Wednesday, March 30, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १

१९४७ साली देशाची फाळणी झाली तेव्हा जम्मुसह सारा देश धार्मिक दंगलीत आणि धार्मिक द्वेषात होरपळत असतांना काश्मीर घाटीत काय सुरु होते हे समजून घेतल्याशिवाय काश्मीरचे वेगळेपण समजणार नाही. १९४७ ते १९९० व त्यानंतरही हे वेगळेपण संपविण्याचा प्रयत्न झाला ज्याचे बळी काश्मिरी पंडीत ठरले.
---------------------------------------------------------------------------------------  

२०१४ नंतर म्हणजे प्रधानमंत्री मोदी सत्तेत आल्यानंतर सत्ता बदला सोबत अनेक प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला नाही तर प्रश्न समजून घेण्याची साधनेही बदलली. सध्या चर्चेत आणि वादात असलेला 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण आहे. जगाच्या इतिहासातील जटील प्रश्नांपैकी एक असलेला काश्मीर प्रश्न सिनेमाच्या पडद्यावरून या देशाच्या पंतप्रधानालाही माहित होण्याचा हा काळ आहे. घटनेतील कलम ३७० रद्द करून - खरे तर कलम ३५ अ रद्द करून - काश्मीर प्रश्न संपविण्याचा दावा करणाऱ्या आमच्या पंतप्रधानांनी काश्मीर प्रश्न अजून आहे तसाच आहे हे दर्शविणारा चित्रपट लोकांनी पाहावा असे आवाहन करणे हे प्रचंड विरोधाभासी आणि पंतप्रधानांचा गोंधळ दाखविणारे आहे. काश्मीर मधील विस्थापित झालेला पंडीत समुदाय आणि इतरही समुदाय विस्थापितांचे जीवन जगत असतील तर काश्मीर प्रश्न मोदी राजवटीतही सुटला नाही हे स्पष्ट आहे. विस्थापित झालेला समुदाय काश्मीर मध्ये होता तेव्हाही काश्मीर प्रश्न होताच. याचा अर्थ या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर नाही. कलम ३५ अ रद्द करून काश्मीरचे वेगळेपण संपविले हा आमचा भ्रम आहे. काश्मीरचे वेगळेपण पंडीत समुदाय आणि मुसलमानांचे सहअस्तित्व हे होते.                                                                                         

 कलम ३५ अ हे १९२७ साली हिंदू महाराजा हरिसिंह यांच्या काळात बनलेल्या ''राज्य उत्तराधिकार कायदा" चे आपल्या घटनेतील प्रतिरूप आहे.  काश्मिरातील हिंदू राजाच्या काळात अस्तित्वात आलेला कायदा देशाच्या नव्या राज्यघटनेत सामावून घेण्याचा प्रयत्न होता. आणि या कायद्याचा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तेथील पंडीतांचे  'काश्मीर काश्मिरींसाठी' चे आंदोलन आणि प्रयत्न केले होते. या कायद्यानुसार काश्मीरचे निवासी ठरविण्याचा अधिकार तिथल्या राज्याला मिळाला. शिवाय काश्मीर निवासी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला जमीनजुमला खरेदी करण्यास या कायद्यानुसार मनाई होती. शेख अब्दुल्ला यांना अटक केल्यानंतर काश्मीरच्या स्थितीत कोणताही फरक केला जाणार नाही हे तेथील जनतेला आश्वस्त करण्यासाठी नेहरूंनी अध्यादेश काढून हे कलम घटनेत सामील केले होते. मोदी सरकारने हा कायदा रद्द केल्या नंतरच्या तीन वर्षात बाहेरच्या ४४ लोकांनी जम्मू-काश्मीर-लडाख मध्ये जमीनजुमला खरेदी केला असल्याचे उत्तर सरकारने सध्या चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात दिले आहे. खरेदी झालेल्या मालमत्ता प्रामुख्याने जम्मूतील असून काश्मीर घाटीत अपवादानेच खरेदी झाली हे सरकारने आपल्या उत्तरात लपविले आहे. काश्मीरचा प्रश्न जमीनजुमल्याचा नसून हाडामासाच्या माणसांचा आहे हे आम्हाला कधी कळले नाही आणि आता कळल्याचे आम्ही सांगतो आहोत ते एका चित्रपटाच्या आधारे ! चित्रपट निर्माते,दिग्दर्शक, पटकथाकार आणि असा चित्रपट काढण्यासाठी पैसा आणि प्रेरणा देणारे पटकथाकार यांच्या दृष्टीने अल्पसंख्य असलेल्या पंडितांचा प्रश्न मांडण्याचे हेतू वेगळे असतील, यात राजकारणही असेल पण काश्मीरचा प्रश्न भौगोलिक सिमारेषांचा नसून माणसांचा आहे याला मान्यता मिळत असेल तर नकळत चित्रपटाने चांगले काम केले आहे.                         

या चित्रपटा संबंधी ज्या वार्ता येत आहेत त्यातून मुस्लिमांविरुद्ध द्वेषाक्त वातावरण तयार होत असल्याचे बोलले जात आहे. पण यात आधीपासूनच द्वेषाच्या गटारगंगेत लोळणारे किती आणि हा चित्रपट पाहून द्वेषाच्या गटारात उडी मारणारे किती याचा अभ्यास केला तर यात नव्या लोकांचे प्रमाण कमीच असल्याचे दिसेल. द्वेषा पेक्षाही पंडितांना ज्या स्थितीतून जावे लागले त्याचे दु:ख या नव्या लोकांना वाटते असे त्यांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येते.  काश्मिरातील जवळपास प्रत्येक समुदायाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात अशी दु:खे आली आहेत हे जेव्हा त्यांना कळेल , लक्षात येईल तेव्हा त्यांना त्यांच्या बद्दलही तितकेच दु:ख वाटेल जितके आज हा चित्रपट पाहून पंडितांबद्दल वाटते. चित्रपट खोटे आणि अर्धसत्य याची सरमिसळ असेल, चित्रण पक्षापातीही असेल पण याने सत्य समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली असेल तर चित्रपटाने मोठे काम केले असेच म्हणावे लागेल. चित्रपट आणि डॉक्युमेंटरी यातील फरक समजून घेतला तर चित्रपटावर चाललेली चर्चा निरर्थक वाटेल. चित्रपट अतिरंजित नसेल तर ती डॉक्युमेंटरी होईल आणि तीला फारसा प्रेक्षक मिळणार नाही. तेव्हा सत्य चित्रपटापेक्षा वेगळे म्हणण्यापेक्षा अधिक खोल असते हे समजायला माणूस फार बुद्धिमान असावा लागत नाही. त्यात खोल दडलेले सत्य समजून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे खऱ्याखुऱ्या फाईल्स तपासणे ! 

१९४७ साली झालेल्या देशाच्या फाळणीची चर्चा बरीच झाली आहे. मुस्लीमबहुल भागातून हिंदुना आणि हिंदूबहुल भागातून मुस्लिमांना पलायन करावे लागले आणि यात सर्वाना कल्पनातीत यातना सहन कराव्या लागल्या हे सर्वाना माहित आहे. पण याच काळात जम्मूतील मुस्लीमबहुल असलेल्या काही भागातून मुस्लिमांनाच पलायन करावे लागण्याची घटना मोठी असूनही स्वातंत्र्योत्तर काळात त्याची फारसी चर्चा झाली किंवा त्यावर खूप काही आपल्याकडे लिहिले गेले नाही. याची चर्चा विदेशी माध्यमात आणि विदेशी लेखकांनी काश्मीर प्रश्नावर लिहिलेल्या पुस्तकापुरती सीमित असल्याने सर्व सामान्यांना याची माहिती नसणे स्वाभाविक आहे. आपल्याला इथे १९४७ साली जम्मूत मुस्लिमांच्या झालेल्या हत्या आणि मुस्लिमांना पाकिस्तानच्या पंजाबात करावे लागलेले पलायन याची तुलना १९९० मध्ये आणि १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येशी आणि काश्मीर घाटीतून जम्मूत कराव्या लागलेल्या पलायनाशी करायची नाही. ज्यांच्या संवेदना मेल्या आहेत तेच अशी तुलना करून माणुसकी शुन्यतेचे प्रदर्शन करतील. १९४७ साली जम्मूत ही परिस्थिती असतांना काश्मीर घाटीत काय परिस्थिती होती हे दाखवून देण्यासाठी जम्मूतील घटनेचा उल्लेख इथे केला आहे.                                       

जम्मूत जेवढ्या मोठ्या संख्येत मुस्लीम होते तेवढ्या मोठ्या संख्येत काश्मीर घाटीत हिंदू नव्हते. जम्मूतील किंवा देशातील इतर ठिकाणी फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीचा कोणताही परिणाम मुस्लीमबहुल असलेल्या काश्मीर घाटीत पाहायला मिळत नाही. त्यावेळी तिथे अल्पसंख्य असलेले काश्मिरी पंडीत, डोग्रा हिंदू , शीख आणि ख्रिस्ती पूर्णपणे सुरक्षित होते. काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने बळकावला होता तिथे मात्र हिंदू आणि शिख मोठ्या प्रमाणात मारले गेले व उरलेल्यांना  घाटी सोडून जम्मूत निर्वासित म्हणून यावे लागले. पण पाकिस्तानच्या ताब्यात नसलेल्या काश्मिरात हिंदू व इतर अल्पसंख्य सुरक्षित होते. केवळ सुरक्षित नव्हते तर ते मुस्लिमांच्या खांद्याला खांदा लावून काश्मीर वाचविण्यासाठी पाकिस्तानी घूसखोरा विरुद्ध लढत होते.  (क्रमश:) 
-------------------------------------------------------------------------------------------                                   सुधाकर जाधव 
पांढरकवडा , जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८                                                                         

Wednesday, March 23, 2022

'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाचे प्रमोशन : मोदीजींचे सेल्फ गोल !

प्रधानमंत्र्याने एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन करावे काय हा वादाचा आणि वेगळा विषय आहे. पण 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे प्रमोशन करून मोदीजीनी अनेक सेल्फ गोल केलेत हा या लेखाचा विषय आहे. आजपर्यंत लपविलेली माहिती या चित्रपटाने बाहेर आणली असे म्हणणे म्हणजे आठ वर्षे सत्तेत राहूनही आम्हाला बाहेर काढता आले नाही ते एका चित्रपटाने काढले म्हणण्यासारखे आहे !
------------------------------------------------------------------------------------------

 
'द कश्मीर फाईल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटावर एवढा वाद आणि चर्चा सुरु आहे की चित्रपटात काय दाखविले आहे हे सिनेमागृहात जावून चित्रपट न बघताही कळू शकेल. 'हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून रचनेचे स्वातंत्र्य घेतले आहे' हे  चित्रपट निर्मात्या तर्फे पडद्यावरच स्पष्ट करण्यात आले आहे. एवढे स्पष्ट केल्यानंतर चित्रपटातील दृश्ये आणि संवाद यावर वाद होणे, चित्रपट ऐतिहासिक की अनैतिहासिक अशी चर्चा निरर्थक ठरते. चित्रपट पाहून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया मात्र आश्चर्यकारक आहेत आणि त्याचेच विश्लेषण करण्यासाठी हा लेखन प्रपंच. १९९० साली काश्मिरी पंडितांना आपले घर , आपले गांव, आपली संपत्ती सोडून रातोरात काश्मीर घाटी सोडून पलायन करावे लागले आणि तेव्हापासून आतापर्यंत विस्थापितांचे जीवन जगण्याची पाळी त्यांच्यावर आली ही घटना तर शंभर टक्के सत्य आहे. केवळ पंडितच नाही तर इतर हिंदू, शीख आणि मुसलमानही बाहेर पडलेल्यांमध्ये होते हे सत्य असले तरी त्यामुळे काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची तीव्रता कमी होत नाही किंवा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट निर्मात्याचा दावा असत्य ठरत नाही. चित्रपटात रचनेचे जे स्वातंत्र्य घेतले आहे त्यातून काही प्रश्न आणि प्रतिक्रिया निर्माण झाल्या आहेत. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून न पाहण्याचा हा परिणाम आहे !                                                                                 
चित्रपटाकडे चित्रपट म्हणून न पाहता इतिहास म्हणून पाहावा असा विशिष्ट वर्गाचा आग्रह आहे आणि स्पष्टच सांगायचे तर केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा आणि त्या पक्षाच्या नेत्यांचा तसा आग्रह आहे. स्वत: प्रधानमंत्री मोदी यांनी इतिहासात काय घडले हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहिला पाहिजे असे सांगून या चित्रपटाचा प्रचार केला आहे. एवढेच नाही तर आजवर आमच्या पासून लपविण्यात आलेल्या घटना या चित्रपटामुळे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. मोदीजीनीच चित्रपटाचे असे प्रमोशन केल्याने चित्रपटावर प्रेक्षकांची उडी पडली नसती तरच नवल. आणि प्रतिक्रियाही मोदीजीच्या सुरात सूर मिळविणाऱ्या उठल्या असतील तर नवल नाही. मोदीजी सारखी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे पण मोदीजींची प्रतिक्रिया अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरते. सर्वसामान्यांची सार्वजनिक घटनांबाबतची  स्मरणशक्ती अल्प असते आणि घटना घडून गेल्यावर काळाच्या ओघात ते विसरूनही जातात. शिवाय घटनेचे सर्व पैलू त्यावेळी जाणून घ्यायची सामान्यांची इच्छा असली तरी त्यांची तेवढी पोच नसते. त्यामुळे चित्रपट पाहून सामान्य माणूस म्हणत असेल की 'अरे हे तर आम्हाला माहितच नव्हते किंवा या गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवण्यात आल्या तर ते बोलणे वावगे ठरत नाही.                                                                                                         

 पंतप्रधानपदी बसलेली व्यक्तीही सर्वसामान्यांसारखे अज्ञान दाखवीत असेल तर ते आश्चर्यकारकच नाही तर गंभीरही ठरते. या चित्रपटाचे प्रमोशन करताना मोदीजी जे काही बोलले त्यावर अनेकजण टीका करत आहेत.टीका करण्या ऐवजी खरे तर त्यांनी मोदीजींचे आभार मानायला पाहिजे होते. काश्मीर प्रश्नावर तोंड बंद करून बसलेल्या विरोधकांना तोंड उघडण्याची संधी मिळाली आहे. त्या दृष्टीने विचार करता कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या वादात उडी घेवून आणि त्या चित्रपटाचा पुरस्कार करून मोदींनी सेल्फ गोल केला असेच म्हणावे लागेल. बोलण्याच्या भरात त्यांनी एकच नाही तर एकापेक्षा अधिक गोल आपल्या टीमवरच म्हणजे आरेसेस, बीजेपी आणि स्वत:च्या सरकारवर केले आहेत. फुटबॉल किंवा हॉकीच्या खेळात असे सेल्फ गोल होत असतात. आता राजकारणातही असे सेल्फ गोल होतात आणि ते करणारे मोदीजी काही पहिले राजकारणी नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर कॉंग्रेसच्या मणीशंकर अय्यरचे देता येईल. लोकसभा निवडणूक प्रचार भरात असतांना अय्यर यांनी मोदींना "चायवाला"म्हणून हिणवले होते आणि या विशेषणाचा कॉंग्रेस विरोधात मोदींनी भरपूर वापर करून घेतला. काहीसा असाच सेल्फ गोल "कश्मीर फाईल्स"बद्दल मोदीजीनी केला आहे. 

मोदींच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांच्या काश्मीर धोरणावर टीका होत होती. पीडीपी सोबत सरकार बनविणे हाही टीकेचा विषय बनला होता. मात्र दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी कलम ३७० रद्द करून आपल्या विरोधकांची बोलतीच बंद केली होती. त्यानंतर काश्मीरवर कोणीच तोंड उघडायला तयार नव्हते. कोणी काश्मीरवर बोलायला लागला किंवा प्रश्न विचारायला लागला की त्याला देशद्रोही ठरवून त्याचे तोंड बंद करणे फारच सोपे झाले होते. कश्मीर मध्ये काय घडतय हे कलम ३७० रद्द झाल्या नंतर फारसे कळत नव्हते तरी कोणाची विचारायची हिम्मत होत नव्हती. सुरक्षा दलांनी इतके आतंकवादी मारले अशा बातम्या येत होत्या म्हणजे आतंकवादी कारवाया सुरूच आहेत असा त्याचा अर्थ होत असला तरी त्या बद्दल मोदी सरकारला जाब विचारण्याची हिम्मत कोणी करत नव्हते. काश्मीरवासियांचा आवाज सरकार ऐकत नव्हतेच पण इतर पक्षांच्या नेत्यांच्या कानावर पडूनही ते न ऐकल्यासारखे करत होते. ही सगळी परिस्थिती एका चित्रपटाने बदलली ! कश्मीर मध्ये काय घडले आणि काय घडतय या चर्चेला मोदीजीनी या चित्रपटाचा पुरस्कार करून तोंड फोडले आहे. मोदींचे विरोधक नाही तर आपल्याच देशात निर्वासित म्हणून जीवन जगत असलेले काश्मिरी पंडितच ३७० कलम रद्द झाल्याने आमच्या स्थितीत काय फरक पडला असा प्रश्न विचारू लागले आहेत. हा मोदीजींचा पहिला सेल्फ गोल आहे. 


चित्रपटात जे दाखविले ते आजवर लपवून ठेवले होते आणि चित्रपटाच्या निमित्ताने ते आता कळत आहे असे मोदीजी आणि त्यांच्या पक्षाचे नेते सांगत सुटले आहेत. यावर दोन प्रश्न उपस्थित होतात. एक कोणी कोणापासून काय लपविले आणि या घटने बद्दल भाजप आणि त्यांच्या नेत्यांचे अज्ञान होते तर १९९० नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पंडितांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून भाजपने मते कशी मागितली. या घटनेचा सर्वाधिक राजकीय फायदा कोणी उठवला असेल तर तो भाजपनेच. मग भाजप आजवर काश्मिरी पंडिताच्या प्रश्नाचे भांडवल करत होता ते चुकीच्या माहितीच्या आधारे करत होता की अंदाजे तीर मारून लोकांच्या भावनांना हात घालत होता असा प्रश्न पडतो. काश्मीरमध्ये असे काय घडले की जे आधी संघ भाजपला व त्यांच्या नेत्यांना माहित नव्हते आणि हा चित्रपट बघूनच कळले हे त्या नेत्यांनी स्पष्ट केले पाहिजे. यापेक्षाही मोठा आणि महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे गेली आठ वर्षे देशाची आणि काश्मीरची सत्ता हाती असताना काश्मीरचे 'सत्य' भाजप आणि त्याच्या सरकारला समोर आणता आले नाही. ही गोष्ट या सरकारची अक्षमता , निष्क्रियता आणि उदासीनता दर्शविते. सरकारने लोकसभेत काश्मीरचे सत्य मांडण्या ऐवजी चित्रपटातून सत्य कळले असे म्हणणे हे दिवाळखोरी जाहीर करण्यासारखे आहे आणि तशी ती करून मोदीजीनी दुसरा सेल्फ गोल केला आहे ! मोदीजींचा तिसरा सेल्फ गोल तर भाजपला बेनकाब करणारा ठरला. संघ-भाजपच्या प्रचाराने आणि कॉंग्रेसच्या मुख दुर्बलतेने व कोणी काहीही बोलू द्या त्याने आम्हाला फरक पडत नाही या कॉंग्रेसच्या गुर्मीने पंडितांच्या पलायनाचे पातक कॉंग्रेसच्या माथी असल्याचे जनता समजून चालली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने झडत असलेल्या चर्चेत  पंडितांच्या निर्वासनात भाजपचा हात  पहिल्यांदाच ठळकपणे समोर आला आहे. मोदीजीनी संधी दिलीच आहे तर आपणही काश्मीर आणि पंडितांच्या प्रश्नाचा शोध आणि वेध क्रमश: घेवू. 
-------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८   


Thursday, March 17, 2022

विरोधकांच्या मनोधैर्यावर भाजपा विजयाचा बुलडोझर !

उत्तरप्रदेश वगळता अन्य चार राज्याच्या निवडणूक निकालावर परिणाम करणारा मुख्य कोणता घटक असेल तर तो घटक म्हणजे कॉंग्रेसचा नाकर्तेपणा ! कॉंग्रेसचा नाकर्तेपणा हेच या राज्यांमध्ये बीजेपी आणि आप पक्षाच्या विजयाचे कारण राहिले आहे. 
----------------------------------------------------------------------------


पाच राज्याचे निवडणूक निकाल भारतीय जनता पक्षाला कितपत अपेक्षित होते हे सांगता येणे कठीण असले तरी हे निकाल विरोधीपाक्षांसाठी संपूर्णत: अनपेक्षित असे होते. जेव्हा एखाद्या विजयावर तो का झाला यावर खल करावा लागतो , त्याच्या मागची कारणे शोधावी लागतात याचा अर्थच विजय संभ्रमात टाकणारा आहे.  कारण निवडणुकीपूर्वी भाजपसाठी परिस्थिती फारसी अनुकूल आहे असे दिसत नव्हते. उत्तर प्रदेशात काट्याची टक्कर होईल आणि पंजाब,गोवा व उत्तराखंड ही राज्ये बिजेपीसाठी प्रतिकूल ठरतील असा आधी अंदाज व्यक्त केला जात होता. यात फक्त पंजाबने बीजेपी विरोधात कौल दिला. हा कौल बीजेपी विरोधात आहे असे म्हणण्या पेक्षा कॉंग्रेस विरोधी आहे असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. कारण पंजाबमध्ये बीजेपीचे स्थान नगण्य आहे. अकाली दलाच्या मदतीने तिथे बीजेपीला थोड्याफार जागा मिळायच्या. त्यामुळे पंजाब बीजेपीकडे जाणार नव्हताच. तिथे कॉंग्रेस की आप एवढाच प्रश्न होता. तिथे आप ने अभूतपूर्व विजय मिळविला.  या पाच राज्यांपैकी गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड ही छोटी राज्ये आहेत.आणि पंजाब सुद्धा फार मोठे राज्य आहे असे म्हणता येत नाही. लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती म्हणून या निवडणुकीकडे भाजप नेतृत्व पाहत आले आहे. त्यामुळे ही राज्ये छोटी असली आणि लोकसभेच्या जागा या राज्यात कमी असल्या तरी छोट्या राज्यातील विजय बिजेपीसाठी मोठी वातावरण निर्मिती करणारा ठरला आहे.                                                                                                     


उत्तर प्रदेशाची निवडणूक बिजेपीसाठी प्रतिष्ठेची व लोकसभा निवडणूक निकालावर प्रभाव पडेल अशी होती. तिथेही अपेक्षेप्रमाणे काट्याची टक्कर पाहायला मिळाली नाही पण निवडणूक एकतर्फीही झाली नाही. जागांच्या बाबतीत बिजेपिची पीछेहाटच झाली.तरीही हा विजय बिजेपीसाठी समाधानकारक ठरला. जागा कमी होवूनही विजयाचे समाधान मिळत असेल तर याचा अर्थ अशा विजयाबद्दल बीजेपीला मनातून विश्वास वाटत नव्हता असा होतो. पण बीजेपीच्या जागा कमी होवूनही विरोधी पक्षांना त्याचा आनंद झाला नाही याचा अर्थच उत्तर प्रदेशाची सत्ता बीजेपीच्या हाती गेल्याने विरोधकांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. योगीच्या  बुलडोझरखाली विरोधी पक्षांचे मनोधैर्य चिरडले गेले आहे. मनोधैर्य खच्ची झाले असे म्हणतो तेव्हा हा या निवडणुक निकालाचा मानसिक परिणाम आहे हे इथे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती तेवढी वाईट असेलच असे नाही. खोलात जावून निवडणूक निकालाचे विश्लेषण केले तर बीजेपी प्रदर्शित करते तेवढा मोठा हा विजय नाही हे लक्षात येईल. पण विरोधकांच्या मनोधैर्यावर परिणाम करण्या इतपत मोठा असल्याने बीजेपीचे नेतृत्व या विजयाचा उपयोग विरोधकांना मानसिकदृष्ट्या अधिक खच्ची करण्यासाठी करत आहे. या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीची झलक दिसते हे प्रधानमंत्री मोदींचे प्रतिपादन त्याच साठी आहे. प्रचारासाठी असे बोलणे ठीक आहे पण प्रत्यक्षात या निवडणूक निकालाचा अर्थ आणि परिणाम काय असू शकतात याच्या वेगळ्या विश्लेषणाची गरज आहे. 



या निवडणूक निकालाचा पहिला अर्थ असा आहे की जेथे मुख्य विरोधक कॉंग्रेस आहे तेथे प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळविणे बीजेपीसाठी कठीण जात नाही. मागच्या निवडणुकीत गोवा आणि मणिपूर राज्याने कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला होता. असा कौल मिळूनही या दोन्ही राज्यात कॉंग्रेसला सरकार स्थापन करता आले नव्हते. या मागे केंद्रात असलेल्या सत्तेचा दुरुपयोग हे जेवढे कारण आहे तेवढीच कॉंग्रेस पक्षाची सुस्ती याला कारणीभूत होती. निवडणुकीचा कौल अनुकूल येवूनही सत्ता स्थापन करण्यात कॉंग्रेस अपयशी ठरत असेल आणि भाजपने आपली सत्ता स्थापन करण्यात केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग केला त्याविरुद्धही कॉंग्रेसजनात आक्रोश नसेल किंवा तसा आक्रोश प्रकट करण्याची तयारी नसेल तर अशा पक्षाला पुन्हा का निवडून द्यायचे हा तिथल्या मतदारांपुढे प्रश्न पडला असेल तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. उत्तरप्रदेश वगळता अन्य चार राज्याच्या निवडणूक निकालावर परिणाम करणारा मुख्य कोणता घटक असेल तर तो घटक म्हणजे कॉंग्रेसचा नाकर्तेपणा ! कॉंग्रेसचा नाकर्तेपणा हेच या राज्यांमध्ये बीजेपी आणि आप पक्षाच्या विजयाचे कारण राहिले आहे. उत्तर प्रदेशची स्थिती वेगळी आहे. तिथे बीजेपी विरोधात लढणारा मुख्य पक्ष कॉंग्रेस नव्हता. तिथे बीजेपीला संघर्ष करून यश मिळवावे लागते. मात्र हे यश बीजेपीच्या,योगीच्या आणि मोदीजीच्या निव्वळ कर्तृत्वावर व उपलब्धींवर मिळाले असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. नेतृत्वाच्या उपलब्धी व कर्तृत्वापेक्षा साधनसंपन्न पक्षाच्या सूक्ष्म आणि कुशल  नियोजनाचा हा विजय आहे हे लक्षात घेतले तर येणारी लोकसभा निवडणूक अशीच होईल हे समजण्याचे कारण नाही.                 


मोदींच्या लोकप्रियतेवर विरोधकांना मात करता आली नाही व नजीकच्या भविष्यात मात करता येईल की नाही याबाबत साशंकता असली तरी भाजपच्या सूक्ष्म आणि कुशल नियोजनावर मात करणे अशक्य कोटीतील गोष्ट नाही. ज्या उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालाने विरोधकांना नैराश्यात लोटले तेच निकाल विरोधकांना भाजपवर मात करणे शक्य असल्याचा संदेश देत आहेत. हा संदेश समजून घेण्यासाठी निकालाशी संबंधित सर्व आकडेवारीचे विश्लेषण करावे लागेल. पण तसे विश्लेषण करण्याआधीही निवडणूक इतिहासाकडे पाहून सांगता येते की पुढच्या निवडणूक विजयासाठी मागचा निवडणूक विजय फारसा उपयोगी पडत नसतो. कारण परिस्थिती बदलत असते आणि बदलत्या परिस्थितीचा परिणाम निवडणूक निकालावर होत असतो. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षफुटी नंतरही इंदिरा गांधीनी दणदणीत विजय मिळविला. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळवून इंदिराजी लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान होत्या. पण दोन वर्षात परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आणि नंतरच्या निवडणुकीत इंदिराजींचे पानिपत झाले. नेहरू व इंदिराजीपेक्षा जास्त जागा मिळवून राजीव गांधीनी इतिहास रचला पण पुढच्याच निवडणुकीत पक्ष पराभूत झाला. २००४ पेक्षा २००९ साली मोठा विजय मिळवून मनमोहनसिंग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बनले. पण एक वर्षातच त्यांच्या विरोधात वातावरण बनायला सुरुवात झाली आणि पुढच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला. तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही फक्त बदलत्या परिस्थितीचा उपयोग सत्ताबदल करण्यासाठी करता आला पाहिजे. पराभवाचे दु:ख विसरून उत्तर प्रदेश निवडणूक निकालाचे बारकाईने अवलोकन केले तर विरोधीपक्षांना आशेचा किरण नक्की दिसेल.
-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, March 10, 2022

चुका करून बोनस मिळविण्याचे मोदीजींचे अफलातून कौशल्य !

 कोणत्याही कामासाठी विदेशात गेलेल्या भारतीय नागरिकाची काळजी घेणे हे भारत सरकारचे कर्तव्यच असते आणि वेळोवेळी हे कर्तव्य प्रत्येक सरकारने पार पाडले आहे. पण या बाबतीत कोणत्याही सरकारने मोदी सरकार सारखी आपली पाठ कधी थोपटून घेतली नाही. पाठ थोपटून घेण्याचे तंत्र मोदीजीनी चांगल्या प्रकारे आत्मसात केले आहे. विधानसभा निवडणुकीतील भाजपचा मोठा विजय हा त्यांच्या अफलातून व्यवस्थापनाचा पुरावाच आहे.
--------------------------------------------------------------------------

७-८ वर्षाच्या काळात मोठमोठ्या चुका करूनही त्याची मोदी सरकारने कधी कबुली दिली नाही. या चुकांची त्यांना कधी शिक्षाही मिळाली नाही. उलट चुकांवर पांघरून घालण्याचे तंत्र आणि व्यवस्थापन मोदी सरकारने संघाच्या मदतीने एवढे विकसित केले आहे की चुकीचा फटका त्यांना आजवर बसला नाही. उलट चुकांपासून फायदा उचलण्याच्या तंत्रात मोदी सरकारने सिद्धी प्राप्त केल्याचे अनुभवास येते. सरकारच्या चुकांचा जनतेला कितीही त्रास झाला तरी त्याची अंतिम परिणती सरकारसाठी कधीच तोट्याची राहिली नाही. त्यामुळे आपले निर्णय अचूक असावेत , त्याचा लोकांना त्रास होवू नये याची फिकीर करण्याची गरज मोदी सरकारला वाटत नाही. त्यामुळे सरकारची एका चुकीकडून दुसऱ्या चुकीकडे वाटचाल सुरु असते आणि त्याच्या बदल्यात सरकार बोनस गुण कमावते. याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. मोदी सत्तेत आल्यानंतर पठाणकोटच्या वायुदल तळावर आतंकी हल्ला झाला. तिथपर्यंत आतंकवादी पोहचू शकतात हे विविध सरकारी यंत्रणाचे सरळ अपयश होते. सत्तेत नसताना अशा अपयशाबाबत मोदींनी मनमोहन सरकारवर अनेकदा टीकाही केली. मनमोहन काळात आतंकी हल्ले झाले की त्याला फक्त ते सरकार जबाबदार असायचे. मोदी काळातील आतंकी हल्ल्यात मोदी सरकारचा काहीच दोष नसतो ! पठाणकोटची चूक दुरुस्त करून अधिक सजगता बाळगली असती तर पुढे पुलवामा घडले नसते आणि आमच्या जवानांचे प्राण वाचले असते. जेव्हा तुम्हाला तुमच्या चुकी बद्दल फटकार न मिळता बोनस मिळतो तेव्हा चूक मान्य करण्याची आणि दुरुस्त करण्याची गरजच नसते. 

दुसरे उदाहरण घ्या. कोविडचा प्रकोप सुरु झाल्या नंतर अचानक मोदीजीनी लॉकडाऊन जाहीर केला. रेल्वे व इतर प्रवासी सेवा बंद केल्या. परिणामी लाखो लोकांना प्रचंड यातनांना सामोरे जावे लागले. लोकांचे रस्त्यावर हाल हाल सुरु असतांना सरकारने थेट सुप्रीम कोर्टात सांगितले की रस्त्यावर कोणीच नाही. सर्व लोक ठिकठिकाणी आराम करताहेत ! आणि सुप्रीम कोर्टाने देखील आंधळेपणाने सरकारचे म्हणणे प्रमाण मानले. सरकारचे डोके ठीकाण्यावर आणण्यासाठी कोर्ट आणि प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्वाची असते. पण त्यांनी आपली भूमिका बजावणे सोडून दिल्याने सरकारच्या घोडचुका झाकल्या गेल्या. त्याचा परिणाम पुढे आणखी भीषण स्वरुपात लोकांना ऑक्सिजनच्या कमीच्या रुपात भोगावा लागला. लोक तडफडून मेले. देशातील सगळी स्मशाने २४ तास पेटती राहिली आणि तरीही लोकांवर गंगेत प्रेत सोडून देण्याची वेळ आली. नंतर लसीमुळे कोविडचा प्रकोप कमी झाला आणि लोक सरकारमुळे जे भोगावे लागले ते विसरले आणि आपल्यामुळे कोविड नियंत्रणात आला असे ढोल बडवायला सरकार मोकळे झाले. पण वेळीच परिस्थिती समजून घेवून निर्णय झाले असते तर लोकांचे हाल हाल झाले नसते आणि अनेकांचे प्राण वाचले असते. कोविड मध्ये झालेल्या चुकावर पांघरून घातल्यावर सरकार दुसऱ्या चुका करायला मोकळे झाले. रशिया -युक्रेन युद्धात वेळीच हालचाल करून तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना परत आणले नाही. परिणामी भारतीय विद्यार्थ्यांना व नागरिकांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. 

सरकारने माती खाल्ली हे लक्षात आले की सरकार समर्थक यंत्रणा सरकारचे कसे बरोबर आहे आणि ज्यांच्या बाबतीत माती खाल्ली तेच कसे चुकलेत हे सांगण्याची स्पर्धा सुरु होते. युक्रेन युद्धात फसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हेच घडले. ते स्वत:हून विमानाने गेलेत तसे त्यांना परत येता येत नव्हते का असा पहिला प्रश्न विचारल्या गेला !विमानाने गेलेले श्रीमंत असतात हे गृहित धरल्या गेले. देशातील अनेक लोक परदेशात जावून मजुरी करतात ते देखील विमानाने जातात हे सोयीस्करपणे विसरले गेले. मोदींनी यांना जायला सांगितले होते का. मग मोदींनी परत आणावे अशी अपेक्षा ते कसे करू शकतात असेही बोलले गेले. युद्ध सुरु होणार हे त्यांना काळात नव्हते का मग तेव्हाच का नाही परत आलेत असे म्हणून विद्यार्थ्यांना दोषी धरल्या गेले. करदात्यांचा पैसा या लोकांवर कशासाठी खर्च करायचा असेही विचारले गेले. म्हणजे सरकारने वेळीच त्यांना परत आणण्यासाठी हालचाल केली नाही यात सरकारचा काहीच दोष नसून विद्यार्थी त्यांच्या कर्मामुळे तिथे अडकले असे पटविण्याचा पहिला अध्याय पार पडला. त्यानंतर सरकारने 'ऑपरेशन गंगा' तहत विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा हीच सगळी पलटण सरकार किती सक्षमपणे काम करीत आहे आणि विपरीत परिस्थितीत विद्यार्थ्यांना बाहेर काढीत आहेत हे अथकपणे सांगू लागली. यात सरकारने उशिरा प्रयत्न सुरु केल्याने विद्यार्थ्यांचे झालेले हाल विसरले गेले आणि वरून मोदी आहे म्हणून हे शक्य झाले असे ढोल वाजू लागलेत. 

कोणत्याही कामासाठी विदेशात गेलेल्या भारतीय नागरिकाची काळजी घेणे हे भारत सरकारचे कर्तव्यच असते आणि वेळोवेळी हे कर्तव्य प्रत्येक सरकारने पार पाडले आहे. पण या बाबतीत कोणत्याही सरकारने बटबटीतपणे आपली पाठ कधी थोपटून घेतली नाही. परदेशात अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी मदत करता यावी म्हणून मनमोहन सरकारने एक फंड तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या फंडात परदेशी जाणारे लोकच योगदान करीत असतात. पासपोर्टसाठी अर्ज करता तेव्हा तुमच्याकडून या फंडासाठी पैसा वसूल केला जातो. तुम्ही विमानाचे तिकीट काढता तेव्हाही या फंडात योगदान घेतले जाते. देशोदेशीच्या भारतीय वकिलातीकडे तुम्हाला कशासाठी अर्ज करावा लागला तर तुमच्याकडून या फंडासाठी योगदान घेतले जाते. हा सगळा निधी परदेशात  अडचणीत किंवा संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी आहे. मोदी सरकार या निधीसाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकाकडून २०१७ पासून अधिक वसुली करत आहे. या निधीत हजारो कोटी जमा असतांना करदात्याच्या पैशातून या लोकांना का आणायचे हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. हा निधी तर २०१० पासून सुरु झाला. पण असा कोणताही निधी हाती नसताना आधीच्या सरकारांनी कोणताही गवगवा न करता संकट प्रसंगी , युद्धप्रसंगी भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणले आहे. ते सरकारचे कर्तव्यच असल्याने त्याची आजच्या सारखी चर्चा झाली नाही. संकटात सापडलेल्या नागरिकांना भारत सरकारने यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येत परत आणले आहे की त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून गिनीज बुक मध्ये झाली आहे. भारताने १५ दिवसात कुवैत युद्धात अडकलेल्या १ लाख ७० हजार नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणले होते. त्यावेळी सरकारने स्वखर्चाने त्यांना का आणले असा असंवेदनशील प्रश्न कोणी विचारला नव्हता. पण मोदी सरकारची गोष्टच वेगळी आहे. आधी परत आणण्यात उशीर करण्याची चूक केली आणि आता युद्ध परिस्थितीतून नागरिकांना परत आणण्याचे काम मोदींमुळे शक्य झाल्याचे बिम्बविण्याचा प्रयत्न सुरु आहे. चूक करा आणि बोनस मिळवा असा हा प्रकार आहे ! नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या अफलातून व्यवस्थापनाचा पुरावाच आहे. 
-----------------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 

Thursday, March 3, 2022

शांततादूत बनण्याची चालून आलेली संधी भारताने गमावली !

 जागतिक महायुद्धात परिवर्तीत होवू शकणाऱ्या युद्धाला थोपविण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी उत्तर प्रदेश निवडणूक जिंकणे सरकारात असलेल्या नेत्यांना जास्त महत्वाचे वाटते. जगाचे नेतृत्व करण्याची चालून आलेली संधी एक प्रांत जिंकण्यासाठी वाया घालविणाऱ्या नेतृत्वाची आंतरराष्ट्रीय समज काय यावरच प्रश्नचिन्ह उभे राहतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

रशिया - युक्रेन युद्ध कोणते वळण घेईल हे कोणाला सांगता येईल अशी परिस्थिती नाही. मात्र युद्ध होणार असल्याच्या चर्चा आणि वार्ता एक महिन्यापासून सुरु होत्या. अशा प्रसंगात सोविएत युनियनच्या विघटनानंतर अमेरिका महत्वाची भूमिका निभावत आली आहे. पण रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका सुद्धा एक पार्टी आहे जरी ती प्रत्यक्ष युद्धात पडली नसली तरी. म्हणजे जगातील दोन महासत्ता प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे युद्धात गुंतलेल्या आहेत. जगातली आणखी एक महासत्ता चीन आहे. या युद्धात चीनने भारतासारखीच तटस्थतेची भूमिका घेतली असली तरी चीन रशियाचा जवळचा मित्र मानला जातो आणि अमेरिका व युरोपीय देशांबरोबरचे  संबंध आधीपासूनच तणावपूर्ण आहे. अमेरिका जशी या युद्धाशी संबंधित घटक आहे तसेच युरोपीय देशही आहेत. युद्धाची कारणे लक्षात घेतली तर युद्ध टाळण्यासाठी भारत महत्वाची भूमिका निभावू शकला असता हे लक्षात येईल.

१९९० च्या दशकात सोवियत युनियनचे विघटन झाले. या युनियनचा भाग असलेले जे देश स्वतंत्र झाले त्यातील एक युक्रेन देखील आहे. विघटनातून सावरून रशिया स्थिर झाल्यानंतर त्याला पुन्हा वेगळे झालेले देश पुन्हा जोडून पूर्वीचे जागतिक स्थान प्राप्त करण्याची इच्छा आणि महत्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे. पण आजच्या युद्धामागे हे कारण तसे सुप्त आहे. आपल्यापासून वेगळा झालेला शेजारचा देश युरोपीय महासंघात आणि अमेरिका-युरोपच्या 'नाटो' नामक बलाढ्य लष्करी संघटनेत सामील होण्याची चर्चा सुरु असल्याने रशिया अस्वस्थ झाला होता. तसा काही निर्णय होण्या आधी कारवाई करणे रशियाला गरजेचे वाटले. कारण युक्रेन 'नाटो' चा सदस्य बनला असता तर अमेरिका रशियाच्या दारात येवून उभा राहिला असता. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांना रशियाची घेराबंदी करणे सोपे गेले असते. या अर्थाने स्वत:च्या सुरक्षेसाठी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले असे म्हणता येईल. अमेरिका आणि युरोप यांनी रशियाला आक्रमण करण्यासाठी उद्युक्त केले असेही म्हणता येईल. 

तरीही रशियाचे युक्रेन वरील आक्रमण समर्थनीय ठरत नाही. हे आक्रमण आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. रशियाला जशी स्वत:च्या सुरक्षेची काळजी आहे तशीच युक्रेनला देखील आपल्या सुरक्षेची काळजी आहे आणि ती काळजी दूर करण्यासाठी निर्णय घेण्याचे त्याला अधिकार आहे. युक्रेनला धोका रशियापासून वाटत होता. युक्रेनमधील रशियन भाषिक बहुल प्रांतातील बंडखोरांना रशिया मदत देत आला आहे. तेव्हा रशियाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी युक्रेन अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांच्या जवळ जात असेल तर त्याला चुकीचे ठरवता येणार नाही. त्याचा तो अधिकार आहे. रशियाला अमेरिका-युरोप पासून धोका असेल तर तो दूर करण्यासाठी युक्रेनला चिरडणे हा मार्ग होवू शकत नाही. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चर्चा आणि संवाद घडवून आणणे हाच उपाय होता. 

जगातले सर्वाधिक प्रभावी देश एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आणि यांच्या पासून काहीसा वेगळा असलेला जागतिक शक्ती म्हणून ओळखला जात असलेला चीन यांच्यात मध्यस्थी करण्याच्या स्थितीत नसलेला किंवा त्याची मध्यस्थी अमेरिका-युरोपला चालण्याची सुतराम शक्यता नसल्याने ही भूमिका निभावण्याची संधी भारताकडे चालून आली होती. भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोणत्याही दूरदर्शी नेत्याने या संधीचे सोने केले असते. भारताने या युद्धात तटस्थतेची भूमिका घेतली ती गैर किंवा चुकीची नाही. पण युद्ध होवूच नये यासाठी करता येतील तेवढे प्रयत्न केल्यानंतर युद्ध झाले असते तर भारताच्या तटस्थतेच्या भूमिकेला दोन्ही बाजूच्या देशांचा आदर मिळाला असता. त्या आदराला तर आपण मुकलोच शिवाय दोन्ही बाजूंची काहीसी नाराजी ओढवून घेतली आहे जिचे परिणाम आपल्याला पुढे भोगावे लागू शकतात. 

जगात भारताला मान आहे. आमच्या नेत्याच्या शब्दाला किंमत आहे हे मागच्या ५-७ वर्षापासून सतत कानावर आदळणाऱ्या गोष्टी कसोटीला घासून घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली होती. पण आपले नेते कसोटीला सामोरे गेलेच नाहीत. खरे तर भारताला मध्यस्थ म्हणून कार्य करून दाखविण्याची आणि जगावर छाप सोडण्याची संधी चालून आली त्याला अनेक कारणे होती. भारताचे रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशाशी सारखेच चांगले संबंध असणे हे महत्वाचे कारण आहे. पूर्वी आपण फक्त रशियाच्या जवळ होतो. नरसिंहराव पंतप्रधान झाल्या नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने रशिया सोबत अमेरिकेशी जवळीक वाढविली. भारत जसा आर्थिक सत्ता बनत गेला तसा अमेरिकेचाही नैसर्गिक मित्र बनला. संरक्षण साहित्यासाठी आपण रशियावर अवलंबून असल्याने रशियाला दूर लोटणे शक्यच नव्हते. त्यामुळे उजव्या विचाराचे अमेरिका धार्जिणे सरकार येवूनही रशियाशी मैत्री टिकली. या दोन मित्रांमध्ये संवादाचे व्यासपीठ बनण्याचे काम भारताला सहज करता आले असते पण आंतरराष्ट्रीय राजकारणातील समज आणि निष्क्रियता आम्हाला भोवली आहे. 

युद्ध सुरु होण्याच्या बेतात असतांना आमचे नेतृत्व युद्ध थांबविण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी विधानसभा निवडणूक प्रचारात व्यस्त होते. जागतिक महायुद्धात परिवर्तीत होवू शकणाऱ्या युद्धाला थोपविण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी उत्तर प्रदेश निवडणूक जिंकणे सरकारात असलेल्या नेत्यांना जास्त महत्वाचे वाटत होते. जगाचे नेतृत्व करण्याची चालून आलेली संधी एक प्रांत जिंकण्यासाठी वाया घालविणाऱ्या नेतृत्वाची आंतरराष्ट्रीय समज काय यावरच प्रश्नचिन्ह उभे राहतात. पुतीनने फोन केला, युक्रेनच्या झेलेन्स्कीने फोन केला याचीच आमच्या नेत्यांना आणि त्यांच्या शिष्यांना नवलाई ! असे संघर्ष उभे राहिल्यावर देशोदेशीच्या नेत्यांशी संपर्क करणे हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना मध्यस्थी करायला सांगितले याचा प्रसारमाध्यमांनी आणि मोदी समर्थकांनी केवढा गवगवा केला ! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेक राष्ट्राध्याक्षाना फोन केलेत त्यापैकी आपले प्रधानमंत्री एक आहेत ! पण कशाचाही गवगवा करून आपली प्रतिमा मोठे करणे या उद्योगाची भारतात सध्या चलती आहे ! जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचविण्यासाठीची ऐतिहासिक भूमिका पार पाडणे तर दूरच राहिले आमच्या देशातील जे हजारो विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले त्यांना युद्ध सुरु होण्याच्या आधी भारतात आणण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे.  

-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८