Thursday, June 25, 2015

शैक्षणिक पदव्यांची लक्तरे

शिक्षण मंत्री तावडे यांच्या पदवीच्या निमित्ताने आजच्या शिक्षण व्यवस्थेवर चर्चा झाली पाहिजे.  चांगल्या प्रकारे लिहिणे , वाचणे, भाषा ज्ञान आणि आवश्यक ती आकडेमोड येणे या पलीकडे सरकार नियंत्रित औपचारिक शिक्षण असावे का यावर विचार करण्याची वेळ आली आहे. अधिक ज्ञान आणि अधिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी समाजात ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या सरकारी नियंत्रणातून मुक्त प्रयोगशील संस्था अस्तित्वात असणे गरजेचे आहे की नाही यावर राजकारण विरहित विचार व्हावा.
------------------------------------------------------------------------------

दिल्लीच्या 'आप' मंत्रिमंडळातील मंत्री तोमर यांचा पदवी घोटाळा बाहेर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या पदव्यांबद्दल जाहीरपणे संशय व्यक्त केला जावू लागला आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्री यांच्या पदवीबद्दल आणि शैक्षणिक पात्रते बद्दल उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन होण्या आधीच राज्यातील व केंद्रातील मंत्र्यांचे नवनवे पदवी घोटाळे समोर येवू लागले आहेत. मोदी राजवटीतील घोटाळ्यांचा आरंभ पदवी घोटाळ्यापासून सुरु होणार कि काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. पदवी घोटाळा प्रकरणी किती टोकाची कारवाई होवू शकते हे दिल्लीतील तोमर प्रकरणाने दाखवून दिल्याने राजकीय विरोधकांचे शिरकाण करण्यासाठी पदवी हे चांगले हत्यार असल्याचे एव्हाना राजकीय नेत्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या राजकीय विरोधकाच्या पदवीत काही घोटाळा तर नाही ना याचा शोध सारेचजण घेवू लागले आहेत. यात महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे देखील सापडले आहेत. शिक्षणमंत्री तावडे यांच्या खुलाशावरून हे प्रकरण इतरांपेक्षा वेगळे आहे हे सकृतदर्शनी दिसत असले तरी राजकीय गदारोळात हे वेगळेपण नजरेआड होवून ओल्या बरोबर सुके जळते म्हणतात तसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तावडे यांना लक्ष्य करण्यामागे घरचे की बाहेरचे ही नवी चर्चा सुरु होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.कारण तावडे यांचा पदवी घोटाळा बाहेर आल्यानंतर लगेचच फडणवीस मंत्रीमंडळातील महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा समोर आला आहे. बहुजन समाजातील या  दोन्ही नेत्यांचे लक्ष्य मुख्यमंत्री पदाची खुर्ची असल्याचे लपून राहिलेले नाही. याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'पाहात राहा पुढे काय काय होते ते' असे सूचक उद्गार काढले होते.  तेव्हा भितरघात झाल्याची चर्चा सुरु होईल आणि आपणास मुद्दामहून लक्ष्य करण्यात येत असल्याचा बचाव पुढे येवू शकतो. अशी चर्चा सुरु होण्या आधीच तावडेंच्या पदवीबद्दल शंका निरसन होणे योग्य राहील. इथे फक्त तावडेच्या पदवीचा विचार एवढ्यासाठी करायचा आहे की निराळ्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या विद्यापीठातून त्यांनी ती पदवी घेतली आहे आणि त्यात त्यांनी कोणतीही लपवाछपवी केली नाही. त्यामुळे शिक्षणमंत्री तावडे यांची पदवी खरी की खोटी अशी चर्चा करण्यापेक्षा ज्या नव्या संकल्पनेतून सुरु झालेल्या विद्यापीठाची ती पदवी आहे त्या संकल्पनेवर चर्चा झाली झाली तर तावडे यांच्या पदवीवर प्रकाश पडेल आणि अधिकृत पदवी पेक्षा त्यातील वेगळेपण लक्षात येवून ते स्विकारार्ह आहे की नाही हे ठरविता येईल. 


सरकारची मान्यता न घेता म्हणजेच सरकारी लालफितशाही आणि शिक्षणाबद्दलच्या जुनाट सरकारी कल्पना यांच्यापासून दूर राहून काळानुरूप उद्योगाच्या आणि समाजाच्या गरजा लक्षात घेत स्वतंत्रपणे अभ्यासक्रमाची आखणी करून अनुभवाची जोड देत तंत्रशिक्षण देण्याची कल्पना ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या स्थापने मागे असल्याचे सांगितले जाते आणि अशा विद्यापीठातून तावडे यांनी तंत्रशिक्षणाची पदवी घेतली आहे. सरकारी यंत्रणांचा कारभार ,औपचारिक शिक्षणाचा कालबाह्य अभ्यासक्रम , शैक्षणिक धोरणातील धरसोड या गोष्टी लक्षात घेतले तर सगळे शिक्षणक्षेत्र सरकारच्या भरवशावर सोडणे धोक्याचे आहे. संकीर्ण विचाराचे सरकार आले आणि ते आपले विचार शिक्षणातून लादू लागले तर काय होईल याचा अंदाज मोदी सरकारच्या १ वर्षाच्या काळात आला आहे. शिक्षणक्षेत्र पूर्णपणे सरकारी नियंत्रणात असणे किती धोकादायक आहे हे यावरून लक्षात यायला हरकत नसावी. आचार्य विनोबा भावे यांनी तर नेहमीच सरकारी नियंत्रणातून मुक्त शिक्षणाचा पुरस्कार केला होता. गांधीजींची नयी तालीम देखील सरकारी नियंत्रणातून मुक्त गरजेनुसार अनुभवाधारित शिक्षणाचीच संकल्पना होती. त्याधर्तीवर ज्ञानेश्वर विद्यापीठा सारखे प्रयोग झाले तर ते स्वागतार्हच मानले पाहिजेत. अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनच दिले पाहिजे. अशा विद्यापीठातून तावडे यांनी पदवी घेतली असेल तर त्याचे टीका होण्या ऐवजी कौतुक झाले पाहिजे. इथे ज्ञानेश्वर विद्यापीठाची संकल्पना प्रागतिक आणि दूरदर्शीपणाची आहे एवढेच इथे म्हणायचे आहे. प्रत्यक्षात ते विद्यापीठ कशाप्रकारे चालले याची पुरेशी आणि स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दोन सदनिकेत विद्यापीठ चालणे आणि उच्चन्यायालयाने ते बंद करण्याचे आदेश देणे या दोन गोष्टी या विद्यापीठा बद्दल नक्कीच शंका निर्माण करतात. तरीही एखाद्या नव्या प्रयोगा बद्दल पूर्ण माहिती अंतर्गत मत बनविणे श्रेयस्कर ठरेल. माहिती अभावी नाविन्याचा किंवा प्रयोगशीलतेचा गळा घोटण्याचे पातक कोणी करू नये. 


तावडे यांचे समर्थक आणि विरोधक निव्वळ आंधळेपणाने या विद्यापीठाचे समर्थन आणि विरोध करू लागले आहेत यावरून एक गोष्ट तर निर्विवादपणे स्पष्ट होते कि , आजच्या औपचारिक शिक्षणाने एखाद्या प्रश्नाकडे निकोपपणे पाहण्याची दृष्टी मिळत नाही. ज्ञानेश्वर विद्यापीठाचे समर्थक त्याबद्दलची अधिक माहिती देण्या ऐवजी शिक्षण सम्राटाच्या संस्थाच्या दोषाकडे बोट दाखवीत आहेत. तर विरोधक त्यापेक्षा तुमच्यात काय वेगळेपण आहे असे विचारीत आहेत. असे आरोप-प्रत्यारोप करून काहीच समजून घेता येत नाही. आजच्या शिक्षण सम्राटांच्या संस्थातील दोष लपून राहिलेले नाहीत. पण यांच्यामुळे बहुजन समाजासाठी तंत्रशिक्षणाची दारे खुली झालीत हे विसरून चालणार नाही. विशिष्टजनासाठीचे शिक्षण सामन्यासाठी खुले होणे ही ऐतिहासिक उपलब्धी आहे. पण आता त्यांचे काम झाले आहे. एकूणच शिक्षणाचा आणि तंत्रशिक्षणाचा वेगळा मार्ग आणि वेगळी पद्धत स्विकारण्याची वेळ आली आहे. तावडे यांच्या निमित्ताने पुढे आलेली ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या संकल्पनेकडे त्यादृष्टीने पाहिले पाहिजे. शिक्षण व्यवस्थेत शिरलेले सगळे दोष आणि सरकारी नियंत्रणाखालील शिक्षणाचे संभाव्य गंभीर दुष्परिणाम बघता समग्र शिक्षणाची पुनर्रचना करण्याची वेळ आली आहे. चांगल्या प्रकारे लिहिणे , वाचणे, भाषा ज्ञान आणि आवश्यक ती आकडेमोड येणे या पलीकडे सरकार नियंत्रित औपचारिक शिक्षण असावे का यावर विचार करण्याची वेळ आली आहे. अधिक ज्ञान आणि अधिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी समाजात ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या सरकारी नियंत्रणातून मुक्त प्रयोगशील संस्था अस्तित्वात असणे गरजेचे आहे. मुळात शिक्षणाचा आणि पदवीचा संबंध तोडून अमुक कालावधीत अमुक शिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र देण्याची पद्धत रूढ केली पाहिजे. पदवीचा आणि नोकरीचा संबंध तोडणे हे ओघाने येतेच. अगदी संशोधन करून मिळविलेल्या पदव्या काय लायकीच्या आहेत हे लपून राहिलेले नाही. आज राजकारणी मंडळींच्या पदव्यांची लक्तरे वेशीला टांगली जात असली तरी सगळ्यांच्याच पदव्यांना लक्तरापेक्षा जास्त किंमत नाही. कारण शिक्षणातून ज्ञान मिळविणे आणि नवे ज्ञान निर्माण करण्याची दृष्टी मिळण्या ऐवजी आहे त्या ज्ञानावरच आमचे भरणपोषण करणारी आजची शिक्षण प्रणाली आहे. त्यामुळे नव्याला सामोरे जाण्याची आम्हाला भीती वाटते आणि जुने ते सोने म्हणत तेच उराशी कवटाळून बसतो.  आजचा शिक्षणावरचा सारा खर्च हा राष्ट्रीय संसाधनाची उधळपट्टी आणि अपव्यय आहे. आपण शिक्षणावर आणि विद्यार्थ्यावर खर्च करीत नसून या शिक्षण व्यवस्थेचा ताबा घेतलेल्या पोटार्थी नोकरदारावर खर्च करीत आहोत. शिक्षणमंत्री तावडेच्या वादग्रस्त पदवीच्या निमित्ताने या चर्चेला प्रारंभ झाला तर मंत्रीपद गेले तरी तावडेची पदवीचे सार्थक होईल.
 
------------------------------------------------------------ 
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८ 
-----------------------------------------------------------

No comments:

Post a Comment