Thursday, July 26, 2012

भारत नावाची खाप पंचायत


आपल्याकडे संघ परिवार हा सगळ्यात मोठा संस्कृती रक्षक म्हणून ओळखला जातो. या संघ स्वयंसेवकांचा ड्रेस कोड काय आहे? संघ स्वयंसेवक तर अर्धी चड्डी घालून रस्त्यावर संचलन करतात.आणि हे संचलन सर्वानी -अगदी स्त्रियांनी सुद्धा- पहावे अशी त्यांची इच्छा असते. मांड्या उघड्या असलेल्या स्वयंसेवकाला पाहून स्त्रिया उत्तेजित होतील असा विचार स्त्रियांनी तोकडे कपडे घातल्यानेच त्यांच्यावर अत्त्याचार होतात असे  म्हणणाऱ्यांच्या डोक्यात का येवू नये?
-------------------------------------------------------------------------------

उत्तर प्रदेशातील एका खाप पंचायतीने मुलीना मोबाईल वापरायला बंदी घालणारा आणि मुलींसोबतच ४० वर्षे वयाच्या  आतील महिलांनी एकट्याने बाजारात जाण्यावर किंवा फिरण्यावर बंदी घालणारा तालेबानी फतवा जारी केल्याने खाप पंचायती देशभर चर्चेचा विषय बनल्या आहेत. आसाम मधील गौहाटीच्या वर्दळ असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी कौरवांचा अंगी संचार झालेल्या तरुणांच्या घोळक्याने  जनता- जनार्दनरूपी पांडवाच्या उपस्थितीत एका तरुणीचे वस्त्रहरण केल्याच्या पार्श्वभूमीवर खाप पंचायतीच्या फतव्याची जास्तच निंदा होत आहे. खाप पंचायतीचे फतवे नवीन नाहीत. गावातील तरुण-तरुणींनी प्रेम विवाह करू नयेत , जाती बाहेर तर मुळीच विवाह करू नयेत यासाठीच खाप पंचायतीचा जन्म तर झाला नसावा ना असे वाटण्या इतपत या पंचायतीची विवाहां संदर्भात लुडबुड राहात आली आहे. या पंचायतीच्या पंचाचे आणि पंचायत क्षेत्रातील नागरिकांचे नाक एवढे नाजूक आहे कि गावातील एखाद्या घरातील मुला-मुलीने अशी हिम्मत केली तर लगेच यांचे नाक कापल्या जाते. कापल्या नाकाची भरपाई म्हणून प्रेम विवाह किंवा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याचा मुडदा पाडन्यासाठी खाप पंचायतीचे क्षेत्र नेहमीच कूप्रसिद्ध राहिले आहे. चंबळ खोरे  जसे दरोडेखोरांच्या आश्रया साठी   प्रसिद्ध आहे तसेच खाप पंचायती असलेला  भाग कुटुंबाचा आणि गांवाचा सन्मान राखण्याच्या नावाखाली सराईतपणे हत्त्या करणाऱ्या हत्त्याऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही.महिना-पंधरा दिवसातून सन्मान राखण्याच्या नावाखाली हत्त्या झाल्याचे वृत्त येतच असते. या हत्त्याऱ्यांची चंबळच्या डाकूंशी तुलना हा त्या डाकूंचा अपमान ठरेल.   चंबळच्या डाकूंच्या ज्या कथा आपण ऐकतो त्यात त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ते डाकू बनल्याचे समान सूत्र आपल्याला ऐकायला मिळते. पण खाप पंचायतीच्या क्षेत्रात तर आपल्याच कुटुंबातील सदस्यांची - मुख्यत: मुलीची - केवळ प्रेम विवाह केला किंवा दुसऱ्या जातीत लग्न केले म्हणून अतिशय निर्दयपणे हत्त्या केली जाते.  कुटुंबातील मुलाने असा प्रकार केला तर सहसा त्याचे कुटुंबीय त्याची हत्त्या करीत नाही. अशा विवाहाच्या कारणावरून मुलाची देखील हत्त्या होते पण ती मुलीच्या कुटुंबियाकडून .  वरच्या जातीतील मुलीने कनिष्ठ जातीतील मुलीशी लग्न करण्याचा अपराध केला तर मुलीचे कुटुंबीय आपल्या मुली सोबत त्या मुलाची देखील हत्त्या करतात. पण मुलाचे कुटुंबीय अशा कारणासाठी मुलाची हत्त्या करतात असे मात्र घडत नाही. यात सुद्धा नेहमी सारखाच मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो . कुटुंबीय जी कृती मुली साठी गुन्हा मानतात तीच कृती मुलांसाठी मात्र गुन्हा मानीत नाही. मुलीनी माती खाल्ली तरी यांच्या सन्मानावर चिखल उडतो आणि मुलाने शेण खाल्ले तरी यांच्या सन्मानावर थोडासाही डाग पडत नाही. त्याच मुळे खाप पंचायतीचा सगळा कटाक्ष आणि नजर मुलींच्या आणि महिलांच्या वागण्यावर केंद्रित होते. त्यातून त्यांनी मोबाईल वापरू नयेत , एकट्याने फिरू नये अशा फतव्यांचा जन्म होतो. देशाच्या राजधानीच्या अवती भोवती असलेल्या उ.प्र.,हरियाणा,पंजाब, राजस्थान या प्रांतातील जाट बहुल क्षेत्रात खाप पंचायतीची अशी हुकुमत चालते. या क्षेत्रात संघटीतपणे आणि जाहीरपणे मिशावर ताव देवून हा प्रकार घडत असल्याने चटकन नजरेत भरतो आणि चर्चेचा विषय बनतो. पण  खाप पंचायतीचा प्रभाव असलेल्या जाट बहुल क्षेत्राबाहेर या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही हे गौहाटीच्या वस्त्रहरणाने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे. मुलीनी आणि स्त्रियांनी काय केले पाहिजे म्हणण्या पेक्षा काय करू नये , कोणत्या वाटेला जावू नये या बद्दलच्या खाप पंचायतीच्या ज्या धारणा आहेत तशाच धारणाचा  कमी अधिक प्रमाणात देशभरातील पुरुष जातीवर पगडा आहे.  या अर्थाने आपला देश हीच  सर्वात मोठी खाप पंचायत ठरते. म्हणूनच तर स्त्रीला पूजनीय मानण्याचा दंभ बाळगणारा हा देश स्त्रियांना राहण्यासाठी नरक असल्याचे जगभर मानल्या जात असल्याचे संपन्न अशा जी - २० देशांमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे .  खाप पंचायतीचे नाव आणि तिचा प्रताप ज्यांच्या कानीही पडला नसेल अशा घरा-घरातून मुलींवर आणि स्त्रियांवर खाप पंचायती सारखेच निर्बंध लादल्या जातात. तुमच्या आमच्या घरात आणि सभोवताली हे घडत असते. दिड महिन्या पूर्वीची एक घटना आहे. विदर्भातील एका खेड्यातून एका युवतीचा मला फोन आला. माझे लेख वाचून प्रभावित झालेल्या या  युवतीला समाजासाठी काही तरी करायचे होते.खेड्याची दुर्दशा पाहून व्यथित झालेल्या त्या तरुणीला आपल्या गावाच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी राजकारणात पडण्याचा धाडशी मनोदय तीने बोलून दाखविला.  त्यासाठी तीला माझी मदत आणि मार्गदर्शन हवे होते. २-३ वेळेस फोन करून तीला पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे तीने माझ्या कडून मिळविण्याचा प्रयत्न केला. पण मुलीचे चाकोरी सोडून राजकारणात जाण्याचे व समाजकार्य करण्याचे मनसुबे घरच्यांच्या कानावर पडताच तिच्यावर बंधने आलीत. आईची सहानुभूती कामी आली ती फक्त मला एवढे कळविण्या साठीच कि तिचा मोबाईल तिच्याकडून काढून  घेण्यात आला असून तीला माझ्याशी संपर्क साधता येणार नाही ! तिच्या या प्रमादासाठी तिचे पुढचे शिक्षण थांबविण्यात आले तर आश्चर्य वाटायला नको. मुलीनी अशी वेगळी वाट निवडायची म्हटली कि प्रोत्साहना ऐवजी बंधनेच तिच्या नशिबी येतात. मुलगी खाप पंचायतीच्या प्रभाव क्षेत्राच्या हजारो मैल दुर असली तरी अशा बंधनातून तिची सुटका नसते. तिचे चाकोरी बाहेर जाणे हे निव्वळ मर्यादाभंगच ठरत नाही तर नीतिमत्तेचा भंगही ठरते.  आणि म्हणून घरातच नव्हे तर घरा बाहेर रस्त्यावर देखील नितीरक्षक रखवाल्रदारांचा त्यांच्यावर पहारा असतो. मनुस्मृतीने स्त्रीच्या रक्षणाच्या नावाखाली तिच्यावर पहारा ठेवण्यासाठी तीन पहारेकऱ्याची नियुक्ती आधी करूनच ठेवली आहे. लग्नाच्या आधी बापावर , लग्नानंतर नवऱ्यावर आणि म्हातारपणी मुलावर ही जबाबदारी होती. पण कुटुंबातील हा पहारा अपुरा वाटल्याने कुठे खाप पंचायती तर कुठे  गौहाटीच्या रस्त्यावर दिसले तसे संस्कृती रक्षक टोळके गल्लो गल्ली निर्माण झालेत.   

                              अपराध पुरुषांचा , शिक्षा स्त्रीला 

 शिक्षणाचा प्रसार, विज्ञानाने साधलेली प्रगती, आर्थिक प्रगतीने निर्माण झालेल्या नव्या आकांक्षा याच्या संयुक्त परिणामी कुटुंबातील मुली आणि स्त्रिया यांच्यावरील बंधने सैल झालीत. पुरुषांची मानसिकता बदलली म्हणून हे घडले नाही. परिस्थितीच्या रेट्यामुळे हे घडले. जिथे असा रेटा नाही तिथे अजूनही स्त्रियांवरील बंधने कमी झालेली नाहीत. परिस्थितीच्या रेट्यामुळे बाहेर पडलेल्या स्त्रियांवर किंवा मुलींवर बंधने घालण्यात कुटुंबाची असमर्थता लक्षात येताच पूर्वीच्या मनुस्मृतीत अलिखित कलमांची भर पडली. ती अलिखित कलमे म्हणजे खाप पंचायती आणि गौहाटीच्या रस्त्यावर धुडगुस घालणारे नीतीमत्तेचे  राक्षस् (रक्षक नव्हे, राक्षसच) होय. कुटुंबातील बंधने सैल झाली तरी स्त्री बंधमुक्त   होवू नये म्हणून गल्लोगल्ली संस्कृतीचे रक्षण करण्याचा विडा उचललेले 'कार्यकर्ते' वावरत असतात. गौहाटीच्या घटनेला फक्त  विकृत आणि कामांधांची कृती म्हणून पाहण्याची चूक करता कामा नये. खाप पंचायती ' मर्यादा भंग ' करणाऱ्या स्त्रीला झाडाला बांधून  विवस्त्र करून मारहाण करण्याची जशी शिक्षा देतात त्याच धर्तीवर पब मध्ये जावून व तोकडे कपडे घालून 'मर्यादा भंग' करणाऱ्या युवतीला गौहाटीच्या स्वघोषित संस्कृती रक्षकांनी दिलेली ती शिक्षा आहे. पार्क मध्ये किंवा समुद्र किनारी बसणाऱ्या तरुण तरुणींना संस्कृती रक्षकांचा प्रसाद नेहमीच मिळत असतो आणि माध्यमे ही स्वघोषित नैतिक पोलिसांच्या कारवाया चवीने चघळत असतात. पब मध्ये किंवा बार मध्ये जाणे वाईट असेल तर ते सर्वांसाठी वाईट असले पाहिजे. पाश्चात्य पद्धतीची वेशभूषा वाईट असेल तर ती सगळ्या साठीच असली पाहिजे. पण ते वाईट असते ते फक्त स्त्रियांसाठीच. त्यामुळे पुरुष उत्तेजित होतात आणि नको ते करून बसतात असा संस्कृती रक्षकांचा हमखास दावा असतो. पुरुषांच्या चूकी साठी स्त्रियांना दोषी धरण्याचा हा हमखास नुस्खा आहे. पुरुषांनी कसाही पोशाख घातला तरी स्त्रिया कोठे कधी उत्तेजित झाल्याचे किंवा त्यामुळे त्यांनी पुरुषावर अतिप्रसंग केल्याचे कधीच ऐकू येत नाही. पुरुषांच्या बाबतीत मात्र हमखास हे कारण पुढे केले जाते. आपल्याकडे संघ परिवार हा सगळ्यात मोठा संस्कृती रक्षक म्हणून ओळखला जातो. या संघ स्वयंसेवकांचा ड्रेस कोड काय आहे? संघ स्वयंसेवक तर अर्धी चड्डी घालून रस्त्यावर संचलन करतात.आणि हे संचलन सर्वानी -अगदी स्त्रियांनी सुद्धा- पहावे अशी त्यांची इच्छा असते. मांड्या उघड्या असलेल्या स्वयंसेवकाला पाहून स्त्रिया उत्तेजित होतील असा विचार स्त्रियांनी तोकडे कपडे घालू नये म्हणणाऱ्यांच्या डोक्यात का येवू नये? अटलबिहारीजी  किंवा अडवाणीजी त्यांच्या तरुण वयात किती राजबिंडे दिसत असतील. असे हे राजबिंडे तरुण अर्धी चड्डी घालून रस्त्यावरून जात असतील तेव्हा त्यांच्या कडे पाहून कुठल्या स्त्रीच्या भावना उद्दीपित  झाल्याने त्यांना नको त्या प्रसंगाला कधी सामोरे जावे लागल्याचे कधी कोणी ऐकले आहे का? पुरुषांच्या बाबतीतच हे घडते कारण ते स्त्रीला निव्वळ भोग वस्तू म्हणून पाहतात. त्याचा कपड्याशी किंवा पब आणि बार या मध्ये जाण्याशी किंवा रात्र पाळीत काम करण्याशी काहीही संबंध नाही. पण समाजात नेहमीच पुरुषांच्या अपराधाची शिक्षा स्त्रीला तिच्या स्वातंत्र्याचा बळी देवून भोगावी लागली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पुरुष अतिप्रसंग करेल म्हणून मुलीनी आणि स्त्रियांनी ७ च्या आत घरात येवून स्वत:ला कोंडून घेतले पाहिजे . शिक्षा अत्त्याचार करतो त्याला नाहीच. शिक्षा जिला अत्त्याचार सहन करावा लागतो तिलाच. मुलींची आणि स्त्रियांची काहीच चूक नसताना त्यांच्या बाहेर पडण्यावर बंधने घालण्या ऐवजी पुरुषांची  अत्त्याचार करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असल्याचे कारण देवून पुरुषांनीच  ७ च्या आत घरात आले पाहिजे असा फतवा काढणे किंवा दंडक घालून देणे न्यायसंगत ठरले असते. पुरुषांवर असे बंधन घालण्याचा विचार पुरुष प्रधान व्यवस्थेत पुरुषांच्या डोक्यात येणे शक्यच नाही , पण स्त्री चळवळींनी तरी आक्रमक होवून कुठे अशी मागणी केली आहे? अशी मागणीच स्त्रियांकडून होत नसल्याने स्त्रियांच्या  स्वातंत्र्याला संस्कृती रक्षकांचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट बसत चालला आहे. पुरुषांच्या चुकीची किंवा अपराधाची शिक्षा पुरुषाला मिळाली पाहिजे . त्याच्या अपराधाची शिक्षा स्त्री स्वातंत्र्याचा संकोच करून स्त्रियांना  देवू नये हाच आज स्त्री चळवळीचा प्रमुख मुद्दा बनला पाहिजे. 

                       स्त्रियांचा दोष 

 आज  स्त्रिया मोठया संख्येने घरा बाहेर  पडत आहेत. महत्वाच्या जबाबदाऱ्या शिरावर घेवून यशस्वीपणे पार पाडीत आहेत. शिक्षणातील त्यांची भरारी डोळे दिपवणारी आहे. पण असे असले तरी वर्षानुवर्षे त्यांच्या पायातील असलेल्या बेड्या त्यांना दागिन्या सारख्या वाटाव्यात इतकी त्यांना त्याची सवय झाली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या  एका सर्वेक्षणात ५२ टक्के महिलांनी नवऱ्याचा मार आवडतो असे सांगितले ते उगीच नाही ! समाजातील सर्व क्षेत्रातील महिलांचा वावर वाढत चालला  , पण स्वातंत्र्याचा मात्र संकोच होत चालला आहे. ती निर्णय घेत नाही , तिच्या साठी निर्णय घेतले जात आहेत. शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीचा अपवाद सोडला तर संपत्तीत वाटा असावा अशी स्त्रियांची मागणी नव्हतीच. तो तीला दिल्या गेला. राजकारणात सहभागी होणे तर तिच्या साठी सर्वाधिक नावडीचे काम आहे. तरीही तीला सत्तेत वाटा देण्याचा निर्णय झाला. संघर्ष करून तीने या गोष्ठी मिळवल्या असत्या तर तीला या गोष्टींचे महत्व कळले असते आणि संघर्षातून तिचे बळ ही वाढले असते. आज पर्यंत कुटुंबाच्या भल्याच्या नावाखाली घरा बाहेर पडू देण्यात आले नाही . आणि आज ती घरा बाहेर पडते आहे ते देखील स्वत:च्या इच्छा-आकांक्षाच्या पूर्ती साठी नाही तर कुटुंबाच्या भल्या साठीच. ती पुरुषाच्या बरोबरीने काम करीत नव्हती म्हणून तिचे स्थान दुय्यम होते आणि आज ती पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहे तरी तिचे स्थान दुय्यमच आहे. पूर्वी विवाहाच्या बाबतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतेच. अंतिम शब्द घरच्यांचाच असायचा. आज उच्च विद्या व पद विभूषित स्त्रियांकडे ते स्वातंत्र्य चालून आले आहे तर त्या तिकडे पाठ फिरविताना दिसतात. विवाह मंडळाकडे होत असलेल्या नोंदी पाहिल्या तर यातील सत्यता आपल्या लक्षात येईल. निर्णय घेणे सोडले तर सगळे काही तीला जमते ही आजची स्थिती आहे. पूर्वी कुटुंब ही तिची चौकट होती आता ती चौकट विस्तारून कुटुंब आणि कामाचे ठिकाण अशी तिची चौकट बनली आहे. पण ही चौकट ओलांडून विशाल अशा सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रवाहात पुरुषांच्या बरोबरीने सामील होण्याची इच्छा आणि जिद्द याचा स्त्रियांमध्ये प्रकर्षाने अभाव आहे. पूर्वी तीला या प्रवाहात सामीलच होवू दिले जात नव्हते आणि आज या प्रवाहात सामील होण्याची संधी चालून आली आहे तर तिचीच त्यात सामील होण्याची इच्छा नाही. तीला चालून आलेली संधी ही स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक समतेच्या लढ्यात स्त्रियांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे होती. पण तो वारसा पुढे चालविण्यात स्त्रियांना आणि स्त्री चळवळींना अजिबात रस दिसत नाही. सामाजिक -राजकीय प्रवाहात सामील झाल्या शिवाय स्त्रियांना मुख्य प्रवाहात येताच येणार नाही. त्या मुख्य प्रवाहात येत नाहीत तो पर्यंत त्यांचे स्थान दुय्यमच राहणार आहे. स्त्री मुक्ती साठी स्त्रियात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय साक्षरतेची नितांत गरज आहे . अशा प्रयत्नांचाच नेमका अभाव आहे. त्यामुळेच खाप पंचायती आणि गल्लो गल्लीच्या संस्कृती रक्षकाच्या टोळक्याना स्त्री स्वातंत्र्यावर घाला घालणे सहज शक्य होत आहे. 
                                                     (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि. यवतमाळ 

Thursday, July 19, 2012

आर्थिक अडाण्यांच्या चरणी समर्पण (यात्रा)

'अर्थक्रांती'ची  किमया साध्य करायची असेल तर खेडोपाडी बँकेचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. आज ग्रामीण भागात बँकांचे जाळे नसण्याचे एकमेव कारण ग्रामीण भागात पैसा नसणे हे आहे. कर्जाऊ पैसे वाटपासाठी बँकांनी शाखा उघडाव्यात हे अव्यावहारिक आहे. असे जाळे निर्माण झाले नाही तर 'अर्थक्रांती'चे सर्व सिद्धांत कागदावरच राहतात ही खरी गोम आहे. म्हणूनच शेती व्यवसायाची भरभराट होणे किंवा हा व्यवसाय फायदेशीर होणे ही अर्थक्रांतीची पूर्व अट असणे अपरिहार्य ठरते. 
-------------------------------------------------------------------------


देशासमोरील सर्वात मोठे आणि जटिल प्रश्न लीलया सोडविण्याचा दावा करणाऱ्या 'अर्थक्रांती'च्या सिद्धांताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी औरंगाबाद शहरातून चारी दिशांनी समर्पण यात्रा निघाली आहे. अर्थक्रांतीचे सिद्धांत शेतकरी आत्महत्या पासून दहशतवादापर्यंतच्या सर्व समस्यांवर उपयुक्त असल्याचा दावा करीत असले तरी हे सिद्धांत मुलत; आर्थिक आहेत. निव्वळ अर्थकारणावर आधारित निघालेली ही देशातील बहुधा पहिली यात्रा असावी. भावनिक मुद्द्यावर आधारित बाबा आमटेंच्या भारत जोडो पासून ते लालकृष्ण अडवाणींच्या मस्जिद तोडो यात्रा सारख्या अनेक यात्रा या देशाने पाहिल्या आहेत. पण निव्वळ जडवादी , ऐहिक म्हणता येईल अशा आर्थिक विषयावर यात्रा काढण्याचे आणि ते सुद्धा तद्दन आर्थिक निरक्षर असलेल्या लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याच्या उद्देश्याने यात्रा काढणे हे साहसिक कार्य आहे. स्वत;च्या खिशातून खर्च करून यात्रा काढायला समर्पणाची भावनाच लागते आणि त्या दृष्टीने विचार करता यात्रेला 'समर्पण यात्रा' हे नाव समर्पकच म्हंटले पाहिजे. अशा त्यागी वृत्तीचा आपल्या समाजात जरा जास्तच आदर केला जातो. त्यामुळे त्याग आणि समर्पनाकडे लोकांचे जास्त लक्ष जाते आणि ज्या मुद्द्यासाठी त्याग व समर्पण केल्या जाते तो मुद्दा दुय्यम ठरतो ही आमची परंपरा राहिली आहे. या यात्रेत सुद्धा हीच परंपरा कायम राहिली तर यात्रेचे तेवढे कौतुक होईल पण मुद्द्याची गोष्ठ बाजूला राहील. म्हणूनच यात्रेकरूंच्या त्यागाला दुय्यम स्थान दिले तरच यात्रेच्या हेतूची व मुद्द्याची चिकित्सा संभव आहे. अन्यथा चिकित्सा करायला गेले कि लोकांचा हमखास आक्षेप असतो कि कोणी तरी काही तरी करते ना मग त्यांना का हतोत्साहित  करता !  कृती मागे वैयक्तिक स्वार्थ दडला नसेल तर ती कृती चांगलीच असते असा आमचा पक्का समज असतो आणि हा समज चिकित्सा करण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. आर्थिक विषयाच्या बाबतीतील असा अडथळा चुकीच्या धोरणात परिवर्तीत होवून अनर्थकारी ठरण्याचा धोका असतो. ही यात्रा बाबा आणि महाराजांच्या चरणाजवळ जावून थांबणार असल्याने भाबड्या भक्तांचा उर आधीच भरून आलेला असेल . या यात्रेची चिकित्सा करण्यातील ही दुसरी मोठी अडचण आहे. ऐहिक किंवा जडवादी मुद्द्यावरील यात्रेचा समारोप मठात किंवा मठाधिपतींच्या चरणी करण्याची कृती म्हणूनच बुचकाळ्यात टाकणारी आहे.  हे चौघेही महाराज वंदनीय असले तरी त्यांची आर्थिक समस्यांची समज तोकडी असल्याबद्दल यात्रेच्या आयोजकाचेही दुमत नसेल. चिकित्से शिवाय लोकमान्यता मिळविण्याचा तर हा खटाटोप नाही ना असे कोणाला वाटले तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. यात दुसराही महत्वाचा मुद्दा दडला आहे. राज्यसत्ते पेक्षा धर्म सत्ता श्रेष्ठ आणि महत्वाची या धारणेचे पुनरुज्जीवन यातून होण्याचा धोका आहे. यात्रेतील मुद्दे सरळ सरळ देशाच्या आर्थिक धोरणाशी निगडीत आहेत. यावर धोरणकर्त्याशी संवाद आणि संघर्ष करण्याची गरज आहे. या यात्रेने धोरणकर्त्यासामोरच आपले म्हणणे मांडणे गरजेचे होते. यात्रेतून निर्माण होणाऱ्या जनमताचा दबाव धोरणकर्त्यावर आणण्या ऐवजी धोरण ठरविणारी दुसरीच  सत्ताकेंद्रे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यायलाच हवी होती. पण बाबा-महाराजांची आर्थिक निरक्षरता दुर करण्याचा आयोजकांचा खटाटोप असेल तर मात्र यात्रेची दिशा आणि मार्ग अगदी बरोबर असल्याचे मान्य करावे लागेल. गेल्या एक-दोन वर्षात या बाबा आणि महाराजांनी आर्थिक प्रश्नात घातलेले लक्ष ,व्यक्त केलेली मते , हाती घेतलेले कार्यक्रम आणि त्याचे झालेले परिणाम लक्षात घेता अशा प्रयत्नाची मोठी गरज होती. या यात्रेने ही गरज पूर्ण केली तर त्याच्या इतके देश हिताचे दुसरे कार्य असू शकत नाही . 

                                   अर्थक्रांतीची चिकित्सा 

सर्व सामान्य लोकांना आर्थिक सिद्धांत कळत नाहीत , अर्थ व्यवहारातील तांत्रिक गोष्ठी कळत नाहीत या अर्थाने त्यांना निरक्षर म्हणता येईल . पण अर्थ व्यवहारात मात्र सामान्य माणूस कुशल असतो. पण बाबा-महाराजांचे तसे नसते. त्यांना परमार्थ जास्त महत्वाचा वाटत असल्याने ते कधीच आर्थिक सिद्धांताकडे लक्ष देत नाहीत. अर्थ व्यवहार म्हणजे पाप कृत्य अशी समजूत असल्याने अर्थ व्यवहारापासून दुर राहणेच ते पसंत करतात. खऱ्या अर्थाने ते आर्थिक निरक्षर असल्याने त्यांना आर्थिक भान देणे जास्त गरजेचे आहे .त्यांचे आर्थिक अज्ञान दुर करण्याचे सामर्थ्य समर्पण यात्रा प्रचारित करीत असलेल्या 'अर्थाक्रांती'च्या सिद्धांतात नक्कीच आहे. आपल्या देशात बाबा आणि महाराज या मंडळीसह बहुतेकांचा जोर माणूस बदलण्यावर असतो. माणूस प्रामाणिक आणि चारित्र्यवान बनला कि सगळ्या समस्या सुटतील असे त्यांना वाटते. माणसातील बरे वाईट गुण व्यवस्थेचा परिपाक असतो हे त्यांच्या गावीही नसते. व्यवस्था बदलण्या ऐवजी कठोर शिक्षेची तरतूद करून माणसे ताळ्यावर आणण्याचा त्यांचा आग्रह असतो. मात्र भ्रष्टाचार, कर बुडवेगिरी किंवा लबाडी करण्यास व्यवस्था कारणीभूत असते हे आर्थिक क्रांतीचे मुलभूत तत्व आहे. समर्पण यात्रा बाबा , महाराज किंवा बाबा वाक्यम प्रमाणंम  मानणारे त्यांचे अनुयायी यांच्या गळी हे वास्तव उतरविण्यात यशस्वी झाली तर बाबा आणि महाराजांच्या आंदोलनाला दिशा मिळेल. व्यक्ती ऐवजी त्यांची आंदोलने व्यवस्था केंद्रित होतील. काळ्या पैशाला माणसाच्या व्यवहारापेक्षा कर प्रणाली अधिक जबाबदार असल्याचे सत्य अर्थक्रांती अधोरेखित करते. विविध प्रकारच्या करा ऐवजी एकाच प्रकाराचा कर असावा आणि तो एकाच ठिकाणी कापण्यात यावा ही अर्थक्रांती मधील सर्वात व्यावहारिक आणि परिणामकारक तरतूद आहे. फॉर्म भरणे,चलान भरणे ,रांग लावून पैसे भरणे अशा कटकटी पासून मुक्तता अर्थक्रांती देते. आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक उलाढालीवर कर हा एकमेव कर असणारी व्यवस्था असेल तर नाना प्रकारच्या करा पेक्षा जास्त कर संग्रह शक्य आहे आणि अशा कर संग्रहासाठी नोकरशाहीची आवश्यकता समाप्त करण्याची किमया अर्थक्रांतीचा कर संग्रहाचा सिद्धांत करू शकतो. पण ही किमया साध्य करायची असेल तर खेडोपाडी बँकेचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. आज ग्रामीण भागात बँकांचे जाळे नसण्याचे एकमेव कारण ग्रामीण भागात पैसा नसणे हे आहे. कर्जाऊ पैसे वाटपासाठी बँकांनी शाखा उघडाव्यात हे अव्यावहारिक आहे. असे जाळे निर्माण झाले नाही तर 'अर्थक्रांती'चे सर्व सिद्धांत कागदावरच राहतात ही खरी गोम आहे. म्हणूनच शेती व्यवसायाची भरभराट होणे किंवा हा व्यवसाय फायदेशीर होणे ही अर्थक्रांतीची पूर्व अट असणे अपरिहार्य ठरते. नेमके 'अर्थक्रांती,कार अनिल बोकील या बाबतीत स्पष्ट नाहीत. अर्थक्रांतीचे चांगले सिद्धांत लागू होण्यासारखी परिस्थिती नसण्यामागे शेतीत बचत न होणे, भांडवल संचय न होणे व यातून भांडवल खाऊन जगण्याची वेळ शेतकऱ्यावर येणे ही शेतीक्षेत्राची  दुरावस्था कारणीभूत आहे हे 'अर्थक्रांती'कारांनी लक्षातच घेतले नाही. शेती बद्दल त्यांनी केलेल्या कल्पना काल्पनिक आहेत. त्यांच्या कल्पने प्रमाणे काळ्या पैशासकट सगळा पैसा बँकात जमा झाला तरी शेतकऱ्याला त्याचा फारसा फायदा होणार नाही. पत नसलेल्यांना पत पुरवठा कोण करील? उलट आजच्या परिस्थितीत काळा पैसा बँकात जमा होवून पांढरा झाला तर त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान संभवते ज्याचा कोणीच विचार करीत नाहीत. शेती सदैव तोट्याची राहात आल्याने त्याला भांडवल खाऊन म्हणजे शेतीचा तुकडा विकून जगावे लागते. ज्यातून उत्पादन खर्च भागण्या इतकेही उत्पन्न निघत नाही अशा शेतीला बऱ्यापैकी भाव मिळतो ही किमया काळ्या पैशाची आहे ! काळा पैसा सुरक्षितपणे गुंतविण्याचे शेती किंवा जमीन हे सोयीस्कर साधन आहे. शेतीतील परिस्थितीने जमीन विकण्याची अगतिकता असूनही त्याला बऱ्यापैकी भाव मिळतो याचे कारण काळा पैसा आहे. शेती फायदेशीर होण्या आधी काळा पैसा संपला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत आणि वेगात प्रचंड वाढ होईल. आज 'अर्थक्रांती'चे सिद्धांत मध्यम व उच्च मध्यम वर्गीयांना अनुकूल असल्याने ते तिकडे आकर्षित होत आहेत. पण आजच्या स्थितीत ते सिद्धांत अमलात आलेत तर ग्रामीण भागाच्या प्रतीकुलतेत वाढ होवून 'इंडिया-भारत' दरी अधिक रुंदावेल.

                                           भांडवलाची कवी कल्पना 

ही बाबा-महाराज मंडळी आपल्या आंदोलनात लोकांसमोर एक चित्र रंगवीत असतात. देशातील व देशा बाहेरील सगळा काळा पैसा विकास कामात वापरला तर सगळे सुजलाम सुफलाम होईल. जणू काही काळा पैसा पोत्यात भरून किंवा परदेशी बँकात पडून सडत असल्याचे ते भासवितात. लोकप्रिय मांडणीची गरज आणि अज्ञान यामुळे बाबा लोकांची ही मांडणी समजून घेता येते . पण आर्थिक व्यवहाराची जाण असणाऱ्या अनिल बोकीलानाही तसेच वाटावे हे आश्चर्यकारक आहे. कारण बहुतांश काळा पैसा जमीन आणि उद्योगाच्या उलाढालीत काम करीत असतो. मागे काळा पैसा पांढरा करण्यासाठी जी माफीची योजना आली त्यातून जास्त पैसा जमा न होण्या मागे हेच कारण होते. आज ही तशी योजना जाहीर झाली तर त्याचीच पुनरावृत्ती होईल . फारसा काळा पैसा बँकात जमा होणारच नाही . कारण तो सडत पडलेला नसून अर्थव्यवस्थेत आधीच गुंतलेला आहे. त्यामुळे विकासकामासाठी ऐयते भांडवल मिळेल हे निव्वळ स्वप्नरंजन आहे. जे थोडे फार जमा होईल ते शेती क्षेत्राच्या वाटयाला येणारच नाही. बँकेतील भांडवल ही 'अर्थक्रांती'च्या सिद्धांतातील बाबा आणि महाराजांच्या कल्पनांशी जुळणारी सर्वात बाळबोध कल्पना आहे. कदाचित या साम्यानेच समर्पण यात्रा बाबा - महाराजांकडे आकर्षित झाली असावी . ज्याने कधी गायी - म्हशी पाहिल्या नाहीत अशा एखाद्या शहरातील लहान मुलाने दुध कोण देते या प्रश्नाच्या उत्तरात दुध गवळी देतो असे सांगावे अगदी तसेच उत्तर भांडवल कुठून येईल या प्रश्नाला 'बँकेतून' असे मजेदार उत्तर 'अर्थक्रांती' देते ! भांडवल निर्मितीचा मुख्य स्त्रोत जेथे एकाचे शंभर दाने होवू शकतात ती जमीन आहे आणि तिथे बचत होवून भांडवल तयार होवून बँकेत जमा झाले तरच खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था गतिमान होवून देश सुजलाम सुफलाम होईल. 'अर्थक्रांती'तून नेमक्या या भांडवल निर्मितीचा सिद्धांत गायब आहे. सगळ्या नक्षत्रातून पावसाची नक्षत्रे वजा केली तर परिणामकारक अर्थाने वजाबाकी शून्य येईल , अगदी तसेच 'अर्थक्रांती'तून शेती समस्या  वजा केली तर तिचे रुपांतर 'अर्थशून्य क्रांती'त होईल. अर्थक्रांतीची पाचही सूत्रे चांगली आहेत पण त्यात शेती समस्येचे समाधान नसल्याने 'अर्थक्रांती' अधुरी आणि अपुरीच नाही तर पोकळ बनली आहे. 
                                            (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ 

Thursday, July 12, 2012

गरज आंबेडकर आणि गांधींचीही 'सत्यमेव जयते' च्या देशातील जातीयवादावर बेतलेल्या भागात  फुले - आंबेडकरांचा नामोल्लेख न होणे ही बाब जशी सगळ्यांनाच खटकणारी होती तशीच कार्यक्रमात महात्मा गांधी यांचा झालेला उल्लेख अनेकांना खटकणारा वाटावा ही बाब देखील खटकणारीच आहे.  या क्षेत्रातील फुले - आंबेडकरांचे कार्य अतुलनीय आहे हे कोणीच अमान्य करीत नाही आणि करूही शकत नाही. पण गांधींच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल बरेच किंतु-परंतु आहेत. या पार्श्वभूमीवर गांधींचे योगदान अधोरेखित करणे  'सत्यमेव जयते'कारांना गरजेचे वाटले असेल तर ते समजून घेतले पाहिजे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी व्यक्ती पूजक नाही. अवतार आणि पुनर्जन्म यावर तर अजिबातच विश्वास नाही. गांधी आणि आंबेडकर या दोघांचेही अनुयायी त्यांना अवतार पुरुष मानण्यात आणि मानायला लावण्यात धन्यता मानीत असतात. मी गांधी विचाराच्या चळवळीत वाढलो असलो तरी गांधी माझ्यासाठी हाडा मासाचा माणूसच आहे. आंबेडकरांना सुद्धा या पेक्षा वेगळे मानण्याचे कारण नाही. गांधी विचाराच्या चळवळीत अनेक वर्ष रमल्या नंतरही जर आज मला गांधींचे कोणते विचार पटतात असा कोणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मला देता येईल असे वाटत नाही. असहमती बद्दल कदाचित भरभरून बोलता येईल. असे असले तरी स्वातंत्र्य चळवळीतून जो भारत घडला त्यातील त्यांचे योगदान सरस होते हे मान्य करायला मला अजिबात संकोच होत नाही. असेच योगदान स्वातंत्र्य चळवळीत नसले तरी आधुनिक भारताच्या जडण घडणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राहिले आहे. उपमा द्यायची झाली तर यांना आगगाडीच्या रुळांची द्यावी लागेल. दोघेही समकालीन असले तरी त्यांचे कार्य आगगाडीच्या रूळा सारखे समांतर राहिले आहे. आधुनिक भारतरूपी  आगगाडी  पुढे गेली ती या रुळावरुनच . ही गाडी बरीच पुढे जावू शकली त्याला हे समांतर रूळ जेवढे कारणीभूत आहेत तेवढेच या रूळा खालील जमीन मजबूत करण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई सारख्या अनेक समाज सुधारकांचे परिश्रम कारणीभूत होते. परवा दूरदर्शन वर चित्रपट अभिनेता आमिरखानने देशवासियांना जातीयवादाचा म्हणण्यापेक्षा अस्पृश्यतेचा जो आरसा देशवासीयांसमोर धरला तो पाहताना या सर्व समाज सुधारकांची आठवण होणे अपरिहार्य होते. आमिरखानने औपचारिकरीत्या फुले,शाहू आणि आंबेडकरांचे नाव घेतले नाही आणि सत्यमेव जयतेच्या या भागातील सर्वात जास्त टोचणारी ही बाब असली तरी हा कार्यक्रम पाहताना ज्याच्या डोळ्यासमोरून फुले-आंबेडकरांचे कार्य तरळून गेले नसेल असा दर्शक विरळाच असेल. फुले - आंबेडकरांचा नामोल्लेख न होणे ही बाब जशी सगळ्यांनाच खटकणारी होती तशीच कार्यक्रमात महात्मा गांधी यांचा झालेला उल्लेख अनेकांना खटकणारा वाटावा ही बाब देखील खटकणारीच आहे.  या क्षेत्रातील फुले - आंबेडकरांचे कार्य अतुलनीय आहे हे कोणीच अमान्य करीत नाही आणि करूही शकत नाही. पण गांधींच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल बरेच किंतु-परंतु आहेत. या पार्श्वभूमीवर गांधींचे योगदान अधोरेखित करने 'सत्यमेव जयते'कारांना गरजेचे वाटले असेल तर ते समजून घेतले पाहिजे. गांधीजी आणि बाबासाहेबांची अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची वाटचाल देखील समांतर असली तरी ती विरोधी नव्हती. दोघांचे कार्य एकमेकांच्या ध्येया पर्यंत पोचण्यासाठी पूरक आणि बळ देणारेच होते याची समज आणि जाणीव नसणाऱ्यांना कार्यक्रमातील गांधींचा उल्लेख खटकण स्वाभाविक आहे. स्वतंत्र भारतात इतक्या वर्षा नंतर आणि इतक्या प्रयत्ना नंतरही अस्पृश्यता व जातीयता याचे उच्चाटन करता आले नाही याची झापडे उघडे ठेवून कारण मीमांसा केली तर लक्षात येईल की गांधी आणि आंबेडकर यांनी सुरु केलेले समांतर कार्य थंडावले आहे. थंडावलेले हे कार्य जोमात सुरु झाल्याशिवाय सामाजिक समता हे स्वप्नच ठरणार आहे. आंबेडकर आणि गांधींची गरज आहे म्हणताना हे दोन व्यक्ती इथे अभिप्रेत नसून या दोन व्यक्तींनी सुरु केलेल्या सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची निकड या निमित्ताने समजून घेतली पाहिजे. 

                                                                मतभेदांचा विपर्यास 

गांधी आणि आंबेडकर यांनी आपल्या अंगीकृत कार्यासाठी जो प्राधान्यक्रम ठरविला होता त्यात या दोघांच्या मतभेदांची बिजे आहेत. इंग्रजाच्या गुलामीतून आधी देशाची मुक्ती याला गांधींचा अग्रक्रम होता तर हिंदूंच्या गुलामीतून अस्पृश्य समजल्या गेलेल्या दलित समाजाची मुक्ती याला बाबासाहेबांनी अग्रक्रम दिला होता. हिंदू समाजातून अस्पृश्यतेचे  उच्चाटन झाले पाहिजे या बाबत दोघात दुमत नव्हतेच. आमचे प्रश्न आम्ही सोडवू पण आधी इंग्रजांनी चालते व्हावे ही गांधींची भूमिका होती. पण उच्च वर्णीय व उच्च वर्गीय हिंदुनी शतकानुशतके दलितांवर जो अन्याय व अत्याचार चालविला होता त्याचा विदारक अनुभव स्वत: बाबासाहेबांनी घेतला असल्याने अशा हिंदू समाजाबद्दल बाबासाहेबांच्या मनात अविश्वासाची भावना होती आणि इंग्रज येथून निघून गेले तर दलित समुदाय पुन्हा एकदा अशा जातीयवादी हिंदूच्या तावडीत सापडेल अशी भिती आंबेडकरांना वाटत होती. कॉंग्रेसचे त्यावेळचे स्वरूप लक्षात घेतले तर आंबेडकरांची भिती अनाठायी नव्हती. म्हणून दलित मुक्ती शिवाय स्वातंत्र्य हे त्यांना मान्य नव्हते. शिवाय दलितांचा प्रश्न समजून घेण्यातही त्यांच्यात अंतर होते. या प्रश्नावर सुरुवातीला गांधी प्रचंड गोंधळात होते आणि आंबेडकर तितकेच स्पष्ट होते. हिंदू मधील वर्ण व जाती व्यवस्था समाप्त झाल्याशिवाय दलितांचा प्रश्न सुटू शकत नाही ही आंबेडकरांची शास्त्रीय भूमिका होती तर अस्पृश्यता तेवढी वाईट , वर्ण आणि जाती व्यवस्था वाईट नाही अशी गांधींची भूमिका होती. गांधींची ही भूमिका १९३२-३३ साला पर्यंत कायम होती .त्यामुळे दोघांचे एकत्रित काम करने अशक्य बनले होते. वर्ण आणि जाती व्यवस्थेतच अस्पृश्यतेचा उगम आहे हे त्याकाळी गांधीना ठणकावून सांगणारे आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते. प्रारंभी गांधीना त्यांच्यावरील हिंदू धर्माच्या पगड्यामुळे आंबेडकरांचे म्हणणे पटले नव्हते . आंबेडकरांची भूमिका त्यांना अतिरेकी वाटली होती. असे असले तरी त्यानंतर गांधीनी कधी वर्ण आणि जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला नाही. आज गांधीच्या चातुवर्ण्याची आवर्जून आठवण करून देणारी मंडळी गांधीचा प्रवास चातुवर्ण्या पासून ते ज्या विवाहात एक जोडीदार दलित समाजातील नाही त्या विवाहात आपण उपस्थित राहणार नाही इथ पर्यंत झाल्याचे सोयीस्करपणे विसरतात. गांधीत असा बदल होई पर्यंत दोघांचे राजकीय, सामाजिक परिवर्तनाचे मार्ग वेगळे होवून गेले होते. मार्ग वेगळे झाले तरी दोघांनी एकमेकांचे मार्ग अडविण्याचा किंवा एकमेकांच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला नाही. दलितांना जागृत व संघटीत करून हिंदू धर्मातील जाती व्यवस्थे विरुद्ध आंबेडकरांनी एकीकडे लढा उभारला तर दुसरीकडे गांधी अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे आणि तो दुर करण्यासाठी जागृतीचे काम स्वातंत्र्य चळवळी सोबत गांधीनी हाती घेतले होते. हिंदू धर्मातून अस्पृश्यता जाणार नसेल तर हिंदू धर्म नष्ट झाला तरी चालेल अशी  टोकाची  धर्मवादी गांधीनी भूमिका घेतली होती . याचा मोठा परिणाम सवर्ण हिंदूंवर झाला होता हे मान्य करावे लागेल. याचा पुरावा म्हणून नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात सवर्ण हिंदूंच्या  आणि कॉंग्रेसच्या सहभागाकडे पाहता येईल. सत्याग्रहाच्या पाहणी साठी आलेल्या तत्कालीन आयुक्तांनी सत्याग्रहीचे जे वर्णन आपल्या अहवालात लिहून ठेवले आहे त्यात अनेक सत्याग्रहींनी खादी  वस्त्र व खादी टोपी परिधान केल्याचे आणि आंबेडकरांच्या सोबतच गांधींचा जयजयकार करीत होते असे वर्णन लिहून ठेवले आहे. मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करण्याची ही वेळ योग्य नाही असे गांधींचे मत असतांनाही गांधीनी कॉंग्रेस कार्यकर्ते व नेते यांना आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात सामील होण्यापासून रोखले नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. पुढे गांधीनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी यात्रा सुरु केल्याने या सत्याग्रहातील कॉंग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचा सहभाग कमी झाला होता तरी जाती निर्मुलनाचे आंबेडकरांचे प्रयत्न आणि अस्पृश्यता निर्मुलनाचे गांधींचे प्रयत्न हे दलित मुक्ती साठी पूरक ठरले हे ऐतिहासिक सत्य नाकारण्यात हशील नाही. पुढे तर गांधीनी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात दलितांच्या मंदिर प्रवेशाला स्थान दिले होते. याला आंबेडकरांनी विरोध केला असला तरी कॉंग्रेसने किंवा गांधीनी दलितांसाठी कार्यक्रम घेवू नये अशी त्यामागची भूमिका नव्हती तर दलितांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे असे आंबेडकरांनी गांधीना सुचविले होते. सांगायचा मुद्दा असा आहे कि आज गांधी आणि आंबेडकरांना एकमेकांचे शत्रू असल्यागत आणि गांधी दलित विरोधी असल्याचे जे विपर्यस्त चित्र आज उभे केले जात आहे त्याला ऐतिहासिक आधार नाही. उलट आंबेडकरांनी या प्रश्नावर दलितांना संघर्षासाठी तयार करणे आणि गांधीनी सवर्ण समुदायाची मानसिकता बदलण्याचा केलेला प्रयत्न यातून दलित मुक्तीच्या लढाईला बळ मिळाले . यातून जे वातावरण तयार झाले त्या वातावरणाच्या परिणामीच समतेवर आधारित भारतीय संविधान तयार झाले आणि मान्यही झाले हे विसरता येणार नाही. गांधींच्या अनुयायांचा भरणा असलेल्या संविधान सभेत आंबेडकरांना आपल्या मनासारखे संविधान मान्य करून घेता आले  त्यात  आंबेडकरांनी उभी  केलेली  दलित चळवळ आणि यातून उभी राहिलेली दलित शक्ती जेवढी कारणीभूत होती तितकीच गांधीनी सातत्याने केलेली जागृती आणि यातून तयार झालेले जनमत कारणीभूत होते . जाती व्यवस्थेच्या निर्मुलनासाठी असे दोन्ही आघाड्यावर काम चालल्याने जाती निर्मुलनाच्या कार्याला यश मिळत गेले होते. पण गांधी - आंबेडकरा नंतर त्यांच्या अनुयायांनी या प्रश्नावर संघर्ष आणि जागरण सोडून दिल्याने जाती व्यवस्था टिकूनच राहिली नाही तर नव्याने मजबूत होवू लागली आहे. आज या प्रश्नावर ना सवर्ण आघाडीवर काम होत आहे ना दलित आघाडीवर . आमिरखानने दाखविलेल्या आरशात जातीवादाचे आणि अस्पृश्यतेचे जे भेसूर चित्र दिसले ते याच मुळे. 

                                           नव्या लढाईची गरज 

गांधींच्या मृत्यू नंतर गांधी सोबत त्यांची अस्पृश्यता निवारणाची चळवळही संपली. स्वातंत्र्याच्या लढाईतील कॉंग्रेस देखील त्यांच्या सोबतच संपली. त्यांचा वारसा चालविण्याचा दावा करणाऱ्या सत्तेतील आणि सत्ता निरपेक्ष अनुयायांनी ही लढाई कधीच गांभीर्याने पुढे नेली नाही. स्वातंत्र्यानंतर उरला तो आंबेडकरांचा एकाकी लढा. पण दलित मुक्तीच्या लढाईच्या रथाचे  सवर्णात बदल घडवून आणण्याचे एक चाकच निखळून पडल्याने जो अपघात झाला त्याचे पर्यावसन धर्मांतरात झाले. यातून सवर्णांची मानसिकता बदलण्याचे कार्य आणखी मागे पडले. पण धर्मांतर करूनही दालीताची मुक्ती संभव झाली नाही याचे कारण सवर्णाच्या मानसिकतेत बदल घडविण्याचे काम थांबल्यात सापडते. आंबेडकरांच्या निर्वाणा नंतर तर दलित मुक्तीच्या रथाचे दुसरे चाक ही निखळून पडले. आंबेडकरांच्या प्रयत्नाने आणि राज्य घटनेचे संरक्षण लाभल्याने शिक्षित झालेली दलितांची पिढी समाज प्रवाहात आपले स्थान बळकट करण्यात गुंतली. पण दालितातील मोठया समूहाला असे शिक्षित होवून समाजात सामावून जाण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांना पुन्हा सवर्णाच्या अत्याचाराला बळी पडावे लागत आहे. कारण  आंबेडकरांनी ज्या पद्धतीने दलितांना संघटीत करून संघर्षाला प्रेरित केले , दालीतात नवा आत्मविश्वास निर्माण केला ते कार्य करण्याची कोणाचीच तयारी नाही. प्रस्थापित दलित बांधवाना आणि आंबेडकर 
चळवळीचे फलित म्हणून जे उच्च शिक्षा विभूषित होवू शकले अशा नव तरुणांना मागे राहिलेल्या दलित बांधवाची आठवण येण्यासाठी अत्याचाराची घटना घडावी लागते. अशी घटना घडली कि हे तरुण जरूर चवताळून बाहेर येतात. दगडफेक करून थकल्यावर आपल्या घरट्यात परततात. पण दलितांवर अन्याय आणि अत्याचार होणारच नाहीत अशा पद्धतीने आंबेडकरा सारखे सातत्यपूर्ण कार्य आणि चळवळ करायची कोणाची तयारी नाही. एकीकडे गांधी चळवळ मृतप्राय झाली तर दुसरीकडे आंबेडकर चळवळीला उत्सवी आणि धार्मिक स्वरूप आले आहे. मुलभूत परिवर्तनाकडे लक्ष देण्या ऐवजी दलित तरुण गांधीना लक्ष्य आणि भक्ष्य बनविण्यात पुरुषार्थ मानू लागली आहेत. असे करताना दलितांना लक्ष्य व भक्ष्य बनविणाऱ्या सनातनी हिंदूंचा वारसा पुढे चालविणाऱ्या तरुणांच्या मनातील गांधी विषयीची मळमळ ते ओकतात याचेही भान दलित तरुणांना राहात नाही. एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करण्याची गांधीनी दाखविलेली तयारी त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाशी जोडून गांधींची हिंदुत्ववाद्यांनी जी सातत्याने खिल्ली उडविली आहे त्याचा संदर्भ दलित तरुणांनी लक्षात घेतला पाहिजे. सवर्ण हिंदुनी दलितांवर एवढे अत्याचार केले आहेत कि त्यामुळे चिडून कोण्या दलिताने मला हिंदू समजून माझ्या श्रीमुखात लगावली तर मी त्याचा प्रतिकार करणार नाही दुसरा गाल पुढे करीन असे गांधी म्हणाले होते.  पुणे कराराच्या नावाने किती काळ आम्ही गळे काढीत बसणार आहोत ? गांधीनी उपोषणाचा अस्त्र म्हणून वापर करून पुणे करार मान्य करायला भाग पाडण्याची घोडचूक केली हे खरे असले तरी पुणे करारात अंतर्भूत प्रश्नाकडे राजकीय मतभेद म्हणूनच पाहिले गेले पाहिजे. स्वतंत्र मतदार संघाला विरोध म्हणजे दलित विरोध असे  समीकरण मांडणे चुकीचे आहे. स्वतंत्र मतदार संघाचा निवाडा येण्याच्या आधी स्वत: बाबासाहेब अशा मतदार संघाला अनुकूल नव्हते. मुस्लीम समाजाला स्वतंत्र मतदार संघ बहाल केले नसते तर आपण कधीच दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ मागितले नसते असे त्यांनी स्पष्ट प्रतिपादन केले होते.गांधींच्या उपोषणा आधी अनेक दलित नेत्यांनी देखील स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला होता आणि हा विरोध एवढा तीव्र होता कि नागपुरात आंबेडकरांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. पुणे  कराराकडे गांधीनी आंबेडकरांना झुकविले असे पाहणेच चुकीचे आहे. या करारामुळे आंबेडकरांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी सोडावी लागली तरी इंग्रजांनी देवू केले  होते  त्या पेक्षा जवळपास दुप्पट  मतदार संघ दलितांसाठी मिळविण्यात आंबेडकर यशस्वी झाले होते हे विसरून चालणार नाही. इतिहासातील घटनेकडे सत्याचा विपर्यास करून पाहण्याने दलित चळवळीचे भले होणार नाही. गांधीचे तत्वज्ञान म्हणून जे पुढे मांडल्या जाते त्यात टाकाऊ आणि कालबाह्य गोष्टींचा भरणा अधिक असला तरी पूर्वग्रहातून मुक्त होवून दलित तरुणांनी आणि विचारवंतानी गांधीच्या दलित मुक्तीतील योगदानाचे पुनर्मुल्यांकन केले पाहिजे. कारण दलित मुक्तीसाठी आंबेडकर मार्ग जितका अपरिहार्य आहे तितकीच सवर्णांच्या परिवर्तनाच्या गांधी मार्गाची देखील गरज आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी ही गरज प्रकर्षाने सर्वांच्या लक्षात आली होती . त्या काळात जयप्रकाश आंदोलनातून निर्माण झालेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून आम्ही चंद्रकांत वानखडे, मोहन हिराबाई हिरालाल,डॉ.सुगन बरंठ  यांच्यासह तरुणांची नामांतर यात्रा विदर्भात काढली होती. या यात्रेचे दालीताकडून स्वागत झाले तरी सवर्ण उदासीन होते हे लक्षात घेवून आम्ही यात्रा सवर्ण वस्तीतच थांबेल आणि सवर्णांनी खाऊ घातले तरच जेवू असा संकल्प काही ठिकाणी उपाशी राहून पूर्णत्वाला नेला होता. पण हा प्रयत्न प्रतीकात्मक होता. दलित मुक्तीसाठी अशा प्रयत्नांना चळवळीचे स्वरूप येणे गरजेचे आहे. अशा प्रयत्नांना आंबेडकरी चळवळीचा भाग मानण्याची गरज आहे. दलित मुक्तीच्या रथाचे गांधी आणि आंबेडकर ही निखळून पडलेली दोन्ही चाके पुन्हा त्या रथाला जोडल्याशिवाय दलित मुक्तीचा रथ पुढे जावू शकत नाही हे समजून घेण्याची हीच वेळ आहे. 

                                    (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि.यवतमाळ 

Wednesday, July 4, 2012

मिट्टी बोले , माटी बोले - '(अ) सत्यमेव जयते '!

---------------------------------------------------------------------------------
हरित क्रांती पूर्वी  सेंद्रीय शेती करीत असताना शेतकरी सुखी नव्हता आणि हरित क्रांती आणण्यासाठी  तो शेतीत रसायने वापरू लागला तरी सुखी नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सेंद्रीय शेती कि रासायनिक शेती हा वाद निरर्थक आहे. कोणत्याही पद्धतीने शेती केली तरी शेतकऱ्याचे मरण अटळ आहे. कारण शेतकऱ्याच्या मरणाची बिजे सरकारच्या धोरणात आणि सुखी समाजघटकाच्या मनोवृत्तीत दडले आहे. ही गोष्ट समजणे अर्थातच आमिरखान आणि त्याच्या टीमच्या कुवती बाहेरचे आहे.
---------------------------------------------------------------------------------


चित्रपट अभिनेते आमिरखान यांची  दूरदर्शन आणि इतर वाहिन्यावरून प्रसारीत होणारी  'सत्यमेव जयते' ही मालिका  बरीच  लोकप्रिय झाली  असून  चर्चेचा विषय देखील बनली  आहे. महत्वाच्या सामाजिक समस्यांची दखल घेवून त्या संबंधी जन जागरण करण्याचा स्तुत्य प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे. मालिकेतून नवे प्रश्न किंवा नवे उत्तर मांडण्याचा प्रयत्न झाला अशातला भाग नाही. ज्या प्रश्नांवर सरकारी व सामाजिक संघटनाच्या पातळीवर भरपूर प्रयत्न झालेत तेच प्रश्न समोर ठेवण्यात आले आहेत. पण कसलेला कलाकार असलेल्या आमिरखानची प्रश्न मांडण्याची हातोटी पूर्वीच्या प्रयत्नावर मात करून गेली आहे. सरकारी व सामाजिक संघटनांनी वर्षानुवर्षे प्रयत्न करून अशा प्रश्नावर जागरण करण्यात जितके यश मिळविले त्या पेक्षा अधिक यश आमिरखानच्या दिड तासाच्या कार्यक्रमाने मिळविले. आमिरखानचे कलाकार म्हणून असलेले आकर्षण आणि त्याने घेतलेली मेहनत कार्यक्रमाच्या यशाला जितकी कारणीभूत आहे तितकीच 'सांस-बहु'च्या अतिरेकी मालिकांच्या माऱ्याने कंटाळलेल्या प्रेक्षकांना सामाजिक समस्यांची मांडणी करणारी मालिका त्यातील नाविन्या मुळे आवडली तर नवल वाटायला नको.  समाजात सामाजिक प्रश्नांबाबत फारसे दुमत नसते व त्या सोडविण्याच्या आवश्यकतेवर तोंड देखले एकमत  देखील असते. म्हणूनच कार्यक्रमात स्वत:च्या सुनांना छळणाऱ्या सासवा  दुसऱ्यांच्या सुनांचा छळ पाहून हेलावून जातात आणि त्यांचा पदर आपसूक डोळ्याला लागतो. आपल्या दांभिकतेचे सद्गुनात रुपांतर करण्याची  संधी अशा कार्यक्रमातून मिळण्याची सोय हे देखील ही मालिका लोकप्रिय होण्यामागचे कारण आहे. डॉक्टर मंडळीवर बेतलेल्या भागाने निर्माण झालेला वाद आणि खळबळ ही मालिका अधिक लोकप्रिय बनवून गेली. असंवेदनशील बनत चाललेल्या डॉक्टर मंडळीवरच्या लोकांच्या रागाला आमिरखानने वाट मोकळी करून दिल्याने तर हिरो असलेला आमिरखान सुपर हिरो बनला आणि त्याची मालिकाही सुपरहिट बनली. वाद निर्माण करून चित्रपट सुपरहिट करण्याचा नुस्खा मालिकेलाही लागू होतो हे लक्षात आल्यावर आमिरखान सारखा मुरलेला कलाकार मालिकेच्या पुढच्या भागात नव्या वादांची पेरणी करणार हे ठरल्या सारखेच होते. नंतरच्या एका भागात शेती संबंधीचे जे चित्रीकरण व सादरीकरण झाले त्यातून लगेच याची पुष्ठी झाली. मालिकेच्या या भागात सेंद्रीय शेती विरुद्ध रासायनिक शेती या वादाला खमंग फोडणी देवून हा वाद रंगविण्यात आला. रासायनिक शेतीच्या परिणामाचे भीषण व भीतीदायक चित्र प्रेक्षकांसमोर मांडून सेंद्रीय शेतीच्या बाजूने कौल दिला गेला. रासायनिक शेतीबद्दलचे रंगविलेले अति अतिरंजित चित्रण सोडले तर या बाबत तक्रार करावे असे काही नाही. रसायनाचे मानवी शरीरावर परिणाम होतच असतात. आपण आजारी पडलो कि जी आधुनिक औषधी घेतो त्याचे जसे मानवी शरीरावर परिणाम होतात , तसेच परिणाम शेतीत वापरल्या जाणाऱ्या रसायनाचेही संभवतात. आजारी पडले तरी औषध घेवू नका अशी सांगणारी आणि औषधाविना उपचार करून बरे करण्याचा दावा करणारी हकीम मंडळी जशी वैद्यकीय क्षेत्रात असतात तशीच शेतीक्षेत्रातही रासायनिक शेती ऐवजी सेंद्रीय शेती कडे वळा अशी सांगणारी मंडळी आहे. यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. याच पद्धतीने आमिरखानला सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करायचा असेल तर त्यावरही आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण आज जी शेती समस्या आहे त्याच्या मुळाशी शेती करण्याची पद्धत आहे किंवा शेतकरी आत्महत्ये साठी शेती करण्याची पद्धत कारणीभूत आहे असा दावा आमिरखानने केला तो मात्र अत्यंत आक्षेपार्ह आहे. शेती समस्या काय आहे आणि शेतकरी आत्महत्या का करतात याबद्दलचे संपुर्ण अज्ञानच यातून प्रकट होते. शेती समस्ये बाबतची आमिरखानने केलेली मांडणी नुसतीच सवंग आणि  वरवरचीच नाही तर चुकीची देखील आहे. शेतकऱ्याला अडाणी आणि अज्ञानी समजून त्याने शेती कशी केली पाहिजे , काय करावे आणि काय करू नये असा त्याला उपदेश करणाऱ्या मंडळीची    आपल्याकडे कमी नाही. अगदी क्षुल्लक कारणासाठी समारंभपूर्वक मेजवान्या देणारी मंडळी शेतकऱ्यांनी लग्न समारंभावर खर्च करता काम नये असा हितोपदेश करीत असतात. तेच त्यांच्या कर्जबाजारी पणाचे कारण असल्याचे ते ठाम प्रतिपादन करीत असतात. पण ही मंडळी समारंभपूर्वक ज्या मेजवान्या देतात त्यातून त्यांची भरभराट होते आणि आवश्यक अशा समारंभावरचा अल्प खर्च देखील शेतकऱ्याला का कर्जबाजारी बनवितो हा प्रश्न या मंडळीना कधीच पडत नाही. शेती परवडत नाही म्हणून जोड धंदे करा असा सल्ला देणाऱ्याची देखील कमी नाही. पण हा सल्ला मानून गाई-म्हशी किंवा कोंबडी-बकरी पालन करायचे शेतकऱ्यांनी ठरविले तर त्याच्यावर कर्जाचा बोजा तेवढा वाढतो हे या सल्लागारांना कधीच दिसत नाही. दिसत नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी डोळ्यावर सोयीस्कर झापडे लावलेले असते. कारण शेतकऱ्यांनी असे जोड धंदे केले कि यांना स्वस्तात दुध-दुभत्यावर आणि मांसावर ताव मारता येतो ! आता रासायनिक शेती सोडून सेंद्रीय शेती केली कि शेतकरी कर्जमुक्त आणि सुखी होईल असा संदेश शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकरी जेव्हा शेतीत रासायनिक खताचा वापर करीत नव्हता किंवा पिकांवर कीटक नाशकाची फवारणी करीत नव्हता तेव्हा सुखी होता का याचा कोणी विचार करीत नाही. तेव्हा शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज नसल्याचा खोटा गवगवा केला जात आहे. शेतकऱ्याला तेव्हा कर्ज घेण्याची गरज नव्हती तर गावोगावी सावकार कसे निर्माण झाले आणि कशाच्या बळावर त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या या प्रश्नांचे उत्तर या मंडळीनी दिले पाहिजे. हरित क्रांती पूर्वीच्या सेंद्रीय शेतीने शेतकऱ्याच्या दारिद्र्यात वाढच होत होती. तो केवळ कर्जबाजारीच नव्हता तर त्याच्या कुटुंबाची उपासमारही होत होती. हरित क्रांती नंतर तो पूर्वीच्या तुलनेत अधिक कर्जबाजारी झाला असला तरी त्याची व त्याच्या कुटुंबीयाची उपासमार आता होत नाही हे सत्य नाकारता येत नाही. दरवर्षी शेतीतल्या तोट्यात भर पडत असल्याने त्याचा कर्जबाजारीपणा वाढत जाणे अपरिहार्य आहे. त्याचा रासायनिक खत किंवा कीटकनाशकाच्या फावारनिशी फारसा संबंध नाही. रासायनिक खत किंवा कीटकनाशकाच्या फवारनीतून निर्माण झालेल्या अन्न-धान्याने सुखासीन लोकांचे आरोग्य धोक्यात येत असेलही पण रासायनिक खते किंवा कीटकनाशक औषधी मुळे शेतकऱ्याचे आर्थिक आरोग्य बिघडले असे म्हणणे शेती प्रश्ना बद्दलचे अज्ञानच दर्शविते. सेंद्रीय शेती करीत असताना शेतकरी सुखी नव्हता आणि आज तो शेतीत रसायने वापरू लागला तरी सुखी नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सेंद्रीय शेती कि रासायनिक शेती हा वाद निरर्थक आहे. कोणत्याही पद्धतीने शेती केली तरी शेतकऱ्याचे मरण अटळ आहे. कारण शेतकऱ्याच्या मरणाची बिजे सरकारच्या धोरणात आणि सुखी समाजघटकाच्या मनोवृत्तीत दडले आहे. ही गोष्ट समजणे अर्थातच आमिरखान आणि त्याच्या टीमच्या कुवती बाहेरचे आहे. त्याने चुकीच्या पद्धतीने शेती प्रश्न मांडण्या ऐवजी त्या प्रश्नाला हातच घातला नसता तर ते जास्त शेतकरी हिताचे ठरले असते असेच आता म्हणावे लागेल. पण सत्यमेव जयतेच्या या भागात नुसतेच अज्ञान नव्हते तर अतिरंजित आणि अशास्त्रीय थाटाचा प्रचार असल्याने शेतकरी समुदाया बद्दलच्या सुखी सदरा घालणाऱ्या समाजाच्या गैरसमजात अधिक भर पडणार आहे. 

                                                    अतिरंजित आणि प्रचारकी

कीटक नाशकाचे दुष्परिणाम हे औषधी सेवनाच्या दुष्परिणामांसारखेच असतात. पण सत्यमेव जयते मध्ये रंगविण्यात आलेले चित्रण टोकाचे अतिरंजित असून शेतकरी आपल्या स्वार्थासाठी इतरांना विष खाऊ घालतात असा गैरसमज यामुळे पसरणार आहे.  अन्ना मधील विषाची ही कथा म्हणूनच विषारी आणि विखारी बनली आहे. यात केरळ मधील एका जिल्ह्याचे, राजस्थान मधील एका जिल्ह्याचे आणि पंजाब प्रांताचे उदाहरण देण्यात आले. एन्डोसल्फान मुळे केरळ च्या त्या जिल्ह्यात किती वाईट परिणाम झाले आहेत हे दाखविण्यात आले. या कथेतील पक्की कडी एवढीच आहे कि रोगग्रस्त मुले आणि व्यक्ती खऱ्या आहेत. या एका कडीत अनेक कमजोर कड्या गुंफून कथा तयार झाली आहे. यातील पहिली कमजोर कडी ही आहे कि ज्या रोगाचे वर्णन करण्यात आले आहे तो रोग एन्डोसल्फानचा वापर या भागात सुरु होण्या आधीपासून अस्तित्वात असल्याचे वैद्यकीय दाखले उपलब्ध आहेत.  तो रोग ज्या कारणाने झाला असेल त्यात एन्डोसल्फानची भर पडून किंवा एन्डोसल्फानचा संयोग होवून अधिक फोफावला असणे शक्य आहे. जसे एखादे औषध एखाद्या व्यक्तीवर विपरीत प्रतिक्रिया करते तसेच एन्डोसल्फानची त्या भागात विपरीत परिणाम झाले असतील हे नाकारता येत नाही. जेथे एन्डोसल्फान विपुल प्रमाणात वापरले जाते त्या भागातील परिणामाचा अभ्यास न करता केरळच्या या भूभागाचा अभ्यास करण्यामागे हे विशेष कारण असू शकते. पण ज्याची प्रतिक्रिया होते असे औषध एखाद्या व्यक्तीला देणे टाळतात , तशीच त्या भागातील फवारणी टाळायला हवी होती. तेच औषध दुसऱ्या रोग्याला दिलेले चालते तसेच या कीटक नाशकाची फवारणी दुसऱ्या भागात केली जावू शकते. एन्डोसल्फानचा सर्वात कमी वापर केरळ राज्यात होत होता. पण या कीटक नाशकाच्या वापरात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,उ.प्र. या सारख्या राज्यात असे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत हे इथे लक्षात घेतले पाहिजे. परवडणारे आणि बहुविध पिकासाठी उपयुक्त असल्याने एन्डोसल्फान शेतकऱ्यात अधिक प्रिय होते. पण या कीटकनाशका विरुद्ध आघाडी उघडण्या मागची  सुद्धा एक कथा सांगितली जाते. आणि ती कथा अधिक तर्कसंगत असल्याने इथे सांगितली पाहिजे. इ.स्.२००० च्या आसपास एन्डोसल्फानचे पेटंट संपुष्टात आल्याने इतर ठिकाणी याचे उत्पादन सुरु झाल्याने मूळ उत्पादक असलेल्या  युरोपियन  कंपनीच्या उत्पादनाची मागणी घटून त्या कंपनीला एन्डोसल्फानचे उत्पादन परवडेना. त्यामुळे कंपनीने ते उत्पादन बंद करून पर्यायी उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. पण नवे उत्पादन विकायचे असेल तर एन्डोसल्फान चे उत्पादन जगभरातून बंद होणे गरजेचे होते. म्हणून युरोपीय राष्ट्रात आणि भारतासारख्या देशात एन्डोसल्फानच्या दुष्परिणामांचे अहवाल तयार
झालेत. सुनिता राव यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या पर्यावरणावर काम करणाऱ्या ज्या संस्थेने केरळ मधील परिणामाचा अभ्यास केला त्या संस्थेला या अभ्यासासाठी कोट्यावधी डॉलर्स युरोपियन राष्ट्रांनी पुरविल्याचे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने मान्य केले आहे. स्वयंसेवी संस्था खोटा अहवाल कशाला तयार करतील या आमिरखानने विचारलेल्या भाबड्या प्रश्नाचे उत्तर यात दडलेले असू शकते. एन्डोसल्फान वापरलेला कोणताही शेतकरी दाखविण्यात आलेल्या दुष्परिणामांवर विश्वास ठेवणार नाही , पण ज्यांचा शेतीशी आणि या किटकनाशकाच्या फवारनिशी संबंध आला नसेल त्यांचा मात्र चटकन विश्वास बसेल. तसा विश्वास बसल्यानेच एन्डोसल्फान वर बंदी आली आहे . पंजाब मधून रोज रेल्वेने भर भरून कॅन्सरचे रोगी राजस्थानातील एका रुग्णालयात जातात हा ही असाच अतिरंजकतेचा रंजक नमुना आहे. बारा डब्याची कॅन्सर ट्रेन गृहित धरली आणि बसण्यासाठी जेवढ्या जागा आहेत तेवढेच रुग्ण त्यातून जातात असे गृहित धरले तर रोज हजार रुग्ण पंजाबातून राजस्थानात उपचारासाठी जातात असा त्याचा अर्थ होतो. हे सत्य असेल तर सारा पंजाबच कॅन्सरग्रस्त असला पाहिजे. पण तशी वस्तुस्थिती नाही.उलट भारतातील सर्वात राकट आणि धडधाकट माणसे पंजाबातच आढळतात. पर्यावरणाचा बाऊ करून पैसे लाटणाऱ्या संस्थांच्या जाळ्यात आमिरखानच्या सत्यमेव जयतेचा हा भाग अडकल्याने शेती आणि शेतकरी यांच्या संदर्भातील चुकीचे चित्र आणि शेती समस्येचे चुकीचे निदान समोर आले आहे . एकीकडे रसायनिक खते आणि कीटक नाशकामुळे शेतकरी कर्ज बाजारी होवून आत्महत्या करीत असल्याचे सांगत असतानाच ज्या २-३ शेतकऱ्याच्या मुलाखती कार्यक्रमात दाखविण्यात आल्या ते स्वत:साठी सेंद्रीय धान्य पिकवितात पण बाजारातील फायद्यासाठी रासायनिक शेती करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे! यावरून आमिरखान , त्याची टीम आणि आपल्याला पाहिजे तसे आमिरखानच्या तोंडून वदवून घेणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांचा गोंधळ लक्षात येईल.

                                    सुखी समाजाचा प्रश्न
आज काम केले नाही तर उद्या खायचे काय असा प्रश्न पडणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य सेंद्रीय शेतीतील आहे कि रासायनिक शेतीतले हा प्रश्न कधीच पडत नाही. सुखी माणसाला पडणारा हा प्रश्नच आमिरखानला हाताळायचा होता. शेतकरी आत्महत्या हा त्याच्यासाठी तोंडी लावण्याचा विषय होता. त्याची चिंता सर्व सूख संपन्न लोकांचे दररोज विष असलेले अन्न खाऊन त्यांना कोणत्या व्याधी होवू नयेत हीच होती. त्याला शेतकरी आत्महत्येची चिंता असती तर त्या प्रश्नावर खोटे अश्रू ढाळनाऱ्या त्याच्या समोरील आणि दूरचित्रवाणीसमोर बसून कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना शेतकरी आत्महत्ये साठी ते सुद्धा जबाबदार आहेत हे दाखवून देता आले असते. कांद्याच्या भावात थोडीशी वाढ झाली कि मोठा कांगावा करून , निर्यात बंद करायला लावून भाव पाडल्या जातात आणि आपले उत्पादन मातीमोल भावाने विकावे लागल्याने त्याला आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय उरत नाही हे सोपे गणित प्रेक्षकांना सांगता आले असते. सरकारची शेती विरोधी मनमानी धोरणे  आणि मध्यमवर्गीय व उच्चभ्रू समाजाची फक्त अन्नधान्याच्या बाबतीतील स्वस्ताईची  हाव शेतकऱ्याला फासावर चढवीत आहे हे सत्य दडवून शेती आणि शेतकऱ्याच्या दुरावस्थेची भलतीच कारणे लोकांच्या गळी उतरविण्यात आमिरखानचा 'सत्यमेव जयते' यशस्वी झाल्याने प्रत्यक्षात  असत्याचा विजय झाला आहे ! 
                                                                             (संपुर्ण)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा,
जि- यवतमाळ