पंतप्रधान राजीव गांधी आणि केंद्र सरकार बोफोर्सचा डाग धुवून काढण्यात गुंतल्याने जम्मू-काश्मीरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी एकट्या फारूक अब्दुल्लावर आली. पण परिस्थिती हाताळण्याचा अनुभव व क्षमता फारूक अब्दुल्ला यांच्यात नव्हती. प्रशासनावर त्यांची पकडही नव्हती.
-------------------------------------------------------------------------------
निवडणुकीत आपण जिंकलो तरी जनमत आपल्या विरोधात जावू लागल्याची जाणीव मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांना होती. प्रशासन लोकाभिमुख करून जनतेचे प्रश्न सोडविण्याची , निवडणुकीत आश्वासन दिल्या प्रमाणे केंद्राची मदत घेवून विकासकामांना गती देण्याची गरज असतांना विरोधकांना धडा शिकविण्यासाठी फारूक अब्दुल्लाने मुस्लीम युनायटेड फ्रंटच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्रास दिला. अनेकांना कारण नसतांना अटक करून तुरुंगात ठेवले. यामुळे फारूक सरकार विरोधातील असंतोष कमी होण्या ऐवजी वाढला. अशातच फारूक अब्दुल्ला यांनी वर्षानुवर्षे हिवाळ्यात जम्मूला राजधानी नेण्याची असलेली परंपरा खंडित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शांत असलेल्या जम्मूत असंतोष उफाळून आला. यात केंद्राने हस्तक्षेप करून जम्मूला हिवाळ्यात राजधानी करण्याचा निर्णय बहाल करायला भाग पाडले. बदललेल्या निर्णयाचा फायदा घेत मुस्लीम युनायटेड फ्रंटचे कार्यकर्ते जम्मूला राजधानी नेण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले. अशारितीने एका अनावश्यक निर्णयाने जम्मू आणि काश्मीर घाटी या दोन्हीही प्रदेशात असंतोष निर्माण होवून दोन्ही प्रदेश एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. याच काळात बोफोर्स तोफ सौद्यात दलाली घेतल्याचा आरोप झाला. दलालीचा संबंध थेट पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न झाल्याने दिल्लीतील व देशातील राजकारण ढवळून निघाले. अशा वातावरणात काश्मीर निवडणुकीत काश्मीरला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन विसरल्या गेले. फारसी विकासकामे सुरु करता न आल्याने आधीच असलेल्या बेरोजगारीत भर पडली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार बोफोर्सचा डाग धुवून काढण्यात गुंतल्याने जम्मू-काश्मीरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी एकट्या फारूक अब्दुल्लावर आली. पण परिस्थिती हाताळण्याचा अनुभव व क्षमता फारूक अब्दुल्ला यांच्यात नव्हती. प्रशासनावर पकडही नव्हती. गैरमार्गाने निवडणूक जिंकल्याची लोकभावना असल्याने लोक समर्थना अभावी सरकार चालविण्याचे अवघड आव्हान फारूक अब्दुल्ला समोर होते.
१९८७ची निवडणूक उंटाच्या पाठीवर शेवटची काडी म्हणतात तशी ठरली. दिल्लीला लोकमताशी काही देणेघेणे नाही , त्यांना कसेही करून आपल्या मताने चालणारे सरकारच आणायचे आहे ही भावना काश्मीरघाटीत प्रबळ बनली. काश्मिरी जनतेचा निवडणुक प्रक्रियेवरील विश्वासच या निवडणुकीने डळमळीत केला. बॅलेट नाही तर बंदूक हा विचार या निवडणुकीनंतर प्रबळ बनला. हा विचार प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी सरकारची अरेरावी कारणीभूत ठरली. या निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी व त्या नंतर अनेक उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीना विनाकारण अटक करून यातना देण्यात आल्या , तुरुंगात डांबण्यात आले. या निवडणुका काश्मीरला अस्थिरतेच्या व आतंकवादाच्या खाईत लोटण्यास कशा कारणीभूत झाल्या यासाठी एक उदाहरण दिले जाते. श्रीनगरच्या आमीर कदल मतदार संघात मुस्लीम युनायटेड फ्रंटचा उमेदवार मोहम्मद युसुफ शाह विजयी होत होता. पण त्याच्या ऐवजी हरणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले तेव्हा मतदार संघातील लोकांनी निकालाचा विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी उमेदवार युसुफ शाह व त्याच्या निवडणूक प्रतिनिधीला अटक करून तुरुंगात डांबले. कोणतेही आरोप न लावता तुरुंगात तब्बल २० महिने ठेवले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर हे दोघेही पाकिस्तानात गेले आणि पाक प्रशिक्षित आतंकवादी बनून भारतात परतले. युसुफ शाह नाव बदलून सैय्यद सलाहुद्दीन बनला. यानेच काश्मिरात अनेक आतंकवादी घटना घडविणाऱ्या हिजबुल मुजाहदिन ही आतंकवादी संघटना तयार केली. तर त्याचा निवडणूक प्रतिनिधी असलेल्या यासीन मलिक याने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या आतंकवादी संघटनेची सूत्रे आपल्या हाती घेतली. १९७० च्या दशकातील आतंकवादा पेक्षा वेगळ्या इस्लामी आतंकवादाला चालना देणारी ही निवडणूक ठरली. १९८७ च्या निवडणुकीनेच हे सगळे घडले असे म्हणता येणार नाही. या निवडणुकी नंतर सत्तेत आलेल्या फारूक अब्दुल्लाने केलेली दडपशाही व काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांचाही हा परिपाक होता. अर्थात या निवडणुकीने काश्मिरी युवकाला बॅलेट कडून बुलेटकडे जाण्याची जमीन तयार करून दिली असे म्हणता येईल.
काश्मीरच्या परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या तीन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना त्याकाळी घडत होत्या. भारतीय राजकारणात बोफोर्स मुळे उठलेल्या वादळाच्या जोडीला बाबरी मस्जिद - रामजन्मभूमी वादाचे वादळही घोंगावू लागले होते. या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने रान पेटवायला सुरुवात केली होती. हिंदुत्ववादी शक्ती संघटीत व आक्रमक होवू लागल्या होत्या. सांप्रदायिक तणाव वाढू लागला होता. जो पर्यंत इस्लाम पेक्षा काश्मीरमध्ये काश्मिरियत प्रभावी होती तोपर्यंत भारतात इतरत्र वाढणाऱ्या सांप्रदायिक तणावाचा परिणाम आणि प्रतिक्रिया काश्मीरमध्ये होत नव्हती. भारतातील सांप्रदायिक तणावाचा परिणाम आणि प्रतिक्रिया मर्यादित स्वरुपात आणि मर्यादित भागात १९८६ मध्ये राम मंदिराचे कुलूप उघडण्याच्या निर्णयानंतर दिसून आला. पण ही प्रतिक्रिया धर्मप्रेरीत असण्यापेक्षा राजकारण प्रेरित अधिक होती. तसे असले तरी काश्मीर भूमीने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सांप्रदायिक तणाव अनुभवला होता. तेव्हापासूनच भारतातील सांप्रदायिक तणावाचा परिणाम काश्मीरवर होवू लागला होता. राममंदिराच्या निमित्ताने देशात हिंदुत्ववादी लाट तयार होत होती तसा काश्मीरमध्ये काश्मिरियतचा प्रभाव घटून काश्मीरचे इस्लामीकरण वेगाने होवू लागले. धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव भारतात सर्वत्र ओसरू लागल्यावर त्याला काश्मीर अपवाद राहणे कठीण होते. काश्मीरचे इस्लामीकरण रोखण्याची जी क्षमता शेख अब्दुल्लामध्ये होती त्या क्षमतेचा संपूर्ण अभाव फारूक अब्दुल्लात होता. शेख अब्दुल्ला मस्जीदित जावून जनतेशी संवाद साधायचे ते फारूक अब्दुल्लाला जमले नाही. काश्मीरमधील वाढत्या इस्लामीप्रभावाचा फायदा पाकिस्तानने उचलला. फारूक अब्दुल्ला सरकारच्या दडपशाहीने बेरोजगार काश्मिरी तरुण पाकव्याप्त काश्मीर मध्ये जावून आतंकवादी कारवायाचे आणि शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेवू लागले. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेली महत्वाची घटना म्हणजे अफगाणीस्थानातून रशियन सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली होती. रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्राला अफगाणिस्तानातून सैन्य मागे घ्यावे लागणे ही काश्मिरी तरुणांना इस्लामची किमया वाटू लागली. भारताला काश्मीर मधून आपले सैन्य माघारी घ्यायला भाग पाडले जावू शकते अशाप्रकारची भावना वाढून काश्मिरी तरुण काश्मिरियत ऐवजी इस्लामी प्रभावा खाली येवू लागले. परिणामी जमात ए इस्लामीची ताकद वाढली. याच सुमारास पाकिस्तानचे सैनिकी शासक जिया उल हक यांचे विमान अपघातात निधन झाले तेव्हा त्याची प्रतिक्रिया काश्मिरात उमटली. या प्रतिक्रियेतून जमात ए इस्लामीची वाढलेली ताकद व पाकिस्तानचा वाढत चाललेला प्रभाव स्पष्ट झाला.
(क्रमशः)
----------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा जि.यवतमाळ
मोबाईल : ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment