आज तुमचे वय किती आहे हे मला माहीत नाही.सुजाण नागरिक म्हणून आपल्या पंतप्रधानांचे वय माहीत असायला हवे , पण तसे काही घटनात्मक बंधन नाही.राज्यकर्त्याचे कमाल वय काय असावे यालाच कसलीही घटनात्मक मर्यादा नसल्याने तसेही वयाकडे लक्ष देण्याचे कारणच नाही.पण तुमचे वय माहीत नसताना 'वय झाले आहे ' अशी समजूत होण्या मागे काही ठोस कारणे आहेत आणि ती कारणे लक्षात घेतली की वय झाल्याचे आपल्याला पटेल आणि आपण सोनियाजी कड़े पद मुक्त होण्या साठी साकडे घालाल या भाबड्या आशेपोटी आपणास पत्र लिहित आहे.तुम्ही सत्ता लोभी कधीच नव्हता आणि आजही नाही आहात याची मलाच काय पण दूधखुले संघवासी सोडले तर सम्पूर्ण देशाला खात्री आहे.तुम्ही पद मुक्त व्हावे ही संघ परिवाराची मनोमन ईच्छा आहे हे तर सर्वानाच माहीत आहे.पण तुम्ही पदावरून पायउतार व्हावे हे अन्य देशवासीयाना वाटने याचा संघ इच्छाशी सम्बन्ध नाही.दोहोंच्या इच्छे मधे मुलभुत फरक आहे.संघ परिवाराला तुमचे निष्कलंक चारित्र्य ,तुमचे निर्मोही असने सत्ता प्राप्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अड़थला वाटतो म्हणून ते देव पाण्यात बुडवून तुमच्या जाण्याची वाट पाहात आहेत.पण संघ परिवाराला नकोसे झालेले तुमचे गुण आम्हा देशवासीयाना हवेसे वाटत असतानाही तुमची सरकार व सरकारी धोरनावरील सुटत चाललेली पकड़ बघुनच माझ्या सारख्या नागारिकावर आता तुम्ही गेले पाहिजे अशी भावना व्यक्त करण्याची वेळ आली आहे।
माननीय पंतप्रधान ,आपण आता पायउतार झाले पाहिजे हे तीव्रतेने वाटले ते कांदा प्रश्नी आपले सैरभैर वर्तन बघून!खरे तर कांदा ही काही देशा समोरची समस्याच नव्हती.शेती माला साठी किंमत मोजण्याची सवय नसलेल्या सुखवस्तु कुटुम्बियाना चार पैसे जास्त मोजावे लागले म्हणून झालेल्या दाम्भीक ओरडी कड़े अजिबात लक्ष देण्याची गरज नसताना आपण मात्र भयभीत होवून अविचाराने वागत होता!तुम्ही कृषी मंत्र्याला कांद्याचे भाव वाढलेच कसे अशी विचारना केल्याचे प्रसिद्ध झाले होते.प्रसिद्धी माध्यमानी जाब विचारला वगैरे असा त्या बातमीचा चावून चोथा केला. पण स्वत:ला कल्पक आणि हुशार समजणार्या प्रसिद्धी माध्यमाला अर्थपंडित असलेले पंतप्रधान अर्थशास्त्राचे प्राथमिक सिद्धांत विसरले हे मात्र उमगले नाही!मागणी वाढलेली असेल आणि पुरवठा जितका कमी असेल तितके भाव अधिक वाढणार हे अर्थशास्त्राचा ढ समजला जाणारा विद्यार्थी किंवा सामान्य बुद्धीचा व तितकेच सामान्य व्यवहार द्न्यान असलेल्या व्यक्तीला जे समजते ते जगमान्य अर्थशास्त्री असलेले पंतप्रधान विसरतात तेव्हा त्याचा एकाच अर्थ होतो-पंतप्रधानाचे वय वाढल्याने विस्मरण वाढत चालले आहे!
माननीय पंतप्रधान ,कांदा प्रश्नी तुमच्या सरकारने दाखवलेली समज ,उचललेली पाउले केवळ हास्यास्पदच नव्हती तर तुम्ही स्वत: देशाला ज्या उदारीकरनाच्या दिशेने घेवुन निघाला होता त्याच्या विपरीत होती आणि आहेत.आर्थिक धोरनावरील तुमची पकड़ सुटत चालल्याचे हे निदर्शक आहे.कांद्याची भाव वाढ कृत्रीम नसून नैसर्गिक व अर्थशास्त्रीय नियमानुसार झाली असताना तुमच्या सरकारातील मंत्र्यानी साठेबाजी विरुद्ध शंख केला.त्यांच्यावर धाडी टाकण्याचा मोठा गाजावाजा केला.गम्मत म्हणजे धाडी घातल्याच्या या बातम्या पैकी एकाही बातमीत किती टन कांदा जप्त झाला याचा उल्लेख नसायचा.आडातच नाही तर पोहर्यात येइल कोठून?ज्या सरकारच्या शीर्ष स्थानी अर्थशास्त्रद्न्य आहे त्या सरकारने केलेला मोठा विनोद इथे नमूद केला पाहिजे.साठेबाजावर पुरवठा विभागाने घातलेल्या धाडी समजू शकतात.पण आयकर विभागाच्या धाडी?समजा कोणी कांद्याची साठेबाजी केली असेल तर त्याच्यावर आयकर खात्याने कशासाठी धाडी टाकायच्या? प्रधानमंत्री महोदय,मी तुमच्या सारखा अर्थशास्त्री नसलो तरी माझे जे तुटपूंजे द्न्यान आहे त्यानुसार आयकर खात्याला आपल्या चालु आर्थिक व्यवहाराचा हिशेब आर्थिक वर्ष संपल्या नंतर द्यायचा असतो.त्यात कर चुकवेगिरीचा संशय आल्यास पुढची कार्यवाही होते। साठेबाजी संदर्भात आयकर खात्याची कार्यवाही ही अनावश्यक तर होतीच पण तो अधिकाराचा दुरूपयोगही होता.आपण कारवाई करतो आहोत असा भास् निर्माण करण्यासाठी अधिकारांचा दुरूपयोग करण्या पर्यंत आपल्या सरकारची मजाल गेली आणि आपण असहायपणे पाहात राहिला.तुमच्या सुदैवाने या देशात व्यापारी वर्गाची बाजू घेणे म्हणजे स्वत:ची प्रतिमा बिघड्विने असे समीकरण रूढ़ असल्याने 'हक्का'चे वाली आणि प्रसिद्धी माध्यमे चुप राहिल्याने नवा बखेड़ा उभा राहिला नाही।
माननीय पंतप्रधान,तुमच्या सरकारच्या अशा कारवायाने कांद्याच्या भावावर काहीच परिणाम झाला नाही ,उलट तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह लागले आहे.कांद्याचे भाव फ़क्त दोनच कारणाने कमी झाले आहेत.प्रथम निर्यात बंदी लादली म्हणून आणि आता भावात घसरण होते आहे तो नवा कांदा बाजारात आला म्हणून.जाणते अर्थशास्त्री म्हणून आणि पंतप्रधान या नात्याने तुम्ही देशवासीयाना कांदा पिका बद्दलचे वास्तव सांगायला हवे होते.कांदा उत्पादकांचे झालेले नुकसान देशा समोर मांडायला हवे होते.नवा कांदा बाजारात आला की भाव कमी होतील हे सत्य सांगुन लोकांना दिलासा देता आला असता.त्याच्याही आधी शेती बद्दल अडाणी मंत्र्याचे कान उपटावयाला हवे होते.पण तुम्ही असे काहीच केले नाही.आज पर्यंत अमलात आणल्या गेलेला निर्यात बंदिचा शेतकरी विरोधी मार्ग अवलंबून तुम्ही मोकले झालात.वास्तविक तुम्ही या देशाला पेट्रोल ,डीज़ल,गैस या सारख्या वस्तुंची किंमत मोजण्याची सवय लावण्यात यशस्वी झालात.त्या दर वाढी विरुद्ध असाच आरडा ओरडा झाला व आजही चालु आहे,पण त्याला तुम्ही जुमानले नाही.आता लोकांना अन्न-धान्याची किंमत मोजण्याची सवय लावण्याची वेळ आली तर पळ काढीत आहात!या बाबतीत लोकानुनय करीत आहात.पेट्रोल,डीज़ल,गैस साठी कम्पन्याना व पर्यायाने सरकारला तोटा होतो तो दूर करण्यासाठी ती भाव वाढ जितकी समर्थनीय आहे त्या पेक्षा किती तरी पटीने अधिक समर्थनीय शेती मालाच्या भावात वाढ होने आहे.पेट्रोलजन्य पदार्थाच्या कमी किमतीने कितीही तोटा झाला तरी कंपन्या व सरकार यांच्या चैनीत कधीच कमी आली नाही.पण शेतीतील सततच्या तोट्याने लक्षावधी शेताकर्याना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत ,तर लक्षावधी आत्महत्त्येच्या वाटेवर आहेत.प्रधानमंत्री महोदय,तुमचे हे दुटप्पी वर्तन शेतकरी समुदायाला अधिक संख्येने आत्महत्या साठी भाग पाडील।
प्रधानमंत्री महोदय, देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना देशाच्या राजकीय पटलावर तुमचा उदय झाला होता.हे आर्थिक संकट कोण्या एका राजवटीने ओढ़वले नव्हते ,तर स्वातंत्र्या नंतरच्या एकुणच धोरणाचा तो परिपाक असल्याचे आपण अचूक निदान केले होते.अर्थकारणातील भाकड कल्पनानी आणि काल्पनिक संकल्पनाच्या व बंदिस्त विचाराच्या बेड्यानी अर्थ व्यवस्थेचे डबके बनविले असल्याने त्या कल्पना बाजुला सारुण उदारवादाची संजीवनी तुम्ही दिली.भारताच्या अर्थ व्यवस्थे साठी जगाचे दालन तुम्ही खुले करून दिले.जगाच्या स्पर्धेत उतरून शेती आणि उद्योगाला स्वत:ची क्षमता स्वत:च्या बलावार सिद्ध करण्याची संधी दिली.सरकारी लुडबुड व हस्तक्षेप थाम्बविन्याचे आश्वासन देवून आश्वस्त केले.सुधारलेल्या देशाशी आम्ही कशी स्पर्धा करणार अशी कुरकुर उद्योग जगताने जरुर केली, पण शेती क्षेत्र संधीचा लाभ घेण्यास उत्सुक होते। शेतीतल्या सरकारी हस्तक्षेपाने शेती मालाला कधीच भाव मिळू दिला नाही हां अनुभव असलेल्या शेतकरी समुदायाला तुमचा उदारवाद भावला. उत्साहाच्या भरात या समुदयाने आपली न्यायासाठी सुरु असलेली आंदोलने संपवून तुमच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकली.पण आपण त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काही केल्याचा दाखला शोधूनही सापडत नाही.उलट आन्दोलन कर्त्यात दुही निर्माण होवून शेतकरी समाजाचे अपरिमित नुकसान झाले ते तुमच्या धोरनाने! तुमच्या उदारवादातही शेती क्षेत्राला दुय्यमच स्थान राहिले.शेती मालाचे भाव वाढू नयेत म्हणून तुमच्या पुर्वासुरीनी जे हातखंडे स्वीकारले ते दूर सारने तुम्हालाही शक्य नसल्याचे कांदा प्रश्नावरून दिसून आले.शेती मालाला भाव मिळू न देता शेतकरी समाजाच्या अंगावर कर्ज माफी सारखे भिकेचे तुकडे फेकायाचे हेच तुम्ही मागच्या पानावरून पुढे चालु ठेवले आहे.शेती बाबतीत तुम्ही गंभीर नाही आहात हे आणखी दोन बाबी वरून दिसून येते.तुमच्या मंत्री मंडलातील व्यापार मंत्री शेती मालाचा व्यापार होवू देण्यास तैयार व उत्सुक नसतात.खरे तर ते व्यापार मंत्री नव्हे आयात मंत्री आहेत.तुमच्या पर्यावरण मंत्र्या विषयी काय बोलावे?शेतीत नवे तंत्रद्न्यान नवे बियाने आले की देशाचे पर्यावरण बिघडणार अशी त्यांची ठाम अंधश्रद्धा! आपण त्यांच्या अंधश्रद्धा निर्मुलना साठी काही प्रयत्न केले असे अजिबात दिसत नाही.आता राहिले कृषी मंत्री.ते बाहेर निर्यात बंदी विरोधी बोलतील,नवे बियाने नवे तंत्र्दन्यान याचा पुरस्कार करतील,पण मंत्रीमंडल बैठकीत मंत्रीपदाला धक्का लागणार नाही इतपतच बोलतील.कृषी मंत्र्याच्या बाबतीत आपल्याला काही करता येणे शक्य नाही हे खरे,पण जयराम रमेश आणि आनंद शर्माकडून त्यांची खाती काढून घेणे तुम्हाला सहज शक्य होते. वाढत्या वयाच्या कारणाने तुमच्यात कृतीशुन्यता आल्याचे वा कोणावरही कसलीही कारवाई करण्याची क्षमता उरली नसल्याचे आताच्या मंत्रीमंडल विस्ताराने सिद्ध केले आहे!
माननीय पन्तप्रधान ,यापूर्वी तुम्ही तुम्ही तुमची क्षमता दोनदा सिद्ध केली आहे.एकदा देशाच्या अर्थ कारनाला नवी दिशा देण्यात व नंतर अणू प्रश्नावर ठाम भूमिका घेवुन .तुमचा हां खंबीरपणा या देशाने पुन्हा कधी पाहिला नाही.असा खंबीरपणा तुम्हाला दाखविता येत नसेल तर तुमचे पायउतार होने देशाच्या हिताचे राहील-तुमच्या सारखा सत्तेचा मोह नसलेला ,सत्तेचा स्वार्थासाठी दुरूपयोग न करणारा निष्कलंक चारित्र्याचा पंतप्रधान पुन्हा होने नाही हे खरे असले तरीही !! --सुधाकर जाधव
pandharkawada मोबाइल - 9422168158
dist.yavatmaal ईमेल: