग आणि मौलाना फारुक यांनी भारत सरकारशी हातमिळवणी केल्याचा संशय यामुळे आतंकवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह शेरेकाश्मीर वैद्यकीय संस्थानातून त्यांच्या घरी आणताना  मिरवणुकीत हजारो नागरिक सामील झाले होते. नागरिकांचा रोष आतंकवादी संघटनांवर व्यक्त होत होता. पण ही मिरवणूक जेव्हा मौलवीच्या घराजवळ एका अरुंद गल्लीत आली तेव्हा सुरक्षादलाने जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात किमान ४७ व कमाल १०० नागरिक ठार झाल्याचे सांगितले जाते. मौलवीच्या प्रेताला सुद्धा काही गोळ्या लागल्या होत्या. या घटनेमुळे या हत्येचा दहशतवादी संघटनेवर असलेला रोष सरकारकडे वळला. देशात आणि परदेशात गोळीबाराच्या या घटनेवर जबर टीका झाली. त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांनी आपला खास दूत दिल्लीला पाठवला व सुरक्षादलाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर केंद्र सरकारने जगमोहन यांना राज्यपाल पदावरून दूर केले. ही घटना घडली होती २१ में १९९० रोजी. त्या आधीही जमावावर गोळीबार करण्याच्या घटना घडल्या होत्या. मोर्चा ,त्यावर गोळीबार आणि या गोळीबाराच्या निषेधार्थ पुन्हा मोर्चा असे दुष्टचक्र १९९० पासून सुरु राहिल्याने काश्मीर मधील हिंसाचारात मुस्लीम नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. सगळे मुस्लीम सुरक्षादलाकडून मारले गेलेत असेही नाही. आतंकवादी संघटनांनी मारलेल्या मुस्लिमांची संख्या कमी नाही. जानेवारी-फेब्रुवारी किंवा त्या आधीच्या महिन्यात दहशतवाद्यांनी पंडीतानाच आपले लक्ष्य केले होते. नंतर मात्र पंडितांसोबत मुस्लीम नागरिकही त्यांच्या निशाण्यावर आलेत. शिवाय दहशतवादी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतही दहशतवाद्यांसह मुस्लीम नागरिक मारले गेलेत.


 मुस्लीम दहशतवादी मारल्या गेलेत त्याचा विचार करण्याची इथे गरज नाही. ते मेलेत त्यांच्या कर्माने असे म्हणता येईल. पण अन्य नागरिकांबाबत असा दृष्टीकोन बाळगणे अनुचित आहे. निरपराध पंडितांच्या निर्घृण हत्येबद्दल दु:ख होणे जितके स्वाभाविक आहे तितकेच दु:ख निरपराध काश्मिरी मुसलमानांबद्दलही वाटायला हवे पण तसे होताना दिसत नाही. आणखी एका वास्तवाची दखल घेतल्या जात नाही.  कर्फ्यू, सुरक्षा दलाकडून नित्याची तलाशी आणि तलाशी दरम्यान बसणारे दंडे व होणारा अपमान याला कंटाळून २० हजार काश्मिरी मुसलमान कुटुंबांनी  काश्मीर घाटी सोडून पाकव्याप्त काश्मीर मध्ये आश्रय घेतला.  १९९० ते १९९३ या काळात भारतीय काश्मीर मधील ४८००० कुटुंबाना  शरणार्थी म्हणून आश्रय दिल्याचा पाकिस्तानचा दावा होता.  हा दावा अतिरंजित असला तरी पंडिता प्रमाणे त्या काळात हजारो मुस्लीमही  घाटी सोडून गेले होते हे सत्य आहे. अर्थात पंडितांच्या काश्मीर घाटी सोडण्याची तुलना काश्मिरी मुसलमानांना पाकव्याप्त काश्मीर मध्ये आश्रय घ्यावा लागण्याशी होवू शकत नाही. हिंसाचार कमी झाला तसा पाकव्याप्त काश्मीर मध्ये गेलेल्या मुस्लिमांसाठी परतीचा मार्ग मोकळा होता. काश्मिरी पंडितांना मात्र परतण्यासारखी स्थिती नव्हती. एवढेच नाही तर जम्मू आणि इतर भागातील ज्या वातावरणाशी काश्मिरी पंडितांना जुळवून घ्यावे लागले ते त्यांच्यासाठी फार यातनादायक होते. काश्मीर घाटीतील वातावरण आणि पाकव्याप्त काश्मीरमधील वातावरण यात फारसा फरक नव्हता. सांस्कृतिक फरकही नव्हता. जम्मूत आणि भारतातील इतर ठिकाणी काश्मिरी पंडीत राहिले त्यांच्यासाठी वातावरणा प्रमाणेच  सांस्कृतिक फरक फार मोठा होता. काश्मिरी पंडितांचा जास्त संबंध काश्मिरी मुसलमानांशीच राहिला. काश्मीर बाहेरच्या हिंदूंशी फार संबंध नसल्याने अनोळख्या लोकात येवून पडल्या सारखी त्यांची अवस्था होती. 

                                                                        (क्रमशः)
-------------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

 

No comments:

Post a Comment