Thursday, October 22, 2020

ही अनुदारता आम्हाला कुठे नेणार ?

झुंडशाहीला शरण जावून टाटा कंपनीने राष्ट्रीय व धार्मिक ऐक्याचा पुरस्कार करणारी जाहिरात मागे घेतल्याने जगभर चुकीचा संदेश गेला. भारत पूर्वीसारखा उदार व सर्वसमावेशक राहिला नसून भारतावर झुंडीचे राज्य असल्याचा समज त्यामुळे निर्माण होवू शकतो. 
--------------------------------------------------------------------------


देशात सध्या दोन व्हायरसचा धुमाकूळ सुरु आहे. एक, कोरोना व्हायरस आणि दुसरा द्वेषाचा व्हायरस. कोरोना सध्यातरी आटोक्यात येताना दिसत आहे. अर्थात यात राज्य किंवा केंद्र सरकारच्या पराक्रमापेक्षा लोकांच्या प्रतिकार शक्तीचा तो परिणाम असला पाहिजे. कारण राज्याने कोरोना निर्मुलनासाठी जोर लावला तेव्हा कोरोना वाढतच गेला. यात केंद्राची भूमिका - विशेषत: प्रधानमंत्री मोदींची भूमिका - उपदेशाचे डोज देण्या पलीकडे गेली नाही. राज्य सरकारे करून भागून थकल्यावर कोरोनाचा जोर कमी होत आहे याचा अर्थच लोकांची प्रतिकार शक्ती वाढत आहे आणि परिणामी कोरोना कमी होत आहे. अशा वेळी प्रधानमंत्र्यांनी दिलेला ताजा उपदेशाचा डोज मात्र दुर्लक्षून चालणार नाही. कोरोनाची लाट आपल्या आधी विदेशात ओसरली होती आणि लोक बेसावध होताच तिकडे दुसऱ्या लाटेचा तडाखा बसू लागला आहे. कोरोनाच्या बाबतीत बेसावध न राहण्याचा प्रधानमंत्र्याचा उपदेश म्हणूनच समयोचित आहे. कोरोना माणसा-माणसाला मनाने नाही तर शरीराने दूर करणारा रोग आहे. या उलट देशात विद्वेषाचा जो व्हायरस धुमाकूळ घालतो आहे तो माणसांना एकमेकापासून मनाने दूर नेणारा रोग आहे. काल पर्यंत एका ताटात प्रेमाने जेवणारे लोक विद्वेषाचा व्हायरस अंगात शिरल्याने संबंधात विष कालवण्यात धन्यता आणि पराक्रम मानू लागली आहेत. द्वेषाच्या या व्हायरस विरोधात लोकांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली त्याबद्दल मात्र कोणी सावधानतेचा इशारा देताना दिसत नाही. या विद्वेषाच्या संक्रमणातून या देशाच्या मातीचे उदारतेचे, सर्वसमावेशकतेचे,आणि भिन्नतेत एकता बघणारे मुलभूत गुणसूत्र धोक्यात आले आहेत. टाटाच्या 'तनिष्क' जाहिरातीच्या निमित्ताने ज्या प्रतिक्रिया उमटल्यात त्यातून हा धोका किती वाढला आहे हे जाणवते. 

जाहिराती बद्दल वाद उपस्थित होणे ही नवी गोष्ट नाही. बऱ्याचदा याला जाहिरातदार देखील कारणीभूत असतात. मालाचा खप वाढावा म्हणून कोणत्याही थराला जाहिरातदार जातात. पण टाटांच्या तनिष्कचे प्रकरण यातले नाही. टाटा आणि टाटा  ब्रँडला देशात मान आहे. केवळ टाटाच्या नावावर अनेक उत्पादने फारसी जाहिरात न करताही खपतात. टाटाचे देशप्रेम आणि सचोटी वादातीत मानली जाणे हे त्यामागचे कारण. म्हणजे कालपर्यंत ती तशी मानली जात होती. पण एकूणच काल आणि आज मध्ये जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. काल ज्या जाहिरातीला राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार केल्या बद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असता अशी जाहिरात मोठ्या संखेत असलेल्या विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या समूहाला लांच्छनास्पद वाटली आणि त्यासाठी त्यांनी टाटा आणि त्यांच्या कंपनीला लांच्छन दिले. हा समूह नुसता लांच्छन देवून थांबला नाही तर टाटा प्रतिष्ठानावर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या धमक्या देवू लागला. अशा झुंडशाहीच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार नसेल तर व्यक्ती आणि कंपनी कितीही मोठी असली तरी झुंडशाहीच्या विरोधात उभा राहण्याचे धाडस होत नाही. टाटा नाक घासत झुंडशाहीला शरण गेले आणि राष्ट्रीय एकात्मतेचा, सामाजिक आणि धार्मिक सख्य व सौहार्दाचा संदेश देणारी जाहिरात मागे घेवून आजवर जपलेल्या उदात्त टाटा परंपरेवर आणि तत्वनिष्ठेवर आपल्याच हाताने माती लोटली.

एक-दोन वर्षापूर्वी तेल उत्पादन आणि विक्री व्यवसायात असलेल्या फॉर्च्यून कंपनीच्या जाहिराती बाबत असेच घडले होते. दुर्गा पूजा हा बंगालचा मोठा आणि महत्वाचा सण. दुर्गापूजा पर्व म्हणजे बंगाली लोकांसाठी मांसाहाराची पर्वणीच. अंडी,मटन,मच्छी याची जेवणात रेलचेल असते. हे पदार्थ फॉर्च्यून तेलात शिजविले तर जास्त चटकदार लागतात अशा आशयाची ही जाहिरात होती. बंगाल मध्ये दुर्गापूजा उत्सव (आता हा बंगाल पुरता मर्यादित राहिला नाही) असतो तेव्हा इतरत्र नवरात्री उत्सव असतो. नवरात्रीत लोक मांसाहार टाळतात. दुर्गापूजा आणि नवरात्र हे एकाच वेळी साजरे होणारे हिंदू सण. एकात मांसाहार प्रिय तर एकात मांसाहार वर्ज्य. ही या देशातील विशेषता आणि विविधता आहे. या विविधतेबद्दल आदर आणि अभिमान बाळगण्याची शपथ आम्हाला शाळेत दिली जाते. तरी दुर्गापूजे निमित्त काढलेल्या जाहिरातीत मांसाहाराचा पुरस्कार केला म्हणून फॉर्च्यून कंपनीला टीकेचा आणि धमक्याचा मारा सहन करावा लागला. कंपनीला माफी मागावी लागली. पण त्याही परिस्थितीत कंपनीने देशाच्या इतर भागातून जाहिरात मागे घेतली तरी बंगाल मध्ये ती जाहिरात कायम ठेवून देशातील विविधतेचा मान राखला.                                         

या कंपनीचे मालक टाटा सारखे प्रसिद्धही नाहीत आणि महान परंपरेचा वारसाही त्यांचेकडे नाही. टाटा कडे हे सगळे असून त्यांना देशातील विविधतेचा मान राखता आला नाही आणि संपूर्ण शरणागती पत्करावी लागली यावरून देशात विद्वेषाच्या व्हायरसने पछाडलेल्या लोकांची संख्या किती वाढली हे लक्षात येईल. अर्थात यात टाटांचाही दुबळेपणा आहे. आधीचा वारसा आणि तत्वनिष्ठा सोडून टाटांनी देशातील बदलत चाललेली परिस्थिती लक्षात घेवून दोन्ही डगरीवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे वाट वाकडी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखाची भेट घेवून संघ कार्याला मदत करणे, प्रधानमंत्र्याच्या पीएम केअर्स या खाजगी प्रतिष्ठानाला भरघोस मदत करून सध्या ज्यांचा प्रभाव आहे त्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे धार्मिक सद्भावना वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. राष्ट्रीय एकात्मतेचा, सामाजिक-धार्मिक ऐक्य व सौहार्द याचा पुरस्कार केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांना आवडत नाही याची कल्पना टाटांना नक्कीच असली पाहिजे. म्हणून तर त्यांनी प्रधानमंत्री मोदी व संघप्रमुख भागवत यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची मर्जी संपादन केली की आपल्याला हवा तो संदेश देता येईल आणि सत्ताधारी समर्थकाच्या लचकेतोडीपासून संरक्षणही मिळेल असे त्यांना वाटत असेल तर त्यांचा अंदाज चुकला. सोशल मेडियावर लचकेतोड करणाऱ्यांना आपले प्रधानमंत्री फॉलो करून अभय देतात हे टाटांना कदाचित माहित नसेल ! काही का असेना दोन्ही डगरी वरचे हात निसटून टाटा तोंडावर आपटले. यातून देशांतर्गत आणि देशाबाहेर मात्र चुकीचा संदेश गेला. धार्मिक ऐक्य, धार्मिक सौहार्द याचा संदेश देणाऱ्या टाटा सारख्या हस्तीला आम्ही नमवू शकतो असा इशारा सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाखाली वावरणाऱ्या ट्रोल आर्मीने असा प्रयत्न करणाऱ्या इतरांना दिला आहे. टाटा विदेशातही ओळखले जात असल्याने भारत उदार आणि सर्वसमावेशक राहिला नसून भारतावर झुंडीचे राज्य असल्याचा संदेश जगभर गेला आहे.
---------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com


1 comment:

  1. मान खाली घटना.तरीही टाटा मला ग्रेट वाटतात.र

    ReplyDelete