भारतीय जनता पक्षाची "मिस कॉल" सदस्य संख्या जशी जगात सर्वात जास्त
आहे असे हा पक्ष अभिमानाने सांगतो तसेच कॉंग्रेसला जगात आपण सर्वात जास्त सुस्त
आहोत असा दावा करण्यासारखी परिस्थिती आहे.
----------------------------------------------------------------------
मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यासाठी कॉंग्रेस नावाच्या पक्षात जिवंतपणाची काही लक्षणे आहेत असे गृहीत धरावे लागेल. तर हे गृहीत धरून माझा प्रश्न आहे : जगातील सर्वात सुस्त प्राणी कोणता ? तुम्ही अजगरासह वेगवेगळ्या प्राण्याचा विचार करत असाल तर ते व्यर्थ आहे. तुमचे उत्तर हमखास चुकणार. या प्रश्नाचे अचूक उत्तर "कॉंग्रेस पक्ष" असे आहे ! भारतीय जनता पक्षाची "मिस कॉल" सदस्य संख्या जशी जगात सर्वात जास्त आहे असे हा पक्ष अभिमानाने सांगतो तसेच कॉंग्रेसला जगात आपण सर्वात जास्त सुस्त आहोत असा दावा करण्यासारखी परिस्थिती आहे. कॉंग्रेसची ही सुस्ती आजची नाही. दीर्घकाळच्या सत्तेतून आलेली ही सुस्ती आहे आणि सत्तेच्या पांघरुणाखाली ती झाकून राहिली होती. सत्तेमुळे दृष्टीआड असलेली ही सुस्ती आतल्या आत कॉंग्रेसला पोखरण्याचे काम करीत होती. किंबहुना भाजप सारख्या पक्षाला बळ देण्याचे काम ही सुस्ती करत होती. भारतीय जनता पक्षाच्या आधीच्या आवृत्तीचा म्हणजे जनसंघाचा आणि त्याही आधीपासून आरेसेसचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रचार आणि प्रसार चालूच असला तरी त्यांना यश मिळत नव्हते. यश न मिळण्याचे महत्वाचे कारण गांवोगांव विचाराने प्रेरीत कॉंग्रेस कार्यकर्त्याचे अस्तित्व आणि प्रभाव होता. विचाराने प्रेरित कार्यकर्ता जसजसा सत्तेने प्रेरित आणि प्रभावीत होवू लागला तसतसा पक्ष म्हणून जनमानसावरील कॉंग्रेसचा प्रभाव कमी होत गेला. निर्माण झालेली पोकळी कमी अधिक प्रमाणात तसाच विचार असणाऱ्या समाजवादी, कम्युनिस्ट आणि तत्सम पक्षाने भरून काढली. पण कॉंग्रेसच्या वाढत्या निष्क्रीयतेने वाढत जाणारी पोकळी भरून काढणे या पक्षांच्या कुवती बाहेरचे काम होते आणि इथेच संघ-भाजपला पाय पसरविण्याची संधी मिळाली. कॉंग्रेस पक्षाची निष्क्रियता याला कशी कारणीभूत झाली याची दोन उदाहरणे देतो.
कॉंग्रेस पक्ष हा मुस्लिमांचे लांगुलचालन करणारा पक्ष आहे असा आरोप संघ,जनसंघ, भाजप आणि त्यांच्या इतर संस्था स्वातंत्र्य मिळाल्यापासून करत आल्या आहेत. पण हा आरोप कॉंग्रेस पक्ष म्हणून जनतेत सक्रीय होता तोपर्यंत कॉंग्रेसवर चिकटला नाही. उलट सर्वाना बरोबर घेवून जाणारा मध्यममार्गी पक्ष म्हणून कॉंग्रेसची प्रतिमा टिकून होती. शाहबानो प्रकरणानंतर कॉंग्रेसवर हा आरोप चिकटू लागला. राजीव गांधी प्रधानमंत्री असतांना शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मुस्लीम समुदायाच्या दबावाखाली येवून संसदेतील बहुमताच्या जोरावर बदलल्याचा आरोप आहे. त्या निर्णयावर मुस्लीम समुदाय नाखुष होता आणि निर्णय बदलण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात आला आणि या दबावामुळे सरकारने त्या निर्णयात समुदायाच्या समाधानासाठी बदल केला. पण जे बदल केल्या गेलेत ते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात किंवा विसंगत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने राजीव सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले तेव्हा स्पष्ट केले होते. पण जनतेसमोर राजीव सरकारने मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला एवढेच आले. या बदलावर स्वत: सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला हे जनतेपुढे मांडल्या गेलेच नाही. हे काम कॉंग्रेस पक्षाचे , त्याच्या नेत्याचे आणि कार्यकर्त्यांचे होते. एकहाती सत्ता असल्याने व त्या सत्तेला आव्हान देणारे कोणी समोर दिसत नसल्याने विरोधकांना बोलू द्या , त्याने आपले काय वाकडे होणार या गुर्मीत कॉंग्रेस राहिली. सत्ता उपभोगात मस्त राहिलेल्या आणि सुस्त झालेल्या कॉंग्रेसला आरोपांचे स्पष्टीकरण देण्याची , निर्दोषित्व सिद्ध करण्याची गरज भासली नाही आणि लांगुलचालनाचा आरोप चिकटला तो चिकटला . आता तर परिस्थिती अशी आहे की मुस्लिमांवर अन्याय झाला तरी त्यावर बोलायला एकही कॉंग्रेस नेता तयार नाही. कारण असे केले की बीजेपी लांगूलचालनाचा आरोप करणार आणि तसा आरोप होवू नये यासाठी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आधीच शेपूट घालून बसणार.
भ्रष्टाचाराच्या आरोपा बाबतही असेच आहे. बोफोर्सचा लागलेला डाग कोर्टाने राजीव गांधी या प्रकरणी पूर्णत: निर्दोष असल्याचा निकाल दिल्यानंतरही कॉंग्रेसला पुसता आलेला नाही. बोफोर्स आणि राफेल प्रकरणाची तुलना केली तर भाजपने चीत असो की पट जीत आमचीच म्हणत कॉंग्रेसची केवीलवाणी परिस्थिती करून टाकली आहे. राफेल आणि बोफोर्स या दोन प्रकरणातील भाजपची भूमिका दुटप्पी असूनही कॉंग्रेसला कधीच ती लोकांसमोर मांडता आली नाही. बोफोर्स आणि राफेल दोन्हीही संरक्षण क्षेत्राशी संबंधित सौदे. पण बोफोर्स वर प्रश्न विचारणारे राफेल वर प्रश्न विचारला की तुम्ही सेनादलावर अविश्वास दाखवीत आहात म्हणून तुमचे तोंड बंद करणार आणि काँग्रेसवाले या तर्कावर थोबाडात मारल्यासारखे तोंड बंद करून गपगार पाडणार. काँग्रेसवाले एवढे ग्लानीत आहेत की त्यांना भाजप नेत्यांना एवढेही विचारता येत नाही की बाबारे, राफेल वर प्रश्न विचारणे हा संरक्षण दलावर अविश्वास असेल तर बोफोर्स वर प्रश्न विचारल्याने संरक्षण दलावर विश्वास प्रकट होतो का ! सुप्रीम कोर्टाने राफेल बाबत मोदींना दोषी धरले नाही मग तुम्ही चौकीदार चोर आहे असे कसे म्हणता म्हणत भाजपवाले कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे तोंड बंद करणार आणि ही मंडळी प्रतिवाद न करता गप्प बसणार. यांच्यात बीजेपी नेत्यांना एवढाही प्रश्न विचारायचा त्राण उरला नाही की बाबानो , राजीव गांधीना कोर्टाने २००४ सालीच निर्दोषीत्व बहाल केले तरी तुम्ही त्यांना चोर कसे ठरवता. सारख्याच प्रकरणात मोदी साहू ठरतात आणि राजीव गांधी चोर ठरतात याला बीजेपी कारणीभूत नाही तर सुस्तावलेले कॉंग्रेसचे माठ नेते आणि कार्यकर्ते जबाबदार आहेत. २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात कॉंग्रेसला घोटाळेबाज ठरवून मोदी सत्तेत आले. २०१४ च्या निवडणूक प्रचारात तोच मुद्दा प्रमुख होता. कोर्टाने निर्णय दिला. घोटाळा झाल्याचा कोणताही पुरावा नाही ! २०१९ च्या प्रचारात मोदीजी कडून स्पेक्ट्रम प्रकरणाचा उल्लेख नसणे स्वाभाविक आहे. पण कोर्टाचा हवाला देत आपला पक्ष निर्दोष आहे हे काँग्रेसवाल्यानी सांगायला नको का ? कोर्टाच्या निर्णयानंतरही घोटाळा केल्याचा आरोप कॉंग्रेसला चिकटून आहे याचे कारण तो पुसून टाकावा यासाठी कष्ट घेण्याची कॉंग्रेस मध्ये कोणाची तयारी नाही. एवढ्या सुस्त आणि निद्रिस्त पक्षाला काही भवितव्य असू शकते का आणि असण्याची गरज आहे का हे दोन प्रश्न भारतीय राजकारणासाठी कळीचे प्रश्न आहेत त्याचा उहापोह पुढच्या लेखात करू.
-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८
शहाबानो प्रकरणात कोर्टाचा निर्णय आमच्यासारख्या कॉंग्रेसवाल्यांनाही माहीत नाही, त्यामुळे आम्हीपण राजीव चुकले हेच म्हणत होतो.
ReplyDelete