Wednesday, November 30, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ३२

 १९७५ चा इंदिरा गांधी - शेख अब्दुल्ला करार  एकतर्फी असल्याने शेख अब्दुल्ला विरोधक व पाकिस्तानी धार्जिण्या शक्तींना बळ मिळाले. काश्मिरातील मिरवाईज म्हणजे मुस्लिमांचा धर्म व अध्यात्मिक गुरु. मिरवाईज आणि जमाते इस्लामी सारख्या कट्टरपंथी धार्मिक संघटनांची हातमिळवणी झाली. त्यांनी शेख अब्दुल्लाने सत्तेसाठी काश्मीरच्या जनतेशी विश्वासघात केला असा जोरदार प्रचार करून शेख अब्दुल्ला व भारत विरोधी वातावरण निर्मिती केली.
-------------------------------------------------------------------------------------------------


इंदिरा गांधी - शेख अब्दुल्ला यांच्यात झालेल्या कराराच्या परिणामी कॉंग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावून शेख अब्दुल्ला यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले. शेख अब्दुल्लांचा पक्ष नॅशनल कॉन्फरंस कॉंग्रेसने आधीच केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करून गिळंकृत केला होता. शिवाय १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख अब्दुल्ला यांचे सहकारी मिर्झा अफजल बेग यांच्या प्लेबेसाईट फ्रंटला निवडणूक लढवू दिली नव्हती. विधानसभेत आपले समर्थक आमदार नसतांना कॉंग्रेसने समर्थन दिले म्हणून शेख अब्दुल्ला फेब्रुवारी १९७५ मध्ये मुखमंत्री बनले. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात जम्मूचा एक व लडाखचा एक प्रतिनिधी घेतला व अशा प्रकारे तिघांचे मंत्रीमंडळ बनले. त्यांचे अशाप्रकारे मुख्यमंत्री बनणे त्यांचा काश्मीरवरील प्रभाव कमी होण्यास कारणीभूत ठरले. इंदिरा - अब्दुल्ला कराराच्या बाबतीत इंदिरा गांधीनी दाखविलेल्या खंबीरपणाचे देशभर कौतुकच झाले. पण काश्मिरात मात्र या कराराचा विपरीत परिणाम झाला. १९७१ च्या युद्धाच्या परिणामी काश्मिरातील छुपे पाकिस्तानी समर्थक निराश होवून शांत बसले होते  त्यांना या कराराने पुन्हा डोके वर काढण्याची संधी मिळाली. आजवर अब्दुल्लांच्या लोकप्रियते समोर निस्तेज बनलेल्या या गटांना पहिल्यांदा शेख अब्दुल्ला यांचे विरुद्ध उघड बोलण्याची व काश्मिरी जनतेला चिथावण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा शेख अब्दुल्ला आणि त्यांनी इंदिराजीशी केलेल्या कराराविरुद्ध काश्मिरात मोर्चे निघाले. सत्तेसाठी शेख अब्दुल्लाने काश्मिरी जनतेच्या हिताची व भावनांची पायमल्ली करून स्वत:ला विकले अशी चर्चा सुरु झाली. कराराच्या समर्थनार्थही मोठा जनसमुदाय पुढे आणण्यात शेख अब्दुल्लांना यश आले असले तरी त्यांचा व कराराचा विरोध करणारे लक्षणीय संख्येत पुढे आलेत आणि संघटीत झालेत. काश्मीर प्रश्न सोडवायचा तर शेख अब्दुल्लांशी वाटाघाटी अपरिहार्य व अनिवार्य असण्याची स्थिती या कराराने बदलायला सुरुवात झाली.                                                                                                                 

हा करार  एकतर्फी असल्याने शेख अब्दुल्ला विरोधक व पाकिस्तानी धार्जिण्या शक्तींना बळ मिळाले. काश्मिरातील मिरवाईज म्हणजे मुस्लिमांचा धर्म व अध्यात्मिक गुरु. मिरवाईज आणि जमाते इस्लामी सारख्या कट्टरपंथी धार्मिक संघटनांची हातमिळवणी झाली. त्यांनी शेख अब्दुल्लाने सत्तेसाठी काश्मीरच्या जनतेशी विश्वासघात केला असा जोरदार प्रचार करून शेख अब्दुल्ला व भारत विरोधी वातावरण निर्मिती केली. शेख अब्दुल्लांनी सार्वमताची मागणी सोडून देणे, अब्दुल्लांच्या अटकेच्या वेळी भारत-काश्मीर यांच्यात जे संबंध होते त्याची पुनर्स्थापना करण्याची मागणीही मान्य न झाल्याने बऱ्याच लोकांचा या प्रचारावर विश्वास बसला. हा करार शेख अब्दुल्लांच्या विश्वासार्हतेला धक्का देणारा ठरला. आजवर नामानिराळे राहून काश्मिरात भारत विरोधात छुप्या कारवाया करणाऱ्या पाकिस्तानने या करारानंतर उघडपणे कराराला विरोध करण्यासाठी बंद पाळण्याचे आणि मोर्चे काढण्याचे आवाहन केले. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या भारत विरोधातील आवाहनाला काश्मिरी जनतेकडून आंशिक का होईना प्रतिसाद मिळाला. निष्क्रिय आणि विस्कळीत झालेले आतंकवादी गट या नव्या घडामोडीने उत्साहित होवून पुन्हा सक्रीय होण्याचा प्रयत्न करू लागलेत. १९७१ च्या युद्धाच्या परिणामी भारताने काश्मीरच्या बाबतीत जे कमावले ते १९७५ च्या इंदिरा-अब्दुल्ला कराराने गमावले. १९५२ चा नेहरू-अब्दुल्ला कराराचा काश्मिरात विरोध झाला नव्हता. विरोध केला तो हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांनी. कारण तो करार एकतर्फी नव्हता. त्यात देवघेव होती. दोन्हीकडच्या भावनांचा आदर करण्यात आला होता.  त्यामुळे काश्मीर भारताच्या जवळ येण्याचा मार्ग खुला झाला होता. असा आदर १९७५ च्या करारात नसल्याने भारत सरकार व भारतीय जनतेला हवा असलेला करार होवूनही काश्मीर भारतापासून दूर गेला. हा करार भारताच्या दृष्टीने इंदिराजींचे अपयश दर्शविणारा नसून सामर्थ्य दाखविणारा असला तरी या करारामुळे काश्मीरचा प्रश्न चिघळला हे वास्तव नाकारता येणार नाही. शिवाय जम्मू-काश्मिरात कॉंग्रेस पक्ष सत्तेत आणण्यासाठी, विरोधकांना धडा शिकविण्यासाठी काश्मीरच्या सत्तेच्या सारीपाटावर इंदिराजींनी ज्या राजकीय खेळी केल्या त्यामुळे काश्मीर पूर्वीच्या तुलनेत अधिक अस्थिर व अशांत बनला. 


इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्लांना मुख्यमत्रीपदी बसविले हे काश्मिरातील कॉंग्रेसजनांना विशेषत: मुफ्ती मोहम्मद सईद सारख्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची आस असलेल्या नेत्यांना आवडले नव्हते. पण इंदिरा गांधी समोर तोंड उघडण्याची हिम्मत नसल्याने चडफडत बसण्यापलीकडे त्यांना काही करता आले नाही. शेख अब्दुल्ला विरोधी शक्तींना खतपाणी पुरविण्याचे काम तेवढे त्यांनी केले. आपणच नेमलेल्या मुख्यमंत्र्यांना विरोध होत राहावा अशा प्रकारची व्यवस्था इंदिरा गांधीनी तयार केली होती. यामुळे त्या मुख्यमंत्र्याला आपण केवळ इंदिरा गांधी यांचे कृपेने पदावर आहोत याची सतत जाणीव होत राहायची. त्याचमुळे काश्मीर मधील कॉंग्रेसच्या नेत्यांना शेख विरोधी कारवाया पासून इंदिराजींनी रोखले नाही. विधानसभेत पाठबळ नसतांना शेख अब्दुल्लांना असंतुष्ट काँग्रेसजन आणि इंदिरा-अब्दुल्ला कराराच्या विरोधाच्या निमित्ताने बिळातून बाहेर आलेले पाकिस्तान धार्जिणे गट या दोहोंचा मुकाबला करावा लागला. कॉंग्रेसच्या समर्थनाने मुख्यमंत्रीपद मिळाल्याने कॉंग्रेसजनाविरुद्ध काही करण्याच्या स्थितीत शेख अब्दुल्ला नव्हते. जमात ए इस्लामी सारख्या संघटना व त्यांचे मदरसे यांच्या विरुद्ध मात्र त्यांनी कठोर कारवाई केली. पण जनकल्याणाचे धोरणात्मक निर्णय घेण्याच्या स्थितीत ते नसल्याने विरोधकांवरील कठोर कारवाईने असंतोषच निर्माण केला. यास्थितीतून त्यांची सुटका कॉंग्रेसनेच केली. १९७५ च्या आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत इंदिराजी व कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाला. इंदिराजींची पक्षावरील पकडही सैल झाली. याचा फायदा घेत मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक मुफ्ती मोहम्मद सईद आणि कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी उत्सुक इतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी शेख अब्दुल्ला सरकारचा पाठींबा काढून घेतला. शेख अब्दुल्लांनी त्यांच्यावर मात करत जम्मू-काश्मीर राज्याच्या संविधानातील कलम  ५३ चा उपयोग करत विधानसभेच्या विसर्जनाची व नव्या निवडणुका घेण्याची शिफारस  राज्यपालांकडे केली. केंद्रात इंदिरा गांधीची सत्ता जावून जनता पक्षाची सत्ता आल्याने राज्यपाल एल.के.झा यांनी ही शिफारस स्वीकारुन २६ मार्च १९७७ रोजी राज्यपाल राजवटीची व नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा केली. सत्तेत पुनरागमन झाल्या नंतर व प्रभाव उतरणीला लागल्यानंतर प्रथमच शेख अब्दुल्लांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाविषयी सर्वत्र उत्सुकता होती. 

                                             (क्रमशः)
--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ 


Wednesday, November 23, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ३१

 
आपल्या  मागण्यांवर अडून राहून पुन्हा तुरुंगात जायचे की सत्तेच्या खुर्चीवर जावून बसायचे एवढाच पर्याय इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्ला समोर शिल्लक ठेवला होता. १९३१ पासून संघर्षात उतरलेला काश्मीरचा हा शेर १९७५ साल उजाडेपर्यंत म्हातारा झाला होता, थकला होता. थकल्यामुळे इंदिरा गांधी पुढे झुकला होता.
-------------------------------------------------------------------------------------
 

 १९६५ मध्ये भारतीय काश्मिरात सुरु झालेला दहशतवाद १९७१ पर्यंत मोडीत निघाला असतांनाच पाकिस्तानला विलक्षण अडचणीत आणणारी घटना त्याच सुमारास घडली. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर प्रथमच ७ डिसेंबर १९७० रोजी पाकिस्तानात लोकसंख्या व प्रौढ मतदान आधारित सार्वत्रिक निवडणूक झाली होती. लोकसंख्येच्या प्रमाणात पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेच्या (आपल्याकडील लोकसभे सारखी) ३०० जागांपैकी पूर्व पाकिस्तानच्या (आत्ताचा बांगलादेश ) वाट्याला १६२ आणि पश्चिम पाकिस्तानच्या (आता अस्तित्वात असलेला पाकिस्तान) वाट्याला १३८ जागा आल्या होत्या. मुख्य सामना पूर्व पाकिस्तानातील मुजीबर रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग आणि पश्चिम पाकिस्तानातील जुल्फिकार अली भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात होता.             पूर्व पाकिस्तानातील अवामी लीगने पूर्व पाकिस्तानच्या १६२ जागांपैकी १६० जागांवर विजय मिळवून पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेम्ब्लीत बहुमत मिळविले. त्यावेळी पाकिस्तानात याह्याखान यांचे सैनिकी शासन होते.                         

ही निवडणूक होई पर्यंत पाकिस्तानच्या शासनावर पश्चिम पाकिस्तानच्या नेत्यांचेच प्राबल्य होते. पहिल्यांदा पश्चिम पाकिस्तानच्या नेत्यांच्या हातून सत्ता जाण्याची वेळ आली होती. त्यासाठी त्यांची तयारी नव्हती. याह्याखान आणि भुट्टो पूर्व पाकिस्तानच्या नेत्याच्या हातात सत्ता द्यायला तयार नसल्याने पूर्व पाकिस्तानात असंतोष पसरून लोक रस्त्यावर आले. लोकांचा हा असंतोष वेळीच चिरडण्यात पूर्व पाकिस्तानातील सत्ताधार्याना अपयश येण्यामागे एक महत्वाचे कारण ठरले भारताने आपल्या हवाई हद्दीतून पाकिस्तानच्या विमानांना जावू देण्यास घातलेली बंदी ! भारतीय विमानाचे अपहरण करून लाहोर विमानतळावर ते जाळण्यात आल्याने इंदिरा गांधी सरकारने ही बंदी घातली होती. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात सुरक्षा दलाना लवकर रसद पुरविण्यात अडथळा निर्माण झाला होता. चिडलेल्या पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले केल्यानंतर ३ डिसेंबर १९७१ ला भारत पाक युद्ध सुरु झाले. १६ डिसेंबरला पूर्व पाकिस्तानात ९३००० पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करल्यानंतर हे युद्ध थांबले आणि पूर्व पाकिस्तानचे बंगलादेश या स्वतंत्र राष्ट्रात रुपांतर झाले. 


या घटनेचे अनेक परिणाम झालेत. यात पाकिस्तानचेच नाही तर मोहमद अली जीना यांच्या धर्माधारित राष्ट्र या संकल्पनेचेही तुकडे झाले. याचा काश्मिरातील धर्मावर आधारित पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या ज्या शक्ती काश्मिरात कार्यरत होत्या त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाला.  युध्दातील नेत्रदीपक विजयामुळे इंदिरा गांधींची शक्ती आणि दरारा वाढला होता. त्यामुळे स्वायत्त काश्मीर आणि स्वतंत्र काश्मीर अशा दोन्ही प्रकारच्या चळवळी चालविणाऱ्या काश्मिरी नेत्यांच्या मनोबलावरही विपरीत परिणाम झाला होता. शक्तिशाली इंदिरा गांधी आपल्याशी चर्चा करायला तयार होतील व काही प्रमाणात का होईना आपल्या मागण्या मान्य करतील अशी शक्यता त्यांच्या दृष्टीने संपुष्टात आली होती. १९५३ साली अटकेनंतर सार्वमताची मागणी रेटून धरणारे शेख अब्दुल्ला ती मागणी सोडून देवून इंदिरा गांधींशी चर्चा करायला तयार झाले ते याचमुळे. १९७१ च्या युध्दातील निर्णायक पराभवानंतर पाकिस्तानही काश्मिरात हस्तक्षेप करण्याच्या स्थितीत नव्हते. शिवाय या पराभवानंतर झालेल्या सिमला करारानुसार काश्मीर प्रश्न द्विपक्षीय (भारत व पाकिस्तान यांच्यातील) असून चर्चेद्वारे सोडविला जाईल व यात युनो किंवा तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य केला  जाणार नाही हे पाकिस्तानने मान्य केले होते.                         

या वेळेपर्यंत तरी काश्मिरी जनतेचे सर्वमान्य नेते शेख अब्दुल्लाच होते. याचा अर्थ शेख अब्दुल्लांना काश्मिरात विरोधक नव्हते असे नाही. पण अब्दुल्लांच्या तुलनेत विरोधकांना मिळणारे जनसमर्थन एवढे कमी होते की उघडपणे  विरोध करण्याची कोणाची हिम्मत नव्हती. शेख अब्दुल्लांना  विरोध .झाला होता तो त्यांच्या नॅशनल कॉन्फरंस मधूनच. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. स्वातंत्र्यापूर्वी १९३२ साली शेख अब्दुल्लांनी चौधरी गुलाम अब्बास यांच्या समवेत मुस्लीम कॉन्फरंसची स्थापना केली होती. त्यानंतर ९ वर्षांनी गांधी, नेहरू व कॉंग्रेस यांच्या प्रभावामुळे त्यांनी मुस्लीम कॉन्फरंसचे रुपांतर सर्वसमावेशक अशा नॅशनल कॉन्फरंस मध्ये केले होते. त्यांचे सहकारी चौधरी गुलाम अब्बास यांनी या परिवर्तनाला विरोध करून काश्मिरात मुस्लीम लीगची स्थापना केली होती. पण शेख अब्दुल्लांच्या प्रभावामुळे काश्मिरात मुस्लीम लीग रुजू शकली नाही. स्वातंत्र्यानंतर त्यांच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना धोका देत केंद्राशी हातमिळवणी करून सत्ता बळकावली. याचाही शेख अब्दुल्लांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला नव्हता. अशा स्थितीत शेख अब्दुल्लांना महत्व देत आणि त्यांनी सार्वमत घेण्याची मागणी सोडल्यानंतर त्यांच्याही काही मागण्या मान्य करून पुढे जाण्याची ही योग्य वेळ होती.                       

 इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्लाशी चर्चा सुरु केली पण या चर्चेअंती १९७५ मध्ये जो करार झाला त्यात शेख अब्दुल्लांची एकही मागणी मान्य करण्यात आली नव्हती. मुळात ही चर्चा शेख अब्दुल्लांचे प्रतिनिधी मिर्झा अफजल बेग आणि भारत सरकारचे प्रतिनिधी जी.पार्थसारथी यांच्यात झाली होती. या दोघांनी सहमतीचे मुद्दे व मतभेदाचे मुद्दे यांचे तीपण तयार अरुण मतभेदाच्या मुद्द्यावर इंदिरा गांधी आणि अब्दुल्लांनी चर्चा करून काय तो निर्णय घ्यावा असे सुचविले होते. पण इंदिरा गांधीनी मतभेदाच्या मुद्द्यावर चर्चा करून काही उपयोग होणार नाही असे म्हणत अब्दुल्लांशी चर्चा करणे टाळले. दोघात चर्चे ऐवजी पत्रव्यवहार झाला. १९५२ साली नेहरू-अब्दुल्ला यांच्यात जो करार झाला होता तो मान्य करून नंतरचे काश्मीरच्या बाबतीत करण्यात आलेले बदल मागे घेण्यात यावेत ही शेख अब्दुल्लांची प्रमुख मागणी होती तर आता घड्याळाचे काटे मागे फिरविता येणार नाहीत ही इंदिरा गांधींची ठाम भूमिका होती हे या पत्रव्यवहारावरून स्पष्ट होते. मागण्या पूर्ण करण्या ऐवजी शेख अब्दुल्लांच्या हाती काश्मीरची सत्ता सोपविण्याची मात्र इंदिरा गांधीनी तयारी दाखविली होती. आपल्या  मागण्यांवर अडून राहून पुन्हा तुरुंगात जायचे की सत्तेच्या खुर्चीवर जावून बसायचे एवढाच पर्याय शेख अब्दुल्ला समोर होता.                 

इंदिरा गांधीनी १९६८ मध्ये अब्दुल्लांची सुटका केली होती पण त्यांना १९७१ च्या निवडणुकीत प्रचार करता येवू नये म्हणून पुन्हा १९७१ मध्ये अटक केली होती. शेख अब्दुल्ला बोलणी करायला तयार झाल्यावर १९७२ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. हा करार झाला नसता तर त्यांच्यावर पुन्हा तुरुंगात जाण्याची पाळी येण्याची शक्यता समोर दिसत होती. १९३१ पासून संघर्षात उतरलेला काश्मीरचा हा शेर १९७५ साल उजाडेपर्यंत म्हातारा झाला होता, थकला होता. थकल्यामुळे इंदिरा गांधी पुढे झुकला होता. या करारान्वये काश्मीर व भारत यांचे संवैधानिक संबंध ३७० कलमानुसार निर्धारित होतील याला मान्यता देण्यात आली असली तरी राज्याच्या विधानसभेला फक्त जनकल्याण, सामाजिक सुरक्षा, सांस्कृतिक बाबी , मुस्लीम वैयक्तिक कायदा या बाबतीतच कायदे करण्याचे अधिकार देवून अब्दुल्लांची बोळवण करण्यात आली होती. 

                                             (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, November 16, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - ३०

 १९६५ ते ७१ दरम्यानचा दहशतवाद आणि १९८० नंतरचा दहशतवाद यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. आधीचा दहशतवाद हा स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या प्रेरणेतून उभा राहिला. याला अजिबात धार्मिक रंग नव्हता. किंबहुना धर्मनिरपेक्ष जम्मू-काश्मीर राष्ट्र अशीच त्यांची संकल्पना होती. त्याकाळात या दहशतवादी संघटनांकडून हिंदू किंवा काश्मिरी पंडिता विरुद्ध हिंसा झाली नाही.
--------------------------------------------------------------------------


१९६५ ते १९७१ दरम्यान काश्मिरात विघ्वंसक कारवाया करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या अल फतेह आणि नॅशनल लिबरेशन फ्रंट या दोन्हीही संघटना काश्मीरच्या पाकिस्तानात विलीनीकरण होण्याच्या विरोधी होत्या. स्वतंत्र जम्मू-काश्मीर राष्ट्र त्यांना हवे होते. या बाबतीत नॅशनल लिबरेशन फ्रंटने जेवढी जाहीर ठाम भूमिका घेतली तेवढी अल फतेह संघटनेने घेतली नव्हती. अल फतेहचे पहिले उद्दिष्ट पाकिस्तानची मदत घेवून भारतीय काश्मीर मुक्त करण्याची होती. त्यामुळे अल फतेह संघटनेला प्रशिक्षित करण्यात व मदत करण्यात पाकिस्तानने दाखविलेला उत्साह लिबरेशन फ्रंटच्या बाबतीत दाखविला नाही. लिबरेशन फ्रंटला प्रामुख्याने पाकव्याप्त काश्मीर मधून मदत व प्रशिक्षण मिळाले. त्याकाळी पाकिस्तानने अल फतेहचे केडर प्रशिक्षित केले असले तरी शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत देण्याबाबत हात आखडता घेतला होता. स्वतंत्र काश्मीर राष्ट्राचे उद्दिष्ट असणाऱ्या संघटना ऐवजी पाकिस्तानात काश्मीरचे विलीनीकरण करण्यास तयार असणारी संघटना बनवून तिला भारतीय काश्मीर मध्ये घुसविण्याची पाकिस्तानची योजना होती. अशा संघटनेला अल फतेहची मदत होवू शकते हा हेतू या संघटनेला प्रशिक्षित करण्यामागे होता. प्रशिक्षित लोकांसाठी शस्त्रे मागितली तेव्हा लढा सुरु करण्याची वेळ आली नसल्याचे सांगत पाकिस्तानने शस्त्रे व आर्थिक मदत देण्याचे टाळले तेव्हा अल फतेहने भारतीय काश्मीर मध्ये येवून शस्त्रास्त्रे व पैसे लुटण्याच्या घटना घडविल्या. त्यासाठी हत्या करायला मागेपुढे पाहिले नाही. मकबूल भटच्या नेतृत्वाखाली नॅशनल लिबरेशन फ्रंटने याचीच पुनरावृत्ती केली. या प्रयत्नात काश्मीर पोलिसांकडून या दोन्ही संघटनांचे म्होरके पकडल्या गेलेत आणि त्यांचे जाळे उध्वस्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. 

१९६५ ते ७१ दरम्यानचा दहशतवाद आणि १९८० नंतरचा दहशतवाद यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. आधीचा दहशतवाद हा स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या प्रेरणेतून उभा राहिला. याला अजिबात धार्मिक रंग नव्हता. किंबहुना धर्मनिरपेक्ष जम्मू-काश्मीर राष्ट्र अशीच त्यांची संकल्पना होती. त्याकाळात या दहशतवादी संघटनांकडून हिंदू किंवा काश्मिरी पंडिता विरुद्ध हिंसा झाली नाही. अमेरिकेचा व्हिएतनाम मधील पराभव व फिलीस्तिनी संघटनांचा इस्त्रायल विरोधी लढा हे त्यांचे प्रेरणास्थान होते. व्हिएतनाम आणि फिलीस्तिनी जे करू शकतात ते आपणही करू शकतो हा त्यांचा स्वप्नाळू आशावाद त्यांची अपरिपक्वता दर्शविनाराच होता. त्या आशावादातून   सशस्त्र संघर्षासाठी केडर उभे करण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे धडपड केली. या संघटनांनी ज्या दहशतवादी कारवाया केल्या त्यात किंवा यांच्या केडरमध्ये पाकिस्तानी नागरिक सामील नव्हते. भारतीय काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यातूनच यांचे केडर उभे राहिले. पाकव्याप्त काश्मीर वर पाकिस्तानचे प्रभुत्व राहावे यासाठी पाकिस्तान सरकारने १९७० साली आझाद काश्मीर अॅक्ट आणला तेव्हा त्याला तीव्र विरोध केला तो पाकव्याप्त काश्मीर मधील प्लेबिसाईट फ्रंट आणि नॅशनल लिबरेशन फ्रंटने. पाकिस्तानने हा विरोध चिरडून टाकण्यासाठी शेकडो लोकांची धरपकड केली त्यात फ्रंटचे नेते आणि सदस्यांचा समावेश होता.  १९८० नंतरचा काश्मीरमधील दहशतवाद हा यापेक्षा फार वेगळ्या स्वरूपाचा राहिला आहे. १९८० नंतरचा दहशतवाद हा पाकिस्तानच्या प्रेरणेने, पाकिस्तानच्या आर्थिक आणि शस्त्रास्त्रांच्या मदतीने तर उभा राहिलाच शिवाय भारतीय काश्मिरात विघ्वंसक कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी युवकाना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात तयार करून भारतीय काश्मीर मध्ये पाठविले जे आजतागायत सुरु आहे. १९८० नंतरच्या बहुतांश दहशत गटांची प्रेरणा धार्मिक राहिली आहे आणि बहुतेक गट पाकिस्तानचे समर्थन करणारे आहेत.                                                                                                                               

 आरंभीच्या दहशतवादाचे म्होरके यांचा संबंध कधीनाकधी नॅशनल कॉन्फरंस व मिर्झा अफझल बेगने स्थापित केलेल्या प्लेबिसाईट फ्रंटशी राहिलेला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाईट फ्रंटची स्थापना करणारा अब्दुल खालिक अन्सारी हा १९४७ पूर्वी नॅशनल कॉन्फरंस मध्ये सक्रीय होता. त्याने जमीन सुधारणा चळवळीत आणि शेख अब्दुल्लाने राजा हरीसिंग विरुद्ध भारत छोडो आंदोलनाच्या धर्तीवर सुरु केलेल्या काश्मीर छोडो आंदोलनात सहभागी झाला होता. पण त्याचे मिरपूर शहर पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्याने तो पाकिस्तानात गेला. मकबूल भट पाकिस्तानात पलायन करण्यापूर्वी मिर्झा अफझल बेगच्या प्लेबिसाईट फ्रंटच्या विद्यार्थी आघाडीत कार्यरत होता. अल फतेहचा मोठा गट प्लेबिसाईट फ्रंट किंवा नॅशनल कॉन्फरंसशी निगडीत होता. मुळात या सर्वांमध्ये स्वयंनिर्णयाचा अधिकार किंवा सार्वमताची मागणी नॅशनल कॉन्फरंस व प्लेबिसाईट फ्रंटमुळेच खोलवर रुजली होती. पण अब्दुल्लांचा पक्ष व मिर्झा अफझल बेगची फ्रंट या संदर्भात पुढे येवून काहीच कार्यक्रम देत नसल्याने या सगळ्यांनी त्यांच्यापासून दूर जात हा वेगळा मार्ग स्वीकारला. हा मार्ग स्वीकारण्यास नॅशनल कॉन्फरंस किंवा प्लेबिसाईट फ्रंटने प्रोत्साहन दिले किंवा प्रवृत्त केले नसले तरी अशा गटांबद्दल ते सहानुभूती बाळगून होते यात शंका नाही.                                                                                                                                                         

अल फतेह गट पकडल्या गेला तेव्हा कोर्टात त्यांची बाजू मांडण्यात मिर्झा अफझल बेग आघाडीवर होते. अशा गटांकडून दबाव वाढला तर भारत सरकार आपल्याशी चर्चा व वाटाघाटीसाठी तयार होण्यास मदत होईल असे मिर्झा अफझल बेग व नॅशनल कॉन्फरंसच्या इतर नेत्यांची भावना असावी. कारण पाकिस्तान समर्थकांचा बागुलबोवा नवी दिल्लीला दाखवून काश्मीरच्या राजकारणातील आपले स्थान बळकट करण्याची परंपरा नेहरू काळापासून चालत आली होती.  शेख अब्दुल्ला सत्तेत आल्यानंतर अल फतेहच्या दहशतवाद्यांवरील खटले मागे घेवून त्यांचे पुनर्वसन केले. यातील एखादा अपवाद सोडता बाकीच्यांनी पुन्हा दहशतवादी कारवायात भाग घेतला नाही. इंदिरा गांधी - शेख अब्दुल्ला कराराचा काश्मिरात विरोध होवू लागला तेव्हा अल फतेहचा मोठा गट या कराराच्या समर्थनात पुढे आला होता. कराराचे समर्थन हा अल फतेहचा शेवटचा कार्यक्रम ठरून ती संघटना निष्क्रिय झाली. तिकडे पाकव्याप्त काश्मिरातील प्लेबिसाईट फ्रंट व नॅशनल लिबरेशन फ्रंट (जी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट - जे के एल एफ या नावाने ओळखली जावू लागली होती.) यांनी आझाद काश्मीर कायद्याविरुद्ध पाकिस्तानात निदर्शने केलीत तेव्हा पाकिस्तानने यांच्या विरुद्ध कडक कारवाई केल्याने हे गटही विस्कळीत व निष्क्रिय झाले होते. १९६५ मध्ये सुरु झालेल्या दहशतवादाने  १९७१ मध्ये नांगी टाकली होती.. याचे बरेचसे श्रेय इंदिरा गांधीच्या दहशतवादा विरुद्धच्या कठोर धोरणाला आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या दक्षतेला व कार्यक्षमतेला द्यावे लागेल. त्यावेळी तर कुठूनही सीमा पार करणे सोपे असण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर पोलिसांची कामगिरी उठून दिसते. 

-------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 


Wednesday, November 9, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - २९

  भारत सरकारला जेरीस आणण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीर मध्ये विध्वंसक कारवाया करण्यासाठी गुलाम रसूल जहागीर याने  १९६७ मध्ये अल फतेह नावाची संघटना काढली. पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरात विघ्वंसक आणि घातपाती कारवायासाठी स्थापन झालेली ही पहिली आतंकवादी संघटना मानली जाते. 
--------------------------------------------------------------------------------------------


श्रीमती इंदिरा गांधी १९६६ साली सत्तेत येण्याआधीच काश्मिरात पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी कारवाया सुरु झाल्या होत्या. शास्त्रीजींच्या काळात  १९६५ चे भारत-पाक युद्ध अधिकृतरीत्या सुरु होण्याआधी पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत मोठ्या संख्येने घुसखोर काश्मिरात पाठविले होते. लोकांना चिथावणी देवून उठाव घडवून आणायचा आणि नंतर आक्रमण करून काश्मीर बळकवायची ती योजना होती. यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी एक मास्टर सेल तयार केला होता. नेहरूंनी १९६४ मध्ये शेख अब्दुल्लांची सुटका केली तेव्हा काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल शेख अब्दुल्ला व त्यांच्या पक्षाने स्पष्ट भूमिका न घेतल्याने नाराज झालेले युवक या मास्टर सेलच्या गळाला लागले होते. पाकिस्तानला अपेक्षित उठावासाठी जनतेचे समर्थन मिळाले नाही पण मास्टर सेलच्या गळाला लागलेल्या युवकांनी युद्धजन्य परिस्थितीत श्रीनगरसह काही ठिकाणी विस्फोट घडवून आणले होते. पोलिसांनी या मास्टर सेलच्या कारवाया १९६६ मध्ये थांबविल्या. पोलिसांनी अटक केलेल्यात एक गुलाम रसूल जहागीर नावाचा युवक होता. २१ ऑक्टोबर १९६५ रोजी त्याला अटक झाली. पण पोलिसांना तो अगदीच सर्वसाधारण युवक वाटला आणि मास्टर सेलच्या कारवायात याची लक्षणीय भूमिका असू शकते यावर पोलिसांचाच विश्वास बसला नाही व त्याची जानेवारी १९६६ मध्ये पॅरोलवर सुटका झाली.  पॅरोलवरप सुटका झाल्यानंतर या युवकाने नियंत्रण रेखा पार करून पाकिस्तान गाठले. भारत सरकारला जेरीस आणण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीर मध्ये विध्वंसक कारवाया करण्यासाठी गुलाम रसूल जहागीर याने  १९६७ मध्ये अल फतेह नावाची संघटना काढली. पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरात विघ्वंसक आणि घातपाती कारवायासाठी स्थापन झालेली ही पहिली आतंकवादी संघटना मानली जाते. वरील दोन्ही घटना काश्मिरात धार्मिक ध्रुवीकरण  आणि आतंकवादाचा आरंभ दर्शविणाऱ्या आहेत. 

'अल फतेह' संघटनेच्या समांतर दुसरी एक संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये आकाराला येत होती. पाकव्याप्त काश्मीर मधील मिरपूर निवासी अब्दुल खालिक अन्सारी याच्या पुढाकाराने १९६५ साली जम्मू-काश्मीर प्लेबिसाईट फ्रंटची स्थापना झाली. भारतीय काश्मीरमध्ये १९५५ साली मिर्झा अफझल बेग यांनी स्थापन केलेल्या प्लेबिसाईट फ्रंटशी या फ्रंटचा संबंध नव्हता. याच्याही आधी गिलगीट निवासी अमानुल्ला खान याने कराची शहरात स्वतंत्र जम्मू-काश्मीर राष्ट्राचा पुरस्कार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.ही समिती जम्मू-काश्मीर प्लेबिसाईट फ्रंटमध्ये विसर्जित करून अमानुल्ला खान फ्रंटचा सेक्रेटरी बनला. अब्दुल खालिक अन्सारी हा अध्यक्ष होता. खान आणि अन्सारी दोघेही व्यवसायाने वकील होते. यांना भारतातून १९५८ साली पाकिस्तानात पळून गेलेला एक युवक सहकारी म्हणून लाभला. या युवकाचे नाव होते मकबूल भट. मकबूल भट हा श्रीनगर मध्ये शिकत असतांना मिर्झा अफझल बेगच्या प्लेबिसाईट फ्रंटच्या विद्यार्थी आघाडीचा प्रमुख होता.   काश्मीरची राज्यघटना तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काश्मीरची घटना समिती विसर्जित झाली. अशा वेळी शेख अब्दुल्लांना मोकळे सोडले तर काय परिणाम होतील हे आजमावण्यासाठी शेख अब्दुल्लांची सुटका करण्यात आली होती. सुटकेनंतर त्यांना लाभलेले जनसमर्थन आणि सरकार विरोधात व्यक्त झालेला रोष बघून शेख अब्दुल्लांना पुन्हा अटक करण्यात आली. सरकार विरोधात निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरु झाले. अटके पासून वाचण्यासाठी  मकबूल भटने  नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तानात १९५८ सालीच पलायन केले होते. . तिथेच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. पाकिस्तानात निवडणूक लढवून काश्मिरी विस्थापितासाठी असलेल्या राखीव जागेवर निवडूनही आला. पत्रकारिताही केली. याचमुळे त्याला पाकव्याप्त काश्मीरमधील प्लेबिसाईट फ्रंटचा प्रसिद्धी प्रमुख बनविण्यात आले.

अब्दुल खालिक अन्सारी, अमानुल्ला खान आणि मकबूल भट या त्रिकूटाचे स्वतंत्र जम्मू-काश्मीर राष्ट्राच्या निर्मितीवर एकमत होते पण हे उद्दिष्ट साध्य कसे करायचे यावर एकमत नव्हते. सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे यावर अन्सारी ठाम होता. तर खान आणि भट मात्र सशस्त्र संघर्ष उभारावा या मताचे होते. अशी सशस्त्र आघाडी उघडण्याची परवानगी फ्रंटकडे त्यांनी मागितली पण फ्रंट मधून या कल्पनेला विरोध झाला. तेव्हा अमानुल्ला खान आणि मकबूल भट यांनी नॅशनल लिबरेशन फ्रंट नावाची भूमिगत संघटना सशस्त्र संघर्षासाठी तयार केली. याच संघटनेचे रुपांतर पुढे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये झाले. या संघटनेच्या माध्यमातून मकबूल भट याने याने भारतीय काश्मिरात काही आतंकवादी घटना घडवून आणल्या. १९६६ साली काश्मिरात प्रवेश करून भट याच्या नेतृत्वाखालील गटाने सीआयडी इन्स्पेक्टर अमरचंद याचे अपहरण केले. अमरचंदने सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गोळी घालून ठार करण्यात आले. यामुळे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी घटनेची पाळेमुळे शोधून काढत मकबूल भट आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करून नॅशनल लिबरेशन फ्रंटचे नेटवर्क उध्वस्त केले. या प्रकरणात मकबूल भट याला श्रीनगर कोर्टाने १९६८ साली फाशीची शिक्षा सुनावली. श्रीनगर तुरुंगात असतांना मकबूल भट याने आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने  सुरुंग खोदून तो सहकाऱ्यासह फरार झाला आणि नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीर मध्ये गेला.                                                                                                                 

त्यानंतर त्याने काश्मीर प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय विमानाचे अपहरण करण्याची योजना आखून ती अंमलात आणली. प्रत्यक्ष अपहरणात त्याचा सहभाग नसला तरी नियोजन त्याचेच होते. या अपहरणासाठी त्याने आपला एक सहकारी हाशीम कुरेशी याला तयार केले. पाकिस्तानी वायुदलाच्या निवृत्त वैमानिकाने अपहरण कसे करायचे याचे कुरेशीला  प्रशिक्षण दिले . हाशिम कुरेशी याने आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने श्रीनगरहून जम्मूकडे जाणाऱ्या गंगा नामक विमानाचे  ३० जानेवारी १९७१ रोजी अपहरण करून ते लाहोर विमानतळावर उतरायला भाग पाडले. त्यात ३५ प्रवासी होते. त्यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असलेले झुल्फिकारअली भुट्टो यांनी अपहरणकार्त्याशी बोलणी केली.  विमान ताब्यात ठेवून प्रवासी व विमान कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आले. प्रवासी सोडण्यात पाकिस्तानने मदत केली असली तरी अपहरणकर्त्याचे पाकिस्तानात जोरदार स्वागत आणि कौतुक झाले होते. अपहरणकर्त्याने भारताच्या कैदेत असलेल्या नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या ३६ कैद्याची सुटका करण्याची मागणी केली. इंदिरा गांधी सरकारने ती मागणी फेटाळून लावली. तेव्हा विमान धावपट्टीवरच जाळून टाकण्यात आले.     
या घटनेनंतर भारताने आपल्या हवाई हद्दीतून पाकिस्तानच्या विमान वाहतुकीवर बंदी घातली. तेव्हा मात्र आधी अपहरणकर्त्यांचे स्वागत करणाऱ्या पाकिस्तानने भारतानेच अपहरणाचा बनाव घडवून आणल्याचा कांगावा केला. अपहरणकरते आणि त्यामागे असलेल्या मकबूल भट सह  लिबरेशन फ्रंटच्या १५०च्या वर सदस्यांना पाकिस्तानने अटक केली. त्यातील फक्त ७ जणांवर खटला चालविला गेला व शिक्षा फक्त हाशिम कुरेशी या प्रमुख अपहरणकर्त्याला झाली.  भारतात आणि इंदिरा काळात घडलेली विमान अपहरणाची ही पहिली घटना होती. विमान अपहरणाचे दहशतवादी कृत्य इंदिरा गांधीनी कणखरपणे हाताळून पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली.

-----------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, November 2, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - २८

 पंडीत समुदायात संघ-जनसंघाचा प्रभाव वाढला तसा शेख अब्दुल्ला यांच्या सोबत राहिलेला हा समुदाय त्यांच्यापासून दूरच गेला नाही तर अब्दुल्लांच्या सुटकेला आणि केंद्र सरकारने अब्दुल्लांशी बोलणी करायला देखील उघड विरोध करू लागला.
---------------------------------------------------------------------------------------


जानेवारी १९६६ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्रीपदी आरूढ झाल्या नंतरचा काळ अनेक अर्थाने वादळी आणि झंझावती ठरला. काश्मीरच्या बाबतीतही हा काळ भरगच्च घडामोडीचा राहिला. इंदिरा गांधीनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हा पदावर येण्यापूर्वी घडून गेलेल्या तीन घटनांचा परिणाम काश्मीरमध्ये दिसायला सुरुवात झाली होती. पहिली घटना म्हणजे आधुनिक शिक्षण घेतलेली नवी पिढी जशी तयार झाली तशीच आधुनिक शिक्षणाला विरोध असणाऱ्या जमाते इस्लामी सारख्या संघटनांनी सुरु केलेल्या मदरसा मधून तयार झालेली पिढीही सक्रीय झाली होती. दुसरी घटना म्हणजे पंडीत नेहरूंच्या मृत्युनंतर चारच दिवसांनी काश्मीर घाटीत प्रवेश केलेल्या जनसंघाने धार्मिक धृविकरणाचा आपला खेळ सुरु केला होता. तिसरी घटना म्हणजे शेख मोहम्मद अब्दुल्लांच्या  नॅशनल कॉन्फरंसचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करून घेण्यात आले त्यातून आपली ओळख मिटविण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना पसरली. केंद्र व जम्मू-काश्मीर राज्यात कॉंग्रेसची सत्ता आल्याने केंद्रच काश्मीरची सत्ता चालवीत असून स्थानिक जनतेला डावलून काश्मिरात राज्यकारभार चालविला जात असल्याची भावना तिथल्या जनतेत निर्माण झाली. आजवर जनतेच्या असंतोषाचा रोख केंद्राच्या मदतीने सत्तेवर आलेल्या काश्मिरी नेत्यांवर होता तो रोख कॉंग्रेसने काश्मिरात सत्ता बळकावल्याने सरळ केंद्राकडे वळला.                                                               

या काळात शेख अब्दुल्ला तुरुंगातच होते. शेख अब्दुल्लांचे प्रमुख सहकारी मिर्झा अफझल बेग यांना सुद्धा नेहरूंनी तुरुंगात टाकले होते. पण काश्मीरच्या घटनासमितीत शेख अब्दुल्लांच्या जवळचा एखादा तरी नेता असावा या उद्देश्याने १९५४ मध्ये मिर्झा अफझल बेगची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.  मिर्झा अफझल बेग यांनी काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी रेटण्यासाठी प्लेबिसाईट फ्रंटची १९५५ मध्ये स्थापना केली होती. स्वत: शेख अब्दुल्ला या फ्रंट पासून दूर राहिले तरी त्यांच्या सर्वात जवळच्या सहकाऱ्याने या फ्रंटची स्थापना केल्याने याला शेख अब्दुल्लांचा आशीर्वाद असणार हे गृहीतच धरल्या गेले. मदरसा आणि आधुनिक शिक्षण घेवून तयार झालेल्या पिढीच्या मनात सार्वमत आणि स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे बीज रुजविण्याचे काम या फ्रंटने केले. इंदिरा गांधींच्या प्रारंभीच्या तीन चार वर्षात काश्मीर वरकरणी शांत भासत असला तरी आतल्याआत काश्मीरचे जनमानस आणि परिस्थिती बदलत चालली होती. शेख अब्दुल्ला तुरुंगातून बाहेर आले तर वेगळे काही घडेल अशी आशा काश्मिरी जनतेला असल्याने या काळात शेख अब्दुल्लांच्या सुटकेच्या मागणीने जोर पकडला होता. जयप्रकाश नारायण आणि १६० च्यावर खासदारांनी देखील इंदिरा गांधीकडे शेख अब्दुल्लांच्या सुटकेची मागणी केली. शेवटी इंदिरा गांधीनी १९६८ साली शेख अब्दुल्लांना तुरुंगातून मुक्त केले. मात्र काश्मीरच्या राजकारणात त्यांना सक्रीय होवू दिले नाही. अनेकदा त्यांच्यावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर काश्मीर प्रवेश बंदी घातली. १९७१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सहभागी होता येवू नये व प्रचार करता येवू नये यासाठी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली ! 

दरम्यान दोन अशा घटना घडल्या ज्यामुळे काश्मीर आजवरचा मार्ग सोडून वेगळ्या दिशेने जावू लागल्याचे संकेत मिळाले. काश्मीर प्रशासनात मुस्लिमांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय पंडीत समुदायाला रुचला नव्हता. लोकसंख्येचा विचार करता ३० टक्के जागा मुस्लिमांसाठी कमीच होत्या. पंडितांच्या संख्येचा विचार करता त्यांच्या वाट्याला अधिक जागा येवूनही ते नाराज होते. या नाराजीचा फायदा जनसंघाने उचलला. मुस्लीम बहुसंख्य असल्याने पंडितांवर अन्याय होणारच हे बिंबविण्यात बलराज मधोक यांच्या नेतृत्वाखालील जनसंघाला यश येवू लागले होते. पंडीत आणि मुस्लीम समुदायात सुप्त तणावाची स्थिती जाणवू लागली होती. त्यातच एका आंतरधर्मीय विवाहाची ठिणगी पडली. काश्मिरात आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण अगदीच तुरळक राहिले आहे. जे झालेत त्यातून कधी दोन समुदायात मोठे वाद झाल्याची नोंद नव्हती. पण जुलै १९६७ साली झालेल्या विवाहाने काश्मीरची सामाजिक वीणच विस्कटली. हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार ठरवून जनसंघ व हिंदू महासभेने देशभर काहूर उठविले.                                                                                                                     

या प्रकरणातील मुलीच्या आईने आपली मुलगी अल्पवयीन असून तिचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन करून विवाह लावल्याची तक्रार केली. त्यावेळी काश्मीरचे डीआयजी पंडीत जमातीचेच होते. त्यांनी तक्रारीची लगेच दखल घेवून पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत. पोलीस स्टेशन मध्ये मुलीची नातेवाईकांनी भेट घेतली. पंडीत समुदायाच्या नेत्यांनीही भेट घेतली. संघ-जनसंघाचे कार्यकर्तेही भेटले. सर्वांनी तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण जे काही केले ते आपल्या मर्जीने केले व आपला निर्णय बदलणार नसल्याची ठाम भूमिका मुलीने घेतली. मुलीला तिच्या पतीसोबत जावू देण्याशिवाय पोलिसांसमोर पर्याय नव्हता. हे प्रकरण इथेच थांबायला हवे होते पण थांबले नाही. पंडीत समुदाय रस्त्यावर उतरला. या प्रकरणाला धार्मिक वळण लागून मुस्लीम समुदायही रस्त्यावर आला. दोन जमातीने अशाप्रकारे आमनेसामने येण्याचा स्वातंत्र्यानंतरचा हा पहिलाच प्रसंग होता. यातही मुस्लिमांचा रोष पंडितांपेक्षा जनसंघाच्या बलराज मधोक यांचेवर अधिक होता.                                                                 

पंडितांनी हे प्रकरण थेट इंदिरा गांधी पर्यंत नेले. संमतीने झालेल्या विवाहाला धार्मिक वळण दिल्याबद्दल इंदिरा गांधीनी पंडिताच्या शिष्टमंडळाची कानउघाडणी केल्यावरच पंडीत समुदाय नरमला. त्यानंतर इंदिरा गांधीनी यशवंतराव चव्हाणांना श्रीनगरला पाठवून दोन जमातीत तडजोड घडवून आणली. पण मुस्लीम - पंडीत संबंधावर विपरीत परिणाम व्हायचा तो झालाच. पंडीत समुदायात संघ-जनसंघाचा प्रभाव वाढला तसा शेख अब्दुल्ला यांच्या सोबत राहिलेला हा समुदाय त्यांच्यापासून दूरच गेला नाही तर अब्दुल्लांच्या सुटकेला आणि केंद्र सरकारने अब्दुल्लांशी बोलणी करायला देखील उघड विरोध करू लागला. काश्मिरातील हिंदू-मुस्लीम संबंध पूर्वी सारखे सौहार्दपूर्ण राहिले नसल्याचे हे द्योतक होते. दुसरी महत्वाची घटना म्हणजे याच सुमारास पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरात आतंकवादी कारवायाही सुरु झाल्यात.  या घटनांचा आरंभ आणि इंदिरा गांधींच्या राजवटीचा आरंभ एकाच वेळी होणे हा योगायोग म्हणता येईल. इंदिरा गांधीनी राबविलेल्या धोरणाशी याचा संबंध जोडता येत नाही. 
---------------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल :९४२२१६८१५८