'अर्थक्रांती'ची किमया साध्य करायची असेल तर खेडोपाडी बँकेचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. आज ग्रामीण भागात बँकांचे जाळे नसण्याचे एकमेव कारण ग्रामीण भागात पैसा नसणे हे आहे. कर्जाऊ पैसे वाटपासाठी बँकांनी शाखा उघडाव्यात हे अव्यावहारिक आहे. असे जाळे निर्माण झाले नाही तर 'अर्थक्रांती'चे सर्व सिद्धांत कागदावरच राहतात ही खरी गोम आहे. म्हणूनच शेती व्यवसायाची भरभराट होणे किंवा हा व्यवसाय फायदेशीर होणे ही अर्थक्रांतीची पूर्व अट असणे अपरिहार्य ठरते.
-------------------------------------------------------------------------
देशासमोरील सर्वात मोठे आणि जटिल प्रश्न लीलया सोडविण्याचा दावा करणाऱ्या 'अर्थक्रांती'च्या सिद्धांताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी औरंगाबाद शहरातून चारी दिशांनी समर्पण यात्रा निघाली आहे. अर्थक्रांतीचे सिद्धांत शेतकरी आत्महत्या पासून दहशतवादापर्यंतच्या सर्व समस्यांवर उपयुक्त असल्याचा दावा करीत असले तरी हे सिद्धांत मुलत; आर्थिक आहेत. निव्वळ अर्थकारणावर आधारित निघालेली ही देशातील बहुधा पहिली यात्रा असावी. भावनिक मुद्द्यावर आधारित बाबा आमटेंच्या भारत जोडो पासून ते लालकृष्ण अडवाणींच्या मस्जिद तोडो यात्रा सारख्या अनेक यात्रा या देशाने पाहिल्या आहेत. पण निव्वळ जडवादी , ऐहिक म्हणता येईल अशा आर्थिक विषयावर यात्रा काढण्याचे आणि ते सुद्धा तद्दन आर्थिक निरक्षर असलेल्या लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याच्या उद्देश्याने यात्रा काढणे हे साहसिक कार्य आहे. स्वत;च्या खिशातून खर्च करून यात्रा काढायला समर्पणाची भावनाच लागते आणि त्या दृष्टीने विचार करता यात्रेला 'समर्पण यात्रा' हे नाव समर्पकच म्हंटले पाहिजे. अशा त्यागी वृत्तीचा आपल्या समाजात जरा जास्तच आदर केला जातो. त्यामुळे त्याग आणि समर्पनाकडे लोकांचे जास्त लक्ष जाते आणि ज्या मुद्द्यासाठी त्याग व समर्पण केल्या जाते तो मुद्दा दुय्यम ठरतो ही आमची परंपरा राहिली आहे. या यात्रेत सुद्धा हीच परंपरा कायम राहिली तर यात्रेचे तेवढे कौतुक होईल पण मुद्द्याची गोष्ठ बाजूला राहील. म्हणूनच यात्रेकरूंच्या त्यागाला दुय्यम स्थान दिले तरच यात्रेच्या हेतूची व मुद्द्याची चिकित्सा संभव आहे. अन्यथा चिकित्सा करायला गेले कि लोकांचा हमखास आक्षेप असतो कि कोणी तरी काही तरी करते ना मग त्यांना का हतोत्साहित करता ! कृती मागे वैयक्तिक स्वार्थ दडला नसेल तर ती कृती चांगलीच असते असा आमचा पक्का समज असतो आणि हा समज चिकित्सा करण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. आर्थिक विषयाच्या बाबतीतील असा अडथळा चुकीच्या धोरणात परिवर्तीत होवून अनर्थकारी ठरण्याचा धोका असतो. ही यात्रा बाबा आणि महाराजांच्या चरणाजवळ जावून थांबणार असल्याने भाबड्या भक्तांचा उर आधीच भरून आलेला असेल . या यात्रेची चिकित्सा करण्यातील ही दुसरी मोठी अडचण आहे. ऐहिक किंवा जडवादी मुद्द्यावरील यात्रेचा समारोप मठात किंवा मठाधिपतींच्या चरणी करण्याची कृती म्हणूनच बुचकाळ्यात टाकणारी आहे. हे चौघेही महाराज वंदनीय असले तरी त्यांची आर्थिक समस्यांची समज तोकडी असल्याबद्दल यात्रेच्या आयोजकाचेही दुमत नसेल. चिकित्से शिवाय लोकमान्यता मिळविण्याचा तर हा खटाटोप नाही ना असे कोणाला वाटले तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. यात दुसराही महत्वाचा मुद्दा दडला आहे. राज्यसत्ते पेक्षा धर्म सत्ता श्रेष्ठ आणि महत्वाची या धारणेचे पुनरुज्जीवन यातून होण्याचा धोका आहे. यात्रेतील मुद्दे सरळ सरळ देशाच्या आर्थिक धोरणाशी निगडीत आहेत. यावर धोरणकर्त्याशी संवाद आणि संघर्ष करण्याची गरज आहे. या यात्रेने धोरणकर्त्यासामोरच आपले म्हणणे मांडणे गरजेचे होते. यात्रेतून निर्माण होणाऱ्या जनमताचा दबाव धोरणकर्त्यावर आणण्या ऐवजी धोरण ठरविणारी दुसरीच सत्ताकेंद्रे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यायलाच हवी होती. पण बाबा-महाराजांची आर्थिक निरक्षरता दुर करण्याचा आयोजकांचा खटाटोप असेल तर मात्र यात्रेची दिशा आणि मार्ग अगदी बरोबर असल्याचे मान्य करावे लागेल. गेल्या एक-दोन वर्षात या बाबा आणि महाराजांनी आर्थिक प्रश्नात घातलेले लक्ष ,व्यक्त केलेली मते , हाती घेतलेले कार्यक्रम आणि त्याचे झालेले परिणाम लक्षात घेता अशा प्रयत्नाची मोठी गरज होती. या यात्रेने ही गरज पूर्ण केली तर त्याच्या इतके देश हिताचे दुसरे कार्य असू शकत नाही .
अर्थक्रांतीची चिकित्सा
सर्व सामान्य लोकांना आर्थिक सिद्धांत कळत नाहीत , अर्थ व्यवहारातील तांत्रिक गोष्ठी कळत नाहीत या अर्थाने त्यांना निरक्षर म्हणता येईल . पण अर्थ व्यवहारात मात्र सामान्य माणूस कुशल असतो. पण बाबा-महाराजांचे तसे नसते. त्यांना परमार्थ जास्त महत्वाचा वाटत असल्याने ते कधीच आर्थिक सिद्धांताकडे लक्ष देत नाहीत. अर्थ व्यवहार म्हणजे पाप कृत्य अशी समजूत असल्याने अर्थ व्यवहारापासून दुर राहणेच ते पसंत करतात. खऱ्या अर्थाने ते आर्थिक निरक्षर असल्याने त्यांना आर्थिक भान देणे जास्त गरजेचे आहे .त्यांचे आर्थिक अज्ञान दुर करण्याचे सामर्थ्य समर्पण यात्रा प्रचारित करीत असलेल्या 'अर्थाक्रांती'च्या सिद्धांतात नक्कीच आहे. आपल्या देशात बाबा आणि महाराज या मंडळीसह बहुतेकांचा जोर माणूस बदलण्यावर असतो. माणूस प्रामाणिक आणि चारित्र्यवान बनला कि सगळ्या समस्या सुटतील असे त्यांना वाटते. माणसातील बरे वाईट गुण व्यवस्थेचा परिपाक असतो हे त्यांच्या गावीही नसते. व्यवस्था बदलण्या ऐवजी कठोर शिक्षेची तरतूद करून माणसे ताळ्यावर आणण्याचा त्यांचा आग्रह असतो. मात्र भ्रष्टाचार, कर बुडवेगिरी किंवा लबाडी करण्यास व्यवस्था कारणीभूत असते हे आर्थिक क्रांतीचे मुलभूत तत्व आहे. समर्पण यात्रा बाबा , महाराज किंवा बाबा वाक्यम प्रमाणंम मानणारे त्यांचे अनुयायी यांच्या गळी हे वास्तव उतरविण्यात यशस्वी झाली तर बाबा आणि महाराजांच्या आंदोलनाला दिशा मिळेल. व्यक्ती ऐवजी त्यांची आंदोलने व्यवस्था केंद्रित होतील. काळ्या पैशाला माणसाच्या व्यवहारापेक्षा कर प्रणाली अधिक जबाबदार असल्याचे सत्य अर्थक्रांती अधोरेखित करते. विविध प्रकारच्या करा ऐवजी एकाच प्रकाराचा कर असावा आणि तो एकाच ठिकाणी कापण्यात यावा ही अर्थक्रांती मधील सर्वात व्यावहारिक आणि परिणामकारक तरतूद आहे. फॉर्म भरणे,चलान भरणे ,रांग लावून पैसे भरणे अशा कटकटी पासून मुक्तता अर्थक्रांती देते. आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक उलाढालीवर कर हा एकमेव कर असणारी व्यवस्था असेल तर नाना प्रकारच्या करा पेक्षा जास्त कर संग्रह शक्य आहे आणि अशा कर संग्रहासाठी नोकरशाहीची आवश्यकता समाप्त करण्याची किमया अर्थक्रांतीचा कर संग्रहाचा सिद्धांत करू शकतो. पण ही किमया साध्य करायची असेल तर खेडोपाडी बँकेचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. आज ग्रामीण भागात बँकांचे जाळे नसण्याचे एकमेव कारण ग्रामीण भागात पैसा नसणे हे आहे. कर्जाऊ पैसे वाटपासाठी बँकांनी शाखा उघडाव्यात हे अव्यावहारिक आहे. असे जाळे निर्माण झाले नाही तर 'अर्थक्रांती'चे सर्व सिद्धांत कागदावरच राहतात ही खरी गोम आहे. म्हणूनच शेती व्यवसायाची भरभराट होणे किंवा हा व्यवसाय फायदेशीर होणे ही अर्थक्रांतीची पूर्व अट असणे अपरिहार्य ठरते. नेमके 'अर्थक्रांती,कार अनिल बोकील या बाबतीत स्पष्ट नाहीत. अर्थक्रांतीचे चांगले सिद्धांत लागू होण्यासारखी परिस्थिती नसण्यामागे शेतीत बचत न होणे, भांडवल संचय न होणे व यातून भांडवल खाऊन जगण्याची वेळ शेतकऱ्यावर येणे ही शेतीक्षेत्राची दुरावस्था कारणीभूत आहे हे 'अर्थक्रांती'कारांनी लक्षातच घेतले नाही. शेती बद्दल त्यांनी केलेल्या कल्पना काल्पनिक आहेत. त्यांच्या कल्पने प्रमाणे काळ्या पैशासकट सगळा पैसा बँकात जमा झाला तरी शेतकऱ्याला त्याचा फारसा फायदा होणार नाही. पत नसलेल्यांना पत पुरवठा कोण करील? उलट आजच्या परिस्थितीत काळा पैसा बँकात जमा होवून पांढरा झाला तर त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान संभवते ज्याचा कोणीच विचार करीत नाहीत. शेती सदैव तोट्याची राहात आल्याने त्याला भांडवल खाऊन म्हणजे शेतीचा तुकडा विकून जगावे लागते. ज्यातून उत्पादन खर्च भागण्या इतकेही उत्पन्न निघत नाही अशा शेतीला बऱ्यापैकी भाव मिळतो ही किमया काळ्या पैशाची आहे ! काळा पैसा सुरक्षितपणे गुंतविण्याचे शेती किंवा जमीन हे सोयीस्कर साधन आहे. शेतीतील परिस्थितीने जमीन विकण्याची अगतिकता असूनही त्याला बऱ्यापैकी भाव मिळतो याचे कारण काळा पैसा आहे. शेती फायदेशीर होण्या आधी काळा पैसा संपला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत आणि वेगात प्रचंड वाढ होईल. आज 'अर्थक्रांती'चे सिद्धांत मध्यम व उच्च मध्यम वर्गीयांना अनुकूल असल्याने ते तिकडे आकर्षित होत आहेत. पण आजच्या स्थितीत ते सिद्धांत अमलात आलेत तर ग्रामीण भागाच्या प्रतीकुलतेत वाढ होवून 'इंडिया-भारत' दरी अधिक रुंदावेल.
भांडवलाची कवी कल्पना
ही बाबा-महाराज मंडळी आपल्या आंदोलनात लोकांसमोर एक चित्र रंगवीत असतात. देशातील व देशा बाहेरील सगळा काळा पैसा विकास कामात वापरला तर सगळे सुजलाम सुफलाम होईल. जणू काही काळा पैसा पोत्यात भरून किंवा परदेशी बँकात पडून सडत असल्याचे ते भासवितात. लोकप्रिय मांडणीची गरज आणि अज्ञान यामुळे बाबा लोकांची ही मांडणी समजून घेता येते . पण आर्थिक व्यवहाराची जाण असणाऱ्या अनिल बोकीलानाही तसेच वाटावे हे आश्चर्यकारक आहे. कारण बहुतांश काळा पैसा जमीन आणि उद्योगाच्या उलाढालीत काम करीत असतो. मागे काळा पैसा पांढरा करण्यासाठी जी माफीची योजना आली त्यातून जास्त पैसा जमा न होण्या मागे हेच कारण होते. आज ही तशी योजना जाहीर झाली तर त्याचीच पुनरावृत्ती होईल . फारसा काळा पैसा बँकात जमा होणारच नाही . कारण तो सडत पडलेला नसून अर्थव्यवस्थेत आधीच गुंतलेला आहे. त्यामुळे विकासकामासाठी ऐयते भांडवल मिळेल हे निव्वळ स्वप्नरंजन आहे. जे थोडे फार जमा होईल ते शेती क्षेत्राच्या वाटयाला येणारच नाही. बँकेतील भांडवल ही 'अर्थक्रांती'च्या सिद्धांतातील बाबा आणि महाराजांच्या कल्पनांशी जुळणारी सर्वात बाळबोध कल्पना आहे. कदाचित या साम्यानेच समर्पण यात्रा बाबा - महाराजांकडे आकर्षित झाली असावी . ज्याने कधी गायी - म्हशी पाहिल्या नाहीत अशा एखाद्या शहरातील लहान मुलाने दुध कोण देते या प्रश्नाच्या उत्तरात दुध गवळी देतो असे सांगावे अगदी तसेच उत्तर भांडवल कुठून येईल या प्रश्नाला 'बँकेतून' असे मजेदार उत्तर 'अर्थक्रांती' देते ! भांडवल निर्मितीचा मुख्य स्त्रोत जेथे एकाचे शंभर दाने होवू शकतात ती जमीन आहे आणि तिथे बचत होवून भांडवल तयार होवून बँकेत जमा झाले तरच खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था गतिमान होवून देश सुजलाम सुफलाम होईल. 'अर्थक्रांती'तून नेमक्या या भांडवल निर्मितीचा सिद्धांत गायब आहे. सगळ्या नक्षत्रातून पावसाची नक्षत्रे वजा केली तर परिणामकारक अर्थाने वजाबाकी शून्य येईल , अगदी तसेच 'अर्थक्रांती'तून शेती समस्या वजा केली तर तिचे रुपांतर 'अर्थशून्य क्रांती'त होईल. अर्थक्रांतीची पाचही सूत्रे चांगली आहेत पण त्यात शेती समस्येचे समाधान नसल्याने 'अर्थक्रांती' अधुरी आणि अपुरीच नाही तर पोकळ बनली आहे.
(समाप्त)
सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ
No comments:
Post a Comment