Thursday, March 26, 2020

भाजप प्रचाराच्या सापळ्यात अडकलेली कॉंग्रेस !


भाजपच्या प्रचारयंत्रणेला खरोखर तोड नाही. ही प्रचार यंत्रणा एवढी अद्भुत आहे कि कॉंग्रेसचा देखील त्यावर विश्वास बसतो ! कॉंग्रेसच्या पतनाचे मूळ घराणेशाही आहे हे काही प्रमाणात राहुल गांधीच्या गळी उतरविण्यात भाजपची प्रचारयंत्रणा यशस्वी झाली आहे ! निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेवून राजीनामा देतांना गांधी घराण्यातील इतर कोणीही कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही हे त्यांचे सांगणे ते स्वत:च भाजपच्या प्रचाराला बळी पडल्याचे दर्शविते.
----------------------------------------------------------------

मध्यप्रदेशात कॉंग्रेसच्या सरकारला राजीनामा द्यावा लागला या घटनेसाठी कॉंग्रेस नेतृत्वाचे कट्टर भक्त सोडले तर कॉंग्रेसचे नेतृत्वच प्रामुख्याने जबाबदार आहे यावर सर्वांचे एकमत आहे. स्वत:च्या डोक्याने विचार करू शकणारा काँग्रेसी कार्यकर्ता सरकार घालविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया किंवा भाजप पेक्षा आपल्या नेतृत्वाला अधिक जबाबदार मानतो. ज्योतिरादित्य सिंधिया यांची नाराजी दूर केली नाही तर काय होवू शकते याचा अंदाजच कॉंग्रेस नेतृत्वाला आला नाही आणि अंदाज असेल तर सिंधीयाची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात कमलनाथ-दिग्विजयसिंग जोडगोळी नाराज होण्याची भीती कॉंग्रेस नेतृत्वाला असली पाहिजे. या परिस्थितीत कॉंग्रेस नेतृत्व सापडण्याचे कारण त्यांचा खालपर्यंत कॉंग्रेस संघटना व कार्यकर्ता यांच्याशी तुटलेला संपर्क आणि संबंध. मुळात असा संपर्क आणि संबंध इंदिरा गांधी नंतरच्या कॉंग्रेस नेतृत्वाने ठेवण्याचा प्रयत्नच केला नाही. मध्यप्रदेशात जे घडले त्याला नेतृत्वाची निष्क्रियता आणि मरगळ हे कारण असले तरी ही निष्क्रियता आजची नाही. हे लक्षात आणून देण्यासाठीच मागच्या लेखात अनेक वर्षापासूनच्या कॉंग्रेस नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचा आलेख मांडला.केंद्रातील सत्ता हाती असताना नेतृत्वाची निष्क्रियता कधी डोळ्यात भरली नाही. सत्तेचे कवच दूर होताच नेतृत्व उघडे पडले. हा फरक सोडला तर कॉंग्रेस नेतृत्व काल होते तसेच आज आहे. या नेतृत्वाने सलग १० वर्षे कॉंग्रेसला सत्ता मिळवून दिली आणि याच नेतृत्वामुळे दोन सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला. राजकारणामध्ये कोणता नेता थोर मानला जातो जो निवडणूक जिंकून देईल. आज कॉंग्रेसला गरज आहे ते अशा नेतृत्वाची. कॉंग्रेसमध्ये आज जी कोणती नेतेमंडळी आहेत त्यांच्यात मत मिळवून देण्याची क्षमता फक्त गांधी घराण्यात आहे. हे घराणे आज ती क्षमता हरवून बसल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. पण कॉंग्रेस कार्यकर्त्यांना हेही माहित आहे कि परत पुन्हा सत्ता गांधी घराण्यातील व्यक्तीच मिळवून देवू शकते. कॉंग्रेसमधून नेतृत्व बदलाची मागणी न होण्याचे हे कारण आहे.                                                      


ज्यांचा कॉंग्रेस पक्ष किंवा संघटनेशी संबंध नाही त्या कॉंग्रेसच्या चाहत्यांना आणि विरोधकानाही कॉंग्रेस समस्येचे मूळ घराणेशाहीत आहे असे वाटते. हा परिणाम कशाचा असेल तर भाजपच्या पद्धतशीर प्रचाराचा आहे. भाजपची घराणेशाही बद्दलची टीका जुनीच आहे. कॉंग्रेसची सत्तेची कवचकुंडले गांधी घराणे आहे हे ओळखून भाजपने फार आधीपासून ही कवचकुंडले भेदण्याचा प्रयत्न सुरु केला होता. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्याला यशही मिळाले. तरीही भाजपच्या मनातील कॉंग्रेसच्या नेतृत्वस्थानी  असलेल्या गांधी परिवाराची भीती जात नाही. कॉंग्रेस एवढी गलितगात्र झाली आहे की तिच्यात लढायचे सोडा उभे राहायचे देखील त्राण नाही पण गेल्या सहा वर्षातील प्रत्येक निवडणूक सभेत नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर गांधी-नेहरू परिवार राहिला आहे. आजही कॉंग्रेसच्या  घराणेशाही बद्दल देशात जे काही बोलले जाते त्यामागे प्रभावी यंत्रणा भाजपचीच आहे. भाजपच्या प्रचारयंत्रणेला खरोखर तोड नाही. ही प्रचार यंत्रणा एवढी अद्भुत आहे कि कॉंग्रेसचा देखील त्यावर विश्वास बसतो ! कॉंग्रेसच्या पतनाचे मूळ घराणेशाही आहे हे काही प्रमाणात राहुल गांधीच्या गळी उतरविण्यात भाजपची प्रचारयंत्रणा यशस्वी झाली आहे. राहुल गांधीनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणे आणि त्यावर ठाम राहणे हा राहुल गांधीनी घेतलेला विचारांती निर्णय नसून भाजपच्या प्रचाराअंती म्हणजे प्रचाराच्या परिणामी घेतलेला निर्णय आहे ! निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेवून राजीनामा देणे समजण्यासारखे आहे. पण मग असा राजीनामा देतांना गांधी घराण्यातील इतर कोणीही कॉंग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी घेणार नाही असे बोलण्याची काहीच गरज नव्हती. ते बोलले याचा अर्थच भाजपच्या घराणेशाहीच्या प्रचाराचा त्यांच्यावरही परिणाम झाला आहे !             

राहुल गांधी कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यास वारंवार असमर्थ ठरत असल्याने राहुल गांधी बद्दलच्या भाजपा प्रचाराला मोठे यश मिळत आहे. भाजप विचाराच्या विरोधी असलेले रामचंद्र गुहा सारखे इतिहासकार आणि विचारवंत देखील भाजपने घराणेशाहीचा जो बागुलबुवा उभा केला आहे त्याला बळी पडत आहेत. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ता देखील विचलित आणि दोलायमान होत आहे. निवडणुकीत पराजय झाला की कॉंग्रेस मध्ये दबक्या आवाजात प्रियंका गांधीनी कॉंग्रेसचे नेतृत्व करावे अशी मागणी होत असते. राहुल गांधीना ‘पप्पू’ ठरवणाऱ्या भाजप प्रचारयंत्रणेचे हे यश आहे. भाजपच्या या प्रचाराला स्वत: कॉंग्रेस कार्यकर्ते आणि भाजप विचारसरणीला विरोध असणारे विचारवंत बळी पडत असतील तर सर्वसामान्य मतदारांवर या प्रचाराचा किती परिणाम झाला असेल हे सहज लक्षात येईल. मोदींना तोड नाही, पर्याय नाही कारण राहुल पप्पू आहे आणि भाजपला आव्हान देण्यात इतर बिगर काँग्रेसी पक्ष कॉंग्रेसपेक्षाही कमजोर आहेत. या पक्षांची भाजपला भीती नाहीच. भीती आहे ती मरगळलेल्या कॉंग्रेसची आणि कॉंग्रेसच्या मरगळलेल्या नेतृत्वाची ! सगळी भाजप प्रचार यंत्रणा राहुलला ‘पप्पू’ ठरवण्यासाठी आणि मोदींना महान ठरविण्यासाठी दिवसरात्र का राबते याचे उत्तर यात आहे. भाजपची घराघरात पोचलेल्या आक्राळविक्राळ आणि आक्रमक प्रचार यंत्रणेच्या तडाख्यातून वाचविणारे नेतृत्व कॉंग्रेसकडे आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.
                                                                       --------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल – ९४२२१६८१५८

Wednesday, March 18, 2020

नाकर्तेपणाचा काँग्रेसी विश्वविक्रम !


भारतीय जनता पक्षाची "मिस कॉल" सदस्य संख्या जशी जगात सर्वात जास्त आहे असे हा पक्ष अभिमानाने सांगतो तसेच कॉंग्रेसला जगात आपण सर्वात जास्त सुस्त आहोत असा दावा करण्यासारखी परिस्थिती आहे.
----------------------------------------------------------------------मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यासाठी कॉंग्रेस नावाच्या पक्षात जिवंतपणाची काही लक्षणे आहेत असे गृहीत धरावे लागेल. तर हे गृहीत धरून माझा प्रश्न आहे : जगातील सर्वात सुस्त प्राणी कोणता ? तुम्ही अजगरासह वेगवेगळ्या प्राण्याचा विचार करत असाल तर ते व्यर्थ आहे. तुमचे उत्तर हमखास चुकणार. या प्रश्नाचे अचूक उत्तर "कॉंग्रेस पक्ष" असे आहे ! भारतीय जनता पक्षाची "मिस कॉल" सदस्य संख्या जशी जगात सर्वात जास्त आहे असे हा पक्ष अभिमानाने सांगतो तसेच कॉंग्रेसला जगात आपण सर्वात जास्त सुस्त आहोत असा दावा करण्यासारखी परिस्थिती आहे. कॉंग्रेसची ही सुस्ती आजची नाही. दीर्घकाळच्या सत्तेतून आलेली ही सुस्ती आहे आणि सत्तेच्या पांघरुणाखाली ती झाकून राहिली होती. सत्तेमुळे दृष्टीआड असलेली ही सुस्ती आतल्या आत कॉंग्रेसला पोखरण्याचे काम करीत होती. किंबहुना भाजप सारख्या पक्षाला बळ देण्याचे काम ही सुस्ती करत होती. भारतीय जनता पक्षाच्या आधीच्या आवृत्तीचा म्हणजे जनसंघाचा आणि त्याही आधीपासून आरेसेसचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रचार आणि प्रसार चालूच असला तरी त्यांना यश मिळत नव्हते. यश न मिळण्याचे महत्वाचे कारण गांवोगांव विचाराने प्रेरीत कॉंग्रेस कार्यकर्त्याचे अस्तित्व आणि प्रभाव होता. विचाराने प्रेरित कार्यकर्ता जसजसा सत्तेने प्रेरित आणि प्रभावीत होवू लागला तसतसा पक्ष म्हणून जनमानसावरील कॉंग्रेसचा प्रभाव कमी होत गेला. निर्माण झालेली पोकळी कमी अधिक प्रमाणात तसाच विचार असणाऱ्या समाजवादी, कम्युनिस्ट आणि तत्सम पक्षाने भरून काढली. पण कॉंग्रेसच्या वाढत्या निष्क्रीयतेने वाढत जाणारी पोकळी भरून काढणे या पक्षांच्या कुवती बाहेरचे काम होते आणि इथेच संघ-भाजपला पाय पसरविण्याची संधी मिळाली. कॉंग्रेस पक्षाची निष्क्रियता याला कशी कारणीभूत झाली याची दोन उदाहरणे देतो.


कॉंग्रेस पक्ष हा मुस्लिमांचे लांगुलचालन करणारा पक्ष आहे असा आरोप संघ,जनसंघ, भाजप आणि त्यांच्या इतर संस्था स्वातंत्र्य मिळाल्यापासून करत आल्या आहेत. पण हा आरोप कॉंग्रेस पक्ष म्हणून जनतेत सक्रीय होता तोपर्यंत कॉंग्रेसवर चिकटला नाही. उलट सर्वाना बरोबर घेवून जाणारा मध्यममार्गी पक्ष म्हणून कॉंग्रेसची प्रतिमा टिकून होती. शाहबानो प्रकरणानंतर कॉंग्रेसवर हा आरोप चिकटू लागला. राजीव गांधी प्रधानमंत्री असतांना शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मुस्लीम समुदायाच्या दबावाखाली येवून संसदेतील बहुमताच्या जोरावर बदलल्याचा आरोप आहे. त्या निर्णयावर मुस्लीम समुदाय नाखुष होता आणि निर्णय बदलण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात आला आणि या दबावामुळे सरकारने त्या निर्णयात समुदायाच्या समाधानासाठी बदल केला. पण जे बदल केल्या गेलेत ते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात किंवा विसंगत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने राजीव सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले तेव्हा स्पष्ट केले होते. पण जनतेसमोर राजीव सरकारने मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला एवढेच आले. या बदलावर स्वत: सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला हे जनतेपुढे मांडल्या गेलेच नाही. हे काम कॉंग्रेस पक्षाचे , त्याच्या नेत्याचे आणि कार्यकर्त्यांचे होते. एकहाती सत्ता असल्याने व त्या सत्तेला आव्हान देणारे कोणी समोर दिसत नसल्याने विरोधकांना बोलू द्या , त्याने आपले काय वाकडे होणार या गुर्मीत कॉंग्रेस राहिली. सत्ता उपभोगात मस्त राहिलेल्या आणि सुस्त झालेल्या कॉंग्रेसला आरोपांचे स्पष्टीकरण देण्याची , निर्दोषित्व सिद्ध करण्याची गरज भासली नाही आणि लांगुलचालनाचा आरोप चिकटला तो चिकटला . आता तर परिस्थिती अशी आहे की मुस्लिमांवर अन्याय झाला तरी त्यावर बोलायला एकही कॉंग्रेस नेता तयार नाही. कारण असे केले की बीजेपी लांगूलचालनाचा आरोप करणार आणि तसा आरोप होवू नये यासाठी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आधीच शेपूट घालून बसणार.


भ्रष्टाचाराच्या आरोपा बाबतही असेच आहे. बोफोर्सचा लागलेला डाग कोर्टाने राजीव गांधी या प्रकरणी पूर्णत: निर्दोष असल्याचा निकाल दिल्यानंतरही कॉंग्रेसला पुसता आलेला नाही. बोफोर्स आणि राफेल प्रकरणाची तुलना केली तर भाजपने चीत असो की पट जीत आमचीच म्हणत कॉंग्रेसची केवीलवाणी परिस्थिती करून टाकली आहे. राफेल आणि बोफोर्स या दोन प्रकरणातील भाजपची भूमिका दुटप्पी असूनही कॉंग्रेसला कधीच ती लोकांसमोर मांडता आली नाही. बोफोर्स आणि राफेल दोन्हीही संरक्षण क्षेत्राशी संबंधित सौदे. पण बोफोर्स वर प्रश्न विचारणारे राफेल वर प्रश्न विचारला की तुम्ही सेनादलावर अविश्वास दाखवीत आहात म्हणून तुमचे तोंड बंद करणार आणि काँग्रेसवाले या तर्कावर थोबाडात मारल्यासारखे तोंड बंद करून गपगार पाडणार. काँग्रेसवाले एवढे ग्लानीत आहेत की त्यांना भाजप नेत्यांना एवढेही विचारता येत नाही की बाबारे, राफेल वर प्रश्न विचारणे हा संरक्षण दलावर अविश्वास असेल तर बोफोर्स वर प्रश्न विचारल्याने संरक्षण दलावर विश्वास प्रकट होतो का ! सुप्रीम कोर्टाने राफेल बाबत मोदींना दोषी धरले नाही मग तुम्ही चौकीदार चोर आहे असे कसे म्हणता म्हणत भाजपवाले कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे तोंड बंद करणार आणि ही मंडळी प्रतिवाद न करता गप्प बसणार. यांच्यात बीजेपी नेत्यांना एवढाही प्रश्न विचारायचा त्राण उरला नाही की बाबानो , राजीव गांधीना कोर्टाने २००४ सालीच निर्दोषीत्व बहाल केले तरी तुम्ही त्यांना चोर कसे ठरवता. सारख्याच प्रकरणात मोदी साहू ठरतात आणि राजीव गांधी चोर ठरतात याला बीजेपी कारणीभूत नाही तर सुस्तावलेले कॉंग्रेसचे माठ नेते आणि कार्यकर्ते जबाबदार आहेत. २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात कॉंग्रेसला घोटाळेबाज ठरवून मोदी सत्तेत आले. २०१४ च्या निवडणूक प्रचारात तोच मुद्दा प्रमुख होता. कोर्टाने निर्णय दिला. घोटाळा झाल्याचा कोणताही पुरावा नाही ! २०१९ च्या प्रचारात मोदीजी कडून स्पेक्ट्रम प्रकरणाचा उल्लेख नसणे स्वाभाविक आहे. पण कोर्टाचा हवाला देत आपला पक्ष निर्दोष आहे हे काँग्रेसवाल्यानी सांगायला नको का ? कोर्टाच्या निर्णयानंतरही घोटाळा केल्याचा आरोप कॉंग्रेसला चिकटून आहे याचे कारण तो पुसून टाकावा यासाठी कष्ट घेण्याची कॉंग्रेस मध्ये कोणाची तयारी नाही. एवढ्या सुस्त आणि निद्रिस्त पक्षाला काही भवितव्य असू शकते का आणि असण्याची गरज आहे का हे दोन प्रश्न भारतीय राजकारणासाठी कळीचे प्रश्न आहेत त्याचा उहापोह पुढच्या लेखात करू. 
-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Thursday, March 12, 2020

ज्योतिरादित्य सिंधीयांच्या दरबार बदलाचा अर्थ


कॉंग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय होतो असे सिंधिया यांना खरोखरच वाटत होते तर त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाविरुद्ध बंड करण्याची धमक दाखवायला हवी होती. नेतृत्वाविरुद्धचे त्यांचे बंड देखील कॉंग्रेसमध्ये नवा प्राण फुंकून चैतन्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरले असते. पण ती धमक आणि समज त्यांच्यात नव्हती हेच त्यांच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे.
---------------------------------------------------------------

कॉंग्रेसच्या भावी नेतृत्वाच्या फळीतील ज्योतिरादित्य सिंधिया हे अग्रगण्य नाव असण्याला कॉंग्रेस पेक्षा बाहेरच्यांचीच अधिक मान्यता होती. अशा लोकांना सिंधिया कॉंग्रेस सोडून भाजपात सामील झाले यास कॉंग्रेस नेतृत्व जबाबदार आहे असे वाटते. तर काहींनी कॉंग्रेसमध्ये जुन्या खोडांचे वर्चस्व असल्याने सिंधीयाना बाहेरचा रस्ता पकडावा लागल्याचे मत व्यक्त केले. या दोन्ही गोष्टींचा हात सिंधीयाच्या बाहेर पडण्यामागे निश्चितच आहे. पण तेवढेच या घटने मागचे कारण नाही. ज्योतिरादित्य स्वत: देखील दोषी आहेत हे सोयीस्करपणे विसरले जात आहे. कॉंग्रेस नेतृत्वाला जबाबदार धरण्याऐवजी कॉंग्रेसला नेतृत्व नसणे या घटनेस जबाबदार आहे हे मानले असते तर ते सत्याच्या अधिक जवळचे ठरले असते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी दिलेल्या राजीनाम्याने  कॉंग्रेसला गांधी घराण्याच्या कुबड्या बाजूला ठेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली होती. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी ही ऐतिहासिक संधी गमावली. कॉंग्रेसचा एकही नेता कॉंग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यासाठी पुढे आला नाही.


दरबारी राजकारणाने कॉंग्रेसमध्ये स्वयं:प्रकाशित  नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे राहूल गांधीनी नव्या नेतृत्वासाठी वाट करून दिली असली तरी त्या वाटेवरून चालायला कोणी समोर न येणे हे कॉंग्रेसचे सर्वात मोठे अपयश आहे. कॉंग्रेसचे जुने नेतृत्व लाचार आणि परप्रकाशित आहे याबद्दल दुमत असूच शकत नाही पण नवे नेतृत्व त्यापेक्षा वेगळे आहे असे कोणाला वाटत असेल तर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजपा प्रवेशाने तथाकथित नव्या नेतृत्वातील दमखम काय आहे हे दाखवून दिले आहे. दरबारी राजकारणात जुन्या नेत्यांचा मुरून मुरब्बा झाला असेल पण नव्या नेत्यानाही दरबारी राजकारणाबाहेर पडून स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्याचा आत्मविश्वास आणि इच्छा नाही हेच सिंधिया यांच्या भाजपा प्रवेशाने सिद्ध झाले आहे. सिंधिया आणि कमलनाथ किंवा दिग्विजयसिंह यांच्यातील संघर्ष तरुण तुर्क विरुद्ध म्हातारे अर्क असा नव्हताच. संघर्ष होता तो दरबारी राजकारणात आपले प्रस्थ वाढविण्यासाठी. सोनिया दरबारी हार झाली म्हणून सिंधिया मोदी दरबारात दाखल झालेत एवढाच खरा तर या घटनेचा अर्थ आहे.


सिंधीयाना कॉंग्रेसमध्ये आपले ऐकले जात नाही, आपली गळचेपी होते असे वाटू शकते. याचे कारण राजकारणात स्वकर्तृत्वाने मिळवायचे असते , आयते ताट वाढून मिळत नाही याचे भान त्यांना नव्हते. अशा बाबतीत राहुल गांधी सारखा एखादाच अपवाद असू शकतो हे त्यांनी लक्षात घेतले नाही. गलितगात्र कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. कॉंग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय होतो असे त्यांना खरोखरच वाटत होते तर त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाविरुद्ध बंड करण्याची धमक दाखवायला हवी होती. नेतृत्वाविरुद्धचे त्यांचे बंड देखील कॉंग्रेसमध्ये नवा प्राण फुंकून चैतन्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरले असते. पण ती धमक आणि समज त्यांच्यात नव्हती हेच त्यांच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे.
                                
                          
कॉंग्रेससोडून भाजपच्या वळचणीला जाताना जे मिळाल्याची चर्चा आहे त्यापेक्षा त्यांना अधिक मिळविता आले असते. कॉंग्रेसमध्ये राहून त्यांना मध्यप्रदेश सरकारचे नेतृत्व करायचे होते. मग भाजपात जातांना ते त्यासाठी का अडून बसले नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर अर्थातच त्यांच्यात ती धमक नाही हेच येते. भाजपात जावून त्यांनी जे मिळविले त्याच्या कितीतरी अधिकपटीने त्यांच्या या खेळीने कमलनाथ सरकार पडले तर भाजपचा फायदा होणार आहे.  म्हणजे आपले पत्ते चालविण्याची हुशारी आणि मुत्सद्दीपणा देखील त्यांचेकडे नाही. अशा नेत्याच्या कॉंग्रेस सोडण्याने कॉंग्रेसवर मोठा आघात होईल असे मानणे तर्कसंगत होणार नाही. मुळात आघात त्याच्यावर होवू शकतो जो जीवंत आहे. जीवंतपणाची कोणतीही लक्षणे कॉंग्रेसमध्ये दिसत नाहीत. सिंधीयाच्या खेळीने ते स्वत: जसे उघडे पडले तसे कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे नेतृत्व मुर्दाड आहे हे देखील पुन्हा एकदा उघड झाले आहे.
  

लोकसभा निवडणुकीनंतर सिंधिया कॉंग्रेसपासून हळूहळू दूर जात असल्याचे दिसत होते. काही मुद्द्यावर ते कॉंग्रेसच्या धोरणाविरुद्ध जाहीरपणे बोललेही होते. कमलनाथ सरकार बद्दलची नाराजी त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. कॉंग्रेस आज ज्या स्थितीत आहे त्यात एकेक कार्यकर्ता महत्वाचा असतांना सिंधीयाच्या नाराजीकडे कॉंग्रेस नेतृत्वाने लक्ष दिले नाही. सत्ता हाती असतांना अवलंबलेली थंड करून निर्णय घेण्याची सवय सत्ता आणि प्रभाव गेला तरी सुटली नाही. नेतृत्वाचा सामंती थाट कायम राहिला.  कॉंग्रेसला गांधी घराणे सोडता येणार नाही पण त्याच सोबत निर्णय घेणाऱ्या धडाडीच्या नेतृत्वाची गरज आहे हे या घटनेने दाखवून दिले. देशात कॉंग्रेसला मानणाऱ्या मतदारांची कमी नाही. पण या मतदारांना आकर्षित करणारे, संघटीत करणारे आणि रस्त्यावरील लढाईसाठी प्रेरित करणारे नेतृत्व कॉंग्रेसकडे नाही. कॉंग्रेसचे नेते आणि कथित कार्यकर्ते कुचकामी आहेत हेच सिंधीयाच्या बाहेर पडण्याने पुन्हा अधोरेखित झाले. म्हातारे विरुद्ध तरुण अशा संघर्षातून कॉंग्रेसमध्ये चेतना निर्माण होणार नाही. गरज आहे ती दरबारी राजकारणाविरुद्ध दंड थोपटून समोर येण्याची. कॉंग्रेसला सिंधीयाची नाही तर असे दंड थोपटून मैदानात उतरणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.
------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल – ९४२२१६८१५८

Thursday, March 5, 2020

मोदी राजवटीतील अभारतीय राजकीय संस्कृती !


उदारवाद आणि सौहार्द यासाठी जगात प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या देशातच उदारवादाला प्रचंड विरोध होणे ही  भारतीय परंपरेला एकप्रकारची सोडचिट्ठीच आहे. अनुदारवाद अभारतीय आहे आणि अशा अभारतीय राजकीय संस्कृतीला मोदी राजवटीने जन्माला घातले आहे.  
------------------------------------------------------------------------


२०१४ च्या मोदी विजयानंतर देशातील राजकीय परिस्थितीने आणि घडामोडीने आधीच्या ६५ वर्षापेक्षा वेगळा रस्ता पकडला आहे. देशात काँग्रेसला हरविणारे मोदी पहिले किंवा एकटे नाहीत. १९७७ मध्ये काँग्रेसची पहिली हार झाली होती. त्यानंतर देशाने अनेक काँग्रेसेतर प्रधानमंत्र्याची राजवट अनुभवली. मोदींपुर्वी काँग्रेसेतर प्रधानमंत्र्यांपैकी भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांची राजवट अधिक काळ होती आणि आता तो विक्रम मोदींच्या नावे होईल. काँग्रेसेतर प्रधानमंत्र्यात मोदी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री असतील हे विशेष नाही. मोदी सोबत एक नवी राजकीय संस्कृती उदयाला आली हे विशेष आहे. काँग्रेस काळात स्थिर झालेल्या राजकीय संस्कृती पेक्षा ही संस्कृती वेगळी आहेच पण अन्य काँग्रेसेतर प्रधानमंत्र्याच्या काळा पेक्षाही वेगळी आहे. अगदी भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी काळापेक्षाही वेगळी. अटलबिहारी प्रधानमंत्री होण्यापूर्वी जेवढे गैर काँग्रेसी प्रधानमंत्री झालेत त्यांना आणि काँग्रेसी प्रधानमंत्र्याना जोडणारा कमजोर का होईना पण स्वातंत्र्य आंदोलनाचा धागा आणि वारसा होता. त्यामुळे राजकीय संस्कृतीत फार मोठा बदल झाला नव्हता. अटलबिहारी प्रधानमंत्री झाल्यानंतर सत्ता आणि स्वातंत्र्य आंदोलनाला जोडणारा धागा खंडित झाला. पण अटलबिहारी वाजपेयींचे काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांशी असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधाने राजकीय सौहार्द आणि संवादाची चालत आलेली राजकीय संस्कृती खंडित झाली नव्हती. नंतर आलेल्या मनमोहन सरकारने संवाद आणि सौहार्दाची राजकीय संस्कृतीला बाधा येऊ दिला नाही पण सत्तेची स्वातंत्र्य आंदोलनाशीआंदोलनातील  निहित मूल्यांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडणे त्या सरकारला शक्य झाले नाही. त्यामुळेच मूल्यविहीन सत्तालोलुप काँग्रेस अशी काँग्रेसची प्रतिमा तयार झाल्याने मोदींचे सत्तारोहण सुलभ झाले. मोदींच्या आगमना सोबत राजकीय संवादाचे आणि सौहार्दाचे पर्वही संपले. आज देशात राजकीय संघर्षाचे आणि विसंवादाचे जे भेसूर चित्र दिसते त्याचे हे मूळ कारण आहे.


मोदीजी सत्तेत आल्यानंतर संसदेच्या पायऱ्या चढतांना लोटांगण घालत संसदेला अभिवादन करून त्यांनी सुरुवात तर छान केली होती. पण त्या अभिवादनात संसद आणि संसदीय लोकशाहीवर प्रकट झालेला विश्वास सत्तेत आल्यापासून आजतागायत त्यांच्या व्यवहारात दिसला नाही. संसदीय लोकशाही विरोधक संख्येने कितीही असले तरी त्यांच्याबद्दल आदरभाव अपेक्षिते . वेगळ्या आणि विरोधी विचारांबद्दल आदर लोकशाहीत अपेक्षित असतो. लोकशाहीत बहुमताने निर्णय घ्यायला अनुमती देत असली तरी अल्पमताचे म्हणणे ऐकण्याची आणि प्रसंगी ते स्वीकारण्याची उदारता अपेक्षित आहे. आज ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार आहे तो पक्ष लोकसभेत संख्येने फक्त दोन असताना देखील सत्ताधारी पक्षाकडून आदर मिळाल्याचा इतिहास आहे. खासदार संख्या दोन असतांना  तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांचे सोबत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या अनेक बैठका झाल्याचा दाखला सापडेल. अनेक महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावर सातत्याने सर्वदलीय बैठका झालेल्या आहेत आणि बहुमत पाठीशी असलेल्या सरकारने अशा बैठका बोलावून अल्पसंख्येतील विरोधकांचे म्हणणे ऐकून नंतरच निर्णय घेतले आहेत. एकाधिकारशाही बद्दल ख्याती असलेल्या इंदिरा गांधी राजवटीत आणीबाणी पर्व वगळले तर ही  परंपरा खंडीत झाली नाही.नेहरूंनी तर गरज नसतांना गांधीजींच्या शब्दाखातर आपल्या मंत्रीमंडळात आपल्या पक्षापेक्षा भिन्न आणि विरोधी विचार असलेल्या व्यक्तींना स्थान दिले होते. मंत्रीमंडळ बैठकीत अशा व्यक्तींशी मतभेद झालेत म्हणून कधी त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही. कमी अधिक स्वरूपात अशा लोकशाही परंपरांचे पालन मोदी सरकार सत्तेत येईपर्यंत झाल्याचे आपणास आढळून येईल.                                                                                                                           या पार्श्वभूमीवर गेल्या ६ वर्षातील राजकीय चित्र नेमके याच्या विरोधी आहे. गेल्या ६ वर्षात आपल्याला असा एकही प्रसंग आढळणार नाही ज्यावर प्रधानमंत्री यांनी सर्वदलीय बैठका बोलावून विरोधी पक्षांशी विचार विनिमय केला. अपवाद फक्त एकच. पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाल्या नंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस देखील उपस्थित न राहता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सभेत भाषण करायला दौऱ्यावर निघून गेले. इथेही त्यांनी विरोधकांचा अधिक्षेप करण्याची संधी सोडली नाही. फक्त संसदेचे अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्व संध्येला चहापानाच्या  औपचारिक बैठकीत चहाच्या घोटा सोबत मोदीसरकार विरोधी मतांचा घोट घेते ! मोदी सरकारात सामील अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांनी नुकतीच देशात फक्त निवडणुकीपूरती  लोकशाही शिल्लक असल्याची खंत व्यक्त केली ती चुकीची म्हणता येणार नाही. 


मोदीजी सत्तेत आल्यापासून फक्त सरकारातील लोकच लोकशाही परंपराचे पालन करीत नाहीत तर या बाबतीत या सरकारचे समर्थक विरोधकांचा अधिक्षेप करण्यात आणि विरोधकांना नामोहरण करण्याचे प्रयत्न करण्यात जास्त उत्साही आणि आघाडीवर आहेत. सक्रिय राजकीय समर्थक लाभणे ही खरे तर भूषणावह आणि लोकशाही सुदृढ करणारी बाब असायला हवी. मोदींचे सक्रिय समर्थक मात्र विरोधी आवाज दाबण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही सरकारला विरोध केला किंवा सरकारी धोरणावर प्रश्न उपस्थित केला की या झुंडी प्रश्नकर्त्यावर तुटून पडतात. प्रश्नकर्त्याचे चारित्र्यहनन करण्यात आणि त्याला देशद्रोही ठरविण्यात मोदी समर्थकांच्या झुंडी अग्रेसर असतात. उदारवाद आणि सौहार्द यासाठी जगात प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या
 देशातच उदारवादाला प्रचंड विरोध होणे ही  भारतीय परंपरेला एकप्रकारची सोडचिट्ठीच आहे. अनुदारवाद अभारतीय आहे आणि अशा अभारतीय राजकीय संस्कृतीला मोदी राजवटीने जन्माला घातले आहे.  
----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
 
मोबाईल - ९४२२१६८१५८