धर्मसंस्थे संदर्भात सुप्रसिद्ध कवी गुलजार यांचे ताजे वक्तव्य अत्यंत समर्पक आहे. धर्म म्हणजे मुदत संपलेले औषध आहे असे गुलजार बोलले. मुदत संपलेले औषध घेतले तर रोगी बरा होत नाही , उलट तो दगावण्याचा धोका असतो. असे मुदतबाह्य औषध पाजण्याचा जगात धर्मांधांकडून जिथे जिथे प्रयत्न होतो आहे तिथे तिथे मानवजात आपले सुखचैन हरवून बसली आहे .
-----------------------------------------------------------
धर्मांध तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानातील पेशावर येथे कोवळ्या मुलांच्या केलेल्या क्रूर हत्येने साऱ्या जगाला हादरवून टाकले आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेबद्दल सर्वदूर निषेध झाला असला तरी घटनेबद्दल आनंद व्यक्त करणारे उलट्या काळजाचे लोक पाहून काळजात चर्र झाल्याशिवाय राहात नाही. हे उलट्या काळजाचे लोक धर्मांध आहेत हे लक्षात घेतले तर धर्म ही संस्थाच आज जगावर मोठे संकट बनली आहे हाच निष्कर्ष निघतो. या घटनेबद्दल क्रूरकर्मा तालिबान्यांनी जेवढा आनंद व्यक्त केला तितकाच आनंद भारतातील अतिरेकी हिंदूवाद्यांना झाला हे लक्षात घेतले म्हणजे धर्मवाद माणसाला किती अमानुष बनवितो हे स्पष्ट होते. जगात प्रेम आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी धर्माचा जन्म झाल्याचे साऱ्याच धर्माचे पंडीत सांगत असले तरी प्रत्येक धर्मवाद्याचे वर्तन याच्या विरोधात राहिल्याचा इतिहास आहे. जगात धर्मावरून जितके युद्ध , दंगली आणि रक्तपात झालेत तेवढे दुसऱ्या कोणत्याही कारणावरून झाले नाहीत हा इतिहास आहे. एखाद्या धर्माने एखाद्या कालखंडात एखाद्या प्रदेशात प्रेम आणि भाईचारा निर्माण केला याचे एखादे अपवादात्मक उदाहरण इतिहासाच्या एखाद्या पानावर सापडेलही, पण इतिहासाची पाने भरली आहेत ती धर्माने एका समुदाया विरुद्ध दुसऱ्या समुदायाचा द्वेष आणि तिरस्कार करण्याने. जगात द्वेष आणि तिरस्कार निर्मितीचा एकमेव कारखाना म्हणजे धर्म आहे. धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणाने जगात द्वेष आणि तिरस्कार याची निर्मिती आणि फैलाव झालेला नाही हे लक्षात घेतले तर जगात प्रेम आणि बंधुभाव नांदायचा असेल तर धर्म नावाच्या संस्थेपासून मुक्ती मिळविण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. मानवाला मुक्ती आणि मोक्ष मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या धर्मापासून सुटका झाली तरच खऱ्या अर्थाने मानवजातीला मुक्ती मिळेल हेच आजवरचा धर्मसंस्थेचा प्रवास दर्शवीत आहे.
अर्थात हजारो वर्षाच्या धर्मप्रभावापासून समाजाला आणि जगाला एकाएकी मुक्ती मिळणार नाही हे खरे आहे. पण त्या दिशेने पावले टाकण्याची गरज आहे. या दिशेने पडणारे सर्वात मोठे क्रांतिकारी पाउल असेल ते जन्माने माणसाच्या कपाळावर धर्माची पट्टी लागता कामा नये. कोणत्या आई-बापाच्या पोटी जन्म घ्यावा हे कोणाच्याच हाती नसते. जन्माच्या अपघाताने माणसाच्या डोक्यावर धर्माचे ओझे पडता कामा नये ही अगदी तर्कसंगत गोष्ट आहे. एखाद्याला एखादा धर्म स्विकारायचा असेल तर तो त्याने जाणतेपणाने स्विकारला पाहिजे. बालमजुरी हा जसा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे , आपल्या घरात आपल्या मुलावर अत्याचार करणे हा जसा गुन्हा ठरविण्यात आला आहे तशीच तरतूद धर्माच्या बाबतीत देखील केली पाहिजे. बालकावर पालकांनी आणि समाजाने धर्म लादणे हा गुन्हा ठरविला गेला पाहिजे. वयात आल्यानंतर एखाद्याने एखादा धर्म स्विकारण्याचे ठरविले तर त्याची नोंद घेण्यापलीकडे राज्यसंस्थेचा आणि धर्मसंस्थेचा संबंध असता कामा नये. ही नोंद त्या-त्या व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी घ्यावी लागणार आहे. एकदा का स्वेच्छेने धर्म स्विकारण्याची तरतूद झाली तर एका झटक्यात तीन चतुर्थांश जग धर्ममुक्त झाल्या शिवाय राहणार नाही. धर्मलुबडे आणि धर्मभाबडे यांच्यापुरतेच धर्माचे अस्तित्व उरेल आणि धर्म हळूहळू लयाला जावून जगातील सगळा अधर्म संपून जग सुखी होईल. धर्म लयाला गेले नाही तरी धर्म सुधारणा नक्कीच होतील. स्त्रियांनी आपला धर्म स्विकारावा यासाठी त्यांना समान स्थान प्रत्येक धर्माला द्यावे लागेल . त्यांच्यावर लादलेली बंधने प्रत्येक धर्माला उठवावी लागतील . जुनाट धर्म आधुनिक तर नक्कीच बनतील ! जन्माने धर्माची पट्टी कपाळावर चिकटण्याची सोय नसती तर पेशावरच्या कोवळ्या मुलांचे प्राण वाचले असते. ओडीशात ख्रिश्चन मिशनरीच्या गाडीत झोपलेल्या दोन कोवळ्या मुलांना गाडी पेटवून जिवंत जाळण्याचा अमानवीय अपराध घडला नसता किंवा पुणे सारख्या सुसंस्कृततेचे बिरूद मिरविणाऱ्या नगरीत निरपराध मुस्लीम युवक बळी गेला नसता. जगात धर्म नसते तर आतंकवादी घटनेत जगातील एकही माणूस मारला गेला नसता. धर्ममुक्तीकडे जाणारे पहिले पाउल म्हणून धर्म जन्माने मिळता कामा नये असा कायदा आणि संविधान संशोधन करण्यासाठी आवाज उठविला पाहिजे. त्याशिवाय जगावरील धर्मसंकट टळणार नाही.
-----------------------------------------------------------------------------------

धर्मसंस्थे संदर्भात सुप्रसिद्ध कवी गुलजार यांचे ताजे वक्तव्य अत्यंत समर्पक आहे. धर्म म्हणजे मुदत संपलेले औषध आहे असे गुलजार बोलले. मुदत संपलेले औषध घेतले तर रोगी बरा होत नाही , उलट तो दगावण्याचा धोका असतो. हे मुदतबाह्य औषध पाजण्याचा जगात धर्मांधांकडून जिथे जिथे प्रयत्न होतो आहे तिथे तिथे मानवजात आपले सुखचैन हरवून बसली आहे , मृत्युच्या खाईत लोटली जात आहे. विज्ञानाचा विकास होण्या आधी , राज्यसंस्थेचा उदय आणि विकास होण्या आधी गूढ जग समजावून घेण्यासाठी आणि समाजाचे नियमन करण्यासाठी इतिहासाच्या एका टप्प्यावर धर्मसंस्थाची गरज होती. गूढ विश्वाचे भय वाटणाऱ्या मानवजातीला मानसिक स्थैर्य आणि अभय हवे होते . ही गरज प्रारंभी धर्माने पूर्ण केली असेल , पण नंतर मात्र धर्म हेच मानवजातीच्या भयाचे कारण बनले हे विसरून चालणार नाही. धर्म सांगतो ते ऐकले नाही , तसे वागले नाही तर मुक्ती नाही असा धाक साऱ्याच धर्माने घातला आणि मानवजातीला वेठीला धरले. पण समाजात जसजसा विज्ञानाचा विकास झाला , सृष्टीचे गूढ उकलण्यात विज्ञानाला यश आले तसतशी धर्माची मगरमिठी सैल होत गेली. धर्माचे मूळ काम विज्ञान आणि आधुनिक राज्यसंस्था यांनी हाती घेतल्याने धर्माच्या अस्तित्वाची गरज संपली होती. धर्माला जे साध्य करता आले नाही ते विज्ञान आणि राज्यसंस्था यांनी मिळून केले. रोगराई, भूक , नैसर्गिक आपत्ती यापासून मानवजातीला मुक्त करण्यात हजारो वर्षात कोणत्याच धर्माला यश आले नाही . हेच काम विज्ञान आणि आधुनिक राज्यसंस्थेने शे;दोनशे वर्षात करून दाखविले. धर्माच्या अस्तित्वावर आणि उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे यश होते. मात्र धर्म नावाच्या संस्थेपासून ज्या वर्गाचा फायदा होत होता त्या वर्गाने आपला धर्म वाचविण्यासाठी दुसऱ्या धर्माची भीती दाखवायला , दुसऱ्या धर्मीया विषयी द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याच्या हत्याराने आपला धर्म वाचविण्याचे कार्य चालविले आहे. पूर्वी मोक्ष आणि मुक्ती मिळणार नाही असे धमकावत धर्म प्रभाव टिकविला आणि आता परधर्मीयांची भीती दाखवत आपला धर्म टिकवून स्वत:चा स्वार्थ धर्माचा पुरस्कार करणाऱ्याकडून साधला जात आहे. हेच जगातील समस्यांचे खरे कारण आहे.
आज जगावरून एक नजर फिरविली तर आपल्या असे लक्षात येते की, जे जे राष्ट्र स्वत:ला धार्मिक राष्ट्र म्हणवून घेत आहे आणि नव्याने धर्मनिरपेक्ष राष्ट्राला धार्मिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न होत आहे अशी सगळी राष्ट्रे समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत. या सगळ्या राष्ट्रात अराजकसदृश्य परिस्थिती आहे. ही राष्ट्रे अंतर्गत किंवा बाह्ययुद्धात अडकली आहेत. द्वेष आणि तिरस्कारापोटी या राष्ट्रातील स्थैर्य , सौख्य , शांतता आणि ऐक्य धोक्यात आले आहे. विकास आणि प्रगती थांबली आहे. अनेक धर्मराष्ट्रे विघटनाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. जगाच्या पाठीवर असलेल्या एकमेव हिंदूराष्ट्राने -नेपाळने - हा धोका वेळीच ओळखून स्वत:ला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. भारतालाच नव्हे तर जगाला धर्ममुक्त करण्याची गरज असताना मोदी विजयानंतर भारताला धर्मवादाच्या आगीत नव्याने फेकण्याचा खतरनाक खेळ सुरु झाला आहे. या शक्तींना यात थोडे जरी यश मिळाले तर आज जगातील धर्मराष्ट्रे ज्या संकटात सापडली आहेत त्या संकटात भारत सापडल्याशिवाय राहणार नाही. विज्ञाननिष्ठ समाज निर्माण झाल्याशिवाय देशाची आणि जगाची धर्माच्या प्रभावापासून सुटका होणार नाही. कोपर्निकसच्या वैज्ञानिक संशोधनाला नाकारण्यात , धर्मातील समज खोटे ठरविणारे संशोधन करणाऱ्या गैलिलिओ सारख्या वैज्ञानिकाला कैद करून ठेवण्यात चर्चची चूक झाली हे आता ख्रिश्चन धर्मगुरूला जाहीरपणे मान्य करावे लागले याचे कारणच चर्च मध्ये जाणारा समाज अधिकाधिक विज्ञाननिष्ठ बनत चालला हेच आहे. जगाच्या निर्मिती विषयक बायबलचे नाही तर विज्ञानाचे म्हणणे सत्य असल्याची कबुली दिल्यानंतर खरे तर त्यांनी आता ख्रिश्चन धर्माची आवश्यकता उरली नाही हे सांगायला हवे होते. पण ते असे सांगणार नाहीत. कारण चर्चची आर्थिक उलाढाल मोठी आहे ! भारतातील मंदिराबाबत तर बोलायलाच नको. लुटीचा आणि काळा पैसा दडविण्याची ती इतिहासकाळापासून चालत आलेली ऐतिहासिक ठिकाणे आहेत. एकाएकी वाढलेली मस्जीदीची संख्या हा पैसा मिळविण्याचा धर्ममार्तंडाचा खेळ आहे हे आता लपून राहिलेले नाही. आता धर्म म्हणजे धर्मकारण राहिले नसून ते पूर्णपणे अर्थकारण बनले आहे. मात्र समाज अर्थकारणी बनला तर यांचे अर्थकारण विस्कटणार आहे. समाज अर्थनिष्ठ न बनता धर्मनिष्ठ राहावा यासाठी सगळे धर्म आणि धर्ममार्तंड धडपडत आहेत. अर्था सोबत सत्ता मिळणार असेल तर त्या धर्माचे गुणगान वरच्या पट्टीत होणार हे ओघानं आलेच. आज आपल्या देशात जे धार्मिक फुत्कार आपल्या कानावर आदळत आहेत त्या मागचे रहस्य हेच आहे. धर्म परमार्थासाठी निर्माण झाला असेलही , पण त्याच्यावर प्रभुत्व मात्र स्वार्थी लोकांनीच कायम ठेवले आहे. धर्ममुक्ती म्हणचे अनाचार नसून या स्वार्थीतत्वाच्या जोखडापासून मुक्ती ठरणार आहे.
अर्थात हजारो वर्षाच्या धर्मप्रभावापासून समाजाला आणि जगाला एकाएकी मुक्ती मिळणार नाही हे खरे आहे. पण त्या दिशेने पावले टाकण्याची गरज आहे. या दिशेने पडणारे सर्वात मोठे क्रांतिकारी पाउल असेल ते जन्माने माणसाच्या कपाळावर धर्माची पट्टी लागता कामा नये. कोणत्या आई-बापाच्या पोटी जन्म घ्यावा हे कोणाच्याच हाती नसते. जन्माच्या अपघाताने माणसाच्या डोक्यावर धर्माचे ओझे पडता कामा नये ही अगदी तर्कसंगत गोष्ट आहे. एखाद्याला एखादा धर्म स्विकारायचा असेल तर तो त्याने जाणतेपणाने स्विकारला पाहिजे. बालमजुरी हा जसा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे , आपल्या घरात आपल्या मुलावर अत्याचार करणे हा जसा गुन्हा ठरविण्यात आला आहे तशीच तरतूद धर्माच्या बाबतीत देखील केली पाहिजे. बालकावर पालकांनी आणि समाजाने धर्म लादणे हा गुन्हा ठरविला गेला पाहिजे. वयात आल्यानंतर एखाद्याने एखादा धर्म स्विकारण्याचे ठरविले तर त्याची नोंद घेण्यापलीकडे राज्यसंस्थेचा आणि धर्मसंस्थेचा संबंध असता कामा नये. ही नोंद त्या-त्या व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी घ्यावी लागणार आहे. एकदा का स्वेच्छेने धर्म स्विकारण्याची तरतूद झाली तर एका झटक्यात तीन चतुर्थांश जग धर्ममुक्त झाल्या शिवाय राहणार नाही. धर्मलुबडे आणि धर्मभाबडे यांच्यापुरतेच धर्माचे अस्तित्व उरेल आणि धर्म हळूहळू लयाला जावून जगातील सगळा अधर्म संपून जग सुखी होईल. धर्म लयाला गेले नाही तरी धर्म सुधारणा नक्कीच होतील. स्त्रियांनी आपला धर्म स्विकारावा यासाठी त्यांना समान स्थान प्रत्येक धर्माला द्यावे लागेल . त्यांच्यावर लादलेली बंधने प्रत्येक धर्माला उठवावी लागतील . जुनाट धर्म आधुनिक तर नक्कीच बनतील ! जन्माने धर्माची पट्टी कपाळावर चिकटण्याची सोय नसती तर पेशावरच्या कोवळ्या मुलांचे प्राण वाचले असते. ओडीशात ख्रिश्चन मिशनरीच्या गाडीत झोपलेल्या दोन कोवळ्या मुलांना गाडी पेटवून जिवंत जाळण्याचा अमानवीय अपराध घडला नसता किंवा पुणे सारख्या सुसंस्कृततेचे बिरूद मिरविणाऱ्या नगरीत निरपराध मुस्लीम युवक बळी गेला नसता. जगात धर्म नसते तर आतंकवादी घटनेत जगातील एकही माणूस मारला गेला नसता. धर्ममुक्तीकडे जाणारे पहिले पाउल म्हणून धर्म जन्माने मिळता कामा नये असा कायदा आणि संविधान संशोधन करण्यासाठी आवाज उठविला पाहिजे. त्याशिवाय जगावरील धर्मसंकट टळणार नाही.
-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८