Thursday, July 26, 2012

भारत नावाची खाप पंचायत


आपल्याकडे संघ परिवार हा सगळ्यात मोठा संस्कृती रक्षक म्हणून ओळखला जातो. या संघ स्वयंसेवकांचा ड्रेस कोड काय आहे? संघ स्वयंसेवक तर अर्धी चड्डी घालून रस्त्यावर संचलन करतात.आणि हे संचलन सर्वानी -अगदी स्त्रियांनी सुद्धा- पहावे अशी त्यांची इच्छा असते. मांड्या उघड्या असलेल्या स्वयंसेवकाला पाहून स्त्रिया उत्तेजित होतील असा विचार स्त्रियांनी तोकडे कपडे घातल्यानेच त्यांच्यावर अत्त्याचार होतात असे  म्हणणाऱ्यांच्या डोक्यात का येवू नये?
-------------------------------------------------------------------------------

उत्तर प्रदेशातील एका खाप पंचायतीने मुलीना मोबाईल वापरायला बंदी घालणारा आणि मुलींसोबतच ४० वर्षे वयाच्या  आतील महिलांनी एकट्याने बाजारात जाण्यावर किंवा फिरण्यावर बंदी घालणारा तालेबानी फतवा जारी केल्याने खाप पंचायती देशभर चर्चेचा विषय बनल्या आहेत. आसाम मधील गौहाटीच्या वर्दळ असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी कौरवांचा अंगी संचार झालेल्या तरुणांच्या घोळक्याने  जनता- जनार्दनरूपी पांडवाच्या उपस्थितीत एका तरुणीचे वस्त्रहरण केल्याच्या पार्श्वभूमीवर खाप पंचायतीच्या फतव्याची जास्तच निंदा होत आहे. खाप पंचायतीचे फतवे नवीन नाहीत. गावातील तरुण-तरुणींनी प्रेम विवाह करू नयेत , जाती बाहेर तर मुळीच विवाह करू नयेत यासाठीच खाप पंचायतीचा जन्म तर झाला नसावा ना असे वाटण्या इतपत या पंचायतीची विवाहां संदर्भात लुडबुड राहात आली आहे. या पंचायतीच्या पंचाचे आणि पंचायत क्षेत्रातील नागरिकांचे नाक एवढे नाजूक आहे कि गावातील एखाद्या घरातील मुला-मुलीने अशी हिम्मत केली तर लगेच यांचे नाक कापल्या जाते. कापल्या नाकाची भरपाई म्हणून प्रेम विवाह किंवा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याचा मुडदा पाडन्यासाठी खाप पंचायतीचे क्षेत्र नेहमीच कूप्रसिद्ध राहिले आहे. चंबळ खोरे  जसे दरोडेखोरांच्या आश्रया साठी   प्रसिद्ध आहे तसेच खाप पंचायती असलेला  भाग कुटुंबाचा आणि गांवाचा सन्मान राखण्याच्या नावाखाली सराईतपणे हत्त्या करणाऱ्या हत्त्याऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही.महिना-पंधरा दिवसातून सन्मान राखण्याच्या नावाखाली हत्त्या झाल्याचे वृत्त येतच असते. या हत्त्याऱ्यांची चंबळच्या डाकूंशी तुलना हा त्या डाकूंचा अपमान ठरेल.   चंबळच्या डाकूंच्या ज्या कथा आपण ऐकतो त्यात त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ते डाकू बनल्याचे समान सूत्र आपल्याला ऐकायला मिळते. पण खाप पंचायतीच्या क्षेत्रात तर आपल्याच कुटुंबातील सदस्यांची - मुख्यत: मुलीची - केवळ प्रेम विवाह केला किंवा दुसऱ्या जातीत लग्न केले म्हणून अतिशय निर्दयपणे हत्त्या केली जाते.  कुटुंबातील मुलाने असा प्रकार केला तर सहसा त्याचे कुटुंबीय त्याची हत्त्या करीत नाही. अशा विवाहाच्या कारणावरून मुलाची देखील हत्त्या होते पण ती मुलीच्या कुटुंबियाकडून .  वरच्या जातीतील मुलीने कनिष्ठ जातीतील मुलीशी लग्न करण्याचा अपराध केला तर मुलीचे कुटुंबीय आपल्या मुली सोबत त्या मुलाची देखील हत्त्या करतात. पण मुलाचे कुटुंबीय अशा कारणासाठी मुलाची हत्त्या करतात असे मात्र घडत नाही. यात सुद्धा नेहमी सारखाच मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो . कुटुंबीय जी कृती मुली साठी गुन्हा मानतात तीच कृती मुलांसाठी मात्र गुन्हा मानीत नाही. मुलीनी माती खाल्ली तरी यांच्या सन्मानावर चिखल उडतो आणि मुलाने शेण खाल्ले तरी यांच्या सन्मानावर थोडासाही डाग पडत नाही. त्याच मुळे खाप पंचायतीचा सगळा कटाक्ष आणि नजर मुलींच्या आणि महिलांच्या वागण्यावर केंद्रित होते. त्यातून त्यांनी मोबाईल वापरू नयेत , एकट्याने फिरू नये अशा फतव्यांचा जन्म होतो. देशाच्या राजधानीच्या अवती भोवती असलेल्या उ.प्र.,हरियाणा,पंजाब, राजस्थान या प्रांतातील जाट बहुल क्षेत्रात खाप पंचायतीची अशी हुकुमत चालते. या क्षेत्रात संघटीतपणे आणि जाहीरपणे मिशावर ताव देवून हा प्रकार घडत असल्याने चटकन नजरेत भरतो आणि चर्चेचा विषय बनतो. पण  खाप पंचायतीचा प्रभाव असलेल्या जाट बहुल क्षेत्राबाहेर या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही हे गौहाटीच्या वस्त्रहरणाने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे. मुलीनी आणि स्त्रियांनी काय केले पाहिजे म्हणण्या पेक्षा काय करू नये , कोणत्या वाटेला जावू नये या बद्दलच्या खाप पंचायतीच्या ज्या धारणा आहेत तशाच धारणाचा  कमी अधिक प्रमाणात देशभरातील पुरुष जातीवर पगडा आहे.  या अर्थाने आपला देश हीच  सर्वात मोठी खाप पंचायत ठरते. म्हणूनच तर स्त्रीला पूजनीय मानण्याचा दंभ बाळगणारा हा देश स्त्रियांना राहण्यासाठी नरक असल्याचे जगभर मानल्या जात असल्याचे संपन्न अशा जी - २० देशांमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे .  खाप पंचायतीचे नाव आणि तिचा प्रताप ज्यांच्या कानीही पडला नसेल अशा घरा-घरातून मुलींवर आणि स्त्रियांवर खाप पंचायती सारखेच निर्बंध लादल्या जातात. तुमच्या आमच्या घरात आणि सभोवताली हे घडत असते. दिड महिन्या पूर्वीची एक घटना आहे. विदर्भातील एका खेड्यातून एका युवतीचा मला फोन आला. माझे लेख वाचून प्रभावित झालेल्या या  युवतीला समाजासाठी काही तरी करायचे होते.खेड्याची दुर्दशा पाहून व्यथित झालेल्या त्या तरुणीला आपल्या गावाच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी राजकारणात पडण्याचा धाडशी मनोदय तीने बोलून दाखविला.  त्यासाठी तीला माझी मदत आणि मार्गदर्शन हवे होते. २-३ वेळेस फोन करून तीला पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे तीने माझ्या कडून मिळविण्याचा प्रयत्न केला. पण मुलीचे चाकोरी सोडून राजकारणात जाण्याचे व समाजकार्य करण्याचे मनसुबे घरच्यांच्या कानावर पडताच तिच्यावर बंधने आलीत. आईची सहानुभूती कामी आली ती फक्त मला एवढे कळविण्या साठीच कि तिचा मोबाईल तिच्याकडून काढून  घेण्यात आला असून तीला माझ्याशी संपर्क साधता येणार नाही ! तिच्या या प्रमादासाठी तिचे पुढचे शिक्षण थांबविण्यात आले तर आश्चर्य वाटायला नको. मुलीनी अशी वेगळी वाट निवडायची म्हटली कि प्रोत्साहना ऐवजी बंधनेच तिच्या नशिबी येतात. मुलगी खाप पंचायतीच्या प्रभाव क्षेत्राच्या हजारो मैल दुर असली तरी अशा बंधनातून तिची सुटका नसते. तिचे चाकोरी बाहेर जाणे हे निव्वळ मर्यादाभंगच ठरत नाही तर नीतिमत्तेचा भंगही ठरते.  आणि म्हणून घरातच नव्हे तर घरा बाहेर रस्त्यावर देखील नितीरक्षक रखवाल्रदारांचा त्यांच्यावर पहारा असतो. मनुस्मृतीने स्त्रीच्या रक्षणाच्या नावाखाली तिच्यावर पहारा ठेवण्यासाठी तीन पहारेकऱ्याची नियुक्ती आधी करूनच ठेवली आहे. लग्नाच्या आधी बापावर , लग्नानंतर नवऱ्यावर आणि म्हातारपणी मुलावर ही जबाबदारी होती. पण कुटुंबातील हा पहारा अपुरा वाटल्याने कुठे खाप पंचायती तर कुठे  गौहाटीच्या रस्त्यावर दिसले तसे संस्कृती रक्षक टोळके गल्लो गल्ली निर्माण झालेत.   

                              अपराध पुरुषांचा , शिक्षा स्त्रीला 

 शिक्षणाचा प्रसार, विज्ञानाने साधलेली प्रगती, आर्थिक प्रगतीने निर्माण झालेल्या नव्या आकांक्षा याच्या संयुक्त परिणामी कुटुंबातील मुली आणि स्त्रिया यांच्यावरील बंधने सैल झालीत. पुरुषांची मानसिकता बदलली म्हणून हे घडले नाही. परिस्थितीच्या रेट्यामुळे हे घडले. जिथे असा रेटा नाही तिथे अजूनही स्त्रियांवरील बंधने कमी झालेली नाहीत. परिस्थितीच्या रेट्यामुळे बाहेर पडलेल्या स्त्रियांवर किंवा मुलींवर बंधने घालण्यात कुटुंबाची असमर्थता लक्षात येताच पूर्वीच्या मनुस्मृतीत अलिखित कलमांची भर पडली. ती अलिखित कलमे म्हणजे खाप पंचायती आणि गौहाटीच्या रस्त्यावर धुडगुस घालणारे नीतीमत्तेचे  राक्षस् (रक्षक नव्हे, राक्षसच) होय. कुटुंबातील बंधने सैल झाली तरी स्त्री बंधमुक्त   होवू नये म्हणून गल्लोगल्ली संस्कृतीचे रक्षण करण्याचा विडा उचललेले 'कार्यकर्ते' वावरत असतात. गौहाटीच्या घटनेला फक्त  विकृत आणि कामांधांची कृती म्हणून पाहण्याची चूक करता कामा नये. खाप पंचायती ' मर्यादा भंग ' करणाऱ्या स्त्रीला झाडाला बांधून  विवस्त्र करून मारहाण करण्याची जशी शिक्षा देतात त्याच धर्तीवर पब मध्ये जावून व तोकडे कपडे घालून 'मर्यादा भंग' करणाऱ्या युवतीला गौहाटीच्या स्वघोषित संस्कृती रक्षकांनी दिलेली ती शिक्षा आहे. पार्क मध्ये किंवा समुद्र किनारी बसणाऱ्या तरुण तरुणींना संस्कृती रक्षकांचा प्रसाद नेहमीच मिळत असतो आणि माध्यमे ही स्वघोषित नैतिक पोलिसांच्या कारवाया चवीने चघळत असतात. पब मध्ये किंवा बार मध्ये जाणे वाईट असेल तर ते सर्वांसाठी वाईट असले पाहिजे. पाश्चात्य पद्धतीची वेशभूषा वाईट असेल तर ती सगळ्या साठीच असली पाहिजे. पण ते वाईट असते ते फक्त स्त्रियांसाठीच. त्यामुळे पुरुष उत्तेजित होतात आणि नको ते करून बसतात असा संस्कृती रक्षकांचा हमखास दावा असतो. पुरुषांच्या चूकी साठी स्त्रियांना दोषी धरण्याचा हा हमखास नुस्खा आहे. पुरुषांनी कसाही पोशाख घातला तरी स्त्रिया कोठे कधी उत्तेजित झाल्याचे किंवा त्यामुळे त्यांनी पुरुषावर अतिप्रसंग केल्याचे कधीच ऐकू येत नाही. पुरुषांच्या बाबतीत मात्र हमखास हे कारण पुढे केले जाते. आपल्याकडे संघ परिवार हा सगळ्यात मोठा संस्कृती रक्षक म्हणून ओळखला जातो. या संघ स्वयंसेवकांचा ड्रेस कोड काय आहे? संघ स्वयंसेवक तर अर्धी चड्डी घालून रस्त्यावर संचलन करतात.आणि हे संचलन सर्वानी -अगदी स्त्रियांनी सुद्धा- पहावे अशी त्यांची इच्छा असते. मांड्या उघड्या असलेल्या स्वयंसेवकाला पाहून स्त्रिया उत्तेजित होतील असा विचार स्त्रियांनी तोकडे कपडे घालू नये म्हणणाऱ्यांच्या डोक्यात का येवू नये? अटलबिहारीजी  किंवा अडवाणीजी त्यांच्या तरुण वयात किती राजबिंडे दिसत असतील. असे हे राजबिंडे तरुण अर्धी चड्डी घालून रस्त्यावरून जात असतील तेव्हा त्यांच्या कडे पाहून कुठल्या स्त्रीच्या भावना उद्दीपित  झाल्याने त्यांना नको त्या प्रसंगाला कधी सामोरे जावे लागल्याचे कधी कोणी ऐकले आहे का? पुरुषांच्या बाबतीतच हे घडते कारण ते स्त्रीला निव्वळ भोग वस्तू म्हणून पाहतात. त्याचा कपड्याशी किंवा पब आणि बार या मध्ये जाण्याशी किंवा रात्र पाळीत काम करण्याशी काहीही संबंध नाही. पण समाजात नेहमीच पुरुषांच्या अपराधाची शिक्षा स्त्रीला तिच्या स्वातंत्र्याचा बळी देवून भोगावी लागली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पुरुष अतिप्रसंग करेल म्हणून मुलीनी आणि स्त्रियांनी ७ च्या आत घरात येवून स्वत:ला कोंडून घेतले पाहिजे . शिक्षा अत्त्याचार करतो त्याला नाहीच. शिक्षा जिला अत्त्याचार सहन करावा लागतो तिलाच. मुलींची आणि स्त्रियांची काहीच चूक नसताना त्यांच्या बाहेर पडण्यावर बंधने घालण्या ऐवजी पुरुषांची  अत्त्याचार करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असल्याचे कारण देवून पुरुषांनीच  ७ च्या आत घरात आले पाहिजे असा फतवा काढणे किंवा दंडक घालून देणे न्यायसंगत ठरले असते. पुरुषांवर असे बंधन घालण्याचा विचार पुरुष प्रधान व्यवस्थेत पुरुषांच्या डोक्यात येणे शक्यच नाही , पण स्त्री चळवळींनी तरी आक्रमक होवून कुठे अशी मागणी केली आहे? अशी मागणीच स्त्रियांकडून होत नसल्याने स्त्रियांच्या  स्वातंत्र्याला संस्कृती रक्षकांचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट बसत चालला आहे. पुरुषांच्या चुकीची किंवा अपराधाची शिक्षा पुरुषाला मिळाली पाहिजे . त्याच्या अपराधाची शिक्षा स्त्री स्वातंत्र्याचा संकोच करून स्त्रियांना  देवू नये हाच आज स्त्री चळवळीचा प्रमुख मुद्दा बनला पाहिजे. 

                       स्त्रियांचा दोष 

 आज  स्त्रिया मोठया संख्येने घरा बाहेर  पडत आहेत. महत्वाच्या जबाबदाऱ्या शिरावर घेवून यशस्वीपणे पार पाडीत आहेत. शिक्षणातील त्यांची भरारी डोळे दिपवणारी आहे. पण असे असले तरी वर्षानुवर्षे त्यांच्या पायातील असलेल्या बेड्या त्यांना दागिन्या सारख्या वाटाव्यात इतकी त्यांना त्याची सवय झाली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या  एका सर्वेक्षणात ५२ टक्के महिलांनी नवऱ्याचा मार आवडतो असे सांगितले ते उगीच नाही ! समाजातील सर्व क्षेत्रातील महिलांचा वावर वाढत चालला  , पण स्वातंत्र्याचा मात्र संकोच होत चालला आहे. ती निर्णय घेत नाही , तिच्या साठी निर्णय घेतले जात आहेत. शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीचा अपवाद सोडला तर संपत्तीत वाटा असावा अशी स्त्रियांची मागणी नव्हतीच. तो तीला दिल्या गेला. राजकारणात सहभागी होणे तर तिच्या साठी सर्वाधिक नावडीचे काम आहे. तरीही तीला सत्तेत वाटा देण्याचा निर्णय झाला. संघर्ष करून तीने या गोष्ठी मिळवल्या असत्या तर तीला या गोष्टींचे महत्व कळले असते आणि संघर्षातून तिचे बळ ही वाढले असते. आज पर्यंत कुटुंबाच्या भल्याच्या नावाखाली घरा बाहेर पडू देण्यात आले नाही . आणि आज ती घरा बाहेर पडते आहे ते देखील स्वत:च्या इच्छा-आकांक्षाच्या पूर्ती साठी नाही तर कुटुंबाच्या भल्या साठीच. ती पुरुषाच्या बरोबरीने काम करीत नव्हती म्हणून तिचे स्थान दुय्यम होते आणि आज ती पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहे तरी तिचे स्थान दुय्यमच आहे. पूर्वी विवाहाच्या बाबतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतेच. अंतिम शब्द घरच्यांचाच असायचा. आज उच्च विद्या व पद विभूषित स्त्रियांकडे ते स्वातंत्र्य चालून आले आहे तर त्या तिकडे पाठ फिरविताना दिसतात. विवाह मंडळाकडे होत असलेल्या नोंदी पाहिल्या तर यातील सत्यता आपल्या लक्षात येईल. निर्णय घेणे सोडले तर सगळे काही तीला जमते ही आजची स्थिती आहे. पूर्वी कुटुंब ही तिची चौकट होती आता ती चौकट विस्तारून कुटुंब आणि कामाचे ठिकाण अशी तिची चौकट बनली आहे. पण ही चौकट ओलांडून विशाल अशा सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रवाहात पुरुषांच्या बरोबरीने सामील होण्याची इच्छा आणि जिद्द याचा स्त्रियांमध्ये प्रकर्षाने अभाव आहे. पूर्वी तीला या प्रवाहात सामीलच होवू दिले जात नव्हते आणि आज या प्रवाहात सामील होण्याची संधी चालून आली आहे तर तिचीच त्यात सामील होण्याची इच्छा नाही. तीला चालून आलेली संधी ही स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक समतेच्या लढ्यात स्त्रियांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे होती. पण तो वारसा पुढे चालविण्यात स्त्रियांना आणि स्त्री चळवळींना अजिबात रस दिसत नाही. सामाजिक -राजकीय प्रवाहात सामील झाल्या शिवाय स्त्रियांना मुख्य प्रवाहात येताच येणार नाही. त्या मुख्य प्रवाहात येत नाहीत तो पर्यंत त्यांचे स्थान दुय्यमच राहणार आहे. स्त्री मुक्ती साठी स्त्रियात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय साक्षरतेची नितांत गरज आहे . अशा प्रयत्नांचाच नेमका अभाव आहे. त्यामुळेच खाप पंचायती आणि गल्लो गल्लीच्या संस्कृती रक्षकाच्या टोळक्याना स्त्री स्वातंत्र्यावर घाला घालणे सहज शक्य होत आहे. 
                                                     (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि. यवतमाळ 

1 comment:

  1. दुर्दैवाने खरय ! पण स्त्रियानवरिल अत्याचारा विरुद्ध काम करणार्या गुलाबी टोळ्यादेखिल निर्माण झाल्यात व कार्यरत आहेत....अन्याय सहन न करण्याकरता लागणारे मानसिक धैर्य तिच्यात निर्माण व्हायला हवे...हे खरेय पण सर्व ठिकाणी जेंडर बजेटिंग ही सवय व्हायला हवी ...समाजकारणात व राजकारणातही सक्रिय होण्यासाठी धैर्य कसे यैल ते बघायला हवे...निर्णय क्षम स्त्री ही च परिवर्तन घडवू / आणू शकते ...हे निर्विवाद !

    ReplyDelete