आम्हाला पंडितांच्या दु:खावर फुंकर घालायची नाही तर त्याची जखम ताजी राहावी म्हणून जखमे वरच्या खपल्या काढीत राहणे हा आमचा राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आज आम्ही पंडितांना जे भोगावे लागले त्याबद्दल खूप अश्रू ढाळतो पण जेव्हा पंडीत घाटी बाहेर पडून निर्वासितांचे जीवन जगायला सुरुवात केली तेव्हा त्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात पडावी अशी झाली होती.
------------------------------------------------------------------------------------
पंडीत समुदायाला त्याच्या इच्छेविरुद्ध काश्मीरघाटीतून बाहेर पडून निर्वासिताचे जीवन जगायला भाग पडण्याची सुरुवात ३३ वर्षापूर्वी झाली पण आजही त्या घटनेवर तेव्हा इतकाच किंबहुना तेव्हा पेक्षा अधिकच संताप आज व्यक्त होत असतो. काळाच्या ओघात अशा घटनांची वेदना व तीव्रता कमी होत असते पण पंडितांच्या निर्वासना बद्दल तसे होताना दिसत नाही. या घटनेचा उपयोग काश्मीर घाटीतील मुसलमानांना आणि त्या निमित्ताने सर्वच मुसलमानांना खलनायक म्हणून रंगविण्यासाठी केला जातो. पंडितांना काश्मीरघाटी बाहेर पडावे लागणे हा काश्मिरी समज व संस्कृतीवर कलंक आहे आणि हा कलंक दूर करण्याचा एकमेव मार्ग पंडीत समुदायाचे सन्मानाने काश्मीरघाटीत पुनर्वसन करणे हाच आहे. पाकिस्तान प्रशिक्षित व प्रेरित अतिरेकी सोडले तर घाटीतील सर्वच राजकीय पक्ष आणि संघटना पंडीत समुदायाने परत आले पाहिजे, त्यांच्या शिवाय काश्मीरचा समाज आणि संस्कृती अधुरी आहे असे अनेक वर्षापासून सांगत आहे. तेव्हाच्या परिस्थितीत बाहेर पडण्यापासून पंडितांना आपण रोखले नाही किंवा रोखता आले नाही अशी अपराधीपणाची भावना तिथल्या जुन्या जाणत्या मंडळीत आहे. पण काश्मिरेतर भारतात या भावना कधी आमच्या पर्यंत पोचतच नाहीत. १९९० च्या दशकात जे काही घडले आणि त्या व्यतिरिक्त जे काही प्रचारित केले गेले गेले त्यामुळे या भावना आमच्या पर्यंत पोचल्या नाहीत किंवा आम्ही त्याची दखल घेतली नाही. आम्हाला पंडितांच्या काश्मीर मधील पुनर्वसनापेक्षा त्या घटनेचा बदला तेवढा घेण्याची इच्छा आहे. सरकारी आणि प्रशासनिक स्तरावर बदल्याची कारवाई संपूर्ण १९९०च्या दशकभर सुरु राहिली तरी त्याने आमचे समाधान झालेले नाही. बदल्याची ही भावना पेटती ठेवायची असेल तर काश्मिरी पंडितांचे निर्वासित म्हणून जगणे आम्हाला हवे आहे. इतक्या वर्षात काश्मिरी पंडितांना घाटीत परत आणण्याचा एकदाही संघटीत प्रयत्न का झाला नाही याचे हे उत्तर आहे. आम्हाला पंडितांच्या दु:खावर फुंकर घालायची नाही तर त्याची जखम ताजी राहावी म्हणून जखमे वरच्या खपल्या काढीत राहणे हा आमचा राष्ट्रीय उद्योग बनला आहे. आज आम्ही पंडितांना जे भोगावे लागले त्याबद्दल खूप अश्रू ढाळतो पण जेव्हा पंडीत घाटी बाहेर पडून निर्वासितांचे जीवन जगायला सुरुवात केली तेव्हा त्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात पडावी अशी झाली होती. निर्वासित म्हणून जम्मूत त्यांच्या वाट्याला जे भोग आलेत त्याची आम्ही कधी चर्चाही करीत नाही आणि त्याबद्दल भारतीय समाजाला कधी खंतही वाटली नाही.
काश्मिरी पंडीत निर्वासित म्हणून जम्मूत आलेत तेव्हा त्यांच्याकडे फारसे आपलेपणाने पहिले गेले नाही. त्यांना जम्मूच्या बाहेर-बाहेरच्या भागातच डेरा टाकावा लागला. अमरनाथ यात्रेसाठी तंबूची सोय असते ती पंडितांना उपलब्ध करून देण्यात आली आणि काही नवे तंबू टाकण्यात आले. आंघोळ आणि शौचालयाच्या सुविधे बद्दल चांगले बोलता येईल असे काही नव्हते. काश्मीरघाटीत २-३ मजली घर आणि विस्तीर्ण अंगण व फळझाडे असलेली घरे सोडून आलेल्या पंडितांना या स्थितीत दिवस काढावे लागलेत. ज्यांना नोकरी नव्हती पण घाटीत त्यांचा व्यवसाय किंवा शेती होती त्यांच्यासाठी दिवस जास्त खडतर होते. उत्पन्नाची साधने मागे टाकून यावे लागले होते. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उत्पन्नच नसल्याने तुटपुंज्या सरकारी सोयीवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पण जे नोकरी करीत होते आणि घाटी सोडून जम्मूत आलेत तरी त्यांच्या उत्पन्नात खंड पडला नाही अशांचेही जम्मूतील जीवन अजिबात सुखात गेले नाही. काश्मीरमध्ये १९९० च्या दशकात जे भोगावे लागले त्यावर बरेच लिखाण सापडते. जम्मूत आल्यावर जे भोगावे लागले त्याबद्दलही काहींनी लिहिले आहे. असे लिहिणाऱ्या पैकी राहुल पंडीत हे एक आहेत. जे भाडे देवून राहू शकतात अशा काश्मिरी पंडितांसाठी जम्मूतील घरमालकांनी तातडीने खोल्या तयार केल्या. अव्वाच्यासव्वा भाडे आकारले शिवाय अनेक बंधने घातली. पाहुण्यांच्या राहण्यावर बंदी, मर्यादित पाणी, शिवाय घरमालकाची पडतील ती कामे करावी लागायची ती वेगळीच. त्यांच्या परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेण्यात आला. अपवाद वगळता अत्यंत तुच्छतेची वागणूक पंडीत कुटुंबियांना मिळायची. १९९० पर्यंत मुली आणि महिलांसाठी सुरक्षित असलेली घाटी अचानक असुरक्षित बनल्याने अनेक पंडीत कुटुंबीयांनी घाटी सोडण्याचा निर्णय घेतला होता. जम्मू मध्ये आल्यावरही मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेची चिंता दूर झाली नाही यावरून जम्मूत पंडीत कुटुंबियांना मिळणाऱ्या वागणुकीचा आणि समस्यांचा अंदाज येवू शकतो.
१९९० साली भयभीत पंडीत काश्मीरघाटी सोडून जावू लागले तेव्हा तुरळक प्रकार वगळता त्यांचे सामान किंवा घरे बळकावण्यात आली नव्हती. अनेक पंडीत कुटुंबीयांनी त्याही स्थितीत मोठ्या विश्वासाने आपल्या घराच्या किल्ल्या मुस्लीम शेजाऱ्यांकडे देवून ठेवल्या होत्या. फार कमी विश्वासघाताच्या घटना घडल्या . पंडीत कुटुंबीय घाटी सोडून गेलेत म्हणून त्यांची घरे बळकावण्यात आली नाहीत. अशा घटना बोटावर मोजता येतील इतक्याच घडल्या असतील. परतण्याची शक्यता दृष्टीपथात येत नव्हती तेव्हा आर्थिक गरज म्हणून अनेक कुटुंबियांना आपली घरे, शेती विकावी लागली. ती मात्र किमत पाडून खरीदली गेली. हे आर्थिक शोषण वगळता घाटीतील सर्वसामान्य मुस्लीम नागरिकाकडून पंडितांचे आर्थिक शोषण झाले नाही. १९९७ मध्ये तर घाटी सोडून गेलेल्या परिवारांच्या संपत्तीच्या रक्षणाचा कायदा पण आला. हतबल पंडितांच्या स्थितीचा गैरफायदा घाटीतील मुसलमानापेक्षा पंडीत कुटुंबीय निर्वासित म्हणून जम्मू व इतरत्र गेले तिथे अधिक घेतला गेला ही वस्तुस्थिती आहे. जशी काश्मीरघाटीतील पाक प्रशिक्षित दहशतवादी धार्मिक आधारावर मुसलमानांची माथी पंडीत समुदाया विरुद्ध भडकावीत होती तोच प्रकार हिंदुत्ववादी संघटना निर्वासित पंडीत तरुणांची माथी मुसलमानांविरुद्ध भडकावीत होती. यातून काश्मीरघाटीत पंडिताच्या बाबतीत भयंकर घडले. जम्मूत देखील मानहानी होण्याचा प्रसंग पंडीत समुदायावर आला होता. हिंदुत्ववादी संघटनेने निर्वासित पंडीत तरुणांना हाताशी धरून जम्मूतील शाळेत बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न केला. यात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या दोघापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. काश्मीरमधून परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुस्लीम विद्यार्थ्यांना मारण्याची योजना होती. पण त्या शाळेत मोठ्या संख्येत डोग्रा आणि इतर हिंदूंची मुले होती. या मुलांचे पालक या प्रकाराने संतप्त होवून निर्वासित पंडीत समुदाया विरुद्ध रस्त्यावर उतरले होते. अनेक पंडितांना मारहाण देखील झाली होती. त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जम्मू कार्यालयात बॉम्बची जुळणी करताना स्फोट होवून दोघांचा मृत्यू झाला होता. बाबरी मस्जीद पाडण्यात आल्यानंतर जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती त्याच्या कारणात जम्मूतील या दोन बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला होता.
-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment