Thursday, October 29, 2015

गीता सार

सध्याच्या द्वेषाने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणाला छेद देणारी गीताची घरवापसी आनंदाची झुळूक आणि आशेचा किरण बनली आहे. या घरवापसीचा उपयोग देशांतर्गत आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील सौहार्द वाढविण्यासाठी केला पाहिजे.
------------------------------------------------------


भगवद्गीते बद्दल मी लिहिणार नाही. विनोबांच्या रसाळ भाषेतील गीताई पलीकडे माझे गीतेचे वाचन नाही. अनेकांनी गीतेवर भाष्य केलेत हे माहित आहे आणि गांधीजीनी गीतेवर भाष्य करणारे पुस्तक लिहिले नाही हे सुद्धा माहित आहे. तरीही आमचे प्रधानमंत्री मोदीजी पहिल्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी गांधी लिखित गीतेची दुर्मीळ प्रत अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांना भेट दिल्याचे वृत्त वाचून नवल वाटले. त्यामुळे गांधी लिखित गीता भाष्य मिळाले तर ते वाचण्याची मात्र उत्सुकता आहे आणि त्यावर लिहिण्याची देखील. सध्या तरी ती प्रत दुर्मिळच आहे ! त्यामुळे आता लिहित आहे ते पाकिस्तानातून भारतात परत आलेल्या गीता नावाच्या मुलीवर. मुकबधीर असलेल्या मुलीची भेट सर्वप्रथम प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती घेतात तेव्हा ही घटना विशेष महत्वाची असली पाहिजे आणि तशी ती आहेच. भारताच्या सध्याच्या सामाजिक - राजकीय वातावरणा त तर या घटनेचे महत्व अधिक आहे. फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमा देवून पाकिस्तानची निर्मिती झाली . भळभळणाऱ्या जखमेने खपली धरावी आणि ती सुकण्याआधीच काढल्या जावी असे वारंवार घडत आले आहे. अशी खपली ओरबाडून काढण्याची आगळीक सरकारी पातळीवर प्रामुख्याने पाकिस्तानकडून होत आली आहे. त्यात पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाने ही जखम चिघळतच ठेवली आहे. तिथल्या सर्वसामान्य जनतेकडून अशी आगळीक घडली असे म्हणता येणार नाही. भारताने फाळणीचे दु:ख मनात ठेवले पण त्याचा पाकिस्तान बरोबरच्या संबंधात परिणाम होणार नाही याची काळजी घेतली. मोठ्या भावाने छोट्या भावाच्या चुका पदरात घेत राहाव्यात हेच भारताने केले आणि अती झाले तेव्हा या छोट्या भावाला धडाही शिकविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी म्हंटल्या प्रमाणे भारतासाठी पाकिस्तान लहान भाऊच आहे. भारतीय जनतेने तर पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर यांचेवर आपल्या देशातील कलाकार आणि क्रिकेटपटू यांच्या इतकेच प्रेम केले आहे. जनतेच्या पातळीवर पाकिस्तानात देखील अशीच स्थिती आहे . तेथील सरकारी धोरणाने आणि आतंकवाद्यांच्या भारताविरुद्ध गरळ ओकण्याने पाकिस्तानच्या सर्वसामान्य  जनतेची भारताप्रतीची ही भावना कायम धूसर राहिली आणि म्हणावी तशी भारतीय जनते पर्यंत पोचली नाही. त्यामुळे इथेही ज्यांना फाळणीच्या जखमा ओल्या ठेवून राजकारण करायचे आहे त्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्तान विरुद्ध वातावरण निर्मिती केली आहे. दोन्ही राष्ट्राचे संबंध शत्रुवत ठेवण्यासाठी दोन्हीकडील गट सतत कार्यशील असल्याने सतत संशय आणि गैरसमज पसरत राहिले आहेत. भारतातील अशा गटांनी पाकिस्तान बाबत जे समज पसरविले आहेत त्याला गीताची घरवापसी ही छेद देणारी घटना असल्याने तीचे महत्व आहे. गीता प्रकरणाची माहिती होण्यापूर्वीच तंतोतंत अशाच घटनेवर आधारित सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट भारतीयांनी डोक्यावर घेतला होता. प्रत्यक्षात तसे घडले असते तर गीताची जशी सन्मानाने घरवापसी झाली तशीच त्या चित्रपटातील मुन्नीच्या बाबतीत झाले असते. दोन्ही देशातील जनतेच्या भावना या निमित्ताने प्रकट झाल्या आणि त्या भावना समान आहेत ही आजच्या घडीला दिलासा देणारी मोठी बाब असल्याने याचे महत्व आहे.


गीताची घरवापसी होण्याआधी भारतात तीन  घटना घडल्या. पाकिस्तानी गझल गायक गुलामअली यांचा मुंबईतील कार्यक्रम शिवसेनेच्या धमकीमुळे रद्द करावा लागला. भाजपच्या वरच्या सत्ता वर्तुळात वावरलेले सुधींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्याच्या पुस्तकाच्या होणाऱ्या प्रकाशना आधी शिवसेनेने सुधींद्र यांच्या तोंडाला काळे फासून या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला विरोध केला. मुंबईत दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डच्या अध्यक्षांची सुरु असलेली बैठक शिवसेनेने गोंधळ घालून उधळून लावली. सीमेवर पाकिस्तानी आगळीकीतून होणाऱ्या गोळीबारात जवान शहीद होत असताना आपण आपल्या भूमीवर पाकिस्तानच्या कलाकारांचे गाणे ऐकायचे किंवा पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायचे या गोष्टीना शिवसेनेचा विरोध आहे आणि त्यांनी तो व्यक्त केला. भावनिकदृष्ट्या शिवसेनेची भूमिका पटणारी असल्याने शिवसेनेच्या भूमिकेला समर्थनही मिळाले. नीट विचार केला तर लक्षात येईल की दोन्ही देशा दरम्यान जे काही चालते ते तिथल्या जनतेच्या संमतीने किंवा इच्छेने होते असे नाही. पाकिस्तानच्या आगळीकी बद्दलचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांच्या हल्ल्यात आपले जवान मरतात हे म्हणणे ठीक आहे. त्या आगळीकीला आपले जवानही आत घुसून चोख प्रत्युत्तर देत असतात . खरे तर सीमेवर काय चालते हे सरकारकडूनच आपल्याला कळते. सरकार सगळी माहिती देते आणि खरी माहिती देते या भ्रमात कोणी राहू नये. शत्रू राष्ट्राची आंतराराष्ट्रीय जगतात प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याच्या हल्ल्यावर प्रकाशझोत टाकणे गरजेचे असते. तेव्हा सीमेवरील घटना सरकार आणि सैन्यावर विश्वासाने सोडायच्या असतात. जनतेच्या पातळीवर असे शत्रुत्व आणणे आणि वाढविणे चुकीचेच ठरते. पाकिस्तान सरकारच्या शत्रुत्वाच्या कारवाया विरुद्ध आवाज बुलंद करण्याची फार मोठी संधी शिवसेनेकडे होती. प्रधानमंत्र्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्रीमंडळाच्या शपथग्रहण समारंभाला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याला बोलावले होते तेव्हा त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेने शपथघेणे नाकारले असते तर पाकिस्तान साठी ते लज्जास्पद ठरले असते आणि मुत्सद्देगिरीने जगाला पाकिस्तान बद्दल जे सांगायचे ते सांगता आले असते. ती शिवसेनेची मुत्सद्देगिरी ठरली असती . आज मात्र ज्या पद्धतीने शिवसेनेने पाकिस्तानचा विरोध केला ती जगाच्या दृष्टीने गुंडगिरी ठरली आहे. खरी गरज पाकिस्तानच्या नेतृत्वाला पायघड्या न घालता विरोध करण्याची आहे . दुसऱ्या बाजूने तेथील जनतेला आपलेसे करण्याची आहे. त्यामुळे आपलाच नाही तर पाकिस्तानच्या जनतेचा दबाव देखील तिथल्या सरकारवर येईल. शिवसेनेने घडवून आणलेल्या घटनांनी आंतरारष्ट्रीय जगात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे तर गीताच्या घरवापसी प्रकरणात पाकिस्तानची प्रतिमा काहीशी उजळली आहे.

गीताच्या निमित्ताने एक महत्वाची बाब भारतीय जनते समोर आली आहे. पाकिस्तानात आपल्याकडे प्रचारित केले जाते तसा सगळाच काळोख नाही. पाकिस्तान इस्लामी राष्ट्र बनल्यामुळे धर्मराष्ट्राचे सगळे तोटे त्याच्या वाट्याला आले आहेत. पाकिस्तानी धर्मराष्ट्राचे काटे तेथील अल्पसंख्य हिंदुना , ख्रिस्ती आणि अन्य समुदायांना बोचातातच , पण त्याचे दुष्परिणाम मुस्लिमांनाही भोगावे लागत आहे. धर्मराष्ट्राने केवळ शिक्षण आणि आर्थिक प्रगतीच कुंठीत केली नाही तर लोकांचे शिरकाणही चालविले आहे. धार्मिक कट्टरतेतून निपजलेल्या आतंकवादाने तेथील हिंदू किंवा इतर अल्पसंख्याकांचे जेवढे बळी घेतले त्यापेक्षा शेकडो पटींनी मुस्लीमांचेच बळी गेले आहेत. धार्मिक कट्टरतेची किंमत पाकिस्तानला मोजावी लागत आहे. आपल्याकडील परंपरा आणि चालत आलेली उदारता लक्षात घेता आपल्याकडे माणुसकीचे झरे विपुल असणे यात नवल नाही, पण विपरीत वातावरणात पाकिस्तानातही माणुसकीचे झरे जीवंत आहेत गीता प्रकरणाने दाखवून दिले आहे. पाकिस्तानातील हिंदूवरील अत्याचाराच्या आणि धर्मांतराच्या कथा अतिरंजित पद्धतीने प्रचारित करून देशांतर्गत तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती गीता प्रकरणाने थोडीसी का होईना उघडी पडली आहे. याचा अर्थ तेथील हिंदू भरडले जात नाहीत असे नाही. धर्मराष्ट्रात भरडण्या पासून कोणीच वाचू शकत नाही हे त्यामागचे वास्तव आहे. गीता मुस्लिम नाही हिंदू आहे हे लक्षात आल्यावर तिच्या धर्म भावनेचा करण्यात आलेला आदर , सांभाळ हा तेथील जनतेच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकतो. जनतेच्या पातळीवर तरी दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची आणि दृढ करण्याची संधी गीतामुळे मिळाली आहे. जनतेच्या मनात विष कालविण्याच्या प्रयत्नाला यामुळे थोडा तरी लगाम बसेल. जनतेच्या पातळीवर संवाद , आदानप्रदान आणि येणेजाणे वाढले तर आपल्याला धर्मराष्ट्राचे तोटे लख्खपणे कळतील आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असण्याचे फायदे पाकिस्तानातील जनतेला कळतील. असे कळणे दोन्हीकडील जनतेसाठी जरुरीचे बनले आहे. असे झाले तर भारत ,पाकिस्तान आणि बांगलादेश आणि इतरही शेजारी राष्ट्राला सामावून घेत युरोपियन संघाच्या धर्तीवर भारतीय महासंघ बनण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल. अशा प्रकारचा महासंघ हाच अखंड भारत असणार आहे. ज्या लोकांना अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झालेले पाहायचे आहे त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अखंड भारताकडे जाण्याचा मार्ग अशाप्रकारे प्रेमाचा आहे. द्वेषातून राष्ट्राचे छकले पडतात. द्वेष बुद्धीला लगाम घालण्यातच सर्वांचे हित आहे.


----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------

Wednesday, October 21, 2015

शेतकऱ्यांच्या लढाईसाठी गायीची कवचकुंडले !

वामनाने कपटाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडले या आख्यायिकेचा जन्म झाल्यापासून  शेतकरी समुदाय 'इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थना करीत आला आहे. प्रार्थना आणि प्रयत्न आजवर अपयशी ठरत आले आहेत. पण आता या वामनाच्या वंशजांनी स्वत:चे प्रभुत्व टिकविण्यासाठी पारजलेले 'गो-अस्त्र' त्यांच्यावरच वापरून आपली इडा पिडा टाळण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे . 
----------------------------------------------------------------------------------

देशात सध्या गायी शिवाय दुसऱ्या कशाचीच चर्चा होत नाही. गायीच्या रक्षणाच्या नावावर झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरत आहेत. गाय मारली या अफवेवर माणसे मारायला या झुंडी तत्पर आहेत. या गायींचा पालक आणि मालक शेतकरी रोज आपले मरण आपल्याच डोळ्याने पाहतो याची मात्र कोणालाच फिकीर नाही. गोपालक रोज कुठे ना कुठे आत्महत्या करतो तेव्हा या झुंडी कधी रस्त्यावर उतरत नाहीत. आजवर लाखो आत्महत्या झाल्यात आणि त्या सरकारी धोरणातून झालेल्या हत्या असूनही एखाद्या झुंडीने कधी सरकारला जाब विचारला नाही. गोपालक जगला-वाचला तरच गाय वाचेल ही सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ गोष्ट त्यांना दिसत नाही किंवा समजत नाही इतके अशा झुंडी तयार करण्यामागचे डोके निर्बुद्ध नक्कीच नाहीत. गाय मेली तरच झुंडी तयार होणार असतील तर ज्यांना अशा झुंडी बनवून आपले राज्य चालवायचे आहे ते कधीच गाय वाचविण्याचा प्रामाणिकपणे विचार करणार नाहीत. त्यामुळेच  वाचलेल्या गायीचे काय हाल आहेत , उकिरड्यावरचे प्लास्टिक खावून त्या मरताहेत इकडे त्यांचे लक्षच नाही.  गायीला माता मानणाऱ्या गोभक्तांना आपले घोडे पुढे दामटण्यासाठी तेवढी गायीची आठवण येते. त्याच्या पलीकडे त्याला गायीशी आणि खऱ्याखुऱ्या गोपालकाशी म्हणजे शेतकऱ्याशी काही देणेघेणे नाही हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. तसे नसते तर शेतकऱ्यांना गो-पालनासाठी , गो वंश संगोपनासाठी सर्वप्रकारची तांत्रिक आणि शास्त्रीय मदत केली असती. गाय शेतकऱ्यांनी सांभाळायची आणि तिच्या दुधामुताचा यांनी लाभ घ्यायचा हीच रणनीती आणि राजनीती आजवर होत आली आहे. 


गायीचा - गोवंशाचा लाभ शेती आणि शेतकऱ्याच्या भल्यासाठी व्हावे अशी आपल्या राष्ट्रनिर्मात्यांची इच्छा होती. गाय राजकारणासाठी आणि धर्मकारणासाठी वापरली न जाता शेती आणि शेतकऱ्याच्या उन्नती साठी वापरली जावी अशी आपल्या घटना समितीची इच्छा होती , नव्हे आग्रह होता.  आपल्या राज्यघटनेत गोवंश हत्याबंदी बद्दलचा जो दिशा निर्देश आला आहे  तो निव्वळ या कारणासाठी. राज्यघटनेने देश धर्मनिरपेक्ष राहील अशी ग्वाही दिलेली असल्याने कोणाच्या धार्मिक भावना खातर गोहत्या बंदीचा कायदा येणे आणि आणणे शक्य नव्हते. धार्मिक भावना लक्षात घेवून असा कायदा करावा हा आग्रह राखणारे घटना समितीत जी मंडळी होती त्यांनी देखील चर्चेअंती या गोष्टीला मान्यता दिली. गोहत्या बंदी मुलभूत हक्क म्हणून घटनेत समाविष्ट करावा हा आपला आग्रह दुसऱ्या जमातीवर लादणे इष्ट नाही हे मान्य करत त्यांनी आपला आग्रह मागे घेत फक्त दिशा निर्देशात गोहत्या बंदीचा समावेश करण्यास मान्यता दिली होती. गोवंश आणि शेतीचा अन्योन्य संबंध लक्षात घेवून घटनेत हा दिशा निर्देश आला. गोहत्या बंदी मुलभूत हक्क म्हणून अमान्य करण्या मागे शेतीसाठीची त्या त्या वेळची परिस्थिती आणि गरज लक्षात घेवून संबंधित राज्याला वाटले तर गोहत्या बंदीचा कायदा करण्याचे स्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यात गोहत्या बंदीचा कायदा आणताना शेतकऱ्यांचे मत , शेतीची गरज , शेतीचे आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण याचा विचार होवूनच अशा कायद्याचे प्रारूप तयार व्हायला पाहिजे होते. सुप्रीम कोर्टात गोहत्या बंदीवर दोनदा विचार झाला आहे आणि दोन्ही वेळेस सुप्रीम कोर्टाने एकदा बंदीच्या विरोधात आणि आणि दुसऱ्यांदा बंदीच्या बाजूने निर्णय देताना गाय आणि गोवंशाचा विचार केला तो शेती आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा. दोन्ही वेळेस कोर्टात बाजू मांडताना दोन्ही बाजूनी गायीचा आणि धर्माचा संबंध मुळीच जोडला नाही आणि निर्णय देताना कोर्टाने देखील जोडला नाही. म्हणूनच गाय आणि गोवंशाचा विचार करताना शेती आणि शेतकऱ्याचे हित लक्षात घेवूनच गोवंशा संबंधीचे कायदे झाले पाहिजेत. महाराष्ट्रात असा कायदा लागू करताना शेती आणि शेतकऱ्याचे हित लक्षात न घेतल्याने आधीच संकटात असलेला शेतकरी अधिक संकटात सापडला आहे. फडणवीस यांच्या कार्यकाळात आत्महत्या वाढल्यात त्याचे हेच कारण आहे. 


गोवंशाने शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याने गोवंशाची नेहमीच साथ दिली हा आपल्या शेतीचा इतिहास आहे. अडीअडचणीच्या काळात गोवंशाचा उपयोग शेतकऱ्यांना एटीएम कार्डा सारखा होत आला आहे. शेतीची जी अवस्था आहे त्यात शेतकऱ्याकडे काही बचत अथवा शिल्लक राहण्याचा प्रश्नच नसतो. शेतीत फटका बसणे ही नित्याचीच बाब आहे आणि थोडे इकडेतिकडे झाले कि काहीतरी विकून किंवा गहाण ठेवून शेतकऱ्याला आपली गरज भागविता येते. अशावेळी नेहमीच गोधन त्याच्या उपयोगी पडत आले आहे. सतत तीन वर्षे निसर्ग शेतकऱ्याशी खेळ करीत आला आहे आणि सरकार विश्वासघात. अशा परिस्थितीत  शेतकऱ्याला विचारात आणि विश्वासात न घेता फडणवीस सरकारने सत्तेत आल्या बरोबर लागू केलेल्या गोहत्या बंदी कायद्याने शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले. कारण हा कायदा लागू करताच जनावराचा  विशेषत: गायी - बैलाचा बाजार बंद झाला. शेतकऱ्यांनी आपल्या जवळची निरुपयोगी जनावरे कशी पोसायची आणि विकायची असतील तर कुठे विकायची याचा विचार आणि व्यवस्था फडणवीस सरकारने ना कायदा लागू करताना केली ना त्यानंतर केली. गायीला गरीब गाय म्हणण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. तिच्या अवतीभवती एवढ्या धार्मिक भावना पेटविण्यात आल्या आहे की तो एक जिवंत बॉम्ब बनला आहे. हा जिवंत बॉम्ब कशाला कोण विकत घेईल. शेतकऱ्याला आपले जनावर खाटकाच्या हवाली करण्यात कधीच आनंद झाला नाही. पण आपल्या पोराबाळाच्या पोटात दुष्काळी किंवा टंचाईच्या काळात चार घास पोटात पडावे म्हणून त्याला विकणे भाग पडायचे. आता परिस्थिती उलटी झाली आहे. तुमच्या पोराबाळाच्या पोटात चार घास गेले नाही आणि कुपोषण होवून ते मेले तरी चालेल . मात्र गायीला उपाशी ठेवून चालणार नाही. गाय बैल मेले तर ते कशाने मेले याचा जाब शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे.तुमचे पोर का मेले , तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या का केली हे सरकारने आजवर विचारले नाही आणि पुढेही विचारणार नाही. मात्र आता गाय -बैलाच्या बाबतीत हे विचारले जाणार आहे. तुमचे जनावर हरवले तरी तुम्ही ते खाटकाला विकले अशी अफवा पसरवीत एखादी झुंड तुमच्या घरावर चालून येईल इतकी स्फोटक परिस्थिती आज तयार झाली आहे. ज्या गाय-बैलाचा शेतकऱ्यांना आजवर उपयोग होत आला ते आज एक मोठे संकट बनले आहे. शेतकऱ्यासाठी आणि देशासाठी देखील. गाय धर्माच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्नाने गाय-बैल स्फोटक वस्तू बनले आहेत. शेतकरी जनावरे नाही तर बॉम्ब जवळ बालगीत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातही बॉम्ब शेतकऱ्यांनी सांभाळायचा आणि धर्मवाद्यांनी , राजकारण्यांनी पाहिजे तेव्हा त्याचा स्फोट घडवून आणायचा ! शेती शेतकऱ्यांनी करायची आणि पीक दुसऱ्यांनी खायचे असाच हा प्रकार आहे. शेतकरी जागा झाला आणि थोडा विचार केला तर या नव्या संकटाचे संधीत रुपांतर करता येणे शक्य आहे किंबहुना तसे रुपांतर करण्याची ऐतिहासिक संधी शेतकऱ्याकडे चालून आली आहे. 


वामनाने कपटाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडले या आख्यायिकेचा जन्म झाल्यापासून  शेतकरी समुदाय 'इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थना करीत आला आहे. प्रार्थना आणि प्रयत्न आजवर अपयशी ठरत आले आहेत. पण आता या वामनाच्या वंशजांनी स्वत:चे प्रभुत्व टिकविण्यासाठी पारजलेले 'गायअस्त्र' त्यांच्यावरच वापरून आपली इडा पिडा टाळण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे . गाय-बैलाना आज जे बॉम्बचे रूप आले आहे तो काय आपण त्यांच्यासाठी सांभाळतच बसायचा का हा प्रश्न शेतकऱ्यांनी स्वत:ला विचारावा आणि हा बॉम्ब आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपल्यालाच वापरता येणार नाही का याचा देखील विचार करून पाहावा. असा विचार केला तर आपल्या हातात एक अमोघ अस्त्र आले आहे याची जाणीव शेतकऱ्यांना होईल. यापुढे शेतकऱ्यांनी गायीची कवचकुंडले घालून रस्त्यावर उतरायचे ठरविले तर सरकारला ही कवचकुंडले भेदून शेतकऱ्यांना मारता येणार नाही. आजवर आपण माणसे गोळा करून रस्ता रोको करायचो तर पोलीस गोळ्या घालून तास-दोन तासात रस्ता मोकळा करून आपले आंदोलन हाणून पाडायचे. आता जर आपण रस्ता रोको साठी गाय-बैलांना रस्त्यावर उतरविले तर त्यांना गोळ्या घालायची सोडा हात लावायची पोलिसांचीच काय लष्कराची देखील हिम्मत होणार नाही ! गाय-बैलांना घेवून आता कितीही दिवस रस्ता आणि रेल्वे रोखणे शक्य होणार आहे. आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी "पवित्र गायीचा"- गोमातेचा उपयोग होणार आहे. गाय आमच्याजवळ आणि तिचा  उपयोग धर्माच्या आडून राजकारण करण्यासाठी होतो आहे. मग आमच्या गायीचा उपयोग आमचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात गैर काय आहे. उलट गोवंशाचा उपयोग शेती व शेतकऱ्याच्या उपयोगासाठी व्हावा हा भारतीय संविधानाचा दिशा निर्देशच आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी गायीचा वापर करणे हे संविधान संमत असल्याने गायीला देवाचे देण्यात आलेले रूप आपण आपल्या पथ्यावर पाडून घेतले पाहिजे. शिवाय फसफसत असलेल्या गोभक्तीने आज घेतलेल्या विनाशकारी वळणाला विधायक वळण त्यामुळे लावणे शक्य होणार आहे. सर्व हिंदुनी गाय ही गोमाता असल्याने ती आपल्या घरी पाळली पाहिजे असा कायदा करण्याचा आपण आग्रह धरला तर शेतकऱ्यांच्या जनावरासाठी फार मोठे मार्केट तयार होईल. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी एक गोवंश,तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी दोन , द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन अशा क्रमाने गोवंश पाळणे आणि पोसणे  बंधनकारक केले तर शेतकऱ्यांच्या जवळील गोवंशाला किती मागणी वाढेल आणि किती किंमत वाढेल याचा विचार करा. नाही तरी सातवा वेतन आयोग लागू होणारच आहे . तेव्हा शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत वरील प्रकारे गायी पाळल्या शिवाय वेतन आयोग लागू करू नये अशी मागणी करावी. गोमाता आहे तर प्रत्येक घरी , शहरातील प्रत्येक सदनिका धारकांनी ती आपल्या जवळ ठेवलीच पाहिजे. गायीला माता म्हणायचे आणि आईबापाला वृद्धाश्रमात पाठविण्या सारखे गायीला पोसणे शेतकऱ्यावर सोडायचे ही चलाखी आता चालणार नाही. शेतकऱ्यांनी प्रसंगी रस्त्यावर गाय-बैलांना उतरवून शेतकऱ्यांच्या जनावरासाठी मोठी बाजारपेठ तयार करून उत्पन्नाचा हुकुमी पर्याय विकसित गेला पाहिजे. त्यामुळे सर्वांनाच गायीची भक्ती करण्याची , पालन करण्याची संधी मिळेल आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील .


---------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा ,जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८ 
---------------------------------------------------------------------------------

Thursday, October 15, 2015

माननीय प्रधानमंत्र्यांना खुले पत्र

 भाषण करताना तुमचे हात जसे मुक्तपणे हातवारे करतात ते हात कृतीच्या वेळी बांधून ठेवू नका. कोण आपला कोण परका याचा विचार न करता देशाचे स्वास्थ्य आणि सौहार्द बिघडविणाऱ्या चिथावणीखोरावर फक्त हात उगारा. तुमचा उगारलेला हात पाहूनच देशाच्या भाईचारा आणि एकतेला कुरतडणारे हे उंदीर बिळात पळतील.
---------------------------------------------------------------माननीय प्रधानमंत्री ,

प्रारंभीच एक गोष्ट कबुल करतो . मी तुम्हाला सत्तेत येण्यासाठी मतदान केले नव्हते. तसे न करण्याचे प्रमुख कारण तुमचा पक्ष सत्तेत आल्या नंतर देशाच्या धर्मनिरपेक्ष चरित्रात बदल तर होणार नाही ना ही भीती होती. जगात जेवढे धर्म आणि संप्रदाय आहेत ते सगळे या देशात गुण्यागोविंदाने नांदून देशाच्या संपन्नतेत भर घालीत असल्याने ही सांस्कृतिक संपन्नता संपणार तर नाही ना ही भीती होती. कारण तुमच्या आणि तुमच्या पक्षामागे गेल्या १२५ वर्षा पासून देशाला हिंदूराष्ट्र बनविण्याचा ध्यास घेवून कार्यरत असलेली संघटना होती. इथल्या लोकशाही व्यवस्थेबद्दल या संघटनेला फारसे प्रेम आहे याची आणीबाणीचा अल्पकाळ सोडला तर स्वातंत्र्योत्तर काळात कधी प्रचीती न आल्याने देशातील धार्मिक सलोखा आणि लोकशाही संकटात तर येणार नाही ना अशी भीती स्वाभाविक होती. मतदान करणे आणि न करणे हा प्रश्न निवडणुकीपुरता असतो. एकदा निवडणूक आटोपली कि तिचा निकाल सर्वांनी मान्य करून पुढे जायचे असते. हीच तर लोकशाहीची खासियत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर तुम्ही सगळ्यांचे प्रधानमंत्री झालात आणि देशातील सगळी जनता तुमच्यासाठी एकसमान झाली. तुम्ही सुद्धा  मतदान न करणाऱ्या ६९ टक्के मतदारांनाही तुम्ही आपले मानले. 'सबका साथ , सबका विकास' ही तुमची घोषणाच होती. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठीच तर तुम्ही तुम्हाला मतदान न करणाऱ्या मतदारांना तुमच्या टीममध्ये स्थान दिले. तुमची टीम १२५ कोटीची असल्याचे लालकिल्ल्यावरून अभिमानाने सांगितले. या टीमचा एक सदस्य असल्याने मला तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार मिळाला आहे आणि तसे सांगणे एक नागरिक म्हणून कर्तव्य देखील आहे. त्याच साठी हे खुलेपत्र आहे.

तुमच्या कानावर काही गोष्टी टाकण्या आधी मला आणखी एक कबुली द्यायची आहे. तुम्ही प्रधानमंत्री झाल्यानंतर काही प्रसंग असे आलेत की माझ्या सारख्या तुमच्या विरोधकाला तुम्हाला मतदान न करण्यात , तुम्हाला समजून घेण्यात काही चूक तर झाली नाही ना असे वाटले. निवडून आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला तेव्हा संसदेच्या पायरीवर तुम्ही टेकविलेला माथा कोण विसरेल. तुमच्या पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याही डोळ्यात पाणी आणले होते. तेव्हा तुम्ही संसदेला लोकशाहीचे मंदीर संबोधले होते हे आजही मी विसरलो नाही.संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातील तुमच्याच पक्षाच्या नेत्यांसमोर झालेल्या पहिल्यावहिल्या भाषणात तुमच्या पक्षाला स्वातंत्र्याची कोणतीच विरासत नसताना तुम्ही खुल्या मनाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सेनानींचा गौरव केला होता.देशाच्या संविधान निर्मात्यांचे स्मरण करून त्यांच्यापुढे नतमस्तक होवून संविधानाचा गौरव केला होता. तुमच्या कारकिर्दीत गुजरात मध्ये जे काही घडले ते अगदी सहजपणे विसरून जाण्याचा तो क्षण होता. गुजरात आणि त्या ठिकाणी घडलेल्या घटनांना पाठीमागे टाकून तुम्ही नवी सुरुवात करीत आहात असे वाटण्याचा तो क्षण होता. तुमच्या त्या ऐतिहासिक भाषणावर तुमच्या पक्षांच्या संसद सदस्यांनी , मुख्यमंत्र्यांनी आणि इतर नेत्यांनी जी दाद दिली ती लक्षात घेता भीती वाटावे असे काही नाही असे वाटले होते. पण त्या प्रसंगी तुमच्या समोर बसलेल्या ज्या लोकांनी तुम्हाला जो अपूर्व प्रतिसाद दिला त्यांच्या पैकीच अनेकांनी संसदेच्या बाहेर आल्या नंतर तुम्ही संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात निर्माण केलेल्या भावनांना मूठमाती देण्यास प्रारंभ केला. तुम्ही व्यक्त केलेला विकासाचा ध्यास , त्यासाठी सुरु केलेले प्रयत्न पाहता तुमच्याच सहकाऱ्यांनी विकासा आड येणाऱ्या धर्मवादाचे भूत उभे करण्याचे उपद्व्याप विरून जातील असे वाटत होते. विकासासाठीच्या १२५ कोटीच्या तुमच्या टीम मध्ये सामील होण्यास तुमच्याच सरदारांना अजिबात स्वारस्य नसल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकीकडे देशाच्या विकासासाठी तुम्ही इतर राष्ट्रांचे उंबरठे झिजवून खोऱ्याने डॉलर देशात आणण्याचा प्रयत्न करीत आहात आणि तुमचे सरदार मात्र धर्मवादाचे जुनी मुडदे वर काढण्याच्या कार्यात दंग आहेत. विकासाच्या गोष्टी आता आम्हाला परदेशात होणाऱ्या तुमच्या भाषणातून तेवढ्या ऐकायला मिळतात. देशात मात्र विकासा ऐवजी धर्मवादाचे पुनरुज्जीवन करण्याच्या खटपटी आणि लटपटी सुरु आहेत. तुमच्याच पक्षाचे आणि तुमच्याच संघटनेचे सदस्य यात अभिमानाने आणि उन्मादाने पुढाकार घेत आहेत. देशाच्या धर्मनिरपेक्ष रचनेला आणि संविधानाला आव्हान देवून धार्मिक उन्माद वाढवीत आहेत. या धार्मिक उन्मादाने अल्पसंख्याकांनाच भयभीत करण्यात येत नसून विवेकवादाची , अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरु आहे. अशा वातावरणात आर्थिक विकासाला वाव आणि स्थान नसते . तुमच्या सगळ्या प्रयत्नावर ही मंडळी पाणी फिरवीत आहेत आणि त्याचे तुम्ही मूकदर्शक बनला आहात.

१२५ कोटीच्या टीमचा सेनापती अशा परिस्थितीत हतबल आणि लाचार असल्यासारखे वर्तन करीत असेल तर या १२५ कोटीच्या टीमची पांगापांग व्हायला वेळ लागणार नाही. ज्यानी ज्यांनी विकासाच्या शब्दाला प्रमाण मानून तुम्हाला मत दिले , मोदीच विकास करू शकतील असे लोकांना सांगत तुम्हाला भरभक्कम पाठींबा दिला त्या सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर खिळल्या आहेत . माझ्या सारखे तुमचे आधीपासूनचे जे विरोधक आहेत त्यांना 'बघा , आम्ही म्हणत होतो तसेच घडत आहे ना' असे बोलण्याची तुम्ही संधी देत आहात. माननीय प्रधानमंत्री , असे बोलण्याची आमच्या सारख्यांना संधी मिळते याचा आम्हाला अजिबात आनंद नाही. कारण असे बोलण्याची परिस्थिती असणे हे देशासाठी घातक आहे. आमच्या सारख्यांना चूक ठरविणे हेच देशहिताचे आहे. तशी गळ घालण्यासाठीच तुम्हाला हे पत्र लिहित आहे. उत्तरप्रदेशातील दादरीत अकलाखच्या बाबतीत जे घडले तो तुमच्यासाठी आणि देशासाठी एक 'वेक अप कॉल' आहे - जागे व्हा हे सांगणारा तो एक निर्वाणीचा इशारा आहे. हा इशारा तुमच्या पर्यंत नक्कीच पोचला आहे .तुमची थोडी हालचाल झाल्याचेही दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्या पासून रोखण्यासाठी तेवढी हालचाल पुरेसी नाही, खडबडून जागे होण्याची गरज आहे. तसे तुम्ही होताना दिसत नाही यामुळे तुमचे आजवरचे खंदे समर्थक नाराज होत आहेत. आमचे सोडा. आम्ही तर तुमचे विरोधकच. त्यामुळे आमचे बोलणे तुम्ही मनावर न घेणे समजू शकते. पण ज्यांनी तुम्हाला प्रधानमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत जाण्यास मदत केली त्यांची तरी तुम्ही निराशा करू नये . देशातील सर्वसामान्य जनतेच्या खूप आशा आहेत हो तुमच्याकडून . अच्छे दिन येण्याची चातकासारखी वाट पाहात आहे हो ही जनता. अच्छे दिन दाखविण्या ऐवजी तुमचे लोक त्यांना मध्ययुगीन रानटी जगाचा अनुभव देत आहेत. त्यांना आवरा . तेच तुमच्या आणि देशाच्याही हिताचे आहे. आमच्या सारख्या विरोधकाचे तुम्ही अजिबात ऐकू नका . पण तुमचे समर्थक , तुमचे काही सहकारी काय म्हणतात ते तरी ऐका. ज्यांच्याकडे देशाच्या विकासासाठी डॉलर मागायला जाता ते काय म्हणताहेत हे तरी ऐका. माझी अशी भावना झाली आहे की तुमच्या आजूबाजूचे लोक हे काहीच तुमच्या कानावर येवू नये याची दक्षता घेत आहेत. देशात सगळे कसे आबादीआबाद आहे अशी तुमची समजूत करून देत आहेत आणि त्यामुळे काहीच विपरीत घडत नाहीये या भ्रमात तुम्ही वावरत आहात. तुमचा हा भ्रम दूर करण्यासाठीच हे लिहित आहे. आजच्या परिस्थिती बद्दल तुमचे समर्थक काय बोलत आहेत हे तुमच्या कानी घातले तर तुम्हाला पटेल या आशेने हे लिहित आहे.

आज सर्वत्र देशातच नाही तर जगभर भारताच्या संदर्भात चर्चिल्या जात असलेल्या दादरीच्या घटनेबद्दल अनेक दिवस तुम्ही मौनमोहन झालात आणि उशिराने मौन तोडून जे काही बोललात त्यात काहीच दम नसल्या बद्दलची नाराजी या समर्थकांनी व्यक्त केली आहे.  देशाच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी रचनेला आव्हान देणाऱ्या घटनेबद्दल तुम्ही चक्क १० दिवस मौन पाळून होता. या दरम्यान अगदीच चिल्लर घटनावर तुम्ही तुमच्या आवडत्या ट्वीटर वर प्रतिक्रिया देत राहिलात. बोलले तेव्हा म्हणाले कि हिंदू-मुस्लिमांनी ठरवावे त्यांना विकास हवा की भांडत बसायचे. माननीय पंतप्रधान , इथे दोन जमाती एकमेकांशी भांडत नाही आहे. तुमचेच सहकारी भांडण उकरून काढून हल्ले करीत आहेत. सगळा दोष त्यांचा असताना तो लपविण्यासाठी तुम्ही दोन्ही जमातींना दोषी ठरविले.  याचा चुकीचा संदेश गेला. तुम्हाला प्रधानमंत्री पदाच्या खुर्ची पर्यंत पोचविण्यासाठी माध्यमातील ज्या पंडितांनी वातावरण निर्मिती केली त्यांच्या पैकी काही जणांची मते मी तुम्हाला ऐकवीत आहे. प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभ लेखिका तवलीन सिंग म्हणतात कि . दादरीत अकलाखच्या हत्येला अपवादाने घडलेली गुन्हेगारी घटना म्हणून पाहण्याची आणि तिची तीव्रता कमी करण्याची चूक कोणी करू नये.त्यांच्या मते या घटनेवर तुम्ही खूप उशिरा तोंड उघडले. उशिरा का होईना जे काही बोललात त्यामुळे चुकीच्या लोकांना चुकीचा संदेश मिळाला. अशा घटनांना खतपाणी घालणाऱ्यांवर जरब बसावी आणि लोकात विश्वास निर्माण व्हावा असे त्यात काही नव्हते. त्याही पुढे जावून त्यांनी तुमच्या विकासाच्या प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सुशासन आणण्यासाठी ज्या डिजिटल इंडियाचा तुम्ही पुरस्कार करीत आहात ती डिजिटल साधने वापरून तुमच्या पक्षाचे लोक झुंडशाही निर्माण करीत आहे. तुमच्या सहकाऱ्यांची मानसिकता आधी बदला नाही तर विकास निरर्थक ठरेल असा इशारा तवलीन सिंग यांनी दिला आहे. माध्यमातील तुमच्या दुसऱ्या कट्टर समर्थक मधु किश्वर यांनी तर घडणाऱ्या घटनावरची तुमची प्रतिक्रिया पाहून तुमच्यावर कोणी काळी जादू तर केली नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. याच मधु किश्वर यांनी निवडणूक काळात "मोदीनामा" नावाचे पुस्तक लिहून तुमची हवा बनावी यासाठी हातभार लावला होता. तुमच्यासाठी निवडणूक काळात जी जाहिरात यंत्रणा राबली होती त्याची एक सदस्य असलेल्या अर्पिता चटर्जी यांनी सध्याच्या घटना बघून तुमच्या निवडणूक प्रचारात जी मदत केली त्याबद्दल आपल्याला भयंकर पश्चाताप होत असल्याचे नमूद केले आहे. तुमचे खंदे समर्थक असलेले दुसरे स्तंभ लेखक सुरजितसिंग भल्ला यांनी तर तुम्हाला लैटीन म्हणीची आठवण करून दिली आहे. एखाद्या मुद्द्यावर जो गप्प राहतो त्याचा अर्थ त्याची त्या मुद्द्याला सहमती आहे या म्हणीचे स्मरण त्यांनी करून दिले आहे. या गोष्टी फक्त आमच्या सारखे विरोधक किंवा विरोधी पक्षातील लोक बोलत नाहीत. साहित्यिकही बोलायला आणि पुरस्कार परत करायला लागले आहेत.  तुमचे समर्थक म्हणतात तसे हे साहित्यिकही तुमचे विरोधक असल्याने बोलत आहेत असे आपण मानू.  त्यांचा नका तुम्ही विचार करू. पण तुमचे समर्थकच तुमच्या भूमिकेचा काय अर्थ घेतात ते तरी तुम्ही लक्षात घ्या.
उत्तर प्रदेश सारखी घटना पूर्वी घडली नाही अशातला भाग नाही. मात्र अशा घटनांचे कधी कोणी समर्थन केले नाही . अशा घटनांबद्दल दु:खही व्यक्त झाले आणि प्रतिबंधक उपाययोजनाही झाल्यात. तुम्ही १५ दिवसांनी खेद व्यक्त केला असला तरी तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांनी घटनेच्या पहिल्या दिवसापासून जमावाच्या हिंसेचे निर्लज्ज समर्थन केले. तो जमाव अफवा पसरवून तुमच्याच लोकांनी जमवला आणि हत्याही घडवून आणली हे आता उघड झाले आहे. निव्वळ अफवे वरून एका माणसाला ठार मारले आणि त्यावर तुमच्या पक्षाचे नेते म्हणाले गायीचे संरक्षण करण्याप्रती अखिलेश सरकार गंभीर नाही. दुसऱ्या नेत्याने गायीची हत्या केली तर असेच घडेल असे चिथावणीखोर वक्तव्य केले. माणूस मारल्याचे दु:ख नाही आणि न मारलेल्या गायी वरून चिथावणी देवून उन्माद निर्मिती तुमच्याच पक्षाचे नेते करीत आहेत. या लोकांना आवरण्याचे पक्षाचा एक सर्वोच्च स्थानी असलेला जबाबदार नेता म्हणून तुमचे कर्तव्य होते. प्रधानमंत्री म्हणून तुमच्या मंत्रीमंडळातील अशा चिथावणीखोर सहकाऱ्यांना मंत्रीमंडळाच्या बाहेर करणे तुमचे कर्तव्य होते. या लोकांनी घेतलेल्या शपथेचा भंग करून राज्यघटनेला आव्हानच दिले नाही तर अपमानही केला आहे. तुम्ही म्हणालात या घटनेसाठी केंद्राला का आणि कसे जबाबदार धरता ते अगदी बरोबर आहे. केंद्राचा या घटनेशी संबंध नाही. पण घटने नंतर तुमच्या मंत्रीमंडळातील सहकारी जे बेताल वागले आणि वागत आहेत त्याची जबाबदारी कोणाची आहे ? त्यांना आवरणार कोण ? त्यांचेवर कायदेशीर कारवाई कोण करणार ? तुम्हीच जबाबदारी पासून हात झटकण्याचा किंवा पळण्याचा प्रयत्न केला तर लोकांनी - तुमच्याच १२५ कोटीच्या टीम मेम्बर्सनी- कोणाकडे पाहायचे हे तुम्हीच सांगा. माननीय प्रधानमंत्री , भाषण करताना तुमचे हात जसे मुक्तपने हातवारे करतात ते हात कृतीच्या वेळी बांधून ठेवू नका. कोण आपला कोण परका याचा विचार न करता देशाचे स्वास्थ्य आणि सौहार्द बिघडविणाऱ्या चिथावणीखोरावर फक्त हात उगारा. तुमचा उगारलेला हात पाहूनच देशाच्या भाईचारा आणि एकतेला कुरतडणारे हे उंदीर बिळात पळतील. तुमच्यावर हात चालविण्याची देखील पाळी येणार नाही. देशाचा प्रधानमंत्री मौनी आणि दुबळा नसल्याचे  दाखवून देण्याची ही वेळही आहे आणि गरज देखील. आशा आहे स्पष्ट आणि मोकळे बोलल्याचा तुम्हाला राग येणार नाही.
                                                                                                                                                              आपला नम्र
                                                                                                                                  तुमच्या १२५ कोटीच्या टीमचा एक सदस्य
-------------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८

-------------------------------------------------------------------------------------

Thursday, October 1, 2015

शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकारकडून मीठ

मुख्यमंत्र्याची पाठ फिरताच शेतकरी आत्महत्या करीत असेल तर त्याचा अर्थ आजच्या व्यवस्थेवर शेतकऱ्यांचा विश्वास उरला नाही असा होतो. याला कोणी शेतकऱ्यांचे मानसिक संतुलन ढळले असे समजत असेल तर त्याला मनोरुग्नच म्हंटले पाहिजे. मानसोपचाराची गरज कोणाला असेल तर ती या योजनेच्या जनकांना आणि ती लागू करणाऱ्या सरकारला आहे. मानसोपचाराची योजनाच सरकारचे डोके ठिकाणावर नाही हे दर्शविते.
-----------------------------------------------------------------


गेल्या काही महिन्यापासून सरकारातील जबाबदार लोकांनी शेतकऱ्यांची जी थट्टा आरंभिली आहे.त्याचा कुठे शेवट होताना दिसत नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असताना त्याला वैदिक शेतीचे मृगजळ दाखविण्यात येत आहे. कधी सेंद्रिय शेतीचे गाजर पुढे करण्यात येत आहे. शेतकऱ्यासाठी वेळ आली तर सरकारी तिजोरी रिकामी करू अशा बढाया मारल्या जात आहे. शेतकऱ्याच्या नावावर सरकारी तिजोरी रिकामी करण्याचे प्रताप पूर्वीही झाले आहेत. या तिजोरीतील पैशाने कोणाकोणाची घरे भरली जातात हे आता गुपित राहिलेले नाही. शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडून देणाऱ्यापासून तो पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे त्यांची घरे या पैशाने भरली जातात. त्यामुळे शेतकऱ्यासाठी तिजोरी रिकामी करणे हा सरकारातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम बनला आहे. शेतकरी हा दारुडा आहे आणि त्याच्या हाती पैसा पडला तर तो सगळा दारूत खर्च करतो या प्रमेयावर सरकारची देवा इतकीच श्रद्धा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीचा पैसा कोणाच्याही हातात गेला तरी सरकारला चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांची वीज सबसिडी विद्युत मंडळाला अर्पण केली जाते. खत सबसिडी खतनिर्मिती कंपन्याच्या घशात घातली जाते.शेतकऱ्यांना गरज असलेल्या विमा योजनांचे संरक्षण कधीच न देणाऱ्या विमा कंपन्यांचे चांगभले करण्यासाठी सरकार तयार असते. सरकारी यंत्रणा आणि आपल्या सोयीसाठी त्यांनी निर्मिलेले असे मध्यस्थ यांच्यात शेतकऱ्यांच्या नावावरचा सगळा पैसा जिरतो. हा पैसा अडवून जिरविण्यासाठी नवनवे उंचवटे निर्माण केले जातात. फडणवीस सरकारचा असाच एक नवा फंडा म्हणजे शेतकऱ्यांसाठी मानसोपचाराची सुविधा निर्माण करण्याची घोषणा आहे. अशी सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करायला सज्ज झाले आहे. असे मानसोपचार केल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील असे महाराष्ट्र सरकारचे मत आहे. महाराष्ट्र सरकारचे शेतकरी आत्महत्ये संबंधीचे निदान केंद्रीय  कृषीमंत्री राधामोहनसिंग यांच्याही पुढे एक पाउल आहे. केंद्रीय कृषीमंत्र्याने प्रेमभंग , दारू, लग्नादी कार्यक्रमात उधळपट्टी अशी शेतकरी आत्महत्येची कारणे सांगितली होती. याला महाराष्ट्र सरकारने नवे कारण जोडून आपण केंद्रीय कृषीमंत्र्यापेक्षा जास्त प्रतिभावान आहोत हे सिद्ध केले आहे. ज्याचे मानसिक संतुलन ठीक नाही त्याला मानसोपचाराची गरज असते हे सर्वविदित आहे. शेतकऱ्यांचे मानसिक संतुलन ढळल्या मुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत असाच महाराष्ट्र सरकारचा निष्कर्ष असला पाहिजे हे सरकारने सुचविलेल्या उपाययोजनेतून स्पष्ट होते. एकदा का मानसिक संतुलन ढळल्यामुळे आत्महत्या होतात असे मानले कि अशा उपचारा शिवाय शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रती असलेली जबाबदारी संपते अशी समजूत फडणवीस सरकारने करून घेतलेली आहे कि काय हे कळत नाही. मानसोपचाराची उपाययोजना पुढे येण्याचे दुसरे एक कारण संभवते. मुख्यमंत्री धीर देण्यासाठी शेतकऱ्याच्या भेटीला जातात आणि मुख्यमंत्र्याची पाठ फिरताच शेतकरी आत्महत्या करतो याचा आमच्या मुख्यमंत्र्यांना मोठा मानसिक धक्का बसला असावा. या मानसिक धक्क्यातून मानसोपचाराच्या कल्पनेचा उगम झाला असावा. शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्व उपाय योजना म्हणजे 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' अशा स्वरूपाच्या राहात आल्या आहेत. मानसोपचाराच्या बाबतीतही तसेच घडले आहे. मानसिक धक्का मुख्यमंत्र्यांना बसला आणि मानसोपचार मात्र त्यांच्याऐवजी शेतकऱ्यांवर करण्याचे योजिले आहे. 

शेती आणि शेतकऱ्यांना काय झाले , त्यांना कशाची गरज आहे हे आमच्या राज्यकर्त्यांना , धोरणकर्त्यांना खरेच कळत नसेल का? मूळ कारणाला भिडून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी यांना नेहमी शेतकऱ्यांना देण्यासाठी पैकेजच कसे आठवतात हे कळत नाही. विरोधी पक्ष अशा पैकेजची मागणी करतो आणि सत्ताधारी पक्ष फारसी खळखळ न करता पैकेज जाहीर करतो. शेतकरीही आजचा दिवस निभला , उद्याचे उद्या पाहू म्हणत पैकेज स्विकारतो.  परिणाम पैकेजच्या चक्रव्युहातून ना सरकार बाहेर पडत , ना विरोधी पक्ष ना स्वत: शेतकरी. शेतीशी काडीचाही संबंध नसणाऱ्या शहरी अभिजनांना मात्र या पैकेजमुळे सरकार शेतकऱ्यांचे फार लाड करते असे वाटायला लागते. फुकटच्या पैशासाठी शेतकरी काहीही करील अगदी आत्महत्यासुद्धा असे म्हणायला हे उच्चभ्रू अभिजन कमी करीत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीजन्य कारणासाठी होत नाहीत हे दर्शविण्यासाठी सरकारने असंख्य चाळण्या लावल्या आहेत. या चाळण्यात आत्महत्या केलेले निम्मे अधिक शेतकरी अडकतात आणि जे या चाळणीतून खाली पडतात तेवढ्या शेतकऱ्यांना सरकार  तुटपुंजी मदत करते. या तुटपुंज्या मदतीसाठी शेतकरी आत्महत्या करतात असे सवंग विधान निर्ढावलेले अभिजन करीत असतात. ही मंडळी स्वत:ला एवढी शहाणी समजतात तर यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे का कळत नाही हेच कळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कांद्याच्या भाववाढी विरुद्ध ओरड करता येणार नाही. साखर महागली म्हणून तोंड कडू करता येणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे मुळातून न समजून घेण्यात असा सर्वांचा स्वार्थ दडला आहे. सर्वपक्षीयांना , मग ते सत्ताधारी असो कि विरोधी , शेतकऱ्यांना भिकारी ठेवण्यात त्यांचा स्वार्थ दडला आहे. संवेदनशीलतेने शेतकऱ्यांचा विचार केला तर जवळपास फुकटात पडणारे अन्न घशाखाली उतरविणे जड जाईल म्हणून आत्महत्येसाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरणे अभिजनांसाठी सोयीचे आहे. माणूस डोक्याने नाही तर खिशाने विचार करतो हे शेतकऱ्यांच्या समस्याचे जे जे निदान करताहेत त्यांच्याकडे पाहिले कि खात्री पटायला लागते. सर्वजण आपला खिसा भरण्याच्या , वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांचा सुळाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करीत आहेत. 

सरकार , विचारवंत , पत्रपंडीत आणि अभिजन यांनी शेतकरी आत्महत्ये मागची नसलेली गुंतागुंतीची कारणे शोधून काढत त्या आभासी कारणावर उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यापेक्षा शेतकरी आत्महत्ये मागचे साधे सत्य समजून घेतले पाहिजे. साधे सत्य हे नाही कि तो दारू पिण्यात पैसे उडवितो आणि मारतो. साधे सत्य हेही नाही कि लग्न-तेरवी,सणावारावर उधळपट्टी करतो आणि पैसे शिल्लक राहात नाही , कर्जबाजारी होतो आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करतो. आत्महत्या केली तर सरकारकडून मदत मिळते म्हणूनही तो आत्महत्या करीत नाही. वेड लागले म्हणूनही तो गळ्या भोवती फास आवळून घेत नाही. दारू पिण्याने आत्महत्या होत असतील तर माध्यमात आणि सरकारी यंत्रणेत काम करणारे दारुडे आधी मेले असते. केवळ कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या झाल्या असत्या तर देशातील सगळ्या उद्योगपतींनी केव्हाच आत्महत्या केल्या असत्या. पण त्यांचे डोक्यावरील कर्जही वाढते आहे आणि त्यांची संपत्तीही वाढते आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेती करून देशाची भूक भागवून गोदामे भरून टाकणारा शेतकरी कमजोर आणि मानसिक संतुलन ढळलेला असू शकत नाही . त्याच्या आत्महत्ये मागचे साधे सत्य एवढेच आहे की शेतकरी कुटुंब प्रमुखाला कुटुंबातील चील्ल्यापिल्ल्याचे काही भविष्य आहे यावर विश्वास ठेवायला काडीचाही आधार त्याला सापडत नाही. उद्या पैसे मिळायची आशा असेल तर आज पैसे नाहीत म्हणून कोणी आत्महत्या करणार नाहीत. उद्याही पैसे मिळणारच  नाहीत याची खात्री वाटू लागते  तेव्हाची असहाय्यता त्याला आत्महत्येकडे घेवून जाते. कारण जेव्हा जेव्हा त्याच्या खिशात चार पैसे पडायची संधी असते तेव्हा तेव्हा ती संधी त्याच्याकडून क्रूरपणे हिरावून घेण्यात आल्याचा अनुभव त्याने घेतलेला असतो. शेतातून बाजारात आला कि त्याच्या लुटीचा प्रारंभ होतो. अडते-व्यापारी एकीने अडवणूक करून भाव पाडतात आणि चार पैसे गाठीशी बांधण्याच्या त्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होतो. कसाबसा हा टप्पा पार करून वाढीव बाजारभाव पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न केला तर लगेच गोरगरिबांच्या नावाचा जप करीत श्रीमंत आणि अभिजन भाव पाडण्यासाठी दबाव आणते. सरकार त्यांचेच असल्याने त्यांच्या मागणीची दखल तात्काळ घेवून उपाययोजना केली जाते. यातून शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी आणि आयातीला मुक्तद्वार देवून शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे पडणार नाहीत याची काळजी घेतली जाते. यातूनही शेतकरी झोपला नाही तर त्याला झोपवायला निसर्ग तयार असतोच. निसर्गाचा सर्वात जास्त फटका त्याला बसण्याचे कारण शेतीमालाच्या भावात त्याची ही रिस्क कव्हर केली जात नाही. तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होवू नयेत आणि आपल्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित आहे असा त्याच्या मनात विश्वास निर्माण करायचा असेल तर त्याच्या खिशात पैसे पडणार नाही याच्यासाठी कळत-नकळत जे अव्याहत प्रयत्न सुरु आहेत ते थांबविले पाहिजे. हे प्रयत्न न थांबविता शेतकऱ्यांच्या स्थिती बद्दल दु:ख व्यक्त करतात त्यांचे शेतकऱ्यासाठीचे अश्रू खरे नाहीत , ते मगरीचे अश्रू आहेत. शेतकऱ्याला मदत आणि दानधर्माची गरज नाही. त्याच्या घामाला दाम मिळण्याची स्थिती असेल तेव्हातरी ते मिळू द्या. शेतकरी जेव्हा २ रुपये किलोने कांदे किंवा टमाटे विकतो तेव्हा तो दु:खी असला तरी तुमच्याकडे परवडत नाही , जास्त भाव द्या म्हणून कधी भिक मागत नाही. त्याने त्यावेळचा बाजारभाव स्विकारलेला असतो- उत्पादनखर्च सोडाच माल विक्रीसाठी बाजारात आणण्याचा खर्च देखील निघणार नाही हे माहित असून सुद्धा . मग बाजारात धान्य-भाजीपाल्याचे भाव वाढले तर ते स्विकारण्यात का खळखळ होते. गरीब शेतकरी बाजारभाव स्विकारतो आणि पैसेवाला ग्राहक बाजारभाव स्विकारण्यास खळखळ करतो आणि कसेही करून भाव पाडण्यात येतात. भाव पाडण्यासाठी सरकार , अभिजन आणि त्यांच्या वर्चस्वाखालील प्रसारमाध्यमे यांची झालेली दुष्ट युती संपणे हाच शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे पडण्याचा सोपा मार्ग आहे. जर समुपदेशनाची गरज कोणाला असेल तर शेतीमालाचे भाव पाडण्यास कारणीभूत सरकार , अभिजन , प्रसारमाध्यमे आणि व्यापारी यांना आहे. ते रडीचा डाव खेळत असल्यानेच शेतकरी देशोधडीला लागला आहे.
------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------------------------------