Wednesday, August 24, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - २२

कलम ३७० हे देशाच्या फायद्याचे होते की काश्मीरच्या याबाबतीत ते काश्मीरच्या फायद्याचे होते याबाबत आपल्याकडे जवळपास एकमत आहे. या कलमाच्या उपयोगितेचा बारकाईने विचार केला आणि या कलमाचा आधार घेवून काश्मिरात भारतीय राज्यघटनेची जवळपास सर्वच कलमे लागू झालीत हे लक्षात घेतले तर कलम ३७० काश्मीरसाठी नाही तर देशासाठी उपयोगी ठरले हा निष्कर्ष निघतो. 
----------------------------------------------------------------------------------------

 
स्वातंत्र्यानंतर समजून न घेता राज्यघटनेतील कोणत्या कलमाची चर्चा झाली असेल तर ती कलम ३७० ची झाली आहे. या कलमामुळेच काश्मीरचा सगळा घोळ निर्माण झाला अशी सार्वत्रिक भावना निर्माण करून देण्यात आली आहे. घोळ झाला म्हणजे तो नेहरूंनीच केला असणार आणि सरदार पटेल असते तर हे कलमच घटनेत समाविष्ट करण्यात आले नसते हे त्या कलमाला घोळ समजनाराचे पुढचे प्रतिपादन असते. असे बोलणाराना माहित नसते किंवा माहित असले तरी सांगणे सोयीचे न वाटल्याने कलम ३७० चा मसुदा सरदार पटेलांच्या निवासस्थानी बऱ्याच चर्चे नंतर तयार झाला आणि नंतरच तो संविधानसभे समोर आला हे सांगितले जात नाही. कलम ३७० ची चर्चा होवून मसुदा तयार होत असतांना आणि मसुदा संविधानसभेत चर्चेअंती मंजूर होताना पंडीत नेहरू भारतात नव्हतेच. ते परदेशात होते आणि त्यावेळी अशी संपर्क साधने नव्हती की प्रत्येक गोष्टीची माहिती देवून त्यांची संमती घेणे शक्य व्हावे.                                                                                                                                                     

सरदार पटेलांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शेख अब्दुल्ला व काश्मीरच्या अन्य प्रतिनिधीच्या संमतीने तयार झालेल्या मसुद्यात संविधानसभेच्या मंजुरीसाठी ठेवण्याआधी पटेलांच्या संमतीने एक बदल करण्यात आला आणि काश्मीरच्या प्रतिनिधीना त्या बदलाविषयी अंधारात ठेवून संविधानसभेची मंजुरी घेण्यात आली तेव्हा शेख अब्दुल्ला संतप्त झाले होते आणि संविधानसभेवर बहिष्कार टाकण्याचे बोलू लागले तेव्हा पटेलांनी नेहरुंना त्यांची समजूत काढायला सांगितले होते. यावरून नेहरू व पटेल यांच्यात काश्मीर प्रश्नावर सामंजस्य आणि विश्वास होता हा निष्कर्ष काढता येतो. शेख अब्दुल्ला ज्या दुरुस्तीवरून संतप्त झाले होते ती पटेलांनी विचारपूर्वक रेटली होती. काश्मीरची घटना समिती स्थापन होवून तिचे निर्णय होई पर्यंत काश्मीर बाबतचा कोणताही निर्णय आपल्या म्हणजे शेख अब्दुल्लांच्या सरकारच्या संमतीशिवाय होवू नये हा अब्दुल्लांचा आग्रह होता. तो डावलून पटेलांनी अस्तित्वात असलेले सरकार असा बदल केला आणि तांत्रिकदृष्ट्या बदल बरोबर होता. कारण शेख अब्दुल्लांच्या जागी दुसरे कोणतेही सरकार येवू शकत होते. याचा अर्थ सरदार पटेल कलम ३७० चा बारकाईने विचार करत होते असा होतो. कलम ३७० नेहरूंच्या आग्रहामुळे आले आणि या कलमाबाबत नेहरू-पटेल यांच्यात मतभेद होते हा मुद्दाच निकालात निघतो.


कलम ३७० हे देशाच्या फायद्याचे होते की काश्मीरच्या याबाबतीत ते काश्मीरच्या फायद्याचे होते याबाबत आपल्याकडे जवळपास एकमत आहे. या कलमाच्या उपयोगितेचा बारकाईने विचार केला आणि या कलमाचा आधार घेवून काश्मिरात भारतीय राज्यघटनेची जवळपास सर्वच कलमे लागू झालीत हे लक्षात घेतले तर कलम ३७० काश्मीरसाठी नाही तर देशासाठी उपयोगी ठरले हा निष्कर्ष निघतो. समजा त्यावेळी घटनेत कलम ३७० चा समावेश केला नसता तर काय झाले असते ? राजा हरीसिंग यांनी ज्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी करून काश्मीर भारतात सामील केले त्या सामीलनाम्यानुसार भारत आणि काश्मीरचे संबंध राहिले असते. त्या सामिलनाम्यानुसार संरक्षण, परराष्ट्र संबंध आणि दळणवळण हे विषयच भारताकडे राहिले असते आणि या विषया व्यतिरिक्त इतर कोणतेही भारतीय कायदे आणि घटनेतील कलमे काश्मीरला लागूच करता आली नसती.                               

अशा परिस्थितीत भारताला काश्मीरवर आधिपत्य हवे असेल तर करता येण्यासारखी एकच गोष्ट होती ती म्हणजे सैन्याच्या बळावर काश्मीर ताब्यात घेणे ! स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवून सत्तेवर आलेले सरकार दुसऱ्याचे स्वातंत्र्य चिरडण्यासाठी आक्रमण करेल ही शक्यताच नव्हती. पाकिस्तान काश्मीरवर आक्रमण करू शकले त्याचे कारण स्वातंत्र्य लढ्याशी त्याचा काही संबंध नव्हता आणि फाळणीच्या निर्धारित नियमानुसार काश्मीरवर आपला हक्क असल्याची त्याची धारणा होती. जनमत काय आहे याच्याशी पाकिस्तानला देणेघेणे नव्हते. भारताने मात्र प्रत्येक संस्थानातील जनमताला महत्व दिले होते आणि काश्मीर बाबतीतही तेच केले. ज्या अटीवर काश्मीर भारतात यायला तयार होते त्या अटीवर काश्मीरला भारतात सामील करून घेतले.                       

भविष्यात काश्मीर इतर राज्यासारखा भारताचा एक भाग बनावा, त्सायाठी भारताचे संविधान काश्मिरात लागू व्हावे यासाठीच कलम ३७० ची तरतूद करण्यात आली. काश्मिरी जनतेच्या संमतीने व स्वेच्छेने काश्मीर भारताचा भाग बनावे हा कलम ३७० चा अर्थ आणि हेतू होता. भारतात सामील होण्याचे मान्य केले म्हणून आपल्यावर आपल्या इच्छेविरुद्ध काही लादले जाणार नाही हा विश्वास कलम ३७० मधून काश्मिरी जनतेला आणि नेत्यांना मिळाला होता. काश्मीरची जनता स्वेच्छेने संपूर्ण सामिलीकरनास मान्यता देईल हा विश्वास भारतीय नेतृत्वाला वाटत असल्यानेच कलम ३७० कायमस्वरूपी राहणार नाही हे सांगितले जात होते. घटनेतील तात्पुरत्या शब्दाचा पटेलांनी लावलेला अर्थ पंडीत नेहरू आणि इतर नेत्यांनी समजून घेतला असता , मानला असता तर काश्मीरचा चक्रव्यूह निर्माण झालाच नसता.                                                                                                                                         

कलम ३७० तात्पुरत्या स्वरुपात घटनेत सामील करून घेण्यात आले तेव्हा तात्पुरते याचा अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न पत्रकारांनी सरदार पटेल यांना विचारला होता. त्यावर त्यांचे उत्तर होते : काश्मिरी जनता व भारतीय जनता यांचे मनोमीलन झाले की कलम ३७० संपुष्टात येईल ! पण अशा मनोमिलनाच्या प्रयत्नाला प्राधान्य देण्याऐवजी भारतीय संविधान काश्मीर मध्ये लागू करण्याला प्राधान्य दिले गेले. यातून विश्वास निर्माण होण्या ऐवजी अविश्वासाची बीजे रोवल्या गेली. या बाबतीत बराचसा दोष पंडीत नेहरूंकडे जातो. पंडीत नेहरूंची काश्मीर प्रश्न हाताळतांना अडचण झाली ती सरदार पटेल नसण्याची. १९५० पर्यंत काश्मीर बाबतचा पक्षांतर्गत दबाव पटेल यांचेमुळे नेहरुंना फारसा जाणवला नव्हता. पटेलांच्या मृत्यूनंतर हिंदुत्ववाद्यांच्या दबावा सोबत कॉंग्रेस अंतर्गत दबावाचाही नेहरुंना सामना करावा लागला. काश्मीर बाबत एखादा निर्णय अंमलात आणायचा तर पटेल यांचेवर ते काम सोपविले की नेहरुंना चिंता नसायची. पटेल यांचे नंतर मात्र काश्मीर बाबतीत, मंत्रीमंडळात, संसदेत व संसदेच्या बाहेरही एकटे पडले होते.  या सगळ्यांना तोंड देण्यासाठीच नेहरुंना काश्मिरात भारतीय संविधान लागू करण्याची घाई झाली होती. सरदार पटेल हयात असे पर्यंत काश्मीर बाबतचे निर्णय नेहरू आणि पटेल यांनी मिळून घेतले. सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर पंडीत नेहरूंचा मृत्यू होईपर्यंत काश्मीर संबंधी झालेल्या निर्णयांसाठी नेहरू जबाबदार होते. 
                                           (क्रमशः)
-----------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

Wednesday, August 17, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - २१

 नेहरू सरकारातून बाहेर पडल्यावर सरकारच्या काश्मीर धोरणाला विरोध करणारे जनसंघाचे संस्थापक  श्यामाप्रसाद मुखर्जींना मंत्रीमंडळात असतांना काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेण्यास संमती कशी दिली या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते."त्यावेळच्या विशेष परिस्थितीत तो निर्णय घ्यावा लागला होता.संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताच्या काही अपेक्षा होत्या, पण त्या संस्थेकडून भारतास योग्य न्याय मिळाला नाही." 
----------------------------------------------------------------------------------


इंग्रज , कॉंग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्यात फाळणी बाबत हिंदुबहुल प्रदेश भारताकडे तर मुस्लीम बहुल प्रदेश प्मिळून पाकिस्तान बनेल यावर सहमती झाली होती. इंग्रजांच्या अधिपत्याखाली जी संस्थाने आपला कारभार स्वतंत्रपणे पाहात होती त्यांना आपल्या मर्जीनुसार भारत किंवा पाकिस्तानात सामील होण्याचे स्वातंत्र्य किंवा दोघांपासून वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य इंग्रजांनी बहाल केले होते. इंग्रजांच्या या न नीतीला त्यावेळच्या कॉंग्रेसचा विरोध होता. स्वातंत्र्य चळवळीत संस्थानाच्या अधिपत्याखालील प्रदेशातील जनताही सहभागी झाली होती आणि त्या जनतेची इंग्रजापासुनच नाही तर संस्थानिका पासूनही स्वतंत्र राहण्याची इच्छा प्रकट झाली होती. तेव्हा एखाद्या संस्थानातील प्रजा आणि संस्थानिक यांच्यात मतभेद असतील तर जनतेचा कल काय आहे हे बघण्यासाठी सार्वमत घेवूनच त्या संस्थाना बाबत निर्णय घेतला पाहिजे हा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा आग्रह होता. एखाद्या संस्थाना बाबत भारत व पाकिस्तानात मतभेद असतील तर तिथेही जनतेची इच्छा आजमावली जावी हा कॉंग्रेसचा आग्रह होता. तेव्हा कॉंग्रेसने असा आग्रह धरला नसता तर फाळणीच्या निकषानुसार भारताची जी सीमारेषा निश्चित झाली होती त्यातील अनेक संस्थानांनी भारतात सामील होण्या ऐवजी स्वतंत्र कारभार करण्यास प्राधान्य दिले असते. ही केवळ काल्पनिक बाब नव्हती तर प्रत्यक्षात तशी उदाहरणे समोर आली होती. अशा उदाहरणात हैदराबाद सारखे मुस्लीम राजा असलेले संस्थानच नव्हते तर त्रावणकोर सारखे हिंदू संस्थान देखील होते.                         

भारत-पाक सीमेवर असलेल्या जुनागढच्या मुस्लीम संस्थानिकाने तर संस्थानातील बहुसंख्य प्रजा हिंदू असतांना पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सरळ सरळ जनतेची इच्छा डावलणारा होता. त्यामुळे संस्थानाच्या विलीनीकरणाचे काम पाहणारे मंत्री म्हणून सरदार पटेलांनी जुनागढ ताब्यात घेवून या संस्थानावर भारत-पाकिस्तानात वाद होवू नये म्हणून सार्वमत घेवून जुनागढच्या भारतातील विलीनीकरणावर जनतेचे शिक्कामोर्तब करून घेतले. हा जनतेच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेवू पाहणाऱ्या संस्थानिकांना इशारा होता. या पार्श्वभूमीवर त्यावेळच्या काश्मीरच्या स्थितीकडे पाहिले पाहिजे. काश्मीर संस्थानात राजा हिंदू पण ९५ टक्केपेक्षा अधिक प्रजा मुसलमान होती. मुस्लीम बहुल प्रदेश म्हणून पाकिस्तानने काश्मीरवर दावा केला होता. हिंदू राजाला स्वतंत्र राहायचे होते. तेथील जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेख अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरंसला राजेशाही नको होती आणि त्यांची पसंती भारता अंतर्गत स्वायत्त काश्मीरला होती. अशा वादग्रस्त स्थितीत जनतेची इच्छा सर्वोपरी ही त्यावेळच्या कॉंग्रेसची भूमिका काश्मीरलाही लागू होत होती. पण पाकिस्तानने कबायली लोकांना पुढे करून काश्मीरवर आक्रमण केल्याने त्यावेळी सार्वमत घेण्यासारखी स्थिती नव्हती आणि काश्मीर वरील आक्रमण परतून लावण्यासाठी भारताची मदत पाहिजे असेल तर राजाने आधी सामिलीकरण करारावर स्वाक्षरी करावी आणि युद्ध संपून शांतता प्रस्थापित झाल्यावर सार्वमत घेण्यास भारताने तयारी दर्शविली होती. काश्मीरचे सामीलीकरण स्वीकारतांना दिलेल्या पत्रात भारताच्या गव्हर्नर जनरलने परिस्थिती निवळल्यावर सार्वमत घेण्याची हमी देणारे पत्र दिले होते. वादग्रस्त असलेल्या इतर संस्थानाबाबत कॉंग्रेसचे जे धोरण होते तेच काश्मीरला लागू करण्यात आले. शेख अब्दुल्लाने नेहरूंकडून वदवून घेतले वगैरे चर्चेला कुठलाही आधार नाही. पंडीत नेहरूंनी फक्त सार्वमताची भारताची तयारी असल्याचा पुनरुच्चार तेवढा केला. 

काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेल्याबद्दलही नेहरुंना दोष दिला जातो. पण हा नेहरूंचा एकट्याचा निर्णय नव्हता. मंत्रिमंडळाची त्या निर्णयाला संमती होती. ते मंत्रीमंडळ निव्वळ कॉंग्रेसचे नव्हते तर त्या मंत्रीमंडळात इतर पक्षाचे दिग्गज नेते पण होते. नेहरू सरकारातून बाहेर पडल्यावर सरकारच्या काश्मीर धोरणाला विरोध करणाऱ्या हिंदू महासभेच्या श्यामाप्रसाद मुखर्जींना मंत्रीमंडळात असतांना काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेण्यास संमती कशी दिली या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते."त्यावेळच्या विशेष परिस्थितीत तो निर्णय घ्यावा लागला होता.संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताच्या काही अपेक्षा होत्या, पण त्या संस्थेकडून भारतास योग्य न्याय मिळाला नाही." या उत्तरावरून स्पष्ट होते की निर्णय नेहरूंच्या मनात आला म्हणून झाला नाही. त्यावेळच्या परिस्थितीत सर्वपक्षीय सरकारला वेगळा पर्याय दिसत नव्हता. संयुक्त राष्ट्रसंघात न जाता युद्ध सुरु ठेवले असते तर पाकिस्तानने ताब्यात घेतलेला काश्मीरचा भाग मुक्त करता आला असता असे आज बोलले जाते. असेच असते तर संयुक्त राष्ट्रात जाण्यास मंत्रीमंडळाने संमती दिलीच नसती. पाकिस्तानच्या फुसीने २० ऑक्टोबर १९४७ ला सशस्त्र कबायली काश्मीरात घुसले. ते श्रीनगरच्या जवळ आल्या नंतर राजा हरिसिंग यांनी २६ ऑक्टोबरला सामीलनाम्यावर सही केल्यानंतर २७-२८ ऑक्टोबरला भारतीय सैन्य विमानाने श्रीनगर विमानतळावर उतरले. त्यानंतर कबायली आणि कबायली वेषातील पाकिस्तानी सैनिकांना मागे ढकलणे सुरु झाले. भारतासाठी सैनिकांना मदत पोहोचविणे जेवढे जिकीरीचे तेवढेच पाकिस्तानसाठी तिथे मदत पोचविणे सोपे होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी आक्रमकांचा प्रतिकार केला व त्यांना मागे ढकलले. दोन महिन्याच्या युद्धानंतर पुढे जाण्यात प्रगती होत नाही हे बघून संयुक्त राष्ट्रात जाण्याचा निर्णय झाला होता.                                                                                                                                       

भारताची दुसरी अडचण होती ती म्हणजे इंग्रज सैनिक अधिकारी या मोहिमेत होते. तेव्हा सेनापतीही इंग्रजच होता. त्यावेळी पाकिस्तानचा सेनाप्रमुखही इंग्रजच होता आणि त्याने काश्मीरवर आक्रमण करायला मान्यता दिली नसती म्हणूनच पाकिस्तानने कबायली लोकांना पुढे करून आक्रमण केले होते. भारताने मात्र इंग्रज सेनापती व अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकार केला होता. लढाईच्या डावपेचाबाबत त्यांचाच शब्द अंतिम होता. तेव्हा ही विशेष परिस्थिती लक्षात न घेता भारत संयुक्त राष्ट्रात गेला नसता तर पाकिस्तानने गिळंकृत केलेला काश्मीरचा भाग परत मिळवता आला असता असे बोलणे आज सोपे वाटते. तेव्हा तर आपण इंग्रज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली लढत होतो पण शास्त्रीजी पंतप्रधान असतांना १९६५ साली झालेल्या युद्धातही भारताला काश्मीर आघाडीवर यश मिळाले नव्हते. भारताला यश मिळाले होते ते पंजाब, राजस्थानच्या आघाडीवर. १९४७ साली राष्ट्रसंघात जाणे तेव्हाच्या परिस्थितीतील निर्णय होता आणि तो कोणाला आज चूक वाटत असेल तर त्या चुकीबद्दल एकटे नेहरू दोषी नव्हते. मंत्रीमंडळाचा सामुहिक निर्णय होता ज्यात सरदार पटेलही सहभागी होते. सरदार पटेल हयात असतांना काश्मीर संबंधी शेवटचा व  सर्वात महत्वाचा धोरणात्मक निर्णय झाला तो कलम ३७० चा. या कलमावर तेव्हापासून सुरु झालेला गदारोळ आणि उलटसुलट चर्चा आजतागायत थांबलेली नाही. या कलमाबाबत नेहरू आणि पटेल यांची वेगळी मते होती का आणि कलम ३७० चा घटनेत समावेश केला नसता तर काय झाले असते याचा विस्ताराने विचार करणे म्हणूनच महत्वाचे आहे.
                                                     (क्रमश:).
----------------------------------------------------------------------------------------  
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८ Wednesday, August 10, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - २०

 पंडीत नेहरू ऐवजी सरदार पटेल यांनी काश्मीर प्रश्न हाताळला असता तर काश्मीरची समस्याच निर्माण झाली नसती अशी चर्चा सतत होत असते. केंद्रातील सध्याचे राज्यकर्ते अशी चर्चा करण्यात आणि काश्मीर बाबत नेहरू - पटेल यांच्यात मतभेद होते असे सांगण्यात आघाडीवर आहेत. इतिहासातील नोंदी मात्र सांगतात की पटेल हयात असे पर्यंत काश्मीर संबंधी कोणताही निर्णय त्यांच्या संमती शिवाय झाला नाही. मतभेदांच्या वावड्यांवर तर पटेलांनीच नेहरुंना पत्र लिहून आश्चर्य व्यक्त केले होते आणि काश्मीरवर आपल्यात काही मतभेद आहेत याची मलाच माहिती नाही असे त्या पत्रात स्पष्ट लिहिले होते !
-------------------------------------------------------------------------------------------


नेहरूंच्या मृत्यूसोबत भारत - काश्मीर संबंधाचे एक पर्व समाप्त झाले. नेहरू गेले तेव्हा काश्मीर कोणत्या वळणावर होता आणि काश्मीर संदर्भात कोणत्या प्रश्नांचा वारसा ते सोडून गेले याचा सारांशाने उहापोह करून पुढच्या घडामोडीकडे वळणे इष्ट ठरेल. काश्मीर बाबत नेहरूंनी काही चुका केल्या आहेत पण अनेक सामुहिक धोरणाचे जे परिणाम झालेत त्याचे खापरही नेहरूंवर फोडण्यात येते. काश्मीर बाबत असेही बोलले जाते की सरदार पटेलांनी काश्मीर प्रश्न हाताळला असता तर काश्मीरचा गुंता निर्माण झालाच नसता. इतिहासातील नोंदी मात्र या प्रचलीत समजुती पेक्षा वेगळ्या आहेत.. काश्मीर भारतात यावा या बाबतीत सरदार पटेल मुळीच आग्रही नव्हते. तसे त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचे जवळ बोलूनही दाखवल्याची नोंद आहे. जुनागढ व हैदराबाद संस्थान याचेवर पाकिस्तान करत असलेला दावा पाकिस्तान सोडायला तयार असेल तर काश्मीर पाकिस्तानात जाण्याला पटेलांची आडकाठी नव्हती. १५ ऑगस्ट १९४७ च्या आधी लॉर्ड माउंटबॅटन श्रीनगरला गेले होते तेव्हा त्यांनी महाराजा हरिसिंग यांना सांगितले होते की  तुमचे संस्थान भारतात विलीन केले नाही तरी भारताचा त्यावर आक्षेप असणार नाही. तेव्हा हरिसिंग यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना या बाबतीत पटेलांनी देखील आश्वस्त केले असल्याचे सांगितले होते. पटेलांचे राजा हरिसिंग यांचेशी चांगले संबंध होते आणि नेहरूंचे राजाशी कटू संबंध होते हा इतिहास आहे.                                                                                                                                 

इंग्रजांना काश्मीर पाकिस्तानात गेले पाहिजे असे वाटत असल्याने लॉर्ड माउंटबॅटन यांनी हरीसिंगाना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला दिला होता. सावरकरांची हिंदुमहासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा हरिसिंग यांना आपले संस्थान भारत व पाकिस्तान पासून स्वतंत्र ठेवण्याचा सल्ला व आग्रह होता. हरीसिंगांची स्वत:ची इच्छा स्वतंत्र काश्मीरचा राजा राहण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी भारत व पाकिस्तानशी मैत्री करार करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. पाकिस्तानने राजा हरिसिंग यांचा प्रस्ताव मान्य केला होता. काश्मीर पाकिस्तानात येत नाही याच्या दु:खा पेक्षा ते भारतात जात नाही याचा जीनांना जास्त आनंद होता किंवा काश्मीर भारतापासून वेगळे राहिले तर त्याचा केव्हाही घास घेता येईल असे गृहित धरून त्यांनी राजा हरिसिंग यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र काश्मीरचा प्रस्ताव मान्य केला असावा.  हा प्रस्ताव काश्मिरात राजेशाही विरुद्ध लढणारे शेख मोहम्मद अब्दुल्ला, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना मान्य नव्हता. हे तिघेही काश्मीर भारतात सामील होण्याच्या बाजूने होते. त्यामुळे भारत सरकारने राजा हरिसिंग यांचा स्वतंत्र काश्मीरचा प्रस्ताव अमान्य केला होता.                         


१९४७ साली पाकिस्तानने कबायली लोकांच्या आडून आक्रमण केल्यावर राजा हरीसिंगाना काश्मीर भारतात सामील करण्यास मान्यता द्यावी लागली. त्यानंतर पटेलांचा काश्मीर बाबत धोरण व दृष्टीकोन बदलला आणि काश्मीरच्या बाबतीत नेहरुंना त्यांचेकडून जी मदत हवी होती ती एखादा अपवाद वगळता कोणतेही हातचे न राखता पटेलांनी केली. काश्मीर बाबत नेहरू आणि पटेल यांच्यात मतभेद होते अशी चर्चा आजही होते. आणि सध्याचे राज्यकर्ते अशी चर्चा करण्यात आघाडीवर आहेत. पण तेच नाही तर अनेकांना तसे वाटते. असे वाटणाऱ्यात ९० च्या दशकात केंद्रात गृहसचिव राहिलेले व काश्मीर संदर्भात नेमलेल्या ३-४ समित्यांवर काम केलेले माधव गोडबोले सारखे लोकही आहेत. त्यांनी कलम ३७० वर लिहिलेल्या पुस्तकात पटेल-नेहरू यांच्यात  मतभेद असल्याचा उल्लेख केला आहे.आणि पुढे हेही लिहिले आहे की पटेल-नेहरू यांच्यात किंवा पटेलांचा इतर नेत्यांशी काश्मीर प्रश्नावर झालेल्या पत्रव्यवहारात पटेल-नेहरू यांचेत काश्मीर प्रश्नावर मतभेद होते याचा कोणताही पुरावा आढळत नाही !                                                                                                                                         

स्वत: पटेलांनी नेहरुंना लिहिलेले पत्र इंडियन एक्सप्रेस दैनिकाने उद्घृत केले आहे त्या पत्रात काश्मीर प्रश्न हाताळण्यात आपल्यात मतभेद असल्याची चर्चा लोक करीत असतात याबद्दल पटेलांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आपल्यात असे काही मतभेद आहेत याची मला तरी माहिती नाही असे पटेलांनी त्या पत्रात पुढे लिहिले होते. पण तरीही ही चर्चा थांबलेली नाही. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या चार्चेमागे असतो ती चर्चा कधीच थांबत नाही. अशी चर्चा संघप्रेमी नसलेल्या , संघाशी काडीमात्र संबंध नसलेल्यांच्या गळी कशी उतरवायची यात संघाची विलक्षण हातोटी आहे. सगळी माहिती मिळवू शकणारे लोकही अशा चर्चांना कसे बळी पडतात याचे उदाहरण म्हणून इथे माधव गोडबोलेंचा उल्लेख केला आहे. पण असे गोडबोले दिल्लीतच नाही तर गल्लीबोळात असल्याने काश्मीर बाबत सत्याचे आकलन होणे अवघड झाले आहे.                                                                                         

सरदार पटेल हयात असे पर्यंत काश्मीर संबंधी कोणताही धोरणात्मक निर्णय नेहरूंनी पटेलांच्या संमती शिवाय घेतला नाही. पटेल हयात असेपर्यंत काश्मीर संबंधी जे धोरणात्मक निर्णय झालेत ते असे आहेत. एक, काश्मीरचा सामीलनामा त्यातील अटी-शर्तीसहित स्वीकारणे. दोन,सामिलीकरणावर  काश्मीर मधील अस्थिरता संपताच काश्मिरी जनतेकडून सार्वमताच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करून घेणे. तीन, पाकिस्तान विरोधात संयुक्त राष्ट्रसंघाकडे तक्रार करणे आणि युद्धबंदी मान्य करणे. आणि चार, सामीलनाम्यात उल्लेखित विषया व्यतिरिक्त भारतीय संविधानाच्या अधिकार क्षेत्राचा  विस्तार जम्मू-काश्मीर विधीमंडळाच्या संमतीनेच होण्यासाठी कलम ३७० ची तरतूद. काश्मीर भारतातच राहिले पाहिजे हा नेहरूंचा आग्रह असला तरी त्यासाठी किंवा त्या संदर्भात पटेलांच्या हयातीत झालेले हे चारही निर्णय एकट्या पंडीत नेहरूंनी घेतलेले नव्हते. प्रत्येक निर्णयात पटेलांचा सहभाग होताच शिवाय कॉंग्रेस पक्ष, संविधान सभा, संसद आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुकी आधीचे सर्वपक्षीय सरकार यांचाही वरील पैकी त्यांचा ज्याच्याशी संबंध येत होता अशा काश्मीर संबंधी धोरणात  सहभाग होता. काश्मीर संबंधी वर उल्लेख केलेली  चार धोरणे आणि निर्णय कशी झालीत याच्या तपशिलात गेले की मुद्दा अधिक स्पष्ट होईल.
                                                                 (क्रमशः)
 ------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि.यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८   

Thursday, August 4, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १९

पाकिस्तानात शेख अब्दुल्लांचे स्वागत करताना उतू गेलेला उत्साह लगेच ओसरू लागला. कारण शेख अब्दुल्लांनी बोलण्याची संधी मिळेल तेव्हा भारतातील धर्मनिरपेक्षतेचे कौतुक केले. भारताकडून काश्मीरवर अन्याय झाला आहे आणि तो दूर करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी अशा अर्थाचे बोलणे अपेक्षित असतांना शेख अब्दुल्लानी भारतातील धर्मनिरपेक्षतेचे कौतुक करणे पाकिस्तानला मानवण्यासारखे नव्हते.
--------------------------------------------------------------------------------------------


शेख अब्दुल्ला पाकिस्तानची राजधानी रावळपिंडीत पोचले तेव्हा तेथील जनतेने त्यांचे जोरदार स्वागत केले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नेहरूंशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत पोचले तेव्हा त्यांचे स्वागत झाले नव्हते. उलट त्यांच्या आगमनाने दिल्लीत राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या आधीही शेख घटना समितीच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले तेव्हा आणि काश्मीर संदर्भात १९५२ साली झालेल्या 'दिल्ली करारा'ला अंतिम रूप देण्यासाठी शेख दिल्लीत आले तेव्हाही जनतेकडून त्यांचे स्वागत झाल्याची नोंद नाही. शेख अब्दुल्लांच्या इच्छेने आणि प्रयत्नाने फाळणीच्या वेळी काश्मीर भारताशी जोडल्या गेला या संदर्भात भारतीय जनतेकडून कधीही कृतज्ञता प्रकट झाली नाही.  काश्मीर भारता अंतर्गत पण स्वायत्त राज्य असले पाहिजे या त्यांच्या आग्रही भूमिकेला सामीलीकरणाच्या कराराचा संदर्भ आहे हे भारतीय जनतेने कधी समजून घेतले नाही. या पार्श्वभूमीवर आरेसेस,जनसंघ यासारख्या हिंदुत्ववादी समूहांना काश्मीरची स्वायत्तता मान्यच नाही याच्या प्रतिक्रियेतून  स्वायत्तता ते स्वयंनिर्णयाचा काश्मिरी जनतेचा अधिकार अशी शेख अब्दुल्लांची झालेली वाटचाल सर्वसामान्य भारतीय जनतेच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. जनतेला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटण्या ऐवजी ते देशद्रोही आहेत असेच वाटत आले. काश्मीरची गुंतागुंत माहित असलेल्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाला दिलेल्या वचनाचे ज्ञान असूनही त्यांच्याकडून कधी शेख अब्दुल्लांचे मनापासून कौतुक झाले नाही. स्वतंत्र भारतात जम्मू-काश्मीर वगळता शेख अब्दुल्लांचे पाकिस्तानात झाले तसे उत्स्फूर्त स्वागत कधीच झाले नाही.

पाकिस्तान व काश्मीर यांच्यामध्ये शेख अब्दुल्ला खडकासारखे उभे राहिल्याने फाळणीच्या वेळी काश्मीर पाकिस्तानच्या वाट्याला आले नव्हते. याची सल पाकिस्तानची जनता आणि सरकार यांच्या मनात कायम असतांना पाकिस्तानची राजधानी रावळपिंडीत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून तेथील जनतेने त्यांचे स्वागत केले. शत्रूराष्ट्राच्या तुरुंगात १० वर्षे राहिल्या नंतर शेख अब्दुल्लांचा भारताप्रती मोह्भंग झाला असेल व फाळणीच्या वेळी त्यांचे असलेले विचार आता बदलले असतील ही भावना कदाचित अशा स्वागतामागे असेल. बदललेल्या परिस्थितीत शेख अब्दुल्ला काय बोलतात या उत्सुकतेपोटी रावळपिंडीत झालेल्या शेख अब्दुल्लांच्या जाहीरसभेला पाकिस्तानी नागरिकांनी गर्दी केली होती. भारतातील मुसलमानांच्या आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या सुरक्षा आणि प्रगतीसाठी भारत-पाक संबंध सुधारण्यावर त्यांनी जोर दिला. हे संबंध सुधारले तरच काश्मिरात शांतता नांदेल आणि काश्मीरची प्रगती होईल हेही त्यांनी मांडले. पण या मांडणीत कुठेही भारत विरोधी सूर नसल्याने पाकिस्तानची निराशाच झाली. अब्दुल्लांचे स्वागत करताना उतू गेलेला उत्साह लगेच ओसरू लागला. कारण शेख अब्दुल्लांनी बोलण्याची संधी मिळेल तेव्हा भारतातील धर्मनिरपेक्षतेचे कौतुक केले.                                                                           

भारताकडून काश्मीरवर अन्याय झाला आहे आणि तो दूर करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी अशा अर्थाचे बोलणे अपेक्षित असतांना शेख अब्दुल्लानी भारतातील धर्मनिरपेक्षतेचे कौतुक करणे पाकिस्तानला मानवण्यासारखे नव्हते. त्यामुळे दोनच दिवसात पाकिस्तानी वर्तमानपत्रातून शेख अब्दुल्लांवर टीका सुरु झाली. आपण काश्मीरचे प्रतिनिधी आहोत व सार्वमत न घेवून भारत काश्मीरवर करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्या ऐवजी शेख अब्दुल्ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल पाकिस्तानी वृत्तपत्रांचा आक्षेप होता. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुबखान यांनी मात्र चर्चेसाठी भरपूर वेळ दिला. भारताच्या पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी जूनच्या मध्यात दिल्लीला येण्याची अयुबखान यांनी तयारी दर्शविली. पाकिस्तान दौऱ्याचे मुख्य प्रयोजन साध्य झाले होते. मात्र शेख अब्दुल्लांना पाकव्याप्त काश्मीर मधील जनतेच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. त्यासाठी ते २७ मे च्या सकाळीच रावळपिंडीहून मुजफ्फराबादला रवाना झाले. पण वाटेतच त्यांना पंडीत नेहरूंच्या निधनाची वार्ता कळली. ही वार्ता त्यांच्यासाठी धक्कादायक होती. भारत-पाकिस्तान यांच्या बोलण्यातून काश्मीर प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा मावळली होती. ते पुढे मुजफ्फराबादला न जाता रावळपिंडीला परत आले व तेथून नेहरूंचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नवी दिल्लीला परतले.

आपल्या हयातीत नेहरू हे कायम शेख अब्दुल्ला व काश्मिरी जनतेची आकांक्षा आणि आरेसेस-जनसंघ व त्यांना सुप्तपणे साथ देणाऱ्या कॉंग्रेससहित अन्य पक्षातील नेत्यांच्या स्वायत्तता विरोधी भूमिकेच्या कात्रीतच राहिले. भारतात राहू पण भारताच्या अधीन राहणार नाही ही शेख अब्दुल्लांची सुरुवाती पासूनची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका होती.  सामीलनाम्यात नमूद करण्यात आलेल्या गोष्टींव्यतिरिक्त भारताचा अतिरिक्त हस्तक्षेप नको ही शेख अब्दुल्लांची भूमिका आणि काश्मीरची सामीलनाम्यावर सही झाली म्हणजे तो इतर राज्यासारखा भारताचा भागच बनला किंवा बनायला हवा हे भारतातील सर्वसाधारण जनमत ही ती कात्री होती. . या कात्रीची धार कलम ३७० ला कॉंग्रेसची व संविधान सभेची मंजुरी मिळवून सरदार पटेलांनी बोथट केली. पण पुढे नेहरू सरकारच्या काश्मीर भुमिके विरुद्ध जनमताला चिथावणी देण्यासाठी संघ-जनसंघा सारख्या हिंदुत्ववादी शक्तींनी कायम कलम ३७० चा उपयोग केला तर दुसरीकडे नेहरूंनी काश्मीरच्या सर्वमान्य व सर्वोच्च नेते शेख अब्दुल्लांच्या आकांक्षा आणि स्वप्न चिरडण्यासाठी कलम ३७० चा वापर केला. यातून तयार झालेला गुंता सोडविला नाही तर परिस्थिती अधिकच बिघडेल ही जाणीव नेहरुंना झाली पण त्याला बराच उशीर झाला होता. पंडीत नेहरूंनी काश्मीर प्रश्नाचा अंत करण्याचा निर्धार केला तेव्हा परिस्थिती आणि प्रकृतीने साथ दिली नाही. त्यांचाच अंत झाला.

                                     (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------

सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल : ९४२२१६८१५८