धर्मवाद बोकाळला तर धार्मिक संघर्षात अार्थिक प्रगतीचा बळी जाइल आणि जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न विरून जाईल. ओबामांनी हाच इशारा दिला आहे आणि हा इशारा अगदी समयोचित आहे.
------------------------------------------------------
या वर्षी दिल्लीत झालेला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम दोन कारणानी लक्षवेधी ठरला. एकतर नव्या सरकारचा हा पहिला प्रजासत्ताक दिन असल्याने पंतप्रधान विशेष उत्साहात होते. या दिवसाचे उत्सवमूर्ती महामहिम राष्ट्रपती असतात. या वर्षी मोदीजींच्या उत्साहाने तेच उत्सवमूर्ती असल्या सारखे वाटत होते. पंतप्रधान प्रकाशझोतात असणारा हा पहिला प्रजासत्ताक दिन असावा ! या प्रजासत्ताक दिनाचे दुसरे विषेश म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची उपस्थिती. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास कोणत्या तरी राष्ट्रप्रमुखास प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्याची प्रथा असली तरी बलाढ्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रथमच अतिथी म्हणून उपस्थित असल्याने त्याची विशेष चर्चा होती. पंतप्रधान अाणि त्यांच्या सरकार कडून होत असलेली अावभगत अाणि कार्यक्रमात वेळोवेळी ओबामानी दिलेली दाद लक्षात घेता ते मोदी सरकारवर खुश अाहेत असेच वाटत होते. पण जाता जाता ते जे बोलले त्याने तीन दिवस हवेत तरंगणारे सरकार जमीनीवर अापटले.
ओबामा काय बोलले हे समजुन घेण्याआधी हे लक्षात घेतले पाहिजे की भारताला दुसर्यांदा भेट देणारे हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अाहेत. या वरुन ते भारताला अाणि नव्या पंतप्रधानांना किती महत्व देतात हे लक्षात येइल. खुल्या जागतिक अर्थव्यवस्थेत भारत अाणि अमेरिका या देशांना एकमेकांची किती गरज अाहे हे अांधळे समाजवादी वगळता सर्व जाणतात. त्यामुळे ताज्या भारत भेटीत ओबामा जे काही बोलले ते अाकसातून नाही तर भारता बद्दलच्या अास्थेपोटी. ओबामाची २॰१॰ साली झालेली पहिली भारत भेट अाणि अाताची दुसरी भेट या दरम्यान देशात जे परिवर्तन होत अाहे त्यावर बोट ठेवून त्यांनी अापली चिंता प्रकट केली अाहे. ओबामांचे पहिल्या भेटीतील भाषण अाणि अाताच्या भेटीतील भाषण याची तुलना केली तर भारतात होत असलेल्या बदलाचे त्यांचे अाकलन स्पष्ट होइल.
ओबामा अापल्या परदेश दौर्यात त्या त्या देशातील तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतात. मागच्या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या दौर्याचा प्रारंभच मुळी मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयात तरुणांशी संवाद साधून केला होता. यावेळी त्यांनी दिल्लीत शेवटच्या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधला . कदाचित यावेळी त्यांना जे बोलायचे होते ते यजमान सरकारसाठी भुषणावह नसल्याने शेवटी जाता जाता त्यांनी बोलणे पसंत केले असावे.
अापल्या दोन्ही भेटीत सरकारी पातळीवरील औपचारिक बोलणे जवळपास सारखेच होते. भारत अाणि अमेरिकेचे वाढते संबध , वाढती मैत्री दोन्ही देशाच्याच नाही तर जगाच्या हिताची असल्याचे ते तेव्हाही बोलले होते आणि अाताही बोलले. भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यास पात्र, सक्षम अाणि सज्ज असल्याचे तेव्हाही म्हंटले होते अाणि यावेळी देखील तसेच बोलले. करारात देखील डावे उजवे असे काही दाखविता येणार नाही. अणू कराराच्या बाबतीत त्यावेळी संसदेत बोलताना ओबामा यांनी अापल्या भेटीमु्ळे हा करार मार्गी लागल्याचे घोषित केले होते. तेव्हा मार्गी लागलेल्या या कराराच्या मार्गात भारतीय जनता पक्षाने अडथळा अाणल्याने त्याची अंमलबजावणी होवू शकली नव्हती. अाता पंतप्रधान मोदीनी स्वतःच भाजपचा अडथळा बाजुला सारत ओबामांच्या या भेटीत अणूकरार पुन्हा मार्गावर अाणला. सरकारी पातळीवर या दोन भेटीची तुलना करुन निष्कर्ष काढायचा झाल्यास एवढेच म्हणता येईल कि दोन्ही देशातील दृढ संबध अधिक दृढ झालेत ! फरक पडला तो ओबामांच्या गैरसरकारी पातळी वरील बोलण्यात. मागच्या भेटीत त्यांनी भारता बद्दल दुर्दम्य अाशावाद व्यक्त केला होता. झेवियर महाविद्यालयात बोलताना ओबामा यांनी त्यावेळी सर्वाधिक कौतुक भारतात अाढळणार्या सहिस्णूतेचे केले होते. दोन्ही देशात हे समान मुलतत्व असल्याचे म्हंटले होते. भारताच्या अार्थिक प्रगतीचे कौतुक करुन भारताची प्रगती पुढेही वेगाने होत राहील असा अाशावाद प्रकट केला होता. मुंबई नंतर दिल्लीत संसदेत बोलतांना हाच धागा पकडून त्यांनी भारतात एवढी विविधता असूनही प्रगती साधली याबद्दल गौरवोदगार काढले होते. भारतात असलेली विविधतेतील एकता अाणि सहिष्णूता जगासाठी अादर्श असल्याचे मानणार्या ओबामांना या भेटीत त्या अादर्शाला धोका निर्माण झाल्याचे जाणवले अाणि यजमान सरकारला काय वाटेल याची तमा न बाळगता त्या विषयी ते स्पष्ट बोलले. देशांतर्गत मोदी सरकारवर जी टीका होत होती तीच टीका अाणि नवे सरकार सत्तारुढ झाल्या नंतर देशात जे घडत अाहे त्या बद्दल ओबामा यांनी चिंता व्यक्त केली. ओबामांचा स्पष्ट इशारा मोदी विजया नंतर डोके वर काढलेल्या हिंदुत्ववादी शक्क्तीच्या वाढत्या कारवायाकडे होते. हिंदूराष्ट्र बनविण्याच्या घोषणा, घर वापसी सारखे वादग्रस्त कार्यक्रम यामुळे भारताची शक्ती असलेल्या विविधतेवर अाघात करीत असून ते भारताच्या संविधानाच्या विरूध्द असल्याचे त्यांनी निदर्शनास अाणून दिले.
गेल्या भेटीत संसदेतील अापल्या भाषणात ओबामांनी भारताच्या संविधाना बाबत अाणि त्यातील बाबासाहेबांच्या योगदाना बद्दल गौरवोदगार काढले होते. यावेळी त्यांनी भारतीय संविधानातील कलम २५ चा उल्लेख करून संविधानाचे श्रेष्ठत्व विशद केले. या कलमानुसार भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य असल्याची अाठवण ओबामांनी करून दिली. सरकार अाणि हिंदुत्ववादी या दोघांना ही सणसणीत चपराक होती. याचा अर्थ ओबामा चांगला गृहपाठ करुन अाले होते. भारतातील घटनांची त्यांनी इत्यंभुत माहिती करुन घेतली होती. २६ जानेवारीला दिल्लीच्या राजपथवर त्यांनी अापल्या डोळ्यांनी जे पाहिले त्याने त्यांची खात्रीच पटली असेल आणि त्याचमुळे त्यांनी यजमान सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले असेल. राजपथवर राज्यांचे जे देखावे मिरविले गेले त्यात उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता सर्वच्यासर्व हिंदूधर्म अाणि मंदिराशी संबधित होते. भारतातील सांस्कृतिक विविधतेचा लवलेशही यावेळच्या देखाव्यात नव्हता. एक धर्म लादण्याचा प्रयत्न बघुनच ओबामांनी हिंदुत्ववाद्यांना स्वामी विवेकानंदाची अाठवण करुन दिली असावी. विवेकानंदानी अमेरिकेच्या भूमीवर हिंदू धर्माच्या सहिष्णूतेचे गोडवे गायले होते . सर्व धर्मानी धार्मिक सहिष्णूतेचे अनुकरण केले पाहिजे असा उपदेश केला होता. त्या उपदेशाची परतफेड करण्याची संधी हिंदुत्ववाद्यांनी ओबामांना दिली. जगासाठी महात्मा गांधी अादर्श अाणि अनुकरणीय असतांना भारतात मात्र गांधींची सहिष्णूता नाकारली जात असल्याची खंत ओबामांनी बोलून दाखविली. अापल्याच भूमीवर परकीय पाहूण्याने अापल्याला सुनावण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण अापल्यातील काही अाततायी मंडळीनीच त्यांना तशी संधी उपलब्ध करुन दिली हे अमान्य करता येणार नाही.
प्रश्न ओबामाच्या बोलण्याला कितपत महत्व द्यायचे किंवा द्यायचे नाही याचा नाही . चिंतेचा विषय जगभरात बनत चाललेल्या भारतीय प्रतिमेचा अाहे. जगाचे नेतृत्व करण्याची भारताची अाकांक्षा आहे. पंतप्रधान मोदींनी ती बोलूनही दाखविली अाहे. भारताची बदलत चाललेली प्रतिमा , जी ओबामांनी सिरी फोर्ट मधील शेवटच्या भाषणात मांडली, ती जगाचे नेतृत्व करण्यातील सर्वात मोठा अडथळा ठरणार अाहे. धर्मवाद बोकाळला तर धार्मिक संघर्षात अार्थिक प्रगतीचा बळी जाइल आणि जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न विरून जाईल. ओबामांनी हाच इशारा दिला आहे आणि हा इशारा अगदी समयोचित आहे. इंग्लंड किंवा अमेरिकेने जगाचे नेतृत्व केले ते धर्मवादाचे जू झुगारुन दिल्या नंतरच. हा खराखुरा इतिहास विसरुन भ्रामक इतिहासात रमणार्या अाणि वावरणार्या हिंदुत्ववाद्यांचे डोळे ओबामांच्या कानपिचक्याने उघडण्याची शक्यता कमीच अाहे. त्यासाठी कायद्याचा बडगाच उगारावा लागेल. जगाचे नेतृत्व करायचे असेल तर हे सत्कर्म करण्याशिवाय पंतप्रधान मोदी अाणि त्यांच्या सरकार समोर दुसरा पर्याय नाही.
..............................
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल .. ९४२२१६८१५८