Thursday, February 29, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ९४

 मोदी सरकारने  जम्मू-काश्मीरसाठी विशेष प्रतिनिधि म्हणून नेमलेल्या दिनेश्वर शर्मा यांनी काश्मिरातील विविध गटांशी बोलणी करण्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी यासाठी पहिल्यांदा दगडफेकीत गुंतलेल्या युवकाना आरोपमुक्त करून तुरुंगातून सोडून द्यावे असा  प्रस्ताव ठेवला आणि केंद्रातील मोदी सरकारने हा प्रस्ताव मान्य करून जवळपास ११०० युवक-युवतींची तुरुंगातून सुटका केली.
---------------------------------------------------------------------------

बुरहान वाणीच्या एन्काऊंटर नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत आपल्याच पक्षातून सरकारच्या बाहेर पडण्याचा दबाव महबूबा मुफ्ती वर येवू लागला होता. पान या दबावा समोर न झुकता महबूबा मुफ्ती यांनी सरकार मधील सहभाग कायम ठेवला. दुसरीकडे केंद्रातील भाजपा सरकारनेही विभाजनवाद्यांशी बोलणी न करण्याची आधीची ताठर भूमिका सोडून सर्व संबंधितांशी बोलणी करण्यासाठी आय बी चे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची संवादक म्हणून नेमणूक  २३ ऑक्टोबर २०१७ रोजी केली. त्यांना मंत्रिमंडळ सचिवचा दर्जा देण्यात आला होता.  काश्मीरमधील सर्व गटांशी अखंड संवाद सुरू राहावा यासाठी ही नियुक्ती असल्याचे तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. बोलणी करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी दिनेश्वर शर्मा यांनी दगदफेकीच्या आरोपाखाली पहिल्यांदा अटक झालेल्या तरुणाना आरोपमुक्त करून त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार समोर ठेवला. मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यानीही ती मागणी केली होती. पण सरकार मधील सहकारी पक्ष असलेल्या भाजपने या प्रस्तावाला विरोध केला होता. यापूर्वी मनमोहनसिंग यांच्या सरकारने पहिल्यांदा दगडफेक करणाऱ्या तरुणाना आरोपमुक्त करून तुरुंगातून सोडले होते. मनमोहनसिंग सरकारच्या या निर्णयाला तेव्हा भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध केला होता. केंद्र सरकारचे जम्मू-काश्मीरसाठी विशेष प्रतिनिधि म्हणून नेमलेल्या दिनेश्वर शर्मा यांनी असाच प्रस्ताव ठेवला तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकारने हा प्रस्ताव मान्य करून पहिल्यांदा दगडफेक करणाऱ्या तरुण-तरुणींवरील आरोप मागे घेऊन त्यांना मुक्त करण्याचे आदेश महबूबा मुफ्ती यांच्या सरकारला दिले. यावर जम्मू-काश्मीर सरकारने तत्परतेने अंमल करत जवळपास ११०० युवक-युवतींची तुरुंगातून सुटका केली. दिनेश्वर शर्मा यांचा दूसरा प्रस्ताव होता रमजान महिन्यात अतिरेक्या विरुद्धची सुरक्षादळची मोहीम थांबविण्याची आणि शस्तरबंदी करण्याचा. हा प्रस्तावही केंद्र सरकारने मान्य करून शस्त्रबंदी घोषित केली. मुख्यमंत्री महबूबा मुफ्तीही ही मागणी आधीपासून करीत होत्या. केंद्र सरकारने नेमलेले विशेष प्रतिनिधि दिनेश्वर यांच्या आग्रहाने हे दोन्ही प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केले होते पण याचे श्रेय मात्र मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी घेतले.                                                                                                                                                   

बोलणी करण्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी यासाठी ही दोन्ही निर्णय झाले असले तरी बोलणी मात्र फार पुढे गेली नाहीत. याचे एक कारण सांगितले जाते ते म्हणजे दिनेश्वर शर्मा यांनी काय केले पाहिजे याबाबत कोणतीही स्पष्टता केंद्र सरकारच्या निर्देशत नव्हती. एकीकडे त्यांनी संवादक व केंद्र सरकारचे विशेष प्रतिनिधि म्हणून हुरीयतशी बोलणी करणे अपेक्षित होते आणि ते तशा प्रयत्नात असताना एन आय ए मात्र हुरीयतच्या नेत्यांवर कारवाई करीत होते. दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्तीने बोलणी होवून काश्मिरातील  संघर्षाची परिस्थिती निवळेल अशी निर्माण झालेली आशा विरून गेली. दिनेश्वर शर्मा काश्मीरमध्ये संवादक म्हणून नियुक्त असतानाच नॉर्वेचे पंतप्रधान काश्मिरातील विभाजनवादी गटांशी बोलणी करण्यासाठी श्रीनगरला आले होते. अनेकांचा समाज झाला की दिनेश्वर शर्मा यानीच त्यांना बोलावले. पण शर्मा यानाच याची माहिती नव्हती. श्री श्री रवीशंकर यांच्या पुढाकाराने नॉर्वेच्या पंतप्रधानाची काश्मीर भेट ठरली होती. दुसऱ्या देशाचा पंतप्रधान काश्मीरमधील विभाजनवाद्यांशी चर्चा करायला येणे केंद्र सरकारच्या इच्छा व संमती शिवाय शक्य नव्हते. अशी परवानगी मोदी सरकारने दिलीच कशी आणि तेही सरकारने नियुक्त केलेल्या दिनेश्वर शर्मा यांना विश्वासात न घेता असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. पण यामुळे दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्तीतून सरकारलाच परिणामाची आशा नसल्याचा संदेश गेला. काश्मीरमधील विविध गटानीही त्यांना गंभीरतेने घेतले नाही. दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्तीने फारसे काही साध्य झाले नाही. यात त्यांचा दोष नव्हता. नियुक्ती कारणारानाच त्यांचेकडून काय अपेक्षित आहे हे  स्पष्ट नव्हते. दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्ती बाबत सरकार गंभीर नव्हते असेही म्हणण्या सारखी परिस्थिती नव्हती ही दुसऱ्या एका प्रकरणावरून स्पष्ट होईल. ज्यावेळी मोदी सरकारने आपले विशेष प्रतिनिधि म्हणून जम्मू-काश्मीर मध्ये नियुक्ती केली त्यावेळी सुप्रीम कोर्टात कलम ३५ अ विरोधात याचिकाची सुनावणी सुरू होती. भारतीय जनता पक्षाची काश्मीरला लागू करण्यात आलेले हे कलम रद्द करण्याची भूमिका असताना मोदी सरकारने सुप्रीम कोर्टातील या प्रकरणाची सुनावणी स्थगित ठेवण्याची विनंती केली. सरकारने दिनेश्वर शर्मा यांची विशेष प्रतिनिधि म्हणून नेमणूक केली आहे व ते चर्चा करून मार्ग काढतील अशी आशा असल्याने ६ महीने तरी हे  संवेदनशील प्रकरण सुनावणीसाठी घेऊ नये अशी केंद्र सरकारने विनंती केली होती. याचा अर्थ त्यावेळी केंद्र सरकार काश्मिरी गटांशी बोलणी करण्याबाबत सकारात्मक होते असा घेता येतो. बळाचा वापर करून काश्मीर प्रश्न सोडविण्याची मूळ खुमखुमी आणि सरकारात आल्यानंतर बोलणी करण्याचा प्रयत्न अशा द्वंद्वात मोदी सरकार सापडले होते. 

२०१७ आणि २०१८ या दोन वर्षात झालेल्या दोन हत्यानी काश्मीर ढवळून निघाले होते.  २२ जून २०१७ ला पोलिस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडीत यांची जमावाने हत्या केली. ते श्रीनगरच्या ऐतिहासिक जामा मसजीद परिसरात साध्या कपड्यात तैनात होते. मसजीद मधून बाहेर येणाराचे ते फोटो घेत असल्याचा आरोप करून जमाव त्यांच्या अंगावर धावून गेला. काही प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार मसजीद मधून बाहेर पडणारा जमाव प्रक्षोभक आणि देशविरोधी घोषणा देत होता त्याचे रेकॉर्डिंग करताना अयुब दिसल्याने जमावाने त्यांना घेरले। स्वसंरक्षणार्थ त्यांनी गोळीबार केला त्यात तिघे जखमी झाल्याने जमाव अधिकच भडकला व त्यांची अतिशय वाईट आणि क्रूर पद्धतीने जमावाने हत्या केली. दगड, लोखंडी रॉड इत्यादि साधनांचा वापर करून ही हत्या झाली. हत्या जमावाने केली असली तरी जमावाला चिथावणी देण्यात हिजबूल मुजहादीनचा सज्जाद अहमद गिलकरचा जमावाला चिथावण्यात हात होता असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. घटनेच्या १५ दिवसाच्या आत सुरक्षादलाने त्याला ठार केले. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पोलिस उपअधीक्षक अयुब यांच्या हत्येबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटली. मे २०१८ च्या पहिल्या आठवड्यात काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनावर दगडफेकीच्या दोन घटना घडल्या. १ मे रोजी पर्यटकांच्या तीन वाहनांवर दगडफेक झाली होती त्यात ५ पर्यटक जखमी झाले होते. या घटनेच्या आठवडाभराच्या आतच गूलमर्गला जाणाऱ्या पर्यटकाच्या वाहनावर दगडफेक झाली आणि या दगडफेकीत तामिळणाडूचा तरुण पर्यटकाच्या डोक्यावर दगड लागून तो गंभीर जखमी झाला व दवाखान्यात उपचार घेत असताना त्याचा मरतयू झाला. त्याच्या मृत्यूची काश्मीरघाटीत तीव्र प्रतिक्रिया उमटली. या दोन घटनांच्या आधी शाळेच्या बसवर, लग्नाच्या वरातीवर दगडफेक झाली होती. दगडफेक प्रकरण हाताबाहेर जात असल्याची जाणीव काश्मीर मध्ये तामिळनाडूच्या पर्यटकाच्या मृत्यूने झाली. दगड म्हणजे सर्वशक्तिमान सुरक्षादलाच्या प्रतिकारासाठी सर्वसामान्य नि:शस्त्र जनतेचे साधन मानणाऱ्या हुरीयत सारख्या संघटनाना निषेध करणे भाग पडले. महबूबा मुफ्ती यांच्या पिडीपी-भाजप संयुक्त सरकारचा काळ हा विद्यार्थी व तरुणांची दगडफेक आणि पेलेटगनचा वापर करून सुरक्षादलाच्या प्रतिकाराचा काळ राहिला. या काळात दगडफेकीत पोलिस व सुरक्षादलाचे जवान आणि सामान्य नागरिक शेकडोच्या संख्येने जखमी झालेत तर पेलेटगनने तरुण जखमी झालेत, काहीना अंधत्वही आले. 

                                                         (क्रमश:)

  -----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, February 22, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ९३

 २०१० सालच्या आंदोलना नंतर काश्मीर तुलनेने शांत होते. ही शांतता बुरहान वाणीच्या मृत्यूने भंगली. पाकिस्तानने या घटनेचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागळण्यासाठी केला. बुरहान वाणीचा मृतदेह दोन लाख लोकांच्या उपस्थितीत  पाकिस्तानच्या ध्वजात गुंडाळून दफन करण्यात आल्याने  भारतात पिडीपी - बिजेपी युतीच्या सरकार विरोधात जनमत तयार होवू लागले. तरीही या घटनेनंतर भारतीय जनता पार्टी सरकार मधून बाहेर पडली नाही. 
----------------------------------------------------------------------------------------


जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या महबुबा मुफ्ती या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राज्याच्या पहिल्या महिला ठरल्या. राज्यातील १९९६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला होता. राजीव गांधी काळात व्ही-पी.सिंग यांचे सोबत त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद कॉंग्रेस बाहेर पडले होते. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर ते कॉंग्रेस मध्ये पुन्हा सामील झाले. त्याच वेळेस महबूबा मुफ्तीही कोंग्रेसमध्ये सामील झाल्या व १९९६ ची विधानसभा निवडणूक लढवून पहिल्यांदा आमदार झाल्या. कॉँग्रेसची नॅशनल कॉन्फरन्स सोबतची युती मान्य नसल्याने १९९९ मध्ये बाप-लेकीने कॉँग्रेसचा त्याग करून जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी नावाच्या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या पहिल्या अध्यक्षा  म्हणून महबूबा मुफ्ती यांची निवड करण्यात आली होती. या पक्षाच्या स्थापनेनंतर मुफ्ती मोहम्मद सईद यांचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि महबूबा मुफ्ती या देखील मुख्यमंत्री बनल्या. भारतीय जनता पक्षा सोबतच्या युती विरुद्ध काश्मीर घाटीतील जनमत जात असताना त्या मुख्यमंत्री बनल्या. जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हा बहुमान त्यांना मिळाला असला तरी त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द त्यांच्यासाठी, जम्मू-काश्मीरसाठी आणि देशासाठी काटेरी ठरली. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ३ महिन्यांनी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण काश्मीरघाटी अशांत बनली.                                                                                         

काश्मीरला भारताच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी  हाती शस्त्र घेतलेल्या बुरहान वाणी या २१ वर्षीय तरुणाचा आणि त्याच्या दोन साथीदारांचा सुरक्षादला सोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण घाटीत लोक -विशेषत: तरुण- रस्त्यावर उतरले. बुरहान वाणी याने सोशल मेडियाचा वापर करून मोठी लोकप्रियता मिळविली होती व त्याचा वापर करून तो काश्मीरी तरूणांना भारतीय सुरक्षादला विरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित करीत होता. मोठा भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत जात असताना सुरक्षादलांकडून अपमानित झाल्याने तो दहशतवादाकडे वळल्याचे सांगितले जाते. वयाच्या १५ व्या वर्षी बुरहान वाणी  घर सोडून हिजबूल मुजाहदिन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. दरम्यान त्याचा मोठा भाऊ खालिद सुरक्षादलाकडून मारल्या गेल्याने बुरहान वाणी कट्टर भारत विरोधी बनला. त्याला पकडण्यासाठी सुरक्षादलाने १० लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. चकमकीत ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी लोकानी सुरक्षादलावर दगडफेक आणि हल्ले केलेत. या घटनेनंतर जवळपास ५० दिवस काश्मीरघाटीत कर्फ्यू लावावा लागला. कर्फ्यूचे उल्लंघन करून लोक रस्त्यावर येत होते आणि सुरक्षादलाशी चकमकी झडत होत्या. या काळात ९०च्यावर प्रदर्शनकारी सुरक्षादलाच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले. १५००० च्यावर लोक जखमी झालेत. ४००० सुरक्षाकर्मी देखील जखमी झाले होते. २०१० सालच्या आंदोलना नंतर काश्मीर तुलनेने शांत होते. ही शांतता बुरहान वाणीच्या मृत्यूने भंगली. पाकिस्तानने या घटनेचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागळण्यासाठी केला. बुरहान वाणीचा मृतदेह दोन लाख लोकांच्या उपस्थितीत  पाकिस्तानच्या ध्वजात गुंडाळून दफन करण्यात आल्याने  भारतात पिडीपी - बिजेपी युतीच्या सरकार विरोधात जनमत तयार होवू लागले. तरीही या घटनेनंतर भारतीय जनता पार्टी सरकार मधून बाहेर पडली नाही. 


बुरहान वाणी प्रकरण पूर्णपणे शांत झालेले नसतानाच उरी जवळील सुरक्षादलाच्या कॅम्प वर पाकिस्तानी दहशतवादयानी  भीषण हल्ला केला. पाकव्याप्त काश्मीरमधून नियंत्रण रेषा ओलांडून १८ सप्टेंबर २०१६ च्या  पहाटे चार दहशतवादयानी उरी कॅम्प मध्ये घुसून ग्रेनेड फेकले. यामुळे तंबुना आग लागून १७ सैनिक शहीद झाले.. ३० च्या वर जखमी झालेत. पैकी दोघांचा इस्पितळात उपचार घेताना मृत्यू झाला. 4 तास चाललेल्या गोळीबारात चारही दहशतवादी मारले गेलेत. याची प्रतिक्रिया भारतभरच नाही तर जगभर उमटली. पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला. दहशतवादी संघटनाना आश्रय व सहाय्यता देवून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात पाकिस्तान नेहमीच सहभागी असतो असा आरोप भारताने केला. पाकिस्तानने मात्र या हल्ल्याचा संबंध बुरहान वाणी याच्या मृत्यू नंतर काश्मीरमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याच्याशी जोडला. भारताने या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध दाखवून पाकिस्तानला एकटे पाडले. एवढेच नाही तर पाकव्याप्त काश्मीरच्या ज्या भागातून हल्ला झाला तेथील दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले व अनेक दहशतवादयाना कंठस्नान घातले. उरी घटनेने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले. भारताने पाकिस्तानात होवू घातलेल्या सार्क संमेलनावर बहिष्कार घातला.                                                       

काश्मीरमध्ये शांतता नांदण्यासाठी पाकिस्तान सोबत बोलणी सुरू ठेवली पाहिजे हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाचा आग्रह होता पण बोलणी होण्यासारखी परिस्थिती न राहिल्याने काश्मीरच्या राजकारणात महबूबा मुफ्ती यांची स्थिति कमजोर झाली आणि त्या एकाकी पडल्या. काश्मीर प्रश्नावर भारत सरकार काश्मीर मधील विविध गटांशी व पाकिस्तानशी बोलणी करील ही मुफ्ती मोहम्मद सईद  आणि नंतर मुख्यमंत्री बनलेल्या महबूबा मुफ्ती यांनी दाखवलेली आशा मावळल्या नंतर दहशतवादी गटानी पिडीपीच्या नेत्याना लक्ष्य करायला सुरुवात केली. दक्षिण काश्मीर मधून महबूबा मुफ्ती यांच्या पक्षाला मोठे समर्थन मिळाले होते. त्या भागातच पक्षाच्या नेते  आणि कार्यकर्ते यांचेवर हल्ले होवू लागले. सप्टेंबर २०१७ मध्ये पिडीपीच्या नईम अख्तर या मंत्र्याच्या वाहनाच्या ताफ्यावर दहशतवादयानी ग्रेनेडने हल्ला केला. हा हल्ला हिजबूल मुजहादीनच्या दहशतवादयानी केला. या हल्ल्यात मंत्री बचावले पण एका महिलेसह तीन नागरिकांचा मृत्यू झाला. ३० जण जखमी झालेत. यात मंत्र्यासोबत प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हा हल्ला झाल्यानंतर त्या भागातील तरुण रस्त्यावर उतरला आणि त्या भागात मंत्र्याच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षासैनिकांवर दगडफेक करीत आजादीच्या घोषणा देवू लागला. बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर आशा घटना काश्मीरमध्ये नित्याने घडू लागल्या आणि त्याचे चटके सत्तेत असलेल्या पिडीपीला मोठ्या प्रमाणात बसू लागले. 

                                                       (क्रमश:)

-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि . यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, February 15, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ९२

 काश्मीरमध्ये अब्दुल्ला घराण्याच्या राजकीय प्रभावाचा मुकाबला करीत स्वत:ची जमीन तयार करणे सोपे नव्हते. त्यासाठी मुफ्ती मोहम्मद सईद काश्मीरमधील पृथकतावादी आणि पाकिस्तान धार्जिण्या गटापासून ते कलम ३७० रद्द करण्यास प्रतिबद्ध असलेल्या भारतीय जनता पार्टीची मदत घेण्यास कचरले नाही.
--------------------------------------------------------------------------------

मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर लगेच महबुबा मुफ्ती मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे सर्वाना अपेक्षित होते. पण तसे घडले नाही. भारतीय जनता पक्षाचा त्यांच्या नावाला विरोध नव्हता पण मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला त्याच तयार नव्हत्या. कारण मुफ्ती मोहम्मद सईद हयात असतांना जो 'अजेंडा ऑफ अलायन्स' ठरला होता त्यानुसार सरकारची वाटचाल होताना दिसत नव्हती. विशेषत: काश्मीर प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यासाठी काश्मिरातील हुरियत सह सर्व गटांशी आणि पाकिस्तानशी चर्चा करण्याच्या दिशेने केंद्राकडून पाउले उचलली जात नव्हती. त्यामुळे काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी आघाडी बद्दल असंतोष निर्माण होवू लागला होता. महबुबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षासाठी ही धोक्याची घंटा होती. त्यामुळे जो अजेंडा ठरला तो पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखल्या नंतरच आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवू अशी भूमिका महबुबा मुफ्ती यांनी घेतली. आधी शपथ घ्या नंतर या गोष्टी ठरवता येतील ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती. दोन्ही पक्ष आपली भूमिका सोडायला तयार नसल्याने राज्यात राज्यपाल शासन लावण्यात आले. मुफ्ती मोहम्मद सईद यांची राजकीय कारकीर्द जवळपास सहा दशकाची होती आणि ते हयात असे पर्यंत काश्मीरमध्ये जेव्हा जेव्हा राज्यपाल राजवट लागू झाली तेव्हा तेव्हा त्या घटनेशी त्यांचा कुठल्या न कुठल्या प्रकारे संबंध राहिला होता. सईद काश्मीरमध्ये कॉंग्रेस पक्षाचे नेते असताना इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्लाशी तडजोड करून त्यांना कॉंग्रेसच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री बनवले होते. त्यावेळी सईद यांना मुख्यमंत्री बनायचे होते. याचा बदल त्यांनी १९७७ मध्ये शेख अब्दुल्ला सरकारचा पाठींबा काढून घेतला आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदा राज्यपाल राजवट लागू करण्यास ते कारणीभूत ठरले. इंदिरा गांधीनी जगमोहन यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नेमल्या नंतर फारुख अब्दुल्ला सरकार खाली खेचण्यासाठी दिल्लीच्या आशीर्वादाने सईद यांनी हालचाली केल्या. त्यावेळी ते जम्मू-काश्मीर कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.                                                                                                                                 

महत्वाकांक्षी असलेल्या फारुख अब्दुल्लाच्या मेहुण्याला -जि.एम.शाह- यास  पुढे करून राज्यपालाच्या मदतीने फारुख अब्दुल्ला यांना मुख्यमंत्री पदावरून हटविले. पुढे जी.एम. सहा सरकारचा पाठिंबाही सईद अध्यक्ष असलेल्या कॉंग्रेसने काढून घेतला आणि राज्यात दुसऱ्यांदा १९८६ मध्ये  राज्यपाल राजवट लागली ज्याचा मुफ्ती मोहम्मद सईदशी संबंध होता. कॉंग्रेसमधून व्ही.पी.सिंग यांचे सोबत सईद बाहेर पडले आणि निवडणुकीनंतर ते व्ही.पी.सिंग मंत्रीमंडळात सामील होवून देशाचे पहिले गृहमंत्री बनले ! गृहमंत्री बनल्यानंतर काही दिवसातच रुबैया सईद या त्यांच्या तिसऱ्या मुलीचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. तिच्या सुटकेसाठी काही दहशतवाद्यांना सोडण्यात आले आणि त्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद बोकाळला. भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली सईद यांनी जग्मोहानला राज्यपाल म्हणून काश्मीरमध्ये पाठविले. या नियुक्तीला फारुख अब्दुल्ला यांनी विरोध करून राजीनामा दिला आणि अशा रितीने मुफ्ती मोहम्मद सईद जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्यांदा राज्यपाल राजवट लागू होण्यास कारणीभूत ठरले. पुढे नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर सईद यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही हे लक्षात घेवून त्यांनी जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रटिक पार्टी या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. २००२ च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकी नंतर त्यांना कॉंग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. पण सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी करण्यात त्यांनी जो वेळ घेतला त्यामुळे तिथे काही दिवसासाठी पुन्हा राज्यपाल राजवट लागू करावी लागली. राज्यपाल राजवटीची ही चौथी वेळही त्यांच्यामुळे आली पण यावेळी त्यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. जम्मू-काश्मीर विधानसभेचा कालावधी सहा वर्षाचा असायचा. कॉंग्रेस सोबत ३-३ वर्षाचे मुख्यमंत्रीपद वाटून घेत ते २००२ साली मुख्यमंत्री बनले. त्यांचा ३ वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ पूर्ण झाल्यानंतर कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री बनले. २००८ मध्ये अमरनाथ जमीनीचां वाद निर्माण झाला आणि विधानसभा निवडणुकीला थोडाच कालावधी बाकी असताना मुफ्ती मोहम्मद सईद कॉंग्रेस सोबतच्या सरकार मधून बाहेर पडले आणि त्यांचा हा निर्णय पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यास कारणीभूत ठरला. २००८ सालच्या निवडणुकीनंतर ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले पण २०१४ च्या शेवटी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुफ्ती मोहम्मद सईद यांचा पक्षा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. यावेळी भाजपा सोबत सरकार बनविण्यासाठी वाटाघाटी करण्यात त्यांनी वेळ घेतला आणि त्यामुळे अल्पकाळासाठी का होईना राज्यपाल राजवट लावावी लागली. राज्यपाल राजवटीशी त्यांचा संबंध मृत्यूनंतरही कायम राहिला. 

मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी अत्यंत हुशारीने आणि कल्पकतेने आपले स्थान काश्मीरच्या राजकारणात निर्माण केले होते. नेहरू काळात शेख अब्दुल्ला यांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स हा देखील खिळखिळा करण्याचे तेव्हाच्या केंद्र सरकारचे धोरण होते. याचाच एक भाग म्हणून सादिक यांनी त्या पक्षापासून वेगळे होत डेमोक्रॅटिक नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. अलीगड विद्यापीठातून शिक्षण घेवून परतलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद या पक्षात सामील झाले. त्यानंतर त्यांनी मागे पहिलेच नाही. पक्ष बदलत प्रगती करत ते पुढे गेले. १९६२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. दुसऱ्यांदा निवडून आले तेव्हा सादिक मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी उपमंत्री म्हणून सईद यांना आपल्या मंत्री मंडळात स्थान दिले. उपमंत्री ते केंद्रीय गृहमंत्री आणि दोनदा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय झेप राहिली आहे. काश्मीरमध्ये अब्दुल्ला घराण्याच्या राजकीय प्रभावाचा मुकाबला करीत स्वत:ची जमीन तयार करणे सोपे नव्हते. त्यासाठी ते काश्मीर मधील पृथकतावादी आणि पाकिस्तान धार्जिण्या गटापासून ते कलम ३७० रद्द करण्यास प्रतिबद्ध असलेल्या भारतीय जनता पार्टीची मदत घेण्यास कचरले नाही. निवडणुकीत फुटीरतावादी तत्व मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाला मतदान करतात हा अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सचा कायम आरोप राहिला आहे आणि त्या आरोपात तथ्यही आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करणारे हुरियत सारखे गट नॅशनल कॉन्फरन्स विरोधात आतून पीडीपीला मदत करीत आले आहेत. मदत करण्याचे एक कारण हेही होते की १९९० च्या दशकात काश्मिरी जनतेची जि होरपळ झाली त्यांच्या दु:खावर फुंकर घातली पाहिजे आणि मानवी अधिकाराचे जे हनन झाले त्या संदर्भात दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी ते सतत करीत राहिले आणि या मागणीमुळेही त्यांना जनसमर्थन लाभले हे नाकारता येणार नाही.  फुटीरतावाद्यांना पीडीपी हा जवळचा पक्ष वाटावा यासाठी मुफ्ती मोहम्मद सईद यांनी १९८७ च्या विधानसभा निवडणुकीत 'मुस्लीम युनायटेड फ्रंट'चा जो झेंडा आणि दऊतटाक निशाणी होती तोच झेंडा आणि तीच निशाणी पीडीपी साठी घेतली. काश्मिरात शांतता नांदायची असेल तर पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध राहिले पाहिजे व त्यासाठी पाकिस्तान सोबत चर्चा करीत राहिले पाहिजे यावर ते शेवटपर्यंत ठाम होते. नॅशनल कॉन्फरन्स विरोधात उभे राहण्यासाठी त्यांनी पाकिस्तान व फुटीरतावाद्यांबद्दल मऊ धोरण अवलंबिले असले तरीतरी ते स्वत: किंवा त्यांचा पक्ष फुटीरतावादी नव्हता. नॅशनल कॉन्फरन्स सारखेच काश्मीरचे भवितव्य भारताशी निगडीत असल्याचे त्यांचेही मत होते. पण जो आधार घेत ते उभे राहिले त्या फुटीरतावाद्यांशी चर्चा करायला ते मोदी सरकारला तयार करू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यू पर्यंत काश्मिरातील जनमत त्यांच्या विरोधात गेले. याची जाणीव महबुबा मुफ्ती यांना असल्यामुळे त्यांनी सरकार पुढे चालविण्यासाठी काही अटी घालून आपण केंद्रापुढे झुकत नसल्याचा किंवा सत्तालोलुप नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करून पहिला.वाटाघाटी लांबट चालल्याने मोदी सरकारने नव्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या. त्यावेळी नव्या निवडणुका झाल्या असत्या तर पीडीपीचा दारूण पराभव झाला असता इतके वर्षभराच्या काळात जनमत विरोधात गेले होते. नव्या निवडणुकांना सामोरे जायचे की मुख्यमंत्री बनून सरकार चालवायचे यात महबुबा मुफ्ती यांनी भाजपा-पीडीपी सरकारचा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारण्यास मान्यता दिली.

                                                (क्रमशः)

------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल- ९४२२१६८१५८ 

Thursday, February 8, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ९१

 काश्मीरमध्ये बीफबंदीचे राजकारण सुरु झाले ते दिल्लीत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर. आणि काश्मीर मधील १५० पेक्षा अधिक वर्षाची बीफबंदी समाप्त झाली ती देखील मोदी सरकारमुळे ! कारण काश्मीरमध्ये बीफबंदी होती ती रणबीर पिनल कोड अंतर्गत आणि कलम ३७० सोबत काश्मीरची राज्यघटना रद्द झाल्याने रणबीर पिनल कोड सोबत बीफबंदीही रद्द झाली.
-----------------------------------------------------------------------------------


जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ऑक्टोबर २०१५ मधील हिवाळी अधिवेशनातील ही घटना आहे. रविन्द्र रैना या भाजप आमदाराच्या नेतृत्वाखाली काही भाजप आमदारांनी अपक्ष आमदार इंजिनियर रशीद यांना विधानसभेत मारहाण केली. मारहाणीचे कारण होते रशीद यांनी दिलेली बीफ पार्टी. रशीद यांनी आदल्या दिवशी रात्री एम एल ए होस्टेलच्या प्रांगणात बीफ पार्टी दिली होती. जम्मू-काश्मीर मुस्लीमबहुल राज्य असले तरी बीफ हे काही तिथल्या मुस्लीम समुदायाचे खाद्य नव्हते. आवडीचे तर मुळीच नव्हते. या बीफ पार्टीला दोन घटनांची पार्श्वभूमी होती. जम्मू-काश्मीर मध्ये दीडशे वर्षापासून लागू असलेल्या बीफ बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्देश जम्मू-काश्मीर हायकोर्टाने दिला होता. त्याच दरम्यान दुसरी घटना घडली होती ती घरात बीफ असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील दादरी येथील अखलाकला जमावाने मारहाण केली होती व या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. कोणी काय खावे याची जबरदस्ती कायदा किंवा एखाद्या धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांना सांगू शकत नाहीत हे सांगण्यासाठी आमदार रशीद यांची बीफ पार्टी असल्याचे जाहीर झाले होते. विधानसभेत मारहाण झाल्यानंतर पत्रकाराशी बोलतांना मात्र रशीद यांनी वेगळी भूमिका मांडली. बीफ बंदीची अंमलबजावणी करण्याच्या जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या निर्णय सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यासाठी स्थगित केला असल्याने आपण बीफ पार्टी देवून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नव्हते. भर विधानसभेत आपल्याला झालेली मारहाण ही भाजपा आमदारांची गुंडागर्दी असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आमदार रशीद यांच्या आधी दुख्तरण ए मिल्लत या संघटनेच्या आसिया अंद्राबी यांनी बीफ बंदी लागू करण्याचा निषेध म्हणून बीफ पार्टीचे आयोजन केले होते. विधानसभेतील मारहाणीच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून काश्मीर घाटीत त्यावेळी काही ठिकाणी बीफ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. काश्मिरी मुसलमानांना बीफ खाण्याची संवय नाही आणि आवडही नाही. पण भारतीय जनता पक्षाच्या बीफ बंदीच्या आग्रहाला प्रतिवाद म्हणून बीफ पार्टीचे राजकारण खेळले गेले.                                             

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला त्यावेळी काश्मीरचे आघाडी सरकार टिकविणे महत्वाचे वाटत होते. बीफ बंदीच्या राजकारणात सरकारचा बळी जावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावेळचे जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री असलेले भाजप नेते निर्मलसिंग यांना दिल्लीला बोलावून विधानसभेतील मारहाणीच्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. विधानसभेत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनीही घडलेल्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत भाजप नेते निर्मलसिंग यांनी माफी मागण्याची मागणी केली होती. पण माफी ऐवजी जे काही घडले त्याचे भारतीय जनता पक्ष समर्थन करीत नाही एवढे बोलून वेळ निभावून नेली ! इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंग्रज काळातील भारतात बीफबंदी नव्हती त्या काळात काश्मीरमध्ये बीफबंदी होती. कायदा बनवून बीफ बंदी झाली ती डोग्रा राजवटीत. महाराजा रणबीर सिंग याच्या जवळपास ५०० वर्षे आधी हिंदू प्रजेच्या भावना दुखावल्या जावू नयेत या कारणाने १४ व्या शतकात मुस्लीम शासक सुलतान गियासुद्दीन झैन उल अबिदीन यांनी सर्वप्रथम जम्मू-काश्मीरमध्ये गोहत्या बंदीचा आदेश काढला होता. सुलतान गियासुद्दीन यांचे काश्मीरमध्ये बडा शाह (ग्रेट किंग) म्हणून आजही नाव घेतल्या जाते. त्यांच्या नंतर महाराजा रणबीर सिंग यांनी इंडियन पिनल कोडच्या धर्तीवर रणबीर पिनल कोड बनविले आणि त्याचा अंमल १८६२ पासून जम्मू-काश्मीरमध्ये केला. या रणबीर पिनल कोड अंतर्गत गाय,बैल,म्हैस यांच्या कत्तलीवर कायदेशीर बंदी घालण्यात आली ती बंदी घटनेचे कलम ३७० रद्द होई पर्यंत म्हणजे ५ जून २०१९ सालापर्यंत कायम होती. स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातील शेख अब्दुल्ला पासून महबुबा मुफ्ती पर्यंतच्या कोणत्याही सरकारने ही बीफबंदी उठविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. काश्मीरमध्ये बीफबंदीचे राजकारण सुरु झाले ते दिल्लीत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर. आणि काश्मीर मधील १५० पेक्षा अधिक वर्षाची बीफबंदी समाप्त झाली ती देखील मोदी सरकारमुळे ! कारण काश्मीरमध्ये बीफबंदी होती ती रणबीर पिनल कोड मुळे आणि कलम ३७० सोबत काश्मीरची राज्यघटना रद्द झाल्याने रणबीर पिनल कोड सोबत बीफबंदीही रद्द झाली. बंदी रद्द झाली म्हणून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर गाय,बैल, म्हैस यांच्या कत्तली सुरु झाल्यात अशातला भाग नाही. काश्मिरी मुसलमानांचे आवडीचे खाद्य म्हणजे बकऱ्याचे मटन. बीफ वर होते ते फक्त राजकारण. या राजकारणाचा फटका विधानसभेतील मारहाणी नंतर मुख्यमत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना बसला. मुस्लीम पाठीराखे त्यांच्या पासून दुरावले. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सईद यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेवून काश्मीरसाठी आर्थिक मदत लवकर जाहीर करावी असा आग्रह धरला. शिवाय भाजप-पीडीपीचा सरकार बनविताना जो अजेंडा ठरला होता त्यावर काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. हुरियत कॉन्फरन्स आणि पाकिस्तान सरकार यांच्याशी केंद्र सरकारने बोलणी करावी असे त्यांनी पंतप्रधानांना सुचविले. ऑक्टोबर २०१५ मधील या भेटीत पंतप्रधानाची काश्मीर भेट नोव्हेंबर २०१५ मध्ये होईल हे निश्चित झाले. आपल्या नोव्हेंबर २०१५ च्या काश्मीर दौऱ्यात श्रीनगर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हजार कोटी मदतीची घोषणा केली. ही मदत पूरग्रस्तांच्या पुनर्वसना सोबतच काश्मीर मधील विकासकामांसाठी होती. ही मदत जाहीर झाल्या नंतर सरकारशी बोलणी करण्यासाठी हुरियत सारखे गट तयार होतील असे मानून मुख्यमंत्री सईद यांनी केंद्र सरकार व हुरियत यांच्यात बोलणी व्हावी असा प्रयत्न केला. हा विषय अजेंडा ऑफ अलायन्स मध्ये असूनही नरेंद्र मोदी सरकारचा प्रतिसाद मुख्यमंत्र्याची निराशा करणारा होता. आपल्या पातळीवर नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानशी बोलणी सुरु ठेवली होती पण त्यात मुख्यमंत्री सईद यांची काहीच भूमिका नव्हती. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधी प्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना आमंत्रित केल्याने भारत आणि पाकिस्तानात बोलणीसाठी अनुकुलता निर्माण झाली होती. रशियात झालेल्या ब्रिक्स बैठकीच्या वेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधानात बोलणी होवून एक जाहीर निवेदन प्रसिद्धीला देण्यात आले. त्यानुसार चांगल्या वातावरणात बोलणी व्हावी यासाठी सीमेवर शांतता राखणे व आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशानी सहकार्य करण्याचे ठरले. दुसऱ्या टप्प्यात परराष्ट्रमंत्री स्तरावर चर्चा व्हावी असे ठरले. पण या निवेदनावर पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानी सेनेला अशी दोन टप्प्यातील चर्चा मान्य नव्हती. तणाव संपविणे आणि काश्मीरवर राजकीय तोडगा काढणे एकाचवेळी झाले पाहिजे अशी पाकिस्तानी सेनेची भूमिका होती. अशा प्रकारच्या चर्चेसाठी पाकिस्तानी सुरक्षा सल्लागार सरताज अजीज नवी दिल्लीला आले. आतंकवाद आणि राजकीय तोडगा यावर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांचा हेतू होता. सरताज अजीज यांनी चर्चेसाठी काश्मिरातील हुरियत, तेहरिक व अन्य गटांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावले. याला भारत सरकारने विरोध केल्याने भारत सरकारशी चर्चा न करताच सरताज अझीझ परत गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाकिस्तान व हुरियत यांचेशी चर्चा घडवून आणण्यात त्यावेळीही मुख्यमंत्री असलेले मुफ्ती मोहम्मद सईद यांची भूमिका महत्वाची होती. पण मोदीकाळात त्यांच्या मनासारखे काही घडत नसल्याने मुख्यमंत्री सईद निराश झाले मोदींच्या नोव्हेंबर २०१५ मधील काश्मीर भेटीनंतर दोन महिन्याच्या आतच अल्पशा आजारानंतर मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन झाले. 

                                                     (क्रमशः)

--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८  

Thursday, February 1, 2024

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ९०

पीडीपी आणि भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक भूमिका परस्पर विरोधी असल्या तरी जम्मू आणि काश्मीर या दोन विभागात असलेला तणाव कमी करून दोन विभागातील समन्वयासाठी पीडीपी व बिजेपी युतीच्या सरकार शिवाय पर्याय नव्हता. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकालच तसे लागले होते. भाजपला सरकार मधून बाहेर ठेवणे म्हणजे जम्मू विभागाला सरकारात स्थान नसल्या सारखे झाले असते.
--------------------------------------------------------------------------------------


भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीर पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी  यांच्यातील महत्वाचे मतभेदाचे मुद्दे होते कलम ३७०, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी काश्मिरातील सर्व गटांशी चर्चा आणि काश्मिरात शांती नांदावी यासाठी पाकिस्तान सोबत चर्चा. या मुद्द्यांवर दोन्ही पक्षात टोकाचे मतभेद होते. कलम ३७० कायम राहिले पाहिजे यावर पीडीपी ठाम होती तर ते हटविण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका जगजाहीर होती. या मुद्द्यावर एकमत झाल्याशिवाय दोन्ही पक्षाची युती होवून सरकार बनविणे शक्य नव्हते. सत्तेत आल्यावर पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित राज्यमंत्र्याने कलम ३७० लवकरच रद्द करण्याची सरकारची भूमिका जाहीरपणे मांडली होती. या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. जम्मू-काश्मीर मध्ये सरकार बनविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला कलम ३७० बाबतच्या आपल्या भूमिकेला मुरड घालणे गरजेचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कलम ३७० बद्दल लवचिक भूमिका घ्यायला अनुकूल राहील का हाही प्रश्न होता. हे लक्षात घेवूनच मोदी सरकारने सरकार बनविण्यासाठी पीडीपी सोबत वाटाघाटी करण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीच्या प्रमुखपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राम माधव यांची नियुक्ती केली होती. फार खळखळ न करता या समितीने काश्मीरची सध्याची घटनात्मक स्थिती कायम ठेवण्यास मान्यता दिली. ही जशी संघ व भाजपच्या कलम ३७० वरील भुमिके वरून माघार होती तशीच सध्याच्या घटनात्मक स्थितीला मान्यता देणे ही सुद्धा पीडीपी साठी माघारच होती. कलम ३७० चा उपयोग करून भारतीय राज्यघटना काश्मीरमध्ये लागू करण्याची जी पाउले उचलण्यात आली त्याच्याशी पीडीपी सहमत नव्हती. त्यामुळे सध्याच्या घटनात्मक स्थितीला मान्यता देण्यास सहमती ही भाजप व पीडीपी या दोहोंचीही आपापल्या जाहीर भूमिकेवरून माघार होती. फरक इतकाच की भाजपची माघार दोन पावलाची असेल तर पीडीपीची माघार एक पावलाची होती.

दोन पक्षातील दुसरा तीव्र मतभेदाचा मुद्दा सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा जमू-काश्मीर मधून हटविण्याचा होता. १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया नियंत्रित करण्यात अडथळा येवू नये यासाठी काश्मीर अशांत क्षेत्र घोषित करून हा कायदा लागू करण्यात आला होता. १९९० च्या दशकातील दहशतवादी कारवायाच्या तुलनेत सध्याची परिस्थिती बरीच शांत असल्याने हा कायदा मागे घेण्याची मागणी मनमोहनसिंग यांच्या काळापासून होत आली होती. या मुद्द्यावरही दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिकेवरून एकेक पाउल मागे घेतले. काश्मीरचा जो भाग दहशतवाद मुक्त झाला त्या भागातील अशांतता क्षेत्र घोषित करण्याची अधिसूचना राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर त्या क्षेत्रातून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा मागे घेण्यावर केंद्र सरकार विचार करेल आणि निर्णय घेईल यावर एकमत झाले. या बाबतीत मनमोहनसिंग सरकारने घेतलेली भूमिकाच सरकार बनविण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या उपयोगी पडली. काश्मीरचा गुंता सोडविण्यासाठी काश्मीरमधील सर्व गटांना मग ते कोणत्याही विचाराचे असोत वा त्यांचा कल आणि आग्रह काहीही असला तरी त्यांच्याशी विचारविनिमय आणि चर्चा करण्याची पीडीपीची आग्रही भूमिका होती. शस्त्र हाती घेणाऱ्या गटांशी किंवा हुरियत सारख्या पाकिस्तान धार्जिण्या गटांशी चर्चा करायला भाजप व मोदी सरकार फारसे अनुकूल नव्हते. तरीही सरकार बनविण्यासाठी सर्व गटांशी चर्चा करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी सरकारने घेतली होती तशी भूमिका घेण्याचे भारतीय जनता पक्षाने मान्य केले. पीडीपी प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांची पाकिस्तानशी चर्चा आणि संवाद झालाच पाहिजे याबाबत आग्रही भूमिका होती. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मुफ्ती मोहम्मद सईद जेव्हा जम्मू-काश्मीरचे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हापासूनची त्यांची हीच भूमिका होती. या भूमिकेला अटलबिहारी सरकारचा प्रतिसाद सकारात्मक होता. पाकिस्तानशी संवाद साधण्या बाबत आणि संबंध सुधारण्याबाबत मोदी सरकार प्रारंभी तरी अनुकूल होते. नवाज शरीफ यांना शपथविधी समारंभासाठी आमंत्रित करणे आणि पूर्वनियोजित कार्यक्रम नसतानाही पाकिस्तानात विमान उतरवून पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणे या कृतीतून ही अनुकुलता स्पष्ट झाली होती. त्यामुळे पाकिस्तानशी संवाद हा मुद्दा आघाडीच्या कार्यसुचीत सामील करायला फारसी अडचण गेली नाही.                                                                                                                                                     

विरोधी पक्ष म्हणून कार्य करतांना भारतीय जनता पक्षाने कायम पाकिस्तानशी किंवा काश्मिरातील पाकिस्तान धार्जिण्या गटांशी चर्चा करायला विरोध केला होता. अशा चर्चेला ते सरकार कमजोर असल्याचे भासवीत असत. जम्मू-काश्मीर मध्ये सरकारात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने या मुद्द्यावर यु टर्न घेतला. अशा तडजोडीमुळे दोन महिन्याच्या चर्चेनंतर पीडीपी प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखालील सरकारात भारतीय जनता पक्ष सामील झाला. दोन्ही पक्षाच्या वैचारिक भूमिका परस्पर विरोधी असल्या तरी जम्मू आणि काश्मीर या दोन विभागात असलेला तणाव कमी करून दोन विभागातील समन्वयासाठी पीडीपी व बिजेपी युतीच्या सरकार शिवाय पर्याय नव्हता ही वस्तुस्थिती होती. दोन विभागात पूर्वीपासून असलेला तणाव या दोन पक्षांनी निवडणूक प्रचारात चांगलाच वाढविला होता. भाजप मुक्त काश्मीर घाटी हा पीडीपी (व इतरही घाटीतील प्रमुख पक्षांचा) नारा होता तर पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस मुक्त जम्मू हा भारतीय जनता पक्षाचा नारा होता. निकालही जवळपास तसाच लागला होता. त्यामुळे निवडणुकी नंतर या दोन विभागात समन्वय साधणारे सरकार स्थापन होणे आवश्यक होते. बीजेपी व पीडीपी युतीमुळे तसे सरकार स्थापन झाले होते. घाटी सोडून गेलेल्या पंडीत समुदायाच्या वापसीसाठी सुद्धा या युतीमुळे अनुकूल वातावरण निर्माण होण्याची आशा होती. युतीच्या सरकारच्या कार्यसुचीत पंडितांच्या वापसीला अग्रक्रमाने स्थान देखील देण्यात आले होते. दोन्ही पक्षांनी बऱ्याच तडजोडी करून सरकार स्थापन केले असल्याने सरकार चालविणे सोपे काम नव्हते. त्यातच सप्टेंबर २०१४ मध्ये काश्मीर घाटीत महापुराने मोठी हानी केली होती. महापूर काश्मीर घाटीसाठी नवीन नसला तरी २०१४ मधील महापूर गेल्या १०० वर्षातील झेलम नदीला आलेल्या महापुरातील सर्वात मोठा महापूर होता. यात २७७ व्यक्तींचा जीव गेला. हजारो घरांची हानी झाली आणि लाखो हेक्टर मधील पीक वाहून गेले. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले ओमर अब्दुल्ला यांचा तब्बल ३६ तास कोणत्याही विभागाशी, अधिकाऱ्याशी किंवा मंत्र्याशी संपर्क होवू शकला नव्हता व सगळे प्रशासन ठप्प झाले होते यावरून पुराची भीषणता लक्षात येईल. सुरक्षा दलाने या महाप्रलयात सापडलेल्या लोकांना वाचविण्यात मोठी भूमिका निभावल्याने जीवित हानी तुलनेने कमी झाली. वित्तहानी मात्र मोठी झाली. या पार्श्वभूमीवर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ झाले होते. केंद्र सरकारच्या मदती शिवाय काश्मीर मध्ये झालेली वित्तहानी भरून निघणे शक्य नव्हते. मात्र पुरेशी मदत मिळायला एक वर्षाचा कालावधी लागला. सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या पूरहानीसाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये श्रीनगर येथे येवून जम्मू-काश्मीरसाठी ८०००० कोटीचे पॅकेज जाहीर केले. यात पूरग्रस्तांच्या मदती सोबतच काश्मीरच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठीच्या प्रकल्पाच्या खर्चाची तरतूद करणारे हे पॅकेज होते. ही आर्थिक मदत सोडली तर जम्मू-काश्मीर सरकारच्या कार्यसुचीतील मुद्द्यांवर वर्षभरात फारसी प्रगती झाली नव्हती. उलट गो हत्या बंदी वरून सरकार मधील दोन्ही पक्षात आणि राज्य व केंद्रात तणावच निर्माण झाला.

                                                   (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८