१९९० ते १९९३ या काळात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या आणि दहशतवादी व सुरक्षादलात मोठ्या प्रमाणावर चकमकी झडत होत्या. संपूर्ण अराजकाचा हा काळ होता. पीटीआय या प्रमुख भारतीय वृत्तसंस्थेने सरकारचा हवाल्याने या काळात एकूण ८१०० व्यक्ती ठार झाल्याचे वृत्त दिले होते. ठार झालेल्यात काश्मिरी पंडीत, काश्मिरी मुसलमान, पाक प्रशिक्षित दहशतवादी आणि सुरक्षादलाचे जवान यांचा समावेश होता.
------------------------------------------------------------------------------
अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली ती २००० साली.ऑगस्ट २००० मध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला चढवून मोठे हत्याकांड केले. या हल्ल्यात सरकारी आकड्यानुसार ८९ तर वृत्तसंस्थांच्या आकड्यानुसार १०५ यात्रेकरू आणि सुरक्षाकर्मीचा मृत्यू झाला तर २०० यात्रेकरू जखमी झाले होते. यानंतरही अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांनी हल्ले केलेत पण हा हल्ला भीषण स्वरूपाचा होता. जुलै २००१ मध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या कॅम्प वर ग्रेनेड फेकले.गोळीबारही केला. ज्यात १३ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर १७ यात्रेकरू जखमी झाले होते. ६ ऑगस्ट २००२ ला अमरनाथ यात्रेकरूंच्या बेस कॅम्प वर हल्ला केला ज्यात ९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर २७ यात्रेकरू जखमी झाले होते. ३० जून २००४ ला पहलगाम येथील अमरनाथ यात्रेकरूंच्या कॅम्प वर हल्ला करण्यात आला ज्यात दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला. २००६ मध्ये राजस्थान मधून आलेल्या अमरनाथ यात्रेकरुंच्या बस वर ग्रेनेड फेकण्यात आलेत ज्यात पाच यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या नंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला तो २०१७ साली. अमरनाथ यात्रा आटोपून परतणाऱ्या बसवर अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढविला ज्यात ७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर २९ यात्रेकरू जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर जसे हल्ले चढवले तशा प्रकारचे दोन हल्ले जम्मूतील १५० वर्षे जुन्या प्रसिद्ध रघुनाथ मंदिरावर चढवले होते. ३० मार्च २००२ आणि २४ नोव्हेंबर २००२ रोजी अतिरेक्यांनी मंदिरावर ग्रेनेड फेकले. गोळीबारही केला. या दोन्ही हल्ल्यात मिळून २० भाविक व मंदिराचे सुरक्षारक्षक ठार झालेत तर ४० भाविक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या दरम्यान १३ जुलै २००२ रोजी जम्मू जवळ २९ मजुरांची हत्या दहशतवाद्यांनी केली. ज्याला सामुहिक हत्या किंवा नरसंहार म्हणता येईल त्या घटनांचा हा तपशील आहे. ही सगळी हत्याकांडे दहशतवादी गटांनी नियोजनपूर्वक घडवून आणलेली होती. सामान्य हिंदू नागरिकांचे सामुहिक हत्याकांड घडवून आणण्याचा हा नृशंस प्रकार १९९७ पासून सुरु झाला. पंडीत समुदायाने मोठ्या संख्येने काश्मीरघाटी सोडली ती १९९० साली. त्यानंतर ७ वर्षांनी अशी सामुहिक हत्याकांडे अतिरेक्यांनी घडवून आणायला सुरुवात केली. एका पंडिताची हत्या करायची म्हणजे परिसरातील हजार तरी पंडीत घाटी सोडतील हे १९९७ पर्यंत अवलंबिलेले तंत्र सोडून दहशतवादी सामुहिक हत्येकडे वळले.
१९९० मध्ये मोठ्या संख्येने काश्मिरी पंडीत काश्मीरघाटी बाहेर पडले तरी काही हजार कुटुंबानी घाटी न सोडण्याचा निर्णय घेवून ते घाटीतच थांबले होते. थांबलेल्या कुटुंबांचा सुरक्षादल परिस्थिती नियंत्रणात आणेल आणि मुस्लीम शेजारी साथ देतील असा दुहेरी विश्वास होता. दोन जमातीतील दुराव्याच्या परिस्थितीतही शेजाऱ्यांवर विश्वास होता कारण मुस्लीम जमावाने पंडितांच्या किंवा इतर हिंदूंच्या घरावर हल्ले केले नव्हते. सुरक्षादलाच्या कारवाईने क्षुब्ध झालेला जमाव संतप्त घोषणा देत रस्त्यावर फिरत होता, काही दिवसात आपण 'आझाद' होणार हा विश्वास त्या जमावाला वाटत होता आणि घाटीतील हिंदू 'आझादीचे समर्थक नाहीत हेही त्यांना माहित होते तरी पंडितांच्या घरासमोरून जाणाऱ्या जमावाने पंडितांच्या घरावर हल्ले केले नाहीत ही बाब फार मोठी असूनही काश्मिरेतर भारतीयांनी कधीच लक्षात घेतली नाही. पंडितांवर हल्ले करण्यात आले, हजारोंची हत्या झाली , रक्ताचे पाट वाहिले अशा दुष्प्रचाराला आम्ही बळी पडलो. पंडीत आणि इतर हिंदू आझादी विरोधात असल्याने गेलेले चांगले ही भावना घाटीतील बहुसंख्य मुसलमानांची होती यात वादच नाही. म्हणून अनेक गांवातून हिंदू कुटुंबीय बाहेर पडले तेव्हा स्थानिकांनी त्यांना रोखले नाही. पण अशीही बरीच गांवे होती जिथे शेजाऱ्यांनी पंडीत कुटुंबियांना जाण्यापासून परावृत्त केले. १९९० नंतर पंडीत कुटुंबे घाटीत थांबलीत याचे हे मुख्य कारण होते. १९९० च्या पूर्ण दशकभर पंडीत कुटुंबीय बाहेर पडत राहिलेत याच्या मागे दहशतवाद्यांनी हत्यासत्र सुरु ठेवणे हे जसे कारण होते तसेच दुसरेही महत्वाचे कारण होते. ते म्हणजे सततची अशांतता, सततचा कर्फ्यू आणि त्यामुळे व्यवसाय ठप्प, शिक्षणसंस्था बंद त्यामुळे मुलांचे शिक्षण ठप्प. अशा स्थितीत मुस्लीम शेजाऱ्यांची साथ असूनही काश्मीर घाटी सोडणे हाच एक मागे राहिलेल्या पंडितापुढे होता. त्यातही मुलांना बाहेर पाठवले पण स्वत: घाटीतच थांबलेले कुटुंबीय पाहायला मिळतील.
१९९० ते १९९३ या काळात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या आणि दहशतवादी व सुरक्षादलात मोठ्या प्रमाणावर चकमकी झडत होत्या. संपूर्ण अराजकाचा हा काळ होता. पीटीआय या प्रमुख भारतीय वृत्तसंस्थेने सरकारचा हवाला देवून काश्मीर घाटीत ठार झालेल्यांची संख्या सांगणारे वृत्त ५ जानेवारी १९९४ रोजी दिले होते. या वृत्तानुसार या काळात अतिरेक्यांच्या हल्ल्यात , सुरक्षादलाच्या गोळीबारात ठार झालेल्यांची एकूण संख्या होती ८१००. या ८१०० मध्ये ठार झालेल्या पंडितांची संख्या होती ३५०. या ८१०० संख्येत निम्मी संख्या सुरक्षा दलाने मारलेल्या अतिरेक्यांची आहे. या अतिरेक्या खालोखाल मारल्या गेलेत ते घाटीतील मुस्लीम रहिवाशी. मुस्लीम रहिवाशी जसे सुरक्षादलाच्या गोळीबारात बळी पडले तसेच आतंकवाद्यांकडून देखील मारल्या गेलेत. भारत समर्थक आहेत म्हणून, पंडितांना संरक्षण देतात या कारणाने आणि पोलिसांचे व सुरक्षादलाचे खबरी असल्याच्या संशयावरून आतंकवाद्यांनी अनेक मुस्लिमांना कंठस्नान घातले. काश्मीर बाहेरच्या भारतीयांचा विश्वास बसणार नाही इतक्या संख्येने अतिरेक्यांनी मुस्लिमांना मारले. सुरक्षादलाकडून या काळात जे मुस्लीम मारले गेलेत ते प्रामुख्याने त्यांच्या मोर्चा व आंदोलनावर सुरक्षादलाने केलेल्या गोळीबारात मारले गेले. या काळात अचानक कुठेही सुरक्षादलात व अतिरेक्यात गोळीबार सुरु व्हायचा आणि या गोळीबारात सापडून मरणाऱ्यात मुस्लिमच असायचे त्यामुळेही याकाळात ठार झालेल्यात मुस्लीम नागरिकांची संख्या अधिक होती. याकाळातच ३५० पंडीत नागरिकांची हत्या झाली असेल तर ९० च्या दशकात ही संख्या वाढली असणार. सरकारी आकडा ५०० च्या आत असला तरी नंतर झालेले पंडीत समुदाया व्यतिरिक्त इतर हिंदूंचे हत्याकांड लक्षात घेतले तर ही संख्या हजाराचा आकडा गाठते. दहशतवादी आपले उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी राहिल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी मोठी हत्याकांड घडविली आणि त्यामुळे हा आकडा वाढला. सुरक्षादलांनी दहशतवादी गटांच्या नाड्या आवळल्या व आझादीचे स्वप्न पाहणारा सामान्य मुसलमान नागरिकही दहशतवाद्यांपासून दूर गेल्याने काश्मिर घाटीतील गांवात हल्ले करण्या सारखी स्थिती राहिली नव्हती. त्यामुळे दहशतवादी गटांनी अमरनाथ यात्रेला व जम्मूला लक्ष्य केले.
(क्रमशः)
----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment