Thursday, February 23, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ४४

 लोकांचा असंतोष नियंत्रणात ठेवण्याचा एकच मार्ग फारूक सरकारने अवलंबिला आणि तो मार्ग म्हणजे दडपशाहीचा. अशा प्रकारच्या दडपशाहीतून असंतोष कमी होण्याऐवजी वाढत गेला. पाकिस्तानच्या चिथावणीतून लोक रस्त्यावर येत असल्याचा फारूकचा आरोप होता. या आरोपात तथ्य होतेच. १९८७च्या निवडणुकीने जनतेचा विशेषतः युवकांचा भ्रमनिरास झाल्याच्या स्थितीचा पाकिस्तानने फायदा उचलायला सुरुवात केली होती.
-------------------------------------------------------------------------------------

१९८७ च्या विधानसभा निवडणुकीतील हेराफेरी आणि मुस्लीम युनायटेड फ्रंटच्या नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्धच्या दडपशाहीने निर्माण झालेला असंतोष विविध निमित्ताने बाहेर येवू लागला. हिवाळी राजधानीच्या निमित्ताने जम्मूत जसा फारूक सरकारच्या विरोधात असंतोष वाढला तसाच असंतोष लडाख विभागात सुद्धा वाढलेला होता. फारूक सरकारात लडाखला प्रतिनिधित्व नसणे हे तात्कालिक कारण होते. लडाखला ट्रायबल स्टेटस असावे ही तिथल्या जनतेची जुनी मागणी दुर्लक्षित राहिल्याने लडाखमध्ये राज्य व केंद्र सरकारबद्दल परकेपणाची भावना वाढली होती. फारूक सरकारला जम्मू व लडाखपेक्षा मोठे आव्हान काश्मीरघाटीत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे होते. हे आव्हान मुख्यत: तेथील बेरोजगार तरुणांकडून दिले गेले होते. काश्मीरघाटीत भौगोलिक परिस्थितीमुळे उद्योगधंदे निर्मितीला मर्यादा होत्या. सरकारी नोकऱ्यात पंडीत समुदायाचे प्राबल्य होते आणि नवीन जागा निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.१९४७ नंतरची तरुणांची ही नवी पिढी होती. अब्दुल्ला घराण्याबद्दल जुन्या पिढीत जे ममत्व होते ते नव्या पिढीत नव्हते. काश्मीरघाटीत रोजगार निर्मिती करणे राज्यसरकारच्या आवाक्याबाहेरचे काम होते. केंद्र सरकारने आर्थिक मदतीचा हात आखडता घेतल्याने रोजगार निर्मिती थंडावल्याचा फारूक अब्दुल्लाचा आरोप होता. शेख अब्दुल्ला मस्जीदीमध्ये जावून लोकांशी संवाद साधायचे तसा संवाद साधणे फारूक अब्दुल्लांना न जमल्याने सरकार आणि जनता यांच्यातील अंतर वाढत गेले.लोकांचा असंतोष नियंत्रणात ठेवण्याचा एकच मार्ग फारूक सरकारने अवलंबिला आणि तो मार्ग म्हणजे दडपशाहीचा.                                                       

 अनियमित वीजपुरवठा आणि वाढलेले वीजदर या विरुद्ध श्रीनगर मध्ये मोर्चा निघाला तेव्हा लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला त्यात तीन मोर्चेकरी ठार झालेत. अशा प्रकारच्या दडपशाहीतून असंतोष कमी होण्याऐवजी वाढत गेला. पाकिस्तानच्या चिथावणीतून लोक रस्त्यावर येत असल्याचा फारूकचा आरोप होता. या आरोपात तथ्य होतेच. १९८७च्या निवडणुकीने जनतेचा विशेषतः युवकांचा भ्रमनिरास झाल्याच्या स्थितीचा पाकिस्तानने फायदा उचलायला सुरुवात केली होती. पाकिस्तानच्या मदतीने जे उपद्रव माजवतील अशा तरुणांना तुरुंगात टाकू, तंगड्या तोडू अशी भाषा फारुक अब्दुल्लाच्या तोंडी वारंवार येवू लागली. काश्मीर पोलिसांना शांतता व सुव्यवस्था राखता येत नाही म्हणून फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रीय सुरक्षा दल बोलावले. केंद्रीय सुरक्षा दलाला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती. आपल्यावरील अविश्वासाने काश्मीर पोलीस दल नाराज झाले. यातून केंद्रीय सुरक्षा दलाशी असहकाराचे प्रकारही घडले. राज्यातील यंत्रणेपेक्षा केंद्राच्या यंत्रणेवर फारूक अब्दुल्लाचा जास्त विश्वास आहे असा समज पसरल्याने राज्यातील प्रशासनही निष्क्रियतेकडे झुकले. अशी चहुबाजूने फारूक सरकारची कोंडी झाली. फारूक सरकारच्या दडपशाहीतून सुटण्याचा सोपा मार्ग होता नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्याचा. अशा लोकांच्या स्वागतासाठी पाकिस्तान तयार होतेच. काश्मिरातील युवकांना आतंकवादी कारवायाचे प्रशिक्षण देवून त्यांना भारताविरुद्ध शस्त्रसज्ज करण्याची संधी पाकिस्तानने सोडली नाही. काश्मीर आणि भारत सरकार मात्र बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या मर्यादित दृष्टीनेच विचार करीत होते. पुढे काय वाढून ठेवले याचा अंदाज ना राज्य सरकारला आला ना केंद्र सरकारला. राज्य आणि केंद्र सरकारला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्याची जबाबदारी आय बी आणि रॉ सारख्या केंद्रीय गुप्तचर संस्थांची होती. या संस्था आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्या.
 

१९८८ च्या जुलै महिन्यात श्रीनगर मधील दूरदर्शन व डाक-तार विभागाच्या इमारती जवळ बॉम्बस्फोट झाला. आतंकवादाच्या नव्या कालखंडाची ही नांदी ठरली. या घटनेनंतर काश्मीर घाटीत भारत विरोधी वातावरण तयार होवू लागले. १४ ऑगस्टला काही ठिकाणी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा झाला तर १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्यदिनी बंदचे आवाहन करण्यात आले.सप्टेंबर महिन्यात काश्मीरचे डी आय जी वाटाली यांच्या घरावर बॉम्ब फेकण्यात आला. यात वाटाली बचावले व हल्लेखोर मारल्या गेला. केंद्रीय राखीव पोलीस दलालाही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले नाही. २६ जानेवारी १९८९ च्या प्रजासत्ताक दिनी बंद पाळण्याचे आदेश आतंकवाद्यांनी दिलेत आणि ते पाळले गेले. ५ फेब्रुवारी ला फाशी दिलेल्या मकबूल भट या आतंकवाद्याचा फाशी दिन पाळण्यात आला. त्याच्याच पुढच्या आठवड्यात सलमान रश्दीच्या पुस्तका विरुद्ध निदर्शने करण्यात आली. एप्रिल १९८९ मध्ये पीपल्स लीगचे अध्यक्ष शबीर शाह याच्या वडिलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी उग्र निदर्शने झालीत.  निदर्शना दरम्यान आतंकवाद्यांनी गोळीबार करणे व पोलिसांनी गोळीबाराने प्रत्युत्तर देणे हे नियमितपणे घडू लागले. परिस्थिती अधिकाधिक स्फोटक बनत चालली होती.  आधी चोरूनलपून नियंत्रण रेषा पार केली जायची. पण आता बस मधून काश्मिरी युवक उघडपणे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जावून आतंकवादी कारवायाचे प्रशिक्षण घेवू लागले होते. काश्मिरात वाढत चाललेल्या पाकिस्तान प्रेरित आतंकवादी कारवायांना आळा घालण्यात राज्यसरकार अपयशी ठरले होते . तिकडे दिल्लीत तापलेल्या बोफोर्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सुरु झाल्याने काश्मीरच्या स्फोटक परिस्थितीकडे केंद्राचे दुर्लक्ष झाले. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होवून कॉंग्रेस मधून बाहेर पडलेल्या विश्वनाथप्रताप सिंग यांचे अल्पमताचे जनता दल सरकार भाजप आणि कम्युनिस्टांच्या पाठींब्यावर सत्तेत आले. काश्मिरातील वाढत्या आतंकवादी कारवायांना आळा घालण्यासाठी केंद्रात स्थिर सरकारची गरज असतांना एक अस्थिर आणि कमजोर सरकार सत्तेत येणे काश्मिरातील परिस्थिती आणखी बिघडण्यास कारण बनले. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारात मुफ्ती मोहम्मद सईद हे गृहमंत्री बनले. काश्मीर मधील नेत्याला केंद्र सरकारात एवढे महत्वाचे पद पहिल्यांदाच मिळाले होते. याचा काश्मीरमध्ये चांगला परिणाम होणे अपेक्षित होते. पण घडले उलटेच. मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री बनण्याच्या एक आठवड्याच्या आतच आतंकवाद्यांनी काश्मिरात त्यांच्याच मुलीचे अपहरण केले. हे अपहरण जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या आतंकवाद्यांनी घडवून आणले होते. या अपहरणाने उद्भवलेली परिस्थिती केंद्र सरकारने ज्या प्रकारे हाताळली त्यातून काश्मिरात आतंकवादाचा नवा अध्याय सुरु झाला.
----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Thursday, February 16, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ४३

पंतप्रधान राजीव गांधी आणि केंद्र सरकार बोफोर्सचा डाग धुवून काढण्यात गुंतल्याने जम्मू-काश्मीरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी एकट्या फारूक अब्दुल्लावर आली. पण परिस्थिती हाताळण्याचा अनुभव व क्षमता फारूक अब्दुल्ला यांच्यात नव्हती. प्रशासनावर त्यांची पकडही नव्हती.
-------------------------------------------------------------------------------

 निवडणुकीत आपण जिंकलो तरी जनमत आपल्या विरोधात जावू लागल्याची जाणीव मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांना होती. प्रशासन लोकाभिमुख करून जनतेचे प्रश्न सोडविण्याची , निवडणुकीत आश्वासन दिल्या प्रमाणे केंद्राची मदत घेवून विकासकामांना गती देण्याची गरज असतांना विरोधकांना धडा शिकविण्यासाठी फारूक अब्दुल्लाने मुस्लीम युनायटेड फ्रंटच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्रास दिला. अनेकांना कारण नसतांना अटक करून तुरुंगात ठेवले. यामुळे फारूक सरकार विरोधातील असंतोष कमी होण्या ऐवजी वाढला. अशातच फारूक अब्दुल्ला यांनी वर्षानुवर्षे हिवाळ्यात जम्मूला राजधानी नेण्याची असलेली परंपरा खंडित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शांत असलेल्या जम्मूत असंतोष उफाळून आला. यात केंद्राने हस्तक्षेप करून जम्मूला हिवाळ्यात राजधानी करण्याचा निर्णय बहाल करायला भाग पाडले. बदललेल्या निर्णयाचा फायदा घेत मुस्लीम युनायटेड फ्रंटचे कार्यकर्ते जम्मूला राजधानी नेण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले. अशारितीने एका अनावश्यक निर्णयाने जम्मू आणि काश्मीर घाटी या दोन्हीही प्रदेशात असंतोष निर्माण होवून दोन्ही प्रदेश एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. याच काळात बोफोर्स तोफ सौद्यात दलाली घेतल्याचा आरोप झाला. दलालीचा संबंध थेट पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न झाल्याने दिल्लीतील व देशातील राजकारण ढवळून निघाले. अशा वातावरणात काश्मीर निवडणुकीत काश्मीरला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन विसरल्या गेले. फारसी विकासकामे सुरु करता न आल्याने आधीच असलेल्या बेरोजगारीत भर पडली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार बोफोर्सचा डाग धुवून काढण्यात गुंतल्याने जम्मू-काश्मीरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी एकट्या फारूक अब्दुल्लावर आली. पण परिस्थिती हाताळण्याचा अनुभव व क्षमता फारूक अब्दुल्ला यांच्यात नव्हती. प्रशासनावर पकडही नव्हती. गैरमार्गाने निवडणूक जिंकल्याची लोकभावना असल्याने लोक समर्थना अभावी सरकार चालविण्याचे अवघड आव्हान फारूक अब्दुल्ला समोर होते.  

१९८७ची  निवडणूक उंटाच्या पाठीवर शेवटची काडी म्हणतात तशी ठरली. दिल्लीला लोकमताशी काही देणेघेणे नाही , त्यांना कसेही करून आपल्या मताने चालणारे सरकारच आणायचे आहे ही भावना काश्मीरघाटीत प्रबळ बनली. काश्मिरी जनतेचा निवडणुक प्रक्रियेवरील विश्वासच या निवडणुकीने डळमळीत केला. बॅलेट नाही तर बंदूक हा विचार या निवडणुकीनंतर प्रबळ बनला. हा विचार प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी सरकारची अरेरावी कारणीभूत ठरली. या निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी व त्या नंतर अनेक उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीना विनाकारण अटक करून यातना देण्यात आल्या , तुरुंगात डांबण्यात आले. या निवडणुका काश्मीरला अस्थिरतेच्या व आतंकवादाच्या खाईत लोटण्यास कशा कारणीभूत झाल्या यासाठी एक उदाहरण दिले जाते. श्रीनगरच्या आमीर कदल मतदार संघात मुस्लीम युनायटेड फ्रंटचा उमेदवार मोहम्मद युसुफ शाह विजयी होत होता. पण त्याच्या ऐवजी हरणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले तेव्हा मतदार संघातील लोकांनी निकालाचा विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी उमेदवार युसुफ शाह व त्याच्या निवडणूक प्रतिनिधीला अटक करून तुरुंगात डांबले. कोणतेही आरोप न लावता तुरुंगात तब्बल २० महिने ठेवले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर हे दोघेही पाकिस्तानात गेले आणि पाक प्रशिक्षित आतंकवादी बनून भारतात परतले. युसुफ शाह नाव बदलून सैय्यद सलाहुद्दीन बनला. यानेच काश्मिरात अनेक आतंकवादी घटना घडविणाऱ्या हिजबुल मुजाहदिन ही आतंकवादी संघटना तयार केली. तर त्याचा निवडणूक प्रतिनिधी असलेल्या यासीन मलिक याने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या आतंकवादी संघटनेची सूत्रे आपल्या हाती घेतली. १९७० च्या दशकातील आतंकवादा पेक्षा वेगळ्या इस्लामी आतंकवादाला चालना देणारी ही निवडणूक ठरली. १९८७ च्या निवडणुकीनेच हे सगळे घडले असे म्हणता येणार नाही. या निवडणुकी नंतर सत्तेत आलेल्या फारूक अब्दुल्लाने केलेली दडपशाही व काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांचाही हा परिपाक होता. अर्थात या निवडणुकीने काश्मिरी युवकाला बॅलेट कडून बुलेटकडे जाण्याची जमीन तयार करून दिली असे म्हणता येईल. 

काश्मीरच्या परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या तीन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना त्याकाळी घडत होत्या. भारतीय राजकारणात बोफोर्स मुळे उठलेल्या वादळाच्या जोडीला बाबरी मस्जिद - रामजन्मभूमी वादाचे वादळही घोंगावू लागले होते. या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने रान पेटवायला सुरुवात केली होती. हिंदुत्ववादी शक्ती संघटीत व आक्रमक होवू लागल्या होत्या. सांप्रदायिक तणाव वाढू लागला होता. जो पर्यंत इस्लाम पेक्षा काश्मीरमध्ये काश्मिरियत प्रभावी होती तोपर्यंत भारतात इतरत्र वाढणाऱ्या सांप्रदायिक तणावाचा परिणाम आणि प्रतिक्रिया काश्मीरमध्ये होत नव्हती. भारतातील सांप्रदायिक तणावाचा परिणाम आणि प्रतिक्रिया मर्यादित स्वरुपात आणि मर्यादित भागात १९८६ मध्ये राम मंदिराचे कुलूप उघडण्याच्या निर्णयानंतर दिसून आला. पण ही प्रतिक्रिया धर्मप्रेरीत असण्यापेक्षा राजकारण प्रेरित अधिक होती. तसे असले तरी काश्मीर भूमीने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सांप्रदायिक तणाव अनुभवला होता. तेव्हापासूनच भारतातील सांप्रदायिक तणावाचा परिणाम काश्मीरवर होवू लागला होता. राममंदिराच्या निमित्ताने देशात हिंदुत्ववादी लाट तयार होत होती तसा काश्मीरमध्ये काश्मिरियतचा प्रभाव घटून काश्मीरचे इस्लामीकरण वेगाने होवू लागले. धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव  भारतात सर्वत्र ओसरू लागल्यावर त्याला काश्मीर अपवाद राहणे कठीण होते. काश्मीरचे इस्लामीकरण रोखण्याची जी क्षमता शेख अब्दुल्लामध्ये होती त्या क्षमतेचा संपूर्ण अभाव फारूक अब्दुल्लात होता. शेख अब्दुल्ला मस्जीदित जावून जनतेशी संवाद साधायचे ते फारूक अब्दुल्लाला जमले नाही. काश्मीरमधील वाढत्या इस्लामीप्रभावाचा फायदा पाकिस्तानने उचलला. फारूक अब्दुल्ला सरकारच्या दडपशाहीने बेरोजगार काश्मिरी तरुण पाकव्याप्त काश्मीर मध्ये जावून आतंकवादी कारवायाचे आणि शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेवू लागले. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेली महत्वाची घटना म्हणजे अफगाणीस्थानातून रशियन सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली होती. रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्राला अफगाणिस्तानातून सैन्य मागे घ्यावे लागणे ही काश्मिरी तरुणांना इस्लामची किमया वाटू लागली. भारताला काश्मीर मधून आपले सैन्य माघारी घ्यायला भाग पाडले जावू शकते अशाप्रकारची भावना वाढून काश्मिरी तरुण काश्मिरियत ऐवजी इस्लामी प्रभावा खाली येवू लागले. परिणामी जमात ए इस्लामीची ताकद वाढली. याच सुमारास पाकिस्तानचे सैनिकी शासक जिया उल हक यांचे विमान अपघातात निधन झाले तेव्हा त्याची प्रतिक्रिया काश्मिरात उमटली. या प्रतिक्रियेतून जमात ए इस्लामीची वाढलेली ताकद व पाकिस्तानचा वाढत चाललेला प्रभाव स्पष्ट झाला. 

                                            (क्रमशः)

----------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Thursday, February 9, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ४२

आधीच्या निवडणुकांपेक्षा जास्त घोटाळे या निवडणुकीत झाले. केवळ मतमोजणीतच घोटाळे झाले नाही तर दंडुकेशाहीचा वापर झाला. पूर्वी अशा प्रकारच्या निवडणुकांचा फटका नॅशनल कॉन्फरंसला बसला होता. हा पक्षच नेस्तनाबूत करण्यात आला होता. हे विसरून फारूक अब्दुल्लाने आपल्या विरोधाकांसोबत तेच केले जे दिल्लीतील कॉंग्रेस सरकारने अब्दुल्ला व नॅशनल कॉन्फरंस सोबत केले होते.
------------------------------------------------------------------------------------


राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आणि फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरंस यांच्या संयुक्त आघाडी विरोधात मैदानात उतरलेल्या मुस्लीम युनायटेड फ्रंट मध्ये जमात ए इस्लामी, पीपल्स लीग आणि अवामी अॅक्शन कमेटी या काही प्रमाणात जनाधार असलेल्या प्रमुख संघटनांसह मुस्लीम एम्प्लाइज असोशिएशन, इत्तीहाड उल मुसलमीन, उम्मत ए इस्लामी सारखे छोटे-मोठे समूह सामील झाले होते. हे समूह इस्लामीच नव्हते तर जनमत  संग्रह समर्थकही होते. त्यामुळे ही लढत केवळ धर्मनिरपेक्षता विरुद्ध धार्मिकता अशी नव्हती. मानसिक पातळीवर ही लढत भारत समर्थक विरुद्ध भारत विरोधक अशीही बनली होती..जनमत संग्रहाच्या मुद्द्यावरून हे सगळे समूह भारताच्या विरोधात होते असे म्हणता येईल पण सगळेच समूह पाकिस्तान समर्थक किंवा काश्मीरचे पाकिस्तानात विलीनीकरण व्हावे या बाजूचे होते. यातील जमात ए इस्लामी सारखी प्रमुख संघटना नक्कीच पाकिस्तान धार्जिणी होती. मात्र निवडणुकीत मुस्लीम युनायटेड फ्रंट कडून जनमत संग्रहाची मागणी रेटण्यात आली नव्हती कुशासन विरुद्ध इस्लामी शासन हा मुस्लीम युनायटेड फ्रंटचा प्रमुख निवडणूक मुद्दा होता. त्यामुळे भ्रष्टाचाराने त्रस्त व आर्थिक ओढाताणीने त्रस्त जनतेचा समूह मुस्लीम युनायटेड फ्रंटकडे आकर्षित होणे स्वाभाविक होते.त्यामुळे त्यांच्या सभांना चांगली गर्दी होवू लागली होती.                                                                                                                                 

मागच्या निवडणुकीत मीरवाइज फारूकला आपल्या बाजूने करून स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची मागणी करणाऱ्या समूहात फुट पाडण्यात फारूक अब्दुल्लांना यश आले होते. पण यावेळी फारुक्ने दिल्लीतील सत्ताधारी पक्षाशी समझौता केल्याने स्थानिक पातळीवरच्या संघटना फारूक बरोबर यायला तयार नव्हत्या. त्यामुळे ही लढत काश्मीर घाटीतील स्थानिक पक्ष आणि संघटना विरुद्ध दिल्लीशी हातमिळवणी करणारा राज्यातील प्रमुख पक्ष अशी बनली. तिसरा पर्याय उपलब्ध नव्हता. फारूक विरोधात लोकांचा राग दुहेरी होता. फारूक मध्ये प्रशासन कौशल्य नसल्याने व प्रशासनावर नियंत्रण नसल्याने बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा फटका लोकांना बसला होता या गोष्टीचा रोष होताच  त्यात  दिल्लीशी हातमिळवणी केल्याची भर पडली होती. असे असले तरी निवडणुकीचा अनुभव आणि प्रदेशभर संघटन ही फारूक अब्दुल्लाची जमेची बाजू होती. त्या तुलनेत मुस्लीम युनायटेड फ्रंट कडे एकजिनसी संघटन नव्हते की निवडणूक लढविण्याचा अनुभव नव्हता. जमात ए इस्लामी कडेच थोडाफार निवडणुकीचा अनुभव होता. बाकी सारेच नवखे होते. त्यांच्याकडे सर्व मतदार संघात उमेदवार मिळण्याची मारामार होती. सभा मात्र चांगल्या होत होत्या. सभेतील गर्दी मतात परिवर्तीत होतेच असे नाही. राजकीय परिस्थिती समजून घेण्याची अक्षमता आणि आत्मविश्वासाचा अभाव या दोन गोष्टीमुळे जनमताचा कौल आपल्या विरोधात जाईल की काय या भीतीने फारूक अब्दुल्लाला ग्रासले होते. आपल्या पक्षाचा आणि आघाडीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी फारूक अब्दुल्लाने जे काही केले त्याने काश्मीरला उद्रेकाच्या काठावर आणून ठेवले.

शेख अब्दुल्लाच्या १९५३ मधील अटके नंतर ज्या निवडणुका झाल्यात त्यातून दिल्लीला अनुकूल उमेदवार व पक्ष निवडले जातील हे पाहिले गेले. दिल्लीला अनुकूल नसलेल्या उमेदवारांना घरी बसविण्याचा मार्ग म्हणून तांत्रिक कारणावरून उमेदवारी अर्ज फेटाळणे ही परंपराच बनली होती. यातून दिल्लीला पाहिजे ते सरकार येत गेले. राज्यात सत्तेत यायचे आणि राहायचे असेल तर लोकमर्जीपेक्षा दिल्लीची मर्जी राखणे महत्वाचे बनले. शेख अब्दुल्ला यांनी १९७७ साली व फारूक अब्दुल्ला यांनी १९८३ साली दिल्लीतील सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाविरुद्ध लढविलेल्या निवडणुकीने दिल्लीच्या मर्जीने राज्यात सत्ता स्थापनेची परंपरा खंडीत झाली होती. या दोन निवडणुकीनंतर १९८७ची निवडणूक होत असल्याने जनतेला ही निवडणूक सुद्धा मुक्त वातावरणात होईल अशी आशा वाटत होती. त्यामुळे जनतेत मतदाना बद्दल उत्साह होता. पण घडले उलटेच. आधीच्या निवडणुकांपेक्षा जास्त घोटाळे या निवडणुकीत झाले. केवळ मतमोजणीतच घोटाळे झाले नाही तर दंडुकेशाहीचा वापर झाला. पूर्वी अशा प्रकारच्या निवडणुकांचा फटका नॅशनल कॉन्फरंसला बसला होता. हा पक्षच नेस्तनाबूत करण्यात आला होता. हे विसरून फारूक अब्दुल्लाने आपल्या विरोधाकांसोबत तेच केले जे दिल्लीतील कॉंग्रेस सरकारने अब्दुल्ला व नॅशनल कॉन्फरंस सोबत केले होते. पूर्वी निवडणूक निकाल फिरवायला दंडेली करण्याची गरज पडली नाही. यावेळेस ती केली गेली. काही विरोधी उमेदवार व त्याच्या प्रतिनिधी विरुद्ध पोलीस कारवाई देखील केली गेली.

 जी.एन. गौहर हे त्या निवडणुकीत एका विभागात केंद्रीय पर्यवेक्षक होते. त्यांना दोन प्रकारचे अनुभव आले ते त्यांनी नमूद करून ठेवले आहेत. एका मतदार संघात सत्ताधारी नॅशनल कॉन्फरंसच्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित होता मात्र त्या उमेदवाराला विजयाची खात्री नसल्याने त्याने स्वत:ला विजयी घोषित करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यावर मतमोजणी सुरु असतांनाच दबाव आणला. तर दुसऱ्या एका मतदार संघात मुस्लीम युनायटेड फ्रंटच्या उमेदवाराने निर्णायक आघाडी घेतल्याने तेथून सत्ताधारी पक्षाचा उमेदवार निघून गेला होता. पण वरून चक्र फिरले आणि त्या उमेदवाराला मतमोजणी केंद्रावर बोलावून विजयी घोषित करण्यात आले.  गौहर यांनी हे देखील स्पष्ट केले की अशी दंडेली केली नसती तरी राजीव-फारूक युतीला बहुमत मिळाले असते आणि विरोधी मुस्लीम युनायटेड फ्रंटला फार तर २०-२२ जागा मिळाल्या असत्या व फ्रंटला विरोधी पक्षाचा दर्जाही मिळाला नसता. झालेल्या घोटाळ्याने २०-२२ जागा ऐवजी फ्रंटला ४ जागाच मिळाल्या. मते मात्र ३१ टक्के मिळालीत. सत्ताधारी आघाडीला ६३ जागा मिळाल्या. मोजक्या पण महत्वाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी केलेल्या दंडेलीने या निवडणुकीचे निकाल लोकांच्या रोषास पात्र ठरले. जनतेची सहानुभूती मुस्लीम युनायटेड फ्रंटला मिळाली.
----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


Wednesday, February 1, 2023

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ४१

 फारूक अब्दुल्लांच्या केंद्राशी जुळवून घेण्याच्या निर्णयाने केंद्र सरकार विरुद्ध उभा राहू शकणाऱ्या शक्तीची पोकळी निर्माण झाली. हीच पोकळी धार्मिकतेकडे झुकलेल्या व पाकिस्तान समर्थक असलेल्या शक्तींनी भरून काढायला सुरुवात केली. काश्मीर मधील भारत समर्थक शक्ती कमजोर होण्याच्या आणि भारत विरोधी शक्तींना बळ मिळण्याच्या कालखंडाची ही सुरुवात होती.
--------------------------------------------------------------------------------


मुख्यमंत्री पदावरून बरखास्तीचा जो धडा फारूक अब्दुल्ला यांनी घेतला तो सोयीस्कर असा होता. दिल्लीश्वरांच्या मर्जीशिवाय जम्मू-काश्मिरात सत्तेत राहता येत नाही म्हणून मग त्यांच्याशी जुळवून घेवून पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग तो धडा दाखवीत होता. त्याचवेळी मिळालेल्या दुसऱ्या धड्याकडे फारूक अब्दुल्लांनी लक्ष दिले नाही. मुख्यमंत्रीपदी असतांना फारूक प्रशासनिक अक्षमतेपायी जनतेत आणि प्रशासनात देखील अलोकप्रीय झाले होते. इंदिरा गांधीनी त्यांना बरखास्त केले नसते तर काही कालावधी नंतर त्यांच्या विरुद्ध जनतेचा असंतोष उफाळून आला असता. पण केंद्र सरकारने बरखास्त केले म्हणून जनता त्यांचे दोष विसरून त्यांच्या पाठीशी उभी राहिली हे मात्र फारूक अब्दुल्ला विसरले. दिल्लीच्या सत्तेविरुद्ध उभे राहण्याची हिम्मत केली म्हणून त्यांचे सगळे दोष लक्षात घेवून जनतेने त्यांना निवडून दिले होते हे देखील फारूक अब्दुल्ला विसरून गेले. आपल्या माणसाचे कुशासन चालेल पण बाहेरून कोणी शासन लादलेले काश्मिरी जनतेला चालत नाही ही आपल्याच जनतेची नस ओळखण्यात फारूक अब्दुल्ला कमी पडले. काश्मिरी जनतेच्या मानसिकतेची काहीसी जाणीव पंडीत नेहरुंना होती. त्यामुळे कधीच त्यांनी काश्मीरचा कारभार केंद्राच्या हाती घेतला नाही. डमी का होईना काश्मिरी मुख्यमंत्र्या करवीच त्यांनी काश्मीर हाताळले. इंदिराजींनी पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लादून सरळ केंद्राच्या हाती सत्ता घेण्याची चुक केली. त्यामुळे केंद्र विरुद्ध काश्मीर असा सरळ संघर्ष उभा राहिला. त्यात मुस्लीम विरोधी प्रतिमा असलेल्या जगमोहन यांना राज्यपाल नेमून आगीत तेल ओतले. केंद्र सरकार विरुद्धच्या काश्मिरी जनतेच्या भावना तीव्र होत गेल्या.   

अशा वातावरणात काश्मिरी जनतेच्या प्रतिक्रियेचा विचार न करता पुन्हा सत्तेत येण्यासाठी केंद्रातील सत्तेशी जुळवून घेण्याचा फारूक अब्दुल्लांचा निर्णय काश्मिरातील असंतोष उफाळून यायला कारणीभूत ठरला. फारूक अब्दुल्लांना दिल्लीशी जुळवून घेण्यात अडचण आली नाही कारण त्यावेळी त्यांचे लहानपणा पासूनचे मित्र राजीव गांधी सत्तेत आले होते. केंद्रातील नव्या सत्ताधीशाशी जुळवून घेण्याचे पहिले पाउल म्हणून फारूक अब्दुल्ला विरोधी पक्षाच्या आघाडीतून बाहेर पडले आणि लोकसभा निवडणुकीत राजीव गांधीना एकतर्फी पाठींबा दिला. फारूक अब्दुल्लांच्या देशातील विरोधी पक्षाच्या आघाडीत सामील होण्याचे चांगले परिणाम दिसू लागले होते. काश्मिरातील लोक आणि वृत्तपत्रे फक्त काश्मीरचा विचार न करता राष्ट्रीय राजकारणाचा विचार करू लागली होती. फारूक अब्दुल्लांच्या राष्ट्रीय राजकारणातील सहभागाने काश्मीर घाटीतील वृत्तपत्रात देशातील राजकीय घडामोडीच्या बातम्यांना ठळक स्थान मिळू लागले होते. फारूक अब्दुल्लांचा विरोधी आघाडीतून बाहेर पडून केंद्रातील सत्तेशी जुळवून घेण्याच्या निर्णयाने या नव्या प्रवाहाला खीळ बसली. पुन्हा काश्मीरची जनता राष्ट्रीय राजकारण विसरून काश्मीर केन्द्री झाली. शेख अब्दुल्ला तुरुंगात होते तरी केंद्र सरकारशी संघर्ष करणारा नेता आपल्यात आहे ही अधिकांश जनतेची भावना होती. नंतर फारूक अब्दुल्लाने देखील केंद्र सरकार विरुद्ध संघर्षाचा पवित्रा घेतला तेव्हा लोक त्यांच्या पाठीशी राहिले होते. केंद्र सरकारचे इतर जे विरोधक होते त्यांना काश्मिरी जनतेचा पाठींबा कमी आणि पाकिस्तानचा पाठींबा अधिक होता. फारूक अब्दुल्लांच्या केंद्राशी जुळवून घेण्याच्या निर्णयाने केंद्र सरकार विरुद्ध उभा राहू शकणाऱ्या शक्तीची पोकळी निर्माण झाली. हीच पोकळी धार्मिकतेकडे झुकलेल्या व पाकिस्तान समर्थक असलेल्या शक्तींनी भरून काढायला सुरुवात केली. काश्मीर मधील भारत समर्थक शक्ती कमजोर होण्याच्या आणि भारत विरोधी शक्तींना बळ मिळण्यास प्रारंभ होण्याच्या कालखंडाची ही सुरुवात होती.

राजीव गांधी - फारूक अब्दुल्ला यांच्यातील १९८६ चा करार हा प्रामुख्याने कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरंस यांच्यातील सत्तेच्या भागीदारीचा करार होता. डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली दोन पक्षाचे सरकार स्थापून राज्यातील विभाजनवादी कारवायांना आळा घालून केंद्र सरकारच्या मदतीने विकासकामांना गती देण्याचा निर्धार या करारातून करण्यात आला. संयुक्त मंत्रीमंडळ बनविताना फारूक अब्दुल्लांनी दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना वगळून आपले मंत्रीमंडळ बनविले. ज्येष्ठ आणि कार्यक्षम म्हणून नाव असलेल्या नेत्यांसोबत काम करणे फारूक अब्दुल्लांना सहज वाटत नसावे. पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा विनाचौकशी आपल्या पेक्षा ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना त्यांनी अपमानास्पद रित्या मंत्रीमंडळातून काढून टाकले होते. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मंत्रीमंडळात घेण्याचे ठामपणे नाकारले. स्वत: मुख्यमंत्र्यांना प्रशासन चालविण्याचा अनुभव नाही आणि मंत्रीमंडळातील सहकारी देखील अनुभवशून्य याचा परिणाम पहिल्या कार्यकाळात प्रशासनिक गोंधळ, भ्रष्टाचार वाढण्यात झाला होता या अनुभवा पासून फारूक अब्दुल्ला काहीच शिकले नाहीत. दुसऱ्या वेळेस देखील त्यांनी तसेच मंत्रीमंडळ बनविले. मात्र यावेळी ज्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला नाही अशा कॉंग्रेस व नॅशनल कॉन्फरंसच्या ज्येष्ठ सदस्यांनी विधानसभेत फारूक अब्दुल्लांना अडचणीत आणण्याची योजना बनविल्याची कुणकुण फारूक अब्दुल्लांच्या कानावर आली तेव्हा त्यांनी राज्यपाल जगमोहन यांना विधानसभा बरखास्त करून नव्या निवडणुका घेण्याची शिफारस केली राज्यपालांनी ती मान्य केली. १९८७च्या या काश्मीर विधानसभा निवडणुकीत  कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरंस हे धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करणारे दोन पक्ष एकत्र निवडणूक लढविणार असल्याने सगळे धर्मवादी आणि पाकिस्तानकडे कल असणारे गट या युती विरोधात मुस्लीम युनायटेड फ्रंट या नावाने एकत्र आले.  प्रत्येक निवडणुकीत सरकारच्या धोरणावर,कार्यक्रमावर नाराज असणारा एक वर्ग असतो तसा तो इथेही होता आणि त्याला आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी फ्रंटच्या बाजूने उभे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. फारूक अब्दुल्लाने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली नसती तर काश्मीरच्या परिस्थितीस केंद्र सरकारला जबाबदार धरले असते व त्या स्थितीत हा नाराज समुदाय फ्रंटकडे वळण्या ऐवजी नॅशनल कॉन्फरंसकडे वळू शकला असता. कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरंसच्या हातमिळवणीने मुस्लीम युनायटेड फ्रंटला आयते समर्थक मिळाले.   
----------------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८